टूर'की'...१
टूर'की'...२
टूर'की'...३
टूर'की'...४
टूर'की'...२
टूर'की'...३
टूर'की'...४
आम्हीं पक्षी होतो. पंख पसरून तरंगत जात होतो. आकाश किंचितसेही थकले नव्हते. क्षितिजाला टेकले नव्हते. एखाद्या अथांग विवरातून आपण तरंगत चाललो आहोत असा भास. आमचा थवा तरंगत तरंगत खाली उतरू लागला. प्रवास लांबचा झाला होता. विसाव्याची ओढ होती. हलकेच आम्हीं पाय टेकवले. आणि डोळे उघडले.
खिडकीबाहेर गाड्यांचे दिवे लुकलुकत होते. छतावरील लाल दिवे विझू लागले. खटखट आवाज वेगवेगळ्या अंतरावरून ऐकू येऊ लागला. कंबरपट्टे सुटू लागले. आम्ही पायांवर उभे राहिलो. बाहेर देश वेगळा होता.
गेल्या दहा दिवसांत केलेला बेत अखेर पार पडला होता. आम्हीं मायलेकी तुर्कस्तानात येऊन पोचलो होतो. आता थोडाच अवधी मग बाहेर रस्त्याला देखील लागू.
बॅगा ताब्यात घेणे, पासपोर्टवर शिक्का मारून घेणे ह्यात थोडा वेळ गेला. ह्यापुढे जेनीचे आकाश वेगळे असणार होते व आमचे शहर वेगळे. जेनी ट्रॉली घेऊन वळली...तिला पाठमोरी बघत मी काही क्षण नुसतीच उभी राहिले. ती भेटली आणि आमचा मुंबई विमानतळावरचा वेळ न कंटाळता पुढे सरकला. मी वळले. काचेचा दरवाजा बाहेर ढकलला. इस्तान्बुलच्या रस्त्यावर आम्हीं दोघी उभ्या होतो. हाताच्या अंतरावर आमच्या नावाचा बोर्ड घेऊन हॉटेलचा माणूस उभा होता. त्याला ओळखीचा हात केला. पुढे येऊन त्याने सामान ताब्यात घेतले. आम्हीं त्याच्या मागे चालू लागलो. पुढल्या पंधराव्या मिनिटाला रस्त्याला लागलो होतो. बाहेर काळोख होता. थोड्याच वेळात उजव्या हाताला समुद्र दिसू लागला. रात्रीचे नऊ वाजले होते. समुद्राला लागून मोकळे हिरवे मैदान होते. चकाकता समुद्र. त्याला लागून हिरवे मैदान. कुठे कठड्याला टेकून समुद्रात गळ टाकून बसलेले रहिवासी. काही वेगळंच चित्र. एकेका फुटावर उभे असलेले तरुण तुर्क...म्हातारे...
हॉटेलपाशी पोचलो तेव्हां दहा वाजले होते. बॅगा आम्हांला देऊ केलेल्या खोलीमध्ये ठेवल्या. हातपाय धुतले. ताजेतवाने झालो.
"आता ?" मी विचारलं.
"पडूया बाहेर ?" लेकीने विचारलं.
हॉटेलबाहेर उभं राहून तिशीच्या मॅनेजरने हात लांब करून बोट दाखवलं. उजवीकडे. नंतर डावीकडे....त्या तिथे. म्हणे एक हॉटेल होतं...खात्रीचं. त्याने चाखून बघितलेलं. बाहेर पडताना, स्वागतकक्षातून इस्तान्बुलच्या माहितीचे वाङमय हातात घ्यायला मात्र विसरलो नाही. खाताखाता उद्या काय करायचे ते आज रात्रीच नको का ठरवायला ?
गल्ल्या तशा अरुंदच. काही घरं जुनी. काही नव्याने वर वाढवलेली. बोळं. पुन्हां परत आपल्या हॉटेलपाशी नक्की पोचू की नाही ही एक शंका डोकावलीच.
एका गल्लीच्या तोंडाशी वसलेले शेशमे रेस्टॉरंट. बैठ्या बांधकामासमोरील मोकळ्या हवेत थाटलेलं. माथ्यावर उतरतं छप्पर. टेबल खुर्च्या आटोपशीर. आम्हीं दोघी आत शिरलो तेव्हा ते तसं भरलेलंच होतं. सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे वळल्या. भारतीय आम्हीं एकटेच होतो. जोडपी त्यांची पेयं हलकेच पीत गप्पा मारत शांतपणे बसलेली होती. वेटर वर्ग सगळा तरुण. पांढरे शर्ट, काळी पॅन्ट.
"Where are you from ?" मोडक्या इंग्रजी उच्चारांतून एका रुबाबदार वेटरने विचारलं.
"इंडिया."
"हिंदुस्तान ?" त्याने भुवया उंचावून विचारलं. मंद हसला. बाजूच्या जोडप्याने वळून बघितलं.
मनात अभिमान भरून आला. मान नकळत ताठ झाली. आणि आमच्या चेहेऱ्यावर हसू पसरलं. प्रतिसाद हसरा मिळाला.
तुर्कस्तानातील पहिली चव. रात्रीच्या शांत वातावरणात. आजूबाजूला हलकेच हसण्याचे आवाज. वेटरांची टेबलाभोवती सफाईदार हालचाल.
डोळे मिटून घेतले...
डेड लाईन्स, प्रेझेंटेशन्स...मिटींग्स...दिवसाचे चोवीस तास.
एक क्षण सर्व आठवलं...आठवलं ते बरं झालं...
नेहेमीच, हातात आलेले पहिले छायाचित्र सर्वात मागे जाते...आणि मग तेव्हांच गठ्ठ्यातून नवनवी छायाचित्रे नजरेसमोर येऊ लागतात. मोकळा श्वास...तुर्कस्तानातील काळे आभाळ...दूर समुद्र पक्षांनी दिलेली साद. पहिली मोकळी रात्र.
आम्हीं समुद्र पक्षी होतो.
क्रमश:
17 comments:
पोहोचवलेस बाई एकदाचे तुर्कीला! पण छान वाटलं... एक इंच ही न हलता... तुर्की गाठताना :)
पक्षांची उपमा झ्याक वाटली बघ!!
'तरुण (आणि म्हाताऱ्या ही) तुर्कांची' नाके फार लांब असतात म्हणे... खरे आहे का ते?
"आम्हीं समुद्र पक्षी होतो.......... "
कल्पनातीत .... वास्तव !!
आता मात्र उत्कंठा वाढीला लागलीय... तुर्कस्थान विहाराची !
पक्षी..
मस्त लिहिले आहे एकदम !
आनंद घ्यायचे क्षण हे आनंद घ्यायचे क्षण आहेत हेच कितीदा तरी लक्षात येत नाही.
'अडाणी' कबाब नव्हतं हे मात्र बरं झालं ;)
मस्त लिहिते आहेस.. पुढचा भाग टाक लवकर..
बाकी सर्व जाऊ दे ते अडाणा कबाब का काय त्याचा फोटो कुठाय? :D
एका 'हॉटेला' तून दुसऱ्या 'हॉटेला' त तुम्ही का जाताय हे मला कळलंच नाही क्षणभर ;)
घ्या..जळवायची सुरुवात. अडाणा कबाबचा उल्लेख करायची काही गरज होती का आता?
श्रीराज, आता तू बोलतोयस तर वाटतंय हा मला....त्यांची नाकं लांब होती म्हणून ! :)
राजीव, :)
शार्दूल, अगदी खरं ! :)
हेहे ! विद्याधर, मला पण आधी तेच नाव वाटलेलं ! :D
रोहणा, अडाणा कबाब फोटू काढायच्या आत खतम हो गये ! :p
हेरंबा, :) :)
असं कसं पंकज राव ! ते तर पयलं ! :) :)
सर्वात लांब नाक असलेला पण त्याच देशातला आहे म्हणे... मला खूप हेवा वाटतो त्यामुळे त्यांचा... भला उनका नाक मेरे नाक से बढ़ा कैसा?!
वाह वाह.. कमाल हा... आपल्याकडे जसा फॉरेनरला भाव देतात तसाच एकदम भाव मिळाला असेल. सगळे तुर्की "अरे वो देखो फॉरेनर जा रहे है" म्हणुन बघत असतिल.
पोस्ट आटोपती का घेतली??? त्या पहिल्या चविच काही पण वर्णन नाही.. :) कबाबचे फोटॊ कुठाय??
Post a Comment