नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 30 October 2012

विहीर

मी विचारात पडते. त्यावेळी विचारांची ती एक विहीर असे. कधी माझ्या हातात कॉफीचा जाडजूड मग असतो, कधी एखादा कांदा तर कधी एखादे पुस्तक. मी फक्त आत डोकावू पहाते आणि विहीर मला आत ओढून नेते. ती काळ्याभोर पाण्यावर फुंकर घालते. पाणी शहारते. तरंगू लागते. मी त्यात फुका गोल गोल गिरक्या घेत रहाते. विहिरीला त्याची तमा नसते. एक गिरकी मला कुठे घेऊन जाईल ह्यावर माझा तो काय ताबा ? मी देखील ना विरोध करत...ना कधी रडत भेकत.

आज पहाटे पहाटे जाग आली. डोळे उघडते ना उघडते तोच मला तिने आत खेचून नेले.
शरण मी उभी राहिले, ती थेट एका न्हाणीघराच्या बंद दारासमोर. हलकेच मी दार ढकलते. पांढऱ्या फरशींवर लाल काळे रक्त. कुठे आतली फरशी दिसावी तर कुठे रक्त थांबून गेलेले. जणू वहाणे मरून गेले. चार दिवसांपूर्वीच स्तब्ध झालेले रक्त. वाटते गोठलेल्या रक्तावर बोट टेकवावे. बोट कपाळी लावावे. त्याच तर रक्ताचे मी कधी कपाळी कुंकू लावलेले. ते रक्त ज्या देहात वहात होते...त्याच देहाचे नाव मनी जपले होते...त्याच त्या नावाने गौरीहार पुजला होता. अंगभर पिवळा पदर...कपाळावर मुंडावळ्या...तांदळाच्या शुभ्र कण्यांत हळूहळू लपत जाणारी...नाजूक पार्वती...अन्नपूर्णा...
दारी आलेल्या पाहुण्याला दीर्घायुष्य दे...
दारी आलेल्या पाहुण्याला दीर्घायुष्य दे...
दारी आलेल्या पाहुण्याला दीर्घायुष्य दे...

तितक्यात गजर वाजतो.
क्रूर विहिरीच्या तावडीतून मला बाहेर फक्त घड्याळ खेचू शकते.
एक काम...दुसरे काम...तिसरे काम....
मग मी एक मुंगी होते.
स्वत:ला कामांच्या गर्तेत झोकून देते.

14 comments:

श्रिया (मोनिका रेगे) said...

प्रत्येक व्यक्तीला असते तिची एक वेगळी विहीर..
कधी कधी हि विहीर नको तितकी खोल वाटते तेव्हां लिहित सुटायचे हा आपला माझा मार्ग..
...हळू हळू विहिरीच्या भिंतीवर चढून, आतल्या गारव्याला,थंडीला आणि पडताना भरलेल्या धड्कीला विसरण्याचा प्रयत्न करत किती वेळा काठ गाठलेला आठवतो.
छान लिहिलेस अनघा...

Gouri said...

मस्त! :)
हे गिरमिट फार डेंजर असतं ... कुठल्या बेसावध वळणावरून आपण या विहिरीत ओढले जाऊ याची शाश्वती नसते. कधीकधी वाटतं, काम करण्याची निकड नसती, तर यातून बाहेर कसं पडता आलं असतं!

Anonymous said...

>>>कधीकधी वाटतं, काम करण्याची निकड नसती, तर यातून बाहेर कसं पडता आलं असतं!.... अगदी !!

बाकि अनघा तूला दरवेळेस काय मस्त लिहीलेस म्हणून सांगायचं ... ते गृहित आहे :) :) ... विचार करत रहा आणि मनात आलेल्या विचारांना इथे मांडत रहा... तुझ्या आरश्यात आम्हाला आमचेही प्रतिबिंब सापडते....

श्रद्धा said...

अनघाताई,
एक साधासाच विचार जेव्हा तुमच्या लेखणीचं बोट धरून जेव्हा कागदावर उतरतो तेव्हा किती तरल आणि अलवार होऊन जातो. शब्दांना जर विचार करण्याची ताकद असती न तर त्यांनी देखील स्वतःला भाग्यवान मानलं असतं तुमच्या हातून त्यांच सोनं झाल्याबद्दल. अशाच व्यक्त होत राहा.

Shriraj said...

Anagha, tuza ha lekh ani Emily Bronte chi 'A little while, a little while' ya kavite madhye thoda virodhabhas janavto. Mhanje tithe ti.kamatun visava milalya var sukhavtana diste ani ithe tu visavyatun baher nighnyasathi jhatatana... pan donhi titkech khare ani mhanun parinamkarak ahet yat vadach nahi.

Ani ho roman lipitle marathi chalavun ghe... kay karu ya mobile varun hi ek gosht nahi jamat bagh

हेरंब said...

बाप रे.. कसलं भयंकर लिहिलं आहेस... !!!! :((((

Anagha said...

मोनिका, गौरी, तन्वी, श्रद्धा, श्रीराज आणि हेरंब...मला माझी विहीर उलगडण्यास मदत केल्याबद्दल आभार....

BinaryBandya™ said...

chan lihlay .

Devashri said...

मी हि अनेकदा अशाच खोल विहिरीत डोकावून पाहिलं आहे.

त्यात मला एक प्रतिबिंब दिसते, त्यात चेहरा माझाच असतो, पण तरी ती मी नसते. ती कुणी वेगळीच असते. तिच्या ओठांवर हसू असते, पण तिचे डोळे गढूळल्यासारखे असतात. ती मी नाही असे समजून मी दुर्लक्ष्य करण्याचा जितका जास्ती प्रयत्न करते, तितकीच ती माझ्या जास्त जवळ येते.

मी निकराने प्रयत्न करते; तिच्यातला आणि माझ्यातला फरक दाखवण्यासाठी मी धडपड करत राहते.

पण तरीही...तिचे डोळे जे सांगतात, अगदी तेच विचार माझ्या मनात असतात. मला वाटते, तिला कुठली जादू तर अवगत नसेल? माझ्या मनातले विचार जणू ती वाचत तर नसेल...??

मी स्वतःला धीर देत राहते, आणि हळूहळू अगदी स्वतःच्या मनाविरुद्ध कबूल करते, कि हो ... ती आणि मी सारख्याच आहोत ...

हो आम्ही सारख्या आहोत.... ती मीच आहे.. काही काळापूर्वीची .... स्वतःला फसवणारी .... नसलेल्या गोष्टी आहेत असं मानून सामाधान मिळवू पाहणारी, मुठीतून वाळू निसटताना धडपडणारी, आणि काही करू न शकल्याने कोमेजलेली .....

मग भ्रमनिरास होऊन शहाणपणाच्या चार गोष्टी शिकून बाहेर पडलेली मी तिच्याकडे बघून हळूच हसते आणि तिला सांगते कि काळजी करू नकोस... मी आहे... तू संपलेली नाहीस . उलट आता जास्त समंजस आणि शहाणी अश्या माझ्या हाती आता तू सुखरूप आहेस..... तू आहेस....

thank you Anagha....

सौरभ said...

लेख वाचला. मनात एक कृष्णविवर तयार झालं. सगळे विचार त्यात लुप्त. silence.... :-|

अपर्णा said...

हम्म...अनघा हे वाचून मला हॅरी पॉटरमधली ती "विहिर" आठवली डंबलडोच्या ऑफ़िसमधली....

काळजी घे....

रोहन... said...

विहीर कितीही खोल असली तरी बारबार उसमे नीचे जानेका जरुरत नाही है... :D बालटीसे पाणी निकालके वापरनेका..

भानस said...

कितीही निकराने प्रयत्न केला तरी या विहीरींचे झाकण उचकटले जातेच. :( कुठल्या कारणाने ते सरकेल याचाही अदमास कधीच येत नाही...

पण या डोहातून सुळकन काठ पकडणे आपल्याला जमायला हवे... नव्हे जमवायलाच हवे ते... सांगणे सोपे करणे अवघड तरीही म्हणेन करच... !

Panchtarankit said...

निबद्ध झालो आहे.