नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 28 March 2012

निवड

पतीपत्नी मधील नाते हे काय असते ?

नातं...चिनीमातीच्या सुरेखश्या भांड्यामधील एक नाजूक गुलाबाचे रोप...मोठ्या प्रेमाने दोन मनांनी निगराणी राखलेलं...त्यावर प्रतिदिनी टवटवीत गुलाब डवरतो....आणि रोप अधिकाधिक मनमोहक बनू लागतं.
की नातं हे येशू ख्रिस्त आहे....क्रुसावर टांगलेलं...कळत नकळत...एकेक खिळा त्यावर ठोकला जातो...आणि काळ उलटेल त्यावेळी जे हाताशी लागेल ते निश्चेष्ट कलेवर असते ?

संसारातील गोष्टी ह्या बऱ्याचदा छोट्या छोट्याच असतात. नाजूक असतात. संसार एक चालवायला घेतला तरी दोन पूर्णत: वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे त्यासाठी एकत्र आलेली असतात. वेगवेगळ्या नोकऱ्या वा वेगवेगळे काढलेले बालपण ह्यामुळे मित्र परिवार वेगळा असतो. आणि मग हे असे निर्णय घेण्याचे क्षण उभे रहातात.

प्रेमात पडणे, लग्न करून घर सांभाळणे, नोकरी...मातृत्व....आणि आता घर एकटीच्या खांद्यांवर येऊन पडणे...ह्या सर्व घटना कधी आवडीने तर कधी नाईलाजाने जगत गेल्यावर, आज मला जाणवते, जे मला दिसते ते हे असे...

कोणी खत घालावयाचे...कोणी खिळा ठोकायचा ही त्यात्या वेळची, ज्याचीत्याची निवड असते. संसारात, रोज दिवसागणिक आपल्याला काहीनाकाही 'निवड' करणे भाग पडते. कधी विचारपूर्वक तर कधी एखाद्या क्षणात आपण आपली निवड ठरवून टाकतो. आणि त्यावेळी पतीपत्नीच्या नाजूक नात्याला खत घातले गेले की त्यावर अजून एक खिळा ठोकला गेला हे शेवटी काळ ठरवतो.

आज मी एक स्त्री आहे...आणि ह्या सर्व घटनांतून मी स्वत: गेले आहे.
पुरुषांच्या भूमिकेत शिरून एखाद्या घटनेकडे बघणे फार अवघड आहे असे मला वाटत नाही. ह्याला कारण आहे. जाहिरात क्षेत्रात, रोज नवे काम समोर येते. त्यावेळी नित्य नव्या 'टारगेट ग्रुप' साठी एखादी जाहिरात करावयाची असते. वेगवेगळ्या वयोगटाचे...कधी स्त्री तर कधी पुरुष. त्यामुळे आज स्त्रीच्या तर उद्या पुरुषाच्या भूमिकेत शिरण्याची एक सवय मनाला पडून गेलेली आहे. कधी गरज पडली तर अल्लड ७/८ वर्षाची मुलगी होणे, वा कधी साठ वर्षांच्या एखाद्या भारतीय पुरुषाच्या मानसिकतेत डोकावणे, फारसे अवघड जात नाही. आणि त्यातून आयुष्यात वेगवेगळ्या घडामोडींना सामोरं जावे लागल्याकारणाने, व माझ्या कामाच्या ढंगामुळे, कधी एखादी स्त्री कसा विचार करेल, वा कधी एखादा पुरुष एखादी घटना कशी घेईल हा विचार आता अंगवळणी पडला आहे.

आज म्हटलं तर फुलपाखरू बनणे वा उद्या कचऱ्याच्या डब्याची आत्मकहाणी लिहिणे...ह्यात असे अवघड ते काय ?
त्यामुळे, मी पुढे मांडलेले विचार, हे...'साल्या ह्या बायका ना ! वैतागे रे !' किंवा 'ह्यांना ना...च्यायला नवरे...कायम ह्यांच्या कुशीत लागतात !'...असा विचार करून सोडून द्यावेत असे मला नाही वाटत.
हे अशा प्रकारचे पुरुषांचे विचार देखील माझ्या ओळखीचे आहेत ह्याला कारण आहे. हा असा विचार करणारे पुरुष सुद्धा मी आसपास बघितले आहेत.
कधी एखादी सहल, कधी एखादा चित्रपट, नाटक बघण्याचे बेत ठरू लागतात.
३०/३२ वयोगटाचा तरुण पती विचार करू लागतो...जाण्याचा...पत्नीला घेऊन जाण्याचा बेत आखू शकत नाही...घरात लहान मूल आहे. ती बाळाला टाकून येऊ शकत नाही. मग ? त्या वेळी त्याने निर्णय घेतला सहल न टाळण्याचा...एक दिवसाची तर सहल...सक्काळी जाणार रात्रीपर्यंत परत येणार...त्यात काय मोठं...घरी ती तापाने फणफणलेल्या बाळाच्या उशाशी बसून...कपाळावर घड्या ठेवत...रात्री तो जेव्हां पुन्हा तिच्यासमोर उभा रहातो...त्यावेळी बाकी काहीच बदललेलं नसतं...फक्त एक खिळा वाढलेला असतो.

एखादी सहल...आणि त्याच दिवशी बायकोच्या माहेरी लग्न...तो मित्रांना कळवून टाकतो....मला नाही जमणार....घरी लग्न आहे...मित्रांची सहल काही त्याच्यासाठी थांबत नाही...पण इथे मात्र अजून एक टपोरा गुलाब त्या पतीपत्नीच्या नात्यावर उगवलेला असतो.

तर दुसऱ्या कोणा एकासाठी, बायकोच्या माहेरचे लग्न, हे मित्रांबरोबर ठरवलेला नाटकाचा बेत टाळण्यासाठीचं सबळ कारण असू शकत नाही....तो नाटकाला जातो...बायको एकटीच नवऱ्याशिवाय माहेरच्या नातेवाईकांसमोर आनंदी चेहेऱ्याने उभी रहाते...हा एक खिळा असतो.

छोट्या मुलीच्या अंगात १०५ ताप..मित्रांबरोबर ठरवलेली दुबईच्या वाळवंटातील 'डेझर्ट सफारी'...त्या भर तापात मुलीला घेऊन निघण्यासाठी जेव्हां एखादा नवरा आपल्या बायकोला भरीस घालत असतो...त्यावेळी तो एक असाच खिळा त्या येशूच्या हातावर मारत असतो.

तर दुसरा कोणी...रंगात आलेला सहलीचा बेत...अचानक ओढवलेले बायकोचे आजारपण...आणि मग सहलीचा मोह टाळून त्याचे तिच्याबरोबर घरी रहाणे. एक टपोरा गुलाब उगवलेला असतो.

खिळे अंगावर झेलणारी नाती...
कालौघात त्यांची लक्तरे होतात. ती लक्तरे अंगावर लेऊन उघडी पडलेली नाती.
आणि हाती फक्त प्रेत लागते.

आणि टपोऱ्या गुलाबांनी फुललेले एखादे रोप...
आयुष्याची बाग हसरी, ताजी, टवटवीत ठेवते...
आणि त्या सुगंधी बागेला वयाची अट नसते.

34 comments:

तृप्ती said...

:)

Unknown said...

अलका किती सहज पणे लिहील तुम्ही. पण अस दुसर्याच्या मनातल पुरे पूर समझून घेण, आमच्या सारख्या साधारण लोकांना अशक्य आहे.

Shriraj said...

दुसऱ्याच्या मन ओळखायला हवे हे खरे; पण ते नाही जमले तर निदान आपण त्या जागी असतो आणि समोरचा आपल्याबरोबर 'त्या' प्रकारे वागला असता तर आपल्याला काय वाटले असते हा जरी विचार केला तरी आपण बऱ्यापैकी नाती दृढ/भक्कम करू शकतो. हा अर्थात माझा दृष्टीकोन आहे; पण मला नक्कीच याचा फायदा होतो.

सुप्रिया.... said...

नात हे मुळात खूप गहन विषय आहे...
आणि नवरा-बायकोच नात म्हणजे ? अरे बापरे !!
तू म्हणालीयेस ते अगदी खरंय ताई म्हटलं तर गुलाबच रोप म्हटलं तर येशू...
:
:
एकमेकांवर विश्वास ठेवून प्रत्येक situation नुसार एकमेकांना समजून घेतलं कि झालं....

Anagha said...

हेरंबा, उद्गारवाचक चिन्ह ! आणि त्याचे अनेक अर्थ ! :) :)

Anagha said...

तृप्ती, :) :)

Anagha said...

हेगडे साहेब, सोप्पं आहे. स्वत:ला समोरच्याच्या जागी ठेवून बघावं ! गणितं सोपी जातील कदाचित. :)

Anagha said...

श्रीराज, तू असाच वागत असशील ह्याची मला खात्री आहे. :) :)

Gouri said...

मस्त.
कितीतरी वेळा ही निवड तिसर्‍याच गोष्टीवर अवलंबून असते, नाही का? म्हणजे ऑफिसमध्ये भांडण झालं म्हणून घरी चिडचिड करायची. बाहेर शहाण्यासारखं वागावंच लागतं म्हणून घरी आपल्या माणसाजवळ वेड्यासारखं वागून घ्यायचं. आपली हक्काची रुसण्याची जागा म्हणून... आणि समोरच्याने याला खिळा न मानता आपल्याला समजून घ्यावं अशी अपेक्षा करायची :)

aativas said...

आपण खिळे निर्माण नाही केले तरी वारंवार समोरची व्यक्ती तेच करतेय म्हणाल्यावर आपणही तसेच वागायला लागतो - इथं प्रश्न न सुटण्याच्या दिशेने जायला लागतो. आणि हे कोणत्याही नात्यात घडत!

Pankaj - भटकंती Unlimited said...

एखादी सहल...आणि त्याच दिवशी बायकोच्या माहेरी लग्न...तो मित्रांना कळवून टाकतो....मला नाही जमणार....घरी लग्न आहे...मित्रांची सहल काही त्याच्यासाठी थांबत नाही...पण इथे मात्र अजून एक टपोरा गुलाब त्या पतीपत्नीच्या नात्यावर उगवलेला असतो.

:) :)

Anagha said...

कदाचित दिवसागणिक आजपर्यंत किती गुलाब फुलवले गेले आहेत त्यावर हे अवलंबून असावे. नाही का गौरी ?
गृहीत धरणे बऱ्याचवेळा व्हायला लागले...की मग खिळे वाढणार नाहीत का ? :)

Anagha said...

'एकमेकांवर विश्वास ठेवून प्रत्येक situation नुसार एकमेकांना समजून घेतलं कि झालं....'
सुप्रिया, त्यातला तोल सांभाळला गेला तर सर्वच गोड. :):)

धन्यवाद गं.

Raindrop said...

every experience decides what you feel about a relationship. it is never easy to comment upon it as an outsider. all you can do is feel its 'talmal' or harshollas' from outside. You have given here a summary of all thos 'talmals'.

Anagha said...

खरंय सविता...

Anagha said...

पंकज, :)

Anagha said...

असेलही वंदू...

Suhas Diwakar Zele said...

हम्म्म्म....

BinaryBandya™ said...

sundar..

Anagha said...

तन्वे, 'वर्डप्रेस आणि ब्लॉगर्स'च्या स्पर्धेत तुला इथे कमेंट न करता येणं हे मला फार त्रासदायक होतं ! :(

पण तुझं पत्र वाचून खूप आनंद झाला. तुला अजून बरं वाटलेलं नाही हे वाचून वाईट वाटलंच. पण तरीही हीच वेळ काहीतरी दाखवून देत असते ना ?
आपापले गुलाब ओळखले जावेत व आपण अ जाणता कुठे खिळे तर मारीत नाही आहोत ना ह्याचा कुठेतरी विचार व्हावा...असंच काहीसं मनात होतं. :)

अशीच हसत रहा गं. :)

Anagha said...

सुहास, हम्म्म्म. :) :)

Anagha said...

बंड्या, :)

Deepak Parulekar said...

माझी मौलिक कमेंट मी माझं लग्न झाल्यावर देईन.
ऑफ कोर्स त्या टपोर्‍या गुलाबासहीत... :)

Anagha said...

मौलिक कमेंटवाल्या ! मला त्याची खात्री आहे ! :) :)

Trupti said...

"आपापले गुलाब ओळखले जावेत व आपण अ जाणता कुठे खिळे तर मारीत नाही आहोत ना ह्याचा कुठेतरी विचार व्हावा...असंच काहीसं मनात होतं."
किती छान ग..अनघा दि!
आवडले :)

Anagha said...

तृप्ती, आभार. :) :)

सौरभ said...

No Bayko, No Khila, No Gulab... Happy Yeshu :D

Suhas Diwakar Zele said...

हा हा हा हा... सौरभ :) :)

Anagha said...

सौरभा, असा पळ नाही हा काढायचा रणांगणातून ! आम्हीं बरे सोडू तुला असातसा ! एक तरी बायको गळ्यात मारणारच तुझ्या ! :p :) :)

रोहन... said...

अनघा... अप्रतिम पोस्ट... :) आणि मला पूर्ण समजली आणि पटलीही.. :)

तुझा एक पंखा... :)

Prof. Sumedha said...

बघू खिळे कमी करता येतात का ? मग गुलाब ही फुलतीलच.

Anagha said...

रोहन !! :D :D

Anagha said...

सुमेधा, हे बरीक खरंच हा ! :) :)

juikalelkar said...

नातं...चिनीमातीच्या सुरेखश्या भांड्यामधील एक नाजूक गुलाबाचे रोप...त्या सुगंधी बागेला वयाची अट

नसते......

सुरुवात ते शेवट.... किती छान शब्दात नात्यांची उलगड़ केलीस तू अनघा.....

वाचता वाचता तो टोचलेला खिळा मागे पडतो आणि मनात सुन्दर गुलाबाची बागच फुलवतो

आणि खिळा हरतो गुलाबच जिंकतो.....!

अजुन काय हव ?.... जगण्यासाठी ...........