नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 3 August 2010

स्पर्श

काल एका चित्रतारकेला शूट केलं. सुंदर आणि भावविभोर चेहरा. क्षणात बदलणारा. हवे तसे भाव देणारा. कधी भावूक, कधी आतुर, तर कधी हलकेच स्मितहास्य देणारा. आरसपानी.
बहुतेकवेळा तरी ही PG3 मंडळी सहज तीनचार तास उशिरा येतात. परंतु ह्या तारकेची गाडी आणि माझी गाडी एकाच वेळी स्टुडियोत दाखल झाली. मात्र ज्यावेळी आमची सहनशक्ती संपत आली त्यावेळी तिचा चेहरा मेकअप करून तयार झाला. पाच तास. त्यानंतर एका मागोमाग एक....क्षणात बदलणाऱ्या मुद्रा. खोटं बोलणं माझ्या बापजाद्यात कोणी केलेले नाही त्यामुळे जर तिचा चेहरा बोलका नसता तर मला तिला उस्फुर्त दाद देणं खूप कठीण गेलं असतं. पण हा बोलका चेहरा मी फोटोग्राफरच्या कम्प्युटरवर बघत होते आणि माझ्या तोंडून तिला दाद मिळत जात होती...त्या प्रत्येक सच्या दादेमधून तिची कळी खुलत गेली आणि कम्प्युटर खुश होत गेला. जवळजवळ सहा तास चाललेलं शूट. तिची काम चांगलंच करायची तीव्र इच्छा... आणि अनुभवी अदाकारी. ज्यावेळी पॅकअप झालं तेंव्हा तिने मला मारलेली घट्ट मिठी मात्र मला वेगळीच आठवण करून गेली.

गेल्या वर्षी मी भारताच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय शूट करत होते. नागपूर विमानतळावर उतरून सहा तासांचा प्रवास करून एका छोट्या गावी आम्ही पोचलो होतो. शूट पूर्ण झालं त्यावेळी दिवसभर आमच्यावर रखरखत्या उन्हाचं छत्र धरून सूर्य थोडा कंटाळला होता. एका शेतकऱ्याने आम्हां सगळ्यांना घरी घेऊन जाण्याचा घाट घातला होता. पोचलो. घरातील वडीलधाऱ्यांशी ओळखी झाल्या. आणि मिनिटात घरची लक्ष्मी बाहेर आली आणि माझी ओटी भरली. मुंबईतल्या ऑफिसमध्ये बसून ह्या मोठ्या शुटची तयारी करताना, ना मला ह्याची अपेक्षा होती. ना माझी तयारी. घरातील वृध्द आजी ह्या सगळ्यावर दुरून नजर ठेऊन होत्या. मी त्यांच्या पाया पडले तेंव्हा देखील अशीच मला घट्ट मिठी मारली गेली होती. अतिशय आपुलकीची. अतिशय जवळीक साधणारी, तेंव्हाही मला त्यांचा आयुष्यभर काढलेला कष्टांचा घाम जाणवला होता.

काल त्या वातानुकूलित, भल्या मोठ्या स्टुडियोत, त्या चित्रतारकेचा किंचितसा घामट स्पर्श मला, केलेले कष्ट सांगून गेला.

10 comments:

rajiv said...

अनघा, घामाच्या किंमतीची जाणीव असणाऱ्यालाच त्यामागील कष्ट व जवळीक कळते, नाहीतर घामाला ओंगळवाणे समजणारे अस्तातातच की ..... !

सौरभ said...

:) the Touch therapy, pretty effective :)

Shriraj said...

हा अनघाचा वर्ग आहे. इथे आम्ही रोज एक नवा धडा शिकतो :)

Anagha said...

काय रे श्रीराज!! मी बघितलंय! मी कसल्याही मुडात असले न तरीही तू मला हसवूनच सोडतोस!! :D

Raindrop said...

hard work has it's own language and you can always feel it - maybe through the layers of make-up or through the sun seasoned wrinkles on an elderly lady. It always speaks. You are lucky you can hear, feel and speak that language yourself....through your hard work.

Raindrop said...

hard work has it's own language and you can always feel it - maybe through the layers of make-up or through the sun seasoned wrinkles on an elderly lady. It always speaks. You are lucky you can hear, feel and speak that language yourself....through your hard work.

भानस said...

स्पर्शाची भाषाच न्यारी. :)

Anagha said...

:D

रोहन... said...

खरय तुझे ... असे अनेक स्पर्श आणि अनुभव अनुभवले गेल्या १० वर्षात सह्याद्री भटकताना... :)

Anagha said...

रोहन, म्हणतात ना....केल्याने देशाटन..... :)