नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 14 October 2010

तू तू...मैं मैं

रविवारची दुपार. ऑफिस बरे असे वाटण्याइतके काम संपवून केतकी आवारात आरामखुर्ची टाकून नुकतीच विसावली होती. १० बाय १० च्या दोन खोल्या नावावर असणे हे मुंबईसारख्या उतू जाणाऱ्या शहरात मोठी जमेची बाजू. मात्र हे समोरचं चिंचोळ आवार तिचं अगदी लाडकं. रविवारी दुपारी अख्खी चाळ जेव्हा वामकुक्षी घेत असते तेंव्हा, त्या शांततेत एखादं पुस्तक वाचून काढावं. सुखाच्या केतकीच्या कल्पना तश्या फार डोईजड नव्हत्या.

हिरवट, लाकडी कठड्याला लागून तिने लहानपणीच डालडाच्या डब्यात लावलेली गुलबक्षी, रंगीबेरंगी गुलाबाची रोपे, तिला अजूनही साथ देतच होती. वडिल ती कॉलेजला असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने गेले होते. अर्धा सोडलेला त्यांचा संसार पुरा करताकरता तिची चाळीशी जवळ आली होती. धाकट्या बहिणीला, मिनूला, उच्चशिक्षित करून, लग्न लावून दिलं तेव्हां आईने केतकीच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला होता. आईने कितीही लपवले तरी देखील तो एक लबाड अश्रू केतकीशी फितुरी करूनच गेला.

केतकीने हातातील पुस्तक अर्धवट बंद करून पोटावर ठेवलं आणि दूर शून्यात नजर टाकली. शून्याचं एक बरं असतं, कुठेच नजर आपटत नाही....आता वाचायचा चष्मा लागला असला तरी देखील दूर जितकं शक्य असेल तितकं हिचं शून्य खोल. चाळीचं कौलारू छत वरून खाली आलं होतं. आणि त्याने आपोआप दिसणाऱ्या चित्राला एक नक्षीदार चौकट तयार झाली होती. कुठेतरी केतकीला जाणवलं, कोणीतरी बघतंय. टक लावून. शोधात नजर पुन्हा वर पोचली, तर छपरावरून कबुतर डोकावत होतं. करडं, गुबगुबीत. उन्हात बसलेलं. खालून केतकीला कबुतर दिसत होतं, फक्त छातीपुरतं. एक क्षण नजरानजर झाली आणि त्याने नजर फिरवली. पण केतकीची नजर तर गुंतून पडली. त्याच्या गळ्यावर. ती काय नजर हलवणार? कबुतराच्या गळ्यात हे काय होतं? लक्षलक्ष रंग. निळा, हिरवा, पोपटी, मोरपिशी. किती छटा. कोणा राणीच्या गळ्यातील कंठमणी फिका पडेल इतका लाख मोलाचा. वेळावणाऱ्या मानेवर चपखल बसलेला. आणि मग काय तो तोरा? केतकीला त्या नखऱ्यावरूनच जाणवलं, ती कबुतरी होती. तो तोरा एका स्त्रीचाच असू शकतो. गळ्यात एव्हढा सुंदर दागिना आणि कोण मिरवणार? बहिणीच्या लग्नाच्या खरेदीवेळी, कितीदा केतकी गेली होती सोनाराकडे. किती ती मिनूची, आवडनिवड. शहरातले सगळे सोनार पालथे घातले होते. पण हा असा दागिना? नव्हता कुठेच दिसला. त्यावेळी केतकीची नजर, एकदाच अडकली होती एका हिऱ्यामाणकांच्या चिंचपेटीवर. लालबुंद माणकं बसली होती तारकांच्या कोंदणात. केतकीने तो गळ्यात घालून देखील बघितला होता. आरसा अगदी हलकंच हसला सुद्धा. परंतु, पैसे जरी केतकीचे असले तरी लग्न मिनूचं होतं, खरेदी तिची होती. अपराधीपणाच्या भावनेने दुसऱ्या क्षणाला ती ठसठशीत चिंचपेटी पुन्हा पेटीत गेली होती.

मादक कबुतरीला केतकीच्या नजरेतील हेवा जाणवलाच होता जसा काही. मुद्दाम मान वर खाली. डावीकडे उजवीकडे. उन्हाचा तो खेळ आणि रंगांची ती चमक. मोराच्या लांबसडक पिसाऱ्याची गंमत वेगळी आणि कबुतरीच्या ह्या दागिन्याचे सौंदर्य वेगळे. सावळे शरीर आणि सावळ्या मानेवर हा खुलता हार. लाल मादक डोळे आणि आरपार नजर. केतकीला जाणवला तो कबुतरीचा गर्व. जेव्हा आपल्या शक्तीची जाणीव असते तेंव्हाच हा गर्व स्त्रीच्या नजरेनजरेतून समोरच्यावर मारा करतो. समोरच्याला गारद करतो. कबुतरीची मानसिकता तिला दुरून जाणवली. पुन्हा नजरानजर आणि केतकीने अपरं नाक उडवलं. कबुतरीने नजर रोखली. केतकीने नजर नाही हटवली. आता काय ही कबुतरी देखील तिच्यावर वर्चस्व दाखवणार होती? केतकीने नाक मुरडले. मान उडवली. काही क्षणांचा खेळ. तेव्हढ्यात कुठून गुटूरगुर कानी आलं. कबुतरीने मान वेळावली. पाय थरथरवले. पंख पसरले. कौलं सोडली. तोऱ्यात भरारी घेतली तेव्हा गिर्रेबाज कबुतरीबरोबर तिचा जोडीदार होता. कबुतरीला आता सगळं जग थिटं. बुटकं. आणि गिरकी घेण्याआधी केतकीच्या गुलबक्षीवर, पांढरीशुभ्र रांगोळी टाकायला ती नव्हती विसरली.

आता मात्र केतकी हरली. पुस्तक खुर्चीत आपटून ती उठली. म्हातारी आई दरवाज्यात येऊन उभी राहिली तेंव्हा केतकी मन लावून गुलबक्षीला अंघोळ घालत होती.
"काय गं? काय झालं?"
"काही नाही गं. हे कबुतर! घाण सगळी!..... एक काय कमी होतं, म्हणून आता जोडीदाराला घेऊन आलं!"

16 comments:

सौरभ said...

कबुतर... एका जोडप्याने आमच्या गॅलरीत छान जागा हेरुन घरटं बनवुन दोन अंडी टाकलेली. मी एकाचं नाव "ऑम्लेट" आणि दुसऱ्याचं "भुरजी" ठेवलं होतं. ह्यॅह्यॅह्यॅ. काचेवर फाडफाड आणि झोपेच्या टायमाला गुटर्गु करायचे. जाम वैताग यायचा. ती कबुतरंपण अशीच होतं. पण त्यांचा असा तोरा आपल्याला कधी निरखता आलाच नाही. आणि पाहिला असला तरी "सुंदर" ह्या शब्दापलिकडे जाऊन कधीच वर्णिता नाही. :( भोवतालच्या गोष्टींचं एवढं बारीक निरीक्षण आणि त्यांना सफाईने रोजच्या जीवनातल्या साध्यासाध्या घडामोडींशी सांधायची पद्धत!!! वाहव्वा!!! खरच सुरेख!!! अल्-ब्रिलिआन्ते!!! :)

Shriraj said...

अप्रतिम!! निव्वळ निव्वळ अप्रतिम!!! आणि शेवट वाचताना तर हसायलाच आलं :D सही आहे!!

rajiv said...

कबुतराच्या गळ्यात हे काय होतं? लक्षलक्ष रंग. निळा,हिरवा , पोपटी, मोरपिशी. किती छटा. कोणा राणीच्या गळ्यातील कंठमणी फिका पडेल

`काय भारी निरिक्षण आहे केतकीचे ..! :)

पुन्हा नजरानजर आणि केतकीने अपरं नाक उडवलं. कबुतरीने नजर रोखली. केतकीने नजर नाही हटवली. आता काय ही कबुतरी देखील तिच्यावर वर्चस्व दाखवणार होती? केतकीने नाक मुरडले. मान उडवली. काही क्षणांचा खेळ.


वाटले आता महाभारत बघायला मिळणार ....
दोन्ही बाजूंनी नेत्र बाणांची मारामारी ......

पण नाही ते भाग्य लाभले आम्हला.

छानच लिहीलीयेस कथा .!
त्यातील नाजूक कंगोरे पण खूप काही सांगून गेल्येत.
केतकीच्या व्यथेसहीत...:(

Anagha said...

अरे श्रीराज! ती माझी केतकी बिचारी एकटीच आहे आणि तुला हसायला का येतंय??? :)

Anagha said...

सौरभ, प्रसंग शब्दांत गुंफायचा प्रयत्न चालू आहे....जमतंय असं वाटतंय...हो का?

Shriraj said...

Sorry Sorry!!! mla tya kabutaraacha hasaaylaa aala ga!!!

सौरभ said...

जमतंय असं वाटतंय!!?? अगदी घट्ट गोड दही जमल्यासारखं जमतय. :)

Anagha said...

hehe!! श्रीराज! :D

akhalak said...

वाह वाह , फार छान, प्रत्येक लिखाण वाचताना शेवटचा twist काय असेल हेच वाटत असते, आणि तो इतका भन्नाट असतो कि थोडावेळ मन विचार करेल लागत .

THEPROPHET said...

दोन वरवर अगदी वेगळी वाटणारी जगं कसली मस्त गुंफलीयत एकामेकांत!!
अप्रतिम!!!!!

Anagha said...

विद्याधर, प्रयत्न तोच होता! धन्यवाद! :)

Anagha said...

अखलक, आभार! :)

Raindrop said...

:) absolutely beautiful and touching. one can see that it has taken time to write because there is not even one sentence which is unnecessary....every word....every sentence is carved beautifully and then kept one over the other to construct the beautiful structure of this story.

mast aahe :)

Anagha said...

धन्यवाद वंदू! :)

juikalelkar said...

खरच ग
केतकी खुप एकटी आहे............

Anagha said...

जुई!