नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 20 September 2010

आभार...

परकं शहर, हॉटेलचा नववा मजला, खोलीतील काचेची बंद खिडकी आणि भर दुपार. एक स्तब्धता त्या वेळेला होती. एखाद्या नीरस भिंतीवर लटकलेले चित्र जसे. स्थिर, अचल. श्वास घेताना देखील त्या क्षणाची, तंद्री मोडण्याचे भय. नजरेसमोर उजव्या हाताला न संपणारी पिवळट चकचकीत भिंत. त्या भिंतीपलीकडून उरलेल्या चौकटीत डावीकडे वर बघावे, तर स्टार्च केलेली नवीकोरी चादर पसरावी असे निळे आकाश. त्यात घुसलेल्या, जमिनीशी कधीच नाते तोडलेल्या उंच आणि टंच इमारती. खाली नजर टाकावी तर न हलता रस्ता. सगळेच वातावरण गंभीर. श्वास मंदावला. पापण्या अडकल्या. सगळं रितं. हृदय मात्र भरलेलं.

कुठेतरी हलकीच हालचाल जाणवली. भय दाटलं. कळेना कोण हललं? कोण होतं ते? मानही न हलवता फक्त नजर हलवली. काही दृष्टीक्षेपात नव्हते. ना खिडकीला पडदे. वातानुकूलित खोलीत ना पंखा. मग? मान वर केली. आकाशात नजर टाकली. हो. तिथेच तर हालचाल होती. हलकी. जाणवेल न जाणवेल अशी. खिडकीच्या डाव्या विंगेतून कोणी चोर पावलाने तिथे दाखल होत होते. पांढरेशुभ्र. ती परी का होती? पांढऱ्या कपड्यात, त्या निळ्या मंचावर दाखल झाली होती? नाजूक पंख असलेली? एकटी? नाही. ती एकटी नव्हती. मागोमाग तिच्या हळूहळू एकेक दाखल झाले. तसेच पांढरे. त्यांच्या एकुलत्या एका प्रेक्षकाकडे बघत. पायाच्या टाचेवर. बॅले. सर्वप्रथम आलेली परी होती त्यांची नायिका. आणि ते होते तिचे राखणदार. तिचा लांबच लांब पसरत जाणारा झगा हातात उचलून तिच्या पाठी येणारे तिचे बुटके. स्नो व्हाईट आणि सात बुटके. कसलीच घाई नाही. कोणाचीच लगबग नाही. नाट्य संपवायची कोणालाच घाई नाही. त्यांचा रंगमंच मोजून दोन वार. डाव्या विंगेतून प्रवेश करावा आणि भिरभिरत, नृत्य करत उजव्या विंगेतून नाहीसे व्हावे. कधी ती स्नो व्हाईट तर कधी सिंड्रेला. हा इवलासा प्रवेश. परंतु त्यात किती संगीत? किती नाट्य? काय ती नजाकत? अहाहा!

अचानक जमिनीवर हालचाल झाली. नजर खाली टाकली. एक लालचुटुक गाडी सुळकन निघून गेली. मान उंचावली. मंच रिकामा होता. ते ढग त्या भिंतीमागे नाहीसे झाले होते. निळा पडदा पुन्हा स्थिर होता.

नाही माहित नाट्य किती क्षणांचं होतं. नाही माहित किती काळ श्वास रोधला होता. पण जेंव्हा ते नाट्य संपले तेंव्हा त्या जीवघेण्या स्तबद्धतेतील भय पळाले होते. हसू आलं. लक्षात आलं. त्या ढगांच्या प्रवेशासाठीच तर ती गूढ शांतता पाळली गेली होती. त्या पूर्व शांततेशिवाय त्या अतिसुंदर नृत्यात काय आनंद? न्यू यॉर्क शहरात 'लायन किंग' ब्रॉडवे पहाण्याचा योग आला होता. त्याची आठवण झाली. अप्सरा, किन्नर, गंधर्व अवतरले होते. किंवा तो त्यांचा रोजचा दिवस होता....आम्ही तिथे पोहोचलो होतो. रंगमंच मोठा. प्रेक्षकवर्ग प्रचंड. तिथे जमलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला अंगावर रोमांच उमटवण्याचा अनुभव, एकत्र देण्याची किमया काही अगाध. इथे चिमुकला रंगमंच. प्रेक्षक फक्त मी. अनुभव मात्र तोच. अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी.

रिकाम्या आकाशात मी पुन्हा बघितले.

मला कळले. त्याला माझे एकटेपण जाणवले होते. मनात दाटून आलेले भय, त्याला दुरून जाणवले. त्याने मला एकटे नाही टाकले. ढगांना धाडलं. माझ्यासाठी. ते ढग तो अलौकिक खेळ, काही क्षणांत करून गेले.
मन भरून आलं. डोळ्यांत अश्रू आले.

आभार. देवा, तुझे शतशः आभार.

12 comments:

सौरभ said...

सुरेख... हि शब्दांची चित्रकारी कमाल झालीये. खिडकीत मीच उभा असल्यासारखं वाटलं. कमाल... खरच कमाल...

Anagha said...

धन्यवाद सौरभ... :)

rajiv said...

तसेच पांढरे. त्यांच्या एकुलत्या एका प्रेक्षकाकडे बघत. पायाच्या टाचेवर. बॅले. सर्वप्रथम आलेली परी होती त्यांची नायिका. आणि ते होते तिचे राखणदार. तिचा लांबच लांब पसरत जाणारा झगा हातात उचलून तिच्या पाठी येणारे तिचे बुटके. स्नो व्हाईट आणि सात बुटके....
अचानक जमिनीवर हालचाल झाली. नजर खाली टाकली. एक लालचुटुक गाडी सुळकन निघून गेली. मान उंचावली. मंच रिकामा होता. ते ढग त्या भिंतीमागे नाहीसे झाले होते. निळा पडदा पुन्हा स्थिर होता...



पेन हातात धरून चित्रांप्रमाणे ` शब्दचित्रे' रंगविण्याचे कौशल्य परत दिसून आलेय .
फक्त ह्या चित्राला एक करड्या रंगाची चौकट आहेय :(

Shriraj said...

जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज असते तेव्हा न मागताच देव ती देतो...हो ना?

Anagha said...

किती खरं श्रीराज...

BinaryBandya™ said...

सुरेख ...
एकटेपणाला जेंव्हा ढगांची साथ लाभते ..
तेंव्हा कागदावर असे काहीतरी भन्नाट उतरणारच ...

Anagha said...

:)
धन्यवाद बायनरी बंड्या.

THEPROPHET said...

शब्दचित्र नावाचा प्रकार म्हणतात तो हाच का?

Guru Thakur said...

tuzya shabdakarila daad dyayla mazya kade shabd nahit ata...nave shabd shodhtoy..

Anagha said...

'गुरु'जी, आपण आलात, प्रतिक्रिया दिलीत...आनंद झाला! :D

Anagha said...

The Prophet, ह्या पोस्टवर सगळ्यांचीच अशी 'शब्दचित्र' म्हणणारीच प्रतिक्रिया आलीय..नाही का? म्हणजे मला मधेच विसर पडतोय वाटतं, कि आपण चित्र काढत नाहीयोत, तर निबंध लिहितोय!!! :D

Anagha said...

शब्द किंवा चित्र....दोन्ही मनातील भावना व्यक्त करणारे आविष्कार....तुमच्यापर्यंत त्या पोचल्या, भावल्या तर मला आनंद आहे....
:)