नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 10 February 2013

पुन्हा वाचन आणि चित्रपट...

मनाशी काही निश्चय करून नव्हे परंतु, बऱ्याचदा वाचलेली पुस्तके व पाहिलेले चित्रपट ह्यात, जगभरातील स्त्रिया, त्यांच्यावरील अन्याय व अत्याचार, त्यांच्या स्त्रीत्वाविषयी भूमिका, ह्या संदर्भात वाचले जाते व ते मनात कुठे ना कुठेतरी कोरले जाते. त्यात कधी स्वत:ला गुंफले जाते. आपल्यावर कळत नकळत झालेल्या अन्यायाविषयी चिंतन केले जाते.

सर्वात प्रथम आठवण होते ती चिमुकल्या 'हायडी'ची.
आल्प्ससारख्या बर्फाळ प्रदेशात, आपल्या आजोबांसमवेत रहाणारी चिमुरडी हायडी. माझ्याकडे हे पुस्तक आहे. टीव्हीवर फारा वर्षांपूर्वी दाखवली गेलेली अॅनिमेशन सिरीज देखील मी मोठ्या प्रेमाने बघितली होती. ती बागडणारी, रुसून बसणारी हायडी, आजोबांपासून दूर पाठवली गेल्याकारणाने सतत आजारी पडू लागलेली हायडी माझ्या लेकीइतकीच माझी लाडकी होती. आणि ज्यावेळी ही सिरीज टीव्हीवर दाखवली गेली त्यावेळी माझी लेकही त्याच वयाची असल्याकारणाने तर माझा जीव हायडीवरील संकटे बघून तीळतीळ तुटे. पुस्तक आणि चित्रपट ह्यांची जर तुलना केली तर माझे झुकते माप नेहेमी पुस्तकाकडे जाते. परंतु, हायडीच्या बाबतीत मात्र माझे तसे होत नाही. छोट्या पडद्यावर बागडणारी हायडी ही माझी दुसरी लेक होती, जी रोज अगदी दुपारी ठरलेल्या वेळी माझ्या पुढ्यात येई. तिच्या वेदना माझ्या होत. तिचे डोळे माझे होत...आम्हां दोघींचे अश्रू, एकाच वेळी आमच्या गालावर ओघळू लागत.

'मेमॉयर्स ऑफ गेशा'.
हे पुस्तक मी आधी वाचले. नंतर चित्रपट बघितला गेला. चित्रपटाने खोल आतवर जपानमधील चित्र नक्की नजरेसमोर दिले. परंतु, पुस्तकात चियोबरोबर तिच्या बालपणापासून मी मोठी झाले. तो अनुभव मला त्या चित्रपटाने नाही दिला. तिथे मी त्रयस्थच राहिले. व चियो माझ्यासमोर तिच्या आठवणी फक्त चित्ररुपाने दाखवित गेली. पुस्तकाने मात्र मला भरपूर दिले. जपानमधील एक स्त्री, तिचे अगदी लहान वयापासून गेशा म्हणून तयार होत जाणे, त्यासाठी तिने घेतलेले कष्ट, त्यातील व्यावसायिक चढाओढ, स्वार्थ, सूड ह्या सर्व भावना मला आत्मचिंतन करावयास भाग पाडू लागल्या. आमचे देश, त्यातील संकल्पना वेगळ्या, परंतु, काय चियो फक्त जपानी होती ? मला असे नाही वाटले. ती एक स्त्री होती, तिच्या देशातील, बालपणी तिच्यावर लादले गेलेली निवड, व समज आल्यावर आयुष्यातील काही चुकीचे तर काही बरोबर घेतलेले गेलेले निर्णय, त्यासाठी तिने केलेले विचार हे पुन्हा आम्ही दोघींनी एकत्र बसून केले. चित्रपट पाहिल्यावर ही चियो माझ्यापासून अक्षरश: दूर जाऊ लागली. चित्रपटाने, आम्हां दोघींमध्ये एक भिंत उभी करू घातली. व प्रयत्नपूर्वक मला त्या भिंतीची एकेक वीट पाडावी लागली.

पर्ल बक ह्या जगप्रसिद्ध लेखिकेची 'पिओनी'.
१८५० मध्ये चीनमधील ज्यू कुटुंबामध्ये विकली गेलेली चिनी पिओनी. त्या घराने तिला नोकरापेक्षा वरची परंतु, लेकीपेक्षा खालची जागा दिलेली आहे.  आपण एकेक पान उलटत जातो. ती व त्या घरातील एकुलत्या एका मुलाचे बालपण, एकत्र हसणे, खेळणे, मग तारुण्यात पदार्पण, तिचे त्याच्या प्रेमात पडणे....परंतु, त्याच्याशी विवाह अशक्यप्राय असणे...आयुष्याचे हे कटू सत्य तिने जिरवणे, परंतु तरीही त्याच्या दिमतीला सदैव तैनात असणे...हे सर्व व अजून काही आपण तिच्याबरोबरच जगतो. आयुष्यात तिने घेतलेला शेवटचा निर्णय आपण देखील स्वीकारतो. त्या निर्णयाबरोबर जे जीवन पिओनी स्वीकारते....आपणही स्वीकारतो. शेवटचे पान आपल्यासमोर कधी आले ते कळत नाही. पुस्तक आपण बंद करतो. आपला पुढला दिवस मग पिओनी शिवाय उजाडतो. मात्र आपली खात्री असते....आपण पिओनीला जिथे सोडून आलो आहोत....ती तिथे सुरक्षित आहे. एक स्त्री म्हणून तिच्या आयुष्यात तिच्या मनाविरुद्ध, शरीराविरुद्ध कुठलीही घटना आता ह्यापुढे घडणार नाही. 
माझ्या माहितीप्रमाणे ह्या कादंबरीवर चित्रपट आलेला नाही. आणि ते मला बरेच वाटते.

२००८ साली आलेला प्रियांका चोप्राचा 'फॅशन'.
ह्यावरील कादंबरी असण्याची शक्यता दिसत नाही. जाहिरातक्षेत्रात वावरत असल्याने ह्या क्षेत्राचे व बॉलीवूडचे नाते माझ्या ओळखीचे आहेच. वडिलांच्या इच्छेविरुद्ध चित्रपटात नाव कमावण्यासाठी घरातून एकटीच बाहेर पडलेली मेघना, मला फारशी अनोळखी वाटत नाही. ज्या मुलींबरोबर मी रोज काम करीत असते त्यातील बऱ्याच मुली अशाच कुठल्या ना  कुठल्यातरी छोट्या शहरातून, शिकून आता इथे मुंबईत स्थायिक झाल्या आहेत. मी फारशी 'पार्टी पर्सन' नसले तरीही काही पार्ट्या ह्या टाळता येण्यासारख्या नसतात. मग त्यातील दारू, नृत्य हे सर्व आपल्यासमोर बेभान होत जातं. आपण तिथे असतो, व नसतो देखील. आणि जेव्हा दुसरा दिवस उजाडतो, तेव्हा काल रात्री आपण जे आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितलेले असते, ते आपल्या स्मृतिकोषातून कायमचे हद्दपार करावयाचे असते. इथे हे आपल्याला पटले, नाही पटले ह्याचा काडीचाही संबंध आपण ठेवायचा नसतो. कुटुंबाशी संबंध तोडून टाकावे लागलेली मेघना, आपल्या व्यवसायक्षेत्राची एकेक पायरी ज्या वेगाने चढते त्याच वेगाने घसरत जाते. बेधुंद अवस्थेत  असताना अनोळखी माणसाबरोबर एका बिछान्यात तिला एके दिवशी जेव्हा जाग येते त्यावेळी तिला धक्का बसतो. ती उध्वस्त होते. आपण हे काय करीत आहोत, ह्याचा तिला विचार करावासा वाटतो. त्या प्रसंगातून मला जाणीव झाली होती ती एकच. माणसाला आपल्या माणसांची, आपल्या कुटुंबाची, त्यांच्या मानसिक आधाराची गरज असते. तेच त्याचे मनोबल असते. भान आल्यावर, आपल्या आई वडिलांच्या पाठींब्याच्या बळावर, पुढे जेव्हा जेव्हा त्याच क्षेत्रात ती पुन्हा उभी राहू पहाते, तेव्हा कुठलाही अडथळा तिला रोखू शकत नाही. तिला टाळ्यांच्या कडकडाटात खंबीर उभी राहिलेली पहातच आपण चित्रपटगृह सोडतो.

पुन्हा पुस्तक.
पर्सपोलीस. मारीजान सत्रपी ह्या इराणी मुलीच्या आठवणी, कॉमिक पुस्तकाच्या काळ्या पांढऱ्या चित्रपटलातून आपल्या समोर येतात. ती वयाच्या तिच्या सहाव्या वर्षापासून आपल्याला आठवणी सांगत आहे...ते थेट तिच्या वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत. तिच्या ह्या आठवणींना पार्श्वभूमी आहे इराणमधील बदलांची. त्यातील चित्रे नीट बघितली तर आपल्याला त्यात बऱ्याच वेळा काही प्रतीके सापडतात. मिश्र शाळेमध्ये शिक्षण घेत असताना अचानक स्त्रियांवर बुरखा घेण्याची सक्ती करण्यात येते. व मग मारीजान व तिच्या चिमुरड्या मैत्रिणी हा बदल कशा प्रकारे स्वीकारतात ते चित्रात बघण्यासारखे आहे. तिचे मध्यमवर्गीय आईवडील हे पुढारलेल्या विचारांचे व सुशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांच्या बाहेर होणाऱ्या धार्मिक व राजकीय बदलांवर त्यांच्या आपापसात चर्चा ह्या रोजच्याच आहेत. त्या ऐकतच मारीजान मोठी होत असते. व त्यातून तिला स्वतंत्र विचार करण्याची सवय होत जाते. मात्र ज्यावेळी तेहरान मधील परिस्थिती इराकच्या हल्ल्याने अतिशय अस्थिर होते, त्यावेळी आपल्या लाडक्या लेकीला आपल्यापासून दूर ठेवण्याचा, परदेशी पाठवण्याचा निर्णय तिचे आईवडील घेतात. त्यानंतर तिचे आयुष्य कशी वळणे घेत जाते, ती कधी कुठे आणि कशी भरकटते, ती कशी स्वत:ला सावरते, हे सर्व चित्रातून आपल्यासमोर येत जाते. मला वाटतं मारीजानचे आयुष्य आपण चित्रात बघतो, ही त्या गोष्टीची शक्ती आहे. हेच जर शब्दांत आपल्या समोर आले असते, तर ते इतके परिणामकारक झाले नसते. ह्या पुस्तकावर अॅनिमेशन चित्रपट केला गेला आहे. मी तो बघितलेला मात्र नाही. मात्र ज्या ज्या वेळी माझ्या कामामध्ये अॅनिमेशन वापरण्याची शक्यता येते, त्यावेळी मी नेहेमीच ह्या चित्रपटाची युट्यूबची लिंक समोरच्याला दाखवत असते. संपूर्ण चित्रपट बघण्याचा योग मात्र नाही आलेला. नेहेमीप्रमाणे इथे देखील मी  मारिजानच्या गोष्टीजागी स्वत:ला ठेवून बघते. शहर असुरक्षित झाल्याने मी माझ्या छोट्या लेकीला कुठे परदेशी पाठवेन काय असा मी स्वत:ला प्रश्न विचारते. उगाच. आणि माझे स्वत:ला उत्तर हे नकारार्थी येते. काय व्ह्यावयाचे आहे ते आपले एकत्रच होऊ दे...पण माझ्या मुलीला युद्धप्रसंगी जगात एकटी मी पाठवू शकत नाही असे मला वाटते. 
हे पुस्तक अजून शक्तिशाली होऊ शकले असते, त्यात कुठेतरी काहीतरी कमी पडते आहे असे मात्र मला फार वाटते.

ह्या अशा जगभरच्या स्त्रिया. त्यांच्या कधी हळव्या, कधी आपल्याला जगण्याचे बळ देणाऱ्या कथा. 
मध्यंतरीच्या काळात काही वर्षांपूर्वी बलात्कार झालेल्या एका स्त्रीची मुलाखत वाचनात आली होती. त्यात तिने एक वाक्य म्हटले होते, ते मला फार काही सांगून गेले होते. पटून गेले होते. 'एक घटना म्हणजे आयुष्य नव्हे. आयुष्य बरेच काही असते, वेगळेच असते.' एखादी घटना आपले आयुष्य नक्कीच बदलून टाकते. परंतु, ती एक घटना म्हणजे आपले आयुष्य नसते. फक्त कोणतीही एक घटना जेव्हा घडते त्यावेळी ती आपल्यावर आदळते, आपल्याला आरपार छेदून जाते. परंतु, खरेच ती घटना म्हणजेच आयुष्य असते काय ? की आयुष्य त्यापलीकडले असते ? अचानक कोणी खोल विहिरीत ढकलून दिल्यावर आपण हातपाय मारतो, वर येतो...घुसमट होताहोता पहिला श्वास घेत. तोच श्वास महत्वाचा असतो....आणि त्यापुढील आपला प्रत्येक श्वास हा आपल्याला हात मारावयास शिकवतो....आणि आपण 'आपला' तलाव पोहू लागतो....नव्या दमाने.


18 comments:

हेरंब said...

भरपूर चित्रपट आणि पुस्तकांच्या सान्निध्यातलं आयुष्य हे सर्वात परिपूर्ण आयुष्य असतं !

सचिन उथळे-पाटील said...

भरपूर चित्रपट आणि पुस्तकांच्या सान्निध्यातलं आयुष्य हे सर्वात परिपूर्ण आयुष्य असतं ! +1

aativas said...

अजून किती वाचायचं आणि पाहायचं बाकी आहे याची कल्पना येते अशा लेखांतून.

Anonymous said...

भरपूर चित्रपट आणि पुस्तकांच्या सान्निध्यातलं आयुष्य हे सर्वात परिपूर्ण आयुष्य असतं !
अजून किती वाचायचं आणि पाहायचं बाकी आहे याची कल्पना येते अशा लेखांतून.+++

श्रद्धा said...

भरपूर चित्रपट आणि पुस्तकांच्या सान्निध्यातलं आयुष्य हे सर्वात परिपूर्ण आयुष्य असतं !
अजून किती वाचायचं आणि पाहायचं बाकी आहे याची कल्पना येते अशा लेखांतून.++++++++

इंद्रधनु said...

एक वाक्य वाचलेलं आठवलं "If you have a garden and a library, you have everything you need..... - Cicero"
यामध्ये "laptop and hard-disk full with movies" पण जोडायला हवं बहुतेक.... :)

Shriraj said...

kadambarivarun chitrpat banavnaryanbaddal mla khup dayaa vatte... pustakatil itkya pananna chitra-rupat anne khup kathin vatte

Yashodhan said...
This comment has been removed by the author.
Pankaj - भटकंती Unlimited said...

मेमोयर्स ऑफ गेयशा पाहिला होता. आवडला.
फॅशनसुद्धा.
बाकी पुस्तकं शोधणार आता. त्या इराक आणि युद्धावरुन आठवलं, ते ब्रेडविनर आणि नॉट विदाऊट माय डॉटरही भारी आहेत.

Anagha said...

खरोखर हेरंबा ! :)

Anagha said...

सचिन, आणि आपण एकमेकांना चांगले सिनेमे बघायला आणि चांगली पुस्तकं वाचायला देत असतो, त्यावर चर्चा करतो हे फार बेस्ट आहे ! त्यात एकमेकांना धरून मार्ग काढणं आहे. :)

Anagha said...

सविता, आणि ह्या धकाधकीच्या आयुष्यात दिवसाला जेमतेम एक पान वाचून होतं ! :) :)

Anagha said...

तन्वे, आपलं जग अधिकाधिक विस्तारत जातं ह्यातून. नाही का ? :)

Anagha said...

श्रद्धा, आता कुठलं नाटक आपण एकत्र बघणार आहोत ? :) :)

Anagha said...

इंद्रधनू, अगदी अगदी ! आणि ही अशी समविचारी मित्रमैत्रिणींची वाढती यादी हवी ! :) :)

Anagha said...

खरंय श्रीराज, आणि पुस्तकं आपला आपला फलक देत असतं… आपलं आपलं चित्र रेखायला ! :) :)

Anagha said...

श्री. वाळिंबे, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

Anagha said...

पंकज, Not without my daughter वाचायचंय ! आठवण करून दिलीस ! :) :)