नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 20 May 2011

कोर्टाची पायरी...भाग ४

भाग १
भाग २
भाग ३

१५ जुलै २००३
रत्नागिरी.

भिडे व भुर्के वकिलांच्याने काही तारीख लवकरची करून घेणे झाले नाही. कारण तसे रक्तातच नाही. कोर्ट जी तारीख देईल ती तारीख...घाई कुणाला आहे अशी मानसिकता...मग त्यात संबंधित लोकांची आयुष्य का जाईना. जितकी अधिक वर्ष खटला चालेल तितकेच त्यातून उत्त्पन्न वाढेल....असा त्यांचा विचार असावा.

कधी कधी शंका येते...भिडे व भुर्के नक्की काय करत होते...का ते लवकरच्या तारखा घेत नव्हते....काय ह्याच त्यांच्या कार्य पद्धतीमुळे वीस वर्षे गेली होती ? कोर्टात जाऊन ज्या वेळी एक अख्खा दिवस वीस वर्षांची पोतडी उघडून बघितली तर ही शंका अधिक प्रबळच झाली...मूळ वकील, पावसकर ह्यांना कायम ठेवून शर्मा बाईचे अधून मधून वकील बदलणे... आजारपणाची कारणे देऊन तारखा महिना महिना पुढे ढकलून घेणे. बाबांचे नोकरीधंद्यानिमित्त मुंबईतील वास्तव्य. उठसुठ रजा घेऊ न शकण्याची व कोर्टात दर तारखेला हजर राहू न शकण्यातील त्यांची हतबलता. खरं तर, त्यांचा जीव, एखाद्या पुस्तकांच्या दुकानात वा एशियाटिक वाचनालयात तासनतास रमणारा. एखादे पुस्तक वाचा...त्यावर मित्रांशी चर्चा करा...टिपणी करून ठेवा...'नवी क्षितिजे' ह्या त्यांच्या त्रैमासिकासाठी लिखाण करा...नाहीतर पहाटे पाच वाजताच बाजारात जाऊन चांगले निवडून निवडून मटण, गावठी कोंबडी घेऊन या...स्वत: व्यवस्थित साफ करून...सर्वांना खायला घाला...समोरच्या माणसाच्या चेहेऱ्यावरील तृप्तीचा आनंद लुटा....हे पाटलांचे छंद.
त्यांच्यासाठी, हा नस्ता मागे लागलेला आणि वेळ व पैसे खाणारा व्याप. हे सर्व विरुद्ध पार्टीच्या पथ्यावर पडणारं.

पण घाईला, मी पेटले होते...हे मला संपवायलाच हवे होते...शर्मा बाईला बाहेर काढायचेच होते...लवकरात लवकर...माझ्या हातात निर्णय दिले असते...तर ताबडतोब ! कदाचित बाबांसाठी तो फक्त एक खटला होता...पण माझ्यासाठी तो 'माझ्या बाबांचा' खटला होता...ज्या खटल्याने माझ्या बाबांना त्रास दिला होता...मानसिक, शारीरिक व आर्थिक. त्यांची काहीही चूक नसताना...
शर्मा बाईला 'मी' महाग पडणार होते...बाबांपेक्षाही अधिक !

त्यादिवशी रत्नागिरी कोर्टाने आमचा 'घराचा ताबा घेण्याचा अर्ज' दाखल तर करून घेतला परंतु, शर्माच्या वकिलांनी, पावसकरांनी, आम्ही हाय कोर्टात रिट पेटिशन दाखल केल्याचे त्या कोर्टाला सांगितले व पुढील तारीख मागितली. त्यावर जिल्हा कोर्टाने त्यांना तुमचे 'रिट पेटिशन' (विनंती अर्ज) हे हाय कोर्टाने दाखल करून घेतले आहे किंवा फेटाळून लावले आहे ह्याबद्दल माहिती देण्यास सांगितले. त्यासाठी पुढील तारीख दिली गेली.


१२ ऑगस्ट.
मुंबई.
दुपारी माझा मोबाईल वाजला. समोरून कपाडियांचे सहकारी चितळे बोलत होते.
"सकाळी हाय कोर्टात आपली केस उभी राहिली होती. व खालील कोर्टाच्या निकालावर हाय कोर्टाने स्टे दिला होता."
"म्हणजे ?! आता ?"
"परंतु, मला ते कोर्ट चेंबर मध्ये स्क्रीन वर फ्लॅश होऊन गेल्यामुळे कळले. मग मी हाय कोर्टात दुपारी पुन्हा केस उभी केली. जज्जना कळवले की आपण हाय कोर्टात कॅव्हिएट दाखल केलेले आहे. त्यामुळे आम्हांला आमची बाजू सांगण्याची संधी दिल्याविना असा 'स्टे' दिला जाऊ नये."
"मग ?" मला अजूनही हे सगळे शब्द...ही कोर्टाची भाषा कठीण जात होती...
"तेव्हा मग कोर्टाने सकाळी दिलेला स्टे उठवला आहे. व ह्या खटल्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे खालील कोर्टाकडून मागवून घेतली आहेत."
"हो का ? मग आता ??"
"येतील कागदपत्र..."
"किती दिवस जातात त्यात ?"
"महिना दीड महिना..."

आपल्या इच्छांची घोडदौड व कायद्याची कासवगती....

२७ जूनला हाय कोर्टात दाखल केलेल्या एका 'कॅव्हिएट'ने, १२ ऑगस्ट रोजी अंगावर येणारी, एक प्रचंड लाट थोपवून धरली होती.

बऱ्याचदा मला वाटतं...देव माझ्याकडे लक्ष ठेऊन आहे. रोज उठून सिद्धीविनायकासमोर रांग लावण्यातील तर मी नाही. संकटे तोच उभी करतो...मान्य. पण, काय तो संकटात मला एकटं टाकतो ? माझी मजा बघत काय तो हाताची घडी घालून, नुसती बघ्याची भूमिका घेतो ? नाही. ऐनवेळी...प्रत्येकवेळी...तो पुढे येऊन वाचवतो. सावरतो. आणि मग मी त्या त्या संकटांमधून काही ना काही शिकत जाते...पुढील आयुष्यासाठी तयार होत जाते. जशी काही ही माझी अडथळ्यांची शर्यत आहे. शर्यत एकटीचीच. अडथळा कधी उंच तर कधी फक्त एक हलकासा गतीरोधक. पण काय हरकत आहे ? जर शेवटी, त्याने तयार केलेल्या शर्यतीत मी उतरत राहिले तर आज ना उद्या उत्तीर्ण होईनच ! नाही का ?
मग बसेन शांतपणे खिडकीपाशी...हातात कॉफीचा माझा मग घेऊन...एकेक घोट शांतपणे घेत...!

फक्त ह्या सर्व परीक्षा त्याने माझ्यासाठीच ठेवाव्या...
माझ्या बहिणी, माझी आई व माझी लेक...
ह्यातून दूर रहाव्या...
इतकंच काय ते.

विषयांतर झालं !

18 comments:

Shriraj said...

अनघा, मी आतुर झालोय.... सांग ना पुढे काय झालं...

Gouri said...

अनघा, प्रत्येकाच्या ‘पायरी’प्रमाणे परीक्षा घेत असतो ग तो ... तुझ्या सगळ्या एकदम वरच्याच परीक्षा चालल्यात :)

हेरंब said...

प्रत्येक वेळी तुझा फॉन वाजला (असं वाचलं) की मलाच टेन्शन येतं की समोरची व्यक्ती आता काय नवीन बातमी देणार असेल !

सौरभ said...

शर्माने की है फाईल 'रिट पेटिशन', हायकोर्टने लाया स्टे, लेकिन कॅव्हिएटने वापस उठा दिया स्टे, कहानी एक रोमांचित मोडपर... क्या होंगे सिद्धिविनायक बाप्पा अनघाजींपे प्रसन्न??? क्या मिलेगा अनघाजींको उनका घर वापस??? क्या होगा फैसला कोर्ट का???.... जाननेके लिए पढते रहिए... restiscrime.blogspot.com

Shriraj said...

ह्या सौरभला कुणीतरी धरा रे! :D :D :D

श्रद्धा said...

हेरंब, माझं अगदी असंच होतं.
Somehow at back of the mind, I trust Anagha's guts and her goodwill or her good deeds, so I don't really worry about success of the result, although I agree the process is painful (or must have been very painful for her).

Anagha said...

श्रीराज, अरे मी लिहायला घेतलं ना तेव्हा वाटलं नव्हतं की इतके भाग होतील...पण अरे काही गाळण्यासारखं देखील नाहीये ! लिहिते लिहिते...पटापट लिहिते ! :)

Anagha said...

गौरी, 'त्याने' माझ्यासाठी थोडं कठीण सिलॅबस टाकलंय वाटतं ! :)

Anagha said...

हेरंबा...अजून २/३ भाग होणार बहुधा... :)

Anagha said...

फटके, फटके मारणार आहे तुला सौरभा ! भेट तर तू मला ! :D :D :D

Anagha said...

श्रीराज, ह्या सौरभाला कोण धरणार ?! :D

Anagha said...

श्रद्धा...नुसतं माहित असतं ग की हे युद्ध आपल्याला लढायचंय...बाकी, एकही शस्त्र माहित नाही ! अशी अवस्था...!

तुझा हा विश्वास मला माझे आयुशातील उरलेले धडे गिरवायला नक्की मदत करेल... :) खरंच.

रोहन... said...

त्या कॅव्हिएट चा फायदा झाला म्हणायचा... पुढे वाचतो... :) तारखांबरोबर साल पण लिही.. म्हणजे नेमका अंदाज येईल.. :)

Anagha said...

अगदी अगदी रोहणा... :)

बरोबर..मी आता ह्या पोस्टीच्या सुरुवातीलाच साल टाकलंय... आभार, :)

आणि अजून आपण २००३ मध्येच आहोत...तू कॉलेजमध्येच आहेस अजून ! :D

हेरंब said...

श्या.. ते फॉन वाचायला लय बेक्कार वाटतंय.. 'फोन' असे वाचावे..

Pankaj - भटकंती Unlimited said...

आपल्या इच्छांची घोडदौड व कायद्याची कासवगती.
सगळं अनुभवलं आहे मीही.

Anagha said...

काय झालं हेरंबा ?

हेरंब said...

माझ्या आधीच्या कमेंटमधे फोनच्या ऐवजी चुकून 'फॉन' असं लिहिलं गेलंय.. त्याच्याबद्दल म्हणत होतो मी.. तुझ्या पोस्टबद्दल नाही :)