नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 20 September 2011

विहीर

लहानपणी वाटायचं की बाबा सारखेसारखे काय स्मशानात जातात ! आणि मग घरी परत येऊन अंघोळ करतात ! कधी बाबांचे भाऊ, कधी आईचे मामा ! कधी बाबांची पुतणी तर कधी आईची मावशी ! पण कधी ते रडताना दिसले नाहीत !
आता कळतं...मरणात तसं रडण्यासारखं काहीच नसतं...जशी बाळं भरघोस जन्माला येतात तशीच छोटी मोठी माणसं इथेतिथे मरतच असतात...कधी सोयर तर कधी सुतक...
म्हणून आई फक्त तिची आई गेली तेव्हा हमसाहमशी रडताना दिसली...

कधी आणि कशी कोण जाणे...मीही आता त्याच पायरीवर पोचले आहे...
इथेतिथे गेला बाजार माणसे मरतात....
हे सत्य आता पूर्ण कळून चुकलंय...

आणि ती...डोळ्यांच्या आत कधीतरी ओसंडून वाहणारी विहीर अगदी पार कोरडी ठणठणीत झालेली आहे...
अगदी तळ दिसू शकेल इतकी.

आज एका जवळच्या मित्राची आई गेली.
नवऱ्याला, बऱ्याच स्त्रियांना 'आई' मानायची एक सवय होती....त्यामुळे तशी सासवांची वानवा नाही...
त्यातल्याच ह्या एक.

12 comments:

Gouri said...

अनघा, ज्यांच्या नसण्याने आपल्याला खरंच फरक पडतो अशी मोजकीच माणसं असतात ग - त्यांच्यासाठीच ती विहिर राखून ठेवायला शिकतो आपण हळुहळू ... बाकी सगळे उपचार असं मला वाटतं.

Shriraj said...

:(
तुला माहितेय बहुतेक पुरुषांना कमीच रडायला येतं. का काय माहित !!??

अपर्णा said...

:(

अनघा असं कोरडं होता येतं असं तुला खरच वाटतं?

हेरंब said...

कोरडी विहीर :(

Anagha said...

अपर्णा, येतं ग...क्षुल्लक कारणासाठी पण मी रडू शकते असे पूर्वी ! आता एकदम ठणठणाट !
...अरे, आता आणि मी कुठे गेले ना कोणाला भेटायला की लोक गोंधळातच पडलेली दिसतात मला.
माझ्या एका मैत्रिणीचा नवरा गेला म्हणून गेले तर ती आपली माझ्याकडे बघून म्हणे 'तू तर ह्यातून गेलीयस'...! :)
आधीच अशा प्रसंगात बोलायला काहीच नसतं...मी आपली जाऊन सगळीकडे हजेरी लावून येते ! उगाच कोणी बोलायला नको...शरदची बायको फिरकली पण नाही म्हणून !

Anagha said...

खरंय गौरी.

Anagha said...

श्रीराज, खरं तर बघायला गेलं तर स्त्रियांची मानसिक शक्ती अफाट असते...तुलनेत बघता. फक्त 'अश्रू वाहू देणे म्हणजे मानसिक दुर्बलता जगाला दाखवून देणे' असा गैरसमज स्त्रिया मानत नाही...इतकेच.

Anagha said...

हेरंबा... :)

Anagha said...

बाप रे ! किती फटकारून बोलते ना मी ! कशी झालेय मी !!!

sanket said...

गीतेचा उपदेश अंगी भिनला म्हणायचा. :)

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येSर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥

Anagha said...

ह्म्म्म....संकेत, सगळं आधी कुठे ना कुठे तरी...कोणी ना कोणी तरी...सांगून गेलेले असतात...पण स्वत: धक्के खाल्याशिवाय काही शिरत नाही डोक्यात...

सौरभ said...

रुदालींना बोलवायचं... okay.. it's a bad joke.. पण मला वाटतं, आपल्याला रडू नाही आलं म्हणजे असं नाही की आपण असंवेदनशील झालो. कदाचित एक पुढची वैचारिक/भावनिक पातळी आपण गाठलेली असेल. काही सत्य मान्य करुन खंबिर उभं राहण्याची ताकद आणि समंजसपणा आपल्यात आला असेल.