नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 14 July 2012

टूर'की'...भाग ९

टूर'की'...भाग १
टूर'की'...भाग २
टूर'की'...भाग ३
टूर'की'...भाग ४ 
टूर'की'...भाग ५
टूर'की'...भाग ६
टूर'की'...भाग ७
टूर'की'...भाग ८

"आई, बाहेर पडूया ? येताना मी आपल्या रस्त्याला लागून काही हॉटेल्स बघितली होती.  तिथे जाऊया जेवायला ?"

आम्हीं पहाटे निघालो होतो. आता अडीच वाजून गेले होते. दिलेल्या रूममध्ये बॅगा ठेवून झाल्या होत्या. खोली काही फार थाटामाटाची नव्हती. साधीसुधी. मात्र स्वच्छ. बैठी कौलारू घरं. समोर पाऊलवाट. प्रत्येक घराची एक स्वतंत्र वाट. ह्या वाटा एकत्र येऊन पुढे चालत गेलं तर डाव्या हाताला मोकळी जागा. हिरवळ त्यावर लिंबाची झाडं. लाकडी टेबलं. वर झाडावर लटकवलेले सुक्या भोपळ्याचे दिवे. उजव्या हाताला टेबल टेनिसची तयारी. त्याच्याच समोर गझीबो. म्हणजे छोटं छत असलेलं १२ फुट बाय १२ फुटांचं घर. गाद्या टाकलेलं. मधोमध तुर्की जाजम पसरलेलं. पाय पसरा, तुर्की चाय हातात घ्या, एक पुस्तक घ्या...नाहीतर हुक्का...आणि बसा मग आरामात. तासनतास.

आम्हीं ताजेतवाने झालो. रस्त्याला लागलो. तसं ऊन होतंच. कधीकधी गोष्टी छानच घडणार असतात. आणि मग त्या तशा गोष्टी घडाव्यात अशी पावलं आपण आपोआप उचलतो. आम्हीं पाच मिनिटे पुढे चालत गेलो आणि उजव्या हाताला 'माय लॅण्ड नेचर' हॉटेल दिसलं. पाय तिथे वळले. हेही बैठं हॉटेल. समोर भलंमोठं जाळीदार छत. त्याखाली बरीच टेबलं आणि खुर्च्या. आम्हीं तिथेच स्थानापन्न झालो. समोर मॅनेजरची केबिन होती. आत पुस्तकांची लाकडी कपाटं ! येणाऱ्या पाहुण्यांसाठी खुले वाचनालय ! लेक तिथे वळली. हातात पुस्तक घेऊन बाहेर आली. खुर्ची, हातात पुस्तक, वर सुंदर जाळीदार छत. छताला द्राक्षांची झुलती किनार. त्यातच एखादं लालचुटुक जास्वंद. जमिनीवर झेपावणारे बिलोरी ऊन खडे....चमचम...चमचम. अप्रतिम. शांत. तितक्यात कोणी त्या केबिन मधून बाहेर आलं. पन्नाशीच्या आसपासचा ओझेल. हॉटेलचा एक भागीदार. गप्पा सुरु झाल्या. गप्पा रंगल्या.
"कुठून ?"
"इंडिया."
भारतातून थेट चिरालीला येणारे म्हणे आम्हीं पहिलेच पर्यटक. भारतीय येतात. परंतु, भारतातून नव्हे. लंडनहून. लंडनवासी. मग हे आश्चर्यच नव्हे काय...? "तुम्हीं कसे काय इथे पोचलात ? चिराली हे गाव कोणी तुम्हांला सांगितलं...?"
ज्या कुठल्या साईटवर आम्हीं चिरालीची माहिती बघितली त्या प्रत्येक साईटवर हे गाव छोटं आहे. शेजारीच ऑलिम्पसचे भग्न अवशेष आहेत. शांत निळा समुद्र किनारा आहे...फारसं काही करावयास नसणारं गाव आहे...असंच वर्णन आम्हांला सापडलं. म्हणून आम्हीं दोघी इथे येऊन पोचलो.
ओझेलला हे विचित्र वाटलं. तो हसला. "आज सूर्यास्तानंतर भेट देण्याजोगं एक ठिकाण सांगू का तुम्हांला ?"

तिथेच खास घरगुती तुर्की जेवण जेवून आमच्या हॉटेलवर परतलो. या हॉटेलचा एक भागीदार, सुलेमान. दुपारी आमचे ज्या मुलीने स्वागत केले ती सुलेमानची धाकटी बहिण. एसेगुल. ही बहिणभावंड घरगुती हॉटेल (pansiyon) सांभाळत होते. संध्याकाळी सातच्या आसपास, सुलेमान आणि सुलेमानाचा लेक मुस्तफा आमच्यासाठी गाडी काढून तयार होते.

मुस्तफा, सुलेमानच्या मांडीवर. स्टीयरिंग व्हील मुस्तफाच्या हातात. वय नऊ महिने. खुदुखुदू हसत साहेब चक्र फिरवत होते. पंधरा मिनिटे मुस्तफाने गरगर चक्र फिरवले. आम्हांला एका डोंगराच्या पायथ्याशी आणून सोडले. थोड्याच वेळात काळोख पडू लागणार होता. उजव्या हाताला टेबलं टाकलेली होती. 'चाय'चा मोठा थोरला पिंप ठेवलेला होता. माणसे बसली होती...गप्पा रंगल्या होत्या.. समोर चाय होता. आम्हीं एक टॉर्च घ्यावा अशी ओझेलने दुपारी सुचना देऊन ठेवली होती. बाजूच्या दुकानात टॉर्च लटकत होते. एक ताब्यात घेतला. डोंगर चढावयास सुरुवात केली. आजची संध्याकाळ तुर्कस्तानातील डोंगरावर घालवायचा बेत होता. तुर्कस्तानात ट्रेक.
किमीरा. तीन प्राण्यांचे रूप धारण करणारी. दैत्यीण. भयानक किमीराचे मस्तक सिंहाचे, शरीर बोकडाचे, शेपटी सर्प. मुखातून उसळत्या ज्वाळा. इफिरया येथील राजपुत्र हिपोनेस ह्याने शिकार करता करता आपला बंधु, बेलेरॉस ह्याची हत्त्या केली. हे कृत्य करून, गर्वाने त्याने स्वत:चे नामकरण केले....बेलेरेफॉन्तेस. अर्थ...जो बेलेरॉसचे भक्षण करतो तो. आपल्या पुत्राच्या ह्या अपकृत्याने संतापून, 'इफिरया'च्या सम्राटाने बेलेरेफॉन्तेसला हद्दपार केले. राजपुत्राने सम्राट आरगोस ह्याकडे मदतीची याचना केली. शरणागताला हाकलून लावणे म्हणजे आत्मसन्मानची अवहेलना अशी राजा आरगोसची निष्ठा. त्याने बेलेरेफॉन्तेसची पाठवणी केली लिशियन राज्यात. तेथील सम्राटाला देशोधडीला लागलेल्या राजपुत्र बेलेरेफॉन्तेसची दया आली. दया येऊन त्याने काय करावे ? सम्राटाने बेलेरेफॉन्तेसला किमीराशी युद्ध करावयास धाडले. किमीराचे वास्तव्य होते ऑलिम्पस पर्वतावर. शूर बेलेरेफॉन्तेस त्याच्या पंख असलेल्या अश्वावर, पेगाससवर स्वार झाला. निघाला किमीराशी युद्ध करण्यास. किमीरा पुढे पेगासस तग धरू शकेल ? आकाश रंग बदलू लागले. रंगमंच जणू. पडदे क्षणाक्षणाला सरसर बदलत गेले. बेलेरेफॉन्तेसला घेऊन पेगासस उडाला थेट आकाशात. वेगाने पृथ्वीवर खाली येत असता, हातातील भाल्याने बेलेरेफॉन्तेसने किमीरावर जोरदार हल्ला चढवला. त्या भयावह दैत्यीणीला सर्व शक्तीनिशी खाली ढकलले. किमीरा खोलखोल जाऊ लागली. धरणी देखील बेलेरेफॉन्तेसच्या दैवी शक्तीपुढे हतबल ठरली. जसे एखादे तलम वस्त्र फाटावे तशी ती भेदत गेली. क्षणार्धात किमीराला शूर बेलेरेफॉन्तेसने खोल ढकलले. पाताळात नेले. तिला तिथेच जखमी सोडून पेगाससवर दिमाखात आरूढ झालेला बेलेरेफॉन्तेस विजयी भाला हवेत उंचावत वेगात वर आला. मात्र किमीरा पाताळात देखील कधी शांत झाली नाही. आजही ती प्रयत्न करीत रहाते. पार आकाशाला भिडण्याचा. तिच्या मुखातून भयानक ज्वाळा पृथ्वीला भेदून आजही आकाशाकडे झेप घेतात...पावसापाण्यात...उन्हातान्हात....बर्फाच्या माऱ्यात.

कुतूहलजनक ग्रीक कथा. पर्वत किमीरा येथील पृथ्वीतून आकाशाकडे झेपावणाऱ्या अग्नीच्या ज्वाळांमागची कथा. हजारो वर्षे सांगितली गेली...काळाबरोबर पुढे पुढे आली. ना त्या ज्वाळा विझल्या...ना ती कथा विरली. बेलेरेफॉन्तेसची ही विजयगाथा जतन करण्यासाठी व तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ऑलिम्पसमधील प्रजा पर्वतावर मशाली पेटवतात व सुसाट दौडत ऑलिम्पस गावात परततात. म्हणे जगातील हा सर्वात पहिला ऑलिम्पिक खेळ. कालांतराने अनेक विविध खेळ ह्यात जोडले गेले. ऑलिम्पिक मशाल देखील ह्याच किमीराच्या मुखातील ज्वालांवर बेतलेली आहे. तुर्कस्तानाचा असा दावा आहे. अर्थात ग्रीक जनतेची ऑलिम्पिक मशालीच्या उगमासंबंधी काही वेगळी कथा आहे. ह्या पूर्ण प्रदेशात चर्च, देवळे ह्यांचे भग्न अवशेष आजही दिसून येतात. हेफायस्तोस, अग्निदेवता, ह्या ग्रीक देवाची देवळे. तिथे वस्ती होती ह्याची ही चिन्हे. पृथ्वीच्या ह्या भौगोलिक रूपाचे यनार्तास (अग्निखडक) हे तुर्की नाव .

ट्रेक सुरू करण्याआधी पायथ्याशी फलकावर छापलेली ही कथा आम्हीं मायलेकींनी वाचली व मग चढायला सुरुवात केली. त्यामुळे काही वेगळेच स्फुरण. वर पोचल्यावर नक्की काय नजरेसमोर दिसणार आहे ह्याची पुसटशी देखील कल्पना येत नव्हती. आणि असे काही बघायला मिळणार आहे ह्याची आधी कल्पना नसल्याकारणाने जालावर शोध घेतला गेला नव्हता...एकही छायाचित्र बघितले गेले नव्हते. चढेस्तोवर अंधार पडायला हवा. कारण त्या अंधारातच ज्वाळा अधिक उठून दिसणार होत्या. चढणाऱ्या आम्हीं एकट्याच नव्हतो. वेगवेगळ्या देशांतील अनेक पर्यटक होते. नेहमी सूर्यास्त होण्याआधी डोंगर उतरण्यास सुरुवात होते. इथे उलटंच होतं. सगळेच अंधार पडण्याची वाट बघत चढ चढत होतो. आता येईल नंतर येईल करीत. काही माणसे परतत होती. "अजून किती चढ आहे ?" "फक्त दहा मिनिटे." उत्तर मिळत होतं.

अचानक समोर तिरपा जाणारा चढ दिसला. तुरळक गर्दी. काही फुटांच्या अंतरावर जमिनीतून वर झेपावणाऱ्या ज्वाळा. अशांत किमीरा.

अंधार वाढला. आग अधिक उठून दिसू लागली. लाल ज्वाळा. जणू वेगवेगळ्या अंतरावर जमिनीखाली कोणी मशाल घेऊन अथक उभे असावे. डोंगरावर कोणी अजरामर पणत्या पेटत ठेवाव्या. अदमासे २०० मशाली ह्या सर्व परिसरात आहेत. हजारो वर्षांपूर्वी, पायथ्याशी दूरवर असलेल्या समुद्रातील बोटी म्हणे ह्या मशालींचा उपयोग, मार्ग ठरवण्यासाठी करीत असत. अदमासे २५०० वर्षांपासून हा अग्नी जिवंत आहे. जवळ जाऊन बघितलं. वाकून वाकून बघितलं. मनात आलं, पुरातन काळात ज्यावेळी मनुष्याच्या नजरेस हे जेव्हां प्रथम नजरेस पडले असेल, त्यावेळी त्याची काय अवस्था झाली असेल ? सर्वात प्रथम ज्याने हे पाहिलं...त्याचं भयाने काय झालं असेल ? पायथ्याशी समुद्रावरून कधीतरी त्याची नजर वर गेली असेल. रात्रीच्या काळोखात ह्या ज्वाळा त्याला कधी दिसल्या असतील तर कधी सोसाट्याच्या वाऱ्यामागे त्या लुप्त झाल्या असतील...भुताटकी...भय सगळीकडे ग्रासून गेले असेल. आणि मग कल्पनाशक्तीची भरारी....तीन प्राण्यांचे एकत्र रूप धारण करणारी दैत्यीण...देव...दैत्य...युद्ध...सूड...वगैरे.

अभ्यासकांनी तीन निष्कर्ष काढले आहेत. एक म्हणजे इथे पृथ्वीच्या गर्भात लाव्हा आहे. त्याचा हा परिणाम आहे. दुसरा अभ्यास सांगतो, भूगर्भातील सततच्या हालाचालीचा हा परिणाम आहे. कायमस्वरूपी भेगा तयार झालेल्या आहेत. तिथून मिथेन वायू बाहेर पडतो. तिसरा निष्कर्ष...सतत बदल घडत असलेले खडक. Metamorphic rock. पृथ्वीच्या गर्भात असलेली उष्णता व अति दबाव ह्यामुळे आतील खडक सतत बदलत रहातात. त्यामुळे तयार झालेली आग जमिनीला पडलेल्या भेगांमधून बाहेर झेपावत रहाते.

पृथ्वीची एकेक आश्चर्ये. हजारो वर्षांपूर्वी अजाण मनुष्याने त्याला जोडलेली मिथ्थके.
शाळेत भूगोल हा असा शिकवत गेले असते तर त्या भूगोलाचे कधी ओझे वाटले नसते. डोळे मिटत असता देखील हातात पुस्तक धरून घोकंपट्टी करावी लागली नसती.

किमीरा पर्वत उतरण्यास सुरवात केली तेव्हां सुलेमानचा सल्ला आठवला. लेकीने टॉर्च लावला. उतरण एका पट्ट्यात दिसू लागली. लाल....केशरी...पायऱ्या....ओबडधोबड दगड. रातकिड्यांची जाग ऐकू येऊ लागली. उगाच डोळ्यांसमोर, त्या अंधारात हातात काठी घेऊन तोंडाने कसले अनाकलनीय मंत्र जपत चाललेली टोळकी दिसू लागली. निसटत्या उजेडात आम्हीं पायऱ्या उतरत गेलो. आमच्या पुढ्यात एक पाच वर्षांचा पोरगा. माकडाच्या गतीने उड्या मारत पोरगं उतरत होतं. अपुऱ्या प्रकाशात. रोजचा पायाखालचा रस्ता असल्यागत. कधीतरी माझ्या समोरचा टॉर्चचा उजेड धूसर झाला. लेक कुठे गेली म्हणून मी मागे वळून बघितलं. माझी लेक त्या पाच वर्षांच्या मुलाला हातातील टॉर्चने उजेड देत होती. आणि मी काळोखातच. हसू आलं. जपून मी खाली उतरू लागले. मागून ते पोरगं...आणि ही त्याची पुरत्या दहा मिनिटांची ताई !

चिरालीतील पहिला दिवस संपला. भौगोलिक चमत्कार. तुर्कस्तानात येऊन आम्हीं ट्रेक करू असं तर नव्हतं ठरवलं. त्यामुळे मी तयार केलेल्या त्या वर्ड डॉक्यूमेंटमध्ये तर हे नव्हतंच.
अविस्मरणीय. रोज एक नवल...आमची तुर्की सहल.
क्रमश:
ग्रीक चित्रे जालावरून साभार

19 comments:

Ashwin said...

अनघा,
थोडासा भूगर्भशास्त्रीय आगाऊपणा करतोय. किमिराच्या ज्वाळा या मिथेनमुळेच तयार होतात. पण गम्मत अशी आहे, की या जागेवर दोन प्रकारचे खडक contact मधे आहेत. एक metamorphic - सरपेंटीनाईट आणि एक sedimentary लाईमस्टोन. मग हा मिथेन आला कुठून? दोन्हीमधून! लाईमस्टोन मधून आलेला मिथेन हा जैविक प्रक्रियेतून तयार झालेला आहे, आणि सरपेंटीनाईट मधून येणारा मिथेन हा अजैविक प्रक्रियेतून. कार्बन मोनोक्साईड आणि इतर कार्बन असलेले वायू यातून मिथेन आणि तत्सम पेट्रोलियम निर्माण होण्याची ही प्रक्रिया आहे. या मिथेनचा अभ्यास केला, तर bacterial particles असलेला आणि नसलेला असे दोन मिथेन आहेत, असं दिसतं. म्हणून या दोन मिथेनची घरं वेगळी!
एम्.एस्सी मधे पेट्रोलियमच्या अजैविक निर्मितीप्रक्रिया शिकताना किमिराचं उदाहरण वाचलं होतं. आज थोडंसं परत आठवलं.
बाकी प्रवास छानच चालू आहे तुमचा. वाचायला मजा येतीये. शुभेच्छा.

Anagha said...

अश्विन, ही अशी माहिती जालावर दिसत होती, पण अजिबात उमजत नव्हती ! हे इतकं छान साध्या भाषेत समजून सांगितल्याबद्दल खूप खूप आभार ! आता माझी अर्धवट ज्ञानाची पोस्ट लोकं वाचतील, आणि मग तुझी ही प्रतिक्रिया...म्हणजे मग त्यांना नीट माहिती मिळेल !!! खूप खूप आभार !!! :) :)

rajiv said...

अशी हि सहल...असे हे नवल ..असा हा अजुबा...!!
मित्थक, ऐतिहासिक व शास्त्रीय अशा या माहितीबद्दल धन्यवाद !
अनघा, तुझ्याकडून आता यापुढे 'ऐकावे ते नवलच' असे वाटतेय !


अश्विन, तुझ्या स्पष्टीकरणाने तर एकदमच सम्जून गेले , आभार !!

Ashwin said...

अनघा,
माहिती तर तुमच्या पोस्टमधे छान आहे. माझा आपला आगाऊपणा. :) हे सारं होण्याची जी प्रक्रिया आहे, ती अनेकांना कोड्यात टाकते. म्हणूनच अभ्यासक असे तीन-चार निष्कर्ष देतात. पार राक्षसीच्या थियरी पासून!पण हे किमिरा प्रकरण फारच सुरेख आहे.
सांगायचं राहून गेलं म्हणजे सर्पेंटीनाईट प्रकारचे खडक mantle मधे असतात. जमिनीपासून २५-३० किमी खाली. काहीतरी गोंधळ होतो, आणि हे खडक भूपृष्ठावर येतात. या वर येण्याच्या गडबडीत जी उष्णता निर्माण होते, त्यात काही विशिष्ट bacteria सुखाने वाढतात.सर्पेंटीनाईटमधला खाऊ (लोह वगैरे) खाताना हे bacteria कार्बन असलेले वायू निर्माण करतात. त्यांचं पुढे मिथेन मधे रूपांतर होतं. हा अजैविक मिथेन. काहीसा दुर्मिळ. लाईमस्टोन मधे लाखो वर्षांपूर्वी दबलेले जीव विघटित होऊन त्यांचं पेट्रोलियम मधे रूपांतर होतं. हे जैविक पेट्रोलियम, कारण त्याचं मूळ या बिचा-या जीवांमध्ये असतं. अजैविक मिथेनला असा 'जिवंत' इतिहास नसतो. मजा आहे सगळी!

Anagha said...

अश्विन ! भारी आहेस ! भूगर्भशास्त्रज्ञ वगैरे !! माझ्या लेकीने कायकाय व्हावं असं मला ती लहान होती तेव्हा वाटायचं ना...त्यात हे पण होतं ! म्हणजे अंतराळवीर वगैरे ! :) :)

हेरंब said...

भन्नाट पोस्ट.. आणि चमत्कारामागचं अश्विनचं स्पष्टीकरण वाचून अजूनच मस्त वाटलं.

Anonymous said...

अनघा ताई,
मस्त आहे 'किमिरा.' अश्विनच्या माहितीने तर सगळ्या रहस्याचा छान उलगडा झालाय. अर्थात तुमचं वर्णन ही प्रभावी आहेच.....
सुरेख चालू आहे तुमचा प्रवास... कीप गोइंग...

Pankaj - भटकंती Unlimited said...

गझीबो एकदम गजब प्रकार आहे. तुम्ही त्यावर अंताक्षरी खेळलात का? ;-)
"तुर्कस्तानात येऊन ट्रेक" हे अधिक आवडलं. कारण प्रत्येक वेळी ट्रेकनंतर काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय पहायला मिळतं ते इथंही सत्य झालं.

THEPROPHET said...

लईच आहे सगळं.. आवडलं.. :)

सौरभ said...

this is awesomeness... bharich aahe he... :D :D :D

Shriraj said...

आश्चर्यच आहे!!

Anand Kale said...

:)) टुर्की ट्रेक केलास...

Anagha said...

अगदी अगदी हेरंबा. :)

Anagha said...

हिंदोळे मनाचे....(तुमचं नाव शोधायचा प्रयत्न केला मी...पण मिळालंच नाही !) धन्यवाद ! :) :)

Anagha said...

'प्रत्येक वेळी ट्रेकनंतर काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय पहायला मिळतं ते इथंही सत्य झालं.'...खरंय हं पंकज !
मात्र 'इतके फिरलात पण कायपण शिकला नाहीत !' असं कोणी म्हणायला नको ! :p :)

Anagha said...

विद्याधर, :)

Anagha said...

सौरभ, सही आहे ना ?! :)

Anagha said...

आनंद, हो. टूर्की ट्रेक ! :D

Anagha said...

श्रीराज, एकदम आश्चर्य अरे ! म्हणजे आपल्याला शास्त्रीय कारण थोडे तरी माहितेय...मग ज्यांना त्याचा काहीही पत्ता नाहीये..त्यांची काय गत झाली असेल ? मग अशा रंजक कथा लिहिल्या जात असतील...नाही का ? :)