नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 28 March 2012

निवड

पतीपत्नी मधील नाते हे काय असते ?

नातं...चिनीमातीच्या सुरेखश्या भांड्यामधील एक नाजूक गुलाबाचे रोप...मोठ्या प्रेमाने दोन मनांनी निगराणी राखलेलं...त्यावर प्रतिदिनी टवटवीत गुलाब डवरतो....आणि रोप अधिकाधिक मनमोहक बनू लागतं.
की नातं हे येशू ख्रिस्त आहे....क्रुसावर टांगलेलं...कळत नकळत...एकेक खिळा त्यावर ठोकला जातो...आणि काळ उलटेल त्यावेळी जे हाताशी लागेल ते निश्चेष्ट कलेवर असते ?

संसारातील गोष्टी ह्या बऱ्याचदा छोट्या छोट्याच असतात. नाजूक असतात. संसार एक चालवायला घेतला तरी दोन पूर्णत: वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे त्यासाठी एकत्र आलेली असतात. वेगवेगळ्या नोकऱ्या वा वेगवेगळे काढलेले बालपण ह्यामुळे मित्र परिवार वेगळा असतो. आणि मग हे असे निर्णय घेण्याचे क्षण उभे रहातात.

प्रेमात पडणे, लग्न करून घर सांभाळणे, नोकरी...मातृत्व....आणि आता घर एकटीच्या खांद्यांवर येऊन पडणे...ह्या सर्व घटना कधी आवडीने तर कधी नाईलाजाने जगत गेल्यावर, आज मला जाणवते, जे मला दिसते ते हे असे...

कोणी खत घालावयाचे...कोणी खिळा ठोकायचा ही त्यात्या वेळची, ज्याचीत्याची निवड असते. संसारात, रोज दिवसागणिक आपल्याला काहीनाकाही 'निवड' करणे भाग पडते. कधी विचारपूर्वक तर कधी एखाद्या क्षणात आपण आपली निवड ठरवून टाकतो. आणि त्यावेळी पतीपत्नीच्या नाजूक नात्याला खत घातले गेले की त्यावर अजून एक खिळा ठोकला गेला हे शेवटी काळ ठरवतो.

आज मी एक स्त्री आहे...आणि ह्या सर्व घटनांतून मी स्वत: गेले आहे.
पुरुषांच्या भूमिकेत शिरून एखाद्या घटनेकडे बघणे फार अवघड आहे असे मला वाटत नाही. ह्याला कारण आहे. जाहिरात क्षेत्रात, रोज नवे काम समोर येते. त्यावेळी नित्य नव्या 'टारगेट ग्रुप' साठी एखादी जाहिरात करावयाची असते. वेगवेगळ्या वयोगटाचे...कधी स्त्री तर कधी पुरुष. त्यामुळे आज स्त्रीच्या तर उद्या पुरुषाच्या भूमिकेत शिरण्याची एक सवय मनाला पडून गेलेली आहे. कधी गरज पडली तर अल्लड ७/८ वर्षाची मुलगी होणे, वा कधी साठ वर्षांच्या एखाद्या भारतीय पुरुषाच्या मानसिकतेत डोकावणे, फारसे अवघड जात नाही. आणि त्यातून आयुष्यात वेगवेगळ्या घडामोडींना सामोरं जावे लागल्याकारणाने, व माझ्या कामाच्या ढंगामुळे, कधी एखादी स्त्री कसा विचार करेल, वा कधी एखादा पुरुष एखादी घटना कशी घेईल हा विचार आता अंगवळणी पडला आहे.

आज म्हटलं तर फुलपाखरू बनणे वा उद्या कचऱ्याच्या डब्याची आत्मकहाणी लिहिणे...ह्यात असे अवघड ते काय ?
त्यामुळे, मी पुढे मांडलेले विचार, हे...'साल्या ह्या बायका ना ! वैतागे रे !' किंवा 'ह्यांना ना...च्यायला नवरे...कायम ह्यांच्या कुशीत लागतात !'...असा विचार करून सोडून द्यावेत असे मला नाही वाटत.
हे अशा प्रकारचे पुरुषांचे विचार देखील माझ्या ओळखीचे आहेत ह्याला कारण आहे. हा असा विचार करणारे पुरुष सुद्धा मी आसपास बघितले आहेत.
कधी एखादी सहल, कधी एखादा चित्रपट, नाटक बघण्याचे बेत ठरू लागतात.
३०/३२ वयोगटाचा तरुण पती विचार करू लागतो...जाण्याचा...पत्नीला घेऊन जाण्याचा बेत आखू शकत नाही...घरात लहान मूल आहे. ती बाळाला टाकून येऊ शकत नाही. मग ? त्या वेळी त्याने निर्णय घेतला सहल न टाळण्याचा...एक दिवसाची तर सहल...सक्काळी जाणार रात्रीपर्यंत परत येणार...त्यात काय मोठं...घरी ती तापाने फणफणलेल्या बाळाच्या उशाशी बसून...कपाळावर घड्या ठेवत...रात्री तो जेव्हां पुन्हा तिच्यासमोर उभा रहातो...त्यावेळी बाकी काहीच बदललेलं नसतं...फक्त एक खिळा वाढलेला असतो.

एखादी सहल...आणि त्याच दिवशी बायकोच्या माहेरी लग्न...तो मित्रांना कळवून टाकतो....मला नाही जमणार....घरी लग्न आहे...मित्रांची सहल काही त्याच्यासाठी थांबत नाही...पण इथे मात्र अजून एक टपोरा गुलाब त्या पतीपत्नीच्या नात्यावर उगवलेला असतो.

तर दुसऱ्या कोणा एकासाठी, बायकोच्या माहेरचे लग्न, हे मित्रांबरोबर ठरवलेला नाटकाचा बेत टाळण्यासाठीचं सबळ कारण असू शकत नाही....तो नाटकाला जातो...बायको एकटीच नवऱ्याशिवाय माहेरच्या नातेवाईकांसमोर आनंदी चेहेऱ्याने उभी रहाते...हा एक खिळा असतो.

छोट्या मुलीच्या अंगात १०५ ताप..मित्रांबरोबर ठरवलेली दुबईच्या वाळवंटातील 'डेझर्ट सफारी'...त्या भर तापात मुलीला घेऊन निघण्यासाठी जेव्हां एखादा नवरा आपल्या बायकोला भरीस घालत असतो...त्यावेळी तो एक असाच खिळा त्या येशूच्या हातावर मारत असतो.

तर दुसरा कोणी...रंगात आलेला सहलीचा बेत...अचानक ओढवलेले बायकोचे आजारपण...आणि मग सहलीचा मोह टाळून त्याचे तिच्याबरोबर घरी रहाणे. एक टपोरा गुलाब उगवलेला असतो.

खिळे अंगावर झेलणारी नाती...
कालौघात त्यांची लक्तरे होतात. ती लक्तरे अंगावर लेऊन उघडी पडलेली नाती.
आणि हाती फक्त प्रेत लागते.

आणि टपोऱ्या गुलाबांनी फुललेले एखादे रोप...
आयुष्याची बाग हसरी, ताजी, टवटवीत ठेवते...
आणि त्या सुगंधी बागेला वयाची अट नसते.

Saturday, 24 March 2012

२०१२ मधील माझं क्रिएटिव्ह...

कन्सेप्ट माझी आणि इलस्ट्रेशन्स, माझा मित्र, निलेश नाईक ह्याची. :)  

Friday, 23 March 2012

कधी वाटू लागतं...

कधी वाटू लागतं...
आयुष्य सुंदर आहे.
जगण्यासारखं आहे.
सखेसोबती भेटतात...
हसणं होतं...
खिदळणं होतं...
आणि मग खरंच वाटू लागतं...
आयुष्य सुंदर आहे.
जगण्यासारखं आहे.

मात्र हसता हसता जेव्हां डोळे भरून येतात...
पाणी चोरता चोरता...
डोळे हकनाक उघडे पडतात...
तेव्हा मात्र वाटतं...
ह्या डोळ्यांचं आणि हृदयाचं कधी पटलंच नाही...
त्यांचं एकमेकांशी कधी जमलंच नाही.
आणि फिरून एकदा तो क्षण सरतो...
लाट डोळ्यांआड सरकते...
कुठून ना कुठून...कोणी ना कोणी हसवून जातं...
आणि मग पुन्हा वाटू लागतं...
आयुष्य सुंदर आहे.
जगून बघायला काय हरकत आहे ?

Thursday, 22 March 2012

खांदेरी-उंदेरी

आपण सगळे गेल्या रविवारी खांदेरी-उंदेरी जलदुर्ग बघायला गेलो.
आपापल्या ब्लॉगवर सगळ्यांनी फोटो टाकले.  
सुंदर लेख लिहिले.
मग आता मी काय वेगळं लिहू ?

तुम्हां सगळ्यांमुळे असं काही नवंनवं मला बघायला मिळतं.
नाहीतर मी 'तिकोना'ला जाणे कठीण... 
कासच्या पठारावरील इंद्रधनुषी फुलांपर्यंत मी पोचणं महाकठीण... 
आणि खांदेरी-उंदेरी जलदुर्ग केवळ अशक्य !

माणसं आपापल्या वाटची सापशिडी खेळत असतात.
निसर्ग आपल्या जागी ऊनपावसाळे झेलत असतो.
जसा निसर्ग धडे देतो...तशीच माणसे देखील शिकवत असतात.
आयुष्याचे धडे, प्रत्यक्ष जगून पाठ झाले तरीही, संपत नाहीत हे मात्र खरे.
आणि पुढचं पाठ मागचं सपाट...ह्या नियमानुसार आयुष्य नित्य नव्या दमाने पुढे सरकतच रहातं.
तो समुद्र, ते काळे पाषाण.
तिथे फिरताना, जाणवणारी त्यावेळच्या आयुष्याची कठीणता.
पायात चांगले शूज घालून देखील धडपडणारे आम्हीं...मग त्यावेळी हातात भाले तलवारी घेऊन वेगाने त्या दगडावर चढणारे सैनिक, ही करामत कसे करीत असत हे त्यांचे त्यांनाच माहित.
ते त्यांचे त्या काळातील खडतर आयुष्य. आज सीमेवर आमच्या सुरक्षिततेसाठी खडतर आयुष्य जगणारे आमचे सैनिक.
आणि आम्हीं....साधा रोजच्या आयुष्यातील एक कुठला नियम पाळताना आमची मारामार.
एखाद्या ऐतिहासिक वा नयनरम्य ठिकाणी देखील दारुच्या बाटल्या, प्लास्टिकच्या प्लेट्स, सिगारेटची थोटकं, कागदाचे बोळे....टाकताना आम्हांला ना लाजा वाटत...ना आमचे हात कचरत !
कसले आम्हीं स्वाभिमानी, आणि कसली आमची देशभक्ती ?! आमच्या रक्तारक्तात अस्वच्छता मुरली आहे. अस्वच्छतेतेच आम्हीं पुजारी आहोत...आम्हीं गलिच्छ आहोत...आणि आम्हीं कुठल्याही देवाला कचऱ्याने माखायला कचरत नाही. मग तो सिद्धिविनायक असो...वा महालक्ष्मी असो वा असो एखादा वेताळदेव.
हेच सत्य आहे !

आमचा देव सर्वत्र वसतो.
आम्हीं सर्वत्र कचरा करतो.
आमचा देव कचऱ्यात वसतो.
अ = ब.
ब = क.
अ = क....ह्या धर्तीवर.
देव अदृश्य. कचरा सदृश्य.
फक्त म्हणून तो कचऱ्यात बुडून गेलेला, आपल्या आंधळ्या डोळ्यांना दिसत नाही इतकंच !

असो...
...खास सगळे मिळून काही ठरवलं...की आयुष्यातील एखादा दिवस हसतखेळत, सहजगत्या सरून जातो.
मग मंडळी आता पुन्हां कधी ?
:)
















ग्रुप फोटो आकाशच्या सौजन्याने ! :)

Saturday, 10 March 2012

विळखा

माडाला विळखा घालीत, माडासमवेत आकाशाकडे झेपावणारी ती वेल. पानं जणू, कोणाचे तळहात असावेत. मऊ लुसलुशीत. बोटं फुटलेली पानं. काही नवी, कोवळी तर काही जुनी, करडी पडत चाललेली. माडाला घट्ट विळखा मारून माडावर विसंबलेली ती नाजूक वेल. कोणाला त्या वेलीचा हेवा वाटावा. कोणाला मत्सर माडाचा. असंही जगात काय शाश्वत असतं ?

वेलीची दोन पानं होती. त्यांची ही गोष्ट. त्या वेलीचं आज पावेतो फुटलेलं ते शेवटचं पान होतं. म्हणून ते सर्वात वर होतं. उद्या अजूनही नवी पानं फुटतील. वेल, वरवर माडाच्या झावळ्यांपर्यंत पोचायला काही फारसा काळ लागणार नाही. मग माड अजून वर आकाशात सरकेल. ढगांना स्पर्श करण्याची इर्षा मनात बाळगून. जशी काही त्या वेलीत व माडात शर्यंत जुंपली होती. हसतीखेळती शर्यंत. अग्रेसर, हिरवीगार बोटं फुटलेलं ते पान. आणि त्याच्याच खाली एक जून पान. एक मात्र होतं. सगळ्या पानांची नजर भुईकडे होती. म्हणूनच हिरव्या पानाला जून पान थेट दिसत होतं. वारा येई पानाला स्पर्श करी. पान थरारे. हाले डोले. जून पान, हवेतल्या धुलीकणांनी करडं झालं होतं. कणांचा त्याच्यावर लेपच जसा चढला होता. हिरवं पान रोज बघे. करडं पान दिवसागणिक भरून जात होतं. अधिकाधिक अनुभव गोळा व्हावे व त्या अनुभवांचं एक मळभ साठावं. ताजेपणा खोलखोल लपून जावा. 

पानं कधीही उर्मट नव्हती, कोणालाही कसलाही गर्व नव्हता. त्यांची मुळी निसर्गाने रचनाच तशी केली होती. नजर भुईकडे. त्यामुळे जरी माडाच्या आधाराने ती वर चढत होती, तरीही त्यांना उंचीचा गर्व नव्हता. ग ची बाधा नव्हती. हिरवं पान करड्याकडे बघे. त्याचे मन त्याला विचार करावयास भाग पाडे.

"दादा, तुम्हांला एक माहित आहे काय ?" आज पहाटे हिरव्याला रहावलेच नाही. आसपास तशी जाग नव्हती. अंधूक अस्पष्ट दिसू लागले होते. पक्षांचा चिवचिवाट सुरु झाला होता. त्या मधुर आवाजानेच हिरव्याचे डोळे उघडले आणि करड्यावर स्थिरावले.
"काय रे ?" करड्या दादाने हलकेच विचारले. पक्ष्यांच्या किलबिलाटात ही सळसळ कशी प्रसन्न करत होती.
"दादा, मला सांगा, मी हिरवा, चमचमणारा. आणि तुम्हीं का असे...थकलेले ? असे काय घडले...तुम्हांला थकवून गेले ? मला सांगाल ?"
"अरे बाळा," दादा धाकल्याशी प्रेमाने बोलू लागला. "मी जन्माला येऊन महिने उलटले. किती पावसाळे मी बघितले. आयुष्याच्या सुरवातीला मी पार तळाशी होतो. जसजसा एकेक दिवस सरे तसतसा मी वर चढत गेलो. कधी उन्हाळा कधी पावसाळा. निसर्ग जे देईल ते. तो पावसाची धार सुरू करतो. मी धुवून निघतो. पुन्हां एकवार चमकू लागतो. मात्र मी आता काहीच विसरत नाही. पाण्याची धार संपते. पावसाळा संपतो. अनुभवांची पुटं, पुन्हा अंगावर चढू लागतात. शरीर थकत जाते. जून दिसू लागते. पण माझे मन ? माझे मन हे नेहेमीच माझ्या ताब्यात असते. मला जाणीव असते...आज मी जून दिसेन, उद्या मी नवा दिसेन...पण एक दिवस असा येईल...मी माडाचा त्याग करेन...निखळेन...तळाशी भुईवर जाऊन विसावेन...स्वेच्छेने जसा समाधिस्थ होईन...तिथेच बाह्य रूप मातीत मिसळून जाईल. अंतरात्मा जाळी होईल. मोकळाढाकळा. मग मी असाच एक दिवस मातीत मिसळून जाईन. आणि तेच सत्य असेल. त्यानंतर बदल नसेल. कणकण मिसळून मी मातीत सुखाने विसावेन. पुन्हां जेव्हा पाणी पडेल...माझे कण चिंब भिजतील...सुखावतील. मंद दरवळ आसमंतात आनंद घेऊन येईल. मग मला एक सांग मित्रा...हे सर्व घडण्याआधी, मी हा आज जो इतका वर आलो आहे तो कोणामुळे ? आकाशाकडे झेपावण्याचे मी कधी स्वप्न बघितले...ते कोणाच्या आधारावर ? हे मी कसे विसरावे ? माझा विळखा तितक्याच असोशीने जपणाऱ्या  ह्या माडाला मी कधी विसरेन ? मी विळखा हलकेच घातला. माझी लहानथोर मूळं माडाने आपली मानली. मला जोपासले...पाणी पाजले. कळतंय का बाळा मी काय म्हणतोय ते ?" नतमस्तक थोरला, धाकल्याला सांगत होता. त्यावेळी धाकल्याचे डोळे पाणावले. दवबिंदू हलकेच भुईकडे झेपावले.

असेच असते...गर्व अज्ञान पसरवते. अनादी अनंत निसर्गात मिसळून जाणे हेच सत्य असते. तारुण्य, वार्धक्य ही शारीरिक अवस्था. धाकला हलकेच हसला. आता सूर्याचे किरण त्याला शोधत त्याच्यापर्यंत पोचलेच होते. तो अधिकच चमकू लागला. वारा आला. धाकल्याने त्या संधीचा फायदा उठवला. खाली वाकला, थोरल्याच्या पायाला स्पर्श करून गेला. एका क्षणाचा तो अवधी. थोरला मंद हसला. त्याने मनात इतकेच म्हटले...निसर्ग देतो धडे...ते आम्हीं समजू शकतो...आम्हीं जाणतो...परंतु, स्वत:ला शहाणी समजणारी ही मानवजात...कधी कोणाच्या उपकाराने वर उभारते...त्याचेच रक्त शोषून जाते. 
थोरल्याच्या अनुभवी नजरेला भविष्य दिसत होते. माडाच्या पारापाशी माणसे जमा होत होती. हातात कोयते होते. कुऱ्हाडी तळपत होत्या. 
होणाऱ्या नवीन बांधकामाच्या आवारात त्याच्या माडाचा बळी आज ठरलेला होता.

Saturday, 3 March 2012

स्टिच इन टाईम...

आपण आयुष्यात काहीतरी चुकीचे निर्णय घेतले, काही धडे घेतले की ते मित्रमंडळीना सांगावेसे वाटतात. उदाहरणार्थ...बाबा रे, हे असे असे घडले...मी असा चुकीचा निर्णय घेतला...आणि मग त्यातून हा असा मनस्ताप झाला.
त्याउलट...मी आयुष्यात हा असा बरोबर निर्णय घेतला (कधी नव्हे ते !) व त्याचा असा असा फायदा झाला.

तसाच एक दूरदृष्टीतून घेतलेला उचित निर्णय. व त्यातून आलेला अनुभव.

निर्णय घेतला त्याला आता चार वर्षे ओलांडून गेली आहेत. आरोग्य विमा उतरवण्याचा निर्णय. इथे कोणत्या कंपनीकडे विमा उतरवला ते नाव देणे टाळता येण्यासारखे दिसत नाही, म्हणून नाव देते आहे. कदाचित त्या कंपनीपेक्षा दुसरी एखादी कंपनी अधिक चांगल्या रीतीने आपल्या ग्राहकाची दखल घेत असेल. मी उतरवलेला विमा हा 'आयसीआयसीआय लोम्बार्ड' ह्या कंपनीचा होता...व आहे.

२५ जानेवारी २०१२ दिवस मावळला त्यावेळी माझ्या अंगात तापाने शिरकाव केला होता. हा 'बिन बुलाये' आलेला पाहुणा, अगदी महिनाभर वास्तवास आला आहे, हे सुरवातीच्या काळात कुठून कळणार ? ताप आला तर आपण पहिले एकदोन दिवस क्रोसिनवर काढून बघतो. नाही का ? मीही तेच केले. ठरलेल्या मिटींग्स असतात, प्रेझेन्टेशन्स असतात, डेड लाईन्स असतात...आणि त्या पाळायलाच लागतात. ताप अगदी घड्याळ लावून आल्यासारखा रात्री आठनंतर हजेरी लावत असल्याकारणाने ऑफिसच्या कामात काही अडथळा आला नाही. परंतु, ताप हटायचे नाव घेईना. आणि मग रोज वेगळे डॉक्टर, वेगवेगळ्या टेस्ट्स असे माझे दिवस सुरु होऊ लागले, व तसेच ते संपू लागले. कुठलाही रिपोर्ट काहीही स्पष्ट सांगेना. हळूहळू माझी रिपोर्ट्सची फाईल फुगू लागली. औषधं वेगवेगळ्या प्रकारची सुरू झाली. आता ह्या निदान न होऊ शकणाऱ्या तापाला सगळ्या डॉक्टरांकडून एक नाव मिळू लागले. PUO - Pyrexia of Unknown Origin. ज्या तापाचे निदान होत नाही असा ताप. चला, म्हटलं माझ्या थोट्या वैद्यकीय ज्ञानात थोडी भर पडली. अँटीबायोटिक्स घेण्यास एकदा का सुरवात केली की मग त्या औषधाचा आपला आजार बरा करण्यास काहीही उपयोग होत नाही आहे हे जरी एकदोन दिवसांत कळून चुकले, तरीही औषधांचा ठरवून दिलेला कोर्स घेण्यात शहाण्या रोग्याने खंड पाडू नये. कारण जर ही अँटीबायोटिक्स आपण अर्धवट सोडली तर आपले शरीर त्या औषधासाठी प्रभावशून्य ठरू लागते. त्यामुळे मी १२ दिवस ही अशी उपयोग नसलेली औषधं केवळ ठरलेला कोर्स पुरा व्हावा ह्या हेतूने नियमित घेतली. रक्त निदान ? उत्तम. अगदी आपल्या शरीरात वहात असलेल्या रक्ताचा अभिमान वाटावा इतका खणखणीत अहवाल ! छातीचा एक्स रे ? स्वच्छ ! युरीन रिपोर्ट ? क्लियर ! ताप ? नियमित ! दिवस सरकत होते. ताप हटत नव्हता. आणि मग एक दिवस सगळी औषधं संपली. मला 'काय झालेले नाही' हे बऱ्याच प्रमाणात नक्की झाले. फक्त काय झाले आहे हे कळत नव्हते. म्हटले ठीक आहे...हेही नसे थोडके. मला कॅन्सर, एड्स, मलेरिया, टायफॉइड, ट्युमर ह्यातील काही झालेले नाही असे चित्र दिसत होते. फायलीत औषधांची, डॉक्टरांची बिले भितीदायकरीत्या येऊन बसत होती. महिना फेब्रुवारी होता. आर्थिक वर्ष संपत आलेलं होतं. ऑफिस जे काही मेडिकल बिलांच्या नावे देत असते ते पैसे जानेवारीच्या सुरवातीलाच वर्षभरातील इतर आजारपणात संपून गेले होते. ह्याच्या अर्थ सध्याच्या आजारपणाचा सर्व खर्च हा माझ्या खिशातून चाललेला होता. हे फारच मनस्ताप देणारे.

त्यापुढील चार दिवस तसेच गेले. ताप आला की फक्त क्रोसिन घेणे. आणि त्याने ताप न उतरणे. आता फक्त एक घडले. शरीरातील अँटीबायोटिक्सचा परिणाम शून्य झाला. आणि मग ती रात्र सुरू झाली. १६ फेब्रुवारी. ताप जसा कालिया यमुना नदीतून फणा काढून वर दिसू लागावा, तसा सूर्यास्तानंतर रंग दाखवू लागला. १०० च्या पुढे. संथ गतीने. आई व माझी लेक...दोघी आळीपाळीने माझ्या डोक्यावर घड्या ठेवू लागल्या. अधेमध्ये कधीतरी त्या दोघी जेवल्या. माझ्या लेकीने मला मऊ वरणभात करून आणला. मी चार घास खाल्ले. बिछान्यावर आडवी झाले तीच मुळी सर्व शस्त्रे टाकल्यासारखी. कालिया अक्षरश: नाचू लागला. लेक मोठ्ठे भांडेच माझ्या पायाशी ठेवून बसली. पंचा घेऊन. डोक्यावर, पोटावर घड्या ठेवू लागली. माझ्या अंगातील ताप आणि माझी लेक, तुंबळ युद्ध सुरू झाले. ताप थोडा खाली उतरून मध्येच हूल देई. तर पुढच्या क्षणात १०१...१०२....१०३...१०४...१०४.७....! 
"बाळा, हे काही खरं नाही. चल आपण हिंदुजा कॅज्युल्टीत जाऊ." गेले चार तास पाण्यात हात बुडवून बुडवून लेकीचे हात थंडगार पडले होते. माझ्या तापाशी लढण्याकरता तिला मदतीची गरज होती. हे मला दिसत होते. संकटात मित्रमंडळी नाही धावून येणार तर कोण येणार ? तिने जवळच रहाणाऱ्या तिच्या मित्राला फोन केला. दोन मिनिटांत तो त्याची गाडी घेऊन आमच्या घराखाली हजार झाला. आणि पुढल्या दहाव्या मिनिटाला मी हिंदुजातील तळमजल्यावरील कॅज्युल्टी वॉर्डमधील कोपऱ्यातील बिछान्यावर आडवी होते.
"आम्हीं तुम्हांला अॅडमिट करून घेतो आहोत." नर्स मला म्हणाली.
"माझं वॉलेट दे माझ्या हातात." मी लेकीला सांगितले. तिने दिले. मी त्यातून 'आयसीआयसीआय लोम्बार्ड' चं विमा कार्ड काढून तिच्या हातात दिलं. "हे अॅडमिशन काउन्टरवर दाखव."
लेक आणि तिचा मित्र दोघे काउन्टरवर गेले. मित्राच्या मदतीने, तिथे तिने फॉर्म भरला.
"आई, आत्ता त्यांनी आपल्याकडून २०,००० घेतलेत. कारण मी ते तुझं इन्शुरन्सचं कार्ड त्यांना दाखवलं. नाहीतर ते म्हणे ३०,००० घेतात. आणि मग तुझ्या क्रेडीट कार्डावरून मी ते २०,००० भरले." माझ्या उशाशी येऊन तिने हलकेच मला सांगितले.
"माझी सही नाही लागली ?"
"नाही...मी केली सही !"
"बरं..." माझी लेक ह्या तिच्या अनुभवांतून शिकत होती. कठीण प्रसंग नेहेमी आपल्याला शिकवत असतात...आपली शिकण्याची तयारी असली तर...असे मला नेहेमीच वाटत असते.
मग तिथून माझी रवानगी हिंदुजाच्या दुसऱ्या इमारतीत...अॅम्ब्युलन्समधून. बाराव्या मजल्यावरील खिडकीपाशी एका बिछान्यात. इंजेक्शन्स, सलाईन. अचानक थंडी, पाचपाच सहासहा ब्लॅन्केट्स, ताप १०४च्या पुढे जोमात...
"तुमच्या शीरा अगदी केसासारख्या बारीक आहेत हो !" माझा हात धरून शोधाशोध करीत नर्स म्हणाली. "जरा वेळ जाणार आहे शोधण्यात...थोडं सहन करा."
"हं...करते...शोधा तुम्ही." दुसरा काही इलाज होता का?
रात्र संपली. दुसरा दिवस उजाडला. ज्युनियर डॉक्टर हजर झाले. त्यांची प्रश्र्न मालिका घेऊन. आजपर्यंत माझ्या आरोग्याच्या बाबतीतील सर्व इतिहास त्यांना हवा होता.
"काही फॅमिली हिस्ट्री?"
"ब्रेस्ट कॅन्सर...एक मावसबहीण, एक मामेबहीण, आईची आई...आजी...ह्यांच्या मृत्यूचे कारण." डॉक्टरांनी माहिती टिपून घेतली.
"कधी काही अजून आजार ?"
"पूर्वी अस्थमा...." डॉक्टरांसमोर कधीही काहीही लपवू नये.
"कुठल्या औषधाची अलर्जी ?
"माहितीत तरी नाही..." टिपले गेले.
"कधीपासून ताप ? काय औषधे घेतली ? काय टेस्ट्स केल्या?" लेकीने माझी फुगीर फाईल, त्यांच्या हातात दिली.

हिंदुजाच्या तळमजल्यावर TPA चा एक काउन्टर आहे. थर्ड पार्टी एजन्सी. त्यांच्याकडे आपले फॉर्म भरून द्यायचे असतात. त्या फॉर्मला डॉक्टरांचा कागद जोडला जातो. TPA द्वारे आपले इन्शुरन्सचे काम पुढे सरकते. तिथे माझं फॉर्म दाखल झाला हे मला माझ्या हॉस्पिटलमधील बिछान्यात कळले ते एका एसेमेस द्वारा....'Dear Customer, Your cashless request has been received and registered. Staus would be updated within 4 hours. For any queries, pls call us on toll-free no. ----------.'
तासाभराने दुसरा एसेमेस....'Dear Customer, Your cashless request is under process. AL no. is ----------. For any queries, pls call us on toll-free no. ----------.'
दीड तासाने, रात्री पावणेआठच्या सुमारास तिसरा एसेमेस...'Dear Customer, the status of AL no.---------- for patient Anagha Sharad Nigwekar is queried. For any further assistance, pls call us on toll free no.----------' ह्याचा अर्थ, जो फॉर्म डॉक्टरांच्या कागदासहित, TPA काउन्टरवर आम्हीं दाखल केला होता; त्यावर विमा कंपनीला काही प्रश्र्न पडले होते.

माझ्या पलंगाच्या उजव्या हाताला पूर्व दिशा होती. मध्यरात्री भर तापात, काळ्या आकाशात धूसर चंद्रकोर दिसली होती. डोळ्यांवर चष्मा नव्हता. मग चंद्रकोर, चारपाच एकातेक गुंतलेल्या. थंडी भरून, १०४ च्या पुढे जोशात सरकणाऱ्या तापाशी शारीरिक लढा. "मला ब्लॅन्केट हवंय"...अजून...अजून....सहासात जड ब्लॅन्केट्स अंगावर. येताजाता हाताला टोचलेल्या नळीतून इंजेक्शन्स. मनात आत कुठेतरी ह्या विमाप्रकरणाची काळजी. हॉस्पिटलचं बिल लाखाच्या पुढे जाईल की काय अशी एक चिंता. साडेपाच वाजले. नर्स ताप बघून गेली. पहाट झाली आणि आकाश गुलाबी तांबूस दिसू लागलं. सव्वा सातच्या सुमारास गोल सूर्य खिडकीत दिसू लागला. दूरदूर कुठलासा डोंगर होता. त्यामागून सरकत सरकत तो वर डोकावत होता. पुढे उंच ठेंगण्या नव्या जुन्या इमारती. त्यातून हळूहळू पेटणारे दिवे. सगळीकडे जाग येऊ लागली होती. आपापल्या रहाटगाडग्यात मुंबईकर शिरत होते. पण माझा व माझ्या लेकीचा दिवस रोजच्यापेक्षा वेगळा असणार होता.

मी सलाईनवर. हाताला सुया टोचलेल्या...उजव्या हाताला वर बाटली अडकवलेली. आता हे विमा प्रकरण कोण सोडवणार ? त्यांना त्यांनी दिलेल्या क्रमांकावर फोन करायला हवा होता. त्यांना जे काही प्रश्र्न पडले होते त्याची उत्तरे लवकरात लवकर देणे गरजेचे होते. सकाळी आमचे कुटुंबमित्र श्री. फलटणकर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांच्यापेक्षा ह्या सर्व प्रकारात अनुभवी कोण होते ?
त्यांनी मला एसेमेस वरून देण्यात आलेला क्रमांक नोंद करून घेतला. TPA काउन्टर गाठला.
दोन तासांनी ते परत आले त्यावेळी त्यांच्या समोर काय करायला हवे आहे ह्याचे चित्र स्पष्ट झाले होते. डॉक्टरांनी जो कागद लिहून दिला होता त्यात लिहिले गेले होते...'P/H ब्रेस्ट कॅन्सर. म्हणजे पेशंटची हिस्ट्री - ब्रेस्ट कॅन्सर. खरे तर काय असायला हवे होते ? F/H ब्रेस्ट कॅन्सर. म्हणजे फॅमिली हिस्ट्री - ब्रेस्ट कॅन्सर. डॉक्टरांनी लिहिताना गफलत केली होती. इन्शुरन्स कंपनीला पडलेला पहिला प्रश्र्न तो होता. कारण चार वर्षांपूर्वी ज्यावेळी मी ह्या इन्शुरन्स कंपनीचा पहिला हप्ता भरला होता त्यावेळी मी कधीही 'ब्रेस्ट कॅन्सर' चा उल्लेख केला नव्हता. मला कधीही ब्रेस्ट कॅन्सर न झाल्याकारणाने. मग पेशंटची हिस्ट्री, ब्रेस्ट कॅन्सर कशी काय असू शकते....असा तो गोंधळ होता.
"मग आता ?" मी फलटणकरांना विचारलं.
"तू त्रास नको करून घेऊस. मला फक्त डॉक्टरांकडून चूक दुरुस्ती करून घ्यायला हवीय. ते मी घेतो करून." जिने लिहिताना ही चूक केली होती, ती जुनियर डॉक्टरबाई थोड्या वेळात हजर झाली. तिने हिंदुजाच्या लेटरहेडवर चूक दुरुस्ती व त्याचबरोबर चूक झाल्याबद्दल माफी असे एक पत्र विमा कंपनीसाठी लिहून दिले. ते पत्र TPA काउन्टरकडे दाखल केल्या गेलेल्या माझ्या कागदांना जोडण्यात आले.

पुन्हा रात्री एक एसेमेस माझ्या मोबाईलवर दाखल झाला...Dear Customer, the status of AL no.---------- for patient Anagha Sharad Nigwekar is queried. For any further assistance, pls call us on toll free no.----------' आता अजून काय ?
तापाने अजून हार मानलेली नव्हतीच. अगदी सहजगत्या तो १०४ च्या पुढे जात असे. एखादी शिडी भराभर चढावी तसा. सापशिडीचा उलटा खेळ. मी कधी नव्हे ती त्या सापाच्या प्रतिक्षेत. कधी तो साप नजरेसमोर येईल...आणि कधी एकदा माझा ताप त्याच्यावर बसून खाली घसरेल. म्हणजे माझा ताप हा पण कालिया आणि...त्याच्याशी लढणारा हा दुसरा साप ! तापात डोकं भरकटतं...

दुसऱ्या दिवशी फलटणकर पुन्हां TPA काउन्टरकडे. लहानपणापासून अस्थमा आहे असे डॉक्टरांनी लिहिले आहे. त्याबाबत आधी डॉक्टरांनी काय उपाययोजना केली आहे त्याबाबत माहिती हवी आहे. कोणाकडून ? फलटणकरांनी त्यांना विचारले. डॉक्टरांकडून. असे उत्तर मिळाले.
हिंदुजाच्या डॉक्टरांनी, माझ्या अस्थमावर काहीही लिहून द्यायला नकार दिला. ज्या रोगावर त्यांनी माझ्यावर कधीही उपचार केले नव्हते त्याविषयी त्यांनी का लिहून द्यावे ? त्यांचे हे म्हणणे काय चुकीचे होते ? मग आता हे गणित कसे सुटायचे ?
"आता काय करायचं ?" माझी परिस्थिती थोडी सुधारली होती. मलेरिया व टायफॉइड ह्या दोन्ही रोगांची औषध मला द्यावी लागली होती. मलेरियाची एक गोळी माझ्या पोटात गेली आणि मला थंडी भरणे थांबले. ताप मात्र हटत नव्हता. बऱ्याच बाटल्या रक्त पाथॉलॉजिस्ट घेऊन गेला होता. दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी माझं रक्त अभ्यासासाठी जमा केलं गेलं होतं. तोपर्यंत मी आजतागायत घेतलेल्या सर्व अँटीबायोटिक्सचा माझ्या शरीरावर झालेला परिणाम ओसरला होता. आणि आजपर्यंत अबोल असलेलं माझं रक्त शनिवारपर्यंत थोडं बोलकं झालं. टायफॉइडचे विषजंतू, त्यात कार्यरत झालेले दिसत होते. मात्र सोमवारी कळणार होते...हा टायफॉइड होता की पॅराटायफॉइड होता.
"मी बोलते आयसीआयसीआय लोम्बार्डशी. मला फोन लावून द्या." एसेमेस द्वारे आलेला क्रमांक लावला.
पंधरा मिनिटांचं माझं जे संभाषण झालं त्याचा गोषवारा असा होता...मी सलाईनवर. हे नक्की की ह्या उलाढाल्या पेशंट करू शकत नाही. पहिली चूक बरोबर ती हॉस्पिटलकडून झाली होती. ती त्यांनी सुधारून दिली. आता हा जो दुसरा अस्थमाविषयी उल्लेख आहे त्याचं काय करायचं. मी गेली चार वर्ष तुमच्याकडे दर वर्षी पैसे भरतेय. त्यावर मी जी काही OPD ( Outpatient Department - म्हणजे कुठल्याही हॉस्पिटल मध्ये दाखल न होता जी काही औषधांची, डॉक्टरांची बिले असतील ती ) पाठवली त्यात कधीतरी अस्थमाची बिले होती काय ? मी ह्या चार वर्षांत कधीतरी अस्थमासाठी कुठल्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे काय ? मग मी कोणाकडून आणि काय ट्रीटमेंट घेतली असे लिहून आणू ? मी इथे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले त्यावेळी जेव्हा इथले डॉक्टर माझा कागद लिहित होते, त्यावेळी काय मी ही माहिती लपवून ठेवायची होती ? नाही ना ? मग तुमचा मला लहानपणी झालेल्या अस्थम्याशी संबंधच काय ? माझा आजचा आजार व ३/४ वर्षांची असताना झालेला अस्थमा ह्यांचा एकमेकांशी काडीचा संबंध नाही...इत्यादी इत्यादी. त्यावर समोरील माणसाने काय म्हटले ?..."तुम्हीं तुमच्या फॅमिली डॉक्टरकडून तसे लिहून आणाल काय ?"
"काय लिहून आणू ? की त्यांनी कधीही मला अस्थम्यासाठी ट्रीटमेंट दिली नाही म्हणून ?"
"नाही...तसं नाही..."
"मग कसं...?"
"ठीक आहे मॅडम....मी बघतो...इथे सिनियर्सशी बोलतो..आणि तुम्हांला कळवतो..."

दुसऱ्या दिवशी दुपारी एक एसेमेस दाखल झाला...
'Dear Customer, the staus of AL -------------- for patient Anagha Sharad Nigwekar is approved. For further assistance pls call us on toll-free no.--------------'

परदेशात, विम्याशिवाय काहीही काम होत नाही. तेथील वैद्यकीय सेवा ह्या अतिशय महागड्या असतात. व त्या विम्याशिवाय भागवणे हे सामान्य लोकांना अशक्यप्राय असते. मी चार वर्षांपूर्वी माझ्या एका जवळच्या मैत्रिणीच्या अनुभवांतून हा धडा घेतला होता. तिचे एक ऑपरेशन तिने व्यवस्थित आखणी करून, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये करून घेतले होते. अगदी पंचतारांकित हॉटेलमधील डबलरूम असावी अशी थाटात स्वत:ची सेवा करून घेतली होती. मी त्यावेळी तिथून बाहेर पडले होते तीच मुळात हा निश्चय करून...मी देखील माझी व माझ्या लेकीची ही अशीच काळजी घेईन. कधी काही अशी अचानक आजारपणे उद्भवली तर आम्हां दोघींना आमची व्यवस्थित काळजी घेता यायला हवी. आमचा आर्थिक बोजा तरी कोणावरही कधीही पडता कामा नये. आम्हांला नेहेमीच मानाने जगता यायला हवे.

ह्या सगळ्या एका महिन्याच्या कालावधीत तुम्हीं सर्वजण आमच्याबरोबर होतात...मी कधीही एकटी पडले नाही...शुभा, अक्का, आकाश, सौरभ, दीपक, सुहास, फलटणकर, वंदना, पार्था, धनराज, निलेश, सौमित्र, विरल, अंतरा, इरा, नमन, आपा, हेरंब, तन्वी, श्री, विद्याधर, सपा, महेंद्र, श्रीराज, पंकज, कांचन, गौरी, आका...माझ्या सर्व प्रिय मित्र मैत्रिणींनो, हाही एक अनुभव आम्हां दोघींना तुम्हां सर्वांचा आधार देऊन गेला...आम्हांला सतत हसवत होतात...त्यामुळे हाही प्रवास चांगलाच झाला असं म्हणता येईल. :)

"बाळा, मला ह्या सर्व घटनेत एक फार बरं वाटलं..." काल आम्हीं दोघी नेहेमीसारख्याच घरी गप्पा मारत बसलो होतो.
"काय ?"
"ह्या तुझ्या वयातच आरोग्य विमाचं महत्त्व तुला कळलं...हे माझ्यासाठी फार मोठं आहे...तुला ह्याची जाणीव झाली...की मी हा विमा उतरवला असल्याकारणाने..आपल्याला हे आजारपण म्हणजे मोठा आर्थिक फटका तरी नाही बसला....नाही का ? तसेच जो काही अस्थम्यामुळे आपल्याला मनस्ताप सहन करावा लागला...तो केवळ चार वर्षांपूर्वी सुरवातीला विम्याचा फॉर्म भरताना मी त्यात ह्या लहानपणी झालेल्या अस्थम्याचा उल्लेख न केल्याने झाला. हे ही आपण लक्षात घ्यायला हवे."

लेक माझी...मान डोलावली आणि हसली.
मला माहित असतं...माझ्या सगळ्या बऱ्यावाईट अनुभवांतून, माझी लेक शहाणी होत जाते.

Friday, 2 March 2012

सहज...




सध्या घरीच आहे...रिकामा वेळ बराच आहे.

आज स्केचबुक आणि पेन हातात घेतलं तेव्हा हेच सुचलं...आणि म्हणून तेच कागदावर उतरलं.

खूप दिवसांनी हातात ब्रश घेतला...छान वाटलं.