नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 5 August 2010

मला चंद्र हवा

"तुमच्या घराबद्दल काय कल्पना आहेत?"
"माझ्या घरात मला चंद्र हवा."

बाहेरच्या खोलीत पाचांच कुटुंब झोपायचं. आई आणि तीन मुली एका रांगेत आणि वडील त्यांच्या पुस्तकांच्या दुनियेला चिकटून. विद्वानांच्या कुशीत.
रात्र पुढे सरकायची. चंद्र कधी समोरून तर कधी 'side profile' देत फिरायला निघायचा. आणि मग बरोब्बर खिडकीत येऊन अडकायचा. आणि मग काय विचारता? अख्खी १५x१२ ची खोली रुपेरी होऊन जायची. उठून त्याच्याकडे बघितलं तर फिरणारे धुलीकण त्या खोलीला अधिकच गूढ बनवून जायचे. वाटायचं जसं काही आपण सर्वचजण आता तरंगायला लागू आणि न कळत त्या धुलीमार्गातून बाहेरच्या विश्वात नाहीसे होऊ. चंद्रावर पोचू की नाही माहित नाही पण पृथ्वीवरून नक्कीच नाहीसे होऊ. जागी आहे म्हणून मला कळेल तरी पण बाकीच्यांना कळलंच नाही तर? बाबांची पुस्तके त्यांच्या बरोबरच ह्या प्रवासाला निघाली तर मग त्यांना काहीच फरक पडणार नाही. आणि बाबा बरोबर आहेत म्हणजे मग हा रस्ता मला कुठेही का नेईनात, मला फरक पडणार नाही. तो अडकलेला चंद्र अंग झटकून स्वतःची सुटका कधी आणि कशी करून घेई माहित नाही पण जाग येई तेंव्हा ढळढळीत उजाडलेलं असे आणि बाबा समोर व्यायाम करत असत. हुश्श! त्यांच्याशिवाय मला आणि माझ्याशिवाय त्यांना कोणी नेलेलं नसे!

आता धबधब्याच्या शेजारी घर बांधायला घेताना त्या वास्तुविशारदाने हा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर त्याला एका क्षणात मिळालं. पण माझं हे चंद्राचं घर काही मला नाही मिळालं. असा खोलीत अडकलेला चंद्र नंतर दिसला तो अमेरिकेत बहिणीच्या शयनगृहात. तेंव्हा लक्षात आलं, दुसऱ्यांच्या खोलीत डोकवायची ह्याला खोडच आहे म्हणायची!

15 comments:

श्रीराज said...

अप्रतिम अनघा!!! निव्वळ निव्वळ अप्रतिम!! तुझ्या भावना जशाच-तशा पोहचल्या!

rajiv said...

`नारायण धारपांच्या' गूढ कथेतील प्रवासाला सुरवात केली अन अचानक `चांदोबा' तील एका कवितेवर येऊन पोचलो !
`खट्याळ व खोडकर चांदोबा........' ! खूप छान !

Raindrop said...

moonshine makes the night so much more worth to stay awake for. especially if it is falling on all your loved ones who are sleeping soundly in the warmth and comfort of their loved ones.

all i can think of right now is:

http://www.youtube.com/watch?v=x5UjceuIZ2o&feature=player_embedded#!

do watch it. chandamama door ke....

भानस said...

आवडेश. :)

भौतिक साधने जेव्हां कमी असतात/होती नं तेव्हां मन या सार्‍या छोट्याछोट्या क्षणांमध्ये गुंगून जात होते. आज फक्त वाढवलेल्या किंवा निष्कारण निर्माण केलेल्या (ज्या गरजांमध्ये चुकूनही समाविष्ट होऊ शकत नाहीत )साधनांमागे धावण्यात अति मौल्यवान क्षण हरवून गेलेत.

ज्याचा त्याचा चंद्र वेगळा आणि ज्याला त्याला भासे तो आगळा.:)

अनघा said...

भाग्यश्री, किती सुंदर लिहिलंयस अगं तू!! मला एकदम तुला टाळीच द्यावीशी वाटतेय!!
:D

rajiv said...

भानस , तुझा अभिप्राय वाचून मला नेहमी ऐकलेली लाकुडतोड्याच्या गोष्टीची आठवण झालीय.
त्यातील देविप्रमाणे, तू तर लगेच शंभर नंबरी सोनेच बाहेर काढून दाखवल्येस !
तू व अनघा, पूर्वजन्मीच्या (किंवा जन्मोजन्मीच्या ) सख्ख्या मैत्रिणी असणार नक्कीच!

Saurabh said...

फार सुरेख... फार फार फार म्हणजे फारवर अनेक रफार सुरेख... दाद देण्यासाठी शब्द नाही मिळत म्हणून दातखिळी बसावी आणि दाद देता येत नाही म्हणून वाईट वाटावं असं झालय... क्षणभर का होईना चांदण्यात रमलो मी... u r gr8!!!

भानस said...

खचितच. :) राजीव, आवर्जून लिहीलेत खूप आनंद झाला. औपचारीक धन्यवाद देत नाही.
मनाचे हे असेच असते ना... हजारो मैल लांब असलेल्या, न पाहिल्या देखील्या अनघेत मला जीवाभावाची सखी सापडते.
आता हे सख्य जीवापाड जपायचे, फुलवायचे. अर्थात अनघेची हरकत नसल्यास... :P

काय अनघाबाई, सकाळी सकाळी मीच सापडले का तुला?? :D

अनघा said...

सौरभ,श्रीराज...धन्यवाद! :)

अनघा said...

Vandu, I saw the link!! Lovely na?? Thanks a ton!! :)

संकेत आपटे said...

कसलं भारी लिहिता तुम्ही. शाळेत असताना निबंधात तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळत असतील ना?

अनघा said...

:) संकेत, आवडलं ना तुला? एकदम भरून पावलं! निबंधात मार्क चांगले मिळायचे खरे! :)

संकेत आपटे said...

मला वाटलंच. तुमची दिनचर्या काय आहे हो? म्हणजे काय खाता, किती वाजता उठता वगैरे वगैरे... मलाही थोडं सुचतं का बघतो. :-)

अनघा said...

रोज पहाटे शिर्षासन करायला हवं! आणि अगदी खोलीच्या मध्यावर! भिंतीला चिकटून नाही! लिखाणाचं रहस्य सांगितलंय हा बुवा तुम्हांला! सांगू नका कोणाला! ;)

संकेत आपटे said...

आयला शीर्षासन! म्हणजे कठीण आहे. शीर्षासन करण्यासाठी एका महत्त्वाच्या गोष्टीची गरज असते... डोकं.... जाऊ द्या. चांगलं लिखाण माझ्या नशीबात नाही असं दिसतंय... ;-)