आज सकाळीच कविताने कपाटे साफ करायला घेतली होती. बरेच दिवस झाले होते. वेळ नव्हता मिळाला. खरं तर फक्त वेळ हे काही कारण नव्हतं. कपाट उघडा आणि त्यातील आठवणींच्या बाणांचा घनघोर वर्षाव अंगावर घ्या... ह्यासाठी तिच्याकडे आता शक्तीच उरलेली नव्हती. कवचकुंडलं कधीच गळून गेलेली होती. पण मग कोळ्यांचं फारच फावलेलं दिसत होतं. सगळीकडे कोळिष्टकं. म्हणतात ना एकाच्या दुःखात दुसऱ्याचे सुख!
लेकीला बाबापुता करून, आठवडाभर गोडगोड बोलून मदतीला तयार केलं होतं. तिने कपाट उघडलं. एकेक गोष्टी खाली यायला सुरुवात झाली. एखाद्या उंच किल्य्यावरून प्रचंड मोठ्या आकाराच्या पाषाणांचा जसा माराच. सरलेली वर्षं जडशीळ होऊन खाली आदळत होती. कविताचे हात प्रयत्न करत होते...वजन हृदयावर पेलण्याचा.
प्रथम दगड...बालपणातील जपून ठेवलेली जिवलग सख्यांची पत्रं. कुठून कुठून पाठवलेली. कविता कधी उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी गेलेली असता...'तुझी खूप आठवण येते...कधी परत येणार तू?' तर कधी, 'अगं तू नाहीस आणि पत्ते रंगतच नाहीत.' 'लगोरी नीट लागत नाही...सुट्टीत आपण सायकल शिकणार होतो.' सगळ्याच तक्रारी, मनापासून केलेल्या.
लेक वरून दगड फेकण्यात मश्गुल होती. कविताच्या डोळ्यांतील पाणी नाहीतरी त्या जाड्या चष्म्याआडून पटकन दिसतच नाही.
दुसरा दगड...कविताच्या वडिलांचा... त्यांना शेवटचे हॉस्पिटलमध्ये ठेवले गेले. सगळीकडून नळ्या लावल्या गेल्या. त्यांना बोलता येईना...ते बोलत असूनही कविताला वडिलांचे शब्दच कळेनात. धावत जाऊन परिचारीकेच्या हातून कागद आणि पेन आणलं. बाबांच्या हातात दिलं. वेडेवाकडे शब्द बोलले...'मला पुस्तक वाचायचंय नळ्या कधी काढणार?'
आला...तिसरा दगड आला. कवितेच्या नवऱ्याचा. लेकीने तिच्या आईबाबांची प्रेमकहाणी कवितेच्या हातात दिली. कॉलेज चुकवून बघितलेल्या चित्रपटांची तारीखवार यादी..."आई, हे तुझं म्हणजे ना, त्या 'दिलं चाहता है' मधल्या सोनाली कुलकर्णीच्या बावळट बॉयफ्रेंड सारखंच दिसतंय! काहीही लिहून ठेवलंयस!!" त्याचा मोबाईल, त्याची टोपी, त्याने पाठवलेली कॉलेजमधील हळुवार पत्र...
सगळे दगड खाली आले. साफ केले...वर ठेवायला लायक केले.
"आई, हे असं सगळं किती दिवस जपायचंय?"
"तूच सांग बाई. देऊया का आजच फेकून? बोलावते मग रद्दीवाल्याला."
पलंगावर बसून लेकीने कविताकडे आणि खोलीभर अस्ताव्यस्त पसरलेल्या सामानाकडे नजर टाकली.
"नको. राहू दे. वर चढते मी परत. दे तू एकेक मला."
कवितामध्ये अजून त्राण नव्हतं आलं. दगड परत उचलण्याचं.
"अगं, मला वाटतं आपण असं करूयात का?"
"काय?"
"हे ना, आपण आत्ता असंच परत ठेवून देऊ. आणि ना, तुझं कधीतरी लग्न होईल...तुला मुलं होतील...मग आपण ना, त्यांनाच सांगू हे सगळं रद्दीवाल्याला द्यायला. म्हणजे आपण हे सगळं त्यांना कधी दाखवूयाच नको. आणि तुझी मुलं तर काही त्यांच्या आजोबांना आणि पणजोबांना ओळखणारच नाहीयेत ना! कारण त्यांनी त्यांना कधी बघितलेलंच नसणार! मग त्यांना हे सगळं फेकून द्यायला ना काहीच नाही वाटणार!" एका दमात कविताने बोलून टाकलं.
लेक तिच्या चेहेऱ्याकडे बघत राहिली. आजचं मरण हे आपल्या आईने, आपल्या मुलांवर टाकलेलं तिला कळून चुकलं. अजून लग्नाचा ना थांगपत्ता आणि...
"बरं, माते! तसंच करूयात आपण. नाहीतरी हे मलाही नाहीच शक्य...आजोबांच्या आणि बाबाच्या गोष्टी रद्दीत टाकून देणं! माझ्या पोराबाळांना काय फरक पडणार आहे!"
मायलेकींनी न जन्मलेल्या जीवांवर, मोठीच जबाबदारी टाकून, आठवणींची बोझी पुन्हां बांधायला घेतली.
12 comments:
hmmm...
>>मायलेकींनी न जन्मलेल्या जीवांवर, मोठीच जबाबदारी टाकून, आठवणींची बोझी पुन्हां बांधायला घेतली
आणि तुम्ही कुठलंतरी अज्ञात ओझं वाचकांवर टाकून पुढची पोस्ट लिहायला घेतलीत! :)
हो ना विद्याधर? झालं खरं असं! नाही काही करू शकले. :(
वंदू...
खरं हां...घराची आवराआवर करताना हे असंच होतं...जुन्या वस्तू फेकायला अत्यंत जीवावर येतं!
श्रीराज, म्हणजे आपण भूतकाळातच अधिक जगतो! नाही का?
kharay! :)
विद्याधर छान कमेंटलास :)
सौरभ, ओझी थोडी वाटून घ्यावी म्हणतात. :)
इतके दिवस विचार करते आहे मी ... काय म्हणू तुझ्या या पोस्ट वर? अगं, हे सगळे शेवटी दगडच ना? यातच आपण इतके गुरफटून जातो कधी कधी, की किती ओझी उगाचच वाहतो आहे याचं भानच राहत नाही! ते टाकून द्यायची शक्ती येईल तो खरा मुक्त होण्याचा दिवस.
किती दिवसांनी बोलतेयस अगं!! मी आपली लिहिते आणि तू काही बोलतच नाहीस! :(
आणि भूतकाळात जगायची ही ना एक वाईट खोडंच आहे!
अनघा, अगं मधून मधून मी अशी हरवत असते. कधी काम खूप असतं, कधी दुसराच काहीतरी उद्योग चाललेला असतो, कधी लिहायला सुचतच नसतं. मग पुन्हा गाडं रुळावर आल्यावर अशी उशिरा कॉमेंट टाकते. :)
Post a Comment