नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 3 November 2010

धुमश्चक्री...संपूर्ण!

भाग
भाग २

तर मंडळी, पंधरावीस दिवस असेच गेले. ढोपरं फुटली. कोपरं फाटली. तोल, कधी उजवीकडे तर कधी डावीकडे. आणि मग एका क्षणी सुवर्णमध्य गाठला गेला. सायकल आमचं ऐकू लागली. आम्हांला न पाडता पळू लागली. म्हणजे अगदी सर्कशीतल्या सिंहाला वठणीवर आल्यावर जसा रिंगमास्तरला आनंद होत असेल तसाच काहीसा आनंद आम्हांला झाला. आमची सायकल वठणीवर आली. सरळ धावू लागली आणि अगदी वळणं सुद्धा घेऊ लागली. आमचा आरडाओरडा ऐकून सायकल चालवण्याच्या कलेचा प्रसार झाला. बिल्डींगमधील इतर मुलींना स्फूर्ती मिळाली. आम्ही दोनाचे अगदी चारपाच झालो. बाबूचा धंदा वधारला. आणि सगळयाच काका मावश्यांच्या मुली सायकल शिकू लागल्यामुळे नाबर आजोबांचा विरोध मावळला.

पण,
किंतु,परंतु....

एक दिवस सायकलवर बसून बिल्डींगला चकरा चालू होत्या. परसातून फेरा सुरु करायचा,
पुढे अंगणातून गोल फिरून पुन्हा परसात जाऊन मैत्रिणींसमोर सायकल उभी करायची हा शिरस्ता. बिल्डींच्या एका बाजूला पिवळ्या चाफ्याचे सुंदर झाड आजही उभे आहे. फांद्या जमिनीला समांतर जाऊन थोड्या आभाळाकडे वळलेल्या. फेरा माझा सुरू झाला. अंगणातील वळण झालं आणि चाफ्याचं झाड समोर दिसू लागलं. आता नेमकी झाडाखाली कचरा काढणारी मावशी उभी! जागा निमुळती. डावीकडून ओवरटेक करण्याचे बेकायदेशीर तंत्र तोपर्यंत नव्हते अवगत झालेले!
"बाजू, बाजू! मावशीईईईईईई!
"ट्रिंग ट्रिंग"
आता हे वळतं जे तेव्हां नव्हतं
कळलं! बिचाऱ्या सायकलवाल्यांची ट्रिंग ट्रिंग कोणालाच नाही कधी ऐकू येत! मावशी मन लावून कचरा काढत होत्या. आणि अधिकाधिक पुढे पुढे करत होत्या...मग आता? आता काय? झाडापर्यंत पोचल्यावर सायकल सोडून देणे आणि चाफ्याला लटकणे एव्हढेच हातात होते. गोंधळ ऐकून सगळ्या जमल्या तेंव्हा त्यांना जमिनीवर लोळण घेतलेली सायकल आणि फांदीला लटकलेली मी हे दृश्य दिसलं! आणि काही दृश्य अमर बनतात! माझ्या समस्त मैत्रिणी परिवारामध्ये हे एक तसंच अजरामर झालेलं चित्र!

आणि माकडे? माकडांनी बघितले मुली सायकलवर बसून मिरवायला लागलेल्या आहेत. नजरेत दृश्य खुपू लागले. आणि मग एक दिवस...

पुन्हा फेरा माझाच होता. उजवीकडून निघाले. गती घेतली. आणि? आणि डावीकडून एक बांबू येऊन
खाडकन समोर आदळला! अगदी सायकल समोर! मग काय? काही कळायच्या आत पुढचे चाक बांबूवरून गडगडले...सायकलस्वार सायकलसकट भुईसपाट झाला...आणि हशा पिकला! डावीकडे वळून बघितलं तर त्या हशाचे मूळ बिल्डींगमधील सर्व मुले होती! नेम धरून बसलेल्या माकडांनी वेळ साधली होती. माकडं नाचताना कधी बघितलीयत का तुम्हीं? अगदी तस्सच दृश्य होतं ते! मग झाली सुरुवात. भांडण, तंटा, रडारड आणि अगदी हातघाईची मारामारी. अर्धा तासाची धुमश्चक्री. मोठ्यांना दंगा ऐकू गेला. तमजल्यावरच्या गुप्ते मावशी बाहेर आल्या.
"काय झालं?"
"मावशी, बघा ना!
दीपकने मुद्दामून माझ्या सायकलसमोर बांबू टाकला!" वादीने गुन्हा मोठ्या हिरीरीने जाहीर केला.
दीपक आणि टोळी, बेडर
उभी. जज्जसाहेबांना न्याय द्यायचा होता. त्यांनी साक्ष काढली. सर्व पुरावे गुन्हेगारांच्या विरोधात होते. वादीला खात्री होती. निकाल तिच्याच बाजूने लागणार होता आणि आज माकडांना चांगलाच धडा मिळणार होता!
"मावशी, हे बघा ना! लागलं मला!"
दोन्ही रक्ताळलेल्या गुढघ्यांचा पुरावा दाखवण्यात आला.
"आधी तू ऐक. भांडू नकोस."
"पण मावशी!"
"मावशी, ही ह्या बिल्डींगमध्ये रहात नाही! इथे येऊन का चालवते सायकल?" दीपक
तारस्वरात किंचाळला.
"पण मावशी, मला लागलंय बघा ना केव्हढं!"
कोर्टात भोकाड पसरून काही म्हणजे
काsssssही होत नाही!
मोठ्यांशी भांडत नाहीत. मोठ्यांचं ऐकतात. सायकल परत करायला आम्हीं दोघी निघालो तेंव्हा गुन्हेगार
उघड माथ्याने फिदीफिदी हसत दाराशीच उभे होते.

म्हणतात ना, अडथळा ही बऱ्याचदा लपूनछपून आलेली संधी असते. म्हणजे अगदी बागुलबोवा म्हणून घोंगडं पांघरून कोणी भिववावं आणि
घोंगडं भिरकावून आत डोकवावं तर आत जीवाभावाचं मैत्र असावं! बाबुकडून सायकल ढकलत आणण्याची गरज उरली नव्हती. आणि तिथून दोन मिनिटं चालून गेलात तर शिवाजी पार्क येतं. आणि सायकल वर बसून गेलात तर? अगदी १० वेळा पॅडल घुमवा कि आलंच आमचं मैदान! नाहीतरी शिक्षण संपलंच होतं. आता बाहेरच्या जगाची हवा घेण्याचीच वेळ आलेली होती! अहो, बिल्डींगची छोटी छोटी चक्कर कुठे आणि ही शिवाजी पार्कची दीड मैलाची सफर कुठे! आणि कधी चाकाला गती मिळालीच तर उजव्या हाताला वांदऱ्याचा कार्टर रोड आणि डाव्या हाताला वरळीचा समुद्र किनारा, काही फार लांब नाही हो!

थोडं गणित मात्र बेरजेचं झालं. म्हणजे कसं, एका भाड्याच्या सायकलीचे तासाला आठ आणे, तर दोन सायकलींचे किती? जर तासाला आठ आणे तर दहा मिनिटांचे किती?
आणि बावीस मिनिटांचे किती? ती पावकी आणि दिडकी हो! अजूनही कठीणच जाते!

इति धडपड नगरातील एकवीस दिवसांची सायकल कहाणी, तीन भागा सफल संपूर्ण...!!



18 comments:

सौरभ said...

मला वाटलं फुलॉन राडा होणार... लफडा एकदम... पण दीपक सुटला. हरकत नाही. आता तुमच्याकडे चारचाकी आहे ना. अब नय छोडनेका...

Soumitra said...

apratim lihile ahes very nostalgic keep writing

Deepak Parulekar said...

हे हे हे !! सही होती !! मजा आली !!

Anagha said...

सौरभ, दीपक सुटणारच होता! तो त्या बिल्डींग मधला होता ना! :)

Anagha said...

सौमित्र, धन्यवाद! मंडळ आभारी आहे! :)

Anagha said...

दीपक, आभार आभार! :)

Raindrop said...

:) aww chhottushi anagha ne kaay kaay prataap kele! i am so glad u gave that deepak one big phatka n ur piece of mind. would have loved to see u hanging to the tree though :)

little episodes of life...teaching us big lessons.

Anagha said...

hehe! वंदू, एकदम मारामारी केली मी!! :) मावशी ओरडल्या पण! :(

Shriraj said...

अनघा गोष्ट अफलातून झालेय...

ती झाडावर लटकलेली छोटीशी अनघा मला प्रत्यक्षात बघायला आवडली असती ;D

Anagha said...

hehe! हो न श्रीराज? अजून सगळ्याजणी जमलो कि त्या प्रसंगाची आठवण निघतेच आणि आम्हीं मग सगळ्याजणी खोखो हसत बसतो!!! :D

रोहन... said...

हाहा.... मला तू त्या चाफ्याच्या झाडावर लटकलेली दिसते आहे अजून... :D

Anagha said...

अरे व्वा! रोहन, सगळ्यांना तेच दिसतंय वाटतं! :)

THEPROPHET said...

काही दृश्य अजरामर असतात! हे अगदी खरं!
आक्षी खरं!
पण राड्यामध्ये सहसा मुलींच्या बाजूने निकाल लागतात..त्यात रक्तरंजित घटनाक्रम...पण ही काही वेगळीच सोसायटी (समाज ह्या अर्थाने) दिसते! :)
तुमची सजामिश्रित मजा वाचून आम्हाला मात्र लई मजा आली!

Anagha said...

विद्याधर! ते जरा इंडिया पाकिस्तानच झालं! आणि त्यात मला पाकिस्तान धरलं गेलं!! :( जाऊ दे! वाईटातून चांगलंच निघालं! और हमने भी ऐसाच नही छोडा! वयाला शोभेलसा माराझोडा! ;)

Gouri said...

चाफ्याच्या झाडावरची अनघा ... एमदम चित्र डोळ्यापुढे आलं :D

आम्ही मोठ्या भावांच्या सायकली ते घरात नसताना हळूच घेऊन जायचो - सायकल शिकायला ... चोरून नेली म्हणजे ती हमखास कुठेतरी पडायची आणि त्यांना समजायचं :)

Anagha said...

hehe!! गौरी, अशी मी एकदा नवऱ्याची मोडकी सायकल हट्ट करुन चालवायला घेतली आणि एकदम हॉस्पिटलच्या बेडवर जाऊन पोचले! :p

संकेत आपटे said...

तुम्ही सायकल सोडून फांदीला लटकलात हे दृश्य इमॅजिन करून मी हसतोय कधीचा. हाहाहा... तिथे उपस्थित असलेले लोक केवढे हसले असतील!

Anagha said...

संकेत, सगळयांबरोबर तू पण बसलास ना हसत?! :)