नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 12 October 2014

अम्मा, आन्डू ?

रात्र झाली होती. सूर्याने सगळा फाफटपसारा आवरला होता व चंद्राने रंगमंचावर एन्ट्री घेतली होती. मला चंद्र एकूणच फार आवडतो ह्याचं कारण बहुतेक तो शुभ्र असतो हे असावं. मी आणि माझी लेक, आम्ही दुसऱ्या गावात होतो. हॉटेलच्या सज्ज्यात मी उभी होते. दिवसा उजेडी दूर डाव्या हाताला समुद्राचा छोटा निळा आयत दिसला होता. आता त्याची फक्त गाज ऐकू येत होती. ह्या गावचा समुद्र दिसायला देखील सुंदर होता. वर काळंकुट्ट आभाळ, त्यात शुभ्र फुगीर चंद्र आणि बोलक्या समुद्राची दुरून कानावर येणारी गाज. बस. अजून काय हवे ? मी सुखावर तरंगत होते. तेव्हा जाणवले, चंद्राचा आजचा अख्खा प्रवास मी म्हटले तर निरखू शकते. माझ्या आणि त्याच्या मध्ये एकही अडथळा उभा नव्हता. मी लगेच आत गेले आणि अंगाखाली घ्यायला उशा घेऊन आले. लादीवर टाकल्या आणि दिले त्यावर अंग लोटून. म्हटलं आज तू आहेस आणि मी आहे. नेहेमी नेहेमी कुठल्या ना कुठल्या इमारतीमागे निघून जातोस आणि मग मला फार हिरमुसायला होतं. आता वर आकाशात तो आणि खाली जमिनीवर मी. थोडा वेळ गेला. आणि का मला वाटलं कोण जाणे. मी हात लांब केला. आणि त्या रात्री माझा हात थांबलाच नाही. म्हणजे ? म्हणजे नेहेमी आपण हात लांब किती करू शकतो ह्यावर आपल्याच हाताची बंधने असतात. पण ती रात्र अनोखी होती. त्या रात्री, त्याच्या आणि माझ्या मैत्रीत माझा हात देखील आडवा आला नाही. मी लांब करत गेले आणि हात लांब होत गेला. आणि शेवटी ? शेवटी शुभ्र चंद्राला स्पर्श करूनच थांबला. मग ? मग काही नाही. मग मी चंद्र आकाशातून उचलला. म्हणजे आपण जमिनीवरून जसा कागद उचलतो तसा, मी आकाशातून चंद्र उचलला आणि माझा हात मागे घेतला. मग कागद उचलल्यावर जशी जमिनीवरची ती जागा रिकामी होते, तसं आकाश रिकामं झालं. मी माझ्या मांडीवर त्याला घेतलं आणि थोडं गोंजारलं वगैरे. तेव्हढ्यात मला दुरून कुठून तरी लहान मुलाचा आवाज ऐकू आला. तो त्याच्या भाषेत त्याच्या आईला काहीतरी सांगत होता. "अम्मा, आन्डू गोन्डू आन्डू गोन्डू !"  त्यातलं अम्मा हे एव्हढंच मला कळलं. पण मग चंद्र मला म्हणाला की तो लहान मुलगा आईला विचारतोय की अम्मा, आत्ता तर चंद्र आकाशात होता ! मग आता कुठे गेला ?! हे चंद्राचं भाषांतर ऐकून मला फारच हसायला आलं ! म्हणजे माझ्याबरोबर गप्पा मारायला मी चंद्राला घेऊन आलेय आणि आता कोणालाच चंद्र दिसत नाहीये हे म्हणजे कायतरी भारीच होतं ! असं होऊ शकतं हे कधी माझ्या तसं लक्षातच आलं नव्हतं ! कधी काही रस्त्यात पडलेलं दिसलं तर आपण काही ते उचलायचं नाही असं आपले आईबाबा शिकवतात त्यामुळे आपण कधी तसे प्रयत्न करीत नाही ! पण आज मी साधा हात काय वर केला तर चंद्र माझ्याबरोबर गप्पा मारायला आला ! भारीच ! पुन्हा एकदा "अम्मा, आन्डू गोन्डू आन्डू गोन्डू !" समुद्राच्या बोलांमध्ये हे आहेच काहीतरी ! "अगं, तो लहान मुलगा घाबरलाय ! अचानक मी नाहीसा झालो म्हणून !" चंद्र मला म्हणाला ! लहान मुलं म्हणजे एक वैतागे ! कसली पण भीती वाटू शकते त्यांना ! असू दे ! घाबरू दे त्याला ! मला चंद्राशी कित्येक वर्षांच्या गप्पा मारायच्या होत्या ! मी खूप खूप लहानपणी देखील आजीच्या घराच्या पायऱ्यावर बसून त्याच्याशी कायकाय गप्पा मारी ! त्या त्याला आठवतायत का हे देखील मला त्याला विचारायचं होतं ! मी का म्हणून सोडू त्याला लगेच ?! नाही का ? पण...पण ते पोरगं फारच रडायला लागलं ! आणि रडण्याला थोडीच काही भाषा असते ! रडणं म्हणजे रडणं ! आता त्यात काय हा भाषांतर करणार ?! तो फक्त माझ्याकडे बघत बसला ! आणि मी त्याला नाक मुरडून दाखवलं ! इतक्यात आतल्या खोलीतून माझ्या लेकीने मला विचारलं, " आई, ते बाळ का रडतंय ?" हिला एक सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात ! तोपर्यंत मी चंद्राला धरून ठेवलं होतं ! "मला काय माहित ?!" मी तिला म्हटलं. चंद्राने डोळे वटारून माझ्याकडे बघितलं ! म्हणजे मी खोटं बोलले ना म्हणून ! आणि आपण असं आपल्या मुलांशी खोटं बोललो तर मग ते आपल्याशी खोटं बोलले तर आपण तक्रार कशी करणार ? म्हटलं, हे काही खरं नाही ! ही बाहेर आली तर बघेल माझ्या हातात आणि म्हणेल हा कसला पांढरा तुकडा घेऊन  बसलीयस वेड्यासारखी ! मी त्याच्याकडे बघितलं तर तो आकाशाकडे नजर लावून बसला होता ! लहान मूल…हरवल्यासारखं ! मला असं कोणी दु:खी झालेलं अजिबात आवडत नाही ! म्हटलं जा ! नकोच तू मला ! मी पुन्हा हात लांब केला आणि पुन्हा माझा हात लांब झाला ! रबरबॅण्ड सारखा ! दिला ठेऊन परत आकाशात ! जिथून घेतला होता, अंदाजे त्याच्या थोडं पुढे ! कारण तो आणि मी किमान दहा मिनिटं तरी एकत्र होतो आणि तो दहा मिनिटं आकाशातून गायब होता ! म्हणून ! "अम्मा !" पोरगं टाळ्या वाजवून आईला हाका मारू लागलं ! "आन्डू गोन्डू आन्डू गोन्डू !" त्याची अम्मा त्याला म्हणाली ! आता मला कोण सांगणार ती बाई काय बोलली ते ?! श्या ! मी मनात म्हटलं ! तर मला माझ्या कानात हळूच ऐकू आलं ! "अगं, त्या बाई त्यांच्या लेकाला सांगतायत की बघ, तुला सांगत नव्हते चांदोबा ढगाआड गेला असेल, येईल इतक्यात बाहेर !" मला हसूच आलं ! मी खोखो हसले !

"आई ! एकटीच काय हसतेयस गॅलेरीत बसून ! आत ये पाहू ! एकतर थंडी वाजतेय !"  आपली मुलं मोठी झाली की हि अशी आपल्यालाच ओरडतात ! श्या ! मी जागेवरून उठले आणि सगळ्या त्या चारपाच उशा घेऊन आत वळले ! लेकीने तिच्या पुस्तकातून डोकं वर उचलून माझ्याकडे बघितलं. मी पटकन तिच्याकडे गेले आणि तिच्या कपाळावरच्या आठ्या हाताने पुसून टाकल्या ! आणि ती आणि मी दोघी हसत सुटलो ! 

...ती का हसली माहित नाही, पण माझ्या हाताला चंद्राचा स्पर्श अजून जाणवत होता ! 
आणि म्हणून मी हसत होते !


2 comments:

Gouri said...

असा कसा सोडलास त्याला? त्या मुलाला तिथूनच दाखवायचा ना ... मग रडायचा थांबला असता तो! :) :D

श्रद्धा said...

Anagha Tai,
Kiti sundar :) :) tumachya madhe asalela ek niagas mul tumhi japtay. Really nice.