नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 4 October 2012

बदल...माझ्यातील...तुझ्यातील...आपल्यातील

मागील पोस्टवरील संहिता/अदिती ह्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर उत्तर लिहावयास सुरवात केली तर त्यातून बरेच विचार डोकावू लागले. आणि मग ती निव्वळ प्रतिक्रिया न रहाता एक नवी पोस्ट आकार घेऊ लागली.

त्यांनी मांडलेल्या एकेक मुद्द्यांवर मला सुचलेले विचार...

मुद्दा १) महानगरपालिका आणि सरकारची, शाळांची जबाबदारी.
लहान मुलं व त्यांना वळण लावणे ही जबाबदारी फक्त शाळांची होऊ शकत नाही. ती पालक म्हणून आपली अधिक असते. ह्याचेच एक दुसरे उदाहरण म्हणजे लाल सिग्नल असून देखील तो तोडून आपले वाहन पुढे दामटवणारे पालक गाडीत आपल्या बाजूला बसलेल्या आपल्या मुलांना चुकीचे धडे देत असतात. त्यामुळे तो मुलगा / मुलगी मोठी झाल्यावर जर दुर्दैवाने काही विचित्र घडले तर त्याचे मूळ कारण हे 'पालकांकडून चुकीची शिकवण दिली जाणे' हे बऱ्याचदा दिसून येते.
जागोजागी कचऱ्याच्या कुंड्या : जागोजागी कचरा कुंड्या असणे हे आवश्यक हे बरोबर. परंतु, शिवाजी पार्कच्या परिसरात अतिशय सुंदररीत्या ठेवल्या गेलेल्या कचराकुंड्या रातोरात गायब झालेल्या मी बघितल्या आहेत. त्यामुळे हातातला कचरा केवळ नजरक्षेत्रात कचराकुंडी नाही म्हणून आहोत तिथे टाकून देणे ही एक चुकीची मानसिकता आहे.

मुद्दा २) इतक्या गर्दीत कचरा होणे हे शक्य.
विसर्जनाची गोष्ट घेतली तर चौपाटीवर कचरा टाकण्यासाठी कुंड्या होत्या/आहेत. परंतु, पुन्हा वर मांडलेला विचार येथे लागू पडतो. आहोत त्याच जागी कचरा टाकून पुढे निघून जाणे ही चुकीची सवय/मानसिकता आपल्याला लागलेली आहे. प्रत्येकाने असेच केल्याने शेवटी आपल्या परिसराचा उकिरडा झालेला दिसून येतो. मोठमोठ्या डिग्र्या घेतल्या म्हणजे माणसे शिकली हा एक गैरसमज आहे. जो माझा हल्लीच दूर झाला आहे. शिकली सवरलेली माणसे समाजाला बाधक अशी कामे करताना रस्तोरस्ती दिसून येतात. संहिता/अदिती यांनी मांडलेल्या विचारांत  बरेचदा निसर्गामुळे होणाऱ्या कचऱ्याचा उल्लेख दिसतो आहे. (वाऱ्याने कागद उडणार...वगैरे. ) हल्ली सगळ्यांच्याच हातातून वारा फारच सामान उडवू लागला आहे. त्यावर ताबा मिळवायला हवा. आता ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. हा मुंबईतील वारा आहे त्यामुळे त्यांना तो आवरता यायलाच हवा. बरोबर आहे का त्यांचं म्हणणं ?

३) लोकांनी केलेल्या कचर्‍यासाठी आपण स्वतःलाच का बडवून घ्यायचं?
लोकांनी कचऱ्यासाठी स्वत:ला बडवून घेणे गरजेचे आहे कारण ही 'लोकं' म्हणजेच समाज. आणि कचरा हा त्यांच्यामुळे होताना दिसतो. (आता सध्या आपण 'वारा' बाजूला ठेवू.) हल्ली 'पैसे' हीच भाषा आपल्याला कळते. त्यामुळे 'दंड' हा आर्थिकरूपी असला तर बरे होईल. हा तुमचा मुद्दा बरोबर.
पुन्हा...मंडळे म्हणजे अनेक नागरिक. सगळीच कामे पैश्यातून व्हावीत व आपली मूळ सवय बदलली जाऊ नये हे चुकीचे. माझे शहर हे 'माझे' आहे. त्यामुळे ते स्वच्छ ठेवणे ही माझी जबाबदारी आहे ही भावना प्रत्येकाची व्हायला हवी. आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तर आपल्या माणसांमध्ये ही भावना रुजवायलाच हवी. मनात आले...आणला गणपती...केली सजावट...आणि टाकला समुद्रात हे सर्वच फार घातक आहे.

संहिता/अदिती ह्यांच्या मुद्द्यांवर विचार करीत असता कचरा आणि गर्दी यांचे व्यवस्थापन व नियोजन याविषयी काही कल्पना डोक्यात आल्या.
१) 'विशेष सोयी'साठी शुल्क भरून आपण ती सोय मिळवतो. उदा. रेल्वे स्थानकावर/विमानतळावर जाण्यासाठी तिकीट घेऊन आत जातो. तसेच विसर्जनस्थळी तिकीट घेऊन आत प्रवेश असावा. प्रवेश फक्त विसर्जनासाठी असावा व तो देखील शुल्क भरून. प्रत्येक मंडळाला ठराविक प्रमाणात माणसे, संबंधित शुल्क भरूनच आत नेण्यास परवानगी दिली जावी.
२) मूर्तीच्या उंचीच्या प्रमाणात विसर्जन शुल्क आकारण्यात यावे. १ ते २ फूट उंचीपर्यंत नि:शुल्क अनुमती असावी.
३) प्रत्येक गणपतीबरोबर केवळ तिकीटधारकांनाच प्रवेश द्यावा व इच्छुक प्रेक्षकांसाठी बाहेर मोठ्या पडद्यांवर विनातिकीट विसर्जन दाखवण्यात यावे.
४) ह्यापुढे नवनवीन मंडळांना गणपती बसवण्यासाठीची परवानगी नाकारली जावी. इथे 'एक गाव एक गणपती' ही कल्पना उपयुक्त ठरू शकेल. कदाचित मुंबईत 'एक वॉर्ड एक गणपती' असे का करू नये ? ह्यातून अनेक मोठ्या स्पर्धा, मनोरंजनाचे खेळ घेता येऊ शकतात.
५) प्रत्येक मंडळाने स्वत:च्या २० कार्यकर्त्यांची संख्यानोंदणी महानगरपालिकेत आधी करावी. व त्यांना वेगळे कपडे घालून विसर्जनस्थळी संध्याकाळी ५ पासून हजर ठेवणे आवश्यक केले जावे. कार्यकर्त्यांची संख्या मूर्तीच्या उंचीशी निगडीत असावी. तितके कार्यकर्ते हजर झाले तरच मंडळास विसर्जनास परवानगी दिली जावी. 

या व अशा प्रकारच्या उपायांनी वेड्या गर्दीला आळा घालून, स्वच्छता राखून, शिस्तीने गणपतीचे व गैरशिस्तीचे विसर्जन पार पडणे शक्य होईल असे मला वाटते.   

आता ह्या सर्व चर्चेतून माझ्या मनात येते...'माझ्या गावाची स्वच्छता ही जबाबदारी दुसऱ्या कोणाची नसून ती माझी आहे असे प्रत्येक नागरिकाला वाटायला हवे' हा 'चर्चेचा विषय' होऊ शकतो इथेच आपल्या समाजाच्या मानसिकतेची हार आहे. तो चर्चेचा कमी आणि प्रत्यक्ष कृतीचा अधिक असा व्हावयास हवा.
नाही का ?
( मला एका मित्राने विचारलं...तुला वेळ कुठून मिळतो जाऊन साफसफाई करायला ?" म्हटलं साधं गणित आहे..."तुम्ही दर्शनासाठी, विसर्जनासाठी वेळ काढता...आणि मी साफसफाईसाठी." )

18 comments:

Anonymous said...

संपुर्ण पोस्टला अनूमोदन अनघा !!

rajiv said...

खरे तर 'एक जनहित याचिका ' ज्यायोगे शासनाला याबाबत अंमल करण्यास न्याय प्रक्रियेचा पाठींबा मिळेल व समाजाला पण जाणीव होईल..
ध्वनी प्रदूषणबाबत ज्याप्रमाणे न्यायालयीन आदेश असल्याने पूर्वपरवानगी घ्यावी लागते ...असेच काहीसे.. करणे आवश्यक आहे

Anagha said...

तन्वे, काही विचार आहेत डोक्यात. बघू कसं नेता येतं पुढे ते. :)

Anagha said...

राजीव, डोक्यात हेच आहे ! तुमच्या मदतीशिवाय काही हे होणार नाही ! जनहित याचिका कशी करायची असते ते सांगा !

Snehal said...

Asa samaj aahe ki tumhi gharat ekda ganpati mandla ki darvarshi mandaylach hava, jar navsacha asel tar navsa pramane, mala vavte bappach ata bolel ki babano ata jar tumhi gharaghart, gallibolit mala mandle kiva,tar matra me nakki naraj hoil....... Ganpatimurtyache vadhate praman kharach kuthe tari aatokyat aanayla have, navin mandalala parvangi na dene+1, darvarshi visarjan karnyapeksha 11 varshani vagare ganpati visarjit karava ase maze mat aahe, tyachi pratikruti mhanun jastit jast 1ft murty visarjan karavi ha badal khupach farak padel ani ti murti shaduchi aasavit......

Sakhi said...

अनुमोदन...
हि पोस्ट मस्त झालीय... नुसताच प्रश्न न मांडता त्यावर उपाय काय याचा विचार करणारी...

:)

सागर पुन्हा नवीन..... said...

मस्तच ह्या मुद्यावर पडलेल्या बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि बरेच मुद्दे प्रतेक्षात अमलात आणण्य सारखे आहेत....

Mahendra Kulkarni said...

नुसती तोंडपाटिलकी करणारी बरीच मंडळी असतात, पण तुम्ही करून दाखवलं हे महत्त्वाचे.
अती विचारवंत लोक असले की फक्त विचारच करत रहातात, प्रत्यक्ष कृती करण्यासाठी त्यांना वेळ नसतो-करण सगळा वेळ केवळ विचार करण्यातच दवडला जातो.

Anagha said...

स्नेहल, हा तुझा प्रस्ताव नक्कीच विचार करण्याजोगा आहे. आपण भेटू तेव्हा बोलूच.

Anagha said...

सागर, अजून काही नवीन कल्पना, अनुभव असतील तर नक्की सांग. कारण त्यामुळे त्रुटी दूर व्हायला मदतच होईल.

Anagha said...


महेंद्र, आता आपण इतकी लोकं जमा झालो आहोत...समविचारी आहोत. मग एकत्र येऊन काही चांगले काम करू शकलो तर चांगलेच नाही का ? नेहेमी, बुद्धी + श्रम ह्यांचा मिलाप व्ह्यायला हवा. :)

Abhishek said...

काही लोकांना कचऱ्यात रहायला कसा काय आवडत/जमत! आणि वर अशा बेताल वागण्यावर हक्क दाखवायचा म्हणजे तर अतीच. सो कॉल्लड सुशिक्षित लोक पण अशा चुका करतात हे वाचून अशा समाजाच हसूच येत. (गम्मत म्हणजे हीच लोक सिंगापोर, युरोप, अमेरिकेत गेली की मात्र त्यांच्यातील 'सभ्य' नागरिक जागा होतो)

हेरंब said...

शेवटचा कंसमामा सगळ्यात भारी :)

Anagha said...

अभिषेक, अब्दुल कलाम ह्यांचे ह्याच विषयावर भारतीयांसाठी लिहिलेलं एक पत्र आहे. वाचलंय का ? परदेशात शहाणे आणि मायदेशात वेडे...ह्या विषयावर.
प्रतिक्रियेबद्दल आभार. :)

Anagha said...

हेरंब, मग काय तर ! :) :)

Shriraj said...

Rajiv kharach ase zale tar barach ala basel nahi ya prakarala.

Shriraj said...

Anagha, ganpatichya divsat mi mumbait asen tevha mi tuzya madatila yein ... kharach. :-)

सौरभ said...

१००% सहमत. विसर्जनास आलेला प्रत्येक गटाने त्यांच्या व्याप्तीनुसार कचरा गोळा करण्यासाठी काही ना काही सोबत ठेवावे.