नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 7 December 2011

म्हाडा आणि मी...भाग ३

भाग १
भाग २  

...अशी आम्ही बिल्डरकडे काय मागणी केली होती ? गेली पन्नास वर्षे आई ज्या भागात रहात आहे, त्याच भागात तिला बदलीची जागा देण्यात यावी. दूर कुठेतरी तिला नेऊन ठेऊ नये इतकेच. सध्या आपण वर्तमानपत्रात अनेकदा वाचतो. मतांच्या हव्यासापोटी, मुंबईतील वाढत्या झोपडपट्टीवासियांना देखील जिथे झोपडी तिथेच कायमस्वरूपी जागा द्यावी असले आदेश काढले जातात. इथे आईचे घर पाडून दुसरी इमारत बांधण्यात येणार होती. त्या बांधकामाच्या काळात तात्पुरते निवास स्थळ म्हणून तिला देण्यात येणारी जागा त्याच परिसरात द्यावी इतकेच मागणे होते. आज बांधकाम होणार ह्या निर्णयाला दहा वर्षे उलटून गेलेली आहेत. घरमालकांनी अग्रीमेंट करीत असता त्यावर वेळेचे काहीही बंधन न टाकल्याने इमारत कधी तयार होणार, घराचा ताबा कधी मिळणार ह्या प्रश्नांना कोणतेही उत्तर कोणाकडेही नाही. आईचे आता वय झालेले आहे. तिने एकटे राहावे की मुलींकडे राहावे हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. ह्या उतारवयात दूर कोठे नव्या जागी बस्तान ठेवणे काय शक्य आहे ? म्हणजे 'आता मला रहाता येण्यासारखे घर नाही आणि म्हणून ह्या वयात मला मुलीकडे राहावे लागते' ही कमीपणाची भावना तिने काय म्हणून घ्यावी ?

दिवाळीची सुट्टी संपली. कोर्टचे कामकाज चालू झाले. तोपर्यंत बिल्डरला शांत बसावे लागले होते. नाईलाजास्तव.
कोर्ट भरले होते. तारीख होती. मी कोर्टात शिरले. बिल्डरने कोर्टात अर्ज दिला. आमच्या म्हाडा विरोधी दाव्यात स्वत:ला दाखल करून घेण्याबाबतचा. अजून कोर्ट बसायचे होते. जज्जसाहेब अजून यायचे होते.
माझ्या रांगेत दोन खुर्च्या सोडून एक साठीचे गृहस्थ बसले होते. हसतहसत. त्यांच्या सततच्या हसण्यामुळे व मान डोलावण्याच्या लकबीमुळे माझे लक्ष वेधले गेले.
"तुम्ही तुमचे हक्क पूर्ण वापरले आहेत इथे." रिकाम्या कालावधीत हे गृहस्थ माझ्याशी बोलू पहात होते.
"म्हणजे ?" मी गोंधळून विचारले.
"तुम्हांला चुकीचा सल्ला दिला जातोय...व तुम्ही चुकीच्या वाटेवरून चालला आहात..."
"आपण कोण ?" मी विचारले.
"वर्मा. मी सुरज डेव्हलपर्सचा वकील."
"हो का ? नमस्कार." मी हलकेच हसले. हात जोडून नमस्कार केला. "आम्हांला चुकीचा सल्ला मिळतोय व आम्हीं चुकीच्या रस्त्यावर चाललोय असे तुम्हांला का बरे वाटते ?"
"कारण माझा तेव्हढा अनुभव आहे. मी खूप वर्ष हीच कामे करतोय....you don't know anything...."
"That's true ...I really don't know anything."
"So now let me tell you some facts here...."
"Ya..please do that...."
"भाडेकरू आणि म्हाडा किंवा बिल्डरच्या केसेस मध्ये कायम भाडेकरू हरतो...व नुकसानभरपाई म्हणून भाडेकरूला उलटे पैसे भरायला लागतात..."
"हो ? अरे बापरे...! किती ते ?"
"ते तेव्हांच कळेल तुम्हांला...."
"पण साहेब, तुम्ही स्वत:ला वकील म्हणवता, व कोर्टाच्या भर दालनात बसून तुम्हीं न्याय अन्याय राहिला बाजूलाच...परंतु, नेहेमी भाडेकरूच हरतो व बिल्डरच जिंकतो...हे मला कसं काय बरं सांगू शकता ? हा भारतीय न्यायपद्धतीचा सरळसरळ अपमान नव्हे काय ?"
"See I am telling you as a friend...just trying to help you out....people are misleading you....lawyers do that you know...just to earn money...."
"yes ...of course....thanks a ton...."
दालनातून फलटणकर बाहेर पडताना मला बसल्या जागेवरून दिसत होते. ह्याचा अर्थ आजचे आमचे काम आटोपले होते. मी उठले. मी प्रथम माझा खंबीर हात पुढे केला. वर्मांनी त्यांचा हात पुढे केला. मी आत्मविश्वासाचे हस्तांदोलन केले.
"Nice meeting you sir."

कोर्टाचे दालन सोडताना व आत शिरताना समोर बसलेल्या जज्जसाहेबांना किंचित खाली वाकून मानवंदना द्यावयाची असते. आणि का कोण जाणे...मला हे करताना नेहेमीच अभिमान वाटतो...भारतीय न्यायव्यवस्थेचा अभिमान.
बाहेर पडल्यावर फलटणकरांनी मला सांगितले...आज बिल्डरने स्वत:चे नाव ह्या खटल्यात दाखल करून घेतले होते. म्हाडा व बिल्डर जोडगोळी. धोकादायक. सामान्य नागरिकासाठी.

डिसेंबरचा दुसरा आठवडा उजाडला.
ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या आधी 'पुढील तारखेपर्यंत तुमचेकडून घराचा ताबा काढून घेण्यात येऊ नये' असा कोर्टाने आदेश दिला होता. व तो आदेश उठवणे बिल्डरला आता निकडीचे झाले होते. पुढील तारीख आली. बिल्डर व म्हाडाच्या वादावर विचार करून पहिला आदेश रद्दबादल करण्याच्या प्रयत्नात कोर्टाने काय निर्णय दिला ?
'योग्य कायदेशीर प्रक्रियेशिवाय दावेदाराकडून घराचा ताबा काढण्यात येऊ नये.'
...मनाई हुकुम असा निघाला.

सापाच्या शेपटीवर पाय ठेवला गेला होता काय ?

वर्ष संपले. एकामागोमाग घडामोडींनी भरलेले वर्ष.
पुढील वर्ष चालू झाले. जानेवारीचा अकरावा दिवस लागला होता. आईची कामवाली माझ्या घरी आली. "ताई, वाटेवर सगळे मोठमोठे दगड टाकून ठेवलेत. मी कशी जाऊ ?"
दुसऱ्या मजल्यावरचे आमचे घर सोडून इमारत पाडायला सुरुवात झालेली होती. आई धाकट्या बहिणीकडे होती. आईची बाई मात्र रोज जात असे. केरलादी करून येत असे. आता मात्र तिथे जाणे अशक्य होते. दुसऱ्याच दिवशी फलटणकर तिथे गेले. इमारत बरीच पाडली होती. दगडांची रास रस्त्यात घालून ठेवली होती. तिथून आत जिन्यापर्यंत जाणे कठीण होते. बाई तेच सांगत होती. दहशत निर्माण करणे चालू झाले होते. फलटणकरांनी कॅमेरा बरोबर घेतला होता. इमारतीसमोरील मोकळी जागा, दरवाजा....दगड आणि धोंडे. सर्व फोटो त्यांनी काढून घेतले.

दहशत.
त्या भीतीने मी आता ते देतील त्या जागी सामान हलवेन, घर रिकामे करेन...ही बिल्डरची इच्छा.

"ताई, एक बेडरुममधली आणि दोन बाहेरच्या...काचा फोडून टाकल्यात...खिडक्यांच्या" बाई पुन्हा एक दिवस सांगत आली. घरात आईचं सामान होतं. गोदरेजचं कपाट होतं. काही मौल्यवान गोष्टी असण्याची शक्यता होती. मी माझ्या नेहेमीच्या सुताराला बरोबर घेतले. आईच्या घरी गेले. प्लायवूडने खिडक्या आतून बंद करून घेतल्या. घरभर अंधार झाला. पाणी आधीच तोडलेलं होतं. वीज कापली होती. आमच्या शेजारचं शिंदे मावशींचं घर पूर्ण रसातळाला गेलेलं होतं. फक्त आमचं घर व त्यासाठी खालचे मजले शिल्लक होते. 
मन आता एकूणच बधीर झालं आहे.
क्रमश:








9 comments:

Suhas Diwakar Zele said...

आई ग्ग :( :(


बिल्डरलॉबी ही असली हरामखोर जात आहे, की काय सांगाव... ^%%$$#@$#

Shriraj said...

त्या सुरज डेव्हलपर्सच्या वकिलाच्या प्रत्यक म्हणण्याला तू दिलेली प्रतिक्रिया मस्त होती... अशावेळी तोल ढळू न देता समोरच्याला उत्तर देणं फार कठीण असतं... आणि तू ते छान जमवून घेतलंस.. good good

Prof. Narendra Vichare said...

तुझ्या ब्लॉक च्या "त्या ग्यालरी"तून समोरचा छान समुद्र दिसायचा, असे आता थोडे थोडेसेच आठवतेय. त्या गोष्टीना आता बरीच वर्षे झालीयत. इमारतीकडे तोंड करून उभे राहिल्यावर डाव्या हाताला माडांच्या बनात एक बैठी चाळ होती. तिथे माझा वर्ग मित्र सुनील वाकळे राहायचा. आता तोही या जगात नाही. ती चाळ आणि ती माडांची रांग देखील आता जमीनदोस्त झालीय काय?...... तुझे "त्या" वकील महोदायांशी संवाद साधतानाचे प्रसंगावधान व संयम शाबासकी देण्या योग्यतेचे होते.... झांशीची राणी देखील कधी कधी आपल्या पटावरील प्यादे काही क्षणाला मागे घेत असे. त्याचा प्रत्यय आला... हा..हा..हा....

हेरंब said...

बापरे.. पिक्चरमधे दाखवतात तसं चाललंय सगळं. !!

Anagha said...

सुहास, फार त्रास झाला होता त्यावेळी हे सगळं बघताना.

Anagha said...

आपण शांतपणे ऐकून घेतलं ना श्रीराज, तर समोरचा शत्रू, गाफील राहून बरंच काही नको ते बोलून जातो. आणि ते आपल्या फायद्याचं ठरू शकतं. आपण पण संताप करून घेतला तर आपलाही तोलच ढळणार...म्हणजे मग आपणही काहीतरी चुकीचं बोलून ठेवणार....नाही का ? मग काय उपयोग ? बस ! इतकंच ! :)

Anagha said...

दिसायचा खरं नारळाच्या झावळ्यांमधून थोडासा समुद्र. :) आठवतायत मला तुमचे मित्र सर. ती चाळ कधीच गेली...त्या तिथे आता उंच इमारत उभी आहे. :)
आणि शाबासाकीबद्दल आभार सर. बऱ्याच दिवसानंतर घेतली ना ? नाहीतर वेडीवाकडी स्केचेस घेऊन तुमच्यासमोर उभी रहात असे...आणि प्रोत्साहन द्यायला तुम्हीं आपले मला v. good असा शेरा देत असत...एकदा दहात आठ मार्क्स पण घेतलेत मी सर तुमच्याकडून ! आहे ती वही अजूनही माझ्याकडे ! :) :)

Anagha said...

असं आता लिहिताना मला देखील वाटू लागलंय हेरंब... :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

लई डेंजर आहे हे प्रकरण. आज वाचायला घेतलं. निवांतपणे...