नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 21 May 2011

कोर्टाची पायरी...भाग ५

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

२५ मार्च २००३ ची रात्र. रत्नागिरीतून कोकणकन्या नुकतीच निघाली होती. मी खिडकीत बसले होते. पहाटे मुंबई येणार होती. दोन दिवसांची कामे आटपून फलटणकर व मी घरी निघालो होतो. समोरच्या सीटवर कोणी वयस्कर गृहस्थ बसले होते. गोरे, बारीकसे, थोडे कमरेत वाकलेले. अंदाजे सत्तरीच्या आसपास वय. ते काका, झोपायची तयारी करू पहात होते. पांढरी चादर काढली व चालत्या गाडीत थोड्या कापऱ्या हातांनी चादर अंथरायचा त्यांचा प्रयत्न चालू झाला. बाबा घरी कायम चटईवर झोपत असत. सर्वात प्रथम चटई, मग त्यावर सतरंजी, त्यावर उभी घडी केलेली त्यांची हिरवी चादर व सर्वात वर एक पांढरी शुभ्र चादर. त्या रविवारी देखील १२ च्या सुमारास मी त्यांना हिंदुजातून घेऊन आले होते...त्यांची ही खास गादी करून दिली होती व त्यानंतर पाच मिनिटांवर असलेल्या माझ्या घरी गेले होते. म्हणे मी गादी छान घालत असे. म्हणजे, एकही सुरुकुती येऊ नये...असा प्रेमाने गादीवर हात फिरवावा की बाबांच्या उघड्या मऊ पाठीला एकही चूण टोचू नये. पहाटे सहा वाजता त्यांचा फोन आला. "मला काही बरे वाटत नाहीये. तू अॅम्ब्युलन्स बोलव. कालच्या सारखा मी नाही उतरू शकणार जिने..."
"येते मी बाबा. आणते अॅम्ब्युलन्स."
स्ट्रेचरवर बाबांना ठेवले..."अरे, तुम्हांला जड पडत असेल ना..." बाबा स्ट्रेचर उचलणाऱ्या माणसांना विचारत होते.
बाबांना जाऊन ३ महिने उलटले होते.

"काका, मी घालून देऊ तुम्हांला गादी ?"
"अरे बेटा, घाल ना...मी बसतो असा बाजूला..."
काकांना गादी घालून दिली....एकही चूण नसलेली, धडधडत्या आगगाडीतील गादी.

ओळख झाली...काकांचे नाव बापट. पेशा वकिलाचा. कर्मभूमी मुंबई हाय कोर्ट.
"काय नाव तुझं ?"
"अनघा. अनघा निगवेकर."
संभाषण सुरु झालं...काका हाय कोर्टात वकील आहेत. फलटणकर अॅडव्होकेट आहेत. ते कोर्टात खटले चालवत नाहीत. माझ्या अपुऱ्या माहितीत फलटणकरांनी रीतसर भर घालून काकांना खटला नीट समजावून सांगितला. कपाडिया फौजदारी खटले चालवत. दिवाणी नाही. हाय कोर्टात उभे राहून खटला चालवण्यासाठी कोणा हाय कोर्टात प्रॅक्टिस असलेल्या वकिलाची गरज लागण्याची शक्यता त्यावेळी नाकारता येत नव्हती. रात्र वाढली होती. सहप्रवासी दिवे मालवून आडवे झाले होते. मीही मग काकांच्या समोरील सीटवर निद्रादेवीच्या विनवण्या सुरु केल्या...माझ्या आयुष्यातील कोर्टाच्या चकरांना नुकतीच कुठे सुरुवात झालेली होती...हे किती काळ चालणार आहे...किती खेपा घालाव्या लागणार आहेत...देवच जाणे...
पहाटे दादर आलं...मी उतरून गेले. रात्री काकांचा दूरध्वनी क्रमांक वहीत लिहून घेतला होता....

मुंबईत खटला चालवण्यासाठी बापटकाकांनी त्यांचे सहकारी, लिमये, यांची भेट घडवून दिली. काळे मध्यम उंचीचे लिमये वकील. वय साठीच्या आसपास.

१५ जानेवारी २००४.
मुंबई हाय कोर्ट.
१२ ऑगस्टला तात्पुरता उठवलेला स्टे व हाय कोर्टाने रत्नागिरी कोर्टाकडून मागवलेले खटल्याचे कागद...हे समोर घेऊन त्या दिवशी न्यायमूर्ती चंद्रचूड ह्यांसमोर खटला सुरू झाला होता. बाबा खटला जिंकून कधीच वर्ष उलटून गेलं होतं. त्यानंतर शर्मा बाईने हाय कोर्टाला केलेल्या विनंती अर्जावरची ( रिट पिटीशन ) ही सुनावणी होती. कोर्ट रुममध्ये माझ्या सोबत होते अॅडव्होकेट फलटणकर. समोर न्यायामुर्तींकडे तोंड करून व आम्हांला पाठमोरे, काळ्या कोटातील वकील लिमये तयारीनिशी उभे होते. बाजूला बाईचे वकील, देसाई.
प्रत्येक पक्षाला त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. मी कान लावून ऐकण्याचा जीवतोड प्रयत्न केला...परंतु, कोर्टातील संवाद हळू आवाजात होता...भाषा, बोली नव्हती. मला हळूहळू बहिरेपणा येऊ लागला....काहीही कळेनासे झाले. फक्त हालचाली काय त्या कळत होत्या...देसाई उभे राहिले...देसाई बोलले...लिमये उभे राहिले...लिमये बोलले...न्या.चंद्रचूड यांची भूमिका श्रोत्याची. सर्व ऐकून झाले...आता रिट पिटीशनवर त्यांना निर्णय द्यायचा होता. त्यांनी बाजूलाच बसलेल्या टंकलेखकाकडे बघून आदेश द्यावयास सुरुवात केली. अजूनही मला काहीही ऐकू येत नव्हते. नक्की काय चालले आहे काहीही कळत नव्हते. चंद्रचूड आपल्या बाजूने बोलत आहेत काय ? की आदेश आपल्या विरुद्ध चालू आहे ? काहीही कळायला मार्ग नव्हता. अकस्मात पाठमोरे लिमये खिश्यातून रुमाल काढून घाम पुसताना दिसू लागले. बाजूला बसलेले फलटणकर खाडकन उभे राहिले. पुढे जाऊन लिमयांच्या कानात काही पुटपुटू लागले. चंद्रचूड अजूनही टंकलेखकाकडे बघून आदेशच देत होते. फलटणकर कानात काही बोलल्यावर लिमये न्यायमुर्तीना काही सांगू लागले. आता न्यायमूर्ती, विरुद्ध पक्षाच्या वकिलांकडे बघून काही विचारू लागले...ते काहीतरी उत्तरले....व अखेरीस न्यायमूर्ती परत एकदा आपल्या टंकलेखकास काही आदेश देऊ लागले. आमची वेळ संपली. आदेश देऊन झाला. माझ्यासाठी हा सगळा मूकपट.

आम्ही तिघे कोर्ट रूममधून बाहेर पडलो.

पिवळ्या भिंतींच्या एका कोपऱ्यात लिमये वकील बसत असत. त्यांच्या जागेवर गेलो. लिमये व फलटणकर ह्यांची काही जोरदार चर्चा झाली. मी आत्तापर्यंत दोनदा फलटणकरांना विचारून झालं होतं...काय झालंय ?
"Wait. सांगतो."
"काहीतरी वाईट झालंय का ? आपल्या विरोधात गेलंय का ?"
"एक मिनिट धीर धर. इथून बाहेर पडल्यावर सांगतो."

ती वीस मिनिटे उगाच रेंगाळत चाललेली...म्हणजे कधी थकून गेलो की आपले पाय जसे उचलून टाकता येत नाहीत...तसेच काहीतरी घड्याळाला झाले होते...सरकता सरकेना...लिमये व फलटणकरांची चर्चा संपेना.

"ओक्के. न्यायमूर्ती आज आपला खटला मुंबई हाय कोर्टात दाखल करून घेत होते." आम्ही हाय कोर्टातून बाहेर पडलो होतो. रस्त्याला लागलो होतो. माझ्या हातात एक जडशी थैली. कायदेकानूंनी भरलेली.
"म्हणजे ?"
"म्हणजे त्यांना दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर असे वाटले की ह्यात अजूनही काही विचार होण्याची गरज आहे."
"मग ? आपला खटला इथे अॅडमिट झाला ?"
"झाला असता...पण नाही झाला...ते म्हणाले की हा खटला मी इथे दाखल करून घेऊ शकतो कारण ह्यात दोन्ही बाजूंच्या म्हणण्याचा अजून सखोल विचार होणे आवश्यक आहे."
"मग ?"
"जर आज खटला इथे दाखल होता...तर पुढची वीस वर्ष आपण पायऱ्या चढत राहिलो असतो. म्हणून मी उठून लिमयांना म्हणालो की खटला खाली पाठवायला सांगा ! आणि नशिबाने त्या बाईचे वकील देखील त्या गोष्टीला तयार झाले आणि म्हणून खटला आज इथे अॅडमिट झाला नाही !"
"म्हणून लिमयांना घाम फुटला होता ?"
"हो...कारण आज मॅटर अॅडमिट होताहोता थांबलाय..."
"व्वा ! म्हणजे तू त्या क्षणी उठून लिमयांना सांगितलं नसतंस तर ते काय फक्त घाम पुसत रहाणार होते ?"
"ठीक आहे...नाही झालं ना काही वाईट ?"
"पण मग आता काय करायचं आपण...? आता हा जो खालच्या कोर्टाने निर्णय दिलेला आहे तोच परत तिथेच जाऊन घ्यायचा ? दिलाय ना त्यांनी आधीच निकाल ? जिंकलोय ना आपण तिथे ? आता परत तिथेच जाऊन काय करायचं ?"
"तसं नाहीये ते."
"मग कसं आहे ? मला काहीच कळत नाहीये ! तिथे कोर्टात मला काही ऐकूच येईनासे झाले ! म्हणजे ऐकू येत होतं पण ते काय बोलतायत ते मला काहीच कळत नव्हतं !"
"ते कोर्टाच्या भाषेची सवय नसली की होतं तसं..."
"पण असं खाली का पाठवलं त्यांनी आपल्याला ? त्यांनीच का नाही निकाल देऊन टाकला ?" भोकाड....भोकाड पसरायचं होतं खरं तर....पण रस्त्यात नाही करता येत असलं काही....
"त्यांनी खालील कोर्टाला असा आदेश दिला आहे की...मूळ दाव्यावरील जो निर्णय दिला गेला होता तो सर्व मुद्दे लक्षात घेऊन नव्हता...त्यातील काही मुद्दे तसेच अर्धवट सोडून दिले गेलेले आहेत...आपले म्हणणे असे आहे की शिल्लक मुद्द्यांवर देखील निर्णय व्हावा...व बाईचे म्हणणे आहे, की सर्व निकालच रद्दबादल व्हावा ! म्हणून आता परत एकदा सुनावणी घेऊन पूर्ण निकाल देण्यात यावा."
"मग आता किती दिवस लागतील...हे संपायला...?"
"बघू...संपवू आपण हे लवकर..."
"हे लवकरच संपवायला वं आहे ! माझी लेक काही चालवणार नाहीये ही केस पुढे ! मी खरंच सांगतेय !"
"खालच्या कोर्टात नाही लागणार इतके दिवस. म्हणजे निदान वीस वर्ष तरी नाही लागणार !"

पुन्हां रत्नागिरी...पुन्हा कोर्टाच्या पायऱ्या.
बाबांच्या आयुष्यातील वीस वर्षे + माझ्या आयुष्यातील फक्त दहा महिने !

अजून किती दिवसांची आहुती...ह्या युद्धात...?

10 comments:

रोहन... said...

अरे बापरे... पुन्हा मुक्काम पोस्ट रत्नागिरी... :(
मला सांग हा खटला संपलाय की अजून सुरू आहे???

Anagha said...

हम्म्म्म... हो रोहणा, मुक्काम पोस्ट रत्नागिरी...!

आता बहुधा अजून पोस्टांत संपावा हा लढा...

पेशन्स ट्राय करतेय का मी तुम्हां सर्वांचा ?? :(

Anonymous said...

लवकर टाक गं पुढचा भाग...

Anagha said...

:) टाकते टाकते ग तन्वी ! लिहिते बाई पटापट ! लिहायला घेतलं तर वाटलं नव्हतं ग एव्हढं होईल म्हणून !
पण बरं झालं लिहायला घेतलं...त्यामुळे ना ते सगळं मला नीट एकत्र लावता आलं...व मला देखील त्यातून परत धडे घेता आले...म्हणजे रिव्हिजन झाली ! :)

सौरभ said...

>> अजून किती दिवसांची आहुती...ह्या युद्धात...?
कड्डक... बाकी... :) :) :) एक कुंद वारं फिरुन गेलं...

Anagha said...

:)

हेरंब said...

बापरे.. पुन्हा रत्नागिरी?

ऑन अ लायटर नोट, मला लगेच पुढचा भाग वाचायला मिळणार :)

Anagha said...

:D हो..पुन्हा रत्नागिरी !

Shriraj said...

@ "म्हणे मी गादी छान घालत असे. म्हणजे, एकही सुरुकुती येऊ नये...असा प्रेमाने गादीवर हात फिरवावा की बाबांच्या उघड्या मऊ पाठीला एकही चूण टोचू नये."
=> एक मुलगी बाबांवर कित्ती प्रेम करायची!!!

Anagha said...

:)