नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 16 March 2015

गुलाबी

चंदेरी गाडी घरून निघाली.
रस्त्यातलं ओळखीचं झाड कालपरवापर्यंत रिकामं झालं होतं.
पिंपळाचं.
आज त्यावर गुलाबी स्वप्न उगवली होती.
नाजूक.
सूर्य ती स्वप्न जपेल.
जोपासेल.
कधी ना कधी ती स्वप्न जून होतील.
सूर्य कठोर होईल.
स्वप्न उखडून टाकेल.
पुन्हा नवी स्वप्न उगवायला…
त्या झाडात तेव्हढी ताकद तरी शिल्लक राहील का ?

गाडी पुढे निघाली.
गल्लीत ती नटून उभी होती.
त्याच पिंपळी गुलाबी रंगाचं आवरण…
ओठांवर चढवून.
तो रंग ओरबाडून टाकणारा…
मात्र तिचं पोट भरणारा…
कोणी गिऱ्हाईक तिला आज मिळेल काय ?



Saturday, 7 March 2015

दोरी...

वेगवेगळे विचार ऐकायला मिळतात.
त्यावर थोडा विचार केला की त्यातला कुठला विचार आपल्या मनाला पटतो आहे हे कळतं.
आणि मग आपण नक्की कुठल्या बोटीत बसलो आहोत ह्याची जाणीव होते.

देशभरात बंदी घातलेली डॉक्यूमेंटरी काल बघितली.
'India's daughter'

ही डॉक्यूमेंटरी बघितल्याने मला काही नवे ज्ञान झाले काय ?
माझ्या देशातील पुरुषांबद्दल मला काही नवीन कळले काय ?
ह्या डॉक्यूमेंटरीमुळे जे आजपर्यंत कोणालाही ज्ञात नसलेले ज्ञान आता जगाला मिळाले काय ?
फक्त माझ्याच देशातील पुरुष डॉक्यूमेंटरीमध्ये दाखवल्याप्रमाणे विचार करतात काय ?
पुरुष ह्या प्रकारे विचार करतात त्यामागे जबाबदार कोण ?
एखादा मुलगा जन्माला येऊन तो समाजात वावरायला लागण्यापर्यंत, त्याच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी कोणाची ?

त्या मुलीला धडा शिकवण्यासाठी तिचे असे हाल केले गेले असे तो फाशीची शिक्षा झालेला गुन्हेगार म्हणाला.
तिने जर विरोध केला नसता तर ती आज जिवंत असती. इतक्या उशिरा ती तिच्या मित्राबरोबर बाहेर काय करत होती ? हे वागणंच चुकीचं आहे. त्याचे विचार आजही कायम आहेत.
आणि समजा ह्याचे शिक्षण वा वावर रंजल्यागांजलेल्या वस्तीत झाला असे म्हटले तर ह्या गुन्हेगाऱ्याच्या वकिलाचे विचार देखील तेच होते. त्याची मुलगी समजा हे असे काही करताना जर आढळली तर तिला तो जाळून टाकेल असे काहीसे तो म्हणाला. तिला शिक्षा करणे ही त्यांची नैतिक जबाबदारी.

आपल्या आई, बहिण वा पत्नीला समाजात वावरताना कुठलेही भय वाटू नये असे वातावरण निर्माण करणे ही मात्र कुठल्याही पुरुषाची जबाबदारी नाही.

शीला दीक्षित म्हणाल्या, "तुम्ही मुलांना वाढवीत असताना तुमचा मुलगा आणि मुलगी ह्यात कायम फरक करीत असता. त्याला पेलाभर दुध आणि तिला निम्म्याहून कमी दुध हे प्रकार सर्व घरात सर्रास चालतात. ह्यातून तुम्ही त्या मुलीपेक्षा तो श्रेष्ठ आहे हेच तर त्याच्या मनी बिंबवत जाता ना ?"

ह्यामागे काय असावे ?

म्हातारपणी मला मुलगाच बघणार आहे. 
मुलगी तर लग्न करून दुसऱ्या घरी जाणार आहे.
हा विचार ?

"मेरे दो बेटे हैं." मेरठवरून दिल्लीला परतताना मला देण्यात आलेल्या गाडीचा चालक गप्पा मारत होता.
"बडा थोडा खेलकूद में ज्यादा वक्त गुजारता हैं. पर छोटा पढाई में एकदम आगे है. क्लास में दो लडके हैं. पहला नंबर लाने के लिये इन दो बच्चों में आगे पीछे चलता रहता है."
"बढीया है. पर जो बडा बेटा है उसे कौनसे खेल में ज्यादा दिलचस्पी है ?"
"ज्यूडो कराटे."
"हमको ये ध्यान में रखना चाहिये कि हम जिनको बडा कर रहे हैं वो थोडेही सालों में घर के बाहर कदम रखने वाले हैं और बाहर कि दुनिया को हमारे बच्चो से कोई खतरा ना हो." हे माझ्या तोंडून बाहेर पडलं ह्याच्या मागे काय कारण असावं ? विचारल्याच्या पुढल्या क्षणाला मी विचारात पडले होते.
"हा… हा… वो बात तो एकदम सही हैं. हमें सिर्फ अपने बुढापे में देखभाल करने के लिये अपने बच्चों को बडा नही करना चाहिये. संस्कार तो देनेही चाहिये."

कुठल्याश्या एका गल्लीत दोन पुरुष लहानाचे मोठे होत आहेत.
त्यांना चांगले नागरिक घडवण्याची जबाबदारी ज्याने मोठ्या आत्मविश्वासाने अंगावर घेतली आहे; असा माझ्या देशाचा एक नागरिक माझ्या समोर बसला होता.

माझ्या मनावर भयाचा पगडा अधिक आणि व इतरांवरच्या विश्वासाला उतरती कळा लागली आहे.
माझ्या बोलण्यातून हे माझ्या लक्षात आले. 

मला मुलगी आहे.
तिला वाढवताना आपण धोकादायक समाजात वावरत आहोत हे भय वा ही जाणीव ठेऊनच मला तिला वाढवायला लागलेलं आहे.
पण हे तर जगाच्या पाठीवर मला कुठेही करायलाच हवंय नाही काय ?
दुबईत असताना काय माझी लेक सुखरूप होती ?
आम्हा दोघींच्या बाजूने जाताना अरबी माणसाने त्याच्या भाषेत काहीतरी अश्लील शब्द उचारले आहेत हे ती भाषा न समजून देखील मला आणि तिलाही कळले.
हा अनुभव एकदा वा दोनदा नव्हे, तर आम्ही दोघींनी बऱ्याचदा घेतला.

"ज्यांची मुले हे अशा प्रकारचे घृणास्पद गुन्हे करतात त्यांच्या आयांना शिक्षा द्यायला हवी." माझी मोठी बहिण ताडकन म्हणाली.
"सकाळी मुलाला उशिरापर्यंत झोपून देणे आणि मुलीला मात्र लवकर उठून काम करायला लावणे, जेवायला वाढताना त्याच्या ताटात कोंबडीचे तुकडे देणे आणि लेकीला फक्त रस्सा देणे, हे काय आहे ? ह्याच विचारांतून तर हे असे पुरुष तयार होतात !"
"मला वाटत नाही की आपल्या मुलाला कसे वाढवायचे ह्याचे विचारस्वातंत्र्य कुठल्या बाईला मिळत असेल." मी म्हटले.

एकदा कानावर पडलेली लघुकथा आठवली. त्यातली एका भावाची शिक्षणासाठी झुरणारी बहिण आणि तिचे दु:ख समजून घेणारा भाऊ. त्यांचे वडिलच तर त्या मुलीच्या शिक्षणाच्या आड येत होते. आणि त्यांच्या आईला तिचे दु:ख कळून देखील आपल्या नवऱ्यापुढे तिचे काहीही चालत नव्हते.

'आपल्याला मुलगा आहे आणि आपल्या बहिणीला फक्त तीन मुलीच आहेत' ह्याच्यात आपण काही फार मोठा तीर मारला आहे अशा पद्धतीत माझ्या सख्ख्या मावशीने माझ्या आईचा केलेला अपमान मी स्वत: अजून विसरले नाही. बहुधा माझी आई हे कधीच विसरून गेली असावी. शेवटी आईच्या तिन्ही मुली स्वत:च्या पायावर व्यवस्थित उभ्या राहिल्या आणि मावशीचा मुलगा दारू पिऊन अवेळी मरून देखील गेला. त्याला वाढवताना मावशीने आणि तिच्या नवऱ्याने केलेल्या चुका तेव्हा नाही पण आता कळतात. आणि माझ्या आईवडिलांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय त्यावेळी जरी अजिबात आवडले नाहीत तरी आज त्या निर्णयांमागची भूमिका कळते.

म्हणतात वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत जे संस्कार होतात ते आयुष्यभर आपल्या बरोबर रहातात. आणि त्या कालावधीत मूल आपल्या आईच्या कुशीत अधिक असते. 

म्हणजे त्याच्यावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी फक्त तिची ?
सगळ्या वाईटाचे ओझे तिचेच ?

अशा बलात्कारी मुलाला वाढवण्यापेक्षा त्याच्या जन्माक्षणी मी त्याच्या नरडीला नख का लावले नाही असे त्या मातेला का वाटू नये ?
त्या उलट 'माझ्या मुलाला / नवऱ्याला फाशी दिल्याने काय बलात्कार थांबणार आहेत' ? हे असे उफराटे प्रश्न तिला व त्याच्या बायकोला पडावेत ?

आणि… ही बंदी का ?
तुम्हाला तुमचा चेहरा समोरच्या आरशात दिसला म्हणून ?

हल्ली कोणाच्या पोटी जिजाबाई जन्माला येत नाही.
त्यामुळे शिवाजी जन्माला येण्याचा प्रश्न उद्भवत नाही !

वाटतं...

जिच्या हाती फाशीची दोरी ती जगाते उद्धारी !

Thursday, 6 November 2014

रोपटं

माझ्या मनात येणाऱ्या चांगल्या विचारांना मला धरून ठेवावसं वाटतं. 
स्वच्छ, निर्मल पाणी वाहून जाऊ नये म्हणून एखादा बांध घालावा तसं.
कारण,
कारण मी बघितलंय…
माझेच कोमल विचार मला उघड्यावर टाकून निघून जाताना मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघितलंय.
आणि मी रिकामी होत राहिले.
मात्र एखाद्या घड्याला भोक पडलं आणि पाणी निसरून गेलं म्हणून घडा रिकामाच राहील ह्याची काय शाश्वती ?
त्यात झुरळं, किडामुंगी, कोळीष्टकं नाहीनाही ते जमत राहिलं.
तीन दशकं उलटली.
आज आता पुन्हा एकदा माझा घडा निर्मळ पाणी भरू बघतंय.
त्यात ती सगळी जळमटं निघून जावीत ही इच्छा.
आणि घड्याला पडलेलं भगदाड ?
त्यातूनच एखादं रोप फुटावं…
निळ्या निळ्या आभाळाकडे त्याने झेपावं…
त्या रोपाने माझ्या हळव्या मनाला सावरावं…
ओंजारावं…गोंजरावं…
आणि कधी एखाद्या झुळूकीसह जेव्हा हे माझं वेडं मन उडू इच्छेल…
तेव्हा ?
तेव्हा त्याने त्याला मुक्त उडू द्यावं.


Sunday, 12 October 2014

अम्मा, आन्डू ?

रात्र झाली होती. सूर्याने सगळा फाफटपसारा आवरला होता व चंद्राने रंगमंचावर एन्ट्री घेतली होती. मला चंद्र एकूणच फार आवडतो ह्याचं कारण बहुतेक तो शुभ्र असतो हे असावं. मी आणि माझी लेक, आम्ही दुसऱ्या गावात होतो. हॉटेलच्या सज्ज्यात मी उभी होते. दिवसा उजेडी दूर डाव्या हाताला समुद्राचा छोटा निळा आयत दिसला होता. आता त्याची फक्त गाज ऐकू येत होती. ह्या गावचा समुद्र दिसायला देखील सुंदर होता. वर काळंकुट्ट आभाळ, त्यात शुभ्र फुगीर चंद्र आणि बोलक्या समुद्राची दुरून कानावर येणारी गाज. बस. अजून काय हवे ? मी सुखावर तरंगत होते. तेव्हा जाणवले, चंद्राचा आजचा अख्खा प्रवास मी म्हटले तर निरखू शकते. माझ्या आणि त्याच्या मध्ये एकही अडथळा उभा नव्हता. मी लगेच आत गेले आणि अंगाखाली घ्यायला उशा घेऊन आले. लादीवर टाकल्या आणि दिले त्यावर अंग लोटून. म्हटलं आज तू आहेस आणि मी आहे. नेहेमी नेहेमी कुठल्या ना कुठल्या इमारतीमागे निघून जातोस आणि मग मला फार हिरमुसायला होतं. आता वर आकाशात तो आणि खाली जमिनीवर मी. थोडा वेळ गेला. आणि का मला वाटलं कोण जाणे. मी हात लांब केला. आणि त्या रात्री माझा हात थांबलाच नाही. म्हणजे ? म्हणजे नेहेमी आपण हात लांब किती करू शकतो ह्यावर आपल्याच हाताची बंधने असतात. पण ती रात्र अनोखी होती. त्या रात्री, त्याच्या आणि माझ्या मैत्रीत माझा हात देखील आडवा आला नाही. मी लांब करत गेले आणि हात लांब होत गेला. आणि शेवटी ? शेवटी शुभ्र चंद्राला स्पर्श करूनच थांबला. मग ? मग काही नाही. मग मी चंद्र आकाशातून उचलला. म्हणजे आपण जमिनीवरून जसा कागद उचलतो तसा, मी आकाशातून चंद्र उचलला आणि माझा हात मागे घेतला. मग कागद उचलल्यावर जशी जमिनीवरची ती जागा रिकामी होते, तसं आकाश रिकामं झालं. मी माझ्या मांडीवर त्याला घेतलं आणि थोडं गोंजारलं वगैरे. तेव्हढ्यात मला दुरून कुठून तरी लहान मुलाचा आवाज ऐकू आला. तो त्याच्या भाषेत त्याच्या आईला काहीतरी सांगत होता. "अम्मा, आन्डू गोन्डू आन्डू गोन्डू !"  त्यातलं अम्मा हे एव्हढंच मला कळलं. पण मग चंद्र मला म्हणाला की तो लहान मुलगा आईला विचारतोय की अम्मा, आत्ता तर चंद्र आकाशात होता ! मग आता कुठे गेला ?! हे चंद्राचं भाषांतर ऐकून मला फारच हसायला आलं ! म्हणजे माझ्याबरोबर गप्पा मारायला मी चंद्राला घेऊन आलेय आणि आता कोणालाच चंद्र दिसत नाहीये हे म्हणजे कायतरी भारीच होतं ! असं होऊ शकतं हे कधी माझ्या तसं लक्षातच आलं नव्हतं ! कधी काही रस्त्यात पडलेलं दिसलं तर आपण काही ते उचलायचं नाही असं आपले आईबाबा शिकवतात त्यामुळे आपण कधी तसे प्रयत्न करीत नाही ! पण आज मी साधा हात काय वर केला तर चंद्र माझ्याबरोबर गप्पा मारायला आला ! भारीच ! पुन्हा एकदा "अम्मा, आन्डू गोन्डू आन्डू गोन्डू !" समुद्राच्या बोलांमध्ये हे आहेच काहीतरी ! "अगं, तो लहान मुलगा घाबरलाय ! अचानक मी नाहीसा झालो म्हणून !" चंद्र मला म्हणाला ! लहान मुलं म्हणजे एक वैतागे ! कसली पण भीती वाटू शकते त्यांना ! असू दे ! घाबरू दे त्याला ! मला चंद्राशी कित्येक वर्षांच्या गप्पा मारायच्या होत्या ! मी खूप खूप लहानपणी देखील आजीच्या घराच्या पायऱ्यावर बसून त्याच्याशी कायकाय गप्पा मारी ! त्या त्याला आठवतायत का हे देखील मला त्याला विचारायचं होतं ! मी का म्हणून सोडू त्याला लगेच ?! नाही का ? पण...पण ते पोरगं फारच रडायला लागलं ! आणि रडण्याला थोडीच काही भाषा असते ! रडणं म्हणजे रडणं ! आता त्यात काय हा भाषांतर करणार ?! तो फक्त माझ्याकडे बघत बसला ! आणि मी त्याला नाक मुरडून दाखवलं ! इतक्यात आतल्या खोलीतून माझ्या लेकीने मला विचारलं, " आई, ते बाळ का रडतंय ?" हिला एक सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात ! तोपर्यंत मी चंद्राला धरून ठेवलं होतं ! "मला काय माहित ?!" मी तिला म्हटलं. चंद्राने डोळे वटारून माझ्याकडे बघितलं ! म्हणजे मी खोटं बोलले ना म्हणून ! आणि आपण असं आपल्या मुलांशी खोटं बोललो तर मग ते आपल्याशी खोटं बोलले तर आपण तक्रार कशी करणार ? म्हटलं, हे काही खरं नाही ! ही बाहेर आली तर बघेल माझ्या हातात आणि म्हणेल हा कसला पांढरा तुकडा घेऊन  बसलीयस वेड्यासारखी ! मी त्याच्याकडे बघितलं तर तो आकाशाकडे नजर लावून बसला होता ! लहान मूल…हरवल्यासारखं ! मला असं कोणी दु:खी झालेलं अजिबात आवडत नाही ! म्हटलं जा ! नकोच तू मला ! मी पुन्हा हात लांब केला आणि पुन्हा माझा हात लांब झाला ! रबरबॅण्ड सारखा ! दिला ठेऊन परत आकाशात ! जिथून घेतला होता, अंदाजे त्याच्या थोडं पुढे ! कारण तो आणि मी किमान दहा मिनिटं तरी एकत्र होतो आणि तो दहा मिनिटं आकाशातून गायब होता ! म्हणून ! "अम्मा !" पोरगं टाळ्या वाजवून आईला हाका मारू लागलं ! "आन्डू गोन्डू आन्डू गोन्डू !" त्याची अम्मा त्याला म्हणाली ! आता मला कोण सांगणार ती बाई काय बोलली ते ?! श्या ! मी मनात म्हटलं ! तर मला माझ्या कानात हळूच ऐकू आलं ! "अगं, त्या बाई त्यांच्या लेकाला सांगतायत की बघ, तुला सांगत नव्हते चांदोबा ढगाआड गेला असेल, येईल इतक्यात बाहेर !" मला हसूच आलं ! मी खोखो हसले !

"आई ! एकटीच काय हसतेयस गॅलेरीत बसून ! आत ये पाहू ! एकतर थंडी वाजतेय !"  आपली मुलं मोठी झाली की हि अशी आपल्यालाच ओरडतात ! श्या ! मी जागेवरून उठले आणि सगळ्या त्या चारपाच उशा घेऊन आत वळले ! लेकीने तिच्या पुस्तकातून डोकं वर उचलून माझ्याकडे बघितलं. मी पटकन तिच्याकडे गेले आणि तिच्या कपाळावरच्या आठ्या हाताने पुसून टाकल्या ! आणि ती आणि मी दोघी हसत सुटलो ! 

...ती का हसली माहित नाही, पण माझ्या हाताला चंद्राचा स्पर्श अजून जाणवत होता ! 
आणि म्हणून मी हसत होते !


Tuesday, 30 September 2014

अजून एक व्यक्तीचित्र


घरी असलं की काय करू आणि काय नको असं होत असतं ! पुस्तक वाचू, गाणी ऐकू की चित्र काढू ! एक जाडजूड पुस्तक चालू केलंय वाचायला. आणि माझ्या इतर उद्योगांत, हे पुस्तक माझे काही महिने तरी गिळंकृत करेल ! मध्यंतरी दिवसाला एक चित्र असा संकल्प केला होता खरा पण तो संकल्प फक्त काही दिवस चालला. चित्र काढण्यास कंटाळा आला असे नाही, पण नाना उद्योग उगवत गेले आणि त्यांची छाटणी करण्यात माझं हे गवतफूल वेचायचे राहूनच गेले.

परवा मात्र पुन्हा एकदा ब्रश हातात धरला आणि एक व्यक्तीचित्र रेखाटलं. आता ज्या छायाचित्रावरून मी हे चित्र काढलं ते तर मी तुम्हाला इथे दाखवू शकत नाही. त्यामुळे ते मी तंतोतंत काढलं आहे की नाही हा प्रश्न तुमच्या मनात अनुत्तरितच रहाणार आहे !
;)





Thursday, 18 September 2014

न्यूटनची उडी

एकूणच सज्ज्यात उभं राहून बाहेर बघायला मला आवडतंच.
वाटतं आपण कोणीही असू शकतो. हे हाडामांसाचं फक्त एक आवरण आहे. ते मी पांघरलेलं आहे. तात्पुरतं. पुढल्या क्षणी जर मला वाटलं तर हे पांघरूण झुगारून देऊन समोरच्या आसमंतात पंख पसरून उडून जावं…तर ते तसं करण्याचा अधिकार मला आहेच.

समोर आंब्याचं हिरवंगार झाड. आभाळाने धुवून वाळत ठेवलेलं. फळाचे महिने संपलेले. झाड मोकळंढाकळं. ओटीपोट रिकामं. एका डहाळीवर चिमणी. दुसऱ्या फांदीवर पोपटाचं पिल्लू. त्याला जगण्याची नवलाई. समोर जुन्या इमारतीखाली डांबर जाळत एक पिवळट बनियन घातलेला पुरुष. 
काय विचार करीत असेल तो ?
आज संध्याकाळी चार पैसे हातात येतील. त्यात झ्याक एक बाहुली येल. बनी खुश होल.
की…
हिच्या बांगड्या परवा वाढवल्या नाही का ? जाताना घेऊनच जाऊ…
की…
आंटीकडे जाऊन बरेच दिवस झालेत….!

समोरच्या फांदीवर कावळा बसला. तो नसता आला तरी चाललंच असतं. असा एक सुतार बाबांनी शोधला होता. तो  नसता आला तरी चाललंच असतं. त्याची नजर वाईट आहे असं बाबांना सांगितलं तर त्यांना ते पटलं नाही. तरी आई सांगत होती…त्याची नजर वाईट आहे हे मुलींनाच कळणार नाही का ? तुम्हाला कुठून कळणारे ? पण बाबांनी काही ऐकलंबिकलं नाही...आमचं नाहीच आणि आईचं पण नाही. 

चिमणीचा आत्तापर्यंत उत्तर ते दक्षिण शोध झाला होता. आणि पोपट ? कोण जाणे. नाही दिसला. म्हणजे माझ्या आयुष्यात हा कावळा आला आणि पोपट निघून गेला.
कावळा शांत का बसत नाही ? कावकाव कावकाव.
त्याला त्याच्या आतला आवाज ऐकायचा नसतो का ? ज्याला असा आपल्या आत्म्याचा ध्वनी ऐकावयाचा नसतो तो असा बोंबाटत असतो.  
खाली बघितलं तर मी फक्त पहिल्या मजल्यावर उभी होते.
म्हणजे तसंही हे आवरण वगैरे फेकून उडून जाऊन काही फारसा उपयोग नव्हता. न्यूटनने जर गुरुत्वाकर्षणाचा शोधच नसता लावला तर माणूस कधीतरी उडू शकला असता का ? म्हणजे उगाच आपण शोधात बंद झालो ! न्यूटनमुळे उडी मारली की आपल्याला खालीच येणं भाग पडतं ! आपण उडू शकत नाही !
वैतागे !

डॉक्टरांच्या मदतनीस बाईंनी हाक मारली म्हणून मी आत जायला वळले.
कावळा बसला केकाटत.
डांबरी माणूस डांबर जाळीत.
आणि…
वेड्या न्यूटनच्या आत्म्याला उचकी लागली !
डॉक्टरांसमोरील खुर्चीत बसता बसता मला ऐकू आली.


Sunday, 10 August 2014

म्हणतात...

गळणाऱ्या एकेक पानाने, पुन्हा रिकाम्या देठावर लगडावे म्हटले तर जमेल काय ?
आणि तेही जमलेच तर ते पान 'इथून मी फार लवकर निखळतो' म्हणून कुठल्या दुसऱ्या देठाला चिकटेल काय ?

…पुन्हा मी माझ्या सोळाव्या वर्षात शिरले तर…
आजही मला वाटतं, कॉलेजच्या त्या तळमजल्यावरच्या मोठ्या खिडकीपाशी तासनतास बसून मी दूरवर धुसर दिसणाऱ्या त्या प्रवेशद्वारावर नजर लावून बसेन.
तुझीच वाट बघत.
सकाळी आईची नजर चुकवून तुझ्यासाठी भरून आणलेला डबा…तसाच पुन्हा घरी परतेल…संध्याकाळी आईची नजर चुकवून, केराच्या डब्यात…पाच चपात्या आणि तुला आवडणारी भुर्जी.
अन्नदेवतेने शाप द्यावा असे म्हटले असते तर…?
अन्नाला मोताद होण्याची वेळ आली असती !

म्हणतात, ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याच्यावर नव्हे…ज्याचं आपल्यावर प्रेम आहे त्याच्यावर आपलं आयुष्य सोपवावं.
.........

कोणी शहाणा म्हणेल…
दुसऱ्या कोणावर आपलं आयुष्य सोपवावच का ?
आपलं आयुष्य आपण सांभाळावं !

हे सोळा वर्षाच्या कानांना सांगून बघा !
त्या नाजूक कानांमधून त्यावेळी नाजूक फुलं बहरत असतात !
दाट हिरवीगार झाडी !
त्यावर रंगीबेरंगी फुलं !
आणि शेकडो फुलपाखरं वगैरे !!
ठार बंद !
कान !