नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 3 March 2012

स्टिच इन टाईम...

आपण आयुष्यात काहीतरी चुकीचे निर्णय घेतले, काही धडे घेतले की ते मित्रमंडळीना सांगावेसे वाटतात. उदाहरणार्थ...बाबा रे, हे असे असे घडले...मी असा चुकीचा निर्णय घेतला...आणि मग त्यातून हा असा मनस्ताप झाला.
त्याउलट...मी आयुष्यात हा असा बरोबर निर्णय घेतला (कधी नव्हे ते !) व त्याचा असा असा फायदा झाला.

तसाच एक दूरदृष्टीतून घेतलेला उचित निर्णय. व त्यातून आलेला अनुभव.

निर्णय घेतला त्याला आता चार वर्षे ओलांडून गेली आहेत. आरोग्य विमा उतरवण्याचा निर्णय. इथे कोणत्या कंपनीकडे विमा उतरवला ते नाव देणे टाळता येण्यासारखे दिसत नाही, म्हणून नाव देते आहे. कदाचित त्या कंपनीपेक्षा दुसरी एखादी कंपनी अधिक चांगल्या रीतीने आपल्या ग्राहकाची दखल घेत असेल. मी उतरवलेला विमा हा 'आयसीआयसीआय लोम्बार्ड' ह्या कंपनीचा होता...व आहे.

२५ जानेवारी २०१२ दिवस मावळला त्यावेळी माझ्या अंगात तापाने शिरकाव केला होता. हा 'बिन बुलाये' आलेला पाहुणा, अगदी महिनाभर वास्तवास आला आहे, हे सुरवातीच्या काळात कुठून कळणार ? ताप आला तर आपण पहिले एकदोन दिवस क्रोसिनवर काढून बघतो. नाही का ? मीही तेच केले. ठरलेल्या मिटींग्स असतात, प्रेझेन्टेशन्स असतात, डेड लाईन्स असतात...आणि त्या पाळायलाच लागतात. ताप अगदी घड्याळ लावून आल्यासारखा रात्री आठनंतर हजेरी लावत असल्याकारणाने ऑफिसच्या कामात काही अडथळा आला नाही. परंतु, ताप हटायचे नाव घेईना. आणि मग रोज वेगळे डॉक्टर, वेगवेगळ्या टेस्ट्स असे माझे दिवस सुरु होऊ लागले, व तसेच ते संपू लागले. कुठलाही रिपोर्ट काहीही स्पष्ट सांगेना. हळूहळू माझी रिपोर्ट्सची फाईल फुगू लागली. औषधं वेगवेगळ्या प्रकारची सुरू झाली. आता ह्या निदान न होऊ शकणाऱ्या तापाला सगळ्या डॉक्टरांकडून एक नाव मिळू लागले. PUO - Pyrexia of Unknown Origin. ज्या तापाचे निदान होत नाही असा ताप. चला, म्हटलं माझ्या थोट्या वैद्यकीय ज्ञानात थोडी भर पडली. अँटीबायोटिक्स घेण्यास एकदा का सुरवात केली की मग त्या औषधाचा आपला आजार बरा करण्यास काहीही उपयोग होत नाही आहे हे जरी एकदोन दिवसांत कळून चुकले, तरीही औषधांचा ठरवून दिलेला कोर्स घेण्यात शहाण्या रोग्याने खंड पाडू नये. कारण जर ही अँटीबायोटिक्स आपण अर्धवट सोडली तर आपले शरीर त्या औषधासाठी प्रभावशून्य ठरू लागते. त्यामुळे मी १२ दिवस ही अशी उपयोग नसलेली औषधं केवळ ठरलेला कोर्स पुरा व्हावा ह्या हेतूने नियमित घेतली. रक्त निदान ? उत्तम. अगदी आपल्या शरीरात वहात असलेल्या रक्ताचा अभिमान वाटावा इतका खणखणीत अहवाल ! छातीचा एक्स रे ? स्वच्छ ! युरीन रिपोर्ट ? क्लियर ! ताप ? नियमित ! दिवस सरकत होते. ताप हटत नव्हता. आणि मग एक दिवस सगळी औषधं संपली. मला 'काय झालेले नाही' हे बऱ्याच प्रमाणात नक्की झाले. फक्त काय झाले आहे हे कळत नव्हते. म्हटले ठीक आहे...हेही नसे थोडके. मला कॅन्सर, एड्स, मलेरिया, टायफॉइड, ट्युमर ह्यातील काही झालेले नाही असे चित्र दिसत होते. फायलीत औषधांची, डॉक्टरांची बिले भितीदायकरीत्या येऊन बसत होती. महिना फेब्रुवारी होता. आर्थिक वर्ष संपत आलेलं होतं. ऑफिस जे काही मेडिकल बिलांच्या नावे देत असते ते पैसे जानेवारीच्या सुरवातीलाच वर्षभरातील इतर आजारपणात संपून गेले होते. ह्याच्या अर्थ सध्याच्या आजारपणाचा सर्व खर्च हा माझ्या खिशातून चाललेला होता. हे फारच मनस्ताप देणारे.

त्यापुढील चार दिवस तसेच गेले. ताप आला की फक्त क्रोसिन घेणे. आणि त्याने ताप न उतरणे. आता फक्त एक घडले. शरीरातील अँटीबायोटिक्सचा परिणाम शून्य झाला. आणि मग ती रात्र सुरू झाली. १६ फेब्रुवारी. ताप जसा कालिया यमुना नदीतून फणा काढून वर दिसू लागावा, तसा सूर्यास्तानंतर रंग दाखवू लागला. १०० च्या पुढे. संथ गतीने. आई व माझी लेक...दोघी आळीपाळीने माझ्या डोक्यावर घड्या ठेवू लागल्या. अधेमध्ये कधीतरी त्या दोघी जेवल्या. माझ्या लेकीने मला मऊ वरणभात करून आणला. मी चार घास खाल्ले. बिछान्यावर आडवी झाले तीच मुळी सर्व शस्त्रे टाकल्यासारखी. कालिया अक्षरश: नाचू लागला. लेक मोठ्ठे भांडेच माझ्या पायाशी ठेवून बसली. पंचा घेऊन. डोक्यावर, पोटावर घड्या ठेवू लागली. माझ्या अंगातील ताप आणि माझी लेक, तुंबळ युद्ध सुरू झाले. ताप थोडा खाली उतरून मध्येच हूल देई. तर पुढच्या क्षणात १०१...१०२....१०३...१०४...१०४.७....! 
"बाळा, हे काही खरं नाही. चल आपण हिंदुजा कॅज्युल्टीत जाऊ." गेले चार तास पाण्यात हात बुडवून बुडवून लेकीचे हात थंडगार पडले होते. माझ्या तापाशी लढण्याकरता तिला मदतीची गरज होती. हे मला दिसत होते. संकटात मित्रमंडळी नाही धावून येणार तर कोण येणार ? तिने जवळच रहाणाऱ्या तिच्या मित्राला फोन केला. दोन मिनिटांत तो त्याची गाडी घेऊन आमच्या घराखाली हजार झाला. आणि पुढल्या दहाव्या मिनिटाला मी हिंदुजातील तळमजल्यावरील कॅज्युल्टी वॉर्डमधील कोपऱ्यातील बिछान्यावर आडवी होते.
"आम्हीं तुम्हांला अॅडमिट करून घेतो आहोत." नर्स मला म्हणाली.
"माझं वॉलेट दे माझ्या हातात." मी लेकीला सांगितले. तिने दिले. मी त्यातून 'आयसीआयसीआय लोम्बार्ड' चं विमा कार्ड काढून तिच्या हातात दिलं. "हे अॅडमिशन काउन्टरवर दाखव."
लेक आणि तिचा मित्र दोघे काउन्टरवर गेले. मित्राच्या मदतीने, तिथे तिने फॉर्म भरला.
"आई, आत्ता त्यांनी आपल्याकडून २०,००० घेतलेत. कारण मी ते तुझं इन्शुरन्सचं कार्ड त्यांना दाखवलं. नाहीतर ते म्हणे ३०,००० घेतात. आणि मग तुझ्या क्रेडीट कार्डावरून मी ते २०,००० भरले." माझ्या उशाशी येऊन तिने हलकेच मला सांगितले.
"माझी सही नाही लागली ?"
"नाही...मी केली सही !"
"बरं..." माझी लेक ह्या तिच्या अनुभवांतून शिकत होती. कठीण प्रसंग नेहेमी आपल्याला शिकवत असतात...आपली शिकण्याची तयारी असली तर...असे मला नेहेमीच वाटत असते.
मग तिथून माझी रवानगी हिंदुजाच्या दुसऱ्या इमारतीत...अॅम्ब्युलन्समधून. बाराव्या मजल्यावरील खिडकीपाशी एका बिछान्यात. इंजेक्शन्स, सलाईन. अचानक थंडी, पाचपाच सहासहा ब्लॅन्केट्स, ताप १०४च्या पुढे जोमात...
"तुमच्या शीरा अगदी केसासारख्या बारीक आहेत हो !" माझा हात धरून शोधाशोध करीत नर्स म्हणाली. "जरा वेळ जाणार आहे शोधण्यात...थोडं सहन करा."
"हं...करते...शोधा तुम्ही." दुसरा काही इलाज होता का?
रात्र संपली. दुसरा दिवस उजाडला. ज्युनियर डॉक्टर हजर झाले. त्यांची प्रश्र्न मालिका घेऊन. आजपर्यंत माझ्या आरोग्याच्या बाबतीतील सर्व इतिहास त्यांना हवा होता.
"काही फॅमिली हिस्ट्री?"
"ब्रेस्ट कॅन्सर...एक मावसबहीण, एक मामेबहीण, आईची आई...आजी...ह्यांच्या मृत्यूचे कारण." डॉक्टरांनी माहिती टिपून घेतली.
"कधी काही अजून आजार ?"
"पूर्वी अस्थमा...." डॉक्टरांसमोर कधीही काहीही लपवू नये.
"कुठल्या औषधाची अलर्जी ?
"माहितीत तरी नाही..." टिपले गेले.
"कधीपासून ताप ? काय औषधे घेतली ? काय टेस्ट्स केल्या?" लेकीने माझी फुगीर फाईल, त्यांच्या हातात दिली.

हिंदुजाच्या तळमजल्यावर TPA चा एक काउन्टर आहे. थर्ड पार्टी एजन्सी. त्यांच्याकडे आपले फॉर्म भरून द्यायचे असतात. त्या फॉर्मला डॉक्टरांचा कागद जोडला जातो. TPA द्वारे आपले इन्शुरन्सचे काम पुढे सरकते. तिथे माझं फॉर्म दाखल झाला हे मला माझ्या हॉस्पिटलमधील बिछान्यात कळले ते एका एसेमेस द्वारा....'Dear Customer, Your cashless request has been received and registered. Staus would be updated within 4 hours. For any queries, pls call us on toll-free no. ----------.'
तासाभराने दुसरा एसेमेस....'Dear Customer, Your cashless request is under process. AL no. is ----------. For any queries, pls call us on toll-free no. ----------.'
दीड तासाने, रात्री पावणेआठच्या सुमारास तिसरा एसेमेस...'Dear Customer, the status of AL no.---------- for patient Anagha Sharad Nigwekar is queried. For any further assistance, pls call us on toll free no.----------' ह्याचा अर्थ, जो फॉर्म डॉक्टरांच्या कागदासहित, TPA काउन्टरवर आम्हीं दाखल केला होता; त्यावर विमा कंपनीला काही प्रश्र्न पडले होते.

माझ्या पलंगाच्या उजव्या हाताला पूर्व दिशा होती. मध्यरात्री भर तापात, काळ्या आकाशात धूसर चंद्रकोर दिसली होती. डोळ्यांवर चष्मा नव्हता. मग चंद्रकोर, चारपाच एकातेक गुंतलेल्या. थंडी भरून, १०४ च्या पुढे जोशात सरकणाऱ्या तापाशी शारीरिक लढा. "मला ब्लॅन्केट हवंय"...अजून...अजून....सहासात जड ब्लॅन्केट्स अंगावर. येताजाता हाताला टोचलेल्या नळीतून इंजेक्शन्स. मनात आत कुठेतरी ह्या विमाप्रकरणाची काळजी. हॉस्पिटलचं बिल लाखाच्या पुढे जाईल की काय अशी एक चिंता. साडेपाच वाजले. नर्स ताप बघून गेली. पहाट झाली आणि आकाश गुलाबी तांबूस दिसू लागलं. सव्वा सातच्या सुमारास गोल सूर्य खिडकीत दिसू लागला. दूरदूर कुठलासा डोंगर होता. त्यामागून सरकत सरकत तो वर डोकावत होता. पुढे उंच ठेंगण्या नव्या जुन्या इमारती. त्यातून हळूहळू पेटणारे दिवे. सगळीकडे जाग येऊ लागली होती. आपापल्या रहाटगाडग्यात मुंबईकर शिरत होते. पण माझा व माझ्या लेकीचा दिवस रोजच्यापेक्षा वेगळा असणार होता.

मी सलाईनवर. हाताला सुया टोचलेल्या...उजव्या हाताला वर बाटली अडकवलेली. आता हे विमा प्रकरण कोण सोडवणार ? त्यांना त्यांनी दिलेल्या क्रमांकावर फोन करायला हवा होता. त्यांना जे काही प्रश्र्न पडले होते त्याची उत्तरे लवकरात लवकर देणे गरजेचे होते. सकाळी आमचे कुटुंबमित्र श्री. फलटणकर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांच्यापेक्षा ह्या सर्व प्रकारात अनुभवी कोण होते ?
त्यांनी मला एसेमेस वरून देण्यात आलेला क्रमांक नोंद करून घेतला. TPA काउन्टर गाठला.
दोन तासांनी ते परत आले त्यावेळी त्यांच्या समोर काय करायला हवे आहे ह्याचे चित्र स्पष्ट झाले होते. डॉक्टरांनी जो कागद लिहून दिला होता त्यात लिहिले गेले होते...'P/H ब्रेस्ट कॅन्सर. म्हणजे पेशंटची हिस्ट्री - ब्रेस्ट कॅन्सर. खरे तर काय असायला हवे होते ? F/H ब्रेस्ट कॅन्सर. म्हणजे फॅमिली हिस्ट्री - ब्रेस्ट कॅन्सर. डॉक्टरांनी लिहिताना गफलत केली होती. इन्शुरन्स कंपनीला पडलेला पहिला प्रश्र्न तो होता. कारण चार वर्षांपूर्वी ज्यावेळी मी ह्या इन्शुरन्स कंपनीचा पहिला हप्ता भरला होता त्यावेळी मी कधीही 'ब्रेस्ट कॅन्सर' चा उल्लेख केला नव्हता. मला कधीही ब्रेस्ट कॅन्सर न झाल्याकारणाने. मग पेशंटची हिस्ट्री, ब्रेस्ट कॅन्सर कशी काय असू शकते....असा तो गोंधळ होता.
"मग आता ?" मी फलटणकरांना विचारलं.
"तू त्रास नको करून घेऊस. मला फक्त डॉक्टरांकडून चूक दुरुस्ती करून घ्यायला हवीय. ते मी घेतो करून." जिने लिहिताना ही चूक केली होती, ती जुनियर डॉक्टरबाई थोड्या वेळात हजर झाली. तिने हिंदुजाच्या लेटरहेडवर चूक दुरुस्ती व त्याचबरोबर चूक झाल्याबद्दल माफी असे एक पत्र विमा कंपनीसाठी लिहून दिले. ते पत्र TPA काउन्टरकडे दाखल केल्या गेलेल्या माझ्या कागदांना जोडण्यात आले.

पुन्हा रात्री एक एसेमेस माझ्या मोबाईलवर दाखल झाला...Dear Customer, the status of AL no.---------- for patient Anagha Sharad Nigwekar is queried. For any further assistance, pls call us on toll free no.----------' आता अजून काय ?
तापाने अजून हार मानलेली नव्हतीच. अगदी सहजगत्या तो १०४ च्या पुढे जात असे. एखादी शिडी भराभर चढावी तसा. सापशिडीचा उलटा खेळ. मी कधी नव्हे ती त्या सापाच्या प्रतिक्षेत. कधी तो साप नजरेसमोर येईल...आणि कधी एकदा माझा ताप त्याच्यावर बसून खाली घसरेल. म्हणजे माझा ताप हा पण कालिया आणि...त्याच्याशी लढणारा हा दुसरा साप ! तापात डोकं भरकटतं...

दुसऱ्या दिवशी फलटणकर पुन्हां TPA काउन्टरकडे. लहानपणापासून अस्थमा आहे असे डॉक्टरांनी लिहिले आहे. त्याबाबत आधी डॉक्टरांनी काय उपाययोजना केली आहे त्याबाबत माहिती हवी आहे. कोणाकडून ? फलटणकरांनी त्यांना विचारले. डॉक्टरांकडून. असे उत्तर मिळाले.
हिंदुजाच्या डॉक्टरांनी, माझ्या अस्थमावर काहीही लिहून द्यायला नकार दिला. ज्या रोगावर त्यांनी माझ्यावर कधीही उपचार केले नव्हते त्याविषयी त्यांनी का लिहून द्यावे ? त्यांचे हे म्हणणे काय चुकीचे होते ? मग आता हे गणित कसे सुटायचे ?
"आता काय करायचं ?" माझी परिस्थिती थोडी सुधारली होती. मलेरिया व टायफॉइड ह्या दोन्ही रोगांची औषध मला द्यावी लागली होती. मलेरियाची एक गोळी माझ्या पोटात गेली आणि मला थंडी भरणे थांबले. ताप मात्र हटत नव्हता. बऱ्याच बाटल्या रक्त पाथॉलॉजिस्ट घेऊन गेला होता. दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी माझं रक्त अभ्यासासाठी जमा केलं गेलं होतं. तोपर्यंत मी आजतागायत घेतलेल्या सर्व अँटीबायोटिक्सचा माझ्या शरीरावर झालेला परिणाम ओसरला होता. आणि आजपर्यंत अबोल असलेलं माझं रक्त शनिवारपर्यंत थोडं बोलकं झालं. टायफॉइडचे विषजंतू, त्यात कार्यरत झालेले दिसत होते. मात्र सोमवारी कळणार होते...हा टायफॉइड होता की पॅराटायफॉइड होता.
"मी बोलते आयसीआयसीआय लोम्बार्डशी. मला फोन लावून द्या." एसेमेस द्वारे आलेला क्रमांक लावला.
पंधरा मिनिटांचं माझं जे संभाषण झालं त्याचा गोषवारा असा होता...मी सलाईनवर. हे नक्की की ह्या उलाढाल्या पेशंट करू शकत नाही. पहिली चूक बरोबर ती हॉस्पिटलकडून झाली होती. ती त्यांनी सुधारून दिली. आता हा जो दुसरा अस्थमाविषयी उल्लेख आहे त्याचं काय करायचं. मी गेली चार वर्ष तुमच्याकडे दर वर्षी पैसे भरतेय. त्यावर मी जी काही OPD ( Outpatient Department - म्हणजे कुठल्याही हॉस्पिटल मध्ये दाखल न होता जी काही औषधांची, डॉक्टरांची बिले असतील ती ) पाठवली त्यात कधीतरी अस्थमाची बिले होती काय ? मी ह्या चार वर्षांत कधीतरी अस्थमासाठी कुठल्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे काय ? मग मी कोणाकडून आणि काय ट्रीटमेंट घेतली असे लिहून आणू ? मी इथे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले त्यावेळी जेव्हा इथले डॉक्टर माझा कागद लिहित होते, त्यावेळी काय मी ही माहिती लपवून ठेवायची होती ? नाही ना ? मग तुमचा मला लहानपणी झालेल्या अस्थम्याशी संबंधच काय ? माझा आजचा आजार व ३/४ वर्षांची असताना झालेला अस्थमा ह्यांचा एकमेकांशी काडीचा संबंध नाही...इत्यादी इत्यादी. त्यावर समोरील माणसाने काय म्हटले ?..."तुम्हीं तुमच्या फॅमिली डॉक्टरकडून तसे लिहून आणाल काय ?"
"काय लिहून आणू ? की त्यांनी कधीही मला अस्थम्यासाठी ट्रीटमेंट दिली नाही म्हणून ?"
"नाही...तसं नाही..."
"मग कसं...?"
"ठीक आहे मॅडम....मी बघतो...इथे सिनियर्सशी बोलतो..आणि तुम्हांला कळवतो..."

दुसऱ्या दिवशी दुपारी एक एसेमेस दाखल झाला...
'Dear Customer, the staus of AL -------------- for patient Anagha Sharad Nigwekar is approved. For further assistance pls call us on toll-free no.--------------'

परदेशात, विम्याशिवाय काहीही काम होत नाही. तेथील वैद्यकीय सेवा ह्या अतिशय महागड्या असतात. व त्या विम्याशिवाय भागवणे हे सामान्य लोकांना अशक्यप्राय असते. मी चार वर्षांपूर्वी माझ्या एका जवळच्या मैत्रिणीच्या अनुभवांतून हा धडा घेतला होता. तिचे एक ऑपरेशन तिने व्यवस्थित आखणी करून, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये करून घेतले होते. अगदी पंचतारांकित हॉटेलमधील डबलरूम असावी अशी थाटात स्वत:ची सेवा करून घेतली होती. मी त्यावेळी तिथून बाहेर पडले होते तीच मुळात हा निश्चय करून...मी देखील माझी व माझ्या लेकीची ही अशीच काळजी घेईन. कधी काही अशी अचानक आजारपणे उद्भवली तर आम्हां दोघींना आमची व्यवस्थित काळजी घेता यायला हवी. आमचा आर्थिक बोजा तरी कोणावरही कधीही पडता कामा नये. आम्हांला नेहेमीच मानाने जगता यायला हवे.

ह्या सगळ्या एका महिन्याच्या कालावधीत तुम्हीं सर्वजण आमच्याबरोबर होतात...मी कधीही एकटी पडले नाही...शुभा, अक्का, आकाश, सौरभ, दीपक, सुहास, फलटणकर, वंदना, पार्था, धनराज, निलेश, सौमित्र, विरल, अंतरा, इरा, नमन, आपा, हेरंब, तन्वी, श्री, विद्याधर, सपा, महेंद्र, श्रीराज, पंकज, कांचन, गौरी, आका...माझ्या सर्व प्रिय मित्र मैत्रिणींनो, हाही एक अनुभव आम्हां दोघींना तुम्हां सर्वांचा आधार देऊन गेला...आम्हांला सतत हसवत होतात...त्यामुळे हाही प्रवास चांगलाच झाला असं म्हणता येईल. :)

"बाळा, मला ह्या सर्व घटनेत एक फार बरं वाटलं..." काल आम्हीं दोघी नेहेमीसारख्याच घरी गप्पा मारत बसलो होतो.
"काय ?"
"ह्या तुझ्या वयातच आरोग्य विमाचं महत्त्व तुला कळलं...हे माझ्यासाठी फार मोठं आहे...तुला ह्याची जाणीव झाली...की मी हा विमा उतरवला असल्याकारणाने..आपल्याला हे आजारपण म्हणजे मोठा आर्थिक फटका तरी नाही बसला....नाही का ? तसेच जो काही अस्थम्यामुळे आपल्याला मनस्ताप सहन करावा लागला...तो केवळ चार वर्षांपूर्वी सुरवातीला विम्याचा फॉर्म भरताना मी त्यात ह्या लहानपणी झालेल्या अस्थम्याचा उल्लेख न केल्याने झाला. हे ही आपण लक्षात घ्यायला हवे."

लेक माझी...मान डोलावली आणि हसली.
मला माहित असतं...माझ्या सगळ्या बऱ्यावाईट अनुभवांतून, माझी लेक शहाणी होत जाते.

27 comments:

सौरभ said...

मेडिकल इंश्युरन्स किती फायद्याचा ठरतो हे मला माझा जेव्हा अपघात झालेला तेव्हा समजलच. ह्याबाबतित पप्पांनी त्यांच्या नियोजनाने आमचे आमची लाईफ अगदीच सिक्युअर करुन ठेवली आहे.

Suhas Diwakar Zele said...

खरंय... इंश्युरन्स असणे काळजी गरज बनलंय. निदान भारतात तरी तश्या वैद्यकीय सेवा सहज आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात, फक्त त्यासाठी मदतीचे दोन हात असले की बस्स. जेजेमध्ये मला हा अनुभव आला होता. दीपक नसता बरोबर तर मला काही करणे शक्य झाले नसते :(

अवांतर - मासे पार्टी राहिली आहे, जरा त्याचा अप्रूव्हल मेसेज येऊ देत लवकर :D ;-)

आनंद पत्रे said...

मेडिकल इन्श्युरंस खरंच आवश्यक असतो...
हा ताप खरंच तापदायक होता.. खूप वेळ ठाण मांडून बसलेला..

Anagha said...

सौरभ, पप्पांकडून पप्पांचा लेक काही शिकला की नाही मग ? :) :)

Anagha said...

अगदी अगदी सुहास, मासे पार्टी बाकी आहेच ! अजून एक महिना जाऊ दे शांततेत ( कठीणच आहे ना हे ?! :( ) मग करूच आपण जंगी मासे पार्टी ! :) :)

Anagha said...

आनंद, एक महिना घरी बसलेय मी ! म्हणजे, एक महिन्यापूर्वी विचार करत होते की ५८ दिवस सिक लिव्ह बाकी आहे ती मी एप्रिलच्या आत कशी संपवू...तेव्हां देव हसत होता बहुतेक ! :D

rajiv said...

अनघा -
रोख रक्कम विरहीत विम्याची पसंती - खरोखर उचित निर्णय !!

विमा हा नेहमीच जेवढ्या लहान वयात वा जितक्या लवकर काढला जाईल.. तेवढा स्वस्त !
तसेच थोड्या नेटकेपणाने व चौकसपणाने पॉलिसी घेतली तर खूपच उपयोग होऊ शकतो.
जसे काही मोठ्या आजारपणासाठी नेहमीचे प्लान बरोबर `top -up' प्लान उपयोगी पडतात.
आरोग्य विमा काढताना सर्व माहिती अर्जात नीट काळजीपूर्वक लिहिणे आवश्यक आहे.
म्हणजे ऐनवेळी आपली अडचण होणार नाही.

Anagha said...

राजीव, परवा 'हिंदुस्तान टाईम्स'मध्ये एक लेख आला होता...हेल्थ इन्शुरन्स बद्दलच...त्याची लिंक...

http://www.hindustantimes.com/business-news/Sectors/How-to-increase-your-health-insurance-cover/Article1-786270.aspx

Shriraj said...

This may sound foolish...मी ३ दिवसापूर्वी IRDAची परीक्षा दिली (पार्ट टाईम काही तरी करावं म्हणून) पण हेल्थ इंश्योरंस आपल्याला काढायला पाहिजे हे काही सुचलं नाही.

... पुढच्या पगारात काढतो :)

Thanks Anagha! :)

हेरंब said...

तिशीनंतर तीन गोष्टी मस्ट.. खाण्यावर कंट्रोल, वर्कआऊट आणि हेल्थ इन्श्युरन्स !! (अर्थात हा बोलाचा भात आहे. मी तिन्ही करत नाही :) )

Gouri said...

गेली दोन वर्षं माझं इन्शुरन्स शिक्षण चाललंय :)
इतकी वर्षं कधीच काही क्लेम केलं नव्हतं, आणि कंपनीकडून दिल्या जाणार्‍या इंश्युरन्सच्या फायद्या -तोट्याविषयी विशेष विचारही केला नव्हता. पण मागच्या दोन वर्षात नवर्‍याच्या कंपनीचा काहीही पार्श्वभूमी माहित नसताना धडपडत केलेला क्लेम, प्लॅन्ड सर्जरी, अनप्लॅन्ड सर्जरी, कॅशलेस, पॅरलल क्लेम, क्लेम फ्रॉम नॉन नेटवर्क हॉस्पिटल एवढे सगळे प्रकार करून झालेत, आणि मेडिकल इन्श्युरन्सची किंमत चांगलीच समजलीय!

आता तब्येत बरी आहे ना ग?

Anagha said...

श्रीराज, म्हणजे मग आजारी पडलोच तर निदान पैश्याचं टेन्शन तरी रहात नाही ! :) आणि 'छे ! आपल्याला कायपण होत नाही' ह्या भ्रमात रहाणे काही खरे नाही ! :) :)

Anagha said...

हेरंबा, 'बेटर लेट दॅन नेवर !' :)

Anagha said...

गौरे, अगं एक तर ना मला पैश्यातलं ओ का ठो कळत नाही ! आणि म्हणून मला आणखीनच घाबरायला होतं ! :)
आता बरी आहे ग मी... :)

विनायक पंडित said...

खरंच खूप माहितीपूर्ण लेख आहे! खूपच महत्वाचा! काळजी घ्या, लवकर ठणठणीत व्हा!

अपर्णा said...

अनघा, काळजी घे...हा अनुभव लिहिलास हेही बरं केलंस.....बरेच दिवस विविध कारणांमुळे मीही गायब आहे..पण तरी तुझी खुशाली दिपकने कळवली होती त्यावरून तू ही लढाईपण जिंकशील ही खात्री होतीच....
आता पुन्हा एकदा हास बघु ...:)

We were in ER last week for my little one and I just thoughts its just blessed to be with a good insurance..esp in US....else my first delivery bill was the biggest shock to me...Couse Ins took care of it....(and Insurance is a very big business I would say in US...jaaude..ugach wishayantar nako)

Anagha said...

कधीतरी अशीही जाणीव होते ना विनायक, की आपण घेतलेला निर्णय बरोबरच होता....त्यातली ही एक. :)
आभार प्रतिक्रियेबद्दल. :)

Anagha said...

अगं अपर्णा, कसं आहे आता पिल्लू ?!! तिथे तर सगळंच कठीण जातं...हो ना ? इथे निदान आपली माणसं तरी असतात बरोबर !

मी बरीच बरी आहे गं आता...धन्यवाद गं. :)

Raindrop said...

medical insurance jyanna havi aste tyanna dili zat nahi...zyanna nako aste tyanna roz roz phone...pan kitti avashyak aahe ti fakta lokanche real life experiences aikunach kalataat.

Anagha said...

का बरं नाही दिला जात वंदू ? म्हणजे मला कळलं नाही.

Raindrop said...

they check you for past diseases history...if you have had one or more serious diseases in the past and even if you are healthy for past many many years, you are not entitled for a medical cover....even for other diseases. you are in high-risk category and are demanded very high premium (if by hook or crook you get it approved). Luckily I dont need it now as the army takes care of us....but imagine otherwise meri halat kya hoti?

Prof. Narendra Vichare said...

अनघा, मेडिकल इंश्युरंस बद्दलची जागरुकता वाढविण्याकरिता ICICI वाल्यांनी तुला BRAND AMBASSADOR म्हणून APPOINT करून TESTIMONIAL ADD करायला हरकत नाही... लवकर ठणठणीत बरी हो.... :-)

Anagha said...

विनायक आभार आभार ! आता झालेच आहे बहुतेक बरी ! :)

Anagha said...

सर, :) :)

Anagha said...

I understand Vandu...

भानस said...

मेडिकल आणि लाईफ( टर्म आणि लाईफ दोन्हीही ) इन्श्युरन्स असणे अत्यंत जरूरीचे. इथे तर त्याशिवाय एक पाउलही हलत नाही. जगाच्या पाठीवर कुठेही राहा पण हे करायलाच हवे.

बाकी इन्श्युरन्स करुनही लढावे लागतेच. :(

आणि हो.. तू मनापासून जेवल्याचे मासे येऊन सांगून गेले गं मला... :D:D

Anagha said...

श्री, मासे तुझ्याशी बोलले ?! भारी ! कुठला मासा होता ? बोंबील होते का ? :p :) :)