शुक्रवारचे रात्रीचे ८. आठवड्याची सांगता नेहेमीप्रमाणे उशिरा झाली होती. अंधार पडला होता. कार्यालयातून गाडी बाहेर आणून उजव्या दिशेला काढली तर बरेच सिग्नल आणि वाहतुकीची कोंडी मिळू शकते. डावी दिशा पकडली तर थोडं पुढे गेलं की स्त्रिया नटून थटून रस्त्यावर दुतर्फा उभ्या असलेल्या दिसू लागतात. हे आता आम्हां सर्वांच्या सवयीचं झालेलं आहे. तरुण, मध्यमवयीन, प्रौढ. परकर पोलका, झगमगीत, रंगीबेरंगी लुगडं नेसून एकमेकींशी गप्पा मारत त्या उभ्या होत्या. काय फरक? ह्या कधीही न झोपणाऱ्या शहरात, स्त्रिया रात्रीबेरात्री; बस थांब्यावर, कार्यालयात, सिनेमा हॉलमध्ये नेहेमीच दिसून येतात. त्यात काहीच नवखे नव्हते. कोणाचा व्यापार बुद्धीचा तर कोणाचा शरीराचा. विचार स्पष्ट. गोंधळ काही नाही.
दोन दिवसांपूर्वीच घट बसले आहेत. सूर्यास्त झाला, काळोखाचे साम्राज्य वाढले की आता शहरात सर्वत्र गरबा चालू होतो. सगळीकडे रोषणाई. एक अभ्यास म्हणतो...नवरात्रीनंतर गर्भपाताचे प्रमाण वाढते. असो.
पुढे तीनचार गाड्या होत्या. वेग काही खास नव्हता. तो रस्ता ह्या दिवसांत देखील अंधारलेलाच. त्या कमी प्रकाशातही ते रंगीबेरंगी कपडे आणि ते रंगीबेरंगी चेहेरे उठूनच दिसत होते. जसजशी पुढे सरकले, ती रांग आटत गेली. तेव्हढ्यात डाव्या हाताला ती दिसली. चार फूट उंची. वय बहुधा सात किंवा जास्तीत जास्त आठ. पांढरा पोलका आणि गुलाबी तोकडा स्कर्ट. रंग सावळा कमी आणि काळाच अधिक म्हणता येईल. एका हातात कुठूनशी मिळवलेली एक फुटी काठी. दुसरा हात रिकामा. बाजूला तिच्याच वयाचा एक मुलगा. कमरेवर हात, नजर तिच्याकडे. चेहेऱ्यावर कौतुक. ती असे काय करत होती? गिरक्या घेत होती, काठी मोठ्या जोशात उडवत होती. आपल्याच धुंदीत. आपलं चित्रपटविश्व, हे मन वेडंपिसं करणारे धडे, अतिशय नेटाने देत असतं. तसेच ते तिनेही घेतले असावेत. ती गरबा खेळत होती. एकटीच. खरं तर त्या मुलाव्यतिरिक्त तिच्याकडे कोणीही बघत नव्हतं. पण मला मात्र त्याचं अस्तित्व जाणवलं. तो सैतान कुठे ना कुठेतरी होताच. तिच्याकडे बघत होता. त्याची ती वाईट नजर त्याच्या न दिसण्यातून सुद्धा मला जाणवली. तिचे हवेत फिरणारे चकचकीत काळे, लांबसडक बाहुच ते सांगत होते. जमिनीला स्पर्शही न करणारी पाऊलं तो नक्की बघत होता. ती अदाकारी...ते मुरडणं...ते त्या वयाला न शोभणारं मादक स्मित. कुठल्याही शाळेत तिच्या नावाची नोंद असण्याची शक्यता कमी. परंतु पैसे कमावण्याचे तिचे शिक्षण कधीच सुरु झाले होते. आणि ती पैसे उत्तम कमावणार हे तिची उडती पावलेच सांगत होती. कोण जाणे तिची माऊली कुठे होती!
पोटात खड्डा पडला.
पुढचा रस्ता मोकळा झाला.
माझी पांढरपेशी गाडी सफाईने पुढे निघाली.
मागे, मिट्ट काळोखात, समोरच्या आरशातून ती हळूहळू नाहीशी होत गेली...
12 comments:
हम्म्म्म...
so true but very sad too
'ti raang atat geli'...
.....ti nahishi zhali.
u seriously have started writing like a pro. Now if the book doesn't come out...u r being unfair.
सत्य बोचते...आणि कधी कधी आख्खेच्या आख्खे गिळून ही टाकते
...and I completely agree with Vandana
वंदू आणि श्रीराज, लोकं किती अभ्यास करतात आणि किती प्रचंड प्रमाणात लिखाण करतात! माझ्या पिल्लाला आत्ता कुठे चिमुकले पंख फुटलेत! :)
Avadla...and its true!!
एकदम अंतर्मुख केलं!
विद्याधर, ह्या अश्या तिथे अनेक कहाण्या जन्म घेतायत.
निलेश, धन्यवाद.
सौरभ आणि सौमित्र, धन्यवाद....भेट दिल्याबद्दल आणि कमेंटल्याबद्दल. :)
विनोदी लेखन कधी येतंय याची वाट बघतोय म्या...
:) म्हटलं ना संकेत, ठरवून विनोद कसा बुवा मारायचा!? :)
Post a Comment