नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 27 February 2013

मित्र

खरं तर ही काही 'पोस्ट' नव्हे. आणि 'पोस्ट' ह्या इंग्रजी शब्दाचे मराठीमध्ये भाषांतर म्हणजे 'लेख'...तो तर हा नव्हेच. हे विचार आहेत. माझ्या मनात आलेले. माझ्या अनुभवांवर बेतलेले.

आयुष्याचा जोडीदार शोधला...आणि तो मित्र असावा असा हट्ट धरला. अपेक्षा धरली. मित्र ह्याची व्याख्या होईल काय ? आणि एखाद्या स्त्रीला मित्र असावा काय ? किंवा असा मित्र तिने शोधावाच का ? तिला गरजच काय ? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात उभे राहू शकतात. वा कदाचित तुम्ही ज्या वातावरणात मोठे झाला असाल, त्याला अनुसरून असे प्रश्न तुमच्या मनात येणार देखील नाहीत. परंतु, पती हा, परमेश्वर सोडा पण निदान मित्र तरी असावा असा मी नाहक हट्ट धरला. आणि ह्या हट्टाचे परिणाम देखील भोगले.

शाळेमध्ये हे मित्रबित्र प्रकरण असण्याची वेळच आली नाही. कारण मुळातच आम्ही मुली, मुलांशी बोलत नसू. साधं कुठे एखाद्या मुलाच्या बाजूने जाण्याचा प्रसंग ओढवलाच तर 'साईड प्लीज' असे म्हणून तिथल्या तिथे उभ्या रहात असू. व तो मुलगा बाजूला झाला तर त्याच्या भवताली फिरणाऱ्या हवेच्या कणांचा देखील आपल्याला स्पर्श होणार नाही ह्याची काळजी घेत आम्ही पुढे सरकत असू. मात्र कॉलेजमध्ये पाऊल टाकले आणि हे चित्र बदलून गेले. आसपास बिनधास्त फिरणारी मुलं दिसू लागली. व ती पुढे येऊन आम्हा मुलींशी बोलू वगैरे लागली. परंतु, एखाद्या मुलाला मित्र म्हणण्याची हिंमत प्रत्येकीने प्रत्येकीच्या स्वभावधर्मानुसार वेगवेगळा काल व्यतीत करून मिळवली. 
नाहीतर रक्षाबंधन हे नेमेचि येतेच.

माझा नवरा जेव्हा कॉलेजमध्ये सहविद्यार्थी म्हणून माझ्या समोर आला, त्यावेळी त्या क्षणी मी प्रेमात पडले. आणि अगदी ह्याच्याशीच लग्न वगैरे आयुष्याचे निर्णय मनाने आपोआप घेऊन टाकले. म्हणजे, हा समोर दिसणारा हुशार विद्यार्थी, एक मित्र म्हणून कसा आहे हे समजून घेतले गेले नाही. प्रियकर आणि मग नवरा. झालं. इतकं सगळं सोपं हे त्या कोषातील वयामध्ये वाटलं. आणि त्यातूनच मग आपला नवरा हा आपला मित्र तर असणारच असा समज नकळत करून घेतला गेला. त्याला कोणताही पुरावा नव्हता. कुठल्याही प्रसंगात तो आपल्यासाठी फक्त 'मित्र' म्हणून उभा राहू शकतो काय ह्याचा विचार करता येण्याइतकी माझ्या बुद्धीची कुवत तेव्हा नव्हती. ह्या सर्व गोष्टी अनुभवानेच शिकल्या जातात. वा पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशा प्रकारे.

आज माझा जिवलग मित्र, अतिशय आजारी आहे. प्रथम...मलेरिया असेल, नाहीतर विषमज्वर, किंवा डेंग्यू...ते नाही तर कावीळ...आणि शेवटी तीही नाही म्हणता तर क्षयरोग असावा असे स्वत:चे समज करून घेत होता. आणि साक्षात कर्करोग उभा ठाकला.
"हे असं काही मला होईल असं कधी वाटलंच नाही गं मला."
आपण कर्ण आहोत....कवचकुंडलं घेऊन जन्माला आलो आहोत...असंच आपल्याला का वाटत रहातं ?
शरीर एक रणक्षेत्र मानावे तर कर्करोगाने आपले सैन्य चारी दिशांना पसरवलेले आहे.
पुढचा लढा. अनिश्चित.

मित्र, हा असा असावा ज्याच्यापुढे मन मोकळे करून बोलता यावे. मनाची डूब अपार असते. आपल्या मनाची खोली आपल्यालाच कळत नाही. परंतु, आपण एखादी घागर पुरती रिकामी केली तर त्यातील गाळ देखील बदाबदा बाहेर येतो. व घागर घासून, चकाकवून पुन्हा फडताळावर ठेवता येते. हा माझा मित्र, पुरुष असल्याने मला विचारांचा तो एक वेगळा आरसा समोर आणून देतो. एखाद्या घटनेचा मी एक स्त्री म्हणून विचार करीत असेन तर त्याच प्रसंगाचे दुसरे रूप. मी त्याच्या समोर धरलेला आरसा, 'हा माझ्या ओळखीचाच नाही' असे म्हणून त्याने कधी धुडकावून लावला नाही. तर त्या उलट माझ्या आरश्यात डोकावून मग तो त्या आरश्याची मागील बाजू माझ्या समोर आणून ठेवत असतो. आजतागायत हे असेच झाले आहे. माझ्या आयुष्यात किती असे प्रसंग आले जेव्हा माझा बांध फुटला आहे. समोर पसरलेला राणीच्या नेकलेसचा भर भरतीचा उसळता समुद्र आणि माझ्या डोळ्यांचा गदगदणारा समुद्र. हे दोन्ही त्याने तितक्यात शांतपणे, तटस्थतेने निरखले. मला सावरले. अंगाला एका बोटाचाहि स्पर्श न करता. जेव्हा भरती येते त्यावेळी समुद्र आपल्या पोटात दडलेले सर्व किनाऱ्यावर आणून टाकून जातो. मी ही तेच केले. काहीही न लपवता...मी ह्या माझ्या किनाऱ्यावर मोकळी होत होते.
माझा किनारा.
त्याने ना कधी आलेल्या लोंढ्याला थांबवले.
ना ते कवटाळले.

किनारा नसलेला समुद्र धोक्याचा.


24 comments:

Yogini said...

jabaree lihites..
I am speechless

Mohana Prabhudesai Joglekar said...

मित्र/मैत्रीण अशी असावी की त्याच्याशी बोलताना आपण आपल्या प्रतिबिंबाशी बोलतो आहोत असं वाटावं. मला माझा मित्र आठवला तू लिहलेलं वाचून. तो वयाच्या २५ शीला अपघातात गेला पण आमची मैत्री वर लिहलं तशी होती. तो नेहमी म्हणायचा, "तुझ्याशी बोलताना मी माझ्याशीच संवाद साधतोय असं वाटतं." तुझ्या मित्राचं आजारपण वाचून डोळे ओलावले. आज माझ्या मित्राच्या आठवणींची उजळणी, मनातल्या मनात.

Shriraj said...

Yoginishi sahamat! Kharach jabree!!

भानस said...

आयुष्यात आपण कोणालाही आणि काहीही गृहित धरु शकत नाही हेच खरं. आपल्याच वाट्याला हे भोग का हेही विचारू शकत नाही. हे असं हक्काचं स्थान मात्र सगळ्यांनाच हवसं असतं.

तू नेहमीच छान लिहीतेस. तसंच हेही. भापो गं!


हेरंब said...

एका मित्राची आठवण आली खूप..

Pankaj - भटकंती Unlimited said...

खरंय अगदी. किनारा नसलेला समुद्र धोक्याचा.
कुठूल्या पोतडीतून येतात बरं ही अशी वाक्यं? जरा आम्हांला दे.

बाकी मी स्पीचलेस.

नामधारी विनवी (प्र)सिद्धासी... said...

अगर किनारा नसलेला समुद्र धोक्याचा असेल तर लाभलेल्या किनाऱ्याशी संलग्न राहणे हेच आद्यकर्तव्य बनते जेणेकरून एकदा लाभलेला किनारा आपण सहसा गमावत नाही... धाडसी स्वभाव त्यांनाच शोभून दिसतो ज्यांनी धाडस म्हणजे काय हे कळण्यासाठी तपश्चर्या केलेली असते...

Gouri said...

तुझ्यासाठी त्याने फार अवघड पेपर काढलाय ग ... यत्ता वरची आहे ना तुझी!

श्रद्धा said...

मित्र… आठवलं काही तरी खूप जवळचं … पोस्ट छानच.

अपर्णा said...

हम्म...माझा एक खूप जुना मित्र आठवला....आणि एक मैत्रीणही जी कर्करोगामुळे आमच्यापासून कायमची हिरावली.......
ही पोस्ट अतिशय ह्र्दयस्पर्शी झालीय...तू सगळं नेहमीप्रमाणे मोजक्या शब्दात समजावलंयस...कुठे जास्त मोठं लेक्चर किंवा भावनांना शब्दात जास्त रेंगाळू न देताही मनात त्या तितक्याच समर्थपणे रेंगाळतील असं...

इंद्रधनु said...

किनारा नसलेला समुद्र धोक्याचा. खरंय….
एक तरी मित्र असावा जो "unconditionally" आपल्याला समजून घेईल…

सागर पुन्हा नवीन..... said...

मित्र हा असा असावा ज्याच्या पुढे मन मोकळे करून बोलता यावे. मनाची डूब अपार असते. आपल्या मनाची खोली आपल्यालाच काळात नाही. अगदी खरय .. :-।

Anagha said...

योगिनी, :)

Anagha said...

मोहना, सगळ्यांनाच असा एक मित्र लाभावा आणि त्याची साथ आयुष्यभराची असावी.

Anagha said...

श्री, हाच खरा धडा आहे. 'आजचा दिवस' हे आणि हेच केवळ सत्य. 'उद्या' हा एक आभास. मनाची भोळी समजूत. :)

Anagha said...

हेरंब…

Anagha said...

पंकज, आयुष्य शिकवतं बहुतेक. :)

Anagha said...

नामधारी, एखादा तरी किनारा लाभणे हे त्या नदीचे, समुद्राचे भाग्यच !

Anagha said...

गौरे, पुस्तकाने फार गती पकडलीय. भरभर पानं संपतायत.

Anagha said...

श्रद्धा, धन्यवाद. :)

Anagha said...

अपर्णा, हल्ली माझं सगळंच फार रोखठोक व्ह्यायला लागलंय की काय अशी खरं तर मला भीती वाटत असते.

Anagha said...

इंद्रधनू, आपण आयुष्याकडून फारच काही मागतोय की काय कोण जाणे !

Anagha said...

सागर, :)

BinaryBandya™ said...

किनारा नसलेला समुद्र धोक्याचा

sundar