नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 16 September 2011

पुष्कराज

हम्म्म्म...
"तुम्हांला पुष्कराजची अंगठी बोटात घालायला हवी. त्यामुळे संकटांची तीव्रता कमी होईल..."
पत्रिका आणि हात बघून ते डोंबिवलीचे गृहस्थ म्हणाले. त्यांचे भविष्य अतिशय तंतोतंत असते असे एका जवळच्या मित्राने सांगितले होते. म्हणून बसले होते त्यांच्या पुढ्यात. गोष्ट खूप जुनी आहे. खरी संकटमालिका सुरु होण्याआधीचीच.
" हो का ? बरं. कितीला असते ही अंगठी ?"
"ते तुमच्यावर आहे. त्याच्या आकारावर त्याची किंमत ठरते."
त्यांनी ५०० रुपये घेतले आणि माझ्यावरील संकटांवर हा जालीम उपाय सांगितला. असे उपचार टाळणे बरे नाही. काय सांगावं...होतील कदाचित संकटं कमी. म्हणून नेहेमीच्या सोनाराकडे गेले आणि जवळजवळ सात आठ हजारांची सोन्याची अंगठी करावयास दिली. ५ एमएम मापाचा पुष्कराज. पिवळाधमक. कमीतकमी पंधरा वर्षे झाली असावीत ती अंगठी बोटात बाळगून. कमी झाली का संकट ? आता ते कसं सांगणार ? काय माहित...कदाचित ती अंगठी नसती घातली तर अजून आली असती...संकटं !
पण आता ह्याची आठवण का झाली ? कारण आहे...

परवा एकदा आमच्या एका चॅटरूममध्ये आम्ही क्लायन्टबरोबर टेलीकॉन करत होतो. मी आणि सर्विसिंग टीम. आम्ही तिघे. आणि एक लॅपटॉप. ते तिघे सोफ्यावर बसले होते आणि मी खाली गालिच्यावर...पाय पसरून. त्या बाजूला क्लायन्ट कसा आणि कुठे बसला होता ते मला माहित नाही...आणि ते माहित करून घेऊन ह्या कथेत काहीही फरक पडणार नाही...तेव्हा ते राहुदे. तर मी बोलत होते आणि चाळा म्हणून डाव्या हातातील पुष्काराजाचं बोट पकडलं. आणि एकदम काहीतरी टोचलं...मी दचकून बोटाकडे बघितलं तर काय ? पुष्कराज गायब ! नुसतीच सोन्याची रिकामी चौकट. रिकामे कोंदण. खोलीतील दुसऱ्या दोघांच्या डोळ्यांसमोर रिकामी अंगठी नाचवली...काहीही न बोलता. दुसऱ्या बाजूला क्लायन्ट बोलतच सुटला होता. आणि आम्ही तिघे उलट्या सुलट्या उड्या मारून खोलीभर पुष्कराज शोधत होतो. मिळाला ? नाही. क्लायन्ट बोलायचा थांबला ? नाही. पुढील वीस मिनिटे तो बोलत होता आणि मला कधी एकदा मी माझ्या जागेवर जाऊन पुष्कराज शोधते आहे असं झालं होतं. संपताच...my Pushkraj fell off ya...अशी जाहीर वाच्यता करत करत चांगलं पाच मिनिटांचं चालून दूरवर असलेल्या माझ्या जागेवर मी पोचले. आणि तो दिसला. खुर्चीखाली जमिनीला नाक लावून बसला होता. जमिनीवरील गालिच्यावर कधी पडला कोण जाणे. मग मी मोठ्या प्रेमाने त्याला बॅगेत नीट ठेवून दिला. आणि घरी आल्यावर, अंगठी आणि पुष्कराज दोघांनाही डबीत बंदिस्त करून टाकलं...आठवड्याच्या शेवटीच मला ह्या अशा घरगुती कामांसाठी वेळ मिळत असतो...म्हटलं येणाऱ्या शनिवारी जाऊ सोनाराकडे...

शनिवार उजाडला. डबी घेतली आणि गेले. सोनाराकडे. मग ? पुढे ? त्याच्यासमोर डबी ठेवली. त्याने डबी उघडली आणि काय आश्चर्य ?! त्यात रिकामी अंगठी होती...! पण माझा पुष्कराज ?! नव्हताच ना ! गायबच झाला होता ! अगदी नाहीसा. मी तिथेच बसून माझी पर्स ओतली...आत माझं अख्खं जग होतं पण तो चिमुकला पुष्कराज नव्हताच ! घरी परतले...अख्खी बेडरूम उलथीपालथी केली...पण तो कुठेही मिळाला नाही !

दोन दिवसांपूर्वी आपसूक शांतपणे पुन्हा माझ्या मुठीत येऊन बसला होता...आणि आज पुन्हा तसाच निघून गेला...

असा कसं काय गायब झाला...नक्की माझं किती हजारांचं नुकसान झालं...काही कल्पना नाही...

मग आता....पुढील संकटांचं काय ? माझं कवच...शिरस्त्राण वगैरे हरवलंय काय ? की....

...की आता कुठलीही संकटे येणार नाहीत हे त्याच्या मूक भाषेत सांगत माझ्या आयुष्यातून तो निघून गेला होता...काम संपले...असा इशारा देत?

अंधश्रद्धा. दुसरं काही नाही...संकटं यायला लागली की तीही एक बळ देऊन जाते...
म्हणजे दर शनिवारी शंकराच्या देवळात जाऊन दूध आणि बेल वाहा...
रोज रामरक्षा वाचा...वगैरे.

पुष्कराज आणि मी.
...मैत्री मात्र जुनी होती. चांगली पंधरा सोळा वर्षांची.

अपघाताने जवळच्या माणसांनी अचानक माझ्या आयुष्यातून निघून जाणे हे तसे काही मला नवीन नाही.

23 comments:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

निर्जिव वस्तूंचा सुद्धा लळा लागतो कधी कधी. त्यात त्यांचा आपल्या सुख-दु:खाशी संबंध जोडलेला असेल, तर पहायलाच नको. मला घड्याळ बंद पडलं की काही अशुभ होईल की काय अशी भिती वाटते. उगीचच!

Gouri said...

आता तुला गरज नाही पडणार म्हणून गायब झालाय ग तो पुष्कराज ... दुसर्‍या कुणाला आवश्यकता असेल त्याची :)

विनायक पंडित said...

अनघाजी! आपने एक बहोत बडा पडाव पार किया है! अब कुछ भी होने दो, आप निश्चिंत रहें! मेरी हार्दिक शुभकामनाएं! :)

हेरंब said...

गौरी + १

>> अपघाताने जवळच्या माणसांनी अचानक माझ्या आयुष्यातून निघून जाणे हे तसे काही मला नवीन नाही.

:((

Raindrop said...

कष्ट का सामना कैसे करते हैं, यह एक बात अच्छे से सिखा गया तेरा खोया हुआ पुष्कराज. हो सकता है किसी और को ज़रुरत हो उसकी...गौरी ने सही कहा. जो हुआ, किसी के भले के लिए हुआ, कीमत सिर्फ तूने भरी.

Anagha said...

:) कांचन, मला एकदम आठवलं...असं म्हणतात ना काचेची काही वस्तू फुटली की...घरावरच संकट त्या काचेवर गेलं ! :) आणि म्हणे घरात बंद घड्याळ ठेवू नये ! आमच्या घरात इतकी घड्याळं आहेत की गेला बाजार त्यातली २/३ तरी हमखास बंद असतात ! :D

Anagha said...

गौरी, अगं I hope तो कुठे कचऱ्यात नाही गेलाय ! किंवा ज्याला मिळाला असेल त्याला त्याची निदान किंमत तरी कळली असेल ! :)

...आणि मला पण तशीच आशा आहे गं...आता गरज पडू नये त्याची ! :)

Anagha said...

धन्यवाद विनायक !!! मनापासूनच्या शुभेच्छांसाठी ! :) :D

Anagha said...

हेरंबा ! ते जरा निसटलंच हं वाक्य हातातून ! :)

Anagha said...

वंदू ! अगं काय माहित कोणाच्या हाताशी तरी लागलाय की नाही ते ! नाही तर गेला असेल कुठेतरी वाहून ! पावसात ! :)

अपर्णा said...

अनघा, कदाचित त्याच कामं झालं म्हणून तो गेला असं समजूया..
शेवटच वाक्य चटका लावून जातंय...

sanket said...

पण मी म्हणतो की, बंद डबीतून तुमचे ते आदरणीय "पुष्कराज " गायब झालेच कसे ? डबी बंद, अंगठी राहिली आणि रत्न गायब ? म्हणजे खरेच त्याने ठरवले असेल,’अब बहनजी को जरुरत नही हैं हमारी, तो इनसे रुखसत ले लिया जाये’, और गुम हो गया वह किन्ही बेनूर राहों पर चलने वालों कें रास्ते रोशन करने के लिये .. क्यूँ साहिबान, बज़ा फ़रमा रहें हैं ना हम? :P
बाकी शेवटचे वाक्य चटका लावून गेले. :((

आनंद पत्रे said...

"गुगल" मध्ये शोधायचा ना :-)

Anagha said...

अपर्णा, तसंच डोक्यात ठेवलेलं (धरलेलं) बरं ! :)

Anagha said...

:( बघ ना संकेत ! शेरलोक होम्सलाच कामाला लावायला हवंय ! :) आणि ते काही शक्य नाही त्यामुळे...आपली गरज संपली म्हणून तो निघून गेला असंच समजलेलं बरं ! रत्नच्चेय ! :p

कसलं भारी हिंदीए स्वामी तुमचं ! सॉलिड !

आणि आभार...प्रतिक्रियेबद्दल. :)

Anagha said...

ह्म्म्म..
आनंदबुवा, लावते हा मी गुगलबुवांना कामाला ! :D

सौरभ said...

आनंद बरोबर म्हणतोय.. आणि गुगल वापरुनपण मिळालं नाही तर मग रजनिला साकडं घालायचं. कोईभी राज रजनिसे छुप नही सकता... मग तो पुष्कराज असो, नटराज असो, महाराज असो किंवा महाभॄंगराज असो...

Shriraj said...

अनघा, सही आहे स्टोरी!
पण हे खरं घडलंय?!

आनंद पत्रे said...

हाहाहा.. प्रचंड सौरभ!!!

Anagha said...

सौरभ, :D
पण रजनी नाराज असेल तर ?

Anagha said...

श्रीराज, स्टोरी कसली आलीय बोडक्याची माझ्या ! हरवला माझा पुष्कराज ! :(
:)

sanket said...

अनघाताई, रजनी नाराज असेल तर रजनीव्रत करायचे. त्याची विधी आम्ही दिलेली आहे. तसेच रजनीपुढे दिवा लावायचा, आरती गायची. कलियुगात नाम-जपाचे-कीर्तनाचे महत्त्व ध्यानात घेऊन आम्ही रजनी-संकीर्तनसुद्धा रचलेले आहे. ते कीर्तन केले की रजनी हमखास प्रसन्न होईल बघ. रजनी अतिशय दयाळू,मायाळू, सायाळू, कनवाळू,आहे.तो हमखास आणि पटकन प्रसन्न होतो.

हमारी हिंदी-उर्दू ज़बान की तारिफ़ करने के लिए हम आपके तहे-दिल से शुक्रगुजार हैं !

Anagha said...

आईईईई ग ! संकेत ! :D