नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 12 July 2012

टूर'की'...भाग ८

२०१० साली 'युरोपियन सांस्कृतिक राजधानी' अशी जेव्हां इस्तान्बुलची ओळख होऊ लागली तेव्हां सात करोड पर्यटक इस्तान्बुलला भेट देऊन गेले. इति विकीपिडीया. इथे संस्कृती, इतिहास, मनोरंजन, खादाडी...अशा अनेक गोष्टी एकत्र नांदतात. त्यामुळे पर्यटक आपापल्या आवडीनुसार हवे ते करू शकतो. आनंद मिळवू शकतो. आता शहराचे आधुनिकीकरण झालेले आहे. बरेच उद्योगधंदे, मिडीया शहरात सर्वत्र पसरलेले आहेत. २०२० साली होणारे ऑलिम्पिक ह्या शहरात भरवण्याची संधी त्यांना मिळावी ह्यासाठी तुर्कस्तानाने म्हणे प्रस्ताव मांडला आहे. जर त्यांना ही संधी मिळाली, तर जगाला दाखवण्यासारखे, देण्यासारखे त्यांच्याकडे अलोट आहे हे खरेच.

पहाटे चारच्या सुमारास जेव्हां आम्हीं टॅक्सी करून निघालो तेव्हां इस्तान्बुल अजून निजलेले होते. नशिबाने निदान त्या वेळी तरी एकही तुर्क समुद्रात गळ टाकून, बगळ्यासारखा उभा दिसला नाही. मुंबईहून निघण्याआधी ह्या पूर्ण सहलीचे एक वर्ड डॉक्युमेंट मी बनवले होते. त्यात दिवसावार विमानाच्या वेळा, त्यात्या ठिकाणच्या हॉटेलचे पत्ते आणि त्या त्या गावी पोचल्यावर काय करावयाचे आमच्या मनात आहे हे उतरवले होते. थोडाफार इथेतिथे बदल होणे गृहीत धरून. खास तुर्कस्तानात जिभेचे चोचले कसे आणि कुठे पुरवायचे आहेत ह्याची देखील त्यात नोंद केली होती. रहाण्याच्या ठिकाणापासून अतातुर्क म्युझियम दूर असल्याकारणाने ते राहून गेलं होतं. तशाही बऱ्याच गोष्टी राहून गेल्या होत्या. दोन दिवस तीन रात्री पुऱ्या पडणाऱ्या नव्हत्याच. परंतु, सगळ्या गोष्टी अनुभवल्याच पाहिजेत असा अट्टाहास धरलेलाच नव्हता. प्रत्येक क्षण पूर्ण जगावयाचा होता. आयुष्यात अट्टाहास धरून काही मिळतं हा गैरसमज माझा आता दूर झालेला आहे. चांगली इच्छा मनी बाळगावी...प्रयत्न करावेत. जे मिळतं ते आपल्या नशिबात असतं. जे मिळत नाही ते आपल्या नशिबात कधीच नसतं. कधीकधी वाटतं...माझ्या हातात असं एक गोष्टीचं पुस्तक दिलं गेलं आहे, ज्यात मधली काही पानं नाहीत...माझी गोष्ट तशीच लिहिली गेली आहे...ती पानं गहाळ झालेली नसावीत...तर ती कधी लिहिली गेलीच नाहीत. थोडा वेळ मला कोणी एकटं सोडलं की माझे विचार हे तुर्की घोड्यावर बसून दौडू लागतात. 
इस्तान्बुल विमानतळावर पोचलो...विमानात बसलो....०६:३५वाजता विमान उडालं...आणि ०७:४५ वाजता अन्ताल्जा विमानतळावर टेकलं. वर्ड डॉक्युमेंटमध्ये लिहून ठेवलं होतं त्याप्रमाणेच.
पुढील प्रवास आकाशातून नव्हता. रस्त्यावरचा होता. आणि म्हणूनच दिवसाउजेडीचं विमानाचं बुकिंग केलं होतं. आमचं चिरालीतील हॉटेल हा एका तुर्की कुटुंबाने चालवलेला लघुउद्योग होता. जेव्हा हे बुकिंग केलं, तेव्हा त्यांच्या साईटवर, तिथे कसे पोचायचे ते दिलेलं होतं. प्रवास अदमासे तीन तासांचा होता. दोन बसेस करावयाच्या होत्या. अन्ताल्जा विमानतळातून बाहेर पडावं. एअरपोर्ट ट्रान्स्फर बस पकडावी. ओट्टोपार्क. उतू नये मातू नये...घेतला वसा टाकू नये. जे आखून घेतलं आहे ते तसंच करत पुढे सरकत जावं. ती चारचाकी, दीड तास पुढे नेईल. चालकाला सांगून ठेवावं. चिरालीला उतरणे आहे. तो एका ठराविक ठिकाणी उतरवेल. 'तिकीटा' बसमध्ये चढल्याचढल्या चालक देईल. खिडकीत जागा मिळाली आणि बॅगा डाव्या हाताला नजरेसमोरच राहिल्या तर ठीक आहे. कारण बॅगांना चाके असतात आणि गाडी चालू लागली की आपण पण पळावे असे त्यांच्या मनात येणे ह्यात वावगे ते काय ? फार तर आपण लक्ष ठेवावे. पुढले दोन तास आपल्या बॅगांची, उंदरासारखी चालू असलेली पळापळ बघावी. नाहीतर सरळ दुर्लक्ष करावे. इथे चोऱ्या होत नाहीत. त्यामुळे तुमची बॅग कोणीही स्वत:ची म्हणून उचलून नेणार नाही. ती एकटीच काय ते इथेतिथे मनसोक्त फिरेल आणि तुमच्याबरोबरच खाली उतरेल. मी आपली एकदा तिला नीट कोपऱ्यात ठेवावी म्हणून उठले. म्हटलं आपल्या बॅगांना वाटू नये...परक्या देशात काय बेवारश्यासारखे आपण पडलोय वगैरे म्हणून ! आणि वळून परत जागेवर जाऊन बसावं म्हटलं तर एक पन्नाशीचे गृहस्थ माझ्या जागेवर बसले होते. लेक पण काही बोलली नाही त्यांना. फक्त माझ्याकडे बघत बसली. मग मीच आपली जाऊन त्यांच्या समोर उभी राहिले आणि म्हटलं...my seat आहे म्हणून ! उठले मात्र सदगृहस्थ गृहस्थ लगेच. मागे जाऊन उभे राहिले. त्यांच्याबरोबर असलेली त्यांची तरुण मुलगी माझ्याकडे बघून गोड हसली. मी आपलं म्हणतेय ती त्यांची मुलगी होती म्हणून ! पण नेमकी बायको असायची !

आम्हीं दोघी हातात गुगलचे नकाशे घेऊन बसलो होतो. पण त्या नकाशातील नावे आणि डोळ्यांसमोर दिसत असलेली रस्त्यांची नावे ही काही केल्या मेली जुळेनात ! बसने जेव्हा एक उजवीकडे वळण घेतले त्यावेळी मी आपले लेकीला म्हटले..."हो गं ! इथे नकाशात पण उजवंच वळण दाखवलंय !"
"आई ! त्यातलं वळण आणि आता आपण घेतलेलं हे वळण अजिबात सारखं असणार नाहीये !"
"हो काय ? बरं. " तीन तासांचा प्रवास. कधी सरळ मार्ग तर कधी उजवे...कधी डावे वळण. अंतराळात बसून मार्गाचा आढावा गुगलने दिलाही असता कदाचित. परंतु, आयुष्यात सगळीच वळणे आधीच माहिती झाली तर जगण्यात तो काय आनंद ? अचानक एखादे वळण समोर उभे ठाकावे, आपला ना आपल्या गतीवर ताबा ना कुठल्याही निर्णयावर. वळण घेतले जाते...आणि आपण आयुष्यात पुढे निघून जातो. तसेच काहीसे. मी अशी किती जवळ जाऊन जाऊन 'क्लोजअप प्रिंट आउट' मारणार होते ? प्रत्येक वळण काही ह्या प्रिंट आउट मध्ये आले नसतेच ! माझी लेक अशी हुशारीने काहीतरी बोलली, की मला मी काहीतरी बावळटपणा केलाय ह्याचा खेद होण्यापेक्षा, कसं गं बाई माझं लेकरू...एकदम हुशार झालंय ! असंच वाटू लागतं ! ह्यात नवीन मी काहीच सांगितलेलं नाहीये...माहितेय मला. सगळ्याच आयांना हे असेच वाटत असणार ! असो...

लेकीने एकदा पुढे जाऊन चालकाला सांगितले..."चिराली"
त्याने मान डोलावली. तीनचारदा आमची बस थांबली. बाजूला बसलेलं तरुण जोडपं त्यांच्या इतकुश्या पिल्लाला सांभाळून घेत खाली उतरलं. मी उगाच त्या बाळावर माझी अनुभवी नजर टाकली. जरा कमी दिवसांचं आहे वाटतं त्यांचं बाळ...मी लेकीच्या कानात कुजबुजले. तिने डोळे वटारले. तिला ह्या मेल्या अशा आपल्या बायकी गप्पा मुळी म्हणजे मुळीच आवडत नाहीत ! आम्हीं साध्याश्या छोट्या गावी निघालो होतो. शहरासारखे हुशार, चटपटीत, तुर्क आम्हांला कमी दिसतील आणि साधेसुधे तुर्क अधिक...अशी मला आशा होती. बस पुन्हां थांबली. दोघी म्हाताऱ्या मैत्रिणी गलबलाट करत चढल्या. दार आपोआप बंद झालं...आम्हीं पुढे निघालो. मी वाकवाकून मागे पडू लागलेल्या बस स्टँडवरचा बोर्ड वाचायचा प्रयत्न केला. म्हटलं त्यावरचं नाव तरी आमच्या गुगल नकाशात असेल. पण नाहीच.
इथे काही तुर्क स्त्रिया डोक्यावरून घट्ट स्कार्फ बांधून तर काही आधुनिक. सुंदर कुरळे तपकिरी केस हवेत मोकळे सोडून. सर्व स्त्रिया दिसायला सुरेख. गोऱ्यापान. त्वचा नितळ. घारे तपकिरी डोळे. ह्यांची बाळे अगदी चित्रांत बघावी अशी गोंडस. मात्र मला तरी सगळी बाळं दिसायला सारखीच वाटली ! म्हणजे एखाद्या बाईने आपलं समजून दुसरीचंच बाळ तिच्या घरी नेलं तर तिला दोषी ठरवता यायचं नाही...इतके साम्य. पुरुष देखील गोरे. फक्त गोरा म्हणून दिसायला चांगला वाटावा इतकंच. इथले पुरुष 'सूर्य नमस्कार', वजने उचलणे वगैरे करत नसावेत बहुधा. त्यामुळे सिक्स अॅब्स राहिले दूरच...पोटं अंतर्यामी सुखी दिसत होती !

इतके पुढे आलो तरीही आमचा गुगल नकाशा आणि रस्त्यावरची नावे काही जुळेनात ! अंतराळातून घेतलेले ते फोटू...आणि आम्हीं खरेखुरे त्या रस्त्यांवर...कसे काय जुळायचे ते ? शेवटी एकदाची बस थांबली. सगळेच खाली उतरू लागले. आम्हीं पण पटापट बॅगा घेतल्या. खाली उतरलो. आता ? आता दुसरी बस. ही आपली साधीच. म्हणजे अगदीच आपली एशटी नव्हे. पण आधीची व्होल्व्हो म्हटली तर ही एशटी आणि व्होल्वोच्या मधली. डाव्या हाताला निळा समुद्र किनारा घेऊन बस निघाली. उजव्या हाताला डोंगर. चढ, घाट....करत करत...अचानक, हमरस्त्यावरील फलकांवरची गावांची नावे आणि आमचा नकाशा जुळू लागला. समुद्र डाव्या बाजूला आणि आम्ही बसलो होतो उजव्या हाताला. असं नेहमीच होतं...नाही का ? आपल्याला जी सीट मिळते त्याच्या बरोब्बर विरुद्ध दिशेला निसर्ग आपले सुंदर रूप दाखवत असतो. आमच्या बाजूला असलेले डोंगर तसेही काही हिरवे नव्हते. म्हणजे महाराष्ट्रात पावसाची एक सर पुरेशी असते, आपल्या डोंगरांना अंगावर हिरवागार शालू खेचून घ्यायला. मात्र दुबईतल्या डोंगरांपेक्षा हे डोंगर दिसायला बरे होते म्हणायचे. तिथले डोंगर बघून त्यावेळी मला त्यांच्याबद्दल फारच वाईट वाटलं होतं. म्हणजे नुसती वाळू, करडे पिवळट दगड एकावर एक रचून ठेवल्यागत. वादी...म्हणतात त्याला. ह्या डोंगरांनी कधी आपले हिरवेकंच डोंगर बघितले तर ह्यांचा किती जळफळाट  होईल...नाही का...असे मी तेव्हां माझ्या नवऱ्याला म्हटल्याचे आठवते. तुला एव्हढं हे दाखवायला घेऊन आलो तर तुझं आपलं काहीतरी वेगळंच ! असं तो म्हणाला...ते जाऊ द्या !

किती ते विषयांतर !

'चिराली'. चालक म्हणाला.
आम्हीं दोघी बसमधून उतरलो. आमच्या पुढे अजून दोन बायका...अशा आम्ही चौघी. बस पुढे निघून गेली तेव्हां समोर तीसेक फुटांवर गाड्या उभ्या दिसत होत्या. आम्हीं रस्ता ओलांडला. खुर्च्या टाकून तिथे काही माणसे आरामात गप्पा मारीत बसलेली होती. आम्हांला बघून त्यातील एक माणूस त्वरेने पुढे आला. टॅक्सी ? आम्हांला ज्या रस्त्यावर जायचे होते तोच रस्ता त्या दोघींचा होता. चौघी गाडीत बसलो. गाडी रस्त्यावर पळू लागली. रस्ता उतरणीचा. तसा अरुंद. गाडी उतरू लागली. नशीब हा प्रवास आम्हीं दिवसा करीत होतो. रात्र असती...मिट्ट काळोखात अरुंद रस्त्याने काही वेगळेच रूप धारण केले असते. सूर्यप्रकाशात छानशी नागमोडी वळणे घेणारा रस्ता रात्री, भयावह अजगर वाटला असता. त्या दोघी देखील मायलेकी होत्या. तुर्कस्तानातील. दोघी आमच्यासारख्याच फिरायला निघाल्या होत्या. त्यांचे हॉटेल आधी आले. त्या उतरून गेल्या....आम्हीं अजून पुढे. म्हटलं आहे तरी कुठे आमचं हॉटेल...मनात नसत्या शंका...बैठी हॉटेल्स, फुलांनी डवरलेल्या बागा...द्राक्षांचे मळे. मोकळ्या हवेत शंका हळुवार विरत चालली होती. इतक्यात चालकाने गाडी थांबवली. आमचं हॉटेल आलेलं होतं. टॅक्सी थांबली. चालक सामान उतरवू लागला.
"Welcome..." तिशीच्या आसपासची एक हसतमुख मुलगी पुढे आली.
मी टॅक्सीला पैसे देईस्तोवर...लेक आणि ती तरुणी एक पायवाट चालू लागल्या होत्या. दुतर्फा, झाडे होती. क्व्य्क क्व्य्क करीत एक कोंबडी...तिच्या मागे तिचा चिमुकला लवाजमा...
माझं पिल्लू पुढे...आणि मी मागे !

क्रमश:
नकाशा जालावरून साभार

8 comments:

rajiv said...

स्वत: तर धावपळ करतेच आणि वर त्या बिचाऱ्या ब्यागांना पण ... :) :)

आयुष्यात सगळीच वळणे आधीच माहिती झाली तर जगण्यात तो काय आनंद > "कडक"

"म्हणजे महाराष्ट्रात पावसाची एक सर पुरेशी असते, आपल्या डोंगरांना अंगावर हिरवागार शालू खेचून घ्यायला."
"बैठी हॉटेल्स, फुलांनी डवरलेल्या बागा...द्राक्षांचे मळे. मोकळ्या हवेत शंका हळुवार विरत चालली होती."
या सचित्र वर्णनात आम्ही पण विरत चालेलो आहोत.

तुमचे कोंबडी प्रेम तुमच्या आधी त्या हॉटेल वर पोचले होते न ? मालकाने आख्खा लवाजमाच बोलावला ते :D

अप्रतिम प्रवास सुरुय !!

Shriraj said...

"समुद्र डाव्या बाजूला आणि आम्ही बसलो होतो उजव्या हाताला. असं नेहमीच होतं...नाही का ? आपल्याला जी सीट मिळते त्याच्या बरोब्बर विरुद्ध दिशेला निसर्ग आपले सुंदर रूप दाखवत असतो"

का माहीत नाही, पण असे होते खरे :)

बाकी वर्णन एकदम गमतीदार झाले आहे!

THEPROPHET said...

>>आपल्याला जी सीट मिळते त्याच्या बरोब्बर विरुद्ध दिशेला निसर्ग आपले सुंदर रूप दाखवत असतो

मर्फी'ज लॉ! :)

लिही पटापट..

हेरंब said...

>> आणि ०७:४५ वाजता अन्ताल्जा विमानतळावर टेकलं. वर्ड डॉक्युमेंटमध्ये लिहून ठेवलं होतं त्याप्रमाणेच.
तुझ्या त्या वर्ड डॉक्युमेंट बद्दल मला अपार आदर (आणि भीतीही) वाटायला लागला आहे. (श्री श्री चीरुजी यांचा 'किस्मतवाला' चित्रपट आठवला ;)

रच्याक, तू त्या सदगृहस्थाला तुझ्या सीटवरून उठायला लावल्यावर त्याच्या बरोबरची सुंदर मुलगी गोड हसली हे वाचून फारच मौज वाटली ;)

Anagha said...

धन्यवाद राजीव. :)

Anagha said...

श्रीराज, तुला पण असंच वाटतं ना...?! :) :)

Anagha said...

विद्याधर, मर्फी'ज लॉ!!! अगदी अगदी ! :D

Anagha said...

हेरंबा, उद्धट नव्हती ना तिथली माणसं ! म्हणून ! :) :)
आता त्या 'किस्मतवाला' सिनेमात काय होतं ?? का बरं आठवला तुला तो सिनेमा ?? :)