नेहेमीचा मुंबईतील दिवस. चढत्या भाजणीचा. येथील सूर्य हा मुळातच त्याचे डोळे उघडले की ट्रेडमिलवर चढतो. सुसाट वेग ट्रेडमिलला देऊन टाकतो. स्वत: धावू लागतो आणि त्यामागे सर्व मुंबईकर. लटकत, फरफटत. नेहा आज नेहेमीपेक्षा लवकरच घराबाहेर पडली होती. सगळ्यांनी ऑफिसमध्येच भेटायचे व तेथूनच पुढे मिटींगला निघायचे असे कालच ठरले होते. पावणेदहापर्यंत सर्वजण जमा झाले. लगोलग मोठमोठ्या गाड्या बाहेर पडल्या. रस्त्यावर पळू लागल्या. अगदी पळू नाही म्हणता येणार...पण मॅराथॉन शर्यतीत जसे नवशिके सुरुवात अगदी वेगात व जोशात करतात आणि पुढील पंधराव्या मिनिटाला, जमिनीला पाय टेकल्यागत संथ चालू लागतात तसेच काहीसे ह्या लांबसडक गाड्यांचे झाले. मिटिंग साडेदहाची होती. ऑफिसपासून वीस ते पंचवीस मिनिटांच्या अंतरावर होती. त्यामुळे तसेही काही काळजीचे कारण नव्हते. नेहा, तिच्या बॉससमवेत काळ्या स्कोडामध्ये मागे बसली होती. बॉसची ऐसपैस गाडी. एक सहकारी पुढे वाहकाच्या शेजारी. अशी ही चारांची वातानुकूलित गाडी, त्यांच्या मोठ्या मोहिमेवर निघाली होती. आठवड्याचा मध्य दिवस. कामे भरास आलेली. तसंही बॉसबाई असल्या की नेहाला बोलायचे फारसे नसेच. बॉस वक्ता व नेहा श्रोता. ऐकता ऐकता नेहा गाडीबाहेर डोकावीत होती. बाहेरील प्रत्येक माणूस मनात काहीनाकाही बेत रचून रस्त्याला लागलेला दिसत होता. वेगवेगळ्या दिशेने माणसे धावत होती. पळत होती. वयोमानाला कधी शोभतील असे कपडे तर कधी थोडा विसंगत असा पेहेराव. परंतु, सर्व चेहेऱ्यावर भाव मात्र एकाच प्रकारचे. रस्ता, पदपथ हे दोन्ही हलते असले तरीही एकूण सगळेच साचेबंद. जणू काल ह्यावेळी इथे हीच हालचाल झालेली असावी. व उद्याही ह्याच वेळी जणू हे असेच घडेल. नेमून दिलेल्या भूमिका. ठरवून दिलेली कामे. श्वासाचा एकच ताल आसपासच्या सर्व जीवित गोष्टींनी पकडलेला.
तिच्याच तंद्रीत हरवलेल्या नेहाला, तिच्या बॉसची बडबड व बॉसच्या ड्रायव्हरची नाहक हॉर्न वाजविण्याची सवय...दोन्ही गोष्टी कानाला पीडाच देत होत्या. आणि कान हे डोक्याला चिकटलेले असतात. त्यामुळे तो कर्कश आवाज थेट डोक्यात जाऊन आदळत होता. ज्या इमारतीत मिटिंग होती ती इमारत रस्त्याच्या पलीकडे होती. तेव्हा थोडं पुढे जाऊन एक अर्धवर्तुळाकार वळण घेणे गरजेचे होते. बॉसच्या सूचनेचे पालन करीत तिच्या ड्रायव्हरने सफाईने हातातील चक्र फिरवले. चारी चाके आज्ञाधारक मुलांसारखी लयीत वळली.
"शिंदे, गाडी लेफ्ट में रखो. इधरही थोडा आगे है वो बिल्डींग." हिचं हिन्दी म्हणजे...नेहा मनातल्या मनात पुटपुटली.
गाडी आज्ञेसरशी डाव्या बाजूला सरकली. नेहा डाव्याच बाजूला बसलेली होती. त्यामुळे रुंद गाडी इतक्या तातडीने वळत असताना, डाव्या बाजूला कायकाय दूर पळत होतं ते तिला खिडकीतून दिसत होतं. काही सेकंदांत गाडी पूर्ण डाव्या बाजूला आलेली होती.
"शिंदे वो रही बिल्डींग. अंदर ले लो."
तितक्यात नेहाची नजर पडली ती रस्त्याच्या कडेला कचऱ्याची ढकलगाडी घेऊन जाणाऱ्या एका स्त्रीच्या पाठमोऱ्या आकृतीवर. अनवाणी पावलांच्या थोडे वर खोचलेले हिरव्या रंगाचे पातळ. काळसर रंग. सकाळच्या तिच्या सहकाऱ्यांनी कडेला जमवून ठेवलेला कचरा जमा करीत, रस्त्याच्या त्या टोकापासून ती इथवर आली असावी. नेमकी ज्या इमारतीत नेहाचा कंपू निघाला होता त्याच वळणाच्या तोंडाशी. नेहाने ड्रायव्हरकडे नजर टाकली. ड्रायव्हर 'अर्जुन' होता. त्याला फक्त बॉसने सांगितलेली दिशा दिसत होती. आजूबाजूचे दुसरे काहीही नाही. वळव म्हटले, गाडी वळली. त्या बाईच्या हाताशी ओसंडून वाहणाऱ्या कचऱ्याची ढकलगाडी दिसत होती. ड्रायव्हरच्या हाती आलिशान स्कोडा. दोन्ही गाड्या अर्थार्जनासाठी त्यांच्या हाती पडल्या होत्या. समाजातील आर्थिक स्तरांवर त्या स्त्रीच्या गाडीचे स्थान, सर्वात खाली. ड्रायव्हरच्या हातातील गाडीने, त्याचे स्थान पार वर नेऊन ठेवलेले. त्याने काय म्हणून तिच्यासाठी थांबावे ? खरं तर फक्त काही क्षणांचा प्रश्र्न होता. परंतु, त्या क्षणांवरच तर त्या समाजातील दोन व्यक्तींमधील एकाचे श्रेष्ठत्व अवलंबून होते. त्याची गाडी आलिशान. वातानुकूलित. ड्रायव्हरने सराईतपणे हातातील सुदर्शन चक्र फिरवले. चार चाके वळली. अकस्मात समोर आलेल्या ह्या गाडीला मार्ग देण्यास ढकलगाडी थांबणे तातडीचे होते. नाहीतर ढकलगाडीने काळ्या स्कोडावर आपल्या नखांची क्षते उमटवल्याशिवाय सोडलेच नसते. ढकलगाडीला तिचे वर्चस्व सिद्ध करावयास काही वेळ नसता लागला. आणि जखमा खरं तर स्कोडालाच झाल्या असत्या. बाईने ढकलगाडीला अंगाशी ओढून घेतले. नेहाने क्षणार्धात हे सर्व टिपले होते. स्कोडा काही सूत पुढे गेल्यावर नेहाने मागे वळून बघितले. आणि त्या बाईची व नेहाची नजरानजर झाली. बाईच्या नजरेत संताप होता. नेहाने तो स्वत:च्या अंगावर उगा झेलला. आत नजर वळवली. गाडीतील कोणालाही ह्या एका क्षणाच्या नाट्याची जाणीव देखील नव्हती. बॉसने सांगितले त्या जागी व त्या क्षणी ड्रायव्हरने वळण घेतले होते. स्कोडा वळली होती. प्रथम पुढे असलेली गरीब तीनचाकी ढकलगाडी, हिरमुसती मागे थांबली होती. तिने नमते घेतले होते. श्रीमंत चारचाकी स्कोडा गर्वात पुढे पळाली होती.
हे सर्व म्हटले तर नाट्य व म्हटले तर मुंबईसारख्या शहरात रोज दिसणारा अहंभाव होता. आर्थिक स्तरांवरील खिन्न करणारी विषमता. त्यामुळे आलेली निराशा व एक बेगुमानता...ही अशी प्रत्येक क्षणाला मुंबईत कुठेनाकुठे तरी ठिणगी पाडत असते. कधी ओझरती तर कधी आग लावणारी. इथे मानापमान हातातील वाहनांवर ठरतो...कुत्र्याच्या वागण्यावरून अनेकवेळा त्याच्या मालकाच्या स्वभावधर्माची ओळख करून घेता येते...चालायचेच. गाडी थांबताच नेहाने इतका वेळ बाजूला पडलेली पर्स खांद्यावर अडकवली व दार उघडून ती जमिनीवर आली.
ती ना खालच्या स्तरातील ना वरच्या.
मध्यमवर्गीय नेहा.
ना घरकी ना घाटकी.
त्या नवनिर्मित इमारतीतील लिफ्ट अलगद समोर जमिनीला टेकली. दार उघडले. नेहा पुढे उभी होती. परंतु, आता नेहाने बाजूला होणे अपेक्षित होते. एकवार त्या कचरेवालीशी झालेली नजरभेट तिला आठवली. नेहा बाजूला सरकली. सर्वात प्रथम आत शिरण्यासाठी तिने बॉसला जागा करून दिली. तिसरा मजला आला. दरवाजा हळूहळू उघडला. नेहाने मान झटकली व कचरेवालीची जळजळीत नजर डोक्यात मागच्या कप्प्यात टाकून दिली. संगणकावर एखादी नको असलेली फाईल डेस्कटॉपवरून उचलून जणू कुठे आत गुहेत सरकवून टाकावी. डेस्कटॉप तेव्हढाच मोकळाढाकळा. दिखाव्याला रिकामा.
चला...ही मिटिंग चांगली होऊन जाऊ दे.
कंपनीला हा धंदा जर मिळाला तर वर्षाच्या शेवटी अप्रेजल चांगले होईल...
And that's what matters...
नेहा मनातल्यामनात मिटींगची उजळणी करू लागली.
नेहा मनातल्यामनात मिटींगची उजळणी करू लागली.
17 comments:
satya, gosht, teeka, karika, kaay mhanave kya post la kalat nahi....pan sakshaat trishanku zhalela middle class dolya samor anun thevlas tu.
अवेसम (गुगल ट्रान्सलिटरेटनं दिलेली देणगी आहे ही :D )!!!
आपण कधी नेहा असतो, कधी कचरावाली बाई .. तर कधी बॉसदेखील :-(
Masta
त्रिशंकू...वंदू, हे नाव येत होतं मनात सुरवातीला...पण मग वाटलं 'ना घर का ना घाट' का ह्यात मध्यमवर्गीय म्हणून माझीच भावना अधिक चपखल बसतेय.
विद्याधर ! मी सुरवातीला विचारातच पडले ! म्हटलं हा काय शब्द आहे ! :p :D
किती दिवसांनी येतोयस !! :)
सविता, मध्यमवर्गाची ही शोकांतिका...नाही का ?
>> आणि कान हे डोक्याला चिकटलेले असतात. त्यामुळे तो कर्कश आवाज थेट डोक्यात जाऊन आदळत होता.
हे जबरदस्त वाक्य आहे :)))
अभिषेक, धन्यवाद. :)
हेरंबा, मला आता तुझी आवड कळायला लागलीय बरं का... :) :)
मुंबईतील विषमतेच ज्वलंत उदाहरण!
प्रत्येकजण आपली भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न करतो
"गमन" ची गजल "सिनेमे जलन"ची आठवण झाली.
नाजी एक कविता "विषमता " ब्लॉगवार वाचावी काहिशे असेच विचार
संजय, वाचली कविता...असेच काहीसे विचार आहेत.
प्रतिक्रियेसाठी आभार.
“We think sometimes that poverty is only being hungry, naked and homeless. The poverty of being unwanted, unloved and uncared for is the greatest poverty. We must start in our own homes to remedy this kind of poverty.”
मदर तेरेसाचा याबाबतीतला वरील विचार किती खरा आहे न
हम्म... कधी झाले हे? :) तरी सांगत असतो.. सारखे सारखे इंडिया बुल्सला जाऊ नकोस... :D
Tell Neha not to think much and not to observe or listen everything that is happening...
everytime I hear 'india bulls' i remember the lone tree that used to stand alone in the whole ground which was being prepared for this massive construction. And one day, just like that, the tree was gone and the foundation work for the building began.
every conference room in that center must bear the curse of that tree :(
सगळ्या आपण आपल्यात सगळ्या.. :(
Post a Comment