नमस्कार

नमस्कार

Pages

Friday 13 August 2010

बाहुली

पॅरीसवरून ती आली. गोरीपान. सोनेरी केस. वाऱ्याबरोबर भुरभुरणारे. हातपाय लांबसडक. हात सरळ केले तर अगदी अजानुबाहू. प्लास्टिक खोक्यात बसलेली. डोळे मिटून. पापण्या दाट आणि लांब. झगा निळा बिनबाह्यांचा. चमचमणारा. खोका सरळ केला तर काय गंमत! वळलेल्या दाट पापण्या उघडल्या आणि पातळ भुवईला टेकल्या. आत निळाशार टपोरा समुद्र. झग्याचाच रंग त्यात पसरलेला. तिच्या लालचुटुक ओठांवरचं हसू आशीच्या ओठांवर येऊन बसलं. किती ही सुंदर!

माधवरावांच्या मित्राने त्यांच्या मुलीसाठी आठवणीने ही परदेशी बाहुली आणली होती. आशीच्या हातात जेंव्हा ती आली तेंव्हा आशीचा आठ वर्षांचा जीव एकदम हरखून गेला. तिला कुठे ठेऊ आणि कुठे नको असं होऊन गेलं. शनिवार होता आणि आशीला शनिवारी सकाळची शाळा होती. मग अख्खा दिवस मोकळा. बाहूली दिवसभर आशीच्या हातातच होती. आणि आशी तिला घेऊन घरभर नाचत होती. शेवटी कुठे आशीच्या लक्षात आलं की ती बाहुली आपलीच आहे आणि तिला आता आपण त्या प्लास्टिकच्या खोक्यातून आपल्या भातुकलीच्या जगात आणू शकतो. भराभर प्लास्टिकची फाडाफाड झाली. बाहुली आशीच्या हातात आली.

आशीची मान एकदा डावीकडे एकदा उजवीकडे. बाहुली खाली बाहुली वर. चार डोळ्यांची उघडझाप.

तेव्हढ्यात आशीच्या लक्षात आलं, ही तर विमानाचा प्रवास करून इतक्या दुरून आपल्यासाठी, आपल्या भातुकलीच्या खेळात आलीय. किती दमली असेल ती! अरेरे! आता काय करायचं? आशीच्या प्रश्नाचं उत्तर तिलाच अजून थोडा वेळ मान इकडेतिकडे फिरवल्यावर मिळालं आणि मग आशीने बाहुलीसकट धाव घेतली मोरीकडे. बादलीतून तांब्या भरून पाणी घेतले आणि छानपैकी बाहुलीच्या डोक्यावर ओतले. सोनेरी केस भिजले. चकचकीत झगा भिजला. आई रविवारी कशी नहाण घालते मला तसेच करायला हवे हिचे मला आता. किती हे कष्ट. किती हा त्रास! आई नाही का दमून जात माझे लांबलांब केस धुवून? मी पण किती दमतेय! आता पंचा घ्यावा आणि केस छान पुसून घावेत.
"अगं अगं! हे काय? काय करतेयस तू हे?" आई कामावरून कधी आली कळलंच नाही की!
"अगं आई, बाबा नाही का गावाहून आले की अंघोळ करत? ही पण किती दुरून आलेली आई! पॅरीसवरून! विमानातून! म्हणून अंघोळ घातली मी तिला!"
आईने कपाळाला हात लावला.

चकचकीत झग्याचा मुठी एव्हढा बोळा आणि कुस्करून गेलेल्या लांबलांब पापण्या. सोनेरी केसांची झिपरी मोना, आशीची सर्वात लाडकी बाहुली होती!

11 comments:

rajiv said...

"दाट पापण्या उघडल्या आणि पातळ भुवईला टेकल्या. आत निळाशार टपोरा समुद्र. झग्याचाच रंग त्यात पसरलेला. तिच्या लालचुटुक ओठांवरचं हसू आशीच्या ओठांवर येऊन बसलं"

- एकट्या आशीच्याच का ? माझ्याही बसले ! वाचताना ! एकदम प्रत्यक्ष दर्शी वर्णन ! दिल खुश !!

"" बादलीतून तांब्या भरून पाणी घेतले आणि छानपैकी बाहुलीच्या डोक्यावर ओतले. सोनेरी केस भिजले. चकचकीत झगा भिजला. आई रविवारी कशी नहाण घालते मला ""

- हि निरागासताच भावून जाते


" चकचकीत झग्याचा मुठी एव्हढा बोळा आणि कुस्करून गेलेल्या लांबलांब पापण्या. सोनेरी केसांची झिपरी मोना, आशीची सर्वात लाडकी बाहुली होती "

-
काळाच्या वेगवान प्रवासात देखील `निर्मळ भावना' प्रबळ वा चिरंतन राहू शकतात :) - अप्रतिम !

Guru Thakur said...

i agree with rajiv...!

Shriraj said...

खरंच छान. आवडले. निरागसता ही नेहमीच प्रेरणादायी वाटते. धन्यवाद अनघा you made my day :)

Anagha said...

धन्यवाद! मंडळ आभारी आहे. :)

सौरभ said...

पॅरीसवरून ती आली. (आली... आली... आली...) गोरीपान. सोनेरी केस. वाऱ्याबरोबर भुरभुरणारे. (भुवया उंचावल्या... धडधड धडधड...) हातपाय लांबसडक. हात सरळ केले तर अगदी अजानुबाहू. (येऊ दे... येऊ दे) प्लास्टिक खोक्यात बसलेली. (ऑ!!! घात... घात झाला... खरोखरची बाहुली होती ती)
असो. वाचून हसायला आलं. :) माझ्याकडे खेळण्यातले हिमॅन आणि स्कॅलेटॉन होते. (असावेत अजुन) हाहाहा, त्या आशीसारखं माझ्यासाठी ते किती खरे होते मलाच माहित. :D ;)

Anagha said...

सौरभ बुवा, मला वाटलंच होतं हं अशी सुरुवात करताना कि सौरभ भराऱ्या घेऊ लागणार! :D

BinaryBandya™ said...

बाहुली डोळ्यासमोर उभी राहिली ...
छान लिहलय ...

सौरभ said...

व्वा... एवढा विश्वास!!! आश्चर्यम!!!

Anagha said...

बायनरी बंड्या, आवडली ना माझी बाहुली? :)

संकेत आपटे said...

निरागसता आवडली लेखातली. माझ्याकडे बाहुली नाहीये, पण माझा लाडका ऑप्टिमस प्राईम आहे. :-)

Anagha said...

संकेत, सगळ्यांचेच असे लाडके काही characters असतात नाही का? :)