नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 30 September 2010

बेस्ट सेलर

विविध विषयांतील शोध जगाला या शतकात लागतात आणि बऱ्याचदा ते आपल्या प्राचीन संत वाङमयात आढळून येतात. लोकसत्तात श्री. श्रीकांत नारायण रोज एक गोष्ट सांगतात. परवा त्यांनी संत एकनाथांची गोष्ट सांगितली.
ती अशी....
गावात एक खलप्रवृत्तीचा माणूस रहात होता. एकनाथ महाराजांना तो एक दिवस म्हणाला," तुमचे जीवन किती पवित्र व शुध्द. तुमचे कोणाशी भांडण नाही. तुम्हांला सर्वजण मान देतात. त्या उलट आमचे जीवन पहा. रोज कटकटी आणि रोज भांडणे!"
एकनाथ महाराज त्याला म्हणाले,"माझे राहू दे. परंतु मला तुझ्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट कळली आहे. ती म्हणजे आजपासून बरोब्बर सात दिवसांनी तू मरणार आहेस!" प्रत्यक्ष एकनाथ महाराजांनीच सांगितल्याकारणाने त्याचा त्यावर लगेच विश्वास बसला. तो धावतच घरी गेला व ही वाईट बातमी त्याने घरी सांगितली. त्यासरशी घरात रडारड सुरु झाली. त्या माणसाला काही चैन पडेना. प्रत्येक क्षणी त्याला त्याचे मरण दिसू लागले. परंतु थोड्याच वेळात त्याच्या लक्षात आले, आपल्या मृत्युला अजून सात दिवस बाकी आहेत. त्याने घरातील लोकांची रडारड थांबवली. आणि त्या सात दिवसात त्याने जास्तीत जास्त चांगले वागण्याचा प्रयत्न केला.
सातव्या दिवशी आज आपण मरणार म्हणून पहाटेच शुचिर्भूत होऊन तो महाराजांच्या दर्शनाला गेला. त्यांच्या पायावर डोके ठेवून तो म्हणाला," मी आता चाललो. तुमचे शेवटचे दर्शन घ्यावयास आलो आहे."
त्यावर एकनाथ महाराज म्हणाले," गेल्या सात दिवसात तू किती पापे केलीस?"
त्यासरशी तो म्हणाला," पापाचा विचार देखील माझ्या मनाला शिवला नाही. सारखे देवाचे स्मरण करत होतो. जास्तीत जास्त चांगले वागायचा मी प्रयत्न केला."
एकनाथ महाराज म्हणाले," मरणाची तुला सतत आठवण होत होती म्हणून तू असे वागलास. मरणाची कायम आठवण ठेवणे हाच पापापासून दूर जाण्याचा उत्तम मार्ग नव्हे काय?"

'Veronica decides to die ' हे पुस्तक लिहिण्यापूर्वी आमच्या एकनाथ महाराजांची ही कथा Paulo Coelho च्या वाचनात आली होती काय? आणि महाराजांना जीवनाचे हे तत्वज्ञान सामान्य जनतेला समजावून सांगताना, सेक्सची काडीचीही गरज पडलेली दिसत नाही!

अर्थात संत एकनाथ महाराज काही बेस्ट सेलर लिहित नव्हते!
:)

लता आणि बालपण

परवा लता मंगेशकरांचा ८१वा वाढदिवस झाला.
लहानपणी आईने लावलेल्या LP आणि EP ऐकत आम्ही मोठ्या झालो. कानाला खूप गोड वाटणारी गाणी आणि त्यांना लगडलेलं बालपण.
बाबा औरंगजेब. संगीताशी वैर. फक्त सैगल ह्या एकाच माणसाला गाता येत असं ह्यांचं कट्टर मत. आईने तिच्या तुटपुंज्या पगारात एक फिलिप्सचा रेकोर्ड प्लेयर आणला आणि त्याबरोबर २ फुट X २ फुटांचा विविध तबकड्यांनी, भारून टाकलेला डबा. मग महिन्यातून निदान एक दिवस तरी कधी तलत, कधी मदन मोहन, कधी लता, कधी आशा तर कधी सैगल घरी हजेरी लावू लागले. त्या सुरांवर आम्ही तिघी तरंगलो. स्त्री साम्राज्यापुढे औरंगजेबाचे काही चालले नाही. ते पुस्तकात डोके खुपसून डोळे उघडे आणि कान बंद ठेवण्याचे नवीन तंत्र शिकले!

आज त्या स्वरसम्राज्ञीचा तो स्वर्गीय आवाज ऐकावा आणि पुन्हा त्या बालपणात जाऊन पोचावं एव्हढीच इच्छा.

सादर आहे हिंदी आणि मराठी, मिश्र गाण्यांची छोटी EP...
आशा आहे, हा सूर तुम्हांला देखील तरंगवेल...

रसिक बलमा -


आयेगा आनेवाला -


नैना बरसे -


तुम ना जाने किस -


जिंदगी उसी की है-


बाई बाई, मन मोराचा कसा पिसारा फुलला -


प्रेमा, काय देऊ तुला -

Wednesday, 29 September 2010

वाटचाल

मध्ये एक विचार वाचनात आला.
स्वर्ग आणि पाताळ किंवा नरक असे काही नसतेच.
जे काही आहे ते आपल्या मनात आहे.
मनात स्वर्ग. आणि मनातच नरक.
प्रत्येक क्षण, प्रत्येक कृती....
एकेक पाऊल स्वर्गाकडे किंवा नरकाकडे.
त्वरित निर्णय...पाऊल कोठे?
आयुष्याच्या प्रवासात कधी एक पाऊल स्वर्गाकडे आणि पुढच्याच क्षणाला दोन पावले नरकाकडे.
तर कधीकधी खात्रीपूर्वक वाटतं...हा मार्ग स्वर्गाकडेच...
परंतु...दहा पावलं चालून गेलं कि लक्षात येतं की इथे तर न टाळता येणारा भुयारी मार्ग आहे...जो आता नक्की नरकाकडेच नेणार आहे.
म्हणजे होकायंत्र हवं.
दूरदृष्टी हवी.
एक पाऊल....
आणि बेरीज वजाबाकी...
स्वर्ग-नरकाच्या वाटचालीची.

Tuesday, 28 September 2010

प्राजक्ती स्वप्न

झाले काही दिवस.....
मी माझी स्वप्नं खुडायला घेतली.
एका दिवशी एक स्वप्न.
एकेक खुडावे....
कचराकुंडीत टाकावे.
पण काल गंमत झाली...
पहाटे पहाटे जाग आली.
आसमंत भरलेला...
घमघमाट सुटलेला...
अंगणातील कचराकुंडी....
झाडाने बहरली...
तेव्हढ्यात एक झुळूक आली....
फांदी न फांदी नाचली...
तिच्या अंगावर काटा आला...
सुळकन खाली सडा पडला.
लालबुंद माती...
पांढरी झाली.

माझ्याच स्वप्नांची तर ती फुलं होती...
उजाडताच सगळी मातीमोल झाली!

Monday, 27 September 2010

तिकोना!


कधी 'तिढा' अनुभवला...
तर कधी बॉलीवूडच्या कृपेने प्रेमाचे विविध 'त्रिकोण' बघितले. पण हे असं तीन दिशांना तीन तोंडं करून उभं असलेलं 'त्रांगडं' नव्हतं बघितलं!

'तिकोना'. पुण्यापासून ६० किलोमीटरवर. कामशेत जवळ. ३५०० फुट उंच. जवळजवळ १२०० फुट उभा चढ. नेहेमी गड चढणाऱ्या आपल्या मावळ्यांना आणि झाशीच्या राण्यांसाठी हा तीन कोन असलेला 'तिकोना' म्हणजे किस झाड कि पत्ती! नवख्यांसाठी मात्र चढायला कठीण.

आजूबाजूला वेगवेगळ्या विजयगाथा ऐकून नेहेमीच वाटत आलेलं.... 'शारीरिक बळापेक्षा मानसिक बळ वरचढ असतं'. काल दिवसाभरात गड काबीज करून संध्याकाळी गडाच्या पायथ्याशी उभं राहिल्यावर ह्यालाच पुष्टी मिळाली. बारा महिने चोवीस तास कम्पुटरवर इमाने इतबारे प्रेम केल्याची परतफेड पाठदुखीने केलेली. त्याचा विसर पडावा अशी ही फत्ते मोहीम! चोवीस शिपायांच्या हसण्यात आणि एकमेकांना जोम देण्याच्या उत्साहात गड चढलो कधी आणि उतरलो कधी... नाही कळलं.

निसर्गराजा महाराष्ट्रावर खुष आहेच. अजून पाऊस रेंगाळतो आहे. निसर्ग बिनधास्त लवंडला आहे. मग आता काय करावं? तो बिनधास्त तर आपण टेचात! जाडजूड कुंचला घ्यावा. मनसोक्त फराटे ओढावे. फराटे मारताक्षणी खाली कागद रूप घ्यावा. नाही तर हे दृष्ट लागेलसं पैस रूप कागदात माववायचं कसं? कागद छोटा नको पडायला. आधी निळा रंग भरावा आणि त्यावर पांढरा रंग बेधडक फिरवावा. मग पोपटी रंग घ्यावा आणि जमीन भरून टाकावी. ओला लुसलुशीत हिरवा रंग कधी उभा मारावा तर कधी आडवा. त्यावर पिवळे ठिबके तर कधी गुलाबी शिंतोडे. झाली की हजारो, लाखो रसरशीत निसर्ग चित्रे!

ईजिप्तमधील मानवनिर्मित पिरॅमिडना मान खाली घालायला लावेल असा हा निसर्गनिर्मित 'तिकोना'. कित्येक वर्ष ताठ मानेने खंबीर उभा. तीन कोनांना भेदणाऱ्या निमुळत्या पायऱ्या. शेवाळलेल्या भिंती. पाण्याने भरलेले दगडी हौद. मधूनच कानी येणारा पाण्याचा नाद. खोल खोल दरी. एखादं चुकीचं पाऊल आणि सोक्षमोक्ष. माथ्यावर नंदीबैलाचे प्रथम दर्शन. त्याच्या पुढ्यात शंकर. तळाशी मंदिरांची डोकावणारी कळसे. एखादा ओढा तर एखादा जलाशय. पवना नदी आळसावलेली. सुस्त पसरलेली एक पाउलवाट. कौलारू घरे. सौंदर्याचे भरभरून वाटप. निसर्गाचा हात ना आखडता ना थोटका.

मावळे आणि हिरकण्या पटापट चढल्या आणि पटापट उतरल्या. आम्ही त्यांच्या मागोमाग. सेनापती रोहनच्या आदेशांची तात्काळ अंमलबजावणी. किंचितसाही कचरा करायचा नाही हा आदेश तर सर्वच मावळ्यांनी मनापासून पाळला. जरासाही मागमूस मागे न ठेवता सेना दुपारनंतर पसार.

रोहन, शमिका, अनुजा, भाग्यश्री आणि वीस शिलेदार...मानाचा मुजरा!
आत्मविश्वास द्विगुणित केलात.
मनापासून आभार!
:)



















Friday, 24 September 2010

हम नही सुधरेंगे!

"कधी शिकणार तू तुझ्या चुकांपासून?"
"मागच्यावेळचा अनुभव विसरलीस वाटतं? "
"This is the second time you are making this mistake!"

किती वेळा ऐकलंय हे? वडिलधाऱ्यांकडून? वरिष्ठांकडून?
आणि आपण किती वेळा हे दुसऱ्यांना ऐकवलंय?

पण आता आपलं हे असं का होतं त्याचं उत्तर मिळालंय! अमेरिकेत! मॅसाच्युसिटस (मला आशा आहे की ह्या क्लिष्ट शब्दाचा उच्चार बरोबर लिहिला गेला आहे!) मधील एका संस्थेत. त्यांनी मेंदूवरील केलेल्या शोधामध्ये त्यांना सापडलंय की आपला मेंदू आपले यशच फक्त लक्षात ठेवतो. चुका नाही. अपयश मेंदूमध्ये खूप कमी प्रमाणात किंवा बऱ्याचदा शून्य बदल घडवून आणतं. मात्र यश मेंदूत चांगलेच बदल घडवतं!

म्हणतात ना उगाच वाईट लक्षात ठेऊ नये! आणि आता जर आपला मेंदू लक्षातच ठेवत नाहीये...तोच मुळी स्वतःत बदल घडवून आणायला तयार नाहीये तर मग आपण कसे काय आपल्या चुकांमधून शिकणार? थोडक्यात काय, तर मग आपण कसे बदलणार?

नाही का?
काय वाटतं तुम्हांला?
(अर्थात एकूणच जगभर लोकं फारच अभ्यास करतात. किंवा साध्या साध्या गोष्टींचा फारच कीस काढतात, ही बाब अलाहिदा!)
:)

Thursday, 23 September 2010

मी काय करीन?

काल एक पुस्तक वाचून संपवलं.
'Paulo Coelho चं 'Veronika decides to die'.
माणसे कायम आपल्याला कधीतरी कोणीतरी दिलेला 'आयुष्यमान भव' हा आशीर्वाद अगदी खराच होणार आहे ह्या भ्रमात दिवस काढत असतात. परंतु समजा मला कळलं की मी फक्त पुढचा एकच आठवडा जगणार आहे...तर काय मी अशीच जगेन?

एकदोन वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राने हा असा प्रश्न मला घातला होता...फक्त त्याने मला जगण्यासाठी अगदी एकच आठवडा नाही तर एक महिना दिला होता. "जर तुला सांगितलं की तू एकच महिना जगणार आहेस, तर काय तू आज जे करत आहेस तेच करशील? की तुला ह्या पठडीतून बाहेर यावंसं वाटेल आणि काही वेगळं जगावसं वाटेल?" मी अगदी मला जितका झेपेल तितका खोल विचार केला. "नाही रे, मी हेच करेन बहुधा. सकाळी उठेन. लेकीचा डबा तयार करेन. तिला उठवेन आणि तिला टाटा बाय बाय अगदी ओरडून करेन. आणि नीट जा ग. आणि लवकर घरी ये, हेच बोलेन."
"फुकट आहे तुझं आयुष्य!"

माझं आयुष्य फक्त चाळीस वर्षांचं आहे असं सतत म्हणणारी आणि आपल्या शब्दाला जागून चाळीस नाही तरी पन्नास वर्ष पूर्ण करून निरोप घेणारी माणसे देखील बघितली. पण मग ती मिळालेली पन्नास वर्ष विचारपूर्वक वापरली गेली का हे ज्याचं त्यालाच माहित.

कित्येक सैनिक जीवाची तमा न बाळगता माझ्या देशाचं रक्षण करतात. त्यांना कोणी सांगितलं,"आता फक्त पुढचा एकच आठवडा"....तर?
रोज लाखो रुपये खाऊन आमचे पुढारी सात पिढ्या खातील असे वैभव उभे करतात....त्यांना विचारलं..."आता फक्त पुढचा एकच आठवडा"....तर?
तिथे जगातील अतिश्रीमंत यादीत नाव असलेला बिल गेट जाहीर करतो की त्याने जमवलेले वैभव तो आपल्या वारसांसाठी सोडून नाही जाऊ इच्छित...तेव्हा तो स्वतःला हेच रोज बजावीत असतो काय?...पुढचा फक्त एकच आठवडा.

प्रत्येक क्षण हा पुढच्या क्षणाला इतिहासात जमा होतो.
जर ह्यापुढे प्रत्येकाला त्याचे आयुष्य किती आहे ह्या आकड्याची जाणीव फक्त 'त्याला' करून दिली तर काही फरक पडेल?

"चल, दिले तुला सात दिवस.
बघू काय दिवे लावतोस.
माझा गळ तयार आहे.
टाकायला सात दिवसांचा अवधी आहे."

माश्याला नाही का पाण्यात पडलेला गळ तर दिसतो.
मग काय तो सर्वांचा निरोप घेतो?
इतिहासात जमा होता होता...
काय तो मनाशी विचार करतो?
मी मेलो तरी चालेल...
निदान मी कोणाचं पोट तरी भरेन!

"अरे चल यमराजा,
वाजवलीस ना वॉर्निग बेल?
आजपर्यंत आत्मा होता...
पण आता शरीर अमर करीन!
आयुष्यात दुसरं काही नाही केलं...
...पण देहदान मी नक्कीच करीन!"

Tuesday, 21 September 2010

रंग...माझा...तुझा

कॉलेजमध्ये, मला वाटतं, तिसऱ्या वर्षी आम्ही रंगांचा अभ्यास केला.
काळा, पांढरा, प्रायमरी, सेकंडरी, टर्षरी, 'हाय' की (high key), 'लो' की (low key)....
लाल, निळा आणि पिवळा हे प्रायमरी रंग.
लाल+निळा = जांभळा, लाल+पिवळा = केशरी, निळा + पिवळा = हिरवा हे सेकंडरी रंग.
आणि एक प्रायमरी + एक सेकंडरी = एक टर्षरी.
एकाच प्रकारची चित्रं आम्ही ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांमध्ये रंगवली. म्हणजे जर एखादा चेहेरा घेतला तर तोच चेहेरा प्रायमरी रंगात, तोच चेहेरा सेकंडरी रंगात आणि तोच टर्षरी रंगात.

ही थियरी आज मला का आठवली?
काल 'बाबा'ची भिंत ह्या ब्लॉगवर एका चर्चेत भाग घेतला....तेंव्हा हे डोक्यात आले...

महाभारतात मनुष्य स्वभावाच्या अनेक छटा दिसतात. अगदी कृष्णाच्या स्वभावात देखील ह्या रंगांची मिसळ दिसते. मानसशास्त्रातील व्याख्यांना उत्तम उदाहरणे इथे मांडलेली सापडतात. येथील सगळी व्यक्तिचित्रे आपल्यासमोर माणसे म्हणून जिवंत होतात. ती कधी चुकतात तर कधी बरोबर असतात. युद्धात क्षम्य म्हणून कृष्णाच्या सर्व लबाड्या आपल्याला मान्य. आणि भावाभावांमध्ये भांडणे होऊ नयेत म्हणून पाची भावांना एक पत्नी दिलेली आपल्याला मान्य. दुर्गा भागवतांनी त्यांच्या 'व्यासपर्व' पुस्तकात ह्या व्यक्तिमत्वांचा सुरेख अभ्यास मांडला आहे.

परंतु रामायण देवदानवांचे आहे. माणसांचे नाही. त्यामुळे देवांना देवासारखे वागणे भाग आहे. रामाचा जन्मच मुळी सर्व देवांवर विजय मिळवणाऱ्या रावणाचा वध करण्यासाठी झालेला होता. मग बाकी कथा त्या कार्याला मदत व्हावी अशी पुढे सरकते. काळा आणि पांढरा हे दोनच रंग इथे दिसतात. आणि त्यातही पांढऱ्या रंगाचा इथे अतिरेक दिसून येतो. राम आणि सीता पूर्ण पांढरे, रावण पूर्ण काळा. पांढऱ्या शुभ्र सीतेला, किंचितसा झालेला काळ्या रंगाचा स्पर्श, एका धोब्याच्या मते, तिला करडी छटा देऊन गेला. रामाला मग तिचा त्याग केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण राम हा पांढराच असू शकतो. येथे मनुष्याच्या करड्या रंगछटा मान्य नाहीत. सापडत नाहीत.

आणि मग महाभारत अधिक गुंतागुतीचे आणि अधिक 'इंटरेस्टिंग' होऊन जाते. बॉलीवूडच्या अनेक कलाकृतींचे मूळ महाभारतात सापडते. सगळा मालमसाला उपलब्ध.

आज आपलाच चेहेरा कोणत्या रंगसंगतीत आपण रंगवतोय हे स्वतःला तरी कळते का? आणि आपल्या जवळच्या माणसाचे चेहेरे नेहेमीच आपल्याला एकाच रंगात का आवडतात? ते सुद्धा पांढऱ्याच?
त्यांना का नाही वेगवेगळ्या रंगांचे स्वातंत्र्य? कधी साधे सरळ 'प्रायमरी', तर कधी थोडे मजेशीर 'सेकंडरी', कधी गुंतागुंतीचे 'टर्षरी...
कधी 'हाय' की, तर कधी 'लो' की....

लहान तोंडी मोठा घास घेतलाय का?

Monday, 20 September 2010

आभार...

परकं शहर, हॉटेलचा नववा मजला, खोलीतील काचेची बंद खिडकी आणि भर दुपार. एक स्तब्धता त्या वेळेला होती. एखाद्या नीरस भिंतीवर लटकलेले चित्र जसे. स्थिर, अचल. श्वास घेताना देखील त्या क्षणाची, तंद्री मोडण्याचे भय. नजरेसमोर उजव्या हाताला न संपणारी पिवळट चकचकीत भिंत. त्या भिंतीपलीकडून उरलेल्या चौकटीत डावीकडे वर बघावे, तर स्टार्च केलेली नवीकोरी चादर पसरावी असे निळे आकाश. त्यात घुसलेल्या, जमिनीशी कधीच नाते तोडलेल्या उंच आणि टंच इमारती. खाली नजर टाकावी तर न हलता रस्ता. सगळेच वातावरण गंभीर. श्वास मंदावला. पापण्या अडकल्या. सगळं रितं. हृदय मात्र भरलेलं.

कुठेतरी हलकीच हालचाल जाणवली. भय दाटलं. कळेना कोण हललं? कोण होतं ते? मानही न हलवता फक्त नजर हलवली. काही दृष्टीक्षेपात नव्हते. ना खिडकीला पडदे. वातानुकूलित खोलीत ना पंखा. मग? मान वर केली. आकाशात नजर टाकली. हो. तिथेच तर हालचाल होती. हलकी. जाणवेल न जाणवेल अशी. खिडकीच्या डाव्या विंगेतून कोणी चोर पावलाने तिथे दाखल होत होते. पांढरेशुभ्र. ती परी का होती? पांढऱ्या कपड्यात, त्या निळ्या मंचावर दाखल झाली होती? नाजूक पंख असलेली? एकटी? नाही. ती एकटी नव्हती. मागोमाग तिच्या हळूहळू एकेक दाखल झाले. तसेच पांढरे. त्यांच्या एकुलत्या एका प्रेक्षकाकडे बघत. पायाच्या टाचेवर. बॅले. सर्वप्रथम आलेली परी होती त्यांची नायिका. आणि ते होते तिचे राखणदार. तिचा लांबच लांब पसरत जाणारा झगा हातात उचलून तिच्या पाठी येणारे तिचे बुटके. स्नो व्हाईट आणि सात बुटके. कसलीच घाई नाही. कोणाचीच लगबग नाही. नाट्य संपवायची कोणालाच घाई नाही. त्यांचा रंगमंच मोजून दोन वार. डाव्या विंगेतून प्रवेश करावा आणि भिरभिरत, नृत्य करत उजव्या विंगेतून नाहीसे व्हावे. कधी ती स्नो व्हाईट तर कधी सिंड्रेला. हा इवलासा प्रवेश. परंतु त्यात किती संगीत? किती नाट्य? काय ती नजाकत? अहाहा!

अचानक जमिनीवर हालचाल झाली. नजर खाली टाकली. एक लालचुटुक गाडी सुळकन निघून गेली. मान उंचावली. मंच रिकामा होता. ते ढग त्या भिंतीमागे नाहीसे झाले होते. निळा पडदा पुन्हा स्थिर होता.

नाही माहित नाट्य किती क्षणांचं होतं. नाही माहित किती काळ श्वास रोधला होता. पण जेंव्हा ते नाट्य संपले तेंव्हा त्या जीवघेण्या स्तबद्धतेतील भय पळाले होते. हसू आलं. लक्षात आलं. त्या ढगांच्या प्रवेशासाठीच तर ती गूढ शांतता पाळली गेली होती. त्या पूर्व शांततेशिवाय त्या अतिसुंदर नृत्यात काय आनंद? न्यू यॉर्क शहरात 'लायन किंग' ब्रॉडवे पहाण्याचा योग आला होता. त्याची आठवण झाली. अप्सरा, किन्नर, गंधर्व अवतरले होते. किंवा तो त्यांचा रोजचा दिवस होता....आम्ही तिथे पोहोचलो होतो. रंगमंच मोठा. प्रेक्षकवर्ग प्रचंड. तिथे जमलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला अंगावर रोमांच उमटवण्याचा अनुभव, एकत्र देण्याची किमया काही अगाध. इथे चिमुकला रंगमंच. प्रेक्षक फक्त मी. अनुभव मात्र तोच. अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी.

रिकाम्या आकाशात मी पुन्हा बघितले.

मला कळले. त्याला माझे एकटेपण जाणवले होते. मनात दाटून आलेले भय, त्याला दुरून जाणवले. त्याने मला एकटे नाही टाकले. ढगांना धाडलं. माझ्यासाठी. ते ढग तो अलौकिक खेळ, काही क्षणांत करून गेले.
मन भरून आलं. डोळ्यांत अश्रू आले.

आभार. देवा, तुझे शतशः आभार.

Saturday, 18 September 2010

'दशा' अवतार

तिचं भलं होणार तरी कसं?
इतक्या वेणा...
इतकी पोरं...
एकेक यातना...
कित्येक खुणा.
हिचं भलं होणार तरी कसं?

पोरांना पडली नाय.
ओरबाडणे ह्यांचे संपत नाय.
आता खरं झेपत नाय...
हौस हिची संपत नाय.
मनोमन विचार करते...
पुढचा 'कल्की'च, खात्री बाळगते.
भलं हिचं होणार तरी कसं?

निपुत्रिकच झाली असती...
निदान जास्ती जगली असती.
उगाच पोरं काढत राहिली...
कसला कृष्ण...
कसला राम...
एकेक पोर...
लचके तोडतं...
एकेक घोट हिचं रक्त पीतं...
पोरांना हिच्या...
भस्म्यारोगच हाय...
मग सांगा आता...
हिचं भलं होणार तरी कसं?

आता म्हणतात...
खूपच भडकलेय...
म्हणे आता खूप तापलेय.
पण सांगा उपयोग काय?
वेळ तर उलटून गेली...
विनाश तर व्हायचा हाय...
पोरांची पोर...
नातवंड...
फारफार तर पतवंड...
चारपाच पिढ्या...
एक दोन युगं....

रात्री खिन्न शांततेत...
कधी नीट तुम्ही ऐकलंय काय?
तिची घरघर...
तिचं हसू....
पुटपुट तिची नीट ऐका...
कधीतरी तिच्या जवळ बसा...
माज थोडा कमी करा..
मान थोडी खाली वाकवा...
कान जरा भूईला लावा...
काय बोलते माय एकदा तरी ऐका...
'कल्की' येणार हाय...
माझा 'कल्की'च येणार हाय...
तोच मला वाचिवणार हाय...

वेडी ही माय...

Friday, 17 September 2010

मनोरंजन

बुद्धिबळाचा डाव आज पुन्हा मांडला जाईल.
राजा राणी पुन्हा खेळतील.
पुन्हा प्यादी उचलली जातील.
चाल कोणती...
कुठली चौकट...
महालातील खाजगी निर्णय.
कॉर्पोरेट जगातील हा खेळ.
मिळालेली चौकट लढवणे, प्याद्यांचे काम.
उचलाउचल प्याद्यांची..
राजाराणीचा विरंगुळा...
...राजाराणीचे मनोरंजन!

Thursday, 16 September 2010

चिऊताई...

पंजाबात एक माणूस चिमण्यांसाठी घरटी बनवतो.
अवकाशातील मोबाईलच्या अति वावराने चिमणे जीव जातायत त्यांना वाचवण्यासाठी.
रोज कामावरून घरी आले की कार्डबोर्डची घरे तयार करतात. आणि विकतात.

जंगलांवर अतिक्रमण.
अवकाशात घुसखोरी.
सगळ्यावर आपले मालकी हक्क.

लहानपणी शिकतो एक साखरेचा दाणा देखील वाटून घ्यावा.
आम्ही पृथ्वी वाटून खातो.

पूर्वी खिडकीच्या गजागजांवर नाचणाऱ्या चिमण्या, गेल्या महिन्यात हाँगकाँगमध्ये डिझ्नी लँडच्या जमिनीवर उड्या मारताना दिसल्या.
वेगळ्या नव्हत्या. आपल्याच वाटल्या.
एक घास चिऊचा. एक घास काऊचा.
गोबऱ्या गुबऱ्या चिमण्या डोळ्यांच्या मुलांबरोबर चाललेला चिमणा नाच.
स्वप्नवत परीकथेतील दुनियेत चिऊताई नाचत होती.
जलपरीबरोबर. जीनीबरोबर.

एक घरटं माझ्या दारी...
येशील का ग तू परतुनी?





बोडकं माझं! :)

Tuesday, 14 September 2010

....हुकूमावरून

आज सकाळी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली.
एका अडतीस वर्षाच्या विधवा बाईला 'ऑन लाईन गेम्स' खेळण्याबद्दल शिक्षा झाली!
का विचारताय?
बाईसाहेब दिवसाचे चोवीस तास फक्त कम्प्यूटरवर खेळत असायच्या. त्यांना त्याचे इतके व्यसन लागले की घरातील त्यांची दोन लहान मुले आणि दोन कुत्रे ह्यांचा त्यांना विसर पडला.
महिनोंमहिने हे चारही जीव फक्त बंद डब्यातील अन्नावर जगत होते. घर अतिशय वाईट अवस्थेत होते. शेजाऱ्यांच्या लक्षात आले. बाईंवर केस फाईल झाली. आणि आता कोर्टाने बाईंना खेळायला मनाई केलेली आहे! त्यांना मन रिझवायची गरज वाटलीच तर त्या आपल्या दोन जिवंत छकुल्यांशी खेळू शकतात. किंवा आपल्या कुत्र्यांबरोबर त्या आपला वेळ घालवू शकतात.

व्यसन वाईट.
आणि ते कोणाला कसले लागेल, सांगता येत नाही.
जसे ह्या बाईंना ऑन लाईन गेम्स खेळायचे व्यसन लागले, तसेच आमच्या पुढाऱ्यांना राजकारण खेळण्याचे व्यसन लागले आहे.

तिथे एका आईला मुलांवर प्रेम करण्याचे आदेश दिले गेले.
मग इथे आमच्या पुढाऱ्यांना देशावर प्रेम करण्याचे आदेश द्यायला हवेत काय?

आणि ह्या आदेशांनी प्रेम होईल काय?

बाटली

Monday, 13 September 2010

मराठी मायबोलीचा प्रवास

जवळजवळ सात आठ वर्षांपूर्वीची गोष्ट.
नवी नोकरी होती.
एका शॅम्पूसाठी फिल्म करायची होती. ३० सेकंदांची. हातात त्याची ब्रीफ होती. स्क्रिप्ट सुचली. लिहून टाकली. बॉस बाईला मेल केली. पुढच्या दहाव्या मिनिटाला बाई माझ्या टेबलापाशी हजर.

"Who wrote that script?"
"I wrote. Why? What happened? Not good?"
"It's very nice! I thought you are an art person! So...."
हसले. "In fact that's the reason I can write my own scripts! Because I can see them! In pictures!"
"Ya. That's very good! I am going to tell this to our creative head!"

स्मितहास्य. तेव्हढंच केलं मी.

परवा दुसऱ्या एका वरिष्ठाने जेंव्हा म्हटले,"I always like to read your scripts. They are nice."
हे ऐकलं आणि ती आठ वर्ष जुनी गोष्ट आठवली.

एखादी छानशी स्क्रिप्ट लिहिण्याचा अनुभव नेहेमीच आगळा.
अर्थात एखाद्या स्क्रिप्टचा प्रवास खरोखरीच्या फिल्म (TVc) पर्यंत जेव्हां होतो तो आनंद नक्कीच वेगळा. जशी दुधात साखर!

बालमोहन विद्यामंदिरच्या मराठी शिशुवर्गापासून, आंतरराष्ट्रीय जाहिरात क्षेत्रातील इंग्रजीपर्यंतचा माझा मराठमोळा creative प्रवास चांगलाच झाला म्हणायचा.

Sunday, 12 September 2010

चंद्रदर्शन

ऑफिसला तीन दिवस लागून सुट्टी. ईद, गणेश चतुर्थी आणि रविवार. ईदची सुट्टी डोक्यावरच्या कामाच्या वाढलेल्या ओझ्याने खाल्ली, ती बाब निराळी. शनिवारी बाहेरून जेवण मागवायला गेलो तर,"मॅडम, तास दीड तास लागेल."
"का बरं?"
"आज हमारी ईद है ना!"
"आज ईद है? अरे भाई, ईद आज नही है! आज तो गणेश चतुर्थी है!"
"नही मॅडम! आज ईद है!"
"तो फिर हमने कल छुट्टी किसकी ली?"
"वो हमें मालूम नहीं! पर हमारी ईद आज है!"
"अच्छा, अच्छा ठीक है! ईद मुबारक!"
"ईद मुबारक!"
गडबड आहे! गणेश चतुर्थीच्या दिवशी जो चंद्राकडे बघतो, त्याच्यावर चोरीचा आळ येतो ना? मला हे कळल्यापासून किती गणेश चतुर्थ्या मी चंद्रोदयानंतर खाली मान घालून घालवल्या! हो की नाही? मग आता हे आपले मुसलमान बांधव न घाबरता नेमके आजच्याच दिवशी, माना ताणून चंद्राकडे बघणार! त्यांच्यावर चोरीचा आळ नाही का येणार?
"बाबर, ईद मुबारक."
"Thank you!"
"बाबर, तू ना आज चाँद की तरफ देखना नहीं! निघत को और बच्चों को भी बोल दे!"
"क्या?! अरे तो खाना कैसे खाएंगे हम?"
"अरे, आज गणेश चतुर्थी है! और आज के दिन कोई चाँद को देखता है ना तो उसके उपर चोरी का इल्जाम आता है!"
"अनघा! तू भी ना!"
बाबर खो खो हसत सुटला! गणपतीला तर मानतो!

ऐकलं नसेलच माझं आमच्या दुबईतल्या, जिवाभावाच्या पाकिस्तानी मित्राने!
;)

Saturday, 11 September 2010

शिस्त

त्या दिवशी दुर्गा आजी दुपारी जेवायला आल्या होत्या. आईने त्यांच्यासाठी शुध्द शाकाहारी स्वयंपाक केला होता. शयनगृहातील दुमडता येणाऱ्या जेवणाच्या टेबलावर सगळे जेवायला बसले होते. माझं जेवण लवकर आटपलं. मी समोरच्या पलंगावर बाबांच्या आणि दुर्गा आजींच्या गप्पा ऐकत बसले. बसता यायला लागल्यापासून हा माझा एक उद्योगच होता. बाबा, त्यांची मित्रमंडळी आणि त्यातील ओ की ठो न समजणारी मी. दहाव्या मिनिटाला बाबांच्या कुशीत मस्त गाढ झोप लागत असे. दुर्गा आजी मात्र अगदी आईशी, आमच्याशी सुद्धा छान गप्पा मारत असत. कधी आईने केलेल्या एखाद्या पदार्थाची पाकक्रिया वा कधी त्यांनी खाल्लेल्या एखाद्या रुचकर पदार्थाची क्रिया! तर कधी दोन दिवसांपूर्वीच होऊन गेलेल्या पौर्णिमेच्या चंद्राचे सुरेख वर्णन. विषयाला कमतरता नव्हती. त्या रंगलेल्या गप्पांत श्रवणभूमिका बजावत मी पलंगावर बस्तान मांडलं होतं. १३-१४ वय वर्ष असावं. थोड्याच वेळात बाबा काहीतरी कारणावरून माझ्यावर नाराज झालेले आहेत हे मला जाणवलं. पण मी तर काहीच बोलत नव्हते. नुसतीच तर समोर बसले होते. दुर्गा आजींचं जेवण होईस्तोवर बाबांची नाराजगी वाढली. पण मला मात्र काहीही कळले नाही.
जेवणे आटपली. आईबाबांनी मिळून केलेल्या फ्रुट सॅलेडचा आस्वाद घेऊन झाला. आणि दुर्गा आजी घरी गेल्या.

"तुला साधं कळत नाही का गं? किती वेळा मी सांगायचा प्रयत्न केला."
"पण मी काय केलं बाबा?"
"तुझं जेवण झालं. विचारून उठलीस, पलंगावर जाऊन बसलीस. इथपर्यंत ठीक होतं. पण तुला एव्हढं साधं देखील कळत नाही...तुझ्या समोर माणसं बसली आहेत आणि तू त्यांच्यासमोर पाय पसरून बसलीस? त्यांच्या जेवणाकडे, त्यांच्याकडे तुझे पाय? हा अन्नदेवतेचा आणि त्या माणसांचा अपमान नव्हे काय?"

आत्ता कुठे प्रकाश पडला. चुकलं खरं. बाबांचं ओरडणं मी माननीय दुर्गाबाई भागवतांकडे पाय करून बसले म्हणून नव्हतं. एकूणच माझं चुकलं होतं. आईची आई मी पाच वर्षांची असतानाच गेली आणि बाबांची आई बाबा लहान असतानाच गेलेली होती. घरात 'आजी' म्हणून हाक मारता येऊ शकणाऱ्या अश्या एकच. त्या बाबांना पुत्र मानत असत. म्हणून त्या आमच्या दुर्गा आजी.

दुर्गा आजींच्या नकळत, परंतु त्यांच्याशीच निगडीत अशी, माझ्या मनावर पूर्ण बिंबलेली ही एक शिस्तीची गोष्ट.

पत्ते

लहानपणी पत्ते खूप खेळलो. उन्हाळ्याच्या सुट्टीत एकामागोमाग एक डाव रंगत जायचे.
भान ना वेळेचे. भान ना भुकेचे.
गाढवपिशी, गणिती झब्बू, not -at -home, बदाम सात, मेंढी कोट, सात-आठ, पाच तीन दोन, ३०४, कनाष्टा...
त्या खेळांत एक 'जोड्या जुळवा' असा देखील खेळ होता.
ज्याच्या जोड्या लवकर जुळतील तो लवकर सुटेल.
आणि ज्याला हे जोड्या जुळवण्याचे प्रकरण नाही जमणार...तो डाव हरेल.
आज प्रकर्षाने त्या खेळाची आठवण झाली.
जोड्या...
आईत मैत्रीण शोधू नये.
नवऱ्यात मित्र शोधू नये.
मित्रात प्रियकर शोधू नये.
लेकात मित्र शोधू नये.
लेकीत मैत्रीण शोधू नये.
खरं तर मैत्रीच शोधू नये.
उगाच रानोमाळ फिरू नये.
जोड्या चुकतात.
डाव हरतो.
हरलेल्या प्रत्येक डावाबरोबर आत्मविश्वास हरतो.

बाबा बरोबर सांगत होते...
चांगल्या घरच्या मुलींनी पत्तेच खेळू नयेत.

Friday, 10 September 2010

जखम

काल रात्री झोपताना,
एक म्हातारी बजबजलेली जखम कापून काढली.
खिडकी बाहेर भिरकावून दिली.

पहाटे डोळे उघडले.
त्या क्षणी ती येऊन पुन्हा चिकटली.
घोण जशी.
रक्त शोषत.
नाही सोडणार ही.
मरेस्तोवर.
अधिकच चिघळणार.
पसरतच जाणार.
विष जसं.

मग मरणाचं निदान काय होईल?
विषबाधा?
की एक चिघळलेली जखम?

Tuesday, 7 September 2010

माणुसकी...

माणुसकी.
एक हरवलेली 'की'.
आत्ता आत्ता होती.
कशी निसटली?
कधी हरवली?
खोल दरीत जाऊन पडली.
खोल दरी,
खोल समुद्र.
बघता बघता झाली दिसेनाशी.

कोण करेल आता समुद्रमंथन,
शोधून काढेल ती...

माणुसकी.
एक हरवलेली 'की'.

Monday, 6 September 2010

प्रेम म्हणजे प्रेम असतं... त्यांचं आपलं सेमच असतं...

त्या दिवशी आमच्याबरोबर ऑस्ट्रेलियाचं एक कुटुंब होतं. साठीच्या आसपासचे चटपटीत दिसणारे काका, त्यांच्याहून का कोण जाणे कमीतकमी दहा वर्षांनी मोठ्या वाटणाऱ्या काकी आणि त्यांचा २७/२८ वयोगटात मोडू शकेल असा ताड्माड मुलगा. मराठमोळा म्हणता येईल असाच काहीसा काकींचा पेहेराव होता. कमरेखाली येईल असा पोलका आणि गुढघ्याखाली जाईल असा परकर. ते आस्ट्रेलियन, आम्ही भारतीय, आमची वाटाडी रशियाला चिकटून असलेल्या एका चिमुकल्या गावातील चिनी आणि रस्ता बीजिंग मधला. आम्ही दोघी मायलेकी युवकाबरोबर मागे, त्यापुढे हे काकाकाकी आणि त्याहीपुढ़े चालकाबरोबर चिनीमकाव! दिवसाभरात आल्यासरशी बघता येईल ते पदरी पाडून घ्यावं आणि 'चला, पैसे वसूल' असं म्हणावं असा एक कट्टर भारतीय बाणा मनाशी बाळगून आम्ही प्रवास सुरु केला. कालच भरलेल्या पैश्यांत कायकाय दाखवलं जाणार आहे ह्याची यादी एका चिटोऱ्यावर लिहून घेतली होतीच. वर इंग्लिश मध्ये आणि खाली चिनी भाषेत! उगाच गोंधळ नको!
अकस्मात् काकांनी बॅगेतून कॅमेरा बाहेर काढला आणि त्यावर काहीतरी शोधायला सुरुवात केली. काही मिनिटांत त्यांचा शोध पूर्ण झाला आणि ते मागे वळले. आम्ही त्या छोट्याश्या स्क्रीनवर नजर केन्द्रित केली....आणि बघावं तर एका बाथटबात दहा वर्षापासून ते जेमतेम एक वर्षाच्या बाळापर्यंत १० मुले उभी! एकमेकांना चिकटून, धक्काबुक्की करत! सगळे मुलगे! "Our daughter's kids!" एकुलत्या एक मुलीला वाढवताना दमछाक झालेल्या मी विचारलं,"Ya? How old is she?"
"३२"
हे काय उत्तर झालं? मी लागले ना गणित मांडायला!
भारतीय आजोबा आणि हे आस्ट्रेलियन आजोबा ह्यांच्या भावप्रदर्शनात काडीचाही फरक नव्हता! आपल्याकडे नाही का सगळेच आजी आजोबा आपल्या नातवंडांचे फोटो आल्यागेल्याला, धरून, पकडून, मारून, मुटकून दाखवत असतात? मोठ्या अभिमानाचे तेच भाव काकांच्या चेहेऱ्यावर पसरले होते. बहुतेक आम्ही काही आमचा अविश्वास लपवून ठेवू शकलो नाही. पुढचा फोटो त्यांनी ३२ वर्षांच्या आपल्या कर्तबगार कन्येचा दाखवला. बया दिसत होती खरी तिशीची!

थोड्याच वेळात 'फॉर्बिडन सिटी'त पोचलो. एका ठिकाणी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागणार होत्या. काका, काकींसोबत खालीच थांबले आणि आम्ही पायऱ्या चढू लागलो. परत आलो तर चिमुकल्या काकी एका चार फूट कट्ट्यावर बसलेल्या. पोरगा आमच्याबरोबर होता. काकांनी आम्हांला येताना बघितलं आणि बायकोला उतरवायला पुढे सरसावले. तरुण लेक म्हणाला,
" Wait Papa, I'll pick her up."
पण कसले काय! त्याचे मातापिता कसले त्याला ऐकतायत! नवऱ्याने उघडलेल्या दोन्ही हातांत काकींनी जी काही गोड उडी मारली! तिथे जर समुद्र असता आणि आम्ही जिथे उभे होतो ती जर 'Titanic' असती तर मी नक्की सांगते तुम्हांला, पुढच्या क्षणी लिओनार्दो आणि केटची ती गाजलेली रोमँटिक अदा आम्हांला बघायला मिळाली असती! काकांनी अलगद लाडक्या बायकोला धरतीवर उभे केले! मी हळूच मुलाकडे बघितलं. ह्यांचं हे नेहेमीचंच असे भाव घेउन हसत तो तिथून निघाला.
आम्ही दोघी देखिल 'पुढील प्रेक्षणीय' स्थळी निघालो!

Sunday, 5 September 2010

तुझ्याविना...

शाळा संध्याकाळी सुटायची. शाळेच्या बसने घरी आलं, बॅग टाकली की खाली खेळायला धावलं. मग कोणाकोणाची हजेरी लागलीय ते बघावं आणि ज्या सख्या आल्या नसतील त्यांच्या नावाने इमारतीखाली उभं राहून हाळी द्यावी. एक नाही, दोन नाही, अगदी श्वास लागेपर्यंत. (हाळी हा फारच पुस्तकी शब्द झाला. जे काही आम्ही करायचो त्याला बोंबाबोंब हाच शब्द खरं तर योग्य होईल. म्हणजे तुम्हा वाचकांसमोर बरोब्बर चित्र उभे राहील. तुमच्या कानावर ती बोंबही पडेल कदाचित. वेगवेगळ्या काकांकडून आणि वेगवेगळ्या मावश्यांकडून, त्यांचे कान किटवण्यावरून खूप ओरडादेखील खाल्ला. परंतु सुधारणेला जागा नव्हतीच कधी!) तर एव्हढ्या हाका मारून देखील कोणी दाद लागू दिली नाही तर मग दाणदाण आवाज करत जिना चढावं, घंटा वाजवावी आणि घरात प्रवेश मिळवावा. ("अगं, मुलगी ना तू? काय हे तुझं लक्षण?" ओरडल्या खाष्ट काकू! आता मुलगी आणि दाणदाण जिना चढणं, ह्याचा काय संबंध?) मग सखीची तयारी होईस्तोवर मावशींशी गप्पा, तिच्या धाकट्या भावंडांशी थट्टामस्करी आणि त्यावर मावशींनी नुकतीच केलेली गुळपापडीची गरमागरम वडी तळहातावर ठेवली तर अजूनच मजा! मग एकमेकींचे हात घट्ट धरून खाली धाव घ्यावी. सूर्य मावळेस्तोवर धुमाकूळ. सातच्या आत मात्र घरात!

हे आठवायचं कारण? मोबाईल मेला आणि जगाशी संबंध फक्त हे जाळं, घरचा आणि कार्यालयातील टेबलावरचा फोन ह्यावर मर्यादित राहिला. शनिवार-रविवार तर ऑफिसदेखील नाही. ह्या धोक्याची जाणीव शुक्रवारी संध्याकाळी, ऑफिसमधील माझ्या सर्विसिंगच्या कंपूला झाली होती आणि घरच्या फोन क्रमांकाची जोरदार मागणीही झाली. परंतु, "काय माझं डोकं फिरलंय?" असा त्रिवार निषेध जाहीर करून मागणी फेटाळल्याने हक्काची सुट्टी शांततेत गेली.

आज संध्याकाळी मैत्रिणीबरोबर भटकायला बाहेर पडायचे ठरवले. तिच्या घराखाली गाडी लावली आणि लक्षात आले. आज आपल्याकडे मोबाईल नाही. वरती संपर्क कसा साधणार? आणि जर तिला मी खाली आले आहे हे वरती कळलेच नाही तर सखी खाली कशी येणार? तिच्या इमारतीला, तळमजल्यावरून बोंब मारायची काही सोयही ठेवलेली नाही! मग तिच्या पाचव्या मजल्यावर जाऊन घंटा वाजवली आणि तिने हसतमुखाने दार उघडल्यावर हे सगळे मागचे हरवून गेलेले प्रसंग नजरेसमोर आले. गंमत वाटली. तो अनुभव जागा झाला. मग काकाकाकींशी मनसोक्त गप्पा, सोबत झकास कॉफी आणि मग घर सोडणे.

आजचा मला वाटतं चवथा दिवस. पूर्वी परदेशात घेतलेला एक जुना फोन दुरुस्तीच्या कारणास्तव त्याच्या मायदेशी परत पाठवला होता. तो मुंबईत शुक्रवारीच दाखल झालेला आहे. तब्येतपाणी सगळे एकदम ठीकठाक आहे अशी बातमी कानी आली आहे. परंतु ज्यांच्या बॅगेतून आगमन झाले आहे त्यांचा मुंबईतील दूरध्वनी क्रमांक माझ्या माहितीत नसल्याने (किंवा असला तरी देखील तो त्या मृत फोनच्या पुस्तकातच असण्याची शक्यता असल्याकारणाने) आता ते मित्रवर्य जेंव्हा फोन करतील तेंव्हाच त्या परदेशी फोनची घरी परतण्याची संभावना आहे! आणि तो, म्हणजे 'तो फोन' परतण्याची शक्यता असताना घाईघाईत दुसऱ्याला आणून उभं करणे म्हणजे प्रतारणाच झाली की हो! वाट बघण्यापलीकडे आता हातात काही नाही!

धीर धरी...धीरापोटी फळे गोमटी!

जाब

सगळ्याचा हिशोब....
मांडावा लागतो.
सगळ्यालाच उत्तर.
द्यावं लागतं.
एकदा एक मैत्रीण जेवायला आली. मी पावभाजी केली. तिने मला पद्धत विचारली.
टोमॅटो, बटाटा...मी सुरुवात केली.
"नाही! आलं किती इंची..लसणाच्या पाकळ्या किती...मोजमाप सांग."
आली का पंचाईत? मोजमाप तर मला येतंच नाही.
समोर काय वाढून ठेवलंय ते बघावं आणि गोडतिखटाचं माप ठरवावं.

आता ह्यांना प्रश्न पडतो.
"रडत का नाहीस?"
"बोलत का नाहीस?"
"You are very optimistic!"

मला तर काही कळत नाही.
असं काही मी ठरवलं नाही.
असा हिशोब मला मांडताच येत नाही.
असं मोजमाप मला करताच येत नाही.

त्याला तरी जमलंय का हे गणित?
किती इंची दुःख?
किती पाकळ्या सुख?
सगळीच तर ह्याची भेसळ!
थोडं चुकलेलं. थोडं बरोबर.
कोणाचंच नशीब 'परफेक्ट' नाही.
कोणाचंच साफ चुकलेलं नाही!
सगळाच ह्याचा 'जेमतेम' कारभार.

म्हणतेस,"अशी न बोलता राहू कशी शकतेस? सांग मला कोणाशी बोलतेस?"

म्हणतात, "माणसाने स्वतःशी मैत्री करावी. म्हणजे मग कोणाची गरज लागत नाही!"

लहानपणी फुटक्या बांगड्यांचा खेळ आम्ही खेळायचो.
रंगीबेरंगी तुकडे फेकावे...आणि मग एक एक करून वेचावे.
वेचताना दुसऱ्याला कणभरही धक्का पोचता कामा नये.
खेळाचा दुष्ट नियम.

तोच तर खेळ चाललाय माझा...
बेरंगी काचा तुझ्या आयुष्यातून वेचायचा...
त्यांचा स्पर्श तुला होऊ न देण्याचा.

Saturday, 4 September 2010

स्वप्न

वय वर्ष बहुतेक १२-१3.
गादी घालावी आणि दिवसभराच्या दंगामस्तीने थकूनभागून झोपून जावं. स्वप्ननगरीत पऱ्यांशी भेट व्हावी. त्यांच्याबरोबर उडावं. बागडावं.
पण नाही! माझ्या स्वप्नात रोज माझं कोण ना कोण तरी मरायचं!! धाकट्या बहिणींपैकी कोणी एक नाहीतर माझे बाबा!
रोज!! नेमाने!! नुसता छळ मांडला ह्या भुतांनी माझा. जरा गाढ झोप लागायची खोटी की झालं...धाकटी बहिण नाहीतर बाबा एकदम ऑक्सिजनवरच दिसायचे! जोरदार भोकाड! सगळ्यांची झोपमोड. मग बाबा जवळ घ्यायचे आणि थोपटवत मला शांत करत झोपवायचे! बराच वेळ म्हणे माझे हुंदके चालू असत.
तर एक दिवस रात्रीची ती रोजची वेळ आली...माझी बहिण ऑक्सिजनवर ठेवली गेली! मी दचकून जागी झाले. नेहेमीच्या सवयीने हंबरडा फोडला. जाऊन बहिणीला मिठी मारली! ती रोजच्या ह्या कटकटीने इतकी वैतागली होती कि मी तिला मिठी मारायची खोटी, तिने एकदम लाथा झाडायला सुरुवात केली!! बाबा धावले आणि मला त्या लत्ताप्रहारापासून दूर करून जवळ झोपवलं.

त्यानंतर मात्र माझ्या हुशार बाबांनी एक उपाययोजना आखली. त्यांच्याकडे एक दुमडता येणारा चाकू होता. तो त्यांनी माझ्या उशीखाली ठेवायला सुरुवात केली. म्हणाले,"आता बघ. तुला अजिबात वाईट स्वप्न पडणार नाहीत! दुष्ट शक्ती आल्याच तर ह्या चाकूला बघून पळून जातील." कोकणातील तो म्हणे जालीम उपाय आहे! रोज मी अगदी नित्यनेमाने तो चाकू उशीखाली ठेवून निश्चिंत मनाने झोपी जायला सुरुवात केली.
आणि काय सांगावं? ती दुःस्वप्न कुठे पळून गेली ती आजतागायत नाही फिरकली! बाबांच्या जादुई चाकूला सगळी भूतं घाबरली!

पुढील कालावधीत एक घडलं....
एक दुःस्वप्न सत्यात उतरलं...

जाहीर कबुली

तो पाण्यात पडला आणि त्याने ना पडताना, ना पडल्यावर मला कळवले. म्हणजे ती आत्महत्याच होती असे म्हणता येईल. आत्महत्येचे कारण काय? कोण जाणे. काही लेखी लिहून ठेवेलेले मिळालेले नाही. म्हणजे मग खुनाची शंका मनात येतेच. परंतु, त्याच्या संपर्कात शेवटी मीच होते. आणि खून करण्याची माझी प्रवृत्ती आधीतरी कधी दिसून आलेली नाही. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर प्रवृत्ती आहे असा दावा करता येईल. कारण आधी घडलेल्या तीन घटना त्याचीच ग्वाही देतात. परंतु ह्यावेळी घटनेची तीव्रता अधिक असल्याने खुनाचा नुस्ता प्रयत्न न रहाता त्याचा मृत्यूच ओढवलेला आहे. आणि त्यामुळे ह्या खुनाची जगभर चर्चा चालू आहे. तरीदेखील अटक संभावत नाही. कारण इतकेच की त्याला पुन्हा जीवनदान देण्याचा मी तितकाच मनापासून प्रयत्न देखील केलेला आहे. आणि त्या प्रयत्नांना साक्षीदार देखील उपस्थित होते. उलट मी त्यांना समोर ठेवूनच जोरदार प्रयत्न केलेले होते. आता त्या प्रयत्नांना यश मिळू नये ही प्रभूची इच्छा. त्याला मी कशी जबाबदार?
तरी देखील ही अपराधीपणाची बोच बाजूला ठेवून आणि जनहित मनाशी धरून त्याच्या शरीराची विल्हेवाट लावण्याअगोदर त्याच्या मेंदूतील माहिती आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मिळवण्याचा मी अखेरचा प्रयत्न लवकरच करणार आहे. परंतु त्यातही किती यश येईल हे पुन्हा त्या प्रभूवरच अवलंबून. मी माझा निष्पापपणा सिद्ध करण्यासाठी ह्याचा मृत्यू झाल्याझाल्या लगेच त्याची जागा दुसऱ्या कोणालाही घेऊ दिलेली नाही. उगाच न्यायदेवतेला शंका नको की, मी हे सगळे अतिशय पद्धतशीररीत्या आखणी करून केले. आता जागा घेण्यासाठी नवीन कोणी आणण्याइतकी माझी आर्थिक परिस्थितीच नाही ही बाब अलाहिदा. पण प्रयत्न चालू आहे. त्याच्या नसण्याने माझ्याव्यतिरिक्त बाकी जगाचेच अधिक नुकसान झाले आहे हे आता मला जरा उशिरा कळले आहे. त्यामुळे पुढच्या खेपेस असे काही करण्याआधी सर्व जगाला आधी कळवण्याची तसदी मी नक्कीच घेईन. म्हणजे माझ्या ब्लॉगवर माझे हे असे आत्मघातकी विचार मी टाकेन किंवा फेसबुकवर माझ्या स्टेटस मध्ये देखील मी जगजाहीर करेन. पण ह्या खेपेला मी असे काही केले नाही ह्याबद्दल क्षमस्व.

अहो, काय? मनात कसली शंका आणताय?? माझा मोबाईल फोन कमोडमध्ये पडला आणि मी त्यावर फ्लश करून त्याला त्या अर्धमेल्या अवथेत कमीतकमी १५ मिनिटे तरंगत ठेवून दिले. ह्याला कारण इतकेच की तो पडलेला मला कळलेच नाही! आणि मग त्याने फक्त १ दिवस तग धरला आणि मग परवा त्याने अखेर जगाचा निरोप घेतलेला आहे.

तुम्हांला काय वाटलं?
कमालच करता हो तुम्ही!
;)

Friday, 3 September 2010

बायको बघून घेईल

सकाळी सकाळी माझा एक मित्र मरणाच्या गोष्टी करत होता.
म्हटलं,"अरे, तुझ्या लेकाचं काय होईल?"
म्हणे,"बायको बघून घेईल!"
खरं आहे...बायको बघून घेईल.

आम्ही बायका नाही असा विचार करू शकत....
"मी मेले तर काय झालं? नवरा बघून घेईल!"

दुष्काळ

मला कळत नाही,
पाणी का येत नाही?

कोरडी जमीन
कोरडं आकाश
कोरड्या समुद्रात
नाव अडकली

मला कळत नाही,
पाणी का येत नाही?

आठवतं.
त्या स्मशान धगीत
तुझ्यावर रचलं मी माझं हृदय,
अस्थी तुझ्या लागल्या हाती
पण माझ्या हृदयाची राखही न मिळावी?

कळतं...
डोळ्यात माझ्या पाणी का येत नाही...