नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 4 September 2010

स्वप्न

वय वर्ष बहुतेक १२-१3.
गादी घालावी आणि दिवसभराच्या दंगामस्तीने थकूनभागून झोपून जावं. स्वप्ननगरीत पऱ्यांशी भेट व्हावी. त्यांच्याबरोबर उडावं. बागडावं.
पण नाही! माझ्या स्वप्नात रोज माझं कोण ना कोण तरी मरायचं!! धाकट्या बहिणींपैकी कोणी एक नाहीतर माझे बाबा!
रोज!! नेमाने!! नुसता छळ मांडला ह्या भुतांनी माझा. जरा गाढ झोप लागायची खोटी की झालं...धाकटी बहिण नाहीतर बाबा एकदम ऑक्सिजनवरच दिसायचे! जोरदार भोकाड! सगळ्यांची झोपमोड. मग बाबा जवळ घ्यायचे आणि थोपटवत मला शांत करत झोपवायचे! बराच वेळ म्हणे माझे हुंदके चालू असत.
तर एक दिवस रात्रीची ती रोजची वेळ आली...माझी बहिण ऑक्सिजनवर ठेवली गेली! मी दचकून जागी झाले. नेहेमीच्या सवयीने हंबरडा फोडला. जाऊन बहिणीला मिठी मारली! ती रोजच्या ह्या कटकटीने इतकी वैतागली होती कि मी तिला मिठी मारायची खोटी, तिने एकदम लाथा झाडायला सुरुवात केली!! बाबा धावले आणि मला त्या लत्ताप्रहारापासून दूर करून जवळ झोपवलं.

त्यानंतर मात्र माझ्या हुशार बाबांनी एक उपाययोजना आखली. त्यांच्याकडे एक दुमडता येणारा चाकू होता. तो त्यांनी माझ्या उशीखाली ठेवायला सुरुवात केली. म्हणाले,"आता बघ. तुला अजिबात वाईट स्वप्न पडणार नाहीत! दुष्ट शक्ती आल्याच तर ह्या चाकूला बघून पळून जातील." कोकणातील तो म्हणे जालीम उपाय आहे! रोज मी अगदी नित्यनेमाने तो चाकू उशीखाली ठेवून निश्चिंत मनाने झोपी जायला सुरुवात केली.
आणि काय सांगावं? ती दुःस्वप्न कुठे पळून गेली ती आजतागायत नाही फिरकली! बाबांच्या जादुई चाकूला सगळी भूतं घाबरली!

पुढील कालावधीत एक घडलं....
एक दुःस्वप्न सत्यात उतरलं...

7 comments:

Raindrop said...

maybe coz u grew up and needed that chaku more in the kitchen. with no one to remind u to keep it back under the ushi...one of the dream bhoot made its way back :(

vaibhav_sadakal said...

शेवटची ओळ मनाला चटका लावून जाते........

सौरभ said...

:( believe in reincarnation...

Anagha said...

सौरभ, पुनर्जन्मावर विश्वास ठेवावा असं वाटत खरं. पण मग असंही असतं ना...की त्या माणसाबरोबरचे ते नाते संपले...मग त्यांनी परत जन्म घेतलाही असेल कदाचित पण मग मला कसं कळणार की ते आता कुठे आहेत?

रोहन... said...

मला सुद्धा भन्नाट स्वप्न पडतात अजून सुद्धा... :) चाकू ठेवून बघतो.. :D

Anagha said...

रोहन, ठेवतोयस ना चाकू?? मनाशी माझ्यासारखा विश्वास धरून ठेव हो! मग होतील सगळी भीतीदायक स्वप्न क्मी!! :D

रोहन... said...

चाकू ऐवजी चिकू ठेवू का गं?? भूक लागली की पटकन खाता तरी येईल.... हा हा :D