नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 18 July 2012

टूर'की'...भाग १०


दगडांची घरे. दगडांची मंदिरे. झाडीत लपलेली शांत वस्ती. समोर नदी. बारा महिने भरून वहाणारी. अल्याड गाव. पल्याड गाव. बोचरा हिवाळा. थैमान पावसाळा. प्रखर उन्हाळा. कालमान. बाल्य, तारुण्य, वार्धक्य. कालातीत. धीट सूर्य. भित्रा चंद्र. भर काळोखात अकस्मात हल्ला. लुटालूट, बलात्कार, खून. कत्तली. रक्त. हाडमांस. मृत्यूचे थैमान. वस्ती नष्ट. पिढ्या गायब. चाचे. समुद्रातून जमिनीवर जहाजातून येणारे लोंढे. अशांत ऑलिम्पस किनारा.

समुद्र निळाशार समोर आणि त्यात हातपाय नाही मारायचे हे काही खरं नाही. चिराली समुद्राचा अपमान. सकाळी त्याचा मान राखून झाला. बागेत बसून नाश्ता झाला. एक डुलकी झाली. त्यानंतर दिवस खरा सुरु झाला. दोन सायकली घेतल्या. सायकलींवरून आम्हीं मायलेकी निघालो. ऑलिम्पसच्या दिशेने. भग्न अवशेषांपर्यंत रस्ता नाही. समुद्रकिनारी आपल्या सायकली लावायच्या. आणि वाळूत पाय टेकवायचे. चालायला सुरुवात करायची. डाव्या हाताला समुद्र. सानथोर पर्यटक. कोणी पाण्यात. कोणी किनाऱ्यावर. उन्हात विसावलेले. किनारी छोटे मोठे, रंगीबेरंगी गोटे विखुरलेले. निळे पाणी, पिवळी वाळू, त्यानंतर गोटे, पुन्हां वाळू. असा पट्ट्यांमध्ये किनारा. वाळू तापलेली. पायाला चटके देणारी. माणसामाणसामध्ये फरक किती. तेच ऊन अंगावर घेत तरुण तरुणी विसावलेल्या. आणि आमच्या पायात स्लिपर्स असून देखील तप्त वाळूचे आमच्या पायांना चटके. शेवटी, आपल्या शरीराला ऊन माहित असतं...गोऱ्यांना त्याचं नाविन्य. ते ऊन अंगावर घेत होते. आम्हीं विचार करत होतो...शूज घातले असते तर बरं झालं असतं. पायांना चटके नसते बसले. किनारा लांबसडक होता. सकाळी पाण्यात गेलो होतो तेव्हां देखील पाण्याची फार खळखळ नव्हती. समुद्र शांत होता. उगाच थैमान नव्हते. संथ निळ्या लाटा, पायाला गार गोट्यांचा स्पर्श, डोळे मिटले तर सर्वत्र शांतता. पाण्याचाच काय तो आवाज. सहजगत्या हात जोडले जावेत. मनात ॐ उमटावा. किनारा ३.५ किलोमीटर लांबीचा. गाव त्या टोकाला. रोमन भग्न अवशेष. आम्हीं त्यांच्या शोधात निघालो होतो. दूर हिरवे डोंगर दिसत होते. दाट झाडी. आयुष्यातली विसेक मिनिटे सरली आणि एक वळण आले. अकस्मात. समुद्र आपल्या मार्गे डाव्या दिशेने पुढे जात होता. मात्र वाळूचा मार्ग उजव्या हाताला वळला होता. आता समोर नदी होती. नदी सागराला मिळत होती. नदीकाठी झाडी, त्यात गुलाबी फुलांच्या डवरलेल्या फांद्या. वाकून समुद्राकडे नजर टाकणाऱ्या. समुद्र त्याच्या धुंदीत. आपल्या मार्गाने पुढे निघून जाणारा. अबोल नदी त्यात मिसळून जाणारी. कधी कुठे....हे तिलाही कळत नसावे. गोडे पाणी खाऱ्या पाण्यात मिसळून गेले....स्वत:चे स्वभावधर्म विसरले....कोणाला कधी जाणवले ? 
ऑलिम्पस. इ. स. पूर्व दुसऱ्या शतकातील महत्त्वाचे लिशियन शहर. हेफायस्तोस ही मूळ देवता. अग्निदेवता. जवळच असलेल्या चिराली गावातील, किमिरा ह्या अनादी अग्नीपासून ह्या देवाची उत्पत्ती झाली असावी. समुद्रावरून वहाणाऱ्या वाऱ्यावर बसून चाचे येत. शहर लुटत. ताबा घेत. इ. स. दुसऱ्या शतकामध्ये रोमन सम्राटांनी चाच्यांकडून हे शहर बळकावले. हल्ल्यांना परतवण्यासाठी किल्ले उभारले. शेवटी पंधराव्या शतकात तुर्कस्तानात ऑट्टोमान सम्राट हजर झाले. आणि हे शहर पुन्हां रिकामे झाले.


तुटक्या कोसळलेल्या अवशेषांमधून चालताना, फिरताना काही वेगळेच वाटते. त्यातून अगदी इ.स.पूर्व इतिहास असेल तर अधिकच. आपण हॉलीवूड्चे चित्रपट बघत असतो. कुठल्या ना कुठल्या चित्रपटाने हा असा जुना इतिहास आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष उभा केलेला असतो. त्यामुळे अशा पतन पावलेल्या शहरांतून, गावामधून फिरत असता आपोआप ती चित्रे डोळ्यांसमोर येऊ लागतात. त्याकाळचे त्यांचे वेष, त्या स्त्रिया, ती बालके....ती युद्धे...ते चाचे...ते दरोडे. खडतर आयुष्य. आत जंगलात लपून बसलेलं, नदी आणि समुद्र ह्यांच्या संगमापाशी वसलेलं एक शहर. शेतीभाती, व्यापार, आवकजावक. गावातून वहाता झुळझुळ झरा. आसमंतात घुमून राहिलेला किड्यांचा आवाज. पाऊल टाकले की सुक्या पानांचा आवाज. वरून लटकलेल्या फांद्या...मोकळ्या जागांतून जमिनीवर येणारं ऊन. थोडा अंधार पडला की भुतांचंच गाव वाटत असावं. मध्येच पायाशी नजर जाते तेव्हा एखादा छोटासा दगडाचा तुकडा दृष्टीक्षेपात येतो. त्यावरही नक्षीकाम. कोणा माणसाने मन लावून एकेक छेद दिला असेल. एकेक फुल...एकेक पान. कदाचित त्यानंतर माझाच हात त्या दगडावर पडला असेल. काही विचित्र भावना थरारून जाते. वाटतं हा तुकडा घेऊन मायदेशी परतावं. "घेऊन जाऊया का गं हा तुकडा घरी ?" "नको....!" लेक म्हणते. मग मला आठवतं. ज्याज्या देशाला भेटी देण्याचा योग येतो त्या त्या देशातून मी तिथली दगड व माती छोट्या बाटलीत भरून घेऊन येते. स्पेनला माओरका बेटावरून जमा केलेले दगड तेथील विमानतळावर अडवले होते. बॅग उघडायला वगैरे लागली. मी हे असे माती, दगडधोंडे का जमवलेत ह्याचे त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. म्हणजे....काही तसं काही खास कारण नाही....सहजच. सहजच म्हणजे ? म्हणजे मी असे जमवते....काय ? दगड ? अं ? हो...म्हणजे जिथे जाईन तिथली माती आणि दगड !...हे असं स्पष्टीकरण देताना माझं मलाच काहीतरी असं म्हणजे स्टुपिड वगैरे वाटलं होतं....पण सोडली नाही मी माझी दगड माती. पुन्हा बॅगेत टाकली...आणि घेऊन आले घरी ! आता जर अडवले, तर हा कोरीव कामाचा दगड ताब्यात ठेवल्याकारणास्तव चोरीचा आळच यायचा ! गुमान सुक्या पानांवर तुकडा ठेवून दिला. जमिनीवर विखुरलेलं अप्रतिम मोझॅक. अपार मेहेनत. 
  
गावातून बाहेर आलो. तेव्हा बाहेर पुन्हा निळं आकाश आणि निळं समुद्र. आत असं काही असेल ह्याचा बाहेर तसा काही मागमूस लागत नाही. वसाहत....लुटारू चाच्यांपासून थोडीफार लपून रहात असावी. वाळूतून पुन्हा परतीचा रस्ता. वाळू थंडावली होती. उन्हं थोडी मवाळली होती. समुद्रात बोटी डुलत होत्या. माणसे तरंगत होती. इथे सूर्य समुद्रात डुबक्या घेत नाही. त्याचं आणि समुद्राचं मुळी संध्याकाळी जमत नाही. म्हणजे दिवसभर भांड भांड भांडून नवरा बायको जसे रात्र झाली की सगळी भांडणं विसरतात...पण ते सगळं आपल्या देशी....आपला सूर्य आणि आपला समुद्र...रोज रात्री आपली रुसवेफुगवे विसरतात आणि मिठीत गुड्डूप होतात. ह्याचं मात्र भलतंच. एकाचं तोंड एकीकडे तर दुसऱ्याचं दुसऱ्याच दिशेला.
रात्री पुन्हा माय लॅण्ड... ओझेलशी गप्पा. ओरहान पामुक. इस्तान्बुलमधील तुर्क लेखक. २००६ सालचा वाङमयातील नोबेल विजेता. My Name is Red. मी वाचलं आहे हे पुस्तक. अतिशय वेगळं. आणि मला प्रचंड आवडलेलं पुस्तक. सगळ्यांनाच आवडेल की नाही खात्री नाही. परंतु, मला त्यातील वाङमयीन मूल्यासाठीच, त्याच्या लिखाणाच्या शैलीसाठीच हे पुस्तक अतिशय आवडलेलं होतं. इस्तान्बुलमध्ये जिथे कुठे दिसेल तिथे माझी लेक मला ते पुस्तक विकत घेण्याचा आग्रह करीत होती. "आई, त्याच्या देशात तू त्याचं पुस्तक विकत घेशील ! किती छान ! घे ना गं !" पण माझं सगळं गणितच वेगळं. मी पैसे 'कन्व्हर्ट' करीत राहिले. मुंबईत कमी किमतीत मिळेल गं मला...असं तिला सांगत राहिले. ओझेल मुळचा इस्तान्बुलचा रहिवासी. आयुष्यातील रहाटगाडग्याचा कंटाळा आला आणि म्हणून चिरालीत समुद्रकिनारी एक जागा विकत घेतली. आणि हे हॉटेल थाटलं. निसर्गाची जवळीक साधत. ओरहान पामुक ह्याबद्दल इथल्या लोकांना काय वाटतं ? अभिमान ?....विषय सरकत गेला पुढे पुढे....अभिमान...पूर्वी वाटत असे. इथल्या लोकांना त्याचा खूप अभिमान वाटत असे...आता नाही वाटत. का बरं ? मी विचारलं. कारण आता तो मुलाखतींमध्ये, सभांमध्ये तोंडाला येईल ते बरळतो. म्हणजे ? म्हणजे अशी काही मुद्दाम मतं मांडतो जेणेकरून सतत त्याच्यावर चर्चा होत राहील...लेकीने माझ्याकडे बघितलं. तिला माझं ह्या लेखकावरचं प्रेम माहित होतं. "आई, म्हणजे इथला सलमान रश्दी आहे वाटतं तो !" मी हसले. ओझेलला तसा फारसा रश्दी ओळखीचा नव्हता. विषय तिथे तुटला. अकस्मात दूर कुठेतरी आकाश कडाडलं. वीज चमकली. आभाळ फुटलं. ओझेल आणि मंडळी धावपळ करू लागली. लाकडी सामान छताखाली घेऊ लागले. त्यांच्याबरोबर आम्हीं दोघी देखील इथे तिथे धावलो. उशीर झाला होता. उद्या सकाळी अकराच्या सुमारास चिराली सोडायचे होते. कपाडोक्यासाठी सकाळी विमानात बसावयाचे होते. दोघी सायकलींवर स्वार झालो. निमुळत्या रस्त्याला लागलो. उगाच ते भग्न गाव डोळ्यांसमोर येत होते...

इ. स. पूर्व गाव. अंधारात लपलेलं. मशाली पेटलेल्या. पावसाचा मारा. विजांचा कडकडाट. उसळत्या लाटांचा खोल आवाज. दगडी घरं. आईच्या कुशीत बाळं. क्षणाक्षणाला दचकून उठणारी बाळं. लांब पांढरीशुभ्र दाढी लोंबणारी वृद्ध अनुभवी माणसं...
...समग्र हॉलीवूड.

(क्रमश:)

17 comments:

Gouri said...

अनघा, टुर्की बघायची खूप उत्सुकता होती. आता वाटतंय, नाही बघितलं तरी चालेल ... इथे फोटो आणि माहितीची मस्त मेजवानी आयती मिळते आहे. :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

सायकली, रंगीत वाळू आणि समुद्रकिनारा आवडला.
शिवाय तो फ्रीज अधिकच आवडला.

THEPROPHET said...

प्रचंड भारी वर्णन गं. हे एक टॉप नॉच प्रवासवर्णन होत चाललेलं आहे.

सौरभ said...

मी एकदम ठार धृतराष्ट्र आहे. आंधळा. हरकत नाही. तुम्ही संजय आहात. तुमच्या नजरेतुन होणारा प्रवास कमालचा आहे.

हेरंब said...

>> हे एक टॉप नॉच प्रवासवर्णन होत चाललेलं आहे.
+++++

>> सहजच म्हणजे ?

तन्वी फटकावणार तुला ;)

THEPROPHET said...

>>तुमच्या नजरेतुन होणारा प्रवास कमालचा आहे.

अनघाताई हा खरं बोलतोय का?? तू कुण्या 'कमाल'चं प्रवासवर्णन कॉपी-पेस्ट करतेयस का? ;)

Shriraj said...

तुझं लिखाण वाचताना मी काहीतरी वाचतोय असं वाटत नाही... आजी गोष्ट सांगतेय आणि आपण आरामात ऐकत बसलोय... असं काहीसं वाटतं.

Shriraj said...

@ Vidya :D :P :D LOL

Gauri Shevatekar said...

अनघा ताई, आपला ब्लॉग अतिशय आवडला. छान लिहीता आपण. प्रवासवर्णन सहजपणे, संवाद साधत करणे ही गोष्ट खचितच सोपी नाही, पण आपल्याला सहजसाध्य झालेली आहे ! छान आहे आपला ब्लॉग. आपल्या ब्लॉगची माहिती मी माझ्या फेसबुकवरील पानावर "उन्मुक्त" वर आज दिली आहे. उन्मुक्तला अवश्य भेट द्या. www.facebook.com/unmukta

पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा !

शुभेच्छा,
गौरी शेवतेकर

Anagha said...

गौरी, तुझ्याबरोबर खरं तर भटकायला बाहेर पडलं पाहिजे. कुठेकुठे जात असतेस ! :)

Anagha said...

पंकज, :)

Anagha said...

विद्याधर, :)

Anagha said...

सौरभ, कमाल कोण आता ??

Anagha said...

हेरंबा !! :D :D

Anagha said...

विद्याधर ! :D

Anagha said...

श्रीराज ! आजी !! आजी म्हणालास तू मला ???!!! :D :D :D :D

Anagha said...

गौरी, मनापासून आभार ! :)