नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 31 October 2010

धुमश्चक्री

सातवीच्या उन्हाळी सुट्टीचा प्रथम दिवस.
झुंजूमुंजू व्हायला सुरुवात झाली होती. "रश्मीSSSSSSSS" पाचव्या मजल्यावर पोचेल अशी आरोळी मारली. दोन मिनिटांच्या अवधीत, पहिल्या मजल्यावरून गोरा गोबरा चेहेरा बाहेर आला. "थांब. आले." खरं तर ती आरोळी हा पहाटेचा रियाज होता. आणि घसा अजून मोकळा करायला आवडलंच असतं!
दोघी रस्त्याला लागलो तेव्हा नाक्यावरील दूध केंद्रावर बत्ती लागलेली होती. आणि बाटल्यांचा खळखळाट कानावर येत होता.
दोघींच्या दोन शेंड्या. एकीच्या नाकावर चष्मा. अंगावर गुढघ्याखाली येणारे झगे आणि पायात चपला. झपाझप चालत दोघी गडकरी चौकातील बाबू सायकल मार्ट समोर येऊन ठेपलो. किती ती घाई! पण हे काय? शटर अजून पडलेलंच! ठीक आहे. सख्ख्या मैत्रिणींच्या गप्पांना तोटा नाही! आणि बस्तान काय, फुटपाथवर बसू शकतं!
... अर्धा तास पसार झाला. शटर उघडलं. दोन डोकी आत डोकावली. बाहेरच्या उजेडातून नजर लगेच सरावली नाही. अंधारात नजर टाकावी तर सगळीकडे गोलगोल. उघड्या दारातून आता आत सूर्यप्रकाशाची तिरीप शिरली. डोळ्यांची उघडझाप केली. आता मात्र नजर सरावली. डोळ्यांसमोर इथे तिथे सायकली! छोटी मोठी! जमिनीवर. भिंतीवर! लाल, निळी, पिवळी, काळी! मान वर खाली, आजूबाजूला. गोंधळच आहे! आता कुठली घ्यायची? तितक्यात कोपऱ्यात काही हालचाल जाणवली. बघावं, तर एक छोटी लाल सायकल. तिने मान वेळावली. माझ्याकडे नजर लावली. का ती मला बोलवत होती?
"रश्मी, ती बघ!"
रश्मीची नजर दुसरीकडेच. कोणाकडे? पिवळी सायकल. काय तिला पिवळी सायकल बोलावत होती?
"अगं, ही पिवळी पण ठीक आहे गं."
"असं म्हणतेस? चालेल. चल तर मग. तू पिवळी घे. मी लाल घेते!"
"वो ले लो. लडकीयों का ही है."
म्हणजे काय आता? दोघींनी एकमेकींकडे बघितलं. डोक्यात काही प्रकाश पडला नाही. रश्मीने खांदे उडवले. निघायची खुण केली.
"कितना टाइम चाहिये?"
"हॅंडल चेक कर गं! म्हणे ते वाकडं असेल ना, तर पडू आपण!"
"वो सब ठीक है!"
"तुम पहले हवा भरो!"
"वो भरता हूँ. एक घंटेका पचास पैसा. एक घंटेसे जादा नही रखने का!"
"हाँ हाँ! नही रखेंगे!"
दोघींच्या खिशात पन्नास पन्नास पैसे. उशीर करून चालणारच नव्हतं. भराभर बाबूच्या वहीत आमची नावं नोंदवली. अवजड सायकली हातात उचलून पायऱ्यांवरून खाली उतरवल्या आणि घराच्या मार्गाला लागलो.
आयुष्यात पहिल्यांदाच हातात सायकल! चार चाकं आणि चार पाय. लाल पिवळी जोडगोळी हाताने ढकलत ढकलत निघालो. चालवण्याचा तर प्रश्नच नव्हता. सुट्टीत तेच तर शिकायचा निश्चय होता. आमच्या इमारतीला काही खाली सायकलचे प्रताप करण्यासारखी जागा नव्हती. म्हणजे सगळी भिस्त रश्मीच्या गृहनिर्माण संस्थेवर.
"देतील ना गं रश्मी आपल्याला सायकल चालवायला?"
"हो! त्यात काय?"
"तसं नाही गं. तुला देतील! पण मला देतील का?" तिच्या इमारतीमधील लोकांचा बाहेरील मुलांविरुद्ध आक्षेपाचे कडू अनुभव आतापर्यंत थोडे फार अनुभवले होते.
"बघू! चल तर!"
चौघीजणी घरापर्यंत पोचण्यातच दहा मिनिटे गेली! आता तर पुढची परीक्षा!

क्रमशः



20 comments:

सौरभ said...

धुमश्चक्री!!! असं होणार काय आहे पुढे??? उत्सुकता लागुन राहिली आहे...
waiting for the next part... :)

Anagha said...

सौरभ, आहे आहे 'धुमश्चक्री'च आहे! आशा आहे, उद्या टाकेन पुढील कहाणी! :)

रोहन... said...

ए अनघा.. आम्ही सुद्धा लहानपणी पहाटे ६ वाजता सायकली भाड्याने घेऊन फिरायला निघायचो. एकदा भारी जोरात पडलो होतो मी.. उजव्या मनगटावर अजून खूण आहे... :D

इतकी छोटी पोस्ट आणि त्यातपण क्रमश:... :P पटापट पूर्ण कर बघू... आज पुरेसे मटण नाही खाल्ले वाटते... :D

Raindrop said...

arey he kaay??? alashi kuthli...story poorna karta yet nahwti??? parat parat yayla lagel atta pudhe kaay zhala baghayala :)

Anagha said...

अरे रोहन, मला ना पोस्ट खूप लांबसडक व्हायला लागली ना की कसं तरीच होतं! आणि अजून आहे त्यात खूप कायकाय मालमसाला! म्हणून म्हटलं आज रात्री लिहीन उर्वरित भाग! :) आणि मटण ना, अरे ते उलट जास्ती झालं ना...म्हणून हे असं लिखाण कमी!! ;)

Anagha said...

वंदू. तीच तर आयडीयेची कल्पना आहे! ;)

शर्मिला said...

उशिरा सापडला हा ब्लॉग. खूपच छान, मनमोकळं लिहिलं आहेस.

BinaryBandya™ said...

लवकर येउद्या ...
अर्ध्यातच लटकावून ठेवले आम्हाला ..

Gouri said...

अनघा, ‘क्रमशः’चा निषेध! :D
लवकर लिही बघू पुढे काय झालं ते ... दोघा मैत्रिणींच्या धुमश्चक्रीविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.

Anagha said...

hehe!! गौरी, लिहिते गं आज रात्री बसून पुढचं!! काल रात्री खूप उशीर व्हायला लागला. आणि आज हापिस ना!!! आणि खूप लांबलचक लिहिलं असतं आणि मग तुम्हां सगळ्यांना माझी एव्हढी बडबड ऐकायला वेळ नसता मिळाला तर?! त्यापेक्षा हे बरं ना? :)

Anagha said...

शर्मिला, धन्यवाद गं! येत जा अशी अधूनमधून! :)

Anagha said...

बायनरी बंड्या! :P आज रात्री नक्की लिहिते!! :)

Deepak Parulekar said...

मी क्रमशः चा नीषेध नाही करणार !!
पण पुढचा भग लवकर टाक !
भाड्याने सायकल घेउन सायकल शिकण्याचे व्रण हातापायावर अजुनही आहेत !! तुझ्या पोस्टमुळे पुन्हा एकदा ते दिवस आठवले !!:)

Anagha said...

दीपक, चालू केलंय रे पुढच्या भागाचं लिखाण! लंच टाइम मध्ये तेच करतेय!! :D

Shriraj said...

:) सहीये...मला माझे जुने दिवस आठवले... मी आणि माझा मित्र, प्रशांत, आम्ही घ्यायचो भाड्याने सायकली :)

पुढच्या एपिसोडची वाट बघतोय :)

Anagha said...

श्रीराज, चालू आहे, चालू आहे....पुढच्या एपिसोडवर काम चालू आहे! :)

THEPROPHET said...

मस्त!
आता तर पुढची 'प्रतीक्षा' ! :D

Anagha said...

:D हुश्शाsssssर गं बाई विद्याधर! :)

संकेत आपटे said...

‘सब्र का फल मीठा होता है’ म्हणतात ते मला आता पटलं. बरेच लेख वाचल्यानंतर मला कळलेला हा पहिला लेख. छान हाय. मी आधी यातही काही गर्भितार्थ आहे का ते शोधत होतो. पण, थोडा वेळ विचार केल्यावर वाटलं, नसावा. :-)

Anagha said...

संकेत, बोडक्याचा गर्भित अर्थ! :)