Monday, 30 August 2010
चिनी चहा
मी बघितलंय जी लोकं चहा पितात त्यांना ज्या चवीचा चहा ते पीत आले आहेत त्या चवीव्यतिरिक्त कुठल्याही चवीचा चहा चालत नाही. आईच्या हातचा, बहिणीच्या हातचा, मावशीच्या हातचा, बायकोच्या हातचा, नवऱ्याच्या हातचा, कुठल्या भय्याच्या हातचा, टपरीवरचा कटिंग चहा, कॉलेजच्या कँटिंनचा चहा... प्रत्येकाची वेगवेगळ्या तऱ्ह्येची स्वतंत्र यादी असते. आणि मग समजा दुसऱ्या कुणी धैर्य एकवटून त्यांच्यासाठी चहा बनवलाच तर तो कसा बेचव झालाय हे, ही लोकं कुठलाही आडपडदा न ठेवता अगदी खुल्या दिलाने सांगून टाकतात. पुढील सर्व विधाने ह्याचीच ग्वाही देतात! "तू चहा जास्त उकळलास." " तू कमी उकळलास." "तू साखर कमी घातलीस." "तू साखर जास्त घातलीस." " दुध कमी घातलंस" " दुध जास्त घातलंस." " दुध म्हशीचं आहे का? मला गाईचं आवडतं!" "दुध शीळं आहे वाटतं?" "शी! साय पडलीय!" "साय का काढून टाकली? छान लागते चहात साय!"
चिनी चहाचा आस्वाद घेताना मला ह्या चहाधर्मीय लोकांची तीव्रतेने आठवण आली.
गुबगुबीत 'ली' आम्हाला पाच प्रकारच्या चिनी चहाची ओळख मोठ्या अभिमानाने करून देत होती. चिनी इंग्रजीत. "चहा. मॅडम, चहा हा आमचा धर्म आहे. चहा ही आमची संस्कृती आहे. चहा हा आमचा इतिहास आहे. आणि चहा ही आमची करमणूक आहे." शाळेतील सर्व पुस्तकांच्या सुरुवातीला एक प्रतिज्ञा असे. 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.' मला ही प्रतिज्ञा ज्या तालात आम्ही मोठ्या अभिमानाने म्हणायचो त्याची आठवण झाली.
पाण्याच्या तापमानाची परीक्षा करणारे एक छोटं प्लास्टिकचं बाळ तिने सर्वप्रथम पुढ्यात घेतलं. ह्या बंड्याचे नाव 'पी-पी-बॉय'. किटलीतील पाणी त्या बाळाच्या डोक्यावर ओतलं आणि काय सांगावं! त्या बाळाने 'शू' केली! म्हणजे म्हणे पाणी उत्तम गरम झालेलं होतं! पहिली चव आम्ही घेतली ती त्यांच्या लाडक्या चहाची. 'जास्मिन' चहा'ची. छोट्याश्या नाजूक कपातून तिने तो आम्हांला चाखवला. दुधविरहित. मी चहा पीत नाही. मला चहा आवडत नाही. पण हे पेय मात्र झकास होतं! त्याला मोगऱ्याचा नाजूक वास होता. म्हणे मोगरा आणि चहा ते एकत्र वाढवतात. मस्त! (चहाधर्मियांची मुरडलेली नाकं मला दिसतायत! ) मग आला 'ड्रॅगन चहा'. (ह्यांच्या सगळ्याच प्रकारात कुठून ना कुठून तो ड्रॅगन यायलाच लागतो!) तुम्ही जेवणाच्या आधी ह्या ड्रॅगनचा आस्वाद घेतलात तर तो तुमची भूक वाढवतो आणि जेवणानंतर प्यायलात तर तो तुमची पचनशक्ती वाढवतो! कप छोटे छोटे होते म्हणून ठीक होतं. अगदी कटिंगच्याही एक चतुर्थांश! थाटात चव घेऊन आवड आणि नावड लगेच 'ली'च्या कानावर घालता येत होती. 'फ्रुट चहा'. हे फळांचे आणि गुलाबकळीचे मिश्रण तुम्ही एकदा वापरलंत की पुढचे पाच दिवस परत परत वापरू शकता. किंवा गुलाब सोडून उरलेल्या सुक्या फळांचा स्वाद (चहा पिऊन झाल्यावर) तुम्ही मनमुराद घेऊ शकता. त्यात एक थोडं आंबट असं देखील एक मस्त सुकं फळ होतं! नंतर आला 'वूलॉंग चहा'. जायफळासारख्या दिसणाऱ्या चविष्ट फळयुक्त चहा.
गोरीपान 'ली' गोड हसत गप्पा मारतमारत, माहिती देतदेत आम्हा दोघींसमोर वेगवेगळे चहा, पेश करत होती. आणि आम्ही दोघी अगदी राजेशाही थाटात 'कधी ख़ुशी कधी गम' दर्शवत होतो. त्या अंधारलेल्या खोलीत खरं तर सर्वात सुंदर गोष्ट काय असेल तर चहाचे वेगवेगळ्या रंगाचे डबे आणि बाटल्या. आणि त्यावरचे त्यांचे अतिशय सुंदर डिझाइनचे गुंडाळलेले कागद!
निघालो तेंव्हा 'एक शू-शू-बाळ, एक महागडा नाजूक टी सेट, फ्रुट चहाचे दोन मोठ्ठे डबे, पाच सुंदर छोटे छोटे लाकडाचे रिकामे डबे (त्यांत घालून तो फ्रुट चहा मला बहिणींना, मित्रमैत्रिणींना प्रेमाने भेट द्यायचाय. त्यांनी कितीही माझ्या चहाला नावं ठेवली तरी देखील ह्या माझ्या चहाला ते नावं ठेवूच शकणार नाहीत ही एक गोष्ट! आणि दुसरं म्हणजे माझ्या चहाला हे सगळे नावं ठेवतात तरी देखील माझं त्यांच्यावर असलेलं अबाधित प्रेम त्यांना चहाद्वारेच दाखवून देण्याची अशी सुवर्णसंधी मला परत कधी मिळणार! )
गोडबो'ली' खुश झाली आणि माझ्या क्रेडीट कार्डाने मला बसलेला 'परदेशीय चलनामधील आर्थिक फटका' मोठ्या तत्परतेने एसएमएस द्वारा दाखवून दिला!
Subscribe to:
Post Comments (Atom)
13 comments:
भारतात असे चहाचे वेगवेगळे प्रकार आहेत का.मला तर नाही माहीत. तुमचा अनुभव चांगला आहे.छान लिहीलंय.
वैभव, ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे. तुम्ही ह्या कट्टर चहाधर्मियांत बसता का? :)
सुटलो बुवा ! गेले आठवडाभर हातात `बेगॉन' व काठी घेऊन वाट बघत बसलो होतो .......
आता मात्र कप बशी घेऊन बसलोय ..... आपला नंबर कधी येतो ते .....!
(साप-झुरळे ऐवजी चहा आयात झालाय न ....)
हा हा हा! राजीव चांगला होता हं!! तुझा विनोद!!! :D
'चहा' विनोदी,गमतीशीर झालाय!!! आणि 'ली'चे फोटोमधूनच गाल खेचावेसे वाटतायत मला
Chan :) :) :)
धन्यवाद प्रशांत! :)
अजिबात नाही चहाची जास्त आवड नाही
आहा आहा... चहा चहा... धरतीवर अमृत... अवतरले पहा...
अहो सौरभ बुवा, तुम्ही पण कट्टर चहाप्रेमी आहात वाटतं!? :)
कट्टर म्हणजे माहित नाही. पण (वसा घेण्याच्या स्टाईलमधे) चहाला ऊतूमातू जाऊ देत नाही. घेतलेला चहा टाकत नाही. सोबत बिस्किटं, फरसाण, पोहे इत्यादी इत्यादी अल्पोपहार सोबत घेतो. (नसला तरी हरकत घेत नाही) नैसर्गिक/मानसिक/शारिरीक/भावनिक परिस्थिती कशीही असो, आम्ही चहाचे नित्यनियमाने सेवन करतो.
श्रीधर फडके ह्यांच "संस्कार" गाणं ऐकलय का? त्या गाण्यातला संस्कार (शब्द) काढून चहा (शब्द) टाका. ऍन्ड येन्जाय :) :D
माझ्या आईकडचे असे सर्व चहाप्रेमी आहेत!! कधीही त्यांना 'चहा घेणार का' विचारा! उत्तर होकारार्थीच मिळेल! जसं काही नाही म्हटलं तर विचारणाऱ्याचा सोडा, त्या चहाचाच अपमान होईल!! :)आणि मी ऐकलं नाहीए 'श्रीधर फडक्यांचं ते गाणं! आता शोधतेच! आणि ऐकतेच! :)
कट्टर चहाधर्मिय? असला शब्द नसतोच मुळी... शब्द असतो तो "चहाबाज". तर हा चहाबाज डावीकडे फोटो असतो तसा दिसतो. त्याचे एक तत्त्व मित्रांच्यात प्रसिद्ध आहे "चहाला वेळ नसते, पण वेळेला चहाच लागतो".
Post a Comment