नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 30 August 2010

सखी शेजारिणी...


घरात मुलगी जन्माला आली आणि ती दिसायला सुरेख असेल तर ती वयात यायची खोटी, गावातल्या एखाद्या चित्रकारासमोर तिला बसवण्यात येई. सुंदरसं जलरंगातील ते तिचे व्यक्तिचित्र मग सम्राटापर्यंत पोचवायची व्यवस्था होत असे. मुलींना शिकायची परवानगी त्या काळी चीन मध्ये देखील नव्हतीच. चित्रकला, संगीत, नृत्य ह्या कला अवगत असतील तर सम्राटापुढे तिची वर्णी लागण्याची शक्यता अधिक.
घरात मुलगा जन्माला आला आणि घरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच असेल तर लहान वयातच त्याला बळजबरी तृतीयपंथी बनवण्यात येई. जेणेकरून त्याची नियुक्ती सम्राटाच्या दरबारी होऊ शके व ते ढासळलेलं घर तो सावरू शके. आणि एकंदरीत घरात जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या दर वर्षी चढतीच असे. दिवसागणिक पडलेली कामे करून हे तृतीयपंथी प्रसादातच मोठे होत असत. त्यांच्या रोजच्या कामांच्या यादीतील सर्वात महत्वाचे काम असे, गावाहून आलेली सुंदर षोडशांची चार ते पाच चित्रे, रोज सूर्यास्तानंतर वयस्कर सम्राटापुढे मोठ्या अदबीने साजरी करणे." राजा, आजची ही तरुण रात्र तुला कोणाबरोबर व्यतीत करायला आवडेल?"
जवळपास ३००० बायका असलेला उदार सम्राट, त्यातल्या एखाद्या चित्रावर बोट टेके. ह्या सम्राटांना आपल्या जीवाची फार भीती. त्या नशीबवान रूपवान मुलीला वस्त्रहीन अवस्थेत समोर उभे केले जाई. पुढचे चार तास सम्राटांना आपल्या ह्या एका रात्रीच्या पत्नीबरोबर मिळत असत. बाहेर त्या मुलाचा पहारा असे. बरोब्बर चार तासांनी पडदा बाजूला सारून तो समोर उभा राही. सम्राटांना विचारले जाई," राजा, पत्नीबरोबरची ही रात्र तुझी कशी गेली?"
उत्तर जर नकारार्थी असेल तर त्वरित त्या मुलीला तेथील राजदरबारी असलेल्या 'अक्यूपंक्चर' तज्ञासमोर तश्याच अवस्थेत उभे केले जाई. दुर्दैवाने तिची जर गर्भधारणा झाल्याची कुशंका आलीच तर त्या शक्यतेची तो तरबेज तज्ञ पुरेपूर विल्हेवाट लावत असे.
आणि जर उत्तर होकारार्थी असेल तर? आहे ना...ह्या असंख्य सत्यकथांना तीही वळणे आहेतच... जर गर्भधारणा झाली व तिने राजाच्या पहिल्या पुत्राला जन्म दिला तर मात्र ती सम्राज्ञी आणि तिचा पुत्र पुढील सम्राट! अर्थात पुढील ह्या 'एक रात्री'च्या अनेक आवडत्या बायकांना झालेले पुत्र आणि ह्या पहिल्या पुत्रामधील वैरभावना कुठले टोक गाठेल आणि त्यातून कोण टिकाव धरून चीनचा सम्राट होईल हे अखेर त्या नियतीच्या हाती!

बीजिंगमधील जनतेला कित्येक शतके सूतभर देखील न बघायला मिळालेल्या 'फॉरबिडन सिटी' मधील सर्वच सम्राटांचे हे अत्याचार आणि ते करण्यासाठी त्यांनीच लढवलेल्या ह्या नवनवीन कल्पना!

दुसऱ्या दिवशीची आमची वाटाडी 'Apple' हिने सांगितलेली ही शोकगाथा.


6 comments:

rajiv said...

पावसाचा असो वा राजाचा ,,, मार..
कोणा काने पोचेल तक्रार ... ?

आधी नर.. तशात सम्राट ...
मग कोणा कानी बांगड्यांचा किणकिणाट .. ?

भुलविले सांगुनी तू होशील सम्राज्ञी ...
पडे आहुती तिची फक्त भोग यज्ञी !!

अनघा said...

अरे व्वा राजीव! मला एकदम माझा मित्र गुरू आहे ना त्याची आठवण झाली!! तो असा पटकन कविता करण्यात तरबेज आहे!! सही आहे!! :)

rajiv said...

अनघा, खूपच सूचक व भेदक शब्दात सगळे सांगितले आहेस ))
प्रणाम तुझ्या लेखणीला ....

BinaryBandya™ said...

बाप रे ...
मोगलाई बरी होती म्हणायचे ...

Raindrop said...

sensitive story...told with so much dignity...yet brinking out the naked truth. this is another aspect of ur writing which people can see...totally new and refreshing side of ur word power.

अनघा said...

वंदू,
:)
बायनरी बंड्या, वाटत नाही...मोगलाई देखील अशीच असणार! फक्त चीनमध्ये हे वाटाडे आपल्याला त्यांच्या राजांनी केलेले अत्याचार उघडपणे सांगतात...