नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 25 December 2012

एक प्रयत्न...

तसाही विचार करायला फारसा वेळबीळ मिळत नाही. आणि त्यातून कामाचा प्रकार असा आहे की २४ x ७ डोकं लढवत बसणे भाग असते. जाहिरात क्षेत्रामध्ये कुठल्याही कामाचा 'रिझल्ट' हा ताबडतोब दिसून यावा लागतो. म्हणजे जाहिरातीत जे काही बोलले जाईल त्याच्याशी वाचक (प्रिंट मिडीया), श्रोता (रेडियो ) वा प्रेक्षक (टीव्ही वा चित्रपट) हा त्वरित कनेक्ट व्हावयास हवा. समोरच्या माणसाच्या भावनांना हात वगैरे. त्यामुळे प्रत्यक्ष एखाद्याशी बोलण्याचा प्रश्न उद्भवला तर आपण जे काही बोलतो आहोत, ते समोरच्याला समजेल असे असावे. त्याच्याकडून आपल्याला जी अभिप्रेत आहे ती कृती मिळवण्यासाठी काय प्रकारची भाषा व काय बोलले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी हा मेंदू तयार झाला आहे....वा तयार होत आहे.

हल्ली माझ्यावर सार्वजनिक वाहनांचा लाभ घेण्याचे प्रसंग कमी येतात. त्यामुळे जिथे 'नियम पाळणे' ह्या आपल्या कर्तव्याची सर्वप्रथम परीक्षा होते ते बहुतांशी तरी माझ्याच हातात असते. आणि मी नियम तोडायला जात नाही.

मात्र गेल्या काही दिवसांत ३ वेळा मला टॅक्सी करावी लागली. मग तीनही वेळा दार उघडून आत शांतपणे बसल्याबसल्या मी चालकाला चार गोष्टी सांगितल्या. सर्वात प्रथम मला नक्की कुठे जायचे आहे ते. दुसरी, तिसरी आणि चौथी गोष्ट...पहिल्यावेळी मी आधी मराठीत बोलून पाहिलं. मग लक्षात आलं की शेवटी मी जे काही बोलणार आहे ते फार महत्त्वाचं आहे...आणि ते समोरच्याला कळणे जरुरीचे आहे. समोरच्याला संवादाची भाषा हिंदी हवी होती...मग मी हिंदीत बोलले. माझ्या मुंबईच्या धेडगुजरी हिंदीत. पण ठामपणे.
"अब हम चार चीजें करेंगे...एक...हम खालीफोकट हॉर्न नही बजायेंगे...दो...हम एक भी सिग्नल नही तोडेंगे...तीन...हम झीब्रापे सवार नहीं होंगे...और लास्ट में...हम खिडकी के बाहर थुकेंगे नहीं."
"ठीक हैं...ऐसा ही होगा...!"
"धन्यवाद...!"

प्रत्येक वेळी होकारार्थी उत्तर मिळालं.
आणि त्या तीनही चालकांनी मला दिलेला शब्द पाळला...मी त्यांच्या गाडीत बसले होते तोपर्यंत.

निदान इतकं तरी पुरेसं आहे...नाही का ?
मी काही 'रिक्षा प्रदेशात' रहात नाही...पण हा एक प्रयोग त्यांच्यावरही करून बघायला हरकत नाही.

मला वाटतं...मी ज्या काही भाषेत बोलले...आणि जे काही बोलले...त्यातून समोरच्याला ठराविक कालावधी पुरती का होईना मला हवी ती कृती करावयास मी भाग पाडले.

हा प्रयत्न करून बघता येईल का तुम्हाला ?

Sunday, 23 December 2012

ओळखपरेड

लहानपणी पातळ पुस्तकं मिळत असत. मोठ्या अक्षरांची. A४ हून लहान आकाराची. सोनेरी सफरचंद...उडता घोडा वगैरे. त्यातील राजकन्या रूपवती असे...अचानक एके दिवशी अतिशय भयावह राक्षस तिला पळवून नेत असे. दूर दूर उंच उंच पर्वतावर तिला ठेवीत असे. ही बातमी वाऱ्यासारखी दुनियाभर पसरे. दिवसांमागून दिवस उलटत. आणि कुठूनतरी एक रुबाबदार राजपुत्र उडत्या घोड्यावर बसून येई. राक्षसाशी तुंबळ युद्ध करी. त्याचा समूळ नायनाट केल्यावर राजपुत्र त्याच उडत्या घोड्यावर राजकन्येला घेऊन स्वार होई. तिला तिच्या देशात, तिच्या महाली घेऊन येई...तिच्याशी विवाह करून...पुढे कित्येक वर्षं सुखाने राज्य करी.

त्यानंतर आयुष्यात आला रावण. त्याने सीतेला खांद्यावर बसवून पळवून नेले. अशोक वृक्षाखाली तिला विद्रूप राक्षसीणींच्या बंदोबस्तात ठेवले. आणि तिची रोज मनधरणी केली. तिने त्याच्याशी लग्न करावे म्हणून. 

पुढील आयुष्यात अनेक राक्षसांशी ओळख झाली. नरकासुर, महिषासुर, कंस वगैरे वगैरे. नरकासुराने असंख्य स्त्रियांवर अत्याचार केले. त्या त्या देवाने जन्म घेऊन त्या त्या राक्षसाचा वध केला. वेळोवेळी मानवजातीला जगणे सुसह्य करून दिले.

शाळेत जाण्यासाठी बस होती. इमारतीच्या खाली सकाळी बस येत असे. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आणून सोडत असे. बसने मुलगी गेली तर ती सुरक्षित राहील अशी आई बाबांची खात्री होती. सात आठ वर्षांची असताना आमच्या शाळेच्या बसचा क्लिनर 'घाणेरडा' होता. लहान लहान मुलींना आपल्या मांडीवर घेऊन त्यांच्या शरीराशी तो चाळे करीत असे. हे चुकीचे आहे आणि ह्याविरुद्ध आपण तोंड उघडावयास हवे...आपल्या आईबाबांना सांगावयास हवे हे कळले नाही...कोणालाच.

रस्त्यात अचानक एखाद्या रिकाम्या गल्लीत एखादा माणूस स्वत:च्या शरीराशी विचित्र चाळे करीत असताना आढळे. त्यावेळी दुसऱ्या पदपथावर जाउन खाली मान घालून चालू पडावे.

कॉलेजसाठी बेस्टच्या बसने येजा करावी लागे. मुद्दाम आपल्या शरीराला हात लावला जात आहे हे कळले की आपण गर्दीतून कसेबसे सरकावे व कुठल्यातरी एखाद्या कोपऱ्यात उभे रहावे.

आपल्याच तंद्रीत इमारतीत शिरावे आणि अचानक पाठून कोणी शरीराला विळखा घालावा. आपण आकांताने किंचाळावे....माणसे जमा करावीत...चेहरा नसलेला माणूस पळून जावा...कोणाच्याही तावडीत न सापडता.

अशा प्रकारचा अनुभव एखाद्या माझ्या सखीला तिच्या आयुष्यात आलाच नसेल हे अशक्य.

राक्षस पुस्तकात वाचले. तेव्हा प्रश्न पडले नाहीत. पण आता पडतात...राक्षस राजकन्येला जेव्हा कैद करून ठेवत असे, काय तेव्हा तो तिच्यावर बलात्कार करीत असे ? ज्यावेळी राजपुत्र राक्षसाचा वध करून राजकन्येची सुटका करीत असे त्यावेळी तिची अवस्था नक्की कशी असे ? त्या अवस्थेत तिला पाहून देखील काय राजपुत्र तिचा पत्नी म्हणून स्वीकार करीत असे ?

रावणाने सीतेची फक्त मनधरणी केली व तिच्यावर बलात्कार केला नाही अशी आपली समजूत आहे की रावण हा एक सद्गुणी राक्षस होता ?

थोरामोठ्यांसमोर स्वाक्षऱ्या केल्या म्हणून नवऱ्याला स्वत:च्या सुखासाठी बायकोवर बलात्कार करण्याचा काय राजरोस कायदेशीर अधिकार मिळतो ?

स्वत: दारू पिऊन मदमस्त झाल्यावर आपला मित्र आपल्या बायकोवर हात टाकतो आहे ह्याचे भान देखील न ठेवणाऱ्या नवऱ्याचे 'राजपुत्राचे देखले कवच' गळून पडलेले बायकोला कळते...मग हे त्याच्या लक्षात कधीच येत नाही काय ?

सादत हसन मंटो. त्याची 'खोल दो' कथा. अवाक करून गेली. पोटात खड्डा पडला...त्यातील तरुण मुलगी आता आपल्या जिवंतपणी आपल्या नजरेपासून कधीही दूर जाणार नाही...हे कळले.

राक्षस सद्गुणी होते.
कारण त्यांच्या माता राक्षसीणी होत्या...बाप राक्षस होते.
त्यामुळे ते बघताक्षणी ओळखू येत होते. कुरूप, अवाढव्य, दहा डोकी...इत्यादी.
आता माणसाने राक्षसाला जन्म घालावयास सुरवात केली आहे.
त्यामुळे आता त्याचे डोळे त्याच्या आईसारखे...नाक बापासारखे...बोटे आजीसारखी...आणि केस आजोबांसारखे.
इंद्रिय मात्र राक्षसाचे.

सखे, आपणच तर ह्यांना जन्म देणार...
मग आता आपण ह्यांना कसे ओळखायचे ?
आणि आपले देव तर आपण मंदिरांत नेऊन बसवले.
त्यामुळे त्या देवळातील मुर्तींतून बाहेर प्रकटबिकट होऊन आपल्या लज्जारक्षणासाठी साड्यांच्या स्पेशल इफेक्टची शक्यता देखील शून्य.
बघ बाई.
राक्षसाची जन्मदात्री देखील तूच.
आणि त्याच्या शरीराखाली चोळामोळा होऊन फाटून निघणारी देखील तूच.

Saturday, 15 December 2012

कुणाविना...

बारा तारखेला बाबा जाऊन दहा वर्षं झाली. हे सिद्ध झालं की आपलं माणूस गेलं म्हणून आपण काही मरतबिरत नाही. आता नववर्षाच्या आरंभदिनी नवरा जाऊन दोन वर्षं होतील. म्हणजे सिद्धांताला पुरावे मिळाले. ह्या सगळ्या आपल्या बालसमजुती असतात. माझ्या ह्या समजुती अगदी माझी लेक दोन वर्षांची झाली तरी टिकून होत्या. म्हणजे आमच्या शेजारचे काका अकस्मात गेले त्यावेळी मला अगदी ठामपणे वाटले होते...आता वर्षभरात काकी पण जातील म्हणून. पण तसं काही झालं नाही. त्यानंतरही बरीच वर्षं काकी जिवंत होत्या. बालवयात प्रेमपत्र वगैरे लिहिताना मी बऱ्याचदा लिहिलं होतं...तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही वगैरे वगैरे. तसलं काही झालं नाही. ह्या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी असतात. आपल्याला कोणी असं बोललंबिललं तर अगदी म्हणणं खोडून टाकायची गरज नाही...पण उगाच त्यावर विश्वास ठेवायला जाऊ नये. कारण आपले जगणे हे आपले असते. आपण शेवटी स्वत:साठी जगत असतो...स्वत:च्या कर्तव्यांसाठी जगतो...आपल्या टाळता न येणाऱ्या जबाबदाऱ्यासाठी जगतो.

हल्ली असं बऱ्याचदा होतं...विचारांची वावटळ आणि समोरील पडद्यावर टंकित करता येण्याची गती...ह्यांचा मेळ जुळत नाही. विचार सुसाट लाटेसारखे किनाऱ्यावर आपटून माघारी निघून देखील जातात...आणि मी तिथेच उभी असते....पायाखालचा ओला स्पर्श सुकवत. बधिर. एक लाट...दुसरी लाट...शुभ्र फेस वाळूच्या आरपार झिरपतो...आणि माझे विचार फेसाइतकेच अल्प आयुष्य घेऊन झिरपून जातात...
अस्तित्वाचे नामोनिशाण न ठेवता. 

माझी लेक मला बोलता बोलता म्हणून जाते..."आई, तुझं आयुष्य फार इव्हेन्टफुल झालंय...."

इव्हेन्टफुल आयुष्य...
आणि इव्हेन्ट मॅनेजमेंटचा ना ओ का ठो मला माहिती...!


Tuesday, 11 December 2012

तीन...दोन...एक

स्वत:ला ओळखेओळखेस्तोवर अर्ध आयुष्य जातं...आणि जोडीदाराला पूर्ण ओळखतो असं मानून त्याच्यावर आपण आयुष्य सोपवतो !
कसला मूर्खपणा आहे हा !
सोळाव्या वर्षी...तळपत्या उन्हात देखील आकाशात इंद्रधनुष्य असतं...कुजक्या नाल्यात डवरलेले गुलाब दिसतात...!
अक्कलखाती आयुष्य जातं !

पानाला पिवळजर्द होऊन धारातीर्थी पडल्यावर कळत असेल काय....वर हे इतकं अथांग आभाळ पसरलं होतं...त्याच्या देखील नकळत...अचानक एखादी वीज त्याचे हृदय फाडून जाते...आणि तरी सुद्धा ते आभाळ जणू सर्व आलबेलच आहे असा आव आणून, पृथ्वीवर सावली धरून उभं रहातं !
कमाल आहे नाही का?
जाणवतं का कधी हे तुम्हांला ?

मला सध्या हे असंच सुचतंय !
काळजी नका करू...
मी आभाळाकडून बरंच काही शिकतेय !
:)



Sunday, 9 December 2012

सैरभैर

आभाळाला सीमा नसते...नियम एक. नदी संथ वहाते...नियम दोन. समुद्र पृथ्वीचा सोबती...नियम क्रमांक तीन.
नियमबाह्य घडते तेव्हा आभाळ फाटते. नदी हंबरडा फोडते. पृथ्वीची साथ सोडून समुद्र आकाशाकडे झेपावतो.
आई प्रेमळ असावी...आयुष्याने धरलेली पहिली अपेक्षा...नियम नव्हे.
मात्र हा एक अपेक्षाभंग...माथ्यावरचे आभाळ फाडतो...डोळ्यांच्या नदीला पूर आणतो...आणि समुद्राची लाट उर फाटून नेते...
...एकूण काय....एक अपेक्षाभंग...आयुष्य सैरभैर वगैरे.

Thursday, 6 December 2012

घुबडकथा

हळव्या चिमणीचं नक्की काय झालं ?
तिचं घुबड कधी झालं ?
वादळ आलं ? उल्कापात झाला ?
कोवळ्या चिमणीचं नक्की घुबड का झालं ?
व्हायचं ते झालं...
घडायचं तेच घडलं.
गळला एकेक दिस....
ढळलं एकेक पीस.
मऊ लोण्याचं शेण झालं...
गुलाबी रंगाचं मातेरं झालं.
बघताबघता ह्या चिमणीचं घुबड झालं.

Wednesday, 28 November 2012

जाळपोळ

डोक्यात जाणारी माणसं वाढलीत.
आणि हृदयाची लोकसंख्या घटलीय.
म्हणूनच बहुधा डोक्यात राख घालून घ्यावीशी वाटते.
आणि वाटते हृदयाची करावी जाळपोळ.

Wednesday, 21 November 2012

प्रश्नपत्रिका

प्रश्नपत्रिका.
कित्येक प्रश्न. त्या प्रश्नांना कुठलीही वर्गवारी नाही. एका वाक्यात उत्तरे द्या, सविस्तर उत्तरे द्या, गाळलेले शब्द भरा...असे काहीही नाही. फक्त प्रश्न.
आणि त्यातून सगळे सोडवलेच पाहिजेत असेही नाही. काही प्रश्न आपल्यासमोर फक्त मांडण्यात आले आहेत, मात्र ते आपण सोडवायचे मात्र नाही आहेत अशी पुसटशी देखील कल्पना दिली जात नाहीत.
मी मात्र सगळेच प्रश्न गांभीर्याने सोडवू पहात होते.
काही प्रश्न काळ सोडवणार आहे व काही थोडेच मी सोडवायचे आहेत हे आधीच कळू शकलं असतं तर कदाचित आयुष्य जगणं थोडं सोपं झालं असतं.
उगाच दिवस उलटतात, महिने सरतात आणि वर्षे निसटतात.
आणि मग मागे वळून बघितल्यावर जाणवते...

...तो प्रश्न मी कधी सोडवूच शकले नाही.
आणि तो कधी सुटलाच नाही.

कोवळ्या वयात कल्पना फार भराऱ्या वगैरे घेतात.
उगाच आत्मवल्गना स्वत:च्याच मनाशी, स्वत:बद्दलच्या.
आयुष्य संपता संपता सगळाच भ्रमनिरास होतो.

आणि हे सगळे इतके कठीण प्रश्न मी सोडवायचे आहेत का ?....ह्या एकाच प्रश्नाचे उत्तर मिळते.

कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मी द्यावयाचेच नव्हते.

परीक्षेला 'काळ' बसला होता !

Tuesday, 30 October 2012

विहीर

मी विचारात पडते. त्यावेळी विचारांची ती एक विहीर असे. कधी माझ्या हातात कॉफीचा जाडजूड मग असतो, कधी एखादा कांदा तर कधी एखादे पुस्तक. मी फक्त आत डोकावू पहाते आणि विहीर मला आत ओढून नेते. ती काळ्याभोर पाण्यावर फुंकर घालते. पाणी शहारते. तरंगू लागते. मी त्यात फुका गोल गोल गिरक्या घेत रहाते. विहिरीला त्याची तमा नसते. एक गिरकी मला कुठे घेऊन जाईल ह्यावर माझा तो काय ताबा ? मी देखील ना विरोध करत...ना कधी रडत भेकत.

आज पहाटे पहाटे जाग आली. डोळे उघडते ना उघडते तोच मला तिने आत खेचून नेले.
शरण मी उभी राहिले, ती थेट एका न्हाणीघराच्या बंद दारासमोर. हलकेच मी दार ढकलते. पांढऱ्या फरशींवर लाल काळे रक्त. कुठे आतली फरशी दिसावी तर कुठे रक्त थांबून गेलेले. जणू वहाणे मरून गेले. चार दिवसांपूर्वीच स्तब्ध झालेले रक्त. वाटते गोठलेल्या रक्तावर बोट टेकवावे. बोट कपाळी लावावे. त्याच तर रक्ताचे मी कधी कपाळी कुंकू लावलेले. ते रक्त ज्या देहात वहात होते...त्याच देहाचे नाव मनी जपले होते...त्याच त्या नावाने गौरीहार पुजला होता. अंगभर पिवळा पदर...कपाळावर मुंडावळ्या...तांदळाच्या शुभ्र कण्यांत हळूहळू लपत जाणारी...नाजूक पार्वती...अन्नपूर्णा...
दारी आलेल्या पाहुण्याला दीर्घायुष्य दे...
दारी आलेल्या पाहुण्याला दीर्घायुष्य दे...
दारी आलेल्या पाहुण्याला दीर्घायुष्य दे...

तितक्यात गजर वाजतो.
क्रूर विहिरीच्या तावडीतून मला बाहेर फक्त घड्याळ खेचू शकते.
एक काम...दुसरे काम...तिसरे काम....
मग मी एक मुंगी होते.
स्वत:ला कामांच्या गर्तेत झोकून देते.

Thursday, 25 October 2012

तेरे लिये...

फिर एक बार...

रामाला जिवंत जाळण्यात आले.
रस्त्यांवर रावणाने थैमान घातले.
हनुमानाने पार्टी बदलली.
मर्कटे रावणाला सामील झाली.

देवी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये...

Friday, 12 October 2012

मावळते मावळे ?

"काही कळत नाही. लोकं पुन्हां पुन्हां शिवाजी महाराज, संभाजी महाराज...कर्ण ह्यांच्यावरील कथा कादंबऱ्या, बखरी का वाचत असावेत ?"
"म्हणजे काय ? ही पुस्तक पुन्हां पुन्हां वाचण्यासारखी असतात म्हणून !"
"पण त्यापुढे देखील इतिहास आहे. आपल्या देशाचा आहे. जगाचा आहे."
"मग ?"
"तसं नाही रे ! आपण शिवाजी महाराजांवरील लिखाणाची पारायणं करीत रहातो. ह्याचा अर्थ ते आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात झिरपत असतात."
"काय म्हणायचंय तुला ?"
"शिवाजी महाराज वा आपले त्यापुढील पुढारी...म्हणजे सुभाषचन्द्र बोस, आगरकर, वल्लभभाई पटेल....मी हीच नाव जाणीवपूर्वक घेतलीयत...कारण मी गांधीजी, टिळक वगैरे म्हटलं तर वेगळेच वाद सुरु होतील !....तर हे आपले नेते, दैवते...त्या त्या वेळी ज्याच्याविरुद्ध लढायची गरज होती त्यासाठी लढले...बरोबर ना ?"
"हो."
"मग आज आपल्यापुढे तसाच वा त्याहून मोठा प्रश्न उभा आहे...मग त्यासाठी आपण प्रत्येकजण ही आपली जबाबदारी समजून का लढत नाही ?"
"म्हणजे काय ?"
"अरे, म्हणजे त्यावेळी निदान आपल्याला परकीयांशी लढायचे होते...आता इथे आपल्याला स्वकियांशीच लढायला लागणार आहे. पण मग आपल्या रक्तात शिवाजी आहे ना मग तो उसळून का येत नाही ? ते फक्त पुस्तकी ज्ञान का रहाते ? म्हणजे इतिहास पाठ..आणि बाकी वास्तवात....वर्तमानकाळात अंधार...असे का ?"
"कळलं...कळलं तुला काय म्हणायचंय ते."
"जर शिवाजीमहाराज हे आपल्या विराट वृक्षाचे मूळ आहेत, तर मग ह्या वृक्षाच्या प्रत्येक पानाने, प्रत्येक फांदीने अगदी लहानशी जरी कीड आली तर ती झटकून टाकण्यासाठी वा तिचा नायनाट करण्यासाठी झटायला हवे आहे ! शिवाजी महाराज मुघलांशी लढले...टिळक, गांधीजी इंग्रजांशी लढले....ना. ग. गोरे, दुर्गा भागवत...आणीबाणीशी लढले...मग आपण काय फक्त मढं आहोत का ? आपल्या आईवडिलांनी प्रेतांना जन्म दिला होता काय ? भ्रष्ट्राचार समोर येऊन ठाकला की आपण त्याला साष्टांग नमस्कार का घालतो ? ते तीर्थ समजून आपल्या डोळ्यांना व माथ्यावर का पसरतो ?"
"मी एकदा आमच्या एका कामासाठी असा लढायला उभा रहात होतो यार...पण माझी बायको मला म्हणाली...उगाच नाय ते करायला जाऊ नकोस ! म्हणून मग मी नाही पडलो त्यात !"
"हम्म्म्म...म्हणजे बायकोच्या मुळांशी झाशीची राणी नाहीये वाटतं...की...आपली मुळंच मरत चाललीयत...?"

Thursday, 4 October 2012

बदल...माझ्यातील...तुझ्यातील...आपल्यातील

मागील पोस्टवरील संहिता/अदिती ह्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर उत्तर लिहावयास सुरवात केली तर त्यातून बरेच विचार डोकावू लागले. आणि मग ती निव्वळ प्रतिक्रिया न रहाता एक नवी पोस्ट आकार घेऊ लागली.

त्यांनी मांडलेल्या एकेक मुद्द्यांवर मला सुचलेले विचार...

मुद्दा १) महानगरपालिका आणि सरकारची, शाळांची जबाबदारी.
लहान मुलं व त्यांना वळण लावणे ही जबाबदारी फक्त शाळांची होऊ शकत नाही. ती पालक म्हणून आपली अधिक असते. ह्याचेच एक दुसरे उदाहरण म्हणजे लाल सिग्नल असून देखील तो तोडून आपले वाहन पुढे दामटवणारे पालक गाडीत आपल्या बाजूला बसलेल्या आपल्या मुलांना चुकीचे धडे देत असतात. त्यामुळे तो मुलगा / मुलगी मोठी झाल्यावर जर दुर्दैवाने काही विचित्र घडले तर त्याचे मूळ कारण हे 'पालकांकडून चुकीची शिकवण दिली जाणे' हे बऱ्याचदा दिसून येते.
जागोजागी कचऱ्याच्या कुंड्या : जागोजागी कचरा कुंड्या असणे हे आवश्यक हे बरोबर. परंतु, शिवाजी पार्कच्या परिसरात अतिशय सुंदररीत्या ठेवल्या गेलेल्या कचराकुंड्या रातोरात गायब झालेल्या मी बघितल्या आहेत. त्यामुळे हातातला कचरा केवळ नजरक्षेत्रात कचराकुंडी नाही म्हणून आहोत तिथे टाकून देणे ही एक चुकीची मानसिकता आहे.

मुद्दा २) इतक्या गर्दीत कचरा होणे हे शक्य.
विसर्जनाची गोष्ट घेतली तर चौपाटीवर कचरा टाकण्यासाठी कुंड्या होत्या/आहेत. परंतु, पुन्हा वर मांडलेला विचार येथे लागू पडतो. आहोत त्याच जागी कचरा टाकून पुढे निघून जाणे ही चुकीची सवय/मानसिकता आपल्याला लागलेली आहे. प्रत्येकाने असेच केल्याने शेवटी आपल्या परिसराचा उकिरडा झालेला दिसून येतो. मोठमोठ्या डिग्र्या घेतल्या म्हणजे माणसे शिकली हा एक गैरसमज आहे. जो माझा हल्लीच दूर झाला आहे. शिकली सवरलेली माणसे समाजाला बाधक अशी कामे करताना रस्तोरस्ती दिसून येतात. संहिता/अदिती यांनी मांडलेल्या विचारांत  बरेचदा निसर्गामुळे होणाऱ्या कचऱ्याचा उल्लेख दिसतो आहे. (वाऱ्याने कागद उडणार...वगैरे. ) हल्ली सगळ्यांच्याच हातातून वारा फारच सामान उडवू लागला आहे. त्यावर ताबा मिळवायला हवा. आता ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. हा मुंबईतील वारा आहे त्यामुळे त्यांना तो आवरता यायलाच हवा. बरोबर आहे का त्यांचं म्हणणं ?

३) लोकांनी केलेल्या कचर्‍यासाठी आपण स्वतःलाच का बडवून घ्यायचं?
लोकांनी कचऱ्यासाठी स्वत:ला बडवून घेणे गरजेचे आहे कारण ही 'लोकं' म्हणजेच समाज. आणि कचरा हा त्यांच्यामुळे होताना दिसतो. (आता सध्या आपण 'वारा' बाजूला ठेवू.) हल्ली 'पैसे' हीच भाषा आपल्याला कळते. त्यामुळे 'दंड' हा आर्थिकरूपी असला तर बरे होईल. हा तुमचा मुद्दा बरोबर.
पुन्हा...मंडळे म्हणजे अनेक नागरिक. सगळीच कामे पैश्यातून व्हावीत व आपली मूळ सवय बदलली जाऊ नये हे चुकीचे. माझे शहर हे 'माझे' आहे. त्यामुळे ते स्वच्छ ठेवणे ही माझी जबाबदारी आहे ही भावना प्रत्येकाची व्हायला हवी. आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तर आपल्या माणसांमध्ये ही भावना रुजवायलाच हवी. मनात आले...आणला गणपती...केली सजावट...आणि टाकला समुद्रात हे सर्वच फार घातक आहे.

संहिता/अदिती ह्यांच्या मुद्द्यांवर विचार करीत असता कचरा आणि गर्दी यांचे व्यवस्थापन व नियोजन याविषयी काही कल्पना डोक्यात आल्या.
१) 'विशेष सोयी'साठी शुल्क भरून आपण ती सोय मिळवतो. उदा. रेल्वे स्थानकावर/विमानतळावर जाण्यासाठी तिकीट घेऊन आत जातो. तसेच विसर्जनस्थळी तिकीट घेऊन आत प्रवेश असावा. प्रवेश फक्त विसर्जनासाठी असावा व तो देखील शुल्क भरून. प्रत्येक मंडळाला ठराविक प्रमाणात माणसे, संबंधित शुल्क भरूनच आत नेण्यास परवानगी दिली जावी.
२) मूर्तीच्या उंचीच्या प्रमाणात विसर्जन शुल्क आकारण्यात यावे. १ ते २ फूट उंचीपर्यंत नि:शुल्क अनुमती असावी.
३) प्रत्येक गणपतीबरोबर केवळ तिकीटधारकांनाच प्रवेश द्यावा व इच्छुक प्रेक्षकांसाठी बाहेर मोठ्या पडद्यांवर विनातिकीट विसर्जन दाखवण्यात यावे.
४) ह्यापुढे नवनवीन मंडळांना गणपती बसवण्यासाठीची परवानगी नाकारली जावी. इथे 'एक गाव एक गणपती' ही कल्पना उपयुक्त ठरू शकेल. कदाचित मुंबईत 'एक वॉर्ड एक गणपती' असे का करू नये ? ह्यातून अनेक मोठ्या स्पर्धा, मनोरंजनाचे खेळ घेता येऊ शकतात.
५) प्रत्येक मंडळाने स्वत:च्या २० कार्यकर्त्यांची संख्यानोंदणी महानगरपालिकेत आधी करावी. व त्यांना वेगळे कपडे घालून विसर्जनस्थळी संध्याकाळी ५ पासून हजर ठेवणे आवश्यक केले जावे. कार्यकर्त्यांची संख्या मूर्तीच्या उंचीशी निगडीत असावी. तितके कार्यकर्ते हजर झाले तरच मंडळास विसर्जनास परवानगी दिली जावी. 

या व अशा प्रकारच्या उपायांनी वेड्या गर्दीला आळा घालून, स्वच्छता राखून, शिस्तीने गणपतीचे व गैरशिस्तीचे विसर्जन पार पडणे शक्य होईल असे मला वाटते.   

आता ह्या सर्व चर्चेतून माझ्या मनात येते...'माझ्या गावाची स्वच्छता ही जबाबदारी दुसऱ्या कोणाची नसून ती माझी आहे असे प्रत्येक नागरिकाला वाटायला हवे' हा 'चर्चेचा विषय' होऊ शकतो इथेच आपल्या समाजाच्या मानसिकतेची हार आहे. तो चर्चेचा कमी आणि प्रत्यक्ष कृतीचा अधिक असा व्हावयास हवा.
नाही का ?
( मला एका मित्राने विचारलं...तुला वेळ कुठून मिळतो जाऊन साफसफाई करायला ?" म्हटलं साधं गणित आहे..."तुम्ही दर्शनासाठी, विसर्जनासाठी वेळ काढता...आणि मी साफसफाईसाठी." )

Monday, 1 October 2012

अकलेचा उकिरडा

आपण ज्या घरात रहातो, त्याबद्दल आपल्याला प्रेम असतं. आपलेपणा असतो व त्यामुळे आपलं घर नीटनेटकं दिसावं ह्यासाठी आपण प्रयत्न करीत असतो. व घर स्वच्छ ठेवणे हे आर्थिक कुवतीवर अवलंबून नसते हे नक्की.

काल सकाळी गिरगाव चौपाटीला आम्ही सात वाजता पोचलो त्यावेळी चौपाटीच्या आवाक्याबाहेर गर्दी होती. मी, सुहास आणि अर्चना. 

समुद्र बराच आत आहे व मुंबईची ही चौपाटी बरीच मोठी आहे. जेव्हा कधी तिथून जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळी मला ही चौपाटी तरी निदान स्वच्छ दिसली आहे. पिवळसर वाळू, काळपट निळा समुद्र. पाण्यावर तरंगती एखादी बोट. किनाऱ्यावर एखादे सुकत घातलेले जाळे. जाळ्याच्या चौकटीतून दिसणारे आकाशाचे तुकडे. अनेक कावळे, एखादी घार. स्पेन, इस्तान्बुल मधील समुद्र निळा. आमचा काळपट करडा. 
आपली शिकवण सांगते, आपल्या आईची शेजारच्याच्या आईशी तुलना करू नये. मात्र आपली सुंदर आई, आपल्याच हाताने विद्रूप करावी आणि मग तरीही शेजारच्याने प्रेमाने राखलेल्या आईशी आपल्या आईची तुलनाच होऊ नये, ही काही अतिरेकी मागणी वाटते.

मुंबईवर कोणाचेही प्रेम नाही. निदान आपल्या नेत्यांना तर तिची काडीची पडलेली नाही. त्यात बिहारी येतात की मद्रासी, त्यांना काहीही फरक पडत नाही. फक्त स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी केलेली ही नाटके आहेत. ह्या वक्तव्याचा पुरावा...कालची गिरगाव चौपाटी.

काल समुद्र कोणी घाण करून ठेवला होता ? तिथे नक्की भय्ये होते...त्यांच्या बायका होत्या...कित्येक गुजराती कुटुंबीय फिरत होते. मुबलक हिंदी कानावर पडत होते. तुकतुकीत गुजराती बायका, त्यांचे नवरे, तीन चार गोरी मुले इथेतिथे. तमे गमे....कानावर पडत होते.
मात्र...नक्कीच तिथे लाखो लोक मराठीच होते. 
आणि तिथे पडलेला कचरा म्हणजे मराठी माणसाच्या मुंबईवरच्या कथित प्रेमाची लक्तरे होता.

तीन शाळकरी मुले. हातात कसले कसले आकाराचे प्लास्टिकचे पेपर. त्यांचा व त्या कागदाचा संबंध संपलेला तत्क्षणी त्यांनी ते कागद जिथे उभे होते तिथेच टाकून दिले आणि आपल्या रस्त्याला लागले. मी एक फुट अंतरावर एक मोठे पोतं घेऊन उभी होते. पोतं नक्कीच इतकं भरलं  होतं, की ते स्वत:च्या पायांवर उभं राहू शकत होतं. मी त्या मुलांकडे त्वरेने पोचले.
"ए मुला, हे बघ कचऱ्याचं पोतं. ह्यात टाक ना कचरा." मी.
"ए जा...टाक त्यात !" काम सरकवणे.
तिघांमधील दोघे तिथून निघून गेले.
ज्याच्यावर सोपवले गेले होते तो खाली वाकला आणि सगळे कागद हातात घेतले. माझ्या हातातील पोत्यात कागद विसावले.
"आता कसा....वाटतोस...शाळेत जात असावास असा !" मी.
तो चुणचुणीत दिसणारा काळसर मुलगा शरमेने हलकेच हसला. खाली मान घालून आपल्या मित्रांच्या रस्त्याला लागला.
पुढाऱ्यांच्या तावडीत सापडलेली कोवळी मने.

काळा रंग, शेंबडं नाक. एक फुट उंची. अंगावर विचित्र चमकणारा पिवळा फ्रॉक. तिने खाली वाकून एक चिमुकली चांदी उचलली. नाकासमोर धरली. मुंबईतील फुटपाथांवर घराचा डोलारा उभारलेली बरीच माणसे समुद्रावरच पसरलेली दिसत होती.
मी तिच्याकडे गेले.
"इधर आ." चिमुरडी माझ्यापाठी आली.
"डाल अब इसमें !" मी पोतं तिच्यापुढे पसरलं. तिने हात उंचावून चांदी आत टाकली.
"कचरा ऐसे इसमे डालने का. रास्ते पे फेकने का नही !" मी हसले.
तिचा चेहेरा फुलला. काळा रंग उन्हात तळपला.

दोन मध्यमवयीन बायका. मध्यम उंची. माझ्या बाजूने जाताजाता खाली वाकल्या, एका क्षणात खाली पडलेला जितका कचरा उचलता येईल तितका उचलला आणि आमच्या पोत्यात सोडला. चेहेऱ्यावर हलकाच आनंद घेऊन गेल्या.

एक गोरा अचानक समोर आला. गप्पा मारू लागला. हातात भला थोरला कॅमेरा. आणि त्या कॅमेऱ्याच्या लेन्समधून तो माझ्याकडे बघत होता. त्याच्या मागे एक भारतीय...मुंबईकर वाटणारा माणूस. मी हे का करतेय...मला हे खटकतं का...वगैरे वगैरे. घरात परका पाहुणा यावा...आणि माझं घर अस्ताव्यस्त असावं...मान शरमेने झुकावी असं वाटलं. "माझ्या देशावर माझं प्रेम आहे...माझ्याकडे...माझ्या ह्या शहराकडे तुला दाखवायला खूप काही चांगलं आहे...मात्र त्याचबरोबर वाईट देखील आहे. मला त्याची जाणीव आहे....सुधारतोय आम्ही...मी फक्त माझा खारीचा वाटा उचलते....इतकंच."

जेव्हा चुकीची जाणीव होते त्याचवेळी माणूस सुधरू शकतो....तीच जर मेली असली तर सुधारणार तरी काय ?
वाटतं गणपती विसर्जनाच्या दिवशी आपण ही जी नैसर्गिक संपत्तीची हानी करतो, त्याची दखल खरं तर जागतिक पातळीवर घेतली जावी. कारण अरबी समुद्र माझ्या देशाच्या नशिबाने आम्हांला मिळाला आहे. परंतु, ती संपत्ती पूर्ण मानवजातीची आहे. हा समुद्र म्हणजे माझ्या घरचा कचऱ्याचा डबा नाही.

"अहो, पुढल्या वर्षी मी तुमच्याकडून तुमची झाडू घेणार आहे. त्याने कचरा काढणे हे अधिक संयुक्तिक आहे. कारण त्यात कमी वेळात अधिक काम होते !" मी महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगाराला म्हटले.
"ते तुम्हांला जमणार नाही ताई." तो म्हणाला.
"का नाही ? घरी मी काढते की कचरा !" मी
"ते वेगळं ! आणि हे वेगळं !" तो म्हणाला.
"ते बरोबर ! पण मी शिकेन ना तुमच्याकडून ! आणि मी बघितलं तुम्हीं कसा कचरा काढता ते ! असा हलकेच झाडू फिरवायचा वाळूत. फार जोर लावायचा नाही. कारण जोर लावला तर खालची वाळू पण गोळा होते. आणि आपल्याला फक्त वरचा कचरा हलवायचाय ! बरोबर ?" मी.
"हो ! बरोबर !"
"मग ठरलं तर ! पुढल्या वर्षी मी माझा एक झाडूच घेऊन येणार !"
तो हसला.

आम्ही तीन पोती कचरा गोळा केला. तो नेऊन महानगरपालिकेच्या कचराडब्यात ओतला. अंदाजे १५ फुट बाय १५ फुट इतक्या आकाराचे ३ चौरस साफ केले.

लालबागचा राजा...आणि त्याच्या विसर्जनासाठी आपली रात्र घालवणारा माझा एक मित्र.
"कस्सली गर्दी लोटली होती रे ! शनिवार रात्र होती ना...त्यामुळे जास्तच गर्दी झाली होती." तो आज ऑफिसमध्ये सांगत होता.
"तू होतास काय तिथे ?" मी.
"होतो म्हणजे ? अरे, अख्खी रात्र होतो तिथे !" लालबागच्या राजाच्या विसर्जनाला न जाणे ह्यात काहीतरी अवमानकारक असावं.
"हो काय ? आम्ही काल सकाळी गेलो होतो तिथे ! सकाळी होतास तू ?" मी.
"सकाळी ? सात वाजता विसर्जन झालं...मग गेलो आम्ही तिथून !" तो
"अच्छा. आम्ही सकाळी सात वाजता पोचलो. समुद्र साफ करायला. तू नव्हतास त्यात." मी.
"मी कशाला असणार त्याच्यात ? मी केला नव्हता कचरा !"
"हो. पण जी अलोट गर्दी लोटली होती, त्याचा तू एक भाग होतास...आणि अवाढव्य मूर्तीचा एक समर्थक असल्याकारणानेच इतकी अख्खी रात्र तिथे घालवलीस ना ?"
"माझा त्या कचऱ्याशी काहीही संबंध नाही. तो मी केला नाही ! मी कशाला उचलू मग ?!" तो.

विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्राच्या होणाऱ्या हानीशी गणपती विसर्जनाचा काडीचाही संबंध नाही...त्यामुळे अवाढव्य मूर्ती, थर्माकोल, चड्डया, पारले ग्लुकोजची व गुटख्याची वेष्टणे, पाण्याच्या बाटल्या, चहाचे प्लास्टिकचे कप, पादत्राणे, सॉक्स...ह्या सर्वांची जबाबदारी कुठल्याही गणेश मंडळाची नाही ! ती जबाबदारी गणपतीने स्वत: उचलावी ! कारण हे सर्व त्याच्यासाठी होते. जबाबदारी टाळून स्वत:चे अवयव अस्ताव्यस्त किनाऱ्यावर टाकून इतर कचऱ्यात भर टाकणे हे मुळात त्याला शोभतच नाही !

दुसऱ्या दिवशी जाऊन कचरा गोळा करणे हे काही दूरदृष्टीचे लक्षण नव्हे ! तर मुळात ही समस्या का उभी रहाते ह्याचा विचार करण्याची गरज आहे. परंतु, गरज आहे...पण आमच्या एकाही पुढाऱ्याची तशी इच्छा नाही ! त्यामुळे कार्यकर्ते आपल्या कामांच्या यादीत हे धरतच नाहीत. त्यांच्या मते आम्ही XXX ठेवणार आणि ते साफ करणे ही फक्त महानगरपालिकेची जबाबदारी आहे...आणि त्यासाठीचा पगार त्यांना मिळतो तेव्हा त्यांनी ते काम केलेच पाहिजे ! कचरा गोळा करताना बरीच तरुण मंडळी दिसत होती. कचरा करणारे आणि कचरा गोळा करणारे असे दोन स्तर तिथे वावरत होते. 
वेगवेगळ्या पक्षांच्या पुढाऱ्यांच्या नावाचे कपडे घालून फिरणारे कार्यकर्ते...कचरा करणाऱ्या गटात मोडत होते !

गिरगाव चौपाटी हे मुंबईचं एक तृतीयांश रूप आहे. त्यापुढे जाऊन ही चौपाटी हे माझ्या देशाचे एक शतांश रूप आहे.
हा देश माझा आहे.
हे गाव माझं आहे.
हे शहर माझं आहे.
ही चौपाटी माझी आहे.
हा रस्ता माझा आहे.
ही आगगाडी माझी आहे.
हा बसथांबा माझा आहे.
वगैरे वगैरे.
ही कुठल्याही एका पक्षाची खाजगी मालमत्ता नाही.
हा रस्ता, ही चौपाटी, हे शहर हा माझ्यासाठी उपलब्ध करून दिलेला एक अजस्त्र कचऱ्याचा डबा नव्हे.
तिथे मी कचरा टाकणे आणि दुसरा कचरा टाकून जात आहे ह्याकडे मी दुर्लक्ष करणे हे दोन्ही गुन्हेच आहेत.
आसपासचा परिसर हा साफ आणि स्वच्छ असावा हे सामान्य ज्ञान आहे.
हे मला शिकवायला एखादा पुढारी मला लागत नाही.
माझे घर कसे साफ ठेवावे हे मला एखाद्या पुढाऱ्याकडून शिकण्याची गरज नाही !
माझा नेता मीच आहे.
माझा पुढारी मीच आहे.
कारण मला डोके आहे.
स्वत:चे भले कशात आहे इतपत कळण्याची सारासार विचारबुद्धी माझ्यात आहे.
मी माझी अक्कल कोणत्याही पक्षाला विकलेली नाही.
आणि ती केळी खायला तरी नक्कीच गेलेली नाही.
तुमची ?
गणपती 'मागील सजावटीच्या पाया पडणाऱ्या' अनेक भक्तांमधील एक बाई.

Friday, 21 September 2012

निषेध

दरवर्षी ह्या सुमारास गणपती येतात. मुंबई नाचते, गाते, जुगार खेळते, दारू पिते. आणि त्यानंतर गणपतीचे दिवस भरले की त्याला समुद्रात सोडले जाते.
पहिल्या दिवशी मूर्तीत प्राणस्थापना केली जाते. ज्या मूर्तीमुळे पर्यावरणाची हानी होत असेल त्यात आधी गणपती येऊन बसेलच कशाला ? आता ह्यात पर्यावरण हानी कशा प्रकारे होते ह्यावर मी काहीही नवे सांगू इच्छित नाही. कारण लोकं अज्ञानी नाहीत. सर्वांना PoP च्या मूर्तीमुळे व त्यावरील कृत्रिम रंगांमुळे होणारी हानी ह्याची पूर्ण जाण आहे. आणि तरीही त्यांना असे वाटते की ह्या हानिकारक मूर्तीमध्ये येऊन देव बसतो. आणि मग ते त्याच्यासमोर बसून जुगार खेळण्यास व दारू पिण्यास मोकळे होतात.
मी माझ्या घरी गणपती आणते का ? अजिबात नाही. श्रद्धा तेथे देव ह्यावर माझा विश्वास आहे. माणुसकीवर माझी श्रद्धा आहे. त्यामुळे माणुसकीमध्ये देव आहे असे माझे मत आहे. उगाच त्याच्याच मूर्ती घेऊन त्यानेच तयार केलेल्या विश्वाची विल्हेवाट लावायला मी जात नाही.
मग आता ?
आता काही नाही.
ह्या गणपतीच्या प्रदुषणाच्या हानीविरुद्ध मी काय करू शकते ? असा प्रश्न मी स्वत:लाच परवा विचारला. मी सामान्य माणूस आहे. मात्र बदल घडवायचा तर तो सामान्य माणूसच घडवू शकतो ह्यावर माझा विश्वास आहे.
आणि शब्दापेक्षा कृती महत्त्वाची हे तर खरेच.
मग एकच निर्णय केला. ज्याची अंमलबजावणी करण्यासाठी मला दुसऱ्या कोणावरही अवलंबून रहाण्याची गरज नाही.

ज्यांच्याकडे 'पर्यावरणाला हानी' पोचवणारे गणपती वा त्याची सजावट असेल त्यांच्याकडे ह्यापुढे मी गणपतीच्या दर्शनासाठी जाणार नाही.

"तुझ्या मित्रमैत्रिणींच्या भावना दुखावतील." माझी एक मैत्रीण मला म्हणाली.
"हो दुखावतील ना. पण निसर्ग आणि मित्रमैत्रिणींच्या भावना ह्यात मला निसर्गाला अधिक महत्त्व द्यावयास हवे. कारण आता अति झाले आहे. कोणालाच मनावर घ्यावयाचे नसेल तर माझ्याकडे आता दुसरा कुठला उपाय आहे ?"

"तुझ्याकडे कसला गणपती आणलाय ?" मी माझ्या एका मित्राला विचारले.
"PoP."
"मी नाही येऊ शकत मग तुझ्याकडे. पुढल्यावर्षी जर तू निसर्गाशी जवळीक साधणारा गणपती आणलास तर मात्र नक्की येईन." सांगून टाकलं.

"तुमच्याकडे कसला गणपती आणलाय ?" दुसऱ्या एका मित्राशी झालेला संवाद.
"PoP."
"का ? तुला तर माहितेय किती हानी होते ते."
"अगं मी ठरवलेलं...पण वेळच नाही मिळाला !"
"वेळ नाही मिळाला म्हणजे ? मग नव्हता आणायचा ह्या वर्षी गणपती. तुला वेळ नाही ह्याची शिक्षा निसर्गाला का ? तू घे ना त्याची शिक्षा. आणू नकोस एक वर्ष गणपती !"

मला असं वाटतं की ज्या कोणाला पर्यावरणाची चाड असेल त्याने/तिने हा असा स्वयंघोषित निषेध व्यक्त करण्यास हरकत नाही.

आजपर्यंत मोजून दोन घरी गेले. मामेबहीण आणि एक मैत्रीण.
फायबर ग्लास.
गौरीने स्वत: खपून केलेला छोटासा शाडूचा गणेश.
हे तीनही सुंदर, मनमोहक स्वत:वर खुष झालेले आनंदी बाप्पा.

संतोष जाहला...


Saturday, 15 September 2012

निर्वासित

एखाद्या साध्या दिवाणखान्यात जरी ते चित्र दिसलं असतं तरी ते मनात इतकं घर करून नसतं राहिलं. परंतु, त्या सुरेख चित्राची पार्श्वभूमी विसरता न येण्यासारखीच होती.

हनुमान गल्ली. एकदोन वर्षांपूर्वी दोन्ही बाजूच्या पदपथावरील झोपड्या महानगरपालिकेने उठवल्या होत्या. तो इतिहास झाला. सद्य परिस्थितीत निळे छप्पर डोक्यावर ओढून घेऊन संसार मांडले गेले आहेत. सकाळी कचेरीत जातेवेळी मी त्या गल्लीत शिरते त्यावेळी काही माणसे रस्त्याच्या कडेला लावून ठेवलेल्या गाड्या धूत असतात. जाताजाता एका क्षणाची नजर कुठल्या झोपडीत गेलीच तर एखादी बाई, काळे केस मोकळे सोडून फणी फिरवत बसलेली आढळते. बाहेर रस्त्यावर एखादा पुरुष बालदीतील पाणी डोक्यावर ओतून घेत असतो. लहान पोरं इथेतिथे उड्या मारीत असतात. हे झालं नेहेमीचं चित्र. मग त्या दिवशीच्या चित्रात वेगळेपण काय होते ?
खरं तर मला तिथून दिसेनासे होण्यास काही क्षण पुरतात. तरी त्या दोघांनी माझं लक्ष वेधून घेतलंच. सातेक वर्षांची फिकट गुलाबी रंगाचा झगा घातलेली एक मुलगी. तिच्या डाव्या हाताला पाचसहा वर्षांचा मुलगा. दोघेही रस्त्याच्या कडेला फतकल मारून बसलेले होते. त्या ताईने जमिनीवर एक पुस्तक पसरले होते. आणि ती हातवारे करून तिच्या त्या छोट्या भावाला त्या पुस्तकातील काही वाचून दाखवीत होती. दोघेही अगदी दंग झाले होते. भाऊ आणि बहिणीचा नातं कोणी सांगावे नाही लागत. ते उमललेलं दिसून येतं. त्या निळ्या प्लास्टिकमधून लटकलेलं दारिद्र्य, खाचखळग्यांनी फुटलेला ओला रस्ता...आणि आपले दोन्ही हात पसरवून रस्त्यावर पसरलेले, आभाळ अंगावर घेणारे ते ज्ञान. 
काही चित्रं भान हरपवून टाकणारी असतात.

अंदाज असा आहे मुंबईतील इतर अनेक झोपडपट्टींप्रमाणे ही झोपडपट्टी देखील निर्वासित बांगलादेशी लोकांनी वसवलेली आहे. त्यांचा काळा रंग, चेहेऱ्याची ठेवण. हा अर्थात माझा अंदाज आहे. आणि आता आजूबाजूच्या अनेक गावागावांतून, देशांतून मुंबईत शिरकाव करणाऱ्या लोकांबद्दल प्रेमभाव मनात आणण्याची ताकद माझ्यात शिल्लक राहिलेली नाही. वाढती गुन्हेगारी, जाळपोळ...हे सर्व माझ्यासारख्या सामान्य माणसांना भयावह आहे. हतबल करणारे आहे. त्यामुळे एखादी तरुण मुलगी एक पोर कुशीत घेऊन गाडीपाशी भीक मारायला उभी राहिली....बंद काचेवर ठोठावू लागली...की आता मला दयेचे पाझर नाही फुटत. तर अकस्मात तिरस्कार उफाळून येतो. दुसऱ्याच क्षणाला माझ्या ह्या भावनेचा त्याग करावासा वाटतो. आणि हे जे दंद्व माझ्या मनात काही क्षण सुरू रहाते त्याची पूर्ण जबाबदारी मला आमच्या निलाजऱ्या पुढाऱ्यांना द्यावीशी वाटते. शहरभर लटकलेले त्यांच्या थोबडांचे फलक दिसतात आणि तोंडात शिव्या येतात...किडे पडतील !

तसलीमा नसरीन ह्यांचे 'फेरा' मध्ये वाचले. बांगला देशाची फाळणी. पाकिस्तान फाळणी वेळच्या भयंकर कथा 'सादत हसन मन्टो' ह्या उर्दू लेखकाच्या पुस्तकांतून वाचनात आल्या होत्या. कधीतरी वाटतं आपण स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेण्यास जन्मास यावयास हवे होते. त्यानंतर मंटोच्या कथा वाचून धस्स होतं. वाटतं कदाचित आपण जन्म घेतला तोच काळ ठीक होता.

'जेव्हा देशातील विशिष्ट विचारसरणीची काही माणसे इतरांवर दबाव आणून आपल्या सुंदर मायभूमीला अक्षरश: उद्ध्वस्त करतात, 'माणुसकी'सारख्या परमोच्च मूल्यालाच मूठमाती देतात, तेव्हा घडणारे बदल हे त्या देशाला प्रगती ऐवजी अधोगतीकडे नेणारे असतात.' तीच कथा आहे 'फेरा'ची.
त्यातील प्रस्तावनेत लेखिका मृणालिनी गडकरी म्हणतात...'तसे पाहिले तर आपल्या मायभूमीबद्दल प्रेम असणे, आपल्या मायभूमीच्या मातीची ओढ असणे स्वाभाविक आहे. अशी ओढ, असे प्रेम माणसात उपजत असतेच. म्हणूनच तर माणसाने जन्मभूमीला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ मानले आहे. मातृभूमीचे पोवाडे माणूस पिढ्या-न-पिढ्या गात आला आहे. काही वेळा माणसाला मायभूमीपासून दूर जाण्याचा कटू निर्णय घ्यावा लागतो; पण मायभूमीपासून दूर गेल्यावर, त्याच्या मनात खोलवर रुजलेल्या ह्या मातीच्या ओढीची त्याला विशेषत्वाने जाणीव होते. मायभूमीपासून दुरावणे माणसाला फार यातना देणारे ठरते.' कादंबरीची नायिका कल्याणी म्हणते, "वृक्ष एका जागेवरून उचलून दुसऱ्या जागेवर लावला, तर कदाचित तो जगेल, पण रुजणार नाही."
कथा मोजून नव्वद पानांची आहे. मात्र त्यातील नायिका आपल्याला बांगलादेशातील खळाळत्या ब्रम्हपुत्राच्या काठाशी तिच्याबरोबर बसवते, माडाच्या झावळ्यांमधून झिरपणारे तिच्या लाडक्या देशातील ऊन अंगावर घेऊ देते, जास्वंदीची लाल टपोरी फुलं....गेटवर फुललेली मधुमालती, हवाई मिठाई घेऊन दारावर येणारा फेरीवाला...सारवलेली अंगणं...पत्र्याची घरं....तळं...तळ्याकाठचा रानटी गुलाब...हिंदू कल्याणी आणि तिची सख्खी जिवाभावाची मुसलमान मैत्रीण शरीफा. 
भारताची फाळणी...नाला झालेली कल्याणीची क्षीण ब्रम्हपुत्रा.
त्यातील एक संवाद पार हबकवून टाकतो...
"त्या मुलांबरोबर काय खेळलास रे तू ?" कल्याणीने तिच्या छोट्या लेकराला, दीपनला, विचारले.
दीपन चिरक्या आवाजात म्हणाला," मी नाहीच खेळलो त्यांच्याबरोबर ते 'मुंग्या मुंग्यां'चा खेळ खेळत होते.'
'मुंग्या-मुंग्या' ? हा कसला खेळ ? मी तर कधीच नाव ऐकलं नाही ते !'
'अगं, भिंतीवर मुंग्यांची ओळ लागलेली असते ना, त्यातल्या निवडून निवडून लाल मुंग्या ती मारत होती आणि काळ्यांना सोडून देत होती. मी त्यांना 'असं का करता' म्हणून विचारलं, तर ते सगळे म्हणाले की काळ्या मुंग्या मुसलमान आहेत, म्हणून त्यांना सोडून द्यायचं आणि लाल मुंग्या म्हणजे हिंदू. त्यांना मारायचं.'
फाळणीत कल्याणीचा बळी पडू नये म्हणून कल्याणीच्या आईवडिलांनी तिला कलकत्याला पाठवून दिले आहे. मामाकडे. मात्र बांगला देशातील ब्रम्हपुत्रा नदीकाठी वसलेल्या हिरव्यागार गावात लहानाची मोठी झालेली कल्याणी कधीही कलकत्यात रमू शकलेली नाही. ते तिला धुळीने कळकटलेले, गर्दीने घुसमटलेले शहरच वाटत राहिले.

'फेरा' वाचले.
हजारो निर्वासित, ठाईठाई, भारतीय म्हणून मुंबईत नांदताना दिसतात त्यावेळी ते हे स्वखुशीने करीत नाहीत हे मला पहिल्यांदाच जाणवले.
मात्र...
कल्याणी जेव्हा एकवार भेट देण्यासाठी म्हणून बांगला देशी परत येते त्यावेळी तिला जसे तिचे लाडके गाव बकाल दिसते...तशी मला माझ्याच देशात....माझ्याच शहरात राहून...माझीच मुंबई दिवसागणिक क्षीण होत असलेली दिसते. कर्करोगाने ग्रासलेली...तीळतीळ संपत चाललेली...जिवंत असल्याचं न झेपणारं सोंग वठवणारी निर्वासितांची मुंबई. 
हे माझे दुर्दैव.

कधीतरी किडे पडलेले एक मृत शरीर नजरेस पडले होते.
जेव्हा ते शरीर पलटवले गेले त्यावेळी लाखो हजारो किडे विस्कटलेल्या पाठीतून भस्सकन बाहेर पडले होते...
चोहो दिशांना अस्ताव्यस्त फुटले होते.

तशीच ही मुंबई.

लहान बहिणभावांचं पुस्तकांत बुडून गेलेलं रस्त्यावरचं चित्र बघितलं...
पुस्तकात दोघेही बुडून गेले होते.
तिला वाचता येत होतं...आणि भावाला गोष्ट वाचून दाखवत होती. यांची शिक्षणाची आस, बंद काचांतून माझ्यापर्यंत झिरपली. ना तिचा चेहरा स्पष्ट दिसला...ना त्याचा. पण त्याने काय अडले ?
मीही अशीच माझ्या धाकट्या बहिणींना विंदा करंदीकरांच्या कविता वाचून दाखवत असे. हेंगाड वेंगाड...फेंगाड भेंगाड...आली आली भुताबाई....चार माणसे रोज खाई....असं काहीसं. दिवाणखान्यातील थंड लादीवर बसून वेडेवाकडे चेहेरे करत मी एक भारी नाटयप्रवेश करीत असे. आणि माझ्या दोघी बहिणी आठवड्यातून किमान एकदा तरी हा प्रयोग करण्यास मला भाग पाडीत असत.

निर्वासित...हा शिक्का.
माणूस...ही जात.
माझा केविलवाणा निर्वासित देश.
आणि दिवसागणिक माझ्या शरीरातून झिरपत, खाली मातीत मिसळून नाहीशी होत चाललेली माझी माणुसकी.

Wednesday, 12 September 2012

बेकरी

"चार रुपयांना तीन पाव."

पूर्वी रस्त्यावर असलेली बेकरी आता सिमेंटच्या उंच इमारतीच्या तळमजल्यावर वसू लागली आहे.
त्या काळी मागेच त्यांची भट्टी असे. व दिवसाच्या ठराविक वेळी तिथे गेलं तर गरमागरम पाव मिळत. ते असे नुसतेच खाण्याची मौज काही औरच. रोज संध्याकाळी आई मला ऑफिसमधून येताना आजीकडून घेऊन निघे. आणि आमच्या घरी पोचण्याच्या रस्त्यावर उजव्या हाताला ही बेकरी होती. आई पाव घेई आणि त्यातला एक मी रस्त्यातच खायला सुरवात करत असे. किरणांचा पिसारा आवरत सूर्य आपला परतीच्या मार्गी लागलेला असे. रस्त्यावरील दिव्यांचा उजेड पुस्तकावर अंधुकसा पडे. पण कॉमिक्स नेहेमीच अशी वेड्यावाकड्या परिस्थितीत वाचली की त्यात अधिक गंमत येते. म्हणजे अगदी आरामात ऐसपैस कोचावर बसून ते वाचणे आणि अर्धवट प्रकाशात, रस्त्यावरून चालता चालता ते वाचणे. अकस्मात वेताळाने त्याची कवटी शत्रूच्या हनुवटीवर उमटवावी आणि बरोबर त्याच वेळी आईने माझ्या पाठीत एक धपाटा घालावा ! डाव्या हातात वेताळ आणि उजव्या हातात गरमागरम पाव. आईला हे फारसे काही कौतुकाचे वाटत नसे. कारण माझे डोळे पुस्तकात आणि दोन्ही हात कामात गुंतलेले. त्यामुळे एकतर तिला हातात धरायला माझा हात मिळत नसे. आणि मी स्वत:च्या डोळ्यांनी रस्ता बघत नसे ! त्यामुळे बखोटीला धरून फरफरटत मला घरी घेऊन जाण्यापलीकडे तिच्याकडे दुसरा मार्ग नसे.

त्यावेळी हा पाव नक्की कितीला मिळत असे ? कोण जाणे. 

परवा मी तिथेच तीन पाव विकत घेतले तेव्हा त्याचे चार रुपये झाले. माझ्या उजव्या हाताला एक लहान अंगच
टीच्या बाई देखील पाव घेत होत्या. लालसर पातळ अंगावर गुंडाळलेलं होतं. आर्थिक परिस्थिती तशी बेताची वाटत होती. त्यांनी चार रुपये दिले. बेकरीवाल्याने जुन्या वर्तमानपत्रात तीन पाव गुंडाळले आणि त्यांच्या हातात दिले. तिथेच उभे राहून बाईंनी कागद उघडला व पाव हातात घेतले. पाव वरखाली केला आणि त्या बेकरीवाल्याला म्हणाल्या,"पाव किती लहान झालाय."
मी माझ्या हातातल्या पावाकडे बघितले. खरंच पाव जणू आक्रसला होता. लहानपणी इथून घेतलेला पाव मला दहा मिनिटांवर असलेल्या घरापर्यंत पोचेस्तोवर पुरत असे. पण हा पाव तर बेकरीतून निघून खाली पायऱ्या उतरेस्तोवर संपून देखील गेला असता. मी बाईंकडे बघितलं. त्या अजूनही पाव हाताळत होत्या. कोण जाणे त्यांच्या मनात काय वादळ उठलं होतं. तीन पाव....तीन लेकरं....कसे पुरणार...अजून एखादा घ्यावा का...मग पैसे ? चेहेऱ्यावर गोंधळ होता.
"माझे चार आणे तुझ्याचकडे राहिले की रे !" वर बघत
त्या बेकरीवाल्याला म्हणाल्या. चार आणे शेवटचे बघून काही वर्षे उलटली. त्यामुळे पुढल्या खरेदीत ते धरले जातील असा हिशेब असावा.
माझ्या पोटात खड्डा पडला. त्यांचे माझ्याकडे लक्ष गेले.
मी त्यांच्याकडे बघून हळूच हसले. त्यांनी पुन्हा कागदात पाव गुंडाळून घेतले आणि हसल्या. त्यांच्या मऊसूत चेहेऱ्यावर ते हास्य हलकेच पसरत गेलं. काही ओठ नुसतेच हसतात. असे हसतात की ते हसलेत ह्याचा त्यांच्याच डोळ्यांना सुगावा देखील लागत नाही. बाईंचं हसू तसं नव्हतं. त्या इतक्या सुरेख हसल्या की त्यांचे डोळे देखील हसले.
"फारच झालेय ना महागाई ?" मी हळूच म्हटले.
"नाहीतर काय !" बाईंनी उजवीकडे मान उडवली व हसल्या.
मी पायऱ्या उतरून खाली आले. हातातील चार पाव गाडीतील सीटवर जाऊन बसले. आताही बेकरीपासून घर दहा मिनिटांवर आहे. पण पाव गाडीत बसले होते. आणि माझ्या हातात कॉमिक नव्हतं !

बारा इंची ताट...त्यात तीन इंची पाव...चार रुपये...आणि बाईंची ती सुहास्य मुद्रा.
कशाचाच
ताळमेळ नव्हता.
मात्र त्या महागाईच्या ज्वा
ळांतून तावूनसुलाखून आलेले ते एक हास्य लाखमोलाचे होते.

Wednesday, 5 September 2012

हट्ट


मज...
सोनेरी चाफ्यास रातराणीसम गंध हवा...
त्या क्षितिजावरल्या इंद्रधनूसी कोकिळेचा गळा हवा

मज...
वेड्याखुळ्या पाऊसथेंबांत मोरपिशी छटा हव्या...
उसळत्या समुद्राला धीरगंभीर तळ हवा

मज...
गर्द निळ्या आकाशाला कधीतरी अंत हवा...
दुधाळ वाटोळा चंद्र नितळ हवा

मज...
आयुष्याच्या जोडीदारात उबदार सखा हवा !

Saturday, 1 September 2012

वाचन आणि चित्रपट

एखाद्या पुस्तकाचा आस्वाद घेत असता आपण आपल्या कल्पनांचे वारू, लेखकाच्या सामर्थ्यानुसार, उधळून लावू शकतो. आपले आपण विश्व बनवतो. त्यात रममाण होतो. तर चित्रपट बघत असताना, आपल्यासमोर कलादालन उघडलेले असते. आणि कॅमेरामन व दिग्दर्शक ह्यांच्या कुवतीनुसार आपण त्यामधून आनंद मिळवतो. त्यांना एखादी कथा सादर करीत असताना जी काही भावना अभिप्रेत असतील त्या भावनांशी आपण समरस होण्याचा प्रयत्न करू लागतो. काही कथा वाचताना, आपल्या नजरेसमोर, उलगडत जातात. कारण आपण कधी ना कधी त्या परिसरात गेलेले असतो. तर कधी तिथे जाण्याचा योग आजपर्यंतच्या आपल्या आयुष्यात आलेला नसतो. व पुढे येण्याची देखील फारशी संभावना दिसत नसते.

मध्यंतरी, एका मित्राबरोबर 'पुस्तक व चित्रपट ह्या दोन वेगवेगळ्या माध्यमांचा आपल्यावर होणारा परिणाम' ह्यावर चर्चा करीत असता तो म्हणाला..."मध्ये माझ्या वाचनात आले...चित्रपट, आपण बरीच लोकं आजूबाजूला जमवून बघू शकतो. आणि जितकी आपली लोकं आपल्याबरोबर तो चित्रपट बघण्यासाठी हजार, तितका अधिक आनंद आपण त्या चित्रपटातून मिळवू शकतो. पण तसे पुस्तक वाचीत असताना होत नाही. उलट, आपण वाचीत असता जर दुसरा कोणी त्यात डोकावू लागला तर ते आपल्याला नकोसे होऊन जाते. असे का बरे ? तर पुस्तक वाचीत असताना त्यातील शब्दसामर्थ्यानुसार आपले आपण आपल्यापुरते एक विश्व बनवतो. त्यात कोणी दुसऱ्याने डोकावणे हे आपल्याला घुसखोरीसारखे वाटू लागते व आपण चिडतो. परंतु, चित्रपट हे आपल्या डोळ्यांसमोरील पडद्यावर एक स्पष्ट चित्र उभे केलेले असते. म्हणजे 'आटपाटनगर'...हे माझे वेगळे आणि तुमचे वेगळे...पुस्तकात. मात्र तेच आटपाटनगर समोर पडद्यावर उभे केले गेले रे गेले की संपलेच सारे. आपले कल्पनास्वातंत्र्य संपुष्टात."
यावर ह्याही पुढे जाऊन चर्चा झाली लेकीबरोबर. मानसशास्त्र हा तिचा विषय. ती म्हणाली...पुस्तक व चित्रपट ह्या दोन्ही गोष्टी एकतर आपल्याला एखादी गोष्ट सांगतात किंवा काही माहिती देतात. आपण पुस्तक एकांतात व चित्रपट घोळक्यात पाहू इच्छितो त्या मागे एक कारण असू शकते. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये साम्य काय आहे ? तर दृष्टी. दोन्ही गोष्टी करण्यासाठी आपल्याला दृष्टीची गरज असते. मात्र पुस्तक वाचीत असताना आपल्याला अजून एक गोष्ट 'आपल्याकडून' त्यात घालावी लागते. व ती म्हणजे, अवधान. त्यातील शब्द, एकेक करून आपल्या मेंदूमध्ये जमा झाले, की त्यानंतर आपल्यासाठी एक चित्र तयार होते. या उलट, चित्रपटात आपण फक्त आपली दृष्टी कामाला लावली की निदान वरवर तरी समोर सांगण्यात आलेली गोष्ट आपल्याला समजू शकते. व एकाच वेळी आपली मित्रमंडळी ते बघत असल्याने आनंद वा दु:ख ह्या भावना आपल्याला एकत्र अनुभवता येतात. वाचन करीत असताना मात्र दृष्टी व अवधान ह्या दोन्ही बाबी कामाला लावाव्या लागतात. व त्यातील एखाद्या गोष्टीत जरी बाधा आली तरी आपल्याला तो उपद्रव वाटू लागतो....असे असू शकते.

असो.

'माय नेम इज रेड' हे ओरहान पमुक लिखित पुस्तक माझ्या हातात पडले त्यावेळी मी रुग्णालयात भरती होते. व तुर्कस्तानात, पमुकच्या देशात जाण्याची सुतराम शक्यता कुठेही दृष्टीक्षेपात नव्हती. पुस्तक मला अतिशय आवडले. तो देश मी बघितला नसल्याकारणाने मला हवे तसे चित्र मी डोळ्यांसमोर उभे करू शकले. हे माझे स्वातंत्र्य. एकेक पान मला त्या लघुशैली (मिनीएचर) चित्रकारांबरोबर त्यांच्या नजरेतून चित्र बघण्यास शिकवत होते. एकातेक गुंफलेल्या कित्येक कथा. त्यानंतर, काही महिन्यांतच त्या देशात जाण्याचा योग आला. आणि ते पुस्तक मला वेगळे जाणवले.
परवा मी त्याच लेखकाचे 'स्नो' वाचावयास घेतले. पहिल्या पुस्तकाची सर ह्या पुस्तकाला नाही. अजून वाचून संपलेले नाही. परंतु, तुर्कस्तानातील मुस्लिम धर्माची ओळख मला इथे पानोपानी दिसते. त्या देशात असताना त्याचा धर्म त्रासदायक वाटला नाही. माणसांची नावे सोडल्यास तो फारसा जाणवला देखील नाही. बाकी अगत्य, प्रेमळ स्वभाव असेच देशाचे दर्शन होते. तेथील स्त्रिया विमानतळावर मोठ्या बॅगांबरोबरच छोट्या बॅगा आणि छोटी बोचकी घेऊन फिरत होत्या. आणि इथेतिथे बागडणारी, त्यांच्या हाताला झोके देणारी, दोनतीन गोजिरवाणी गोंडस बाळं. एका सारखंच दुसरं. म्हणजे हिचं बाळ आणि तिचं बाळ...शेम टू शेमच ! आपलं कसं मेलं ओळखायचं ते त्याची आईच जाणे. बाप तर मला वाटतं दुसरीचच उचलून चालू पडत असत्याती !  भाषा नाही कळली म्हणून काय झालं....बायका बायकांची ती मनं कुटबी जुळत्याती !  यसटीथांब्यावर यसटीची वाट बघत....मालवणला निघाल्यागत... तस्सच मेलं !
ही माझी तिथल्या बायकांची तिथे झालेली ओळख.

'स्नो' मात्र वेगळं चित्र दाखवतं. बर्फ पडायला सुरवात झालेली आहे...आणि त्या शुभ्र बधीर वातावरणात एक वार्ताहर पोहोचला आहे. तुर्कस्तानाच्या सीमारेषेवर. कार्स ह्या शहरात. तेथे अकस्मात तरुण स्त्रिया आत्महत्या करू लागल्या आहेत...'का' हे नाव असलेला हा वार्ताहर कवी मनाचा आहे. त्याच्या कविता, तुर्कस्तानातील काही प्रसिद्ध मासिकांतून छापून आलेल्या आहेत. मूळचा जरी तो तुर्क असला तरीही तो मोठा मात्र झाला आहे जर्मनीमध्ये. त्यामुळे पाश्चात्य मोकळ्या वातावरणाची विचारधारा त्याच्या अंगवळणी पडलेली आहे. धर्मनिरपेक्ष व मूलतत्ववादी ह्या दोन परस्परविरोधी दिशा एकमेकांशी सतत भिडताना ह्या पुस्तकात आपल्याला दिसतात. एका परिच्छेदापर्यंत मी पोचले आणि विचार कुठल्या टोकाला जाऊ शकतात असे वाटले. दोन तरुण व वार्ताहर 'का' ह्यांमधील हा संवाद आहे. ते दोघे 'का'ला प्रश्र्न विचारीत आहेत. धर्म ह्या गहन विषयावरील त्याचे विचार जाणून घेण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.

“Please don’t misunderstand us,’ said Necip. ‘We have no objection to anyone becoming an atheist. There’s always room for atheists in Muslim societies.’
‘except that the cemeteries have to be kept separate,’ said Mesut. ‘It would bring disquiet to the souls of believers to lie in the same cemeteries with the godless. When people go through life concealing their lack of faith, they bring turbulence not only to the land of the living, but also to the cemeteries. It’s not just the torment of having to lie beside the godless till Judgment Day. The worst horror would be to rise up on the Judgment Day only to find ourselves face to face with a luckless atheist. Mr Poet, Mr Ka, you’ve made no secret of the fact that you were once an atheist. Maybe you still are one. So tell us, who is it who makes the snow fall from the sky? What is the snow’s secret?’

कादंबरीतील प्रत्येक घटनेला, शहरात पडणारा बर्फ साक्षीदार रहातो. काच्या नजरेतून, त्याच्या सुखदु:खातून, आपण बर्फाचे नाजूक हलके कण अनुभवतो. पुस्तकात तारुण्य आहे, सौंदर्य आहे, सूड आहे, वैर आहे...धर्मांध खून आहेत. श्रद्धा, विश्वास ह्यांविषयीचा दुराग्रह आहे.

कादंबरीची मूळ भाषा तुर्क आहे. तुर्कस्तानला जाण्याआधी माझ्या हातात ही कादंबरी पडली नाही हे बरेच झाले. उगाच मनात एक शेवाळ पसरलं असतं.
बघू...कथा पुढे कसे वळण घेते.

हे वाचन चालू असतानाच एक चित्रपट बघण्यात आला... द वेव्ह. मूळ जर्मन नाव. Die Welle.
सन १९७१ मध्ये, कॅलीफोर्निया मधील स्टॅण्डफोर्ड विद्यापीठ येथे एक प्रयोग केला गेला. तो प्रयोग ओळखला जातो 'स्टॅण्डफोर्ड प्रिझन एक्सपरिमेन्ट' ह्या नावाने. मानसशास्त्रज्ञ फिलीप झिम्बार्डो व त्यांचे सहकारी ह्यांनी एकत्रित होऊन ज्यावेळी ह्या प्रयोगाची आखणी केली गेली त्यावेळी तो प्रयोग सलग चवदा दिवस चालणार होता. परंतु, जसजसे दिवस पुढे सरकू लागले तसतसे तो प्रयोग भयानक रूप धारण करू लागला. व अखेर सहाव्या दिवशी हा प्रयोग बंद करण्यात आला. 'प्रसंगानुसार ( situational ), माणसाच्या वागण्यात होणारे बदल वा परिवर्तन' हा ह्या प्रयोगाचा विषय होता. सर्वप्रथम, स्टॅण्डफोर्ड विद्यापीठामधील मानसशास्त्र विभागामध्ये संशोधकांनी एक नकली तुरुंग तयार केला. त्यानंतर २४ विद्यार्थ्यांची निवड केली गेली. त्यातील १२ विद्यार्थ्यांना कैद्याची व १२ विद्यार्थ्यांना पहारेकऱ्याची भूमिका देण्यात आली. प्रयोग संपेपर्यंत चोवीस तास ह्या तुरुंगात रहाणे त्यांना सक्तीचे होते. हळूहळू, ह्या भूमिका जगता जगता १२ पहारेकरी शिवराळ करू लागले, हिंसक बनू लागले. त्याउलट, कैदी तीव्र चिंतेमध्ये डुबून मानसिक ताण अनभवू लागले. सतत रडू लागले. दडवलेल्या कॅमेराच्या सहाय्याने स्वत: संशोधक ह्या सर्वांच्या वागण्यावर लक्ष ठेवून होते. मात्र शेवटी हे इतक्या पराकोटीला जाऊन पोचू लागले की प्रयोगाचे संशोधक देखील सत्यापासून दूर जाऊ लागले. मानसशास्त्रज्ञ फिलीप झिम्बार्डो आपल्या 'The Lucifer effect' ह्या पुस्तकात म्हणतात, "सत्तेने दिलेल्या प्रासंगिक मोहावर, नैतिकता वा सभ्यता सतत जागृत ठेवून, फार कमी माणसे विजय मिळवू शकतात. अवधान व जाणीवा सांभाळू शकतात."
पूर्णतः ह्या संशोधनावर बेतलेला चित्रपट म्हणजे 'द एक्स्परिमेंट'. परंतु, 'द वेव्ह' मध्ये देखील हा असाच एक फसलेला प्रयोग आपल्याला दिसून येतो. हा चित्रपट घडतो जर्मनीमध्ये. एक प्राध्यापक, वर्गातील काही मुलांना हुकूमशाहीचे परिणाम दाखवून देत असता त्याचा वर्ग त्याच्या हुकुमाखाली कसा झुकू लागतो हे आपल्या डोळ्यांदेखत घडत जाते. काही चित्रपट आपल्याला फक्त घडलेली एखादी गोष्ट, हलत्या चित्रस्वरूपात दाखवतात. तर काही चित्रपट आपल्याला विचार करावयास भाग पाडतात. आपल्याला अवाक करून जातात. 'द वेव्ह' हा चित्रपट आपल्याला विचार करण्यास भाग पाडतो. चर्चा करण्यास प्रवृत्त करतो.
ह्यामध्ये दाखवलेला प्रयोग सुरु करण्याआधी, त्यातील मुख्य पात्र, प्राध्यापक, विद्यार्थ्यांना काही प्रश्र्न विचारतो. त्यावेळी त्यांनी दिलेली वेगवेगळी उत्तरे ऐकून आपण चकित होत जातो. पुढे एका आठवड्याभरात त्या गटाचे 'द वेव्ह' हे नाव ठरते, त्यांचे बोधचित्र तयार होते, व एक प्रकारचा मुजरा देखील तयार होतो. एकेक करून सर्व विद्यार्थी ह्या गटात सामील होतात. शहरभर बोधचिन्ह डकवले जाते. जीवावर उदार होऊन उंच उंच चढून भिंती रंगवल्या जाऊ लागतात. परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ लागते. मुले हिंसक बनू लागतात. एकमेकांचा जीव घेण्यास देखील पुढेमागे पहात नाहीत. हुकुमशाहीचा दुष्परिणाम मुलांना दाखवून देण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत असे म्हणता म्हणता हातात काही दिवस का होईना आलेली सत्ता प्राध्यापकाच्या रक्तात भिनू लागते.
चित्रपट ज्यावेळी संपतो त्यावेळी जे घडते, ते अशक्यप्राय वाटत नाही...शेवटी हेच घडणार होते असे वाटते.

अमेरिकेत घडलेल्या झिम्बार्डो ह्यांच्या अपयशी प्रयोगानंतर, मानसशास्त्रामधील घडवल्या जाणाऱ्या प्रयोगांवर काही बंधने, नियम घातले गेले. त्या प्रयोगामधील कैदी, तिथून बाहेर पडल्यावर नक्की काय मानसिकतेतून गेले असतील ? आपण मानसिकरीत्या किती दुबळे ठरलो ह्या धक्क्यातून बाहेर येणे त्यांना किती कठीण गेले असेल ? तीच परिस्थिती पहारेकऱ्यांची...समाजात जगत असता, आजवर अंगात बाणलेली सभ्यता इतक्या सहजासहजी आपण कशी काय विसरून गेलो, आपण काय आणि कसे इतके हिंसक वागलो...ह्या धक्क्यातून ते विद्यार्थी कसे बाहेर आले असतील ?
झिम्बार्डो म्हणतात, "खूप कमी माणसे तो तोल सांभाळू शकली, व दुर्दैवाने मी त्या थोर माणसांमध्ये नव्हतो."

'द वेव्ह' बघितल्यानंतर माझे मन त्या धक्क्यातून बाहेर पडल्यावर हादरलेल्या विद्यार्थ्यांकडे ओढ घेत होते. प्रयोगाच्या सुरवातीला, प्राध्यापक विद्यार्थ्यांना फक्त ताठ बसावयास सांगतो. खोल श्वास घ्यावयास सांगतो. आणि विद्यार्थ्यांना जाणवते की हे असे आपण केले की आपल्यालाच बरे वाटते. बस...तिथूनच हळूहळू प्राध्यापक आपला पगडा त्यांच्यावर जमवू लागतो. शिस्त शिकवतो. काही दिवस का होईना, परंतु, एकजूट ही आपली शक्ती आहे, हे अनुभवांतून त्या मुलांना पटल्यानंतर, ज्यावेळी हे सर्व चुकलेले गणित होते, आपण भलतेच काही करावयास लागलो होतो...'सत्ता हातात आल्यावर आपण त्याचा दुरुपयोग करू पहात होतो...ह्याची जाणीव भयानक नसेल का ठरली ? म्हणजेच आपल्यातही एक हिटलर आहे हे मान्य करण्यासारखेच हे नव्हे काय ? आणि आपल्या मित्रपरिवारासमोर आपण केलेल्या भयानक चुकीची उघड उघड मान्यता. मग ही मुले ह्या धक्क्यातून कशी सावरतील...? आता त्यांना बरोबर मार्ग दाखवणारा, शिस्त ही कुठल्या मर्यादेपर्यंत योग्य हे समजावून सांगणारा वेड्या वयात कोणी भेटेल काय...?

मी फ्लीपकार्टच्या साईटवर गेले व मानसशास्त्रज्ञ फिलीप झिम्बार्डो यांचे 'The Lucifer effect' हे पुस्तक मागवले.

...माझे बाबा मानसशास्त्राचे गाढे अभ्यासक होते ह्याचा अर्थ ह्या कुटील विषयावर बोलण्याचा मला अधिकार प्राप्त झाला असे नव्हे. जसे पुढाऱ्याचा मुलगा पुढारी..तसे काही हे नव्हे. परंतु, मला हा विषय आवडतो, त्यावर वाचावयास आवडते. माणसाचे बोलणे, वागणे हे त्याने त्याच्या आजवरच्या आयुष्यात घेतलेल्या अनुभवांवर बेतलेले असते असे मला वाटते. अगदी लहान होते, त्यावेळी बाबांची मित्रमंडळी घरी येत. तासनतास मोठमोठ्या गंभीर विषयांवर त्यांच्या चर्चा चालीत. मी फक्त बाबांच्या मांडीवर तिथेच बसून राही. आणि मग कधीतरी त्यांच्या कुशीत शिरून झोपून जाई. म्हणजे बाबांच्या कुशीत बसून जे काही अर्धवट ज्ञान कानात शिरले असेल त्याचा हा परिणाम झाला काय...असे आता उगीच वाटते. म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे वगैरे नव्हे...पण आवड निर्माण झाली हे मात्र खरेच.

'स्नो'...आणि त्यानंतर 'द वेव्ह'.
एक पुस्तक. एक चित्रपट.
पुस्तक अजून वाचून संपलेले नाही. परंतु, जितके वाचून झाले आहे त्यात व चित्रपटात, काही एक समान धागा जाणवतो आहे.
आत्ता ढोबळ वाटू शकेल, परंतु काही साम्य आहे हे खरेच.
कैदी...पहारेकरी.
विद्यार्थी...प्राध्यापक.
आस्तिक...नास्तिक.
सामर्थ्य...सामर्थ्यहीन.

मध्येच अजून एक पुस्तक हातात आलं.
तस्लीमा नसरीन यांचे 'फेरा'.
बंगालची फाळणी.
धर्म...सत्ता...मी...माझे.
सत्ता...हिंसा.
माणसात दडलेला पशू.

'फेरा' विषयी पुढील भागात.

Thursday, 23 August 2012

नाण्याच्या दोन बाजू

दशक उलटून गेले ह्या घटनेला.
त्यादिवशी इरॉसला सहा ते नऊचा 'रश आर २' बघून आम्हीं निघालो होतो. मी, माझी लेक आणि तिच्या दोघी मैत्रिणी. पोटपूजा आटपून घराच्या रस्त्याला लागेस्तोवर दहा वाजत आले होते. दिवस दुर्गाविसर्जनाचा होता. रस्त्यारस्त्यावर मिरवणुका निघाल्या होत्या. मुंबई, पुन्हां रंगली होती. नाचगाणे चालू होते. काही दिवसांपूर्वी गणेशविसर्जन आणि आता दुर्गा विसर्जन. आमचे देव सभ्य. आम्हीं भक्त असभ्य. मी गाडी चालवत होते. खिडक्या बंद होत्या. राणीचा चमचमता हार आम्हीं पार केला. पुढे सिग्नल. बाण हिरवा झाला आणि मी गाडी काढली. डाव्या हाताला बाबुलनाथ मंदिर. वेग तसा यथातथाच. आणि अकस्मात माझ्यासमोरील गाडीच्या काचेवर थाडकन काही आपटले आणि जमिनीवर कोसळले. ब्रेक आपोआप लावला गेला. गाडी थांबली. काचेचा पार कलायडोस्कोप झाला होता. मी दार उघडून उजव्या हाताने गाडीपुढे आले. समोर एक मानवी शरीर पडले होते. हातपाय तडफडत होते. गर्दी जमली. फुटकी काच इतस्तत: विखुरली आणि काही क्षणांपूर्वी रस्त्यावर इतस्तत: विखुरलेली माणसे, आता गाडीभोवती एकत्रित झाली. मी काही बोलेस्तोवर पडलेला माणूस उठून उभा राहू लागला.
"गलती हो गयी !"
"गलती ? पागल हो क्या ? अरे, तुम आये कहाँ से ??"
"वो मैं वहाँ से...."
माणूस शहरात नवा होता. त्या दिवशी सकाळीच दाखल झाला होता. दुर्गा विसर्जनाची गंमत पहाण्यासाठी म्हणून तो बाहेर पडला होता. उजव्या बाजूने रस्ता ओलांडण्यासाठी इतरांबरोबर जो सुसाट धावत निघाला तो मधल्या दुभाजकावर न थांबता तसाच पुढे आला. व गाडीवर आपटला. शहराची धावती वाहतूक अजून त्याच्या अंगवळणी पडणे बाकी होते. त्यामुळे, दुभाजकावर थांबून डावीकडून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज घेणे त्याला जमले नाही. मग त्याचा वेग आणि माझ्या गाडीचा वेग, त्याला भुईसपाट करून गेले. त्याला उभे फारसे रहाता येत नव्हते. गर्दीतून एक पोलीस पुढे आला.
"हा माणूस एकदम धावत आला आणि गाडीवर आपटलाच !" मी पोलिसाला सांगू लागले.
"मी बघितलंय काय झालं ते. तुमची चुकी नव्हती."
"पण आता काय करायचं ?"
"मी बघतो. तुम्ही निघा."
"नाही. तसं नको. मला सांगा तुम्ही ह्यांना कुठे घेऊन जाणार ?" माणूस तसा तिशीच्या आसपासचा वाटत होता. पायाने लंगडत होता त्या अर्थी पायाला काही मार लागला असावा. रक्तस्त्राव मात्र कुठेही नव्हता.
"केइएमला नेतो. सरकारी इस्पितळात न्यायला हवे."
"ठीक. मी ह्या मुलींना घरी सोडून येते तिथे."
"तुम्ही यायची काही तशी गरज नाही."
"नाही. मी येते. अर्ध्या तासात पोचते तिथे."
आम्हीं घरी गेलो. मुलींना सोडलं आणि मी इस्पितळाचा रस्ता धरला.
इस्पितळं रात्री उदास वाटत असतात. बायका पुरुष इथेतिथे घोळका करून उभे होते. आपापल्या रोग्याविषयी चिंतीत आणि गोंधळलेले. त्यांच्या डोक्यावर पडणारा पिवळा उजेड. पिवळ्या भिंती. गडद हिरवे जाडजूड पडदे. जणू वाऱ्याने पडदा सुद्धा हलू नये.
"मुझे माफ किजीये. गलती हो गयी." पिवळट चादरीच्या बिछान्यावर पडलेला तो माणूस वारंवार माफी मागत होता.
"वो ठीक है..."
त्या माणसाच्या पायाला फ्रॅक्चर होतं. तो पुन्हापुन्हा त्याच्या चुकीची माफी मागत होता. माझ्यासाठी माणुसकीची जबाबदारी ही कायद्याच्या वर आहे. मी त्याला रोख काही रक्कम दिली. तेथून निघाले तेव्हां दोन वाजून गेले होते.

परवा ह्या प्रसंगाची आठवण झाली. कारण निवेदिता नथानी. मोबाईलवर संभाषण करीत, मरीन ड्राइव्हवरील दुभाजकावर न थांबता, निवेदिता भर रस्त्यात खाली उतरली. आणि डाव्या बाजूने वेगात येणाऱ्या स्कोडा गाडीच्या पुढ्यात अकस्मात उभी राहिली. क्षणार्धात, गाडीने तिला आकाशात भिरकावले. ती जमिनीवर आपटली. बॉम्बे हॉस्पिटल येथे तिला नेण्यात आले व मृत म्हणून घोषित करण्यात आले. निवेदिताच्या आयुष्याची गोष्ट ही फक्त २३ वर्षांची होती. तिच्या वडिलांची कहाणी मात्र अजून पुढे चालू आहे. कोलकत्यावरून ते तिचे मृत शरीर घेऊन जाण्यासाठी मुंबईत आले होते असे वर्तमानपत्रात वाचावयास मिळाले. त्यांच्या कहाणीने हे एक दु:खद वळण घेतले आहे. त्यातून ते आता कधी आणि कसे बाहेर पडतील...वा कधी पडू शकतील की नाही हे देव जाणे.

हिंदुस्तान टाईम्समध्ये ज्यावेळी ही बातमी आली त्याचवेळी बातमी शेजारी त्यांनी तेथील रहिवाश्यांचे म्हणणे छापले होते. एक म्हणजे तिथे फार वेगाने वाहने धावतात. दोन, तिथे झीब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत. तीन, आम्हीं कर भरतो आणि त्यामुळे आमच्या मुलभूत गरजा पुरवल्या गेल्याच पाहिजेत.
त्याच बातमीत ट्राफिक पोलिसांचे काय म्हणणे आहे ते देखील छापले होते. सुविधा अधिक हव्यात हे मान्य. परंतु, पादचाऱ्यांसाठी तिथे पदपथ आहे. परंतु, ते त्यावरून चालत नाहीत. चालत्या वाहनांमधून शिवाशिवीचा खेळ करीत असतात. त्यांनी जबाबदारीने वागावयास हवे. निदान जिथे सतत वाहने वेगात जातयेत असतात त्या मार्गांवर पादचाऱ्यांनी स्वत:ची जबाबदारी ओळखावयास हवी. 

मुंबईची मी नागरिक आहे. आणि ह्याच मुंबईतील रस्त्यांवर पायी चालत लहानाची मोठी झाली आहे. त्यानंतर दुचाकी चालवली आहे. व आज चारचाकी चालवते आहे. आजपर्यन्तच्या आयुष्यात स्वच्छेने नव्हे परंतु, वाहतुकीतील अनेक कटू प्रसंगाना सामोरी गेले आहे. त्यामुळे दोन्ही बाजू मी समजून घेऊ शकते. एक जबाबदार नागरिक म्हणून मी नक्की कुठे कधी काय वागावयास हवे ह्याचे भान मी नक्की राखू शकते.

ज्यावेळी मी जे करीत असेन त्या कालावधीसाठीचे वाहतुकीचे नियम हे माझ्यासाठी लागू होतात. म्हणजेच, ज्यावेळी मी माझ्या दोन पायांनी चालत असेन तेव्हां, माझ्यासाठी पदपथ असतो, व रस्ता ओलांडताना झीब्रा क्रॉसिंग असते. बऱ्याचदा असे होते, की पदपथ असतो, परंतु, आपल्याच कृपेने तेथे फेरीवाले नांदत असतात. त्यामुळे आपल्याला त्यावरून चालणे अशक्य बनते. मात्र शक्य असल्यास मी तरीही त्यातूनच मार्ग काढीत पदपथाचा वापर करते.
ज्यावेळी मी वाहन चालवत असते, त्यावेळी फुका कर्कश भोंगा वाजवणे मला स्वत:ला कानाला फार त्रास देऊन जाते. एकदाही भोंगा न वाजवता मी बऱ्याचदा कचेरीत जाते आणि तशीच आवाज न करता परत देखील येते. तो दिवस माझा फार आनंदाचा असतो. झीब्रा क्रॉसिंग ही गोष्ट चार चाकांसाठी नाही ह्याची मला खात्री आहे. आणि सिग्नलमधील हिरवा रंग प्रेमाचा. लाल रंग धोक्याचा व पिवळा रंग हा धोक्याची ताकीद देणारा असतो हे मला माझ्या शाळेने शिकवले आहे. आणि माझी स्मरणशक्ती शाबूत आहे. पादचाऱ्यांचा मी मान ठेवला तर ते माझा मान ठेवतील इतकी ही गोष्ट माझ्यासाठी साधी आणि सरळ आहे. चालत असताना भर रस्त्यात, एखाद्या गाडीला हात दाखवून माझ्यासाठी थांबण्यास भाग पाडणे हे म्हणजे 'मी कोणी म्हातारी, वा अशक्त किंवा रुग्ण आहे...आणि ते बघून तुम्हीं गाडीवाले माझ्यासाठी थांबा', अशी मी भीक मागत आहे असे मला वाटते. भीक मागण्याचे क्षेत्र माझे नव्हे.
एखादी चारचाकी गाडी कधी पदपथावर जाऊ शकते का ? नाही. तेव्हां मी माझ्या दोन पायांनी भर रस्त्यावर रमतगमत चालत नाही.

हक्कांची जाणीव आपली फार तीव्र आहे...मग कर्तव्याची इतकी बोथट का ?
हक्क आणि कर्तव्य नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र हक्काची बाजू अतिशय ठसठशीत आहे. त्याउलट कर्तव्याचे चित्र पुसट होत गेले आहे. मुलभूत हक्क फार काळ डावलले गेले असल्याने ही परिस्थिती ओढवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, जितके एक नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य नाकारू, आणि ही कर्तव्ये म्हणजे काही मोठे सीमेवर जाऊन शत्रूशी लढणे ह्यासारखे जीवावर उदार होण्यासारखी देखील नाहीत...तितकेच आपले आपणच आपल्या हक्कांपासून दूर फेकले जाऊ...असे नाही का वाटत ?

कर्तव्य बजावणे व हक्क मिळवणे ह्या दोन्ही गोष्टी, इंग्रजी अक्षर 'v' सारख्या संलग्न आहेत.
त्यामुळे त्यांना समान महत्त्व आपण दिले तरच एक नागरिक म्हणून आपण जगताना  'V for Victory' असे म्हणू शकू.

Friday, 17 August 2012

लक्ष्मी...दर्शन

"हजर ? सुट्टीवर होतात ना ?"
"हो. तिरुपतीला गेलो होतो."
"अरे व्वा ! कोणकोण ?"
"आम्हीं तिघे...बायको, मी आणि लेक."
"मस्त !"

"तिरुपतीला गेला होतास ?"
"हो...तेच सांगत होतो हिला...म्हणून टाकली होती सुट्टी."
"छान !"
"खूप गर्दी हो पण ! तीनशे रुपये भरले मी ! दर्शनासाठी...!"
"मग झालं का...दर्शन...?"
"थोडं थोडं !"
"तंत्र आहे ते !...मी तीनदा गेलोय !"
"हो काय ?"
"म्हणजे ते तीनशे बिनशे ठीक आहे...ते द्यायचे हवं तर बाहेर...पण आत आलं की समोर...तिरुपती...!"
"हो..."
"मग ते डाव्या बाजूने ढकलायला सुरवात करतात...लगेच...दाराबाहेर !"
"हो ! तसंच झालं ना !"
"मग जायचं असं आपण...उजव्या हाताला सरकत सरकत...हळूहळू..."
"आणि ?"
"आणि काय ? तिथे कोपऱ्यात असतो एक उभा...त्याच्या हातात असे हळूच पन्नास रुपये सरकवायचे..."
"हो काय ?"
"मग काय तर ! मग हवं तितका वेळ रहा उभे ! घ्या दर्शन !"

"म्हणजे देवदर्शनासाठी लाच...?"
"अगं, त्याशिवाय मिळत नाही दर्शन ! विचार ना ह्याला...मिळालं का ? इतका तिरुपतीला गेला ! पण मनासारखं दर्शन मिळालं का ?"
"हम्म्म्म...मग झाला का तुला कधी देव प्रसन्न ? मला शंकाच आहे...लाच देऊन तू दर्शन घेतलंस...तो कसला प्रसन्न होतोय तुला ? काय उपयोग तीनतीनदा इतक्या दूरवर जाऊन ?! ही जर तिथे प्रथाच असेल तर मला शंकाच आहे की तो तिरुपती तिथे असेल ! तो गेला असेल कधीच सोडून !"
"दर्शन झालं ना ! मग झालं काम !"
"ते मूर्तीचं...ते तुला कम्प्यूटरवर पण मिळालं असतं..."
हास्य.
"ह्याला पण देशद्रोहच म्हणतात...लाच देणे हा पण देशद्रोहच आहे ! आणि त्यासाठी कोणीही पाकिस्तानी येण्याची गरज नाही...तुम्हीं स्वत:च आपल्या देशबंधूला फितवता...छोट्या छोट्या गोष्टींसाठी...! आणि देशद्रोह करण्याच्या मोहात पाडता ! आणि मग भ्रष्ट्राचार वाढलाय म्हणून बोंबाबोंब करता ! आणि त्या भ्रष्ट्राचाराच्या भस्मासुरापासून मला वाचव म्हणून त्या देवालाच साकडं घालता ! ह्याला चोराच्या उलट्या बोंबा...असं म्हणतात !"

पांगापांग.

आपण घसरगुंडीवरून पूर्ण घसरलो आहोत.
आता पुन्हां वर चढायचं म्हटलं तर परत मागे वळावयास हवे !
पायऱ्या तर समोर हजर आहेत...
पण मनात इच्छा ?
आणि तेव्हढा वेळ ?

त्या वेंकटेश्वरालाच माहित !

Thursday, 16 August 2012

श्रीराम जयराम...जयजय राम...

आज खरं तर देशप्रेमाची गीते गुणगुणावीत, गपगुमान भाषणे ऐकावी. 
उगाच स्वत:ला सुजाण समजू नये. 
डोक्याचा भुसा करून घेऊ नये.

रोज सकाळी मी वर्तमानपत्र उघडते.
एक नागरिक म्हणून वाचू लागते. जीवाचा संताप होतो.
एक स्त्री म्हणून वाचू लागले. जीव धास्तावतो.

पंचवीस वर्षीय पल्लवीचा खून होतो त्यावेळी मी माझ्या घरात निवांत झोपलेली असते. त्या रात्री दोनवेळा तिच्या घराची वीज तोडली जाते, दोन वेळा तिच्याच बोलावण्याने घरात प्रवेश मिळवला जातो. तिसऱ्या वेळी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न होतो. तिने तीव्र विरोध केला म्हणून तिला मारून टाकले जाते. म्हणे पल्लवी तोकडे कपडे घाली. सरळ तळघरातील तिच्या गाडीपाशी जाई. म्हणे इमारतीत कधी कोणाशी ती बोलत नसे. रात्री तिने चौकीदाराला वीज केली म्हणून बोलावून घेतले आणि त्यावेळी ती त्याच्याशी घरातील गेलेल्या विजेविषयी त्याच्याशी बोलली. मुंबई शहरात कधीही कुठल्याही स्त्रीशी तो बोलत नसे. ती त्याच्याशी बोलली त्यावरून म्हणे त्याला असे वाटले की पल्लवीला त्याच्यात 'इंटरेस्ट' आहे...म्हणे सुमारे पाच वर्षांपूर्वी जम्मू काश्मीर येथून ह्या माणसाला घरातून हाकलून देण्यात आले आहे...गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे !

शहराची मनस्थिती काही ठीक नाही. शहर निराश आहे. शहर वैफल्यग्रस्त आहे. शहराच्या डोक्यात लाव्हा आहे. कल्लोळ आहे.

काल सौतीचंदचे नाव घेऊन एका माणसाचा मला फोन आला. सौतीचंद रंगारी. माझ्या मामेबहिणीने सर्वप्रथम त्याची माझ्याशी ओळख करून दिली होती. अतिशय विश्वासू. एकदोनदा त्याच्याकडून घराला रंग मी लावून घेतला आणि सौतीचंद घरचाच झाला. काही कालावधी लोटल्यानंतर तर त्याच्यावर घर सोपवून मी बाहेरगावी जात असे. सौतीचंद मन लावून प्रामाणिकपणे काम करी. पंधरा दिवसांनी मी परतत असे. माझे घर नवा रंग अंगावर पांघरून प्रसन्न हसत माझे स्वागत करी. गावी बायकापोरे सोडून मुंबईत आलेला सौतीचंद त्यानंतर कधीतरी आपल्या गावी परतला. मग परत पोटापाण्यासाठी म्हणून कधी मुंबईकडे फिरकला नाही. मात्र त्याच्या ओळखीने असे कोणी त्याच्या गावचे रंगारी फोन करीत. एके वर्षी मी त्याच्या मेव्हण्यावर रंगकाम सोपवले देखील. पण ते तितकेच. काल जेव्हां पुनश्च सौतीचंदचे नाव घेऊन कोणी मला फोन केला, त्यावेळी सध्या काही मला रंगकाम काढावयाचे नाही असे मी सांगितले. फोन ठेवला. माझे उत्तर तर खरेच होते. पण काय माझ्या भिंतीच्या रंगाचे पोपडे उडालेले असते, तर त्या अनोळखी माणसाला घरात घेण्याइतके धैर्य आता माझ्या अंगात अजूनही शिल्लक आहे ?

मध्यंतरी दोन अनोळखी फोननंबरवरून माझ्या मोबाईलवर फोन येत होते. वेळ वाटेल ती, बोलणे अश्लील. शेवटी, पोलीस स्टेशन गाठले. त्यांना ते नंबर दिले. माझ्यासमोर पोलिसाने त्यातील एक फोन लावला. त्यानंतर त्या क्रमांकावरून पुन्हा कधी फोन नाही आला. दुसरा क्रमांक, अंधेरीचा कुठल्या दुकानातील. दुकानाचा मालक नसला की तेथील हा कामगार म्हणे माझा नंबर लावत असे. आणि कल्पनाशक्ती लढवत, तोंडाला येईल ते बोलत असे. पोलिसांनी त्याला धमकावले. मला फोन येणे थांबले.

परवा, कार्यालयातून बाहेर पडत असताना, मी लिफ्टने जाण्यापेक्षा जिना धरला. तिसऱ्या मजल्यावरून तळमजल्यापर्यंत जाण्यासाठीचे जिने दोन मिनिटांचे आहेत. आमच्या मजल्यावरून खाली उतरू लागलो की मागे दरवाजा बंद होतो. तळमजल्यावरचा दरवाजा बहुधा उघडा असतो. सध्या आमच्या पाच मजली इमारतीत कुठल्यातरी कार्यालयाचे नुतनीकरण चालू आहे. मी उतरू लागले त्यावेळी जिन्यात माणसांचे बोलण्याचे आवाज कानावर पडू लागले, आणि काही माणसे वर येऊ लागली. मी खाली मान घालून उतरत होते. सबंध त्या अरुंद परिसरात घामट, कुबट असा सिमेंटमिश्रित वास पसरलेला होता. आपण जरी मान खाली घातली तरी बहुतेकवेळा तरी आपल्याकडे एकटक लागलेल्या नजरा आपल्याला जाणवतात. तसेच माझे झाले. हातात घमेली, फावडी घेऊन चाललेली ती माणसे म्हणजे चेहेरे नसलेली एक अदृश्य शक्ती वाटू लागली. ती टाळून लवकर तळमजला येईल तर बरे असे मला वाटू लागले.

आसपास वावरणाऱ्या अपरिचित माणसांची ही वाढती संख्या मनातील भीतीला खतपाणी घालते.
"Mama says...don't talk to strangers." ह्याची आता सतत आठवण होते.
कोण जाणे, मुंबईचे सुजाण नागरिक, कुठून धैर्य गोळा करतात आणि रस्त्यावर जागोजागी बसलेल्या अनोळखी माणसांकडून खरेदी करतात. अनोळखी माणसांच्या गरजा भागवतात. जोपर्यंत या ना त्या मार्गे त्यांची पोटे आम्हीं भरणार तोपर्यंत हा मुंबईचा वाढता लोंढा कसा कमी होणार ?
हल्ली पायी जाण्याचे प्रसंग कमी येतात. परंतु, रस्त्यात तिरस्काराची भावना सगळीकडे तरंगत असल्यासारखे वाटते. तिरस्कार, असंतुष्टता...एक तवंग सर्वत्र पसरलेला. एक ठिणगी पडायची खोटी...भडका हा उडणारच.

इजिप्तमध्ये समजू लागले की माणूस आपला पिरॅमीड बांधू लागे...भावेल ती जागा...झेपेल तो आवाका. आपला आपण सुंदर पिरॅमीड उभारायचा. मोठा स्वावलंबी माणूस म्हणावयाचा ! हे सदगृहस्थ जेव्हां देवाला प्यारे होत...तेव्हां त्याला मंचावर घ्यावयाचा...सर्वात आधी टोचणीने खरवडून त्याचा मेंदू बाहेर काढावयाचा. सुगंधी तेलमालिश करावयाचे. त्याच्या सुरेख पिरॅमीडमध्ये न्यावयाचे. सोनेनाणी, दासदासी, कुत्रे, मांजर, माकड, बिकड. त्याचे संगती आत नेऊन बसवायाचे.

फरक आहे...आमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे...
आम्हीं आता प्रेते आहोत...रिकाम्या डोक्याची प्रेते...जिवंतपणी आम्हीं आमचे डोके रिकामे केले आहे...आमचा मेंदू कधीच काढून आम्हींच समुद्राला वाहिला आहे...स्वत:च आता अंगाला तेलमालिश करीत आहोत.
आमची प्रेते कालातीत...
आमचे मरण अबाधित...
मुंबई...स्वरचित पिरॅमीड.

Tuesday, 14 August 2012

दाता

माझ्या दारी हिरवं वैभव आहे. आंबा. आणि आंब्याला कुशीत घेऊन माझं घर विसावलं आहे. माय जशी बाळाला कुशीत घेते, एक हात उशाशी घेते, तृप्त मनाने झोपी जाते तसंच. माझं छोटंसं नाजूक तांबूस घर त्याच्या आंब्याला कुशीत घेतं आणि शांत माझी वाट बघत बसून रहातं. कसली तक्रार नाही, कसले दु:ख नाही. आयुष्याची बोट वल्हवण्याच्या घाईगर्दीत, मला महिनामहिना माझ्या ह्या आंबेघराकडे फिरकायला वेळ मिळत नाही. मग काय माझं घर रुसतं ? अजिबात नाही. मी दुरून देखील दिसले की आंब्याची सळसळ वाढते, घराला ते हलकेच गुदगुल्या करू लागतं. जागं करतं. मग माझ्या घराला बरोबर माझी चाहूल लागते. हलकेच ते सुद्धा हसतं, आणि मी कडीकुलुप उघडून आत शिरले की खुदुखुदू हसू लागतं.

मग जेव्हा गेल्या आंब्याच्या मोसमात माझ्या लाडक्या झाडाला शेजारणीने लुटलं, त्यावेळी त्याला नक्की काय वाटलं ? आंबा नुसता लगडला होता. ओझ्याने फांद्या वाकल्या होत्या. मी मुंबईहून मुद्दाम रिकामे खोके घेऊनच तिथे पोचले होते. वाटलेलं भरभरून आंबे घेऊन परतू. सगळ्या मित्रमंडळींच्या घरी तळहाताहून मोठा मधुर आंबा पोचेल. सगळे कसे खूष होतील. हे म्हणजे आपण काही मनात मांडे खावेत, आणि व्हावं काही भलतंच. घराच्या पायऱ्या उतरता उतरता आंब्याकडे माझं लक्ष गेलं. आंबा रिकामा होता. जणू, एखाद्या सौंदर्यवतीने, अंगभर ल्यायलेले दागिने साजण न आल्याच्या रुसव्याने उतरून ठेवावे. संन्यासिनीगत रिकामं कोपऱ्यात बसून राहावं. पंधरवड्यापूर्वीच मी इथे चक्कर टाकली होती. त्यावेळी काही आंबे खाली उतरायला अधीर झालेले दिसत होते. नुकतंच पाय फुटलेलं बाळ जसं आईच्या कडेवरून जमिनीकडे झेप घेत रहातं. आंबा अंगाने भरला होता. भांगात भरलेल्या कुंकवाचा हलका रंग खाली उतरू पहात होता. आज मात्र झाडावर एकही आंबा शिल्लक नव्हता. मी दत्ताला हाक मारली. दत्ता माळी. तिशीच्या आसपास वय. दत्ता बाग सांभाळतो आणि त्याची देवकी घर सांभाळते. देवकी सतरा वर्षांची होती तेव्हा त्यांचं लग्न झालं. एकोणीसाव्या वर्षी पदरात एक बाळ आलं. "अगं, सतराव्या वर्षी कसं लग्न लावून दिलं बाई तुझं ? कायद्याने गुन्हा आहे !" मी माझी शहरी अक्कल एकदा पाजळली होती. "ताई, आमच्याकडे असंच होतं." काळीभोर देवकी तिचे टप्पोरे काळे डोळे उघडझाप करीत शांतपणे मला म्हणाली होती.
"दत्ता, आंबा कुठेय ? तू उतरवून ठेवलायस का ?" येऊन समोर पायरीवर उभ्या राहिलेल्या दत्ताला मी विचारलं. गेल्यावेळी देखील दत्ताच वर चढला होता व आकडा लावलेल्या काठीने त्याने आंबे उतरवले होते.
"नाही ताई, मी नाही उतरवला."
"मग ?"
"समोरच्या मॅडमनी उतरवला."
"म्हणजे ?"
"आज दुपारी त्या आल्या, आणि काठी लावून सगळा आंबा त्यांनी काढून घेतला."
दत्ता मला काय सांगतो आहे हे मला अजूनही कळतच नाही.
"दत्ता, कोण मॅडम ? कोणी काढून घेतला आपला आंबा ?"
"त्यांना सांगितलं मी ताई, पण त्यांनी ऐकलं नाही माझं."
"पण कोण ह्या मॅडम ?"
"त्या...त्या समोरच्या घरात रहातात त्या..."
समोरची जुनी मालकीण माझ्या ओळखीची होती. ती ह्या संपूर्ण कलाकार लोकांच्या वसाहती सुरवातीपासून होती. त्यामुळे हे स्वप्न सत्यात आणताना ज्या काही अडीअडचणीना तोंड द्यावं लागलं त्यात आम्हां सर्वांबरोबर ती देखील होती. पण तिने हे घर विकून टाकलं होतं..आणि आता कोणी नवी मालकीण आली होती. आणि माझ्या स्वभावधर्माला धरून, ती नवी मालकीण काळी का गोरी...हे मी आजवर शोधलंच नव्हतं !
"म्हणजे काय ? असं का केलं तिने ?"
गेली दहा बारा वर्ष आम्हीं सगळे सभासद फार गुण्यागोविंदाने इथे नांदत होतो. आम्हीं अदमासे पन्नासेक सभासद आहोत. त्यामुळे डोंगरावर पन्नासेक घर आहेत. टुमदार, लाल विटांची आणि लाल छपरांची.
मुंबई इथून फार दूर नाही. गाडी घेऊन गेलं तर दोन तासांवर मुंबई. दर शनिवार रविवार आमच्यातलं कुणीतरी गजबजलेल्या मुंबईहून येतं. त्याचं गोजिरं घर जागं होतं. दोन दिवस, घराचं लाडकौतुक होतं आणि मग कष्टकरी माणूस आपला मुंबईला निघून जातो. त्याचं घर पुन्हां विसावतं.
"काय माहित नाही. मी त्यांना सांगत होतो...तुम्हीं आंबे काढायला येणार आहात म्हणून...त्यांनी ऐकलं नाही माझं ! मी इथेच होतो उभा...त्यांनी माझ्या डोळ्यादेखत आंबे काढले."

शेजार कधीतरी वेगळाच मिळतो. कोणाच्या झाडावरचा फणस, कोणाचा आंबा...म्हणे हे नवीन नाही.
...'मलाच का बरं अशी माणसं भेटतात' हा एक असा प्रश्र्न आहे जो बहुतेकवेळा प्रत्येक माणसाच्या मनात येतो. म्हणजे मी हा इतका चांगला आणि ही अशी माणसे माझ्याच नशिबी का येतात..असा विचार जर प्रत्येक माणूस करत असेल...तर खरं तर जग चांगल्या माणसांनीच बहरलेलं असायला हवं. पण तसं काही चित्र नाही. त्यामुळे कोणी काही चुकीच्या गोष्टी करणार आणि मग अगदी सत्य आणि असत्य ह्यांचे तुंबळ युद्ध माजणार...आणि सत्याला धीर धरता आलाच तर शेवटी त्याचा विजय होणार.

तसंच झालं. कडाक्याचं भांडण झालं. आपल्याला हे असं अगदी नळावर पाण्यासाठी भांडल्यासारखं देखील भांडता येत ह्याचा मला शोध लागला. स्वत:ची नव्याने ओळख वगैरे.

मग इतकं तारस्वरात ओरडून आंबे परत मिळाले का ?

सूर्य मावळत आला होता. इतका चढा आवाज तसाही आमच्या वसाहतीत आजवर कधीही झाला नसावा. शेजारीण तरातरा निघून गेली. परसात रिकामा आंबा शांत उभा होता. पाने सळसळ होत होती. आता अंधार पडणार होता. हिरवा आंबा काळोखात एखाद्या सावलीसारखा उभा रहाणार होता. मी पायऱ्या उतरत अंगणात आले. अंगणात बसण्यासाठी लाल रंगाचे सिमेंटचे बाक आहेत. त्यावर जाऊन बसले. शांत. इतकी निरव शांतता...आणि त्या तिथेच काही मिनिटांपूर्वी आपणच केलेला आरडाओरडा. त्या शांततेत रातकिडे गप्पा मारू लागले. डोळा लागण्याआधी पक्षी सहचाऱ्याशी सुखदु:ख वाटून घेऊ लागले. बाकी तर आसमंतात शांतताच. समोर पुसट पिवळी छटा असलेला चंद्र साक्षात उभा. गाव तर डोंगराखाली खूप दूरवर आहे. त्यामुळे तशीही फारशी जाग नसतेच. निसर्गाची जी काय जाग असेल ती तितकीच. रक्त तापवून घेऊन केलेले भांडण, शेजारणीचे आततायी वागणे, हातात दगड घेऊन दत्तावर तिने चढवलेला हल्ला. सगळंच भयानक. आणि त्याच्याच पुढल्या क्षणाला ही इतकी निरव शांतता. चंद्र जेव्हा आकाशात संथ उगवत होता, तेव्हां आम्ही भांडत होतो. सगळंच फोल. कोण जाणे ती जेव्हा आंबे काढत होती, त्यावेळी माझ्या आंब्याला कळले तरी का...की ही चोरी आहे...आणि ती चोरी आहे कारण आंबा माझ्या दारी उगवला आहे...आणि त्या अंगणावर माझा मालकी हक्क आहे ! लाललाल मातीच्या ह्या डोंगराची ही ३ गुंठा जागा माझी...त्यावरचा हा आंबा माझा...हे माझे...ते माझे...सर्व हिणकस...क्षुद्र...!

विषण्ण.

माझ्या दारी पेरू देखील आहे. गेल्यावेळी गेले होते तेव्हा किती पेरू लगडले होते. काल बघितलं तर बहुतांशी पेरू, पक्ष्यांनी टोचले होते, अर्धे अर्धे खाल्ले होते. आता काय पक्षांशी जाऊन भांडू ? पेरू तिळमात्र देखील दु:खी वाटला नाही. चांगला खुशीत होता. अंगाखांद्यावर टोचा मारलेले कच्चे पेरू मिरवत होता. किती पाखरांचं त्याने पोट भरलं, वाटलं झाड आपलं सुखावलेलंच आहे. दु:खी नक्की नाही. बाजूला करंबळाचं झाड. ते देखील असंच ओझ्याने वाकलेलं. "आई, मला खूप आवडता हा ते स्टार फ्रूट ! घेऊन ये तू जर आली असली तर फळं !" लेक गेल्या वेळी म्हणाली होती. दत्ता पटकन शिडी घेऊन बाहेर आला. चांगली आठ दहा फळं काढून त्यानं माझ्या हातावर ठेवली. झाड आपलं पुन्हां खुष !

काही कळत नाही...'कोणाच्या ना कोणाच्या तोंडी माझं फळ लागावं...कोणाचे ना कोणाचे दोन क्षण आनंदाचे जावेत...'इतकीच माझ्या झाडांची अपेक्षा असावी बहुतेक !

काल ताटात तिखटमीठ घेऊन आम्ही मायलेकी बसलो. चांगली चार करंबळं ताटलीत घेतली होती. आंबट आंबट ! डोळे मिचकावीत, हसतहसत आम्ही फळं फस्त केली !

मी दूर मुंबईत असले तरीही तेव्हा माझं परसात उभं असलेलं झाड खुशीत डोललं...दूर उभा असलेला आंबा सर्व समजगल्यागत मोठ्या माणसासारखा मान डोलवू लागला.

ह्या वर्षी भरपूर आंबे आले होते...म्हणजे पुढल्या वर्षी तर माझा आंबा विश्रांती घेईल...त्याच्या पुढल्या वर्षी मोहोर बहरेल...तो पुन्हां फुलेल....हिरव्या कैऱ्या फुटतील...त्याच्या अंगाखांद्यावर झोका घेऊ लागतील...पक्षी बागडतील...आंबा इथेतिथे चाखून बघतील...बाळ कैऱ्या उगाच जमिनीकडे झेपावतील...आंबा खुशीत येईल...हसू लागेल...प्रेमाने भरभरून आंबा देईल.

सखी शेजारीण त्यावेळी तरी माझ्या हाती आंबा लागू देईल काय ?

Friday, 10 August 2012

कोडं

:) मी खालील पोस्ट लिहिली किंवा लिहायला घेतली त्यावेळी त्यावर गैरसमज होऊ शकतील हे कळले नव्हते. पण तसं होताना दिसू लागलं. म्हणून मग माहिती काढली. तेव्हा ही माहिती मिळाली. तेव्हा मला वाटतं आधी लिंक बघून घ्या आणि मगच पोस्ट वाचा....कदाचित गैरसमज कमी होतील. :)

काही प्रसंग एका क्षणात घडून जातात. आपल्याला चमकवून जातात. आणि विचारात पाडतात.

आमच्या कार्यालयामध्ये प्रत्येकाच्या हुद्द्यानुसार जागा ठरलेल्या आहेत. सरसकट एकत्र बसणे हे इथल्या तत्वज्ञानात बसत नाही त्यामुळे ते आचरणात आणण्याचा काही संबंध येत नाही. माझ्या पाठी माझा एक मित्र बसतो व पुढे एक. अर्ध्या उंचीच्या छोट्या छोट्या काचेच्या भिंती आमच्यातील अंतर ठरवतात. माझ्या उजव्या हाताला छतापासून कमरेच्या उंचीपर्यंत आलेली खिडकी आहे. निळसर झाक असलेली काचबंद. संपूर्ण कार्यालय वातानुकुलीत असल्याकारणाने ती कायम बंद असते. वरून खालपर्यंत पोचणारा केशरी रंगाचा पडदा प्रत्येक खिडकीला आहे. भल्या मोठ्या प्रशस्त अशा दालनाला अंदाजे नऊ खिडक्या आहेत. आणि बारा महिने चोवीस तास फक्त माझा पडदा वर जाऊन छताला चिकटलेला असतो. कारण बाहेरून माझ्या अंगावर येणारा सूर्यप्रकाश मला आवडतो. अगदी ऊन काही येत नाही, पण नक्की बाहेर काय चालू आहे ते आत कळू शकते. म्हणजे माझे आकाश आक्रसत नेणाऱ्या उंचच इमारती आहेत. तसेच नजर खाली उतरवली, तर लाल कौलारू घरे देखील आहेत. माझ्या अगदी खिडकीपाशी कधी एखादा कावळा येऊन मला हाक मारून जातो, तर कधी एखादी चिमुकली चिमणी तिची ख्यालीखुशाली कळवून जाते. मग मीही त्यांना काहीबाही सांगत बसते. त्यासाठी आम्हांला कुठलीही भाषा यावी लागत नाही हे आमच्या मैत्रीचे वैशिष्ट्य. आमची आपली मौनीभाषा. आपले नाही परंतु, सूर्यदेवाचे काम आटपत आलेले आहे, काळोख पसरू लागला आहे, आकाश भरून आले आहे, प्रचंड वादळ सुटले आहे, हे सर्व मला माझी खिडकी सांगत असते.

माझ्या पुढे बसणारा माझा मित्र हा तसा मला सतत दिसून येत नाही. कारण तो आमच्या मधल्या भिंतीमागे असतो. मात्र सकाळी हजर झालो की 'सुप्रभात' अशी हाळी एकमेकांना आम्हीं नक्की देतो. तोही मराठी आहे आणि मग त्या 'गुड मॉर्निंग'पेक्षा मला आपलं सुप्रभात अधिक जवळचं वाटतं. त्यामुळे हा माझा मित्र जेव्हा नव्याने आमच्या कंपनीमध्ये दाखल झाला, त्यावेळी मी आपला हा मराठी पायंडा घालून टाकला. नाहीतर आंग्लाळलेल्या आमच्या कार्यालयात, संवाद, परिसंवाद, शिवीगाळ, स्तुतिसुमने इत्यादी इंग्रजी भाषेतील वेगवेगळे प्रकार त्यात्या गरजेनुसार वापरले जातात. माझ्या मित्राचे नाव काय ? तसेही नाव कळल्यानेच ही गोष्ट पुढे सरकणार आहे अशा काही ह्या घटनेला मर्यादा नाहीत. कारण त्याचे नाव गणेश, राहुल, वा अमित असले तरीही घटना तशीच रहाते. फक्त मराठी असल्याकारणाने आमचा संवाद हा मराठीत झाला हे नक्की.

मला वाटतं फार पूर्वापार एक ठराविक प्रकारची काळ्या तिळांपासून बनवलेली सुपारी खाण्याची माझ्या ह्या मित्राला सवय आहे. त्यामुळे त्याच्या मंचावर उजव्या हाताला एक चांगला अर्धा फुट उंचीचा प्लास्टिकचा डबा ह्या सुपारीने कायम भरलेला असतो. मित्र उदार अंत:करणाचा असल्याकारणाने, आत कडीकुलुपात सुपारी लपवून ठेवणे हे काही त्याच्या स्वभावधर्मात बसत नाही. येण्याजाण्याच्या रस्त्याच्याच बाजूला त्याने आपला हा डबा ठेवला आहे. व तिथून येताजाता सर्वचजण दिवसातून कमीतकमी चार ते पाच वेळा तो डबा उघडून त्यातील सुपारी आपल्या मुखात टाकीत असतात. आतील सुपारी कमी कमी होत जाते ती बंद डब्याच्या बाहेरून खालीखाली जाणाऱ्या तपकिरी रंगावरून कळते. मग हा आपला नवीन पाकीट विकत आणून त्यात सुपारी भरून टाकतो. आणि द्रौपदीच्या थाळीप्रमाणे आम जनतेला दिवसभर चघळायला सुपारीचा पुरवठा विनासायास मिळत रहातो. ही सुपारी खाल्याने आपण करीत असलेल्या ठराविक 'डाएट' वर काही विपरीत परिणाम तर होत नसेल ना अशी एक चर्चा स्त्रीवर्गात चालू रहाते. अधूनमधून गुगलवरती काळे तीळ हा शब्द टाकून त्यावर माहिती मिळवली जाते व मिळालेल्या माहितीची आपापसात देवाणघेवाण होते. बाकी पुढे सुपारीचे चर्वण मात्र चालूच रहाते.

त्या दिवशी अशीच मिटिंगवरून माझ्या जागेवर परत येत असताना मी मित्राच्या मंचापाशी मधेच थबकले. तो त्याच्या कामात मग्न होता. डबा उघडून मी सुपारी हातावर घेतली. आणि त्याला म्हटले, "तू असलास वा नसलास, आम्हीं आपले सगळेजण तुझ्या सुपारीवर येताजाता ताव मारीत असतो."
तो हसला व म्हणाला,"अरे ! ठीक आहे ना."
मी त्यावर म्हटले,"कोणी डबा उघडून घेताना इथेतिथे पाडलेले काळे तीळ मी आपली साफ करून ठेवते हा. मी पाडले नसले तरीही. उगाच तुझं टेबल अस्वच्छ नको दिसायला. नाही का?"
तो हसला. चष्म्यातून त्या डब्याकडे बघत तत्परतेने उद्गारला,"अच्छा ! म्हणजे तू पुरावा नष्ट करतेस तर !"
मी चमकले. मला एक क्षण काही कळले नाही. नक्की त्या त्याच्या विनोदावर हसावयाचे आहे, की आपली कृती ही चोरीत मोडली गेली ह्याचा धक्का मला बसला आहे, हे त्या क्षणी कळले नाही. मी हं हं केले आणि जागेवर जाऊन बसले.

काय आपल्या तोंडून प्रतिक्षिप्ततेने निघालेले उद्गार, हे आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या; परंतु कालौघात खोल मनाआड दडलेल्या घटनांची एक प्रतिक्रिया म्हणून नकळत बाहेर पडतात ? नाहीतर 'पुरावा', 'चोरी' हे शब्द असे अचानक कसे उद्गारले जात असावेत ?

आम्हीं आमच्या कार्यालयात एक वर्कशॉप बऱ्याचदा करतो. 'फ्री असोसिएशन' असे त्याचे नाव आहे. म्हणजे समोरील फलकावर एकेक शब्द लिहिले जातात. आपण तो शब्द वाचल्यावर पहिल्या क्षणी कुठला दुसरा शब्द येतो, तो सांगायचा असतो. जसं इथे मित्राने 'स्वच्छ' आणि 'पुरावा नष्ट करणे' ह्या दोन शब्दांची जोड केली. आपल्या ह्या मनाच्या खेळाचे आपल्यालाच बऱ्याचदा आश्चर्य वाटू लागते. कारण कधी एखादा शब्द वाचून असा काही वेगळाच शब्द आपल्या डोक्यात येतो की आपणच चकित होतो. आणि मग कधी त्यावर आपण विचार केला तर आपल्याच काही आत दडून गेलेल्या त्या शब्दाशी निगडीत अशा आठवणी जाग्या होतात.

ही घटना घडली त्यावेळी मला त्या वर्कशॉपची आठवण झाली. ह्यात माझी त्या मित्राशी असलेली मैत्री तुटण्याचा प्रश्र्न नव्हता. फक्त हे असे का होत असेल ह्यावर विचार मात्र जरूर करावा वाटला. आपल्या मनातील गुंतागुंत, ही इतकी एकमेकांत गुरफटलेली असते, की त्यापुढे कदाचित गुंतून गेलेला एखादा लोकरीचा गोंडा देखील सोपा वाटून जावा.

(मी ही पोस्ट प्रसिद्ध केली व नंतर वाटू लागले की मला काय म्हणायचे आहे ते नीट स्पष्ट नाही झालेले. आणि म्हणून शेवटची चार/पाच वाक्ये मी पोस्ट एडीट करून वाढवली आहेत. मला आशा आहे की काहीही गैरसमज न होता आता मला काय म्हणायचे आहे ते अधिक स्पष्ट होईल. :) )
 

Sunday, 5 August 2012

'टूर'की...भाग १३ (अंतिम भाग)

पहाटे, तीन वाजता उठून अगदी तयारी वगैरे. आजपर्यंत बऱ्याच वेळा आकाशात उडालो होतो. त्यात काय विशेष ? पण बंद विमानात आत सुरक्षित उडणे वेगळे आणि एखाद्या पक्ष्यासारखे मोकळा श्वास घेत आकाशात विहार करणे वेगळे. त्यामुळे वर आकाशात नक्की किती थंडी असेल, ह्याचा तसा काही पूर्वानुभव नव्हता. हा स्वेटर, ही शाल...ही कानटोपी..अशी चर्चा रात्री झाली होती. आणि रात्रीच कपडेबिपडे, स्वेटरबिटर खुर्चीवर अगदी तयारीत बसले होते. आम्हीं उठण्याची वाट पहात. मी आधी तयार झाले आणि चार वाजता कपाडोक्यिया कसे दिसते हे बघायला दार उघडून बाहेर आले. सगळं स्वप्नवत. गडद निळं आकाश. काळे डोंगरांचे सुळके. नजरेस आजूबाजूला दिसणाऱ्या अनेक गुहा. आम्हीं एका गुहेत, जशी अस्वले. लेक बाहेर आली. गुहेच्या पायऱ्या उतरून खाली आलो. खालील मोकळ्या चौकात शांतता होती. हलका वारा वहात होता. बाजूच्या भिंतीवरील गुलाबाची वेल व त्यावरील टप्पोरे लाल गुलाब डुलक्या काढत होते. मुख्य दरवाजा उघडून आम्हीं बाहेर पडलो. तिथे छोटी बस उभी होती. आत आधीच काही पर्यटक बसलेले होते. वातावरणात एक उत्सुकता होती.
अंधारातून बस निघाली. अरुंद गल्ल्या, चढउतार. बस पुढेपुढे जात होती. शहर मागे मागे पडत होते. आता क्षितिजावर फुगे दिसू लागले. दूर अंतरावर बोटाच्या एका पेराएव्हढे. आकाशात आपोआप वेगवेगळे स्तर तयार होत होते. काही फुगे अगदी नजरेपार. तर काही थोडे जवळ. नजीकच्या फुग्यांवरचे वेगवेगळे रंग, अजूनही न उजाडलेल्या आकाशात धूसर दिसून येत होते. रंगीत फुग्यांचे नवथर आकाश अनोळखी. बस थांबली. आम्हीं सगळे पक्षी तुरूतुरू खाली उतरलो. समोर एक प्रशस्त दिवाणखाना दिसत होता. तिथे सर्वांनी एकत्र जमावयाचे होते. अदमासे शेकडा पक्षी जमा झाले होते. आत थोडी उबदार हवा. गरमागरम तुर्की चहा आणि बिस्किटं आमची वाट बघत होते. आम्हीं दोघी हातात चहाचा ग्लास घेऊन बाहेर आलो. ढग बाजूला सारून सूर्य पुढे सरसावत होता. क्षितिजावरचे पाय उचलून एखाददुसरा फुगा प्रवासास निघाला देखील होता. आम्हांला आमची व आमच्या हॉटेलची नावे विचारण्यात आली. गर्दीत एक भारतीय तरुण जोडपं होतं. आमची नजरानजर झाली. देशी नात्याचं एक स्मितहास्य मी दिलं. प्रत्युत्तर यथातथा. विविध रंगांचे बिल्ले वाटले जात होते. आम्हांला केशरी रंगाचा बिल्ला देण्यात आला. दोघींनी बिल्ला गळ्यात अडकवला.
"Orange." आमच्या रंगाचा पुकारा झाला. आम्हीं दहा केशरी पक्षी होतो.
"That one is yours." एक अवाढव्य फुगा आडवा झोपला होता. त्याच्या पोटाशी अडकवलेल्या वेताच्या टोपलीत एक अनुभवी माणूस बसला होता. त्याच्या हाताशी चार गॅस सिलिंडर्स होती. आगीच्या ज्वाळा फुग्याच्या पोटात शिरत होत्या. फुग्याच्या पोटात हवा भरली जात होती. भक्भक आवाज निघत होता. असे बरेच फुगे आडवे झोपले होते. जणू एखाद्या शर्यतीआधीचं 'वॉर्म अप' चालू होतं. 

हळूहळू आमचा फुगा जागा झाला. आम्हीं सगळे त्याच्या अवतीभोवती गोळा झालो. कोणी लहान कोणी मोठे, कोणी जेष्ठ नागरिक. काही पुरुष काही महिला. वेगवेगळ्या देशांतून त्यावेळी एकत्र झालेले, आकाशात तरंगण्याची एक हौस मनात धरून. फुग्याला कठडा होता. त्यावर हातांचा जोर देऊन आत उतरावयाचे होते. फुग्याचे नेहेमीचे मित्र आम्हांला मदत करत होते. आधी लेक आणि नंतर मी. आम्हीं दोघी आत उतरलो. आत टोपलीचे दोन विभाग केले होते. मध्ये एक आडवी काठी टाकून. आमच्या बाजूला आमचा पायलट उभा होता. थोडा स्थूल पन्नाशीच्या आसपासचा अँड्र्यूज. सुरवातीच्या काळात वैमानिकाचे काम करणारा अँड्र्यूज आजपर्यंतच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या देशांत पर्यटकांना आकाशात तरंगवत होता. आणि आमच्या हॉटेलच्या ऑस्ट्रेलियन तेसप्रमाणेच गेली काही वर्षे तुर्कस्तानात स्थायिक झाला होता.

अँड्र्यूज फुग्याची तपासणी करत होता. त्याच्या मदतीला जमिनीवर चार तरुण होते. त्यांना बाहेर काही सुचना देत आत इथे तिथे वाकून बघत तो मोठ्या बारकाईने फुग्याचे तब्येतपाणी बघत होता. अखेर सगळे त्याच्या मनासारखे झाले. आणि आमचा फुगा उड्डाण करावयास तयार झाला. आम्हीं पक्षी आपापल्या जागा पकडू तयार उभे होतो. अकस्मात एक छायाचित्रकार आम्हांला हाळी देत आमच्या बाजूला येऊन उभा राहिला. कॅमेरा आमच्यावर रोखून खटखट आमचे फोटो काढले गेले. आता उत्सुकता शिगेला पोचली होती. सगळ्यांचा उत्साह भरभरून वाहू लागला.

आणि शेवटी आमच्या फुग्याच्या दोऱ्या जमिनीवरून सोडण्यात आल्या. फुग्याने भुईवरचे पाय वर ओढून घेतले. आणि आमच्या नकळत आम्हीं फूट दर फूट वरवर जाऊ लागलो. काही क्षणापूर्वी नजरेसमोर उभ्या असलेल्या गाड्यांची छते दिसू लागली. आणि डोंगर वर नव्हे तर नजरेसमोर दिसू लागले. रस्ते, डोंगर, दऱ्या, अँड्र्यूजचे चार मदतनीस...सर्वच एकदम गलिव्हरच्या गोष्टीतील ठेंगू. ठेंगू देश. ते चौघे आम्हांला हात करू लागले. आम्हीही हात उंचावले. अस्पष्ट हास्य त्यांच्या चेहेऱ्यावर देखील दिसले.
"Let's kiss that balloon!" अँड्र्यूज म्हणाला. आम्हीं खालची नजर उचलून आता समोर बघितलं. कोणाला किस करायचंय ते कळेना. आमचा फुगा समोर तरंगणाऱ्या फुग्याच्या दिशेने झेपावत होता. हलकेच जाऊन त्या फुग्याला टेकला. जसे काही एका मैत्रिणीने आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या गालावर आपले गाल हलकेच टेकवावे. दोन अवाढव्य फुग्यांचे मुलायम चुंबन. हळूहळू आम्हीं त्या फुग्यापासून दूर जाऊ लागलो.
कालपर्यंत उंच दिसणारे सुळके आता खाली होते. खोल खाली लाल दरी होती. आम्हीं कपाडोक्यियातील प्रसिद्ध 'रोज व्हॅली' वरून चाललो होतो. 'रोज व्हॅली'चे असे नामकरण होण्यामागे कारण तिथला लाल दगड. वेगवेगळे ज्वालामुखी आणि त्यातून निर्माण झालेले विविध प्रकारचे दगड. कपाडोक्यियाचे वैभव. खाली पृथ्वीवर अगणित दऱ्या दिसत होत्या. फार पूर्वी अस्तित्वात असलेल्या वस्तीच्या खाणाखुणा दिसून येत होत्या. भूतकाळ आणि वर्तमानकाळ मनात एकत्र झाला. वाटलं, समजा पृथ्वीवर ह्या घटकेला कास्य युग चालू असते, आणि आकाशात एकविसावे शतक. दऱ्याखोऱ्यांतून खडतर जीवन जगणाऱ्या त्या वस्त्यांमधील समजा एखाद्याचे लक्ष वर गेले असते...आणि उजाडता उजाडता त्याला आम्हीं असे तरंगत जाताना दिसलो असतो...तर त्याच्यासाठी काय आम्हीं पुष्पक विमानातील माणसे झालो असतो...? "आई, कायपण हा !" लेक हसायला लागली. 
आम्हीं अजून वर गेलो. संपूर्ण शहर आता दृष्टीक्षेपात येत होते. जुने कपाडोक्यिया आणि त्याला लगटून वसलेले नवे कपाडोक्यिया. आमचा फुगा मधेच स्वत:भोवती हळूवार गिरकी होत होता. त्यामुळे आम्हां सर्वांना भोवतालचे संपूर्ण दृश्य दिसत होते. एका क्षणी पाठ असलेले आमच्या पुढ्यात उभे राही...आणि मग आम्हीं तिथून पुढे सरकू...अजून वर...वर...अजून वर.  समोर रंगीबेरंगी काही फुगे. खाली ? अधिक काही फुगे. वर ? अजून काही फुगे. फुग्यांचे आकाश...फुग्यांची दुनिया. मी एक फुगा. तरंगता...हलकीफुलका. भाषा विविध...आम्हीं मराठी, कोणी इंग्रजी...कोणी कळती...कोणी नकळती. श्वास हलका...मन हलकं...शरीर तरंगतं. अंगावर एखादी उबदार शाल पसरावी तसे सूर्याचे कोवळे सोनेरी ऊन ढगांआडून आमच्या अंगावर पसरले. कोणाचा गोरा चेहेरा अधिकच उजळला...कोणाचे सोनेरी केस चमकू लागले. विमानासारखे नव्हे...आकाशात उड्डाण केल्यापासून एकाच प्रकारचा प्रकाश. खिडकी बंद केलीत तर बाहेर काय आहे पत्ता लागणार नाही...सकाळ की संध्याकाळ. 
आज आम्हीं शब्दश: हवेत होतो. तरंगता तरंगता अँड्र्यूज आम्हांला आजूबाजूच्या परिसराची माहिती देत होता. आम्हांला आमचा हात फुग्याबाहेर काढता येत होता. अजून थोडं पुढे गेलो तर डोंगर हाताशी होता. हवा सुखद थंडगार होती. माऊथ पीस मधून अँड्र्यूजचा आजूबाजूला उडणाऱ्या फुग्यांबरोबर संवादबिंवाद चालू होता. त्याच्या मित्रांना तो त्यांचा फुगा नक्की कुठे आहे...त्या त्या मित्राचा फुगा आत्ता नेमका कुठे आहे ही देखील माहिती देत होता. मी उगाच कठड्यावरून खाली वाकते. कठडा कमरेच्या वरपर्यंत होता. म्हटलं तरी पडणे कठीण. तरी लेक ओरडते ! "आई, खाली वाकू नकोस !" खाली नजर टाकली तर एकदम काही काळे दिसले...म्हटलं मला काही प्राचीन काळचं फक्त मलाच वगैरे दिसत असावं....पण नाही ! कुठल्याश्या गाडीचा तो काळा टायर होता ! तिथे येऊन कसा काय पडला होता तो ? कोण जाणे. माझ्या मनात आपले 'एका टायरचे आत्मचरित्र' सुरू होते. मी लेकीला काही बोलत नाही...नाहीतर उगाच 'आई, कायपण हा !' असे ती परत म्हणाली असती !

"Now we will be going back..." अँड्र्यूज जाहीर करतो. एक तास संपला ? आयुष्यातील एक तास उडून गेला ? कधी आणि कुठे ? आकाशात उडाला की कुठल्या दरीत सांडला...कोण जाणे.
कपाडोक्यिया आकाशात आम्हीं हजेरी लावून गेलो...कपाडोक्यियाच्या आकाशाला स्पर्श करून गेलो.
दहा दिवसांपूर्वी तुर्कस्तानात प्रवेश केल्यापासून... जमीन. डोंगर. नदी. गुहा. समुद्र. दऱ्या. झाडे. वृक्ष. फुले...आणि आज पहाटे पहाटे...मोकळे आभाळ.
  


वाऱ्यासोबत फुगा वहात होता. काल जेव्हां चिरालीत अकस्मात पाऊस दाखल झाला होता, त्यावेळी तिथल्या ओझेलच्या मनात एक शंका आली होती. कपाडोक्यियामध्ये देखील पाऊस पडू लागला तर फुगे नाही उडवले जाणार. आम्हीं थोडे हिरमुसले होतो. वाटलं होतं,  आलो खरे इथपर्यंत, पण निसर्गाने साथ नाही दिली तर ?  तसे घडणार नव्हते. कपाडोक्यियामध्ये संध्याकाळी पाऊस सुरू होत होता. पहाटे मात्र वहाता वारा...जो फुग्याला समवेत घेऊन हलकेच आसमंतात तरंगत होता. फुगा जिथून उडाला तेथेच त्याच जमिनीवर तो परत उतरेल ह्याची काही शाश्वती नाही. वारा नेईल तेथे...ती त्याची दिशा. आणि ती त्याची त्या क्षणापुरती जमीन. वर आमच्याकडे लक्ष ठेवत खाली जमिनीवर अँड्र्यूजचे चार मित्र गाडीत बसून आमचा पाठलाग करत होते. जसजसा फुगा खाली उतरू लागला, तसतशी त्याची उतरण्याची जागा त्यांना कळत गेली. भराभर आपापली जागा पकडून ते जय्यत तयारीत जमिनीवर उभे राहिले. सगळ्यांनी आपापले कॅमेरे आत ठेवावेत. कठड्याला घट्ट पकडावे आणि गुढघ्यात वाकून उभे राहावे. जर चुकून फुगा वेगात खाली जमिनीवर आदळला तर कोणाच्याही पाठीच्या मणक्याला काही इजा पोहोचू नये ह्यासाठी ही अँड्र्यूजने घेतलेली काळजी. आज्ञाधारक मुलांसारखे आम्हीं सगळे उभे राहिलो. फुगा खाली खाली उतरू लागला. हलकेच एका क्षणी फुग्याने जमिनीला पाय टेकवले, आणि त्याने सरळ अंग सोडून दिले. आमच्या डोक्यावरचा फुगीर घुमट आता खाली वहात गेला. अँड्र्यूजच्या मित्रांनी फुग्याचे सगळे दोरखंड ताब्यात घेतले. फुगा देखील शहाणा मुलगा होता. दमूनभागून भुईवर आडवा झाला. आम्हीं एकेक करून बाहेर आलो. कुठल्या वेगळ्याच ठिकाणी आम्हीं उतरलो होतो. आजूबाजूला झाडे...दगड...आणि ते सुळके. बाजूला मित्रांनी एक टेबल टाकले होते. जमिनीवर झालेल्या सुरक्षित आगमनाबद्दल आता जल्लोष होता. शॅम्पेनची बाटली उघडली जाणार होती.

अँड्र्यूजने बाटली हातात घेतली. अजून सकाळचे फक्त सात वाजले होते. ऊन कोवळे होते. बाटलीचा छोटा बिल्ला उडाला आणि एक क्षण उन्हात चमकत अलगद बाजूला दगडावर विसावला. कुठेही लहानसा देखील कचरा सोडायचा नाही...ह्या तत्वाने अँड्र्यूजच्या एका सहकाऱ्याने बिल्ला उचलून तात्पुरत्या तयार केलेल्या कचरापेटीत टाकला. अँड्र्यूजच्या हातातील हिरवी बाटली उत्साहात उसळत होती. फेसाळते मद्य उन्हात चमकू लागले होते. अँड्र्यूज एकेक ग्लास भरू लागला. सगळेच वातावरण हलके होते...आनंद..जल्लोष. आकाशात केलेला एक तासाचा प्रवास सगळ्यांची मने हलकी करून गेला होता.


रस्त्यावर आमची छोटी बस आमची वाट बघत उभी होती. आम्हीं परतीच्या रस्त्याला लागलो त्यावेळी घडयाळामध्ये आठ वाजत आलेले होते. दूर रस्त्यावर अँड्र्यूजची पत्नी गाडी घेऊन त्याच्यासाठी आली होती. हसत हसत अँड्र्यूजने व तिने आम्हांला हात केला. आमची बस रस्त्याला लागली...आणि ते व त्यांची गाडी नजरेआड गेले. जसे काही क्षणांपूर्वी जमिनीवरील गाड्या क्षणार्धात ठिबक्यांमध्ये रुपांतरीत होत होत्या.

आमचा आजचा तुर्कस्तानातील शेवटचा दिवस होता. सहल संपत आली होती. उद्या मुंबईचे आकाश आणि मुंबईची जमीन गाठावयाची होती.

नेहेमीच एखादी सहल ठरवत असताना त्या संपूर्ण सहलीचा सर्वोच्च आनंदाचा क्षण काय असेल ह्याची थोडीबहुत कल्पना आपल्याला असते. तसेच ह्यावेळी आमचे झाले होते. हॉट एअर बलून राईड हा आमच्या तुर्कस्तानातील प्रवासाचा असाच एक अत्त्युच्च आनंदाचा क्षण असेल अशी आमची पक्की खात्री होती. कारण ह्या आधी कधी हे केले नव्हते. बालीला असताना तेथील समुद्रावर पॅरासेलिंग केले होते. ते देखील एकट्याने. पण तरी देखील हा अनुभव अवर्णनीय. मात्र तुर्कस्तानात आल्या दिवसापासून प्रत्येक दिवस हे असेच आनंदाचे अनेक क्षण देऊन जात होता. एक नव्हे. कित्येक. कधी इतिहासातील अजब कहाण्या तर कधी भौगोलिक आश्चर्ये. कधी जिभेचे चोचले, तर कधी मन:शांतीचा एखादा हलकासा क्षण.

कुठलाही देश असा दहा दिवसांत संपूर्ण बघून होणे अशक्य. त्यातून तो तुर्कस्तानासारखा, इतिहास, भूगोल संपन्न असेल तर अशक्यप्रायच. भारतात आयुष्य गेलं तरी देखील त्यातला एखादा वाळूचा कण काय तो हाताशी लागला असेच म्हणावे लागेल. मात्र आम्हीं जे ठरवले जसे ते झाले...तुर्कस्तानातील दोन शहरे, एक गाव आणि भूमध्य समुद्रात डुबकी. हसतमुख प्रेमळ रहिवासी, खाण्याची रेलचेल, स्वच्छ रंगीबेरंगी शहरे. सुरक्षित गावे. एखादा पर्यटक, उंचउंच डोंगर पायदळी तुडवणारा. कोणी पट्टीचा पोहणारा. कोणी आळशी, कोणी जिभेचा शौकीन, कोणी संगीतप्रेमी, कोणी इतिहास प्रेमी. तर कोणी आमच्यासारखे...सगळ्यांत थोडीथोडी गोडी. तुर्कस्तान. जो जे वांछिल तो ते लाभो...राहून राहून हे मनात येते. पर्यटकांसाठी पर्वणी.

दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्हीं आकाशात होतो. मात्र आज आभाळ आमच्यापासून दूर होते. परके परके. हातात न येणारे. पहाटे छत्रपती शिवाजी विमानतळावर पोहोचलो, तेव्हां अनेक आनंदाचे क्षण खाती जमा झाले होते. मायलेकी दहा दिवस सतत एकत्र होतो. आयुष्यातील बेरीज वाढली होती. वजाबाकी थोडी कमी झाली होती हे कबूल करावयास हवे.

देव बरेच काही काढून घेतो...मात्र जगण्यासाठी काही देत देखील रहातो. त्यासाठी अहोरात्र मेहेनत करावी का लागेना.
उलट कदाचित आनंद जर स्वकष्टाने मिळवता आला तर तो अत्युच्चच.
नाही का ?

समाप्त !
:)