नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 10 March 2012

विळखा

माडाला विळखा घालीत, माडासमवेत आकाशाकडे झेपावणारी ती वेल. पानं जणू, कोणाचे तळहात असावेत. मऊ लुसलुशीत. बोटं फुटलेली पानं. काही नवी, कोवळी तर काही जुनी, करडी पडत चाललेली. माडाला घट्ट विळखा मारून माडावर विसंबलेली ती नाजूक वेल. कोणाला त्या वेलीचा हेवा वाटावा. कोणाला मत्सर माडाचा. असंही जगात काय शाश्वत असतं ?

वेलीची दोन पानं होती. त्यांची ही गोष्ट. त्या वेलीचं आज पावेतो फुटलेलं ते शेवटचं पान होतं. म्हणून ते सर्वात वर होतं. उद्या अजूनही नवी पानं फुटतील. वेल, वरवर माडाच्या झावळ्यांपर्यंत पोचायला काही फारसा काळ लागणार नाही. मग माड अजून वर आकाशात सरकेल. ढगांना स्पर्श करण्याची इर्षा मनात बाळगून. जशी काही त्या वेलीत व माडात शर्यंत जुंपली होती. हसतीखेळती शर्यंत. अग्रेसर, हिरवीगार बोटं फुटलेलं ते पान. आणि त्याच्याच खाली एक जून पान. एक मात्र होतं. सगळ्या पानांची नजर भुईकडे होती. म्हणूनच हिरव्या पानाला जून पान थेट दिसत होतं. वारा येई पानाला स्पर्श करी. पान थरारे. हाले डोले. जून पान, हवेतल्या धुलीकणांनी करडं झालं होतं. कणांचा त्याच्यावर लेपच जसा चढला होता. हिरवं पान रोज बघे. करडं पान दिवसागणिक भरून जात होतं. अधिकाधिक अनुभव गोळा व्हावे व त्या अनुभवांचं एक मळभ साठावं. ताजेपणा खोलखोल लपून जावा. 

पानं कधीही उर्मट नव्हती, कोणालाही कसलाही गर्व नव्हता. त्यांची मुळी निसर्गाने रचनाच तशी केली होती. नजर भुईकडे. त्यामुळे जरी माडाच्या आधाराने ती वर चढत होती, तरीही त्यांना उंचीचा गर्व नव्हता. ग ची बाधा नव्हती. हिरवं पान करड्याकडे बघे. त्याचे मन त्याला विचार करावयास भाग पाडे.

"दादा, तुम्हांला एक माहित आहे काय ?" आज पहाटे हिरव्याला रहावलेच नाही. आसपास तशी जाग नव्हती. अंधूक अस्पष्ट दिसू लागले होते. पक्षांचा चिवचिवाट सुरु झाला होता. त्या मधुर आवाजानेच हिरव्याचे डोळे उघडले आणि करड्यावर स्थिरावले.
"काय रे ?" करड्या दादाने हलकेच विचारले. पक्ष्यांच्या किलबिलाटात ही सळसळ कशी प्रसन्न करत होती.
"दादा, मला सांगा, मी हिरवा, चमचमणारा. आणि तुम्हीं का असे...थकलेले ? असे काय घडले...तुम्हांला थकवून गेले ? मला सांगाल ?"
"अरे बाळा," दादा धाकल्याशी प्रेमाने बोलू लागला. "मी जन्माला येऊन महिने उलटले. किती पावसाळे मी बघितले. आयुष्याच्या सुरवातीला मी पार तळाशी होतो. जसजसा एकेक दिवस सरे तसतसा मी वर चढत गेलो. कधी उन्हाळा कधी पावसाळा. निसर्ग जे देईल ते. तो पावसाची धार सुरू करतो. मी धुवून निघतो. पुन्हां एकवार चमकू लागतो. मात्र मी आता काहीच विसरत नाही. पाण्याची धार संपते. पावसाळा संपतो. अनुभवांची पुटं, पुन्हा अंगावर चढू लागतात. शरीर थकत जाते. जून दिसू लागते. पण माझे मन ? माझे मन हे नेहेमीच माझ्या ताब्यात असते. मला जाणीव असते...आज मी जून दिसेन, उद्या मी नवा दिसेन...पण एक दिवस असा येईल...मी माडाचा त्याग करेन...निखळेन...तळाशी भुईवर जाऊन विसावेन...स्वेच्छेने जसा समाधिस्थ होईन...तिथेच बाह्य रूप मातीत मिसळून जाईल. अंतरात्मा जाळी होईल. मोकळाढाकळा. मग मी असाच एक दिवस मातीत मिसळून जाईन. आणि तेच सत्य असेल. त्यानंतर बदल नसेल. कणकण मिसळून मी मातीत सुखाने विसावेन. पुन्हां जेव्हा पाणी पडेल...माझे कण चिंब भिजतील...सुखावतील. मंद दरवळ आसमंतात आनंद घेऊन येईल. मग मला एक सांग मित्रा...हे सर्व घडण्याआधी, मी हा आज जो इतका वर आलो आहे तो कोणामुळे ? आकाशाकडे झेपावण्याचे मी कधी स्वप्न बघितले...ते कोणाच्या आधारावर ? हे मी कसे विसरावे ? माझा विळखा तितक्याच असोशीने जपणाऱ्या  ह्या माडाला मी कधी विसरेन ? मी विळखा हलकेच घातला. माझी लहानथोर मूळं माडाने आपली मानली. मला जोपासले...पाणी पाजले. कळतंय का बाळा मी काय म्हणतोय ते ?" नतमस्तक थोरला, धाकल्याला सांगत होता. त्यावेळी धाकल्याचे डोळे पाणावले. दवबिंदू हलकेच भुईकडे झेपावले.

असेच असते...गर्व अज्ञान पसरवते. अनादी अनंत निसर्गात मिसळून जाणे हेच सत्य असते. तारुण्य, वार्धक्य ही शारीरिक अवस्था. धाकला हलकेच हसला. आता सूर्याचे किरण त्याला शोधत त्याच्यापर्यंत पोचलेच होते. तो अधिकच चमकू लागला. वारा आला. धाकल्याने त्या संधीचा फायदा उठवला. खाली वाकला, थोरल्याच्या पायाला स्पर्श करून गेला. एका क्षणाचा तो अवधी. थोरला मंद हसला. त्याने मनात इतकेच म्हटले...निसर्ग देतो धडे...ते आम्हीं समजू शकतो...आम्हीं जाणतो...परंतु, स्वत:ला शहाणी समजणारी ही मानवजात...कधी कोणाच्या उपकाराने वर उभारते...त्याचेच रक्त शोषून जाते. 
थोरल्याच्या अनुभवी नजरेला भविष्य दिसत होते. माडाच्या पारापाशी माणसे जमा होत होती. हातात कोयते होते. कुऱ्हाडी तळपत होत्या. 
होणाऱ्या नवीन बांधकामाच्या आवारात त्याच्या माडाचा बळी आज ठरलेला होता.

13 comments:

rajiv said...

iअनघा .... निसर्गाच्या माध्यमातून, कृतज्ञता व कृतघ्नता या दोन परस्पर टोकाच्या भावनांचा आविष्कार खूपच प्रभावीपणे समोर आणलायस !!

Raindrop said...

I didn't understand the post well but it reminded me of the following...
बिरछा बोला पत्ते से, सुन पत्ते एक बात
यह जग यही रीत है, एक आवत एक जात
-कबीर
The tree tells the new leaf (as a response to the leaf's request to do something so that this year the 'patjhad' never arrives) - This is the law of this world that the new comes and the old goes.

भानस said...

बांडगुळाचे मनोगत, व्यक्त केलेली कृतज्ञता...वास्तवाचे भान... छानच मांडले आहेस! त्याचबरोबरीने जगाची दुसरी बाजूही. आवडले!

हेरंब said...

:(((

शीर्षक अगदी चपखल !!

Anagha said...

राजीव, धन्यवाद. :)

Anagha said...

वंदू, आपलं बोलणं झाल्यावर मला आशा आहे, तुला समजून घेण्यास मदत झाली असेल. :)
कबीर दोहा मात्र सुंदरच...त्याला मी काय दाद देणार ? :)

Anagha said...

श्री, हा माड मला रोज खिडकीबाहेर दिसतो...आणि त्यावर ही अशी नव्याजुन्या पानांची वेल चढलेली आहे.
धन्यवाद गं. :)

Anagha said...

श्रीराज, माड आणि वेल ही जोडगोळी, माझ्या मनात फार बसून राहिली आहे.

Anagha said...

हेरंब, आभार. :)

सौरभ said...

I wish मी जर तुमच्या हातातली जर लेखणी असतो... तर शब्द इतक्या सुंदरतेने माझ्याकडुन लिहले गेले असते. I wish... :)

रोहन... said...

जितकी तुझी पोस्ट आवडली तितकीच सौरभची कमेंटही... लेकाने पहिल्यांदाच बहुदा शिस्तीत कमेंट केली... ;)

Anagha said...

सौरभा ! :)

Anagha said...

खरंच रोहन, सौरभने कोणाकडून तरी लिहून घेतलीय वाटतं ही कमेंट ! ;) :D