नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 30 June 2010

'वाढ'दिवस - सत्यकथेवर आधारित

काल एका आईने लेकाचा वाढदिवस केला.
मावश्या आल्या. काका आला. मामा आला.
केक मावशीने आणला.
काकाने पण आणला.
मामाचा तर भाचा लाडकाच होता.
तो केक बरोबर फुले घेऊन आला.
घरभर फुलं.
पिवळी, लाल, जांभळी आणि निशिगंधाची लांबसडक कांडी.
घमघमाट घरभर.
संगीत घरभर.
माणसं घरभर.
लेकाचे मित्र घरभर.
लेक सगळ्यांचा लाडका.
सत्तावीस वर्षांचा.
कोणाशी बोलू? कोणाशी हसू?
तिला आवाज ऐकू येईनासा झाला.
कोपऱ्यातून पार्टी सुंदरच दिसली.
दर वर्षासारखी सुंदरच रंगली.

मग केक कापला. प्लेटा भरल्या.
हसायला, डुलायला.
वेळच नाही पुरला.

प्रथम घड्याळ भानावर आलं.
हळूहळू घर रिकामं झालं.
आवरा आवर केली..फ्रीजमध्ये भांडी गेली.
केक सकाळी बिल्डींग मध्ये वाटू.
आईने विचार केला.

ती रात्र चिवट होती.

पहाटे पहिला केक दुधवाल्याला गेला.
नंतर कचरेवाली, इस्त्रीवाला....वॉचमनला देखील न विसरता दिला.

एकंच झालं...
इस्त्रीवाला कपडे घ्यायला थोडा वेळ थांबला.
"आंटी, किसका बर्थडे था?" विचारता झाला.
"मेरे बेटे का."
"हां? कहाँ है?"

चोंबडा नुसता.
आंटी तरतर आत निघून गेल्या.

कामवालीने टोपलीत फुलांचा हार कोंबून भरला.
काल मावशीने लाडक्या भाच्याच्या फोटोला, घातलेला ताज्या गुलाबाचा हार
नाहीतरी आता कोमेजुनच गेला होता.

Tuesday, 29 June 2010

पासष्टावी कला

काही वर्षांपूर्वी, माश्या मारायचे काम मी अतिशय सुंदर करत असे.
बाबांनी आम्हांला शिकवलंच होतं. कुठलंही काम एकदा अंगावर घेतलं की ते मन लावून आणि सुंदरच करावं. बाबांनी कौतुक करावं म्हणून मी झाडू अगदी जमिनीला घासून घासून कचरा काढत असे. बाबा देखील काही कमी नाहीत! माझा कचरा काढून झाला की पाय घासून खोलीभर एक चक्कर मारायचे. आणि मग पसंतीस माझं काम उतरलं तर म्हणायचे,"अनघा, कचरा बरिक छान काढते !" माझ्या अंगावर मुठभर मांसाची वाढ!

तर हे जरा विषयांतर झालं.

ह्या स्वभावधर्मानुसार माझ्यावर जेंव्हा माश्या मारायची वेळ आली तेंव्हा मी ते देखील काम अगदी मनावर घेतलं. त्यावर अभ्यास केला आणि काही दिवसातच ती देखील कला आत्मसात केली.
तुम्हांला आता प्रश्न पडला असेल की माझ्यावर ही वेळ आधी आलीच कशी! सांगते, ऐका!

छोटं बाळ नुकतंच निजलेलं असताना एका माशीमुळे त्याला जाग यावी आणि मग पुढच्या सगळ्याच कामांची उलथापालथ व्हावी ह्यासारखी वैतागवाणी गोष्ट दुसरी नसेल! आणि त्यातून मला जेंव्हा बाळ झालं तेंव्हा ही हल्लीची 'बाळ झाकून ठेवता' येण्याची सोय मुळीच नव्हती! आमच्या डोंबिवलीत तरी नव्हती! मग मी भराभर स्वयंपाकघरातील कामे आटपून माझ्या लेकीशेजारी हातात प्लास्टिकची एका विशिष्ट पद्धतीने बनवलेली तलवार घेऊन बसत असे. पावसाळ्यात हा त्रास भयंकर. सुरुवातीला मी माशी मारली की एक झप्प असा आवाज येत असे आणि मग ही माझी पालथी झोपलेली लेक बरोब्बर मान वर करून माझ्याकडे बघे! कि मग झालं. पुढची सगळी शांतता भंग. ते काही खरं नाही. गावी, बाबा लहान असताना म्हणे पट्टा छान मारायचे...सफाईने. तेच लक्ष्य डोक्यात धरून मग मी अशी काही हात फिरवायला शिकले की त्या माशीला मी हवेतल्या हवेत निर्वाणाला पाठवत असे. धारातीर्थी पडताना ती टुप्प असा देखील आवाज काढू शकत नसे! समजा लेकीजवळ जाऊन एखादी माशी बसलीच तर तिचा कारभार देखील मी असा काही शिताफीने संपवत असे की लेकीच्या ह्या कानाचा त्या कानाला पत्ता लागू नये! तिच्या अंगावर बसायची त्यांची काय बिशाद? तीने निदान एखादा तास झोपावे म्हणजे मला वर्तमानपत्र तरी सुखाने वाचता येईल एव्हढीच माझी इच्छा. आणि मग रोज गेला बाजारी माझ्या रणभूमीवर दहा ते पंधरा तरी माश्या मरून पडलेल्या असत! दुपारच्या निवांत झोपेमुळे लेकीने बाळसं धरलं ती गोष्ट पण लक्षात घ्यायलाच हवी.

कर्तव्यदक्ष्य नवरा रात्री घरी आल्यावर विचारत असे,"आज काय केलंत तुम्ही दोघींनी?"
"तुझ्या लेकीने चारदा बसायचा प्रयत्न केला, पाचदा पडली आणि मी माश्या मारल्या."

माश्या मारणे ही देखील एक कलाच आहे हे काही मी त्याला पटवून देऊ शकले नाही!

मैत्री

मैत्रीचं जाळं असतं....
मैत्रीचं पोळं असतं...

जाळं दूरदूर पसरतं.
मूळ विसरतं.
एका झटक्यात निखळून जातं.

पोळं मधुर असतं..
एकमेकांना धरून असतं.
कोणी आक्रमण केलं तर
डंख करून एकजात आत्मदहन करतं!

माझं नाही जाळं.
माझं आपलं छोटंसं पोळं.

जाळपोळ करण्यापेक्षा बरं!

Monday, 28 June 2010

पाटा आणि वरवंटा

काळा कुळकुळीत खरखरीत पाटा आणि गुळगुळीत वरवंटा.
रंगात साधर्म्य परंतु स्वभावात वैविध्य. एकमेकांना पूरक. म्हणतात ना संसारात हे असंच असावं. एकमेकांशी मग चांगलं सूत जमत. दोघेही गुळमुळीत किंवा दोघेही रुक्ष! काही खरं नाही!
हे मिक्सरंच युग येण्यापूर्वी आईकडे मी पाट्यावरवंट्यावरच वाटण वाटत असे. ती मजाच काही और. खोबरं, लाल मिरच्या, धने, लसूण सगळं कसं पाट्यावर घ्यावं आणि जरुरीपुरतं पाणी घालून तालात सुरुवात करावी.
डंगडग डडंगडग! जिम वगैरे करायची काही गरज नाही. चांगलं पोटाशी पाय घेऊन खाली बसावं आणि हातात जड वरवंटा घुमवावा. झाले की बायसेप्स तयार! आणि बरोबरच पोटावरची चरबी जळलीच म्हणायची!
वाटणाचं पोत आपल्या हाती. अगदी गंधासारखं मऊ हवंय की हातात ओली वाळू धरल्यासारखं हवंय. चटणी कधी मुलायम वाटणासारखी वाटू नये आणि वाटण कधी रवाळ असू नये. कालवणात तरंगताना माश्याला देखील कसं छान वाटायला हवं. त्याला वाटण बोचायला नको. तेच मिरचीचा ठेचा जर मऊसुत केलात तर काय उपयोग?
गल्लीत खाली टाकी घ्या टाकी अशी हाळी ऐकू आली की आई आम्हाला दामटवायची टाकीवालीला बोलवायला.
हा सगळा माझा तालमय आनंद एकदाच माझ्या अंगावर म्हणजे डोळ्यांवर आला होता.
झणझणित मिरचीचं वाटण वाटलं आणि नंतर लगेच, अगदी तळहाताचा तो वासही गेला नसेल इतक्यात त्याच तळहातावर धरून, स्वच्छ घासूनपुसून डोळ्यात लेन्सेस घातल्या तेंव्हा! डोळ्यात अंजन घालणे किंवा मिरचीची धुरी देणे हे अगदी ह्याची डोळा अनुभवले!

तरी देखील तुम्ही काही म्हणा...
ह्या यंत्रयुगात हे साधेसुधे नियमित करण्याचे व्यायाम नाहीसे गेले आणि मग चरबी जाळायला, घोटीव दंड कमवायला आधुनिक व्यायामशाळा गाठाव्या लागू लागल्या.
अर्थात त्यातून देखील नवनवीन नोकऱ्या निघाल्या, कामधंदे निघाले ही बाब अलाहिदा!

Saturday, 26 June 2010

'धडा लोकलचा'

सकाळी चालत्या लोकल मध्ये डोंबिवलीला चढून दादरला उतरायचे. आणि संध्याकाळी भर गर्दीत दादरला चढून डोंबिवलीला उतरायचे. ह्या एका कृती भोवती माझं दिवसभरंच गणित मांडलं जायचं.
सगळं कसं घड्याळ्याच्या काट्यावर. अगदी बॅले नर्तकीसारखा ताल. काटा इथे तर हातात ब्रश, काटा थोडा पुढे तर स्टोव्ह वर पाण्याचं पातेलं...जसं काही त्यात थोडी जरी चूक झाली तर ते घड्याळ, दोन काट्यांच्या चिमटीत मला धरून फेकुनच देईल.
ह्या मुंबईतल्या लोकलने रोजच्यारोज प्रवास करणाऱ्या बायकांकडून जगाने 'वेळ नियोजनाचे' धडे का घेऊ नयेत? प्रिन्स चार्लसला आमचे फक्त डबेवाले दिसले, आम्ही बायका नाही दिसलो!
जरी जायचं दादरला तरी देखील आधी जावं ठाकुर्लीला. जागा मिळण्याची शक्यता जास्त. खात्री नाही...पण शक्यता नाकारता येत नाही. त्यातून जर गरोदर असाल आणि अगदी सुरुवातीचे महिने असतील तर तुमची खैर नाही. मळमळतंय म्हणून मदतीच्या अपेक्षेने आपल्या भगिनीसमाजाकडे बघाल, अगदी तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगाल देखील. परंतु, काय आम्ही नाही काढली पोरं? तूच राहिलीस का ग गरोदर? असेच भाव चेहऱ्यावर दिसतील.

जन्मल्यापासून दादरला रहाणाऱ्या मला हे सगळं शिकून घ्यायला थोडा वेळच लागला. आणि चढल्याचढल्या, बरोब्बर लवकर उतरणारी बाई हेरून आपली सीट रिझर्व करून ठेवणे तर शेवटपर्यंत नाही जमले! मी शिकू शकले अशी तंत्र हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी. जागा मिळाली आणि पुढच्या पाचव्या मिनिटाला झोप यायला लागली की आपले डोके आपल्याच ताब्यात ठेऊन कसे झोपायचे हे मी शेजारच्या बायकांच्या रोजच्या शिव्या ऐकून नशिबाने लवकर शिकले! आणि मग बरोब्बर 'दिवा' गेलं की डोक्यात कुठूनतरी गजर वाजायला लागायचा. घरच्या घड्याळाचे प्रताप असणार. नोकर न मी त्याची! मिनिटभर जास्त तरी का तो मला झोपून देईल? चालत्या आगगाडीत बसून भाजी निवडून ठेवणे हे जरी सुरुवातीला लज्जास्पद वाटले तरी देखील हळूहळू ती काळाची गरज ठरू लागली. गाडीत बाहेर लटकणे प्रथम भीतीदायक वाटले, पण मग हळूहळू ते जिमन्यॅस्टिक देखील अवगत झाले. शेवटी नियमित सरावाचाच तर सगळा प्रश्न!
पाकशास्त्रात नुकताच शिरकाव केल्यामुळे रोज घायाळ शरीर घेऊन मी ट्रेन मध्ये शिरले की बायका अगदी हिची सासरची माणसं हिला मारहाण करतात की काय ह्या शंकेनेच बघत असंत! कधी बोटं कापलेली तर कधी हातावर किळसवाणे पाण्याने भरलेले टपोरे मोठे मोठे फोड! तव्याच्या वेगवेगळ्या लांबीच्या जळक्या खुणा तर रोजच्याच.

आज जरी तो धकाधकीचा प्रवास माझ्या आयुष्यातून खूप दूर राहिला असेल....तरी देखील मुंबईच्या लोकलने त्या वेळी शिकवलेले ते धडे माझ्या नवीन, कोवळ्या संसाराच्या धड्यातीलच एक होते. एखादा धडा खूप महत्वाचा असतो तसा...

Friday, 25 June 2010

गोगलगाय

लहानपणी, पावसाळ्यात घरासमोरच्या लांबसडक भिंतीवर खुपश्या गोगलगाई दिसू लागत. त्यांच्या दिशा वेगवेगळ्या, मात्र गती एकसारखी. काळपट शेवाळी भिंतीवर त्या पिवळट गोगलगायी कितीही लपून रहायचा प्रयत्न करीत असल्या तरी देखील, मी त्यांना बरोबर उचलून दूर एका ठराविक जागेवर आणून ठेवत असे. एकेक करून भिंतीवरच्या एकजात सगळ्यांना उचलून...काही छोट्या तर काही मोठ्या. फुगीर, टपोऱ्या. अगदी मोजून. कधी वीस तर कधी तीस. जशी काही मी त्यांची सभाच भरवत असे. काही क्षण एका जागेवर स्तब्ध बसून त्या मुक्या गोगलगायी परत आपापल्या दिशेने हळूहळू चालायला सुरुवात करत असत.
मी त्यांची, त्यांनी मनाशी आखलेल्या प्रवासाची दिशाच बदलत असे...
त्यांनी अथक प्रयत्नानंतर जी काही मजल गाठली असेल ती पुसून टाकत असे...
माझ्या मनाला येईल ती दिशा रोज त्यांना देत असे...

आता मला त्यांची आठवण येते.
त्यांना जे मी दिशाहीन करून ठेवत असे ते आठवते.

गती माझीही संथ...
नियती मला उचलून ठेवत असते....
तिला हव्या त्या दिशेला तोंड करून....
मग मी त्या दिशेने चालू लागते....
ती मला परत उचलेस्तोवर...

Thursday, 24 June 2010

ओलावा

ऑफिसमधील खिडकीपाशी दोनच जीव... मी आणि माझं चिमुकलं रोप.
खिडकी निळ्या काचेची...वर्षाचे बारा महिने बाहेरचं जग अंधारून टाकणारी. म्हणजे काम करताना माणसाला पत्ता लागू नये दिवस संपला कधी ह्याचा!
रोजच्यासारखं आल्याआल्या, रोपाला मी पाणी घालायला गेले. पण आज त्याची नजर बाहेर लागून राहिलेली. त्याच्या नजरेला धरून मी देखील बाहेर बघितलं. बाहेर आमच्या अंधारलेल्या जगात पाऊस लागला होता.

ही खिडकी म्हणजे एखादं भलंमोठं एकसुरी चित्रच टांगून ठेवलेलं. काळसर निळा, गडद करडा आणि काळपट हिरवा...एकसुरीपण तोडणारी एकंच गोष्ट. पावसात स्नान करून शुचित झालेली लालबुंद कौलं.
मी माझ्या रोपाकडे बघितलं...पिंजऱ्यात जखडून ठेवलेला पक्षी भकास नजरेने बाहेरच्या मोकळ्या दुनियेकडे बघत असतो. हे माझं रोप एकटक, त्या वरून पडणाऱ्या मुसळधार पाण्याकडे बघत होतं...माझ्या हातात होती माझी शिळ्या पाण्याची बाटली....

मन आसुसलेलं ओलाव्यासाठी...जटेतून जोशात निघालेला आणि मार्गात अडसर न घेता माथ्यावर पडणारा...

मग मी माझ्या रोपाचं दृश्यच बदललं...त्याला उचलून माझ्या घराच्या उघड्या खिडकीत आणून बसवलं...

पावसाचे थेंब अंगावर पडल्यावर ते थरथरलं...
निदान मी त्याचं तरी भविष्य बदललं...

Tuesday, 22 June 2010

क्षणभंगुर

सकाळी सकाळी माझी बॉस बाई तुरुतुरु चालत माझ्या टेबलापाशी आली," Anagha, the client has loved your script!"

"Oh! Ya? Great!"

ओल्या हॅण्डमेड पेपरवर हलकेच एखादा रंग सोडावा आणि तो झर झर पसरत जावा तसा बहुतेक माझ्या चेहऱ्यावर आनंद पसरत गेला.
आता जरा हे आमचं संभाषण तिच्या नजरेतून बघा...
Oh! Anagha is looking too happy! Let me tell her the fact of life!

"Anagha, don't be happy! You know, this client has this habit! They always tell us this first and then later in a day or two, they just change the brief! So don't just get carried away!"

माझ्या हॅण्डमेड पेपरवरचा रंग अधिकच पसरला.
"Don't worry! Am just happy for this moment! It has nothing to do with our client bombing the same script later!"

आता तुम्हीच सांगा, ते ते क्षण जो आनंद देऊन जातात, तो आनंद नंतर काय होणार आहे ह्या अनिश्चिततेमुळे मी का हरवून टाकू?

माझी लेक पहिल्यांदा उभी राहिली तो आनंद, " छ्या! आता ही पडणार!"...
जेव्हा एका संध्याकाळी सहज नजर, समुद्रात बुडणाऱ्या सूर्याकडे गेली आणि संपूर्ण आकाशात जे काही रंग आणि ढग ह्यांचे खेळ चालू होते ते,"हे काय! पुढच्या क्षणाला हे सगळं नाहीसं होऊन अंधार पसरणार!"...
किंवा एका दिवाळीच्या दिवशी रांगोळी खूप सुंदर झाली तेंव्हा "ही तर उद्या पुसावी लागणार!"...

"Ok ! As you wish! Am just warning you! I know this client better than you!"

आनंद बऱ्याचदा क्षणभंगुर असतात... तरी देखील त्या त्या क्षणी ते आनंदच देऊन जातात ना?

Monday, 21 June 2010

हृदयरेषा

खूप वर्षांपूर्वी तळहात बघून मैत्रिणीच्या आईने भविष्य सांगितलं होतं...
"नशीब, ही रेघ अजून खाली नाही वाकली. नाहीतर आयुष्यात तुला कधीतरी नक्की वेड लागलं असतं."

त्या रेघेच्या टोकावर आता सैतान तांडवनृत्य करत आहे...ती रेघ टोकाला अजून वाकावी म्हणून...खोल खोल दाबतोय तिला...
आणि मी...मी खालून धरून ठेवलीय माझी हृदयरेषा...ती अगदी तसूभरदेखील खाली वाकू नये म्हणून...

ह्या आमच्या बळ युद्धात...माझा विजय दृष्टीक्षेपात आहे...
आणि सैतानाला पराजयाची चाहूल देखील न लागावी हे उत्तम.

Sunday, 20 June 2010

C + M + Y + K

सायन + मजेंटा + येलो + ब्लॅक
निळा + मजेंटा + पिवळा + काळा

काल होता पिवळ्या पौर्णिमेच्या चंद्रावर लालबुंद सूर्य
क्षितिजावर तरंगती काळी पक्षीमाला.

आज मात्र फक्त ५०% ब्लॅक.
अजस्त्र पसरलेलं रिकामं करडं आकाश
रखरखीत...निष्प्राण...
उकिरड्यावर पडलेल्या तरुण गर्भाशयासारखं...

माझा ४ कलर जॉब तू अवेळी black and white छापलास!

Saturday, 19 June 2010

नाना 'कळा'


"गणपतीच्या दिवसात नाना तिथे येऊन राहतो. त्यावेळी मी तुला त्याच्याकडे घेऊन जाऊ शकतो. चालेल का बघ."
"धावेल, धावेल!" आमच्या कॉलेजमधल्या गुरुजींनी, नाना पाटेकरच्या 'गणपती परंपरे' विषयी मला सांगितलं तेव्हा माझं उत्तर हे असं होतं.

मग सरांना गाडीत बसवून पोचलो एका दुपारी नानाच्या दारात. रोज नाना गणपतीची फुलांची सजावट कशी करतो हे जर मी तुम्हांला सांगायला निघाले तर म्हणाल की मी त्यात काय नवीन सांगतेय! दर गणपतीत, वर्तमानपत्रांत गणपतीला नटवताना नाना पाटेकरचे आपण खूप फोटो बघतोच. तेंव्हा ते जाऊच दे!

तर आमचे जे जे चे सर आणि नाना ह्यांची कॉलेजची मैत्री. जिवाभावाची. त्याचा मला फायदा. पहिल्या दिवशी सरांनी माझी ओळख करून दिली. मी माझं काम सांगायला सुरुवात केली. "मी जे तुम्हांला पेपर देईन त्यावर आणि मी जे पेन देईन त्याने, मला तुम्ही केलेली एखादी चित्रकृती हवी आहे."
"ठीक. कागद घेऊन उद्या ये. कट नीब्स घेऊन ये. आणि कवी ग्रेस यांची एखादी कविता. मी तुला एक स्केच देईन, एक ग्रेस यांची कविता लिहून देईन आणि एक मी स्वतः केलेली कविता देईन." हे म्हणजे प्राजक्ताच्या झाडाखाली उभं राहिल्यासारखं झालं. एक फूल मिळणार नाही! घ्यायचं तर सडाच घ्या!
दुसऱ्या दिवशी मी त्यांच्यासमोर हजर. सर्व सामुग्रीसाहित. आणि बरोबर माझी टीम. डिरेक्टर, फोटोग्राफर आणि कॅमेरामन.

नानाने आमचा कागद हातात घेऊन पेन उचललं की त्याचे फोटो काढायचे, त्याचे फुटेज कव्हर करायचे हा बेत. त्या घरातील बाहेर पडवीत उजेड आणि आतल्या खोलीत तसा अंधारच. माझ्या टीमने माझ्यामागे भुणभुण सुरु केली. जरा त्यांना विचार न बाहेर पडवीत बसतील का म्हणून. "मी इथे ह्याच खोलीत बसणार. तुम्हांला फोटो काढायचा तर काढा!" सणसणीत उत्तर मिळालं.

मग त्यांनी माझ्याकडून सगळं सामान घेतलं. सुंदर पोत असलेले कागद आणि पेन. आणि मग पुढे जे घडलं तो एक चमत्कार होता.
"जरा तो पाट दे." मांडीवर पाट घेतला. बरेचसे कागद घेतले. चमत्कार सांगून होत नाहीत म्हणून त्यांना चमत्कार म्हणतात. बरेचदा ते क्षणभंगुर असतात. दिसतात, नाहीसे होतात. चष्मा नाकावर, हातात पेन आणि नानाचा हात. जशी काही हातात तलवार होती आणि कापाकाप करायची होती! पिवळट पांढऱ्या कागदावर काळं कुळकुळीत पेन सपासप चालू लागलं. इतक्या वेगात की एक रेघ सुरु झाली कधी आणि संपली कधी हे त्या रेघेला सुद्धा कळू नये. अशी तलवार चालवली जावी की स्वतःचे दोन तुकडे झाल्याचे गवताच्या पातीला समजूच नये. आणि मग जमिनीवर गवताचा खच. जसा त्या दिवशी होता काळ्या बाणांचा खच. नटसम्राटाची त्या वेळी भूमिका होती धनुर्धारी अर्जुनाची. चष्म्यातून एकदाही नजर वर झाली नाही. बाजूला बसलेल्या मित्राशी मधून मधून प्रश्नोत्तरं चालू. माझी नजर त्या कागदावर. पापणी लववायचा अवकाश, बाण, अधिक बाण आणि अजून बाण. रणांगणावर नुसता खच. हळूहळू कागदावरची पांढरी जागा कमी होऊ लागली आणि काळे बाण वाढू लागले. बरोबर दहाव्या मिनिटाला खाली सही रुबाबात पेश झाली. ही जी आत्ता कत्तल झाली त्याची त्या सहीने जबाबदारी उचलली. एक 'ना' सुलटा आणि एक 'ना' उलटा. सहीतून व्यक्तिमत्व कळतं म्हणतात.

माझ्या हातात कागद देण्यात आला. जेव्हा मी बघितलं तेंव्हा त्या काळ्या बाणांमधून एक वृध्द चेहरा हळूहळू पुढे आला. बापरे! जवळजवळ सत्तर वर्षांचा माझ्या डोळ्यात खोलवर बघणारा चेहरा. खडतर आयुष्य जगलेला. कुठे होता हा म्हातारा? खोलीत तर कुठेच नव्हता, ना पडवीत होता... हे स्मरणचित्र होतं? इतकं खरंखुरं? ते खोल डोळे.. डोळ्याची ती खोबणी...ती मिशी...आणि ते भव्य कपाळावरचे, एखाद्या विचारावंतासारखे अस्ताव्यस्त केस....हा म्हातारा माणूस नक्की कुठेतरी होता..त्याची ती माझ्याकडे लागलेली नजर मला ह्याचीच खात्री देत होती.

पुढच्या विसाव्या मिनिटाला घरी मी जेव्हा माझ्या चित्रकार नवऱ्यासमोर ते स्केच ठेवलं, त्यावेळी तो कितीतरी वेळ नुसता त्या म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्यात डोळे घालून बसला होता.

Wednesday, 16 June 2010

F.I.R.

मी माळरानात उभी. मान उचलली तर वर निळं आकाश.
समोर. मागे. आठही दिशांना. नजर पोचेल तिथपर्यंत.

एक दिवस जमिनीतून माझ्या समोर एक राक्षस हळूहळू वर आला.
काही क्षणात स्थिर झाला. तसाच दुसरा त्याहून मोठा. अजून एक त्याहून मोठा.
चारी बाजूने एकेक करून वेडेवाकडे, मोठे, भले मोठे, अक्राळ विक्राळ, अजस्त्र राक्षस उभे राहू लागले. चौरस, आयताकृती, उभे आडवे. मागेपुढे. न हलणारे. जागा न सोडणारे. भुकेले. त्यांची गर्दी वाढू लागली. एकमेकांच्या ते अधिकाधिक जवळ सरकू लागले. एकमेकांशी सलगी करू लागले.

साहेब, त्यांनी माझं क्षितीज कुरतडलं.
माझं आकाश ओरबाडलं.
लक्तरं फेकली माझ्या ढगांची...थोडी पूर्वेला, थोडी पश्चिमेला...

दुखरी मान ताणून वर नेली, तर आता मला खूप थोडं दिसतं...
त्या आकारांमधून थोडं थोडं.
कधी तुकडा आकाश. कधी तुकडा ढग.
कापलेला चंद्र... तोडलेला सूर्य.
तुटकं इंद्रधनुष्य...
एखादं गिधाड एक क्षण दिसतं...
एखादी घार, एखादा कावळा आणि एखादी चिमणी...
माझ्या बोटांच्या पेराइतकंच त्यांचं आकाश उरलं...

आजपर्यंत मला तुम्ही दिसला नाहीत,
आता तर आकाश देखील दिसत नाही.

तुम्हांला आता तुमची जमीनच दिसत नसेल,
मग आम्ही लिलिपुट तुम्हांला कुठून दिसणार?

स्वतःची काळजी घ्या साहेब...
तुमचा देखील 'view block' होतोय!

Saturday, 12 June 2010

क्षण भाग्याचा...


मस्तकापासून पायापर्यंत फक्त पांढरा रंग. पांढरा शुभ्र सदरा, बरोब्बर त्याच सफेदीचा पायजमा, तसेच पांढरे केस आणि स्वछ निर्मळ मन दाखवणारा वयस्क चेहरा. त्यांच्या बॉस्कियानातील प्रशस्त दिवाणखान्यामध्ये, आमच्या समोर गुलजारजी बसले होते. कवितांचे कागद हातात घेऊन. मी आणि माझी डॉक्युमेंटरी दिग्दर्शक मैत्रीण त्यांच्यासमोर बसलो होतो. आमच्या कुठल्याही हालचालींमुळे त्यांची विचारधारा थोडी देखील तुटू नये इतक्या स्तब्धतेने.
त्यांच्या हस्ताक्षरातील त्यांच्या कविता, आमच्या कागदावर लिहून घेण्यासाठी आम्ही तिथे पोचलो होतो.
सर्व प्रथम त्यांना यायला उशिरा झाल्याबद्दल त्यांनी आमची माफी मागितली! हे म्हणजे देवाने दर्शन द्यायचे आणि मग स्वतःला दर्शन देण्यासाठी उशीर झाल्याबद्दल माफी मागण्यासारखंच होतं!
मला खूप वर्षांपासून आपोआप पाठ झालेला 'श्लोक' आठवत होता!
'जंगल जंगल पता चला है, चड्डी पहनके फुल खिला है!'

काही दिवस असेच असतात! आपण जन्माला नक्की का आलोय ह्या वारंवार पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देणारे.

" इन में से देखो आपको कौनसी कविता पसंद आती है...वो मैं आपको आपके कागज पे लिख कर दे दूंगा."
त्या नंतरचा एक तास त्यांच्या आवाजात त्यांच्या कविता ऐकण्याचा होता...
पडणारा पाऊस...सायकलीच्या चाकांतून उडणारं पाणी...गाडीच्या काचेवरून ओघळणाऱ्या थेंबांची रेखा....
प्रत्येक ओळीला एक चित्र जोडलेलं...

हॉलमध्ये फक्त आम्ही होतो आणि गुलजारजींनी उच्चारलेला प्रत्येक शब्द हा फक्त आमच्यासाठी होता...ते कवितेचं एकेक कडवं संथ स्वरात उच्चारणं... कडवं संपल्यावर समोर बसलेल्या आपल्या दोन श्रोत्यांच्या चेहेऱ्याकडे, नुकत्याच चालायला लागलेल्या बालकाच्या निरागसतेने बघणं....आणि मग तितक्याच तन्मयतेने माझ्या मैत्रिणीच्या हिंदीतील कविता ऐकणं...

ही निरागसता आणि हे नाविन्य कुठून येतं?

रंगांचा ब्रश पाण्यात गिरक्या घ्यायला लागल्यावर, पाणी स्वतःचा रंग विसरून तेच रंग ओढून घेतं...
आकाशात सूर्य, किरणं फेकू लागल्यावर रोज नवनवीन रंगछटांची गोधडी, आकाश पांघरतं...

मग कल्पकतेचे ते रंगीबेरंगी इंद्रधनुष्य, प्रयत्नपूर्वक सताड उघडलेल्या माझ्या डोक्याच्या खिडकीतून आत का नाही शिरलं?

Friday, 11 June 2010

माठ

वाटलं तुला तहान लागलीय...
थंड पाणी दिलं.
पण नाही...
ती पाण्याची नव्हती...

आणि मग त्या सहप्रवासात...
तू मलाच 'माठ' ठरवावंस...?

Wednesday, 9 June 2010

कबुतरी

सकाळचे नऊ वाजलेत. काल रात्रीपासून मुंबईत पाऊस सुरु झालाय. कडूलिंबाच्या अगदी वरच्या एका फांदीवर मी बसलेय. स्वस्थ. भरपूर रिकामा वेळ घेऊन.
जरा मान वेळावून बघितलं तर आजूबाजूला सगळं कसं स्वच्छ झालंय. चकाचक. माझी देखील आज त्या नवीन पाण्याने अंघोळ झालीय. चोच मानेत खुपसली तर मस्त वास येतोय. सुकलेल्या मातीवर पहिल्या पावसाचे थेंब पडले कि कसा एक मादक वास आसमंतात भरून रहातो...तसाच आज माझ्या पिसांमधून येतोय. डोळे मिटून छातीत भरून घ्यावा असा...
पाय लांब केले आणि विचार आला, हे सगळं धुऊन पुसून साफ झालंय, मला ताजंतवानं वाटतंय आणि ह्यात मला कष्ट तर काहीच झाले नाहीत! मी आणि माझं हे कडूलिंबाचं घर, मी काहीही त्रास न घेता कसं धुवून पुसून स्वच्छ झालंय!

मान वळवली तर बाजूच्या इमारतीतील बाई खिडकीतून बाहेर बघत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भावच मला सांगून जात होते, बाहेरची हिरवी आणि स्वच्छ दुनिया तिला देखील मोहवून टाकत होती. अचानक ती हसली आणि मला दुरून तिच्या मनातले विचार अगदी छान वाचता आले! बाहेर पावसाने, ओल्या कापडाने एकेक पान, एकेक कौल, रस्त्यावरची एकेक फरशी, अगदी दक्ष गृहिणीच्या प्रेमाने लख्ख पुसून काढली होती. मी नक्की सांगते, तिच्याही मनात हाच विचार आला होता!

आपण जराही हातपाय न हलवता, आपलं घर स्वच्छ आणि ताजतवानं जर दिसायला लागलं तर त्यातला आनंद, फक्त एका स्त्रीलाच कळू शकतो.
आणि एका स्त्रीलाच कळू शकतं दुसऱ्या स्त्रीचं मन!

Monday, 7 June 2010

रडगाणं!

नुसतंच तोंड..
ते देखील हसरं नाय...
फक्त एक सरळ रेषा..
आतून फक्त बाहेर येऊ शकेल...
आत काय बी जानार नाय!...
जागाच नाय तेव्हढी..
सुरुवात लय सुंदर!
टिंग टिंग....टिंग टिंग....
तुमच्या चुकेला थारा न्हाय...
हाकलून लावल...
बरोबर असाल तर मात्र येईल...
ती वाट पहायला लावणारी ओकारी...

झेला! झेला! ओंजळीत झेला!
कोणाच्या ओकारीची एव्हढी वाट कधी नव्हती बघितली...
आणि ती थांबूच नये असं देखील नव्हतं कधी वाटलं...
ओक बाई ओक!

पण पोटात हिच्या जास्ती जातही नाही...
आणि पोटात हिच्या काय रहात बी नाय...
मग काय करल?
महिन्याच्या अर्ध्यावरच हिचं पोट रिकामं...
कसलं ऑल टाइम मनी आणि कसलं काय!
पोटातच काय नाय तर हे सोंग, बाहेर टाकणार काय?

वर तोंड करून निर्लज्यासारखी रिकामं पोट दाखवल!
देऊ का एक गुद्दा पोटात?

गळका घडा

तर नळ थोडा उघडण्यात आलाय. सध्या धार कमी आहे. पण आज ना उद्या नक्की जोरदार वेगाने तो चालू करण्यात येईल...मग खाली जमिनीवर जागोजागी खाचाखोचा तुडुंब भरतील. सगळीकडे पाणीपाणी होईल. आणि तरीही तो नळ बंद होणार नाही. तो बंद करणे तसेही आपल्या हातात नाही. त्याला जेंव्हा वाटेल तेंव्हा तो नळ बंद करेल आणि निघून जाईल. अगदी घट्ट. आपण जसा अर्धवट चालूच ठेवतो तसं तो करण्याची सुतराम शक्यता नाही.

डोंबिवलीत पाच वर्ष अगदी चमच्या चमच्याने औषधासारखं, औषधापुरतं पाणी वापरलंय आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत भांडी भरून नेलीत. वाटी पेला भरून ठेवलाय. तेंव्हा खूप वाटायचं की माणसालादेखील उंटासारखी सोय असती तर बरं झालं असतं.

कधी नव्हे ते दूरदृष्टीने, म्युन्सिपल कॉर्पोरेशनने आता नवीन बांधकामांना, स्वतःचे पाणी स्वतः जमवण्याची, तरतूद करण्यास भाग पाडले आहे. तसा त्यांनी नियमच केलेला आहे. त्याशिवाय बांधकामांना परवानगी मिळणार नाही. ज्यांचे बांधकाम अर्धे झाले आहे त्यांना देखील हे बंधनकारक आहे.

महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडतो हे कोणी आपल्याला सांगायची गरज नाही. आपण आणि आपल्या शहराने भरून ठेवलेलं पाणी, पुन्हा त्या वरच्या नळाचे पाणी सुरु होईस्तोवर संपून जातं. मग पुन्हा आपली बोंब.

पाणी अडवा, पाणी जिरवा...रेन वॉटर हार्वेस्टिंग....करू शकतो का आपण?

ऐकिवात आहे की सचिन तेंडूलकरने, स्वतःच्या वांद्रे येथील बंगल्याच्या अंगणात, सुयोग्य भोके असलेल्या सिमेंटच्या विटा बसवल्यात, पाणी जिरवण्यासाठी.

मला वाटतं, घरातील भांडी भरत बसण्यापेक्षा, घराबाहेरचं एकच मोठं भांडं भरून ठेवणं हे कधीही शहाण्याचं काम होईल.

Sunday, 6 June 2010

तारीख

आज शहरात जागोजागी एका बँकेची, नवीन होर्डींगस पाहिली.
त्यावर भल्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, 'अपने ख्वाबोंको तारीख दिजीये.'
उदाहरणार्थ एक तरुण बाई खुशीत सांगत होती,"माझा नवरा मला दोन हजार तेरा साली बहामाला घेऊन जाणार आहे."
आणि क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या पोराला बापाने, दोन हजार चौदा साली लॉर्ड मैदानावर घेऊन जाण्याचे वचन दिले होते!

कुठूनतरी अवकाशातून माझ्या कानावर आदळला तो सनी देवलचा 'दामिनी' चित्रपटातला आक्रोश!
"तारीख पे तारीख! तारीख पे तारीख!"

म्हणजे आता बघा.
ह्या बँका घरातील कमावत्या माणसांना सांगणार, 'अपने ख्वाबोंको तारीख दिजीये.'
आणि माणसं त्या जाहिरातींवर विश्वासून कुटुंबियांच्या आणि त्याचबरोबर स्वतःच्या स्वप्नांना काहीतरी एक तारीख देणार.
आणि मग त्यांच्याकडून ही जाहीर केलेली तारीख काही अपरिहार्य कारणांमुळे पुढेपुढे ढकलली गेली की घरातील छोटेमोठे सभासद, सनी देवल चा डायलॉग मारणार,"तारीख पे तारीख! तारीख पे तारीख!"

बघा बुवा! मला तरी वाटतं, स्वप्न बघा पण त्याच्यावर तारीख टाकण्याची घोडचूक करू नका! ते धोकादायक आहे!
लहानपणी आपणच नाही का आईबाबांचं डोकं खायचो! "पण तुम्ही तर म्हणाला होतात ना की, सुट्टीत आपण गावी जाऊ!"
(इथे 'सुट्टी' ह्या शब्दावरचा आपण दिलेला जोर कृपया आठवावा!)

Friday, 4 June 2010

तुमचा पाळीव प्राणी कोणता?

छतापासून खाली जमिनीपर्यंत माझ्या घराला भल्या मोठ्या खिडक्या आहेत.
त्या खिडक्यांमध्ये माझी झाडं. झाडं म्हणजे झुडपं. छोटी छोटी.
कारण आमचं घर कोणी 'उन्हात नाही बांधलं'.
म्हणून मग सावलीत जी झाडं वाढू शकतील अश्या झाडांची ही माझी, शहरातली, छोटेखानी बाग.
फुलं नसलेली. पण हिरवीगार.
तर या माझ्या बागेत दोनतीन कुंड्यांमध्ये, मातीत किडे वळवळताना मला दिसले. वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये त्या किड्यांनी खुशीत ओल्या मातीत संसार थाटलाय. बघावं तेंव्हा वळवळ. बायकापोरं, सगळ्यांचीच वळवळ.
माझा माळी म्हणाला,"ताई, तुम्ही त्या झाडांना गरजेपेक्षा जास्ती पाणी घालताय. आधीच इथे ऊन नाही येत!"
म्हणजे हे किडे मी पाळलेतच म्हणायचं की. खाऊपिऊ घालून.

विचार करता मला माझ्या डोक्यातल्या, मेंदूतल्या किड्यांशी, ह्या किड्यांचे साधर्म्य जाणवले. तेही असेच वळवळत असतात. मी विनाकारण त्यांना खतपाणी घालत असते. मग त्यांची पिलावळ वाढते. झाडांच्या मुळापाशी असलेल्या किड्यांचा त्या झाडांना कदाचित फायदा होतही असेल. माती भूसभुशीत झाल्याने. पण माझ्याच डोक्यात दिवसागणिक वाढणाऱ्या वसाहतीचा मला काय उपयोग? नुसताच डोक्याचा भुसा!
त्यापेक्षा समजा डोक्यात मी एक सिंह पाळला, तर निदान तो कधीतरी डरकाळी तरी फोडेल. एखादा मोर पाळला, तर जेंव्हा आकाश फुटेल तेंव्हा एखाद्या गाण्याच्या रुपात माझ्या मनात नाचेल तरी! किंवा एखादी घार पाळली तर माझ्या कल्पना अवकाशात उंच भरारी तरी मारतील.

अणुबॉम्ब टाकायला हवा ह्या वसाहतीत.

Wednesday, 2 June 2010

बोनसाय

झाडं वाढतात.
इमारती वाढतात.
रांगा वाढतात.
मुलं वाढतात.
बिलं वाढतात.
वजन वाढतं.
कंबर वाढते.
वय वाढतं.
कामं वाढतात.
फाईल साईझ वाढते.
पूल वाढतात.
खड्डे वाढतात.
हायवे वाढतात.

मग यार, हा पगारच का नाही वाढत?
ह्याचीच का वाढ खुंटलीय?!

Tuesday, 1 June 2010

अधांतरी

परवा मी आणि माझा कॉपीरायटर मित्र मिटिंगसाठी जात होतो. सारथी मी होते. इच्छित स्थळी पोचायला जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे लागणार होती. आमच्या गप्पा चालू होत्या. 'मुंबईतले गगनचुंबी बांधकाम आणि सुसाट वेगाने गगनाला भिडणारे 'मनीग्राफ', हा विषय.
मी म्हटले," कसे काय आपण ह्या सगळ्यात तग धरू शकणार? इतकी वर्ष आपण मुंबईत रहातोय, पण आता ह्या उभ्या राक्षसांच्या वजनाखाली आपण उच्च मध्यमवर्गीय तर मरूनच जाणार!"
आमचे श्रेष्ठ मित्रवर्य म्हणाले," आधी सर्व प्रथम तू स्वतःच्या डोळ्यांवरची ती पट्टी काढ. भ्रामक समज आधी दूर कर."
समोरच्या रस्त्यावरची नजर शक्यतो न हलवता मी त्याच्याकडे बघून भुवया उंचावल्या.
"तुला कोणी सांगितलं की आपण उच्च मध्यमवर्गीय आहोत म्हणून?"
"म्हणजे? अरे, आम्ही नेहेमीच उच्च मध्यमवर्गीय राहिलो आहोत!" त्याने लावलेल्या चाळणीतून स्वतःला वाचवायचा मी एक प्रयत्न केला.
"ते कुठच्या तरी गावात असेल! काही वर्षांपूर्वी असेल. पण ह्या शहरात नाही! ह्यापुढे नाही!"
"काय बोलतोयस काय तू?"
"अर्थात! विचार कर जरा! परवडतंय का तुला इथे घर घेणं?"

सिग्नल लागला ते बरं झालं. चाळणीतून माझी झालेली घसरण रोखून धरायला मला क्षणभर ब्रेकचीच आवश्यकता होती.
माझ्या लाडक्या मुंबईने माझ्या पायाखालची जमीनच काढून घेतली होती!

'जाहिरातक्षेत्रात भरपूर पगार मिळतो' कोण बोललं रे हे तिकडे? कोणाचा हा आवाज? काय वाट्टेल ते बोलतात ही लोकं!