मन्या गॅलरीबाहेर बघत उभा होता. गेल्याच महिन्यात त्याने केकवरच्या आठ मेणबत्या विझवल्या होत्या. त्याची उंची दोन इंचाने वाढल्याने आता त्याला गॅलरीच्या कठड्यावरून खालचं दिसू लागलं होतं. अगदी इमारतीच्या तळापर्यंत नाही. पण रस्ता दिसायचा आणि संध्याकाळी आईबाबा घराकडे परतताना दिसायचे. तेव्हढं पुरेसं होतं. आज अधूनमधून पाऊस पडत होता. खरं तर त्याने कागदाच्या कितीतरी बोटी तयार करून ठेवल्या होत्या. आणि खाली पाण्याची छोटी छोटी डबकी दिसत तर होती. पण त्याला सांभाळणाऱ्या माई काही त्याला खाली सोडत नव्हत्या. म्हणजे आई आल्याशिवाय काही खरं नव्हतं. सगळ्या बोटी कठड्यावर रांगेत उभ्या होत्या. एकेक करून त्यांना आता बादलीतल्या पाण्यातच सोडावे असा विचार कंटाळलेल्या मन्याच्या डोक्यात आता येऊ लागला होता. रस्त्यावर कोणी नव्हतं आणि पाऊस थोडाच पडत होता. म्हणजे त्याने जेंव्हा हात लांब केला तेंव्हा त्याचा तळहात लगेच नाही भिजून गेला. हलकेच एक एक थेंब त्याला अगदी मोजता येतील असे त्याच्या हातावर पडले. त्याने मोजायचा प्रयत्न देखील गेला पण मग हात पाण्याने भरून गेला. उपडा केला तर पाण्याने थेट खाली उडी मारली.
आता मन्या खूपच कंटाळला. मान उंच करून त्याने वर आकाशाकडे बघितलं तर त्याला ते दिसलं. अर्धवट, पुसट. कठड्याला हात अडकवले, मागे अंग फेकलं आणि मान वाकडी केली तसं दिसणाऱ्या आकाशात ती पट्टी दिसली. मन्याने मग डोळे बारीक करून बघितलं. इंद्रधनुष्य आकाशातून डोकावलं. मन्याने इंद्रधनुष्याच्या एका टोकावरून सुरुवात केली दुसऱ्या टोकापर्यंत जायला. पण डोळे अडकले. बंड्याची बिल्डींग मध्ये आली. बिल्डींग संपली. इंद्रधनुष्य परत दिसलं. मग आला डॉक्टरांचा बंगला. शी! एव्हढा उंच कशाला बांधून ठेवलाय? हरवलं न माझं धनुष्य!
दारावरची घंटा वाजली आणि आईसाठी दार उघडायला माईंच्या आधी मन्या दाराशी पोचला.
मग त्याचं हरवलेलं धनुष्य त्याला परत दिसलं ते गावी काकांच्या घरी. पुढल्या वर्षी. आजीला बरं नव्हतं म्हणून आईबाबा त्याला घेऊन काकांकडे आले होते. चुलत भाऊ, शंकर मन्याहून एका वर्षाने मोठा.
अंगणात त्या दिवशी शंकर आणि मन्या पावसात भिजत होते. साचलेल्या पाण्यात उड्या मारून कोणाचं पाणी उंच उडतं हा खेळ. पाउस येतजात होता. चिंब भिजून कधीच झालं होतं. आई कामात होती म्हणून नाहीतर आत्तापर्यंत मन्याला धपाटाच मिळाला असता. उड्या मारतामारता शंकऱ्या आभाळाकडे बोट दाखवून किंचाळला. मन्याने दचकून वर बघितलं तर इंद्रधनुष्य. मन्याने एक टोक धरलं आणि हे काय? दुसरं टोक देखील तिथेच होतं!
"तुझ्या मुंबईत ते तुकड्यात दिसत असेल. पण आमच्या गावी मात्र ते अख्खंच दिसतं" त्याच्या शंकेला शंकऱ्याचा हे उत्तर होतं.
मन्या हिरमुसलेला. तेव्हढ्यात काका आतून बाहेर आले. इंद्रधनुष्याकडे मान आणि डोळे फिरवून फिरवून बघणाऱ्या मन्याच्या ओल्या केसांवरून हात फिरवत ते म्हणाले," मन्या, अरे इंद्रधनुष्य जन्माला येताना नेहेमीच सगळे सात रंग घेऊन येतं. पण ते कुठे जन्माला येतं त्यावर त्याचे किती रंग शिल्लक रहाणार आहेत हे अवलंबून असतं. आजुबाजूचं वातावरण खुलवणारं असेल तर सगळे रंग अधिक सुंदर दिसतात. त्याचा आकार पूर्ण घेऊन आपल्या समोर येऊन जातं. पण तेच जर त्याला पोषक असे वातावरण नसेल, तर मग काय होणार त्याच्या रंगांचं? ते धूसर होतं. अडथळ्यांतून मग ते दिसतं तुकड्यांत. तुला दिसलेल्या चिंध्याच रहातात मग शिल्लक."
मन्याला काकांचं बोलणं थोडंच कळलं पण बाहेर डोकावलेल्या काकी मात्र कसनुसं हसून परत आत निघून गेल्या.
रिमझिम पुन्हा सुरु झाली.
8 comments:
माझ्याही आयुष्यात मी एकदा कोकणातील प्रवासात एक आख्खे इंद्रधनुष्य बघितले होते व अवाक होऊन ते नाहीसे होईपर्यंत एका जागी उभा होतो !
अनघा, इंद्रधनुष्याच्या सातही रंगांच्या एकत्र असण्याच्या व प्रकाशामुळे त्यातील रंगांचे कमी अधिक गडद दिसण्यातून, वैयक्तिक गुण दोषांवरील संयत भाष्य अप्रतिम.
खरंच अप्रतिम!!
गोष्टी सांगण्याच्याबाबतीत तू 'इसाप'ची आई आहेस :)
श्रीराज, मी माझ्या लेकीला तुझा निरोप दिला कि ती 'इसाप' आहे! :)
lolllllllzzz.... ह्या इंद्रधनुष्याच्या पोस्टने माझा मूड ढगाळल्यासारखा झालेला.. हे वरच कमेंट वाचून खिदळायलाच लागलो... ख्यॅख्यॅख्यॅ... lolz... that is very witty reply indeed... =))
सुरेख! कॅनवास वर एखादा चित्र उमटतांना पाहण्याची जी मजा असते, तशीच वाचतांना पण आली! हळूच कॅनवास ने आपले सगळे रंग धारण केले, अन्न आम्ही मात्र त्या रंगांत अजून हि डुंबून.......
आकाश, मला पण ना, काही वाचताना स्वतःची चित्र दिसू लागतात ना, त्याची खूप गंमत येते! आणि लेखकाने आपल्याला आपली चित्र बघण्याचं स्वातंत्र्य दिलेलं असलं कि अधिक मजा.
:)
नेहमीप्रमाणे हाही लेख छान. नेहमीप्रमाणेच हाही आवडला. :-)
संकेत, मंडळ आभारी आहे! :)
Post a Comment