नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 4 July 2012

टूर'की'...भाग ४


शुक्रवारी, सकाळी ऑफिसला पोचल्यापोचल्या सर्वप्रथम इस्तान्बुलमधील हॉटेलचं आठ दिवसांचं बुकिंग रद्द करावयाच्या मागे लागले. एक्स्पेडीया डॉट कॉम. दूरध्वनी क्रमांक. फोन लागला. कोणी बाई हजर झाल्या. मी माझं नाव सांगितलं. बुकिंगचा तपशील दिला. ते आठ दिवसांचं बुकिंग मला रद्द करावयाचे आहे हे सांगितले. बाईंनी मला थोडं थांबण्यास सांगितलं. बहुतेक त्यांच्या संगणकावर त्यांनी शोधाशोध केली. पुन्हां फोनवर आल्या. मला सांगितले की त्यांनी बरीच शोधाशोध केली आहे परंतु, त्यांना काही माझे हे असले बुकिंग मिळत नाही आहे.
"म्हणजे ?"
"I can see your booking for 3 days. But the one which you are talking about is not there."
"What ?"
"Ya Mam...there is no booking on your name for 8 days in that particular hotel."
हे धक्कादायक होतं. मी त्याच बुकिंगवर तुर्कस्तानाचा विझा मिळवला होता !
"So...now ? What do I do ? I have to cancel that booking !"
म्हणजे जे नाहीच आहे...जे अस्तित्त्वातच नाही आहे...ते कसं बुवा रद्द करून घ्यायचं ?
"Just tell me while booking...which site did you visit ?"
"Of course ...Expedia !"
माझं काय डोकं फिरलंय...यात्रा डॉट कॉम वर बुकिंग करायचं...आणि रद्द करायला एक्स्पेडीयाला फोन लावायचा ? मूर्ख कुठली !
"No Mam...am saying ...Expedia.com or...Expedia.co.in ?"
"Oh ! My God ! There are two different sites ?"
"Of course ! Please check that ! Or else I will give you a number...you call them and get your booking canceled."
"Can't you do that for me ?" वैताग !
"No Mam...you only have to do it."

एक्स्पेडीया डॉट कॉम व एक्स्पेडीया डॉट को डॉट इन... ह्या एकमेकांशी संलग्न अशा दोन कंपन्या आहेत. एक भारतात...एक भारताबाहेर. दोघांचेही नंबर टोल फ्री. नशीब माझं !
बुकिंग करताना हा गोंधळ अजिबात लक्षात येत नाही...किंवा कदाचित ते माझ्या लक्षात आले नाही. माझे पहिले ३ दिवसांचे बुकिंग हे 'एक्स्पेडीया डॉट कॉम' वर होते व विझासाठी केलेले पूर्ण आठ दिवसांचे बुकिंग हे 'एक्स्पेडीया डॉट को डॉट इन' ह्या साईटवर झालेले होते. मी फोन लावण्याचा प्रयत्न केला तर तो क्रमांक माझ्या ऑफिसच्या फोनवरून काही लागेना...मग मोबाईल...आता कोण जाणे मी कुठल्या देशात कोणाशी बोलत होते. बाई इंग्रजी वेगळ्याच ढंगात बोलत होत्या. मी माझा मोबाईल कानावर अगदी दाबून धरला...जसं काही फोन कानावर दाबून धरला की ते एकमेकांत मिसळून गेलेलं बोलणं मला स्पष्ट ऐकू येणार होतं ! एकदोन वाक्यांचा पुनरुच्चार केल्यावर का होईना... माझं बोलणं तिला आणि तिचं गूढ बोलणं मला कळलं...व आमचं आठ दिवसांचं बुकिंग रद्द झालं. डोक्यावरच एक ओझंच जसं काही उतरलं.
पुन्हां 'एक्स्पेडीया डॉट कॉम'चा क्रमांक फिरवला. कृपया आमचं ह्या ह्या तारखांचं ३ दिवसांचं बुकिंग कायम करा...."  ते मघाशी करून घेता नव्हतं आलं...कोण जाणे आठ दिवसांचं बुकिंग कॅन्सल झालं नाही तर हे ३ दिवस आणि त्या तारखा धरून अजून आठ दिवस...म्हणजे भारीच !
"You need to get these things sorted...You cannot confuse your customer for no fault of his ! It is not at all clear on your sites !" कान पिळल्याशिवाय सोडायचं नाही.
"Yes Mam, I will give your feedback to the company...."
"Please do that !" फटकारलं. फोन बंद केला.
परदेशी आमची अर्थव्यवस्था करण्यास कालच ट्रॅव्हल डेस्कला कळवले होते. पाऊण रक्कम ट्रॅव्हल कार्डावर व पाव रक्कम रोख. युरोज. ते कार्ड व पैसे माझ्याकडे ऑफिसच्या पत्त्यावर पाठवले गेले. ते ताब्यात घेतले व मी अर्धा दिवस लवकर ऑफिसमधून निघाले.

पहाटे पावणे दोनला आम्हां दोघींना घरातून बाहेर पडावयचे होते. अजून बॅगा अर्धवट भरलेल्या होत्या. घरात कोपऱ्यात. अर्ध्या उघड्या...अर्धपोटी.

विमानतळावर पोचलो तर विमान कुठल्या अंगणात उभे राहणार होते हे अजून ठरावयाचे होते. तसाच अर्धा तास गेला...एक तास गेला. अंगण ठरले. म्हणून रांगेत उभे राहिलो. घड्याळ तर सरकत होतं. आमची रांग मात्र अडकल्यासारखी. जागच्याजागीच. काही वेळाने समोर डेस्कवर हलकेच माणसे येऊन बसू लागली. मात्र काम करण्याची काही इच्छा नसल्यागत...स्वस्थ. इतक्यात लेक माझ्या कानी पुटपुटली. "आई, ती तिथे ना एक मुलगी दिसतेय...मला वाटतं ती तुझी मैत्रीण आहे !"
लेकीने दाखवलेल्या दिशेकडे मी वळले. काळ्याकुरळ्या केसांचा गोल घुमट...गोरा पसरट चेहरा...आणि बारीक डोळे. असामची जेनी !
मी मोठ्याने तिला हाक दिली. जेनी वळली...हाsss....करत तुरुतरू चालत बुटकीशी जेनी पुढे झाली. जेनी. माझ्याच ऑफिसमध्ये पूर्वी काम करणारी...आणि आता बँकॉकमध्ये स्थायिक झालेली.
"Hey ! What are you doing here ? Where are you going ?"

जेनी देखील तिच्या मैत्रिणींबरोबर तुर्कस्तानालाच भटकायला निघालेली होती. तिच्या मैत्रिणींनी बुकिंग केलं होतं टर्किश एअरलाइनचं आणि हिने रॉयल जॉरडॅनियनचं. कारण तुर्कस्तानावरून परतताना तिला जॉर्डनला भेट द्यायची होती. तिथला तिचा मित्र तिला पेत्राची सर करवणार होता ! झकास बेत होता बाईंचा. हे सगळं ऐकता ऐकता अर्धा तास निघून गेला आणि आमच्या लक्षात आलं...आम्ही अजून जिथल्या तिथेच उभे होतो. डिंकाने डकवल्यासारखे. बघता बघता ३ वाजून गेले होते. 
"थांब आई, मी विचारून येते." लेक म्हणाली.
मला ती डेस्कपाशी बोलताना दिसत होती...मान हलवत माझ्याकडे आली.  हसतहसत मला आणि जेनीला म्हणाली. 
"I have a news for you guys .."
"What ?" जेनीने बारीक डोळे त्यातल्यात्यात मोठे करून विचारलं.
"Our flight has been delayed by five hours. " लेक मंद मंद स्मित हास्य चेहेऱ्यावर पसरवत हलकेच म्हणाली.
"Whaat ?" आत्ताचं जेनीचं व्हॉट आणि काही क्षणापुर्वीचं व्हॉट ह्यात तब्बल पाच तासांचा फरक होता ! त्या चढत्या आवाजाने आजूबाजूचे प्रवासी आमच्याकडे बघू लागले. त्यांनाही उत्सुकता होतीच...नक्की गेलंय कुठे आमचं विमान ?
"Yes.." शांतपणा साईसारखा चेहेऱ्यावर पसरवत आणलेल्या बातमीवर लेकीने शिक्कामोर्तब केलं.

झाले होते ते असे...रॉयल जॉरडॅनियनचं विमान मुंबई विमानतळावर आलेलंच नव्हतं. आणि अजून पाच तास तरी येण्याची शक्यता नव्हती. सकाळी साडे दहाला विमान सुटण्याची शक्यता होती. ती देखील खात्री नाहीच...शक्यता.
मी शांतपणे लेकीकडे बघितलं. तिची अपेक्षा माझ्या रुद्रावताराची होती. जेनी तुरूतुरू डेस्कपाशी गेली. हातात इ-तिकिटाचा प्रिंट आउट. जेनी, इस्तान्बुलपर्यंत रॉयल जॉरडॅनियनने प्रवास करणार होती. परंतु, तिथे उतरल्यावर मात्र तुर्कस्तानातील दुसरे विमान घेऊन ती इझमीरला निघावयाची होती. इझमिरला तिने व तिच्या मैत्रिणींनी हॉटेल बुकिंग केलेलं होतं. जर ती इस्तान्बुल विमानतळावर उशिरा पोचली तर हमखास तिचं पुढचं विमान चुकणार होतं. पंचाईत होती. आत्तापर्यंत सर्वच प्रवाशांना कळून चुकलं होतं. विमान वेळेवर सुटण्याची सुतराम शक्यता नव्हती. आमच्या सहप्रवाशांतील प्रत्येकाचं जॉर्डनला उतरल्यावर पुढे जाण्यासाठी कुठली ना कुठली तरी दुसरी फ़्लाईट  होती. एखादुसराच प्रवासी होता ज्याला जॉर्डनलाच जावयाचे होते. डेस्कवर चढत्या गोंधळाला तोंड देण्यासाठी कोणी एक चटपटीत तरुणी येऊन उभी राहिली. तिच्या पुढ्यात जेनी. व तिला एकटीच कशी उभी करणार म्हणून बाजूला मी. आमचे तिघींचे इ-तिकिटांचे प्रिंट आउट तिने हातात गेले. जेनीने विनवून विनवून तिला तिची समस्या सांगितली...म्हणजे जॉर्डन...इस्तान्बुल...इझमीर. मागे इतर लोकं होतीच. जॉर्डन...अॅमस्टडॅम. जॉर्डन...न्यूयॉर्क. जॉर्डन...वगैरे. जॉर्डन...वगैरे. ती रॉयल जॉरडॅनियनची ऑफिसर तरुणी सगळ्यांना अदबीने काहीनाकाही सांगू पहात होती. अकस्मात ती व तिचे सहकारी नाहीसे झाले...परत आले व त्यांनी पक्की बातमी दिली....टर्किश एअरलाइनच्या त्याच वेळी सुटणाऱ्या विमानात थोडीफार जागा आहे. परंतु, इतक्या लोकांच्या खाण्याची व्यवस्था नाही. आणि त्यांचा तसा नियमच आहे, जितके खाणे विमानावर घेतलेले असेल तितकेच प्रवासी विमानात भरावयाचे. त्यावर एकही नाही. तिने जेनीकडे बघून तिला सांगितले...I was trying for three of you ...but they refused to help.

त्या सगळ्या अस्वस्थ जनसमुदायात एक माणूस फिरत होता. गळ्यात कुठलासा बिल्ला लटकवून. त्याच्याबरोबर मध्यमवयीन स्त्रीपुरुषांचा एक गट होता. शांत एका जागी सगळे बसले होते. आणि हा त्यांचा ग्रुप लीडर काय ती धावपळ करत होता. ते मधुमेहाचे डॉक्टर्स होते. अमेरिकेत त्यांचे सेमिनार होते. त्यासाठी मंडळी निघाली होती. सेमिनारचा त्यांचा पहिला दिवस ह्या गोंधळामुळे चुकणार होता. टर्किश एअरलाइनने त्यांना देखील प्रवेश नाकारला होता. त्या सतरा जणांना...पुरेसा अन्नसाठा नसल्याकारणाने. हळूहळू एकेका माणसाने इथेतिथे पथारी पसरावयास सुरवात केली. लेकीने एक कोपरा बघितला, बॅगेतून दोन शाली काढल्या....अंथरूण झालं...पांघरूण झालं. दुसऱ्या मिनिटाला सुखी जीव निद्रिस्त झाला होता. मी रांगेतच खाली जमिनीवर बस्तान ठोकलं. २ बॅगा आणि मी. जेनी उगाच इथेतिथे फिरत राहिली. वेगवेगळ्या बातम्या अधूनमधून आणत राहिली.

खात्रीलायक आतल्या गोटाची खरंतर एकच बातमी होती. विमान सकाळी दहालाच सुटणार होतं. रॉयल जॉरडॅनियनने आमची सकाळची नाश्त्याची सोय केली होती. बाकी ते काहीही करू शकत नव्हते. घरी जाऊन यावं का....उगाच एक विचार मनातून डावीकडून उजवीकडे सरकला. मी बॅगांची राखण करत होते. दुरून जेनी हातात कॉफीचे दोन मग्स घेऊन आली. माझ्यासारखे अगदीच जमिनीवर मांडी ठोकून बसणे सर्वांनाच जमते असे नाही. मला जमते कारण आमच्या आर्ट स्कूलचे तसे आम्हांला ट्रेनिंगच आहे. रस्त्यात, स्टेशनात मिळेल तिथे बसा...व हातातील स्केच बुक बाहेर काढा....६B पेन्सिल कागदावर सपासप ओढायला लागा...स्केचिंग. त्यामुळे रस्त्यात बसणे आणि ऑफिसात खुर्चीत बसणे एकूण एकच. उलटे हे असे रस्त्यात बसून स्केचिंग करण्यातील मजा काही औरच. जेनी तशीही मला बऱ्याच वर्षांनी भेटली होती. मधली काही वर्षं तसा काही संपर्क नव्हता. फेसबुकवर देखील ती काही फार मोठी वावरणारी नव्हती. त्यामुळे JWT सोडल्यावर पुढे तिने कायकाय केले हे ऐकण्यात काही वेळ सहज व्यतीत होऊ शकत होता. माझ्या आयुष्यात तर गेल्या दोन वर्षांमध्ये घडामोडींनी एकदम एक्सलेटरच घेतलेले होते. जसं काही एखाद्या बॉलीवूडच्या आर्ट सिनेमाने अकस्मात व्यावसायिक सिनेमाचे रूप धारण करावे. दोनतीन कॉफ्या रिचवल्या तोपर्यंत सहा वाजले. दोघींच्या आयुष्यातील सर्व अपडेट्स एकमेकींना देऊन झाली. लेकीने झोप आटोपती घेतली. आम्हांला नाश्त्यासाठी कुठे पुढे विमानतळावरील विश्रामगृहाकडे हाकण्यात आले.

दात घासणे...तोंडावर पाणी फिरवणे....नाश्ता...कॉफी. इत्यादी.
प्रवासाची सुरवात होताहोता मायदेशीच पाय रेंगाळले होते. नाईलाज.
"एक लक्षात घे...आपल्याला नाहीतरी नऊ तास जॉर्डन विमानतळावर काढायचे होते...बरोबर ? त्यातले अर्धेअधिक इथेच संपले की ! आता मला वाटतं फार फार तर ३ तास काढावे लागतील आपल्याला जॉर्डनला." कोचावर मुरकूटी मारून शालीत गुरफटून गेलेल्या लेकीला मी म्हटले.
"अच्छा ! म्हणून तू इतका वेळ गप्प आहेस होय ? तरीच म्हटलं अजून तू हायपर कशी काय नाही झालीस !" अर्धवट डोळे उघडून माझ्याकडे बघत लेकीने तीर सोडला.
"गप्प गं ! वाईटातुन नेहेमी चांगलंच काढावं म्हणून म्हणतेय मी ! मला तर वाटतं...ह्या इतक्या सगळ्या प्रवाशांमध्ये सर्वात कमी गोंधळ आपलाच झाला असावा. कारण आपला तो जॉर्डनचा नऊ तासांचा हॉल्ट ! देव करतो ते सगळं बरोब्बर विचार करून करतो ! त्या परक्या विमानतळावर नऊ तास उगाच इथे तिथे फिरत बसण्यापेक्षा आपल्याच विमानतळावर वेळ काढणं कधीही बरं नाही का ?"
"हो ! कळलं ते !"

१ तास इथे आणि २ तास तिथे. काहीबाही करत वेळ संपला. प्रवासात वाचावं म्हणून पर्समध्ये एक पुस्तक ठेवलं होतं. पण जुनी मैत्रीण भेटली आणि मग पुस्तक पर्समध्येच गपगुमान पंख मिटून राहिलं. शेवटी एकदाचं आमचं लपून बसलेलं विमान अंगणात आलं. आम्हां सर्वांना पुकारण्यात आलं. इतस्तत: विखुरलेले गत रात्रीचे चेहरे पुन्हां दिसू लागले. काही झोपाळलेले तर काही ताजेतवाने. रांग लगबगीने विमानाच्या अरुंद रस्त्याला लागली. एकेक माणूस आत दिसेनासा झाला. आम्हीं सर्वात शेवटी उभे होतो. आत शिरलो त्यावेळी काहीजण स्थानापन्न झाले होते. तर काहीजण वरच्या कप्प्यात नसलेल्या जागेत आपापले सामान घुसवत होते. नजरानजर झाली की एक हलकेच ओळखीचे हास्य सगळ्यांच्याच चेहेऱ्यावर येत होते. रात्रभर जमिनीवर अडकून पडलेले...आकाशात भरारी मारावयास उत्सुक सहप्रवासी.

इस देरी के लिये हमें खेद हैं....
कोणी बिनचेहऱ्याची गोड आवाजाची बाई बोलू लागली.

लेक खिडकीत बसली. 
आम्हीं खुर्चीचे पट्टे लावले. हलकासा खट्ट आवाज खात्री देऊन गेला....
नक्की निघालात आता तुम्हीं...तुर्कस्तानाला.
क्रमश:


14 comments:

rajiv said...

" एक्स्पेडीया डॉट कॉम व एक्स्पेडीया डॉट को डॉट इन... "
जुळ्या बहिणी सारख्या दिसतात हे बघितले होते .... तशा ह्या जुळ्या जाल-भगिनी पण ...तोबा तोबा !!

विमानोड्डाण ५ तास उशिरा ...काय हे.... पण परदेशात ९ तास पेक्षा मायदेशात ५ तास परवडले नाही का ..ह्म्मम्म्म ..!!
तुझी लेक ओळखून आहे तुला अगदी :)

विमान व तुम्ही एकमेकांना न चुकवता टूर ला निघालात तर्र....
शुभेच्छा ...पुढील प्रवासाला व प्रवास वर्णनाला पण :)

रोहन... said...

बढते रहिये!!!बढते रहिये!!!

Shriraj said...

या भागाचा शेवट नजर लागावी इतका सुंदर झाला आहे...

"रात्रभर जमिनीवर अडकून पडलेले...आकाशात भरारी मारावयास उत्सुक सहप्रवासी.

इस देरी के लिये हमें खेद हैं....कोणी बिनचेहऱ्याची गोड आवाजाची बाई बोलू लागली.

लेक खिडकीत बसली. आम्हीं खुर्चीचे पट्टे लावले. हलकासा खट्ट आवाज खात्री देऊन गेला....
नक्की निघालात आता तुम्हीं...तुर्कस्तानाला."

सुंदर अनघा!!!

Anagha said...

'तुझी लेक ओळखून आहे तुला अगदी.' हम्म्म्म...आहे खरी मला ओळखून !! :) :)

Anagha said...

बढ रहे हैं रोहणा ! :) :)

Anagha said...

श्रीराज, एकदाचे आता पोचूच आपण तुर्कस्तानात ! :) :)

THEPROPHET said...

प्रचंडच!

Pankaj - भटकंती Unlimited said...

चार भाग उडण्यातच घालवले. आता पटापटा पुढले टाक.

Anagha said...

पंकज, धीर धरी...धीरापोटी फळे गोमटी....
...असं मी तेव्हां स्वत:ला म्हणत होते ! :) :)

Anagha said...

विद्याधर, :) :)

aativas said...

वाचते आहे. मला क्रमश: वाचायचा कंटाळा येतो :-) तरीही 'क्रमश:' वाचते आहे ..

Anagha said...

सविता, अगं, हे सगळं एका दमात नाही लिहिता येत मला ! म्हणून... सॉरी गं. :)

हेरंब said...

अनघाबाईंच्या स्थितप्रज्ञपणाची लेकीने एका मिनिटात काशी करून टाकली.. हाहाहा..

>> शांतपणा साईसारखा

आम्हाला अंमळ आपले यवगेश साई आठवले ;)

सौरभ said...

झक्कास्स..