नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 29 September 2011

शहाणी बाहुली

[चाल - ला बाइ ला]

या बाइ या,
बघा बघा कशि माझि बसलि बया. १

ऐकू न येते,
हळूहळू अशि माझि छबी बोलते. २

डोळे फिरविते,
टुलु टुलु कशि माझि सोनी बघते. ३

बघा बघा तें,
गुलुगुलु गालातच कशि हंसते. ४

मला वाटतें,
इला बाई सारें काहिं सारें कळतें. ५

सदा खेळते,
कधिं हट्ट धरुनि न मागे भलतें. ६

शहाणी कशि !
साडिचोळि नवि ठेवि जशिच्या तशी. ७

दत्तात्रय कोंडो घाटे.

आठवणीतल्या कविता (भाग दुसरा)

ऱ्हस्वदीर्घ, कानामात्रा, अनुस्वार मी जसेच्या तसे टाकले आहेत ! अगदी वेगळे वाटले तरी. खूप जुनी कविता असल्याकारणाने व्याकरण वेगळे असावे.

तसेच, ह्या कविता संग्रहांवर कीर्ती कॉलेजचे ग्रंथपाल श्री. बर्वे, कवी व प्राध्यापक रमेश तेंडुलकर ह्या व अश्या अनेक अभ्यासू व मान्यवरांनी अविरत मेहेनत घेतलेली आहे. त्यामुळे हे व्याकरण त्यांच्या नजरेखालून गेलेले आहे व ते तसेच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. मग मी कोण त्यावर जाऊन ते बदलणारी ? कारण त्यात मराठीतील व्याकरण प्रवास देखील दिसून येतो. नाही का ? 

सहज पुस्तक चाळत होते. आणि ही कविता समोर आली. कालौघात झिपरी झालेली माझी परदेशी बाहुली आठवली...
तिच्या आठवणींना हे पुष्प...सप्रेम.
:)

Tuesday, 27 September 2011

माझे शहर

आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास प्रभादेवीच्या समुद्राजवळ जाण्याचा योग होता. समुद्राला ओहोटी होती. कचऱ्याला भरती होती. माणसे समुद्रावर प्रातर्विधि आटोपत होती. 
परतताना बघितले फुटपाथांवर अंघोळी चालू होत्या. रस्त्यात कचऱ्याचे डबे ओसंडत होते.
सव्वा नऊच्या दरम्यान घराबाहेर पडले.  ऑफिसला जाण्यासाठी. शिवाजी पार्क ते फिनिक्स मिल. इतकाच रस्ता. शहरातील कचरा अजून काढून झालेला नव्हता. प्रभादेवीला लागले. नजरेस सदा सरवणकर ह्या पुढाऱ्याच्या लेकाचा वाढदिवस माझे शहर साजरा करताना दिसले. शुभेच्छांचे रंगीबेरंगी फलक लटकलेले नजरेस पडले.
मनात शुभेच्छा नाही उमटल्या. शाप मात्र तीव्रतेने डोक्यात उसळला.

आठवण झाली...लहानपणीची. रस्ते सकाळी सातच्या आत स्वच्छ होत. महिन्यातून एकदा पाण्याने धुतले जात.

माझे बेवारशी शहर.
ना माय ना बाप.
फक्त एक भला मोठा कचऱ्याचा डबा.
आणि मग आम्हीं ? आम्ही कोण ?
आम्हीं कोण म्हणुनी काय पुसता ?
आम्हीं त्या कचऱ्यात इथेतिथे फिरणारे उंदीर आणि घुशी.
उकिरड्यावर ऐषोआरामात जगणारे.
कदाचित आंधळे.
मात्र ठार बहिरे. आप्पलपोटी.
आपमतलबी.
मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे आम्हीं.
कुत्रं पण फिरकत नाही आमच्याकडे !

आणि मग आमचे पुढारी ?
ती गिधाडे !
लचके तोडणारी...
पुरवून पुरवून मारणारी.
टोचे मारून मांस खाणारी...
जसे आम्हीं तसेच तर आमचे पुढारी.

माझे बेवारशी शहर.
ना माय ना बाप.

माझ्या शहराची अंतिम प्रेतयात्रा चालू आहे !
या सामील व्हा...
माझ्या शहराची अंतिम प्रेतयात्रा चालू आहे !

Monday, 26 September 2011

पाषाणफुले...

कासचे पठार. सातारा.
रंगीबेरंगी. जसा एखादा कॅनव्हास असावा. व चित्रकाराचा आत्मविश्वास कसा भरभरून रंगाच्या प्रत्येक फटकाऱ्यातून त्यावर अवतरावा. पेलिकन व्हाईट, लेमन येलो, मॅजेंटा, वर्मिलियन...रंगांचे ठिपके. कुठेही नजर टाका....विखुरलेले. व त्यावर निळा पडदा. वर उचललेला. सुंदर. अप्रतिम. अजब. काळ्या कुळकुळीत पाषाणावर मूठ मूठ माती. व त्यावर हे असे रंगांचे साम्राज्य. कसे असे असू शकते ? मनी प्रश्र्न उभा रहातोच. फुलायचे मनात धरले तर कुठेही फुलता येते...का असे सांगणे होते...त्या निसर्गाचे ? ते पाषाण, आयुष्यभर रखरखीत देखील पडून राहिले असते...नाही का ? पण नाही. असे काळे नशीब त्यांचे नव्हते...त्यांच्या नशिबी फुलायचे होते. आणि म्हणून तर मुठभर लाल माती त्यांचे आयुष्य फुलवून गेली...त्यावर कधी हिरवे तर कधी मोरपंखी रांगोळीचे रंग शिंपडून गेली. लाल कुंकू...पिवळी हळद...भरभरून देऊन गेली. 










किती ती नाजूकता...सगळंच अलगद...हलकेच....कुठेही उग्र असे काहीही नाही...दूरदूर काळ्या शिल्पांवर...मखमली रंगीत शाल अंथरलेली...असे निजून राहावयास कोण नको म्हणेल ? ते काळे पाषाण तर त्या स्पर्शाने अगदी फुलून निघाल्यासारखेच तर दिसत होते. फुलांवरचे नक्षीकाम...त्यांचे विविध आकार...तोंडात बोटे जावीत इतकी कल्पकता...निर्मितीत कुठेही तोचतोचपणा नाही. अजब. तो चित्रकारच दैवी.

एक वेडे फूल...म्हणे त्यावर फुलपाखरू येऊन क्षणभर विसावते...त्या फुलपाखराचे त्या नाजूक पाकळीला ओझे होते...हलकेच द्वार उघडते...आणि आश्चर्य बाहेर डोकावते....पिवळे परागकण...एका अवसारात ते फुलपाखरू उडून जाते...द्वार पुन्हा बंद होते...पुढल्या फुलपाखराची मनी आस धरत...

एकदा तरी नक्की जा...एखादी नाजूक गोष्ट आयुष्यात कधीतरी मन फुलवून गेलीच असेल ना...आणि आयुष्यातील ह्या रोजच्या धकाधकीत त्याचा विसर पडला...होय ना...?...मग तर नक्की जा...बघा...मन किती हलके होईल...तिथून निघून जाल...आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी रोजच्या रुक्ष आयुषात शिराल. त्या समोरच्या सपाट भगभगीत कम्पुटरच्या स्क्रीनकडे बघून डोळे मिटाल तर ते रंगीत ठिबकेच दिसत रहातील...डोळ्यांसमोर नाचत रहातील. डोळे शांत होतील. कुठे तो नजरेत न मावणारा, मैलोंमैल पसरलेला रंगीत आसमंत आणि कुठे ती इनमीन दीड फुटावर जाऊन स्क्रिनवर आपटणारी नजर. काय तुलना ह्या दोघांत ? 
थकलेले डोळे...आणि भागलेले मन...त्यांचा हक्कच नाही का ह्या सुखावर ?
:)

Wednesday, 21 September 2011

म्याऊ म्याऊ !

कधी कधी वाटतं घरात मी आणि एक मनीमाऊ रहातो ! म्याऊ म्याऊ !

ममाssss....ममाssss....
बेडरूममधून हाक आली तेव्हा मी स्वयंपाकघरात ह्या माझ्या मनी माऊची न्याहारी तयार करत होते. उपाशी घराबाहेर पडायचं नाही असा मी एक अलिखित नियम तिच्यासाठी केला आहे. आणि त्यासाठी कितीही वाजता उठून पडेल ते कष्ट करायची माझी तयारी असते ! तिने तिचं वेळापत्रक फ्रिझला चिकटवूनच टाकलेलं आहे ! त्याप्रमाणे उठायचं आणि कामाला लागायचं...आणि आता अनुभवावरून हेही कळलंय की सगळ्याच आया काही लवकर उठत नाहीत. आणि मग मनीमाऊला डबा कमी पडतो....कारण बाकीच्या मनीमाऊंना देखील भूक लागते...आणि मग डबा दोन मिनिटांत फस्त होतो. तेव्हा माझी मनीमाऊ उपाशी रहाण्यापेक्षा रोज माऊ कुठे सहलीलाच निघाल्यासारखी मी वेगवेगळ्या पदार्थांचे वेगवेगळे डबे भरते. आणि विनातक्रार ही ते सगळं घेऊन कॉलेजला जाते.
ममाssss....ममाssss....
अगं, पुढे बोल ना...ऐकतेय मी !
पण पुढे काही नाहीचेय ना...मला तुला अशीच हाक मारायचीय ! आवडतं मला तुला अशी तुझ्या नावाने हाक मारायला !
मी हसत बेडरुमच्या दाराशी येऊन उभी राहिले.
म्हणजे तसं तुझं हे नाव नाहीये...तुझं designation आहे...
हो ग बाई...आवडतं हं मला हे माझं designation ! तू बहाल केलेलं...
मनीमाऊ गोड हसली.
अगं, तसंही ज्या दिवशी मी तुझ्या कानात तुझं नाव सांगितलं त्याआधीच तू माझं हे designation मला बहाल केलं होतस, नाही का ?
पुन्हा गोड गोड...
छान छान.. आणि ह्या designation च्या पुढे promotion पण आहे तेही एक छानच आहे...
प्रश्र्नचिन्ह...
आई...सासू....आजी...वगैरे गं...
हा ! जा आता ! खायला दे लवकर...पुढल्या पंधरा मिनिटात निघायचंय मला !
हसत वळले मी पुन्हा माझ्या कामाकडे...

आई...हे designation !
...सर्वात सुंदर.
...सर्वात कठीण...सांभाळायला.
...मिरवायला.
:)


Tuesday, 20 September 2011

विहीर

लहानपणी वाटायचं की बाबा सारखेसारखे काय स्मशानात जातात ! आणि मग घरी परत येऊन अंघोळ करतात ! कधी बाबांचे भाऊ, कधी आईचे मामा ! कधी बाबांची पुतणी तर कधी आईची मावशी ! पण कधी ते रडताना दिसले नाहीत !
आता कळतं...मरणात तसं रडण्यासारखं काहीच नसतं...जशी बाळं भरघोस जन्माला येतात तशीच छोटी मोठी माणसं इथेतिथे मरतच असतात...कधी सोयर तर कधी सुतक...
म्हणून आई फक्त तिची आई गेली तेव्हा हमसाहमशी रडताना दिसली...

कधी आणि कशी कोण जाणे...मीही आता त्याच पायरीवर पोचले आहे...
इथेतिथे गेला बाजार माणसे मरतात....
हे सत्य आता पूर्ण कळून चुकलंय...

आणि ती...डोळ्यांच्या आत कधीतरी ओसंडून वाहणारी विहीर अगदी पार कोरडी ठणठणीत झालेली आहे...
अगदी तळ दिसू शकेल इतकी.

आज एका जवळच्या मित्राची आई गेली.
नवऱ्याला, बऱ्याच स्त्रियांना 'आई' मानायची एक सवय होती....त्यामुळे तशी सासवांची वानवा नाही...
त्यातल्याच ह्या एक.

Friday, 16 September 2011

पुष्कराज

हम्म्म्म...
"तुम्हांला पुष्कराजची अंगठी बोटात घालायला हवी. त्यामुळे संकटांची तीव्रता कमी होईल..."
पत्रिका आणि हात बघून ते डोंबिवलीचे गृहस्थ म्हणाले. त्यांचे भविष्य अतिशय तंतोतंत असते असे एका जवळच्या मित्राने सांगितले होते. म्हणून बसले होते त्यांच्या पुढ्यात. गोष्ट खूप जुनी आहे. खरी संकटमालिका सुरु होण्याआधीचीच.
" हो का ? बरं. कितीला असते ही अंगठी ?"
"ते तुमच्यावर आहे. त्याच्या आकारावर त्याची किंमत ठरते."
त्यांनी ५०० रुपये घेतले आणि माझ्यावरील संकटांवर हा जालीम उपाय सांगितला. असे उपचार टाळणे बरे नाही. काय सांगावं...होतील कदाचित संकटं कमी. म्हणून नेहेमीच्या सोनाराकडे गेले आणि जवळजवळ सात आठ हजारांची सोन्याची अंगठी करावयास दिली. ५ एमएम मापाचा पुष्कराज. पिवळाधमक. कमीतकमी पंधरा वर्षे झाली असावीत ती अंगठी बोटात बाळगून. कमी झाली का संकट ? आता ते कसं सांगणार ? काय माहित...कदाचित ती अंगठी नसती घातली तर अजून आली असती...संकटं !
पण आता ह्याची आठवण का झाली ? कारण आहे...

परवा एकदा आमच्या एका चॅटरूममध्ये आम्ही क्लायन्टबरोबर टेलीकॉन करत होतो. मी आणि सर्विसिंग टीम. आम्ही तिघे. आणि एक लॅपटॉप. ते तिघे सोफ्यावर बसले होते आणि मी खाली गालिच्यावर...पाय पसरून. त्या बाजूला क्लायन्ट कसा आणि कुठे बसला होता ते मला माहित नाही...आणि ते माहित करून घेऊन ह्या कथेत काहीही फरक पडणार नाही...तेव्हा ते राहुदे. तर मी बोलत होते आणि चाळा म्हणून डाव्या हातातील पुष्काराजाचं बोट पकडलं. आणि एकदम काहीतरी टोचलं...मी दचकून बोटाकडे बघितलं तर काय ? पुष्कराज गायब ! नुसतीच सोन्याची रिकामी चौकट. रिकामे कोंदण. खोलीतील दुसऱ्या दोघांच्या डोळ्यांसमोर रिकामी अंगठी नाचवली...काहीही न बोलता. दुसऱ्या बाजूला क्लायन्ट बोलतच सुटला होता. आणि आम्ही तिघे उलट्या सुलट्या उड्या मारून खोलीभर पुष्कराज शोधत होतो. मिळाला ? नाही. क्लायन्ट बोलायचा थांबला ? नाही. पुढील वीस मिनिटे तो बोलत होता आणि मला कधी एकदा मी माझ्या जागेवर जाऊन पुष्कराज शोधते आहे असं झालं होतं. संपताच...my Pushkraj fell off ya...अशी जाहीर वाच्यता करत करत चांगलं पाच मिनिटांचं चालून दूरवर असलेल्या माझ्या जागेवर मी पोचले. आणि तो दिसला. खुर्चीखाली जमिनीला नाक लावून बसला होता. जमिनीवरील गालिच्यावर कधी पडला कोण जाणे. मग मी मोठ्या प्रेमाने त्याला बॅगेत नीट ठेवून दिला. आणि घरी आल्यावर, अंगठी आणि पुष्कराज दोघांनाही डबीत बंदिस्त करून टाकलं...आठवड्याच्या शेवटीच मला ह्या अशा घरगुती कामांसाठी वेळ मिळत असतो...म्हटलं येणाऱ्या शनिवारी जाऊ सोनाराकडे...

शनिवार उजाडला. डबी घेतली आणि गेले. सोनाराकडे. मग ? पुढे ? त्याच्यासमोर डबी ठेवली. त्याने डबी उघडली आणि काय आश्चर्य ?! त्यात रिकामी अंगठी होती...! पण माझा पुष्कराज ?! नव्हताच ना ! गायबच झाला होता ! अगदी नाहीसा. मी तिथेच बसून माझी पर्स ओतली...आत माझं अख्खं जग होतं पण तो चिमुकला पुष्कराज नव्हताच ! घरी परतले...अख्खी बेडरूम उलथीपालथी केली...पण तो कुठेही मिळाला नाही !

दोन दिवसांपूर्वी आपसूक शांतपणे पुन्हा माझ्या मुठीत येऊन बसला होता...आणि आज पुन्हा तसाच निघून गेला...

असा कसं काय गायब झाला...नक्की माझं किती हजारांचं नुकसान झालं...काही कल्पना नाही...

मग आता....पुढील संकटांचं काय ? माझं कवच...शिरस्त्राण वगैरे हरवलंय काय ? की....

...की आता कुठलीही संकटे येणार नाहीत हे त्याच्या मूक भाषेत सांगत माझ्या आयुष्यातून तो निघून गेला होता...काम संपले...असा इशारा देत?

अंधश्रद्धा. दुसरं काही नाही...संकटं यायला लागली की तीही एक बळ देऊन जाते...
म्हणजे दर शनिवारी शंकराच्या देवळात जाऊन दूध आणि बेल वाहा...
रोज रामरक्षा वाचा...वगैरे.

पुष्कराज आणि मी.
...मैत्री मात्र जुनी होती. चांगली पंधरा सोळा वर्षांची.

अपघाताने जवळच्या माणसांनी अचानक माझ्या आयुष्यातून निघून जाणे हे तसे काही मला नवीन नाही.

Saturday, 10 September 2011

साधन

थोर साहित्यिकांना हा प्रश्र्न कोणी नाही विचारणार कदाचित. परंतु, माझ्या सारख्यांना विचारू शकतो. म्हणजे, चित्र काढत होतीस तोपर्यंत ठीक होतं आता लिहावसं का वाटलं....? वगैरे.

मी एखादी वस्तू वा सेवा विकत असते त्यावेळी मी काही प्रत्यक्षपणे तुमच्यापुढे येऊन उभी रहात नाही. वेगवेगळ्या माध्यमातून मी हा उद्योग करत असते. कधी रेडिओ कधी टीव्ही तर कधी वर्तमानपत्र. एखाद्या वस्तूतील अगदी अल्प गोष्ट (USP - Unique Selling Propositions) मोठ्यात मोठी करून सांगण्याच्या हातोटीवर माझे जाहिरातक्षेत्रातील कौशल्य अवलंबून रहातं. हे कौशल्य कधी अनुभवातून कधी टक्केटोणपे खात मिळवलेलं...ह्या शिडीवर चित्रकलेची पायरी अगदी पार तळाची.

ब्लॉग. अगदी प्रत्यक्ष समोरासमोर नाही परंतु, आपण गप्पा मारतो...कधी सहमत होऊन तर कधी असहमत असलो तरीही. कसलाही आग्रह नाही. मैत्रीचा हट्ट नाही....नकळत जुळलेली वीण. एक गोष्ट मात्र नक्की. कसलाही खोटेपणा नाही. असत्याची कास नाही. सत्य व केवळ सत्य.

आयुष्याच्या मध्यांतरावर चक्रीवादळात सापडले असता हाताशी लागलेला एक ओंडका.

देशी परदेशी...कोर्टकचेऱ्या.
देशी परदेशी...पोलीस स्टेशने.
देशी परदेशी...इस्पितळे.
आणि देशी परदेशी...स्मशानभूमी.

काही सांगता येण्यासारखे.
बरेचसे सांगता न येण्यासारखे.

वास्तवात, खूप जगून झालेलं आहे. तश्या न कळत्या वयात एका जीवाला जन्म दिला...खूप मोठी जबाबदारी अंगावर घेतली. त्या जीवाला स्वत:च्या पायावर उभं रहाता येण्याइतपत ती जबाबदारी देखील पार पाडत आणली.

एखादी जाहिरात यशस्वी करताना बऱ्याचदा त्यात असत्य ७५% व सत्य फक्त २५% असते. मूळ स्वभाव तर तो नाही. आयुष्यातील बरीचशी नाती, स्वभावातील ह्या गोष्टीमुळे दुखावलेली. जाणून बुजून दूर सारलेली. पाठ फिरवून चालू पडण्याची सवय. वा खोड म्हणा.

हा ब्लॉग लिहिताना....तो चालवताना मला सर्वात भिडून गेलेली एकच गोष्ट...मला इथे कुठलाही मुखवटा घेऊन उभं राहायचं नाही...मला काहीही विकायचं नाही. महत्त्वाचं म्हणजे स्वत्व विकायचं नाही. चेहरा लपवायचा नाही.

सत्य हेच माझं नेहेमी बळ होतं...
तेच मला बुडवत असतं...
तेच मला तारून नेत असतं.

खरं तर फुटक्या काचेला देखील सुंदर बनवता येतं...
काळ्याकुट्ट ढगांतून भयप्रद वीज कडाडत भेदून जाते...पुढल्या क्षणी तेच ढग पुन्हा एकजीव होऊन जातात.
सुकून गेलेल्या ओंडक्यावर उमललेलं रोप किती वेळा दिसतं.
परंतु, ह्या सर्व उपमा असतात. वास्तवात असं काही नसतं.
एकेक करून जमवलेल्या झोपेच्या गोळ्या कचरा पेटीत फेकून दिल्या.
जगण्याचा प्रयत्न मीही केला.

कित्येक जण, दुर्धर आजारातून बाहेर पडतात. पुन्हा हसत खेळत जगू लागतात. आपली मनं, त्यांचं हे बळ बघून काही शिकून जातात.
फक्त एकच असतं...शरीराला झालेले रोग जगाला सांगता येतात...त्यावर केलेली मात...कधी मनाने तर कधी उपचाराने...हे सर्व जगाला सांगता येतं. जगाकडून जगण्याचं बळ मिळवता येतं.
परंतु, मनाची दु:खं, मनाच्या वेदना अशा सांगता नाही येत.

परवा कचेरीत आम्ही 'bounce back' वर चर्चा करत होतो. ह्या चर्चेला आम्ही 'brain storming' म्हणतो ! प्रत्येकाकडे 'bounce back' करण्याची शक्ती असते...वा असणे आवश्यक आहे. आयुष्यात कुठल्या दिशेने कधी झंझावात येईल सांगता नाही येत. आणि त्यात भुईसपाट होणे हे नैसर्गिक. परंतु, त्या फटक्यानंतर उठून उभे रहाणे...आणि पुढील वाटेला लागणे हे महत्त्वाचे. आणि ते करण्यासाठी प्रत्येकाचे काही वेगळे अस्त्र असते...काही वेगळे माध्यम असते. कधी नकळत तर कधी जाणून बुजून हातात धरलेले.

माझे लिखाण हे माझे साधन.
माझ्या नकळत...माझ्या हातात दिले गेलेले.
कुठल्याही मंदिरात नसलेल्या माझ्या देवाने.

Thursday, 8 September 2011

चिंब !



हे गाणं मला खूप आवडतं....पण तरीही...

ना धड इथलं ना धड तिथलं असं एक वय असतं...आणि त्या वयातून आपण सगळेच जातो...मीही गेले.
...तर असाच पाऊस लागला होता. कुठल्याशा क्लासवरून मी परतत होते. एकटीच होते...सोबत छत्री नव्हती. आणि मस्त पावसाची सर आली. मला चिंब भिजवून गेली. कसली मज्जा आली !
घरी पोचले तर आई वरच्यांकडे गेलेली होती. मी तशीच जिन्यांवरून उड्या मारत तिथे गेले...आणि अगदी जाहीर आरडाओरडा केला..."आई काय मज्जा झाली माहितेय ! मी येत होते ना परत तर ना पाऊस आला...आणि मी ना मस्त भिजले !"
"खाली जा आधी !" आईचा आवाज चढला...पुढल्या क्षणी पाठीत एक धपाटा बसेल असे वाटले...मी तशीच धावत खाली आले...आणि कपडे बदलले. आई खाली आली. "काय गरज काय होती मला वर येऊन तू किती भिजलेयस ते सांगायची ?! तुला माहितेय वरती सगळे दादा असतात ! सगळी मुलं आहेत त्यांच्याकडे ! एव्हढं साधं कळत नाही तुला ?! तिथेच एक ठेऊन देणार होते !"

ह्म्म्म...
ह्या श्रीदेवीला कुणी एक ठेवून दिली नाही वाटतं !
एव्हढी मोठी झाली तरी कळत नाही...एव्हढा मोठा माणूस बघतोय...आणि पिवळी तलम साडी नेसून करतेय हातवारे...भर पावसात ! बिच्चारा आमचा हॅन्डसम विनोद खन्ना किती त्रासलाय !
:)

Tuesday, 6 September 2011

दोन किडे...

सकाळी सकाळी डोक्यात मिक्सर लागला.
डोकं उघडलं...
नुसताच लिबलिबीत, चिपचिपीत गोळा बाहेर आला...
त्यात होते दोन किडे...
एक होता श्रीयुत वळवळ...
आणि दुसरा श्रीयुत खळबळ !

१. श्रीयुत वळवळ
माझा दावा...
माणूस असण्याचा.
माणसासारखं प्रेम केलं...
माणसावर प्रेम केलं.
माणसासारख्या चुका केल्या.
तू.
माणूस.
तू + दारू.
राक्षस.
मग राक्षसाला प्रेम करायला का बरं देवता हवी ?

२. श्रीयुत खळबळ
घुसमट.
भोवळ.
जशी भोवऱ्यात अडकलेली.
किती प्रयत्न करावा...
ह्यातून बाहेर पडण्याचा.
पण नुसतीच उलथापालथ...
नुसतीच डुचमळ.
घशात श्वास अडकावा.
छातीवर मणमण ओझे पडावे.
जशी कोणी बासरी, बूचं लावून बंद करावी.

Friday, 2 September 2011

जय...पराजय

तो किनारा होता.
अथांग पसरलेल्या समुद्राचा किनारा.
अथांग...थांग नसलेला. तळ नसलेला.
यासम समुद्राचा किनारा होणे महाकठीण.
समुद्र...कधी भरकटलेला. समुद्र...कधी थकलेला. खोल गाभ्याशी त्याने लोळत पडावं. कूस वळवावी. वर एक लाट उसळावी. त्याला मन:शांती नाही. तळमळ तळमळ. किनाऱ्यावर लाटांचे थैमान. लाटा कधी हलकेच येत. किनाऱ्याला हळुवट स्पर्शत. किनारा शहारे. लाटेला कवटाळे. शांत करे. पुन्हां माघारी धाडून देई. जसे त्या लाटेचे, किनारा माघारपण करी. मायेने, ममतेने. पुन्हा सिद्ध राही. पुढल्या लाटेसाठी. लाट. तरुण. मदमस्त. समुद्राने दूर सारलेली. किनाऱ्याच्या कुशीत काही क्षण विसावलेली. लटका रुसवा घेऊन. लाटा किनाऱ्याकडे झेपावत राहिल्या. मन:शांतीसाठी...काही क्षणांच्या सोबतीसाठी.

समुद्र आणि किनारा.
गहिरे त्यांचे नाते.
समुद्र मौजा. किनारा योगी.
त्यांचा संवाद...कधी अभंग...कधी लावणी.
समुद्राच्या त्या लाटा...कधी मायेने तर क्वचित कधी हिंसेने...किनाऱ्याला ओरबाडी. ते उमटलेले ओरखडे...किनारा हसत झेली...क्षणात निपटून टाकी.

परंतु, प्रत्येक गोष्टीला शेवट असतो.
चांगले कोणाला बघवते ?
किनाऱ्यापाशी कोणी दगड लावले. एकावर एक चढवले. अगणित....दूरदूर. दगडांचे एक भिंताडच उभे राहिले.
बेभान समुद्र...त्याच्यासाठीच पसरलेला खंबीर किनारा व आज त्यापुढे ही सैतान भिंत.
त्रांगडं.
मग आता काय उरले ? योगी किनारा खचला. तसे बघता, जन्म होताच मरण अटळ. किनारा संपून गेला...दिसेनासा झाला. एकही अश्रू न ढाळता. मूक तो किनारा. युगानयुगे दोघांनी एक प्रौढ नाते जपले होते. आज जन्मलेली, व तरीही माजलेली भिंत अशी उभी राहिली. डोळे वटारून बघू लागली. विनाश आता अटळ होता. कोणी चांगदेव येणार नव्हता.

काय तळाशी भोगविश्वात गढलेला समुद्र जागा झाला ? काय त्याला कळले ? कोणी त्याला सांगितले ? त्याचा सखा मृत्यू पावला. कोणी ही दुवार्ता त्याच्या कानी घातली ? दुसरे कोण ? अशीच एक नाजूक लाट. झेपावली होती योगी किनाऱ्याकडे. आणि तिच्या हाती काय लागिले ? एक दोन रिकामे शिंपले.
ती पुन्हा माघारी धावली. जशी वेगात आली त्याच वेगात परतली.
"समुद्रा....त्याचा अंत झाला. तो कुठे दिसेना. तो अंतर्धान पावला."
सागर क्रोधला. माझा किनारा संपला ? असे कसे झाले ? तिथे आता कोण आले ?
भिंताड ? तिची ही मजाल ?

मग आता काय होणार ? ह्या सत्यकथेचा शेवट काय ?
लाटा आता कोणाकडे झेपावणार ? कोण त्यांना बाहू पसरून आलिंगन देणार ?
काय समुद्र हार मानणार ?
समुद्र निसर्गाचे रूप. कधी सौम्य. कधी उन्मादलेले.
आता उत्पात होईल.
आता प्रलय येईल.
उन्मत्त समुद्र. मदमस्त त्याच्या लाटा.
त्यांचा समुदाय उसळेल. उंच उंच झेप घेईल. रौद्र समुद्राचे ते सैन्य. आकाशातून पृथ्वीवर झेपावे.
हाहा:कार उडेल.
त्या मूर्ख भिंतीची काय कथा ? भिंताड ती. उद्ध्वस्त होईल.
किनारा नकळत हरवला. अहिंसेने अंतर्धान पावला. परंतु, तेव्हढे भान आता समुद्राला नाही. सूडाला भानच नसते. सूड फक्त हिंसा जाणते. रक्ताची चव ओळखते. किनारा त्याचा सखा होता. तोच नाहीसा झाला. आता त्याचे गूज कोण ऐकिल ? काय ती भिंताड ? छे ! तिची कुठली इतकी बुद्धी.
समुद्र तिला उद्ध्वस्त करेल...क्षणार्धात. होत्याचे नव्हते.
समुद्र थैमान. असंख्य हस्त...असंख्य जिव्हा...
भक्षाच्या शोधात. सूड इतकेच जाणतो...

जसे समुद्राने ठरवले तसेच एक दिवस घडले. त्या काळरात्री, त्याच्या तळाशी आकांत झाला. आता कसली निद्रा ? आता कसली विश्रांती ? भडकलेले माथे. सैन्याला त्याने ललकारी दिली. आवेशपूर्ण, भावपूर्ण संवाद साधला. हजारो, लाखो सैनिक गोळा झाले. योगी किनाऱ्याची त्यांनी आठवण काढली. एक क्षण शांतता पाळली.
...ती वादळापूर्वीची शांतता होती.
समग्र क्षूद्र मानवजात...संपायला कितीसा वेळ ?
सैन्य उसळले...सैन्य भिडले.
सगळे होत्याचे नव्हते झाले.

दूरदूर, साक्षीला चंद्र होता.
भीषण घटनेचा फक्त तोच एक साक्षीदार होता.
...दुरून काय दिसत होते ?
मानवजातीचे भग्न अवशेष. कुठे एखादे फळकुटे...कुठे कधीतरी, गगनाला भिडलेल्या एखाद्या इमारतीचा तुटका कठडा.
माणूस ? छे ! त्याला लाटेचा एक फटकारा पुरेसा. गणती नव्हती. असंख्य अगणित प्रेते, दिमाखात डोक्यावर घेऊन बेभान समुद्र नाचत होता. तीच त्याची विजय पताका होती. आकाशपाताळ एक करणारे ते आसुरी हास्य...त्याचे रौद्र रूप...विजयी थैमान घालणाऱ्या त्याच्या त्या लाटा.

त्या काळरात्री, चंद्र न्यायाच्याच बाजूने होता...तरीही...तरीही तो सर्वसाक्षी, एकटाच अश्रू ढाळत होता. अश्रू, खारे अश्रू...ते झेलून, समुद्र अधिकच पिसाटत होता.

सूड समुद्राचा.
किनाऱ्याच्या हत्येचा तो विधिलिखित सूड.