नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 15 December 2012

कुणाविना...

बारा तारखेला बाबा जाऊन दहा वर्षं झाली. हे सिद्ध झालं की आपलं माणूस गेलं म्हणून आपण काही मरतबिरत नाही. आता नववर्षाच्या आरंभदिनी नवरा जाऊन दोन वर्षं होतील. म्हणजे सिद्धांताला पुरावे मिळाले. ह्या सगळ्या आपल्या बालसमजुती असतात. माझ्या ह्या समजुती अगदी माझी लेक दोन वर्षांची झाली तरी टिकून होत्या. म्हणजे आमच्या शेजारचे काका अकस्मात गेले त्यावेळी मला अगदी ठामपणे वाटले होते...आता वर्षभरात काकी पण जातील म्हणून. पण तसं काही झालं नाही. त्यानंतरही बरीच वर्षं काकी जिवंत होत्या. बालवयात प्रेमपत्र वगैरे लिहिताना मी बऱ्याचदा लिहिलं होतं...तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही वगैरे वगैरे. तसलं काही झालं नाही. ह्या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी असतात. आपल्याला कोणी असं बोललंबिललं तर अगदी म्हणणं खोडून टाकायची गरज नाही...पण उगाच त्यावर विश्वास ठेवायला जाऊ नये. कारण आपले जगणे हे आपले असते. आपण शेवटी स्वत:साठी जगत असतो...स्वत:च्या कर्तव्यांसाठी जगतो...आपल्या टाळता न येणाऱ्या जबाबदाऱ्यासाठी जगतो.

हल्ली असं बऱ्याचदा होतं...विचारांची वावटळ आणि समोरील पडद्यावर टंकित करता येण्याची गती...ह्यांचा मेळ जुळत नाही. विचार सुसाट लाटेसारखे किनाऱ्यावर आपटून माघारी निघून देखील जातात...आणि मी तिथेच उभी असते....पायाखालचा ओला स्पर्श सुकवत. बधिर. एक लाट...दुसरी लाट...शुभ्र फेस वाळूच्या आरपार झिरपतो...आणि माझे विचार फेसाइतकेच अल्प आयुष्य घेऊन झिरपून जातात...
अस्तित्वाचे नामोनिशाण न ठेवता. 

माझी लेक मला बोलता बोलता म्हणून जाते..."आई, तुझं आयुष्य फार इव्हेन्टफुल झालंय...."

इव्हेन्टफुल आयुष्य...
आणि इव्हेन्ट मॅनेजमेंटचा ना ओ का ठो मला माहिती...!


21 comments:

अपर्णा said...

अनघा, काळजी घे.

Mohana Prabhudesai Joglekar said...

तुम्ही दिली आहेत त्याच्या बरोबर उलट पण खूप उदाहरणं आहेत. म्हणजे एकापाठोपाठ जीवलगानी जगाचा निरोप घेतल्याची. मला वाटतं, हे असं वाटणं व्यक्तिसापेक्ष आहे. आपण जे अनुभवतो त्यानुसार बनत गेलेली मतं किंवा ते तसं असावं/असेल असं वाटणं.

रोहन... said...

खरयं की... :)

समुद्रावर गेलो की लाटा जश्या सुसाट येत-जात असतात तसे विचार आणि आठवणी येत-जात असतात. किनार्‍यावर बसून वाळू हातात घेउन ती धरून ठेवायचा प्रयत्न केला तर ती अधिकच सतकत जाते नाही!!! त्यापेक्षा तळहातावर अलगद राहू दिली तर बराच काळ टिकते.... आयुष्य देखील असेच... दुसरे काय!!!

Shardul said...

.
तो कधी अचानक कधी समोरुन येतो
आणाभाकांची शकले सोबत नेतो
उधळून लावतो खुळ्या भाबड्या श्रद्धा
पण झुंजायाची जिद्द देउनी जातो
.

rajiv said...

खरेय अनघा !!

पण खरे तर बहुतेक वेळेला आपण स्वतःसाठी न जगता, आपल्या जबाबदार्यांसाठी वा इतरांच्या इच्छापूर्तीसाठी जगत असतो :(
फार थोड्या जणांना स्वतःसाठी जगण्याचे भाग्य वा धारिष्ट्य लाभते !!

Panchtarankit said...

वाचून निःस्तब्ध झालो.
मृत्यू हे चिरंतन सत्य आहे हे माहिती असल्याने कदाचित त्यांच्या विषयी मनात भीती दाटून असते. बाकी ह्या जीवनात सत्य म्हणन जे स्वीकारावे ते कल्पनेपेक्षा वेगळे भासते. कधी कधी सत्याची परिभाषा बदलते.
शेवटी १०० पर्सेंट पेस्तन काका म्हणतात त्यानुसार
लाइफ. म्हणजे सफरींग

भानस said...

अगदी खरं गं!

आपलं आयुष्य हे असंच कप्प्यांमधे विभागलेलं. हे सगळे जीव आपणच स्वत: जोडलेले, निर्मिलेले, जीव लावलेले. ओघाने जबाबदार्‍याही आल्याच. त्यांच्या लाटेखाली आयुष्य निसटून जातच... कारण आपण जबाबदारी स्विकारलेली असते. आणि जे स्वत:साठी जगतात ते सुखी असतात असेही नाहीच. तेव्हां खंतावून जावू नये. आठवणींच्या लाटेत काही काळ झोकून द्यावं आणि पुन: मार्गस्थ व्हावं.

Shriraj said...


Marnyasathi dhadas lagta, pan jagnyasathi tyachyapeksha jyast dhadas lagta. Ani je apla priyakar gela mhanun jiv sodtat tyaat suddha ekprakarcha swartha astoch ki... karan te jyanche priyakar ahet tyanchyasathi hyanna jagavese vatat nahich na...

Shriraj said...

Ani ho .... Mohana che mhanne mla patle... mhanje ekandar jivanache tatvadnyan vyakti sapekshach mhanayla have...

Anagha said...

अपर्णा, माझी अजिबात काळजी करू नकोस... :)

Anagha said...

मोहना, खरं आहे. फक्त हे असं एकामेकांमागे जगातून निघून गेल्यावर जे पाठी रहात असतील, त्यांचे काय होत असेल कोण जाणे. कारण जाणारे जातात...मात्र मागे राहिलेल्यांना गाडी पुढे खेचावीच लागते.

Anagha said...

रोहना, खरंय. :)

Anagha said...

शार्दुल,
'उधळून लावतो खुळ्या भाबड्या श्रद्धा
पण झुंजायाची जिद्द देउनी जातो'
सुंदर ! अगदी खरं ! :)

Anagha said...

राजीव, काही माहित नाही ! कारण ह्या जबाबदाऱ्या देखील आपल्याच माणसांच्या...! त्यामुळे शेवटी त्यातून कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळतोच !

Anagha said...

निनाद...हो...
आयुष्य...एक वेदना...
ती वेदना आत शोषून घेतली तर बरे...
कारण वर दिसणाऱ्या जखमांना उगाच खपल्या धरतात...आणि त्या पुन्हापुन्हा उचकटत रहातात !
नसता खेळच होतो तो !
:)

Anagha said...

भाग्यश्री, माझं एक बरं आहे...दिवसाच्या नुसत्या डेडलाईन्स लागलेल्या असतात ! मग खरं तर फारसा वेळ मिळत नाही...मागे वळून बघायला ! :)

Anagha said...

श्रीराज, मलाही असे वाटते खरे. :)

रोहन... said...

बाकी तुझी मुलगी बोलतेय ते काही खोटे नाहिये बरे.. ;) आम्ही दोघे एकदम सेम टु सेम अ‍ॅग्री बर... ;)

Anonymous said...

ही पोस्ट वाचायची राहिली होती की कदाचित मी वाचत नव्हते....

एक सांगू पायाखालच्या वाळूकडे एकदा बघ , आम्हा सगळ्यांची पावलं उमटलेली दिसतील तुझ्याभोवती कडं करून....

बाकि आयुष्य हाच एक मोठा ईव्हेंट आहे गं!!

Yogesh said...

अगदी खरयं!!

नामधारी विनवी (प्र)सिद्धासी... said...

लहान मूल जन्मल्यानंतर त्याचे वय वर्षे २ ते ३ दरमयान महाखट्याळ आणि वांड असते, ते आपल्या आईबापाच्या अगदी नाकीनऊ आणते असे ऐकिवात आहे,

आज आपला हा लेख वाचून त्याची प्रकर्षाने तरीही पटकन ८वण झाली,,, म्हणून ही टिप्पणी...