Saturday, 28 August 2010
बीजिंग- दिवस पहिला
प्रवासावरून परतल्यावर मागे वळून बघितलं की केलेल्या प्रवासातील आनंदाचा उत्तुंग क्षण काय होता ह्याचा विचार माझ्या मनात नेहेमीच येतो. जमिनीकडे वेगाने झेपावणारा, नजरेत न मावणारा पांढराशुभ्र नायगारा धबधबा, ग्रँड कॅननचं अफाट पसरलेलं लालबुंद रूप, बालीमधील बतूर ज्वालामुखीच्या शिखरावरून दिसणारे झाडांचे जळके काळे उभे सापळे आणि त्यातूनही नव्याने पसरलेला हिरवागार रंग, इजिप्तमधील रखरखीत वाळवंटातील ती आकाशात घुसलेली पिवळी टोकं, सायप्रसमधील चारशे वर्षांचा इतिहास सांगणारी त्या घरची सून आणि बँकॉकमधील हातावर डोके रेलून विसावलेला बुद्ध. हे सगळेच कधी विलोभनीय तर बऱ्याचदा पृथ्वीवरील मनुष्याच्या क्षुद्र अस्तित्वाची जाणीव करून देणारे क्षण.
आता बॅगा रिकाम्या झाल्या. पुन्हा वर कपाटांवर जाऊन बसल्या. खाष्ट सासूला शोभेल अश्या आवेशात टाकलेल्या मळक्या कपड्यांच्या ढिगाऱ्याचा वॉशिंग मशीनने फडशा पाडला. आणि मग कालच संपवलेल्या चीन प्रवासाकडे नजर टाकली. ती लांबचलांब भिंत अजगरासारखी परत एकदा माझ्या डोळ्यांसमोर सरपटली.
त्या भिंतीला शेवट काही नाही. चढत जावं आणि वाटलं कि खाली उतरावं. शिखर पार केलं किंवा एखादा किल्ला सर केला अशी मावळी विजयी भावना मिळण्याची इथे सुतरामही शक्यता नाही. भिंत पूर्वेला सुरु होते आणि पश्चिमेला कुठेतरी समुद्राला जाऊन भिडते. पाण्याची छोटी बाटली, गळ्यात अडकवलेला कॅमेरा आणि डोक्यावर टोपी एव्हढी सामुग्री पुरेशी.
अशी एखादी सामुदायिक मोहीम हातात घेतली कि काहीतरी वीरश्री अंगात शिरते. देशोदेशीचे सहस्त्र सहप्रवासी आणि दिशा एकच. कोणी चिनी, कोणी जपानी, कोणी ब्रिटीश तर कोणी इटालियन. वेगवेगळे रंगरूप, वेगवेगळी भाषा. एखादं वृद्ध जोडपं एकमेकांना आधार देत तर कोणी प्रेमी युगुल एकमेकांना बिलगून. वरून माथ्यावर आपटणाऱ्या उन्हाची तमा न बाळगता, कोणी चिनी झाशीची राणी आपल्या लालबुंद गोबऱ्या गालांच्या नारायणाला पाठीशी बांधून ह्या प्रवासाला निघालेली. तर तिघी इटालियन मैत्रिणींना एकत्र भिंत सर करायची होती. हे सगळं बघतबघत चढत असताना थकण्याचा तर प्रश्न नव्हताच.
"मी आता उभा आहे ग्रेट वॉलच्या पायऱ्यांवर."
वळून मागे बघितलं तर त्या शब्दांचा उगम एका पाठीतून होता. ती पाठ कोणाची आहे ह्याचा शोध घेण्यासाठी तीनचार पायऱ्या खाली उतरले.
"अहो, तुम्ही आत्ता मराठीत बोललात का?" साहेब भिंतीची दुसरी बाजू न्याहाळत होते.
वळले. दिसायला पक्के मराठी. नाकावर चष्मा. वय अंदाजे पस्तीस.
"हो. मी मराठीच आहे"
"पण तुम्ही एकटेच का बोलताय?" ह्याला चोंबडेपणा नाही म्हणावे तर काय म्हणावे?
साहेबांनी खाली सोडलेला उजवा हात वर घेऊन मला हँडीकॅम दाखवला.
"अहो, मुलं नाहीयेत हे बघायला. त्यांच्यासाठी म्हणून शूट करून नेतोय!"
"अरे व्वा! हे छानच की! काय आडनाव तुमचं?" मी पाठ सोडली नाही.
"मी परांजपे. ठाण्याचा. आमच्या कंपनीची शांघायला काँन्फरस होती. त्यासाठी चीनला आलोच होतो म्हणून म्हटलं ही भिंत बघून जावं." अधिक प्रश्न येण्याच्या भीतीने मला वाटतं साहेबांनी संभावित सर्व प्रश्नाची उत्तरे एका दमात देऊन टाकली.
"अच्छा. एव्हढी दमवणूक होईल असं वाटत तरी नाहीये नाही का? किती वर चढायचा विचार आहे?" ह्यांची उत्तरे तरी देखील मला नव्हतीच मिळाली!
"नाही हो. माझं वीस किलोंचं तर पोटच आहे. तेव्हढं वजन घेऊन जेवढं जमेल तेव्हढं चढेन म्हणतो." आता ह्यावर 'खरं आहे' असं म्हणायची खरं तर काहीच गरज नव्हती. नाही का?
"खरं आहे. चला मी लागते पुढच्या रस्त्याला"
"हो.हो. निघा तुम्ही."
"मुलांनो, आत्ताशी तर पहिलाच टप्पा आपण पार केलाय. अजून बरंच चढायचंय बरं का!"
माझा मराठी सहप्रवासी पुन्हा हँडीकॅममध्ये तोंड घालून बोलू लागला.
आणि मी वळून दूरदूर दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या भिंतीवरून सरपटू लागले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
8 comments:
याला मराठी चोम्बडेपणा म्हणून ओळखले जात असले तरी याला परदेशीय व परप्रांतीय प्रांताभिमान व प्रांतीय एकता म्हणून नावाजतात. तेंव्हा ....... अभिमान असावा मराठीचा व एकतेचा !
राजीव, मला एकदम अनोळखी माणसाला 'तुम्ही एकटेच का बोलताय' हे विचारण्यात थोडा विनोदी चोंबडेपणा अभिप्रेत होता. बाकी काही नाही.
एक इंच ही न हलता आम्हाला चायना पाहायला मिळणार आहे तर! :)
श्रीराज, थोडं तरी दाखवलं का मी चीन तुम्हांला?
अनघा, दिसला आणि थोडा कळला ही...मला चीनचा इतिहास अजिबातच माहीत नव्हता. तुझे पोस्ट वाचताना काही नवीन गोष्टी कळल्या.
श्रीराज, मी ना ज्या ज्या देशात जाते ना त्या त्या देशाची माती घेऊन येते....आता ही वेगवेगळी माती एकत्र करून त्यात झाड लावलं तर ते वाढेल का छान? :)
कल्पना छान आहे! :) करुन बघायला काय जातंय आपलं!! ;)
काय जातंय म्हणजे?! अरे, माझी सगळी माती जाते ना!!! :)
Post a Comment