नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 7 February 2014

बाहुल्या...

चालत्या गाडीच्या खिडक्या, ह्या नेहेमीच चांगले दृश्य फ्रेम करीत नाहीत.
समाजाच्या विविध स्तरातून काही क्षणांमध्ये गाडी प्रवास करीत असते.
त्या क्षणांमध्ये आपण कधी फाटक्या भाकरीला मोताद असतो...
तर कधी फक्त वेळ निघून जावा म्हणून १०० रुपयांच्या कॉफीचा आपण आस्वाद घेत असतो.
तिचे वय पाच ते सहा असावे. खांद्यावरून खाली लोंबकळणाऱ्या झिपऱ्या. पिवळट परकर पोलका. त्यावर तपकिरी रंगाचे वर्तुळाकार ठसे. कसलेच ठराविक आकार नसलेले. माझ्याकडे तिची पाठ होती तेच बरे. डोळे नेहेमीच भेदून टाकतात. भर रस्त्यावरून कोणाकडेतरी वा कुठेतरी वळून बघत ती पळत होती. उजव्या काखेत अडकवून तिने तिची कापडी सोबतीण दाबून धरली होती. ती नागवी. मळकट गुलाबी. हातपाय हवेत. आपले आयुष्य त्या मुलीच्या हातात सोपवून टाकलेली.

माझे डोके म्हणजेच एक लोहचुंबक आहे बहुधा. एखादे दृश्य येऊन माझ्या मेंदूच्या एखाद्या कोपऱ्यात थाडकन चिकटते. एकावर एक थप्पी बनून राहिलेली ही दृश्य मला वाटतं कधीतरी आतल्या आत झोंबाझोंबी करितात. आणि मग एखादं खोलवर लपून गेलेलं दृश्य उसळ्या मारीत बाहेर येतं. वाळूवर पडलेल्या माश्यांच्या ढिगातून एखादा मासा तडफडत का होईना पण उड्या मारीत पाण्यात पुन्हा शिरतो…आपले उर्वरित आयुष्य आपल्या पदरात पाडून घेतो.

तिच्या एव्हढीच असताना माझी देखील एक बाहुली होती. पॅरीसवरून आली होती. माझ्या हातात. इतक्या दूरवरून प्रवास करून आली म्हणून मी तिला नखशिखांत भिजवली होती. आणि ती अशीच झाली होती. ओल्या कावळ्यासारखी. तो उन्हात बसून पुन्हा कोरडा तरी होतो. माझी बाहुली पुन्हा कधीच नाही पूर्ववत झाली.

…वाटले, गाडीचे फिरते चाक सोडून द्यावे. खाली उतरावे. ती माझी विस्कटलेली बाहुली पुन्हा हातात घ्यावी आणि त्या झिपऱ्या मुलीचा डावा हात माझ्या उजव्या हातात पकडावा...आणि असंच बागडत जावं.
दोघी दोघी.
कुठे ?
कोण जाणे.

घशात हुंदका.
डोळे…ओले.

गाडी गेटमधून आत नेली.
नटलेल्या दुनियेत प्रवेश केला.
मी अंगठा पुढे केला. हजेरी लावली.
माझ्या आयुष्यातील अजून एक दिवस कंपनीला दान केला.
खात्यातल्या वजाबाकीला महिन्याच्या एकाच दिवशी बांध लागतो.
फक्त एकाच दिवशी पाणी जमा होते.
बाकी सारे दिवस…धरण बेबंध उघडे…
धोधो रिकामे होत.
माझी बाहुली…
तिची बाहुली…
वा आम्ही आमच्या नशिबाच्या बाहुल्या ?
विस्कटलेल्या…
सजण्याची ओढ मनी ?
 
 

5 comments:

Abhijit Dharmadhikari said...

परिसराचे निरीक्षण आणि अभिव्यक्ती खूपच छान!

सौरभ said...

हम सब इस रंगमंच की कठपुतलिया है - आनंद :)

aativas said...

हं! आहे खरं असंच काहीसं ...सगळं कुठेतरी एकमेकांशी जोडलेलं. कशावरून कधी काय आठवेल ते सांगता नाही येत!

Gouri said...

सौरभ + १
माझी पण एक सोनेरी केसांची जर्मन बाहुली होती. अगदी भूत झालं होतं तिचं ... पण तीच आवडायची! माऊची बाहुली बघितली की तीच आठवते मला! :)

Abhishek said...

सौरभ + १
बरे आहे, आपल्या पण कठपुतल्या आहेत ते...
... और दिल चक्कर खा-गया... इथे मुन्नाभाई, पण वेगळ्या अर्थाने...