नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 29 December 2011

असे का बरे ?

परवा काही वेगळीच माहिती कानी आली. आता ती इथे टाकायची म्हटलं तर सर्वात आधी म्हणायला हवे की ही पोस्ट पूर्णत: ऐकीव माहितीवर आधारित आहे. चला...तसेच समजा. पण मला ही माहिती नवीन होती...बहुधा तुमच्यासाठी ती जुनीच असेल. खात्रीलायक मित्राने हे सांगितलं. आणि माझ्या माहितीत भर घातली.

मी फार काही कवितांची पुस्तकं वाचत असते असे अजिबात नाही. म्हणजे खरं तर अजिबात वाचत नाही असेच म्हणावयास हवे. फक्त तसे जागतिक स्तरावर एकदम कबूल करणे जरा जडच जाते ! तर, कविता असे म्हटले की सर्वात प्रथम माझ्या डोक्यात काय येते ? तर 'देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे...घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे...' आणि बहुतेक ज्या काही कविता आठवतात त्या सर्व बालभारतीतल्या. कवितेचे रसग्रहण करावयाचे म्हटले की त्या कवितेच्या खोल गाभ्यात शिरावे व त्यातला 'स्वत:ला समजलेला अर्थ' मांडावा...हे असे कधी होई ? म्हणजे 'स्वत:ला' कळलेला अर्थ मांडण्याचे स्वातंत्र्य कधी बरं असे ? मराठीची प्रश्र्नपत्रिका सोडविताना, जेव्हा एखादी नवी कविता देऊन तिचे रसग्रहण करावयास सांगितले जाई त्यावेळी. आणि फक्त त्याच वेळी. इतर वेळी मात्र बालभारतीतील कवितेतील गर्भित अर्थ, मराठीच्या बाई समजावून सांगत व तो पाठ करून मी उत्तरे लिहित असे.
माझ्या बाबतीत, नेहेमीच मी 'गाणी' प्रथम ऐकते व त्यामुळे ती 'कविता' मला माहिती होते. म्हणजे जी काही चाल लावली गेली असेल, ज्या प्रकारचे संगीत दिले गेले असेल, त्या हिशोबात मी ठरवून टाकत असे...की हे प्रेमगीत आहे वा ह्यात विरह आहे. गंभीर व खोल अर्थांच्या कविता लिहिणारे आरती प्रभू मला माहित झाले ते मुळातच 'समईच्या शुभ्र कळ्या...' मधूनच. आणि त्यांची एकही कविता दहावीपर्यंतच्या माझ्या बालभारतीत नव्हती. त्यामुळे पुन्हां माझे ज्ञान हे तेव्हढेच. आणि त्यामुळे त्यांच्या गूढ कवितांचे रसग्रहण आमच्या मराठीच्या बाईंकडून शिकवून, समजून घेण्याचा कधीही प्रश्र्न उद्भवला नाही. आणि आम्हीं नेहेमीच परीक्षेत गुण मिळवण्यासाठी शिकतो...त्यापलीकडे जाऊन अभ्यास करण्याची आपल्यात पद्धत नाही. नाही का ?

'निवडुंग' चित्रपट. अतिशय सुंदर गाणी...अप्रतिम संगीत...मधुर...सुमधूर...पुन्हा पुन्हा ऐकत रहावी अशी गाणी.

'आठवणीतील गाणी' ही मराठी गाण्यांची साईट माझ्या मॅकवर कायम चालू असते. घरी...ऑफिसमध्ये. परवा देखील मी त्यावर 'भय इथले संपत नाही' ऐकत होते. कविता ग्रेस ह्यांची, स्वर लता मंगेशकरांचं आणि संगीत हृदयनाथ मंगेशकरांचं. तेव्हढ्यात माझा एक मित्र माझ्या टेबलापाशी आला.
"मला ना कवी ग्रेसांच्या कविता अजिबात कळत नाहीत." तो म्हणाला.
"अरे, पण त्यांनी स्वत: सांगितलंय...की त्यांच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही...तुला आणि मला त्यांच्या कविता नाही समजल्या तरीही....!" मी एकदम स्वत:ची पायरी ओळखून बोलून गेले.
मित्र हसला. हा माझा मित्र स्वत: कविता करतो. आणि कविवर्य कुसुमाग्रजांवरील नाशकात होणाऱ्या एका कार्यक्रमात त्याच्या स्वरचित कविता वाचण्यासाठी त्याला आमंत्रित देखील केले गेले आहे.
"तुला एक गंमत सांगू ?" तो म्हणाला.
गंमत सांगण्यास मित्राने सुरुवात केली. आणि त्या गंमतीचा शेवट मी चकित, चाट व विचारात पडण्यात झाला.
"अगं, नाशिकला मध्ये एक कार्यक्रम झाला. तिथे कवी ग्रेस, हृदयनाथ मंगेशकर अशी सर्व थोर मंडळी हजर होती..."
"अरे व्वा !"
"तिथे कवी ग्रेस काय म्हणाले माहितेय ?"
आता कवी ग्रेस काही बोलले...तर ते मला कळेलच अशी खात्री मला अजिबात देता येत नाही. ते काही सडेतोड व हृदयभेदकच बोलले असावे असे मला वाटले.
"ते म्हणाले...हे हृदयनाथ मंगेशकर ! आणि हे हृदयनाथ मंगेशकरांकडे हात असा फेकून ते म्हणाले...त्यांनी आरती प्रभूंची इतकी सुंदर कविता...लवलव करी पातं...आणि ह्यांनी ती कविता अर्चना जोगळेकरवर टाकून त्याच्या सगळ्या अर्थाची वाट लावून टाकली...अरे, ती कविता जरा ऐका...त्यात कवीला काय म्हणायचंय ते समजून घ्या...ती पूर्ण कविता ही प्राणपाखरूचे शरीरातून बाहेर पडण्याचे जे अखेरचे प्रयत्न आहेत...ते शेवटचे जे क्षण आहेत...ती जी धडपड आहे त्या क्षणांचे ते वर्णन आहे...! आणि काय केलंय ह्यांनी त्याचं गाणं ? काय लावलीय चाल...? त्या अप्रतिम कवितेचा अर्थच ह्यांनी बदलून टाकलाय !" मित्र अगदी हावभाव करीत वर्णन करीत होता. म्हणजे माझ्या डोळ्यांसमोर मी कायम टीव्हीवरच दर्शन घेतलेले कवी ग्रेस व हृदयनाथ मंगेशकर साक्षात उभे राहिले.
"आई गं ! मग ? अरे, मग मंगेशकर काय म्हणाले ?" मी.
"काहीही नाही...हृदयनाथ मंगेशकर शांत बसून होते...!"
"आईशप्पत !"
"आता बोल !"
"मी काय बोलू ?! बोडकं ? अरे, ह्या मंगेशकरांनीच माझे कान सुधारलेत रे !"
"म्हणजे ?" मित्र विचारू लागला.
"सारेगम' कार्यक्रमाच्या वेळी टीव्हीवर हृदयनाथ मंगेशकर येत ना ? त्या कार्यक्रमातून त्यांनी माझे कान सुधारले ! म्हणजे एखाद्या गाण्यात, एखाद्या शब्दावरच जोर का दिला गेला आहे....तिथे अशीच तान का घेतली गेली...हे सर्व त्या त्या कवितेवर व कवितेच्या अर्थावर कसे अवलंबून असते हे मला ज्ञात झाले "
खरं सांगायचं झालं तर माझे कान सुधारल्यावर मला मिळालेला आनंद अवर्णनीयच होता. मी एकदम खूषच झाले होते. म्हणजे एखाद्या चित्रामधून चित्रकाराला काय सांगावयाचे आहे हे जर मला समजून गेले तर जसा आकाशाला गवसणी घातल्यागत मला आनंद मिळे...तसेच काहीसे माझे झाले...गाणे समजून घेण्याचा मला निदान प्रयत्न करता येऊ लागला होता. अर्थात माझ्या क्षमतेला अनुसरून.
असे असता, आज मित्र जे सांगत होता तो म्हणजे माझ्यासाठी फार मोठा धक्का होता. हे म्हणजे फारच झाले...माझा कान सुधारणारे हे माझे कान गुरू...हृदयनाथ मंगेशकर...ह्यांनी असे का बरे केले असावे ?

मी लगेच मॅककडे वळले. 'आठवणीतील गाणी' ही साईट माझी मैत्रीण अलका चालवते. आणि त्यासाठी ती जीवतोड मेहेनत घेत असते. ह्या साईटचे सर्वात महत्त्वाचे गुण कोणते ? तर तिथे ज्यावेळी तुम्हीं एखादे गाणे ऐकता त्याच वेळी ती कविता वाचू शकता. त्यामुळे होते काय...की आपल्याला त्या कवितेचा मतितार्थ, त्या चालीमागचा भाव एकाच वेळी लक्षात घेता येतो. तसा प्रयत्न करता येतो. कवितेचे रसग्रहण करण्यास त्या गाण्याची मदत होते...व अपरिमित आनंद आपण घेऊ शकतो. ती साईट मी मॅकवर आणली. डाव्या बाजूला...'गीतकार.' आरती प्रभू...आरती प्रभू.....? मिळाले...त्या नावावर क्लिक केलं. दहाबारा कवितांची यादी डोळ्यासमोर आली...हे काय...आहे ना इथे....'लवलव करी पातं' !

लगेच दुसरा टॅब...त्यावर आपलं...यु टयूब. तिथे थोडा शोध...आलं आलं...Lav lav kari paat !
करा क्लिक...ती काय...दिसतेय ना...अर्चना जोगळेकर ! मग पुढील चार मिनिटे...एकाच वेळी ती कविता....डोक्यात मित्राने सांगितलेला त्यातील गर्भित अर्थ...आणि डोळ्यांसमोर...जोगळेकर बाई...बाईंचे ते नृत्य...लवलव करणारे शरीर...ती कविता...गाय उभी दाव्याची...तटतट करी चोळी...सर्व अर्थच बदलून जात होते...आणि काही कुठे ताळमेळ लागत नव्हता...कॅमेरा काही वेगळेच दाखवत होता...आणि शब्दांतून आरती प्रभू सांगत होते काही अनोखेच...ती आत्म्याची शेवटची धडपड...विशाल आकाशात मुक्त संचार करण्याची ती त्याची ओढ...आणि डोळ्यांना दिसत होते...रवींद्र मंकणी...त्यांची नजर...बाईंचे मुक्त मुक्त नखरे...हरकती...सुटं- सुटं झालं मन...धरू कसं पाऱ्याला...तिचं बागडणं...खट्याळ खट्याळ अर्चनाबाई...मधेच वाऱ्यावर डोलणारं गवताचं पातं...पारूबाई साठीची...मंकणींच्या आईचा क्लोजअप शॉट...अगं आई गं...सगळंच असंग. सारंच विजोड.

मला माझ्या गुरूवर्यांचे काही कळलेच नाही !
इथे ऑफिसात येताजाता, इथेतिथे, ज्यालात्याला दोन शब्द आम्हीं फार वेळा ऐकवित असतो...क्रिएटिव्ह फ्रीडम ! ह्या क्रिएटिव्ह फ्रीडमचे एक बरे असते. त्याचा वापर करावयाचा म्हटलं की मग कल्पनांना मुक्त भरारी करता येते...कसलेही बंधन रहात नाही ! आणि समोरच्याला त्यातले कळले नाही...की लगेच आपल्याला म्हणता येते....अरे ! तुझी कुवतच नाही रे बाबा हे समजून घेण्याची ! मंगेशकरांनी तेच 'क्रिएटिव्ह फ्रीडम' वापरले होते काय ? कवीने काही भावना मनात धरून कविता लिहिली होती...चित्रपट दिग्दर्शकाला गाणं हवं होतं...उडतं खेळतं...खट्याळ...गीतकाराने तेच ते स्वातंत्र्य वापरलं...आणि मग आम्हांला मिळालं...लवलव करी पातं...मोहक...दिलखेचक.

गेली किती वर्षं  मी हे गाणं ऐकते...कित्येकदा मी हे गाणं गुणगुणते...पण कधी कळलं नाही...हीच ती कविता...ज्यात कवीने माझ्या आत्म्याचे कोंडणे, त्याची ती घुसमट...त्याच्या शब्दांत किती चपखल पकडली होती !

मी अज्ञानी. गुरूवर आंधळे प्रेम करणारी.
मग माझ्या सर्वज्ञानी कानगुरूंनी असे का बरे केले असावे ?! काय खरेच हे त्यांचे 'क्रिएटिव्ह फ्रीडम' होते ? आणि मग ह्यावर आरती प्रभू काय म्हणाले असते ? त्यांचे प्राणपाखरू मुक्त झाले ते १९७६ साली. 'निवडुंग' चित्रपटाचे साल आहे १९८९.
हम्म्म्म...
अनंतात विलीन झाल्याकारणाने, तिथेच बसून आरती प्रभूंनी, दिग्दर्शकाच्या व संगीतकाराच्या व्यवहारिक गरजांना समजून उमजून, त्यांच्या 'क्रिएटिव्ह फ्रीडम'ला मनापासून दाद दिली असेल काय ?

आज आता इथे भूतलावर माझ्या हातात रहाते ती त्यांची कविता.
हे इतक्या वर्षांचे उडत्या चालीचे कोंदण, जे त्या कवितेला घट्ट पकडून बसले आहे...ते आता मी कसे दूर करू ?
ती काय कर्णाची कवचकुंडले थोडीच...घेतले धारदार शस्त्र हातात आणि कापून वेगळी केली ?

चवचव गेली सारी...जोर नाही वाऱ्याला...
सुटं - सुटं झालं मन...धरू कसं पाऱ्याला.

43 comments:

K P said...

तुमची अगदी तळमळीने लिहिलेली पोस्ट वाचली. लिहिणा-याने एका अर्थाने लिहावे आणि संबंधितांनी (!)त्याचा निराळाच अर्थ काढावा हा दैवदुर्विलास आहे. जगण्यातही हेच आहे. आपण एका दृष्टिकोनातून जगतो आणि बाकीचे लोक भलते अर्थ लावत बसतात.

Alka Vibhas said...

अनघा.. नेहमी प्रमाणेच विचार करायला लावणारे लिखाण.
अनेक वेळा अर्थ, संदर्भ इ. देण्यात यावा अशी मागणी होऊन सुद्धा ’आठवणीतली गाणी’ वर हे काही नाही.

तू मांडलेल्या दोन्ही बाजूंचा विचार करताना मला कवी-गीतकार-संगीतकार असलेल्या श्री. सुधीरजी मोघे यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सांगितलेले दोन संदर्भ आठवले.

’आला आला वारा, संगे पावसाच्या धारा.. पाठवणी करा सया निघाल्या सासुरा’ हे त्यांचे गीत ’हा खेळ सावल्यांचा’ ह्या चित्रपटात भाताची पेरणी करणाऱ्या स्त्रीयांवर चित्रीत करण्यात आले आहे. पण सासुरा निघालेल्या सया मात्र (सुधीरजींनी सांगितल्या प्रमाणे) ती भाताची रोपं आहेत. कारण भाताची रोपं पण एका ठिकाणी उगवून, वाढवली मात्र वेगळ्या ठिकाणी जातात. म्हणजे निर्मितीच्या वेळचा गर्भितार्थ खुद्द कवीनेच सांगावा.

जेव्हा interpretation किंवा perception ची वेळ येते, तेव्हा (शब्दश:) एकाच गीताला कसा वेगळा अर्थ देता येतो असा प्रयोग सुधीरजींनी आपल्याच एका गीताला संगीत देताना केला आहे. ’भेटशील केव्हा माझिया जिवलगा’ हे त्यांचे ’अधांतरी’ या मालिकेतील गीत त्यात दोनदा वापरले आहे. एकदा ते एका प्रेयसीचे प्रेमगीत आहे तर एकदा ते मृत्यूश्य्येवर असलेल्या व्यक्तीरेखेने केलेली परमेश्वराची आळवणी. हे करताना त्यांनी स्त्री आणि पुरुष आवाजाचा पोत लक्षात घेऊन केवळ चालीत केलेल्या थोड्याशा बदलाने शक्य केले आहे.
(http://www.aathavanitli-gani.com/Song/Bhetashil_Kevha_Majhiya)

आरती प्रभूंच्या ’लवलव करी पात’ ह्या गाण्याला चाल देताना असाच काही प्रयोग हृदयनाथांनी केला असणे शक्य आहे.
गाण्याचे चित्रीकरण हा हृदयनाथांचा विषय नाही. कारण गीताचे शब्द, चाल आणि त्याचे चित्रीकरण यात कसा ताळमेळ नसतो आणि तसे होण्याचे दु:ख काय असते हे काही गीत आणि संगीतकारांकडून मी ऐकले आहे.

थोडक्यात काय, तू हृदयनाथांना गुरू मानणं continue करू शकतेस. :)

Anagha said...

:) ह्म्म्म म्हणजे अलका, तेच ना गं ते आमचं क्रिएटिव्ह फ्रीडम... !?
ह्या बाबतीत मात्र मला ते जरा जास्तीच वाहवल्यासारखं वाटतंय ! ती कविता कवीने ज्या अर्थाने लिहिलेय ना ते समजलं की काही एक वेगळीच अनुभूती येते...ती कविता असामान्य वाटू लागते...नाही ?

Anagha said...

केदार, जो तो ज्याच्या त्याच्या सोयीचा अर्थ काढतो असे म्हटले तर अधिक योग्य होईल काय ?
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद हं. :)

हेरंब said...

माझ्या ड्राफ्टमधे पडून राहिलेली ही एक पोस्ट आहे :) .. पण दुसरी बाजू मांडणारी... असो ते नंतर कधीतरी.

कसं आहे की (माझ्या मते) प्रत्येक कवितेचे नक्कीच एकापेक्षा अधिक अर्थ काढता येतात. आणि हे अर्थ काढणं रसिकांच्या/प्रेक्षकांच्या/वाचकांच्या चोखंदळपणावर अवलंबून असतं.

विथ ड्यू रिस्पेक्ट, ज्या ग्रेस यांनी मंगेशकरांना चुकीच्या अर्थाबद्दल दोष दिलाय त्यांच्याच प्रत्येक कवितेचे एकमेकांपासून सर्वस्वी भिन्न असे कितीतरी अर्थ काढतात वाचक. थोडक्यात 'लव लव करी पातं' चा शब्दशः अर्थ घेतला तरी मला एक रसिक या नात्याने तेवढाच आनंद मिळतो तर मग अमुक एकच अर्थ घ्यावा हा अट्टाहास कशासाठी?

Anagha said...

:) तेही आहेच हेरंबा, आणि मला तसंही ग्रेस वा आरती प्रभू फार कळतात असे नाहीच. परंतु, असे बुद्धिमान हृदयनाथ मंगेशकरांच्या बाबतीत काही म्हणता येणार नाही. प्रत्येक कवितेतील अर्थ समजून उमजून तिला ते चाल व संगीत देतात अशी त्यांची ख्यातीच आहे. व मी खरोखर गाणं व त्यातील कविता ही कशी ऐकावी हे त्यांचेच बोलणे ऐकून शिकले.
त्यामुळे एखाद्या प्रसंगासाठी जेव्हा उडत्या चालीचे गाणेच गरजेचे आहे, तेव्हां दुसरी एखादी कविता देखील निवडता आली असती. त्यासाठी ही इतका सुंदर व गर्भित अर्थ असलेली कविता निवडून त्याचे गाणे करावे..व त्यानंतर दिग्दर्शकाने त्याचे हे असे चित्रीकरण करावे...हे त्या कवितेसाठी फार अन्यायकारक वाटते...माझ्या मते. :)

हेरंब said...

हो बरोबर आहे.... पण केव्हा ? जेव्हा आपण त्या कवितेचा अर्थ "ती पूर्ण कविता ही प्राणपाखरूचे शरीरातून बाहेर पडण्याचे जे अखेरचे प्रयत्न आहेत...ते शेवटचे जे क्षण आहेत...ती जी धडपड आहे त्या क्षणांचे ते वर्णन आहे...!" असा गृहीत धरतो तेव्हाच. मी मुळातूनच कवीला अपेक्षित असलेला किंवा सुचित असलेला प्राथमिक अर्थ हा वर सांगितलेला नसून अन्य एखादा असेल असं म्हंटलं तर? असो.. फार कन्फ्युजिंग वाटत असेल माझं मत तर सोडून दे :)

Anagha said...

कान्फुझिंग नाही हेरंबा, पण जर एखाद्या कवीने एक कविता केली व तो मरून गेला...आणि त्याचा काहीतरी भलताच अर्थ काढून त्याचे सादरीकरण झाले...तर हे त्या कवितेसाठी व त्या कवीसाठी दु:खद नसेल काय ? कारण दुर्दैवाने तो जो अर्थ जगापुढे मांडला जाईल, तोच त्या कवितेचा अर्थ आहे असे आम जनता मानत राहील....आणि मग तो समजच रूढ होऊन बसेल.
उपमा असंख्य असू शकतात...त्या प्रतीके असतात...एखाद्या मुडात शिरून एखादी उपमा वापरली जाते व एखादी निर्मिती घडते. व त्यानंतर केवळ तो कवी आज, त्याचा त्याला अभिप्रेत असलेला अर्थ सांगण्यासाठी जिवंत नाही आणि म्हणून त्याचे हे असे विचित्रकरण केले गेले तर ते उचित आहे काय ?
थोडी अतिशयोक्ती वाटेल कदाचित परंतु, काय आपल्या सारख्या सामान्य माणसाला ज्ञानेश्वरी कळते ? ती ही विद्वान लोकं जे काही आपल्याला सांगतात तेच आपण वर्षानुवर्षे मानत जातो...नाही का ?
तसेच मग ह्या कवितेचे दुर्दैव नाही का ? केवळ तिला जन्म ज्याने दिला तो तिचं मन, तिचा अर्थ सांगायला जिवंत नसल्याकारणाने...जो काही अर्थ ज्याने कोणी आपल्याला सांगितला तोच खरा असे आपण इतकी वर्ष धरून चाललो...त्यातच आनंद मानत गेलो...
त्या कवितेसाठी ह्यापेक्षा अधिक दुर्दैव दुसरे कोणते ?

Deepak Parulekar said...

अम्म्म! कसं आहे. प्रत्येक कवी किंवा लेखक त्याच्या विचाराने किंवा कल्पकतेने एखाद्या गोष्टीचं किंवा प्रसंगाचं वर्णन करतो.
त्यात, आरती प्रभु, कवे ग्रेस, सुरेश भट, कुसुमाग्रज, यासगळ्यांची जातकूळीच वेगळी आहे.

सुरेश भटांची "मेंदीच्या पानावर" ही जी कविता आहे आणि ज्याला पं. ह्रद्यनाथांनी संगीत दिलं आहे ते लताबाईंच्या सुमधुर आवाजातलं गाणं आपण नेहमी ऐकतो. पण ही कविता नक्की कशावर आहे? ही जी कविता आहे ते नक्की कुणाचे अंतरंग उलगडते यावर बरीच एका कार्यक्रमात बरीच चर्चा झाली होती. कुणी म्हटलं की हे एका आईचे आपल्या मुलीसाठी शब्द आहेत, कुणी सांगितलं की ते नवीन लग्न झालेल्या एका नववधूचं गाणं आहे पण, जर तू प्रत्येक चरण वाचत गेलीस तर नीट उलगडा होत नाही.
तसंच, मध्यंतरी मला हे कळलं होतं की, "चाफा बोलेना" ही संत ज्ञानेश्वरंवर आधारीत कविता होती.
कवी ग्रेस यांच्या कविता तर काहीतरी वेगळ्याच आहेत ( तू म्हणशील आला अजुन एक ग्रेस प्रेमी ;) )
तर मुद्दा असा आहे "जे न देखे रवी ते देखे कवी" त्यांच्या कवितांचे अर्थ, संदर्भ हे सगळं फक्त त्यांनाच ठाउक. चित्रपटांच्या प्रसंगांना अनुसरुन जर एखाद्या कवीने एक कविता लिहिली तर ठीक आहे म्हणजे नक्की अर्थ तरी काढता येतो. पण आता तुझ्या त्या मित्राने जसं सांगितलं तसं जर "लवलव करी पातं या कवितेचा गर्भितार्थ जर दुसरा असेल तर त्या गाण्याला एका कवीच्या नजरेतुन काही अर्थ नाही, हां पण एक रसिक म्हणून आपण त्या संगित ऐकू शकतो. पण चवचव गेली सारी हे नंतर होतंच....

कोणत्याही कवितेचे आपण कसे ही अर्थ काढू शकतो, त्यात जर तू कवी ग्रेस यांचा "राजपूत्र आणि डार्लिंग" सारखा कविता संग्रह वाचशील तर पहिल्या ओळीचा अर्थ शेवटच्या ओळीपर्यंत लागत नाही... उदा.. ही एक कविता ऐक

तू माझी मैत्रीण होशील?
कधी होशील?
कुठे होशील?
काय देशील?
मनावरुन माझ्या फिरणार ना पीस?
नीर्गंध होईल माझी पाकळी, पाकळी?
वस्त्रे भिरकाउन तू होशील मोकळी??......

rajiv said...

कवीला अभिप्रेत असलेला अर्थ जर तो त्यातून वाचकाला पोचवू शकत नसेल तर ते त्या कवीचे व कवितेचे पण failuer आहे

Anagha said...

दीपक, ह्या कवितेच्या बाबतीत आपण असंही म्हणू शकत नाही की हृदयनाथ मंगेशकरांना त्या कवितेचा अर्थच कळला नव्हता. बरोबर ?
आता त्यापुढे जाऊन आपण बघू...
...दिग्दर्शक व हृदयनाथ मंगेशकर ह्यांची एक चर्चा झाली असेल..त्याने एखादा प्रसंग ह्यांना सांगितला असेल..."हा असा असा प्रसंग आहे..त्यावेळी मला असा असा मूड पकडायचा आहे...व त्यासाठी मला एखादे अशा अशा प्रकारचे गीत हवे आहे....तुम्ही असे एखादे गाणे रचाल काय ?"
"ठीक आहे...देतो..."
मग मंगेशकरांना ही अशी खोल गर्भित असा अर्थ असलेली कविताच का बरे घ्यावीशी वाटली ? ज्यामुळे त्या कवितेचा अर्थच पूर्ण बदलून गेला...व आम जनतेला ते गाणे त्या कवितेचा अतिशय चुकीचा अर्थ देऊन गेले...आणि आता दुर्दैवाने तोच अर्थ कायम रहाणार आहे...नाही का ? कोणाला कळणार आहे ती जन्मली त्यावेळी त्या बिचाऱ्या कवितेच्या मनात खरे काय होते ?!

Deepak Parulekar said...

अम्म ! तेच म्हणतोय की त्यांना अर्थ कळला नसेल हे शक्य नाही होणार. बरं जर चित्रपटातला प्रसंग बघितला तर अर्चना त्या डिरेक्टरच्या नाटक कंपनीला सोडून त्या नायकाबरोबर पळून त्याच्या गावी येते असा तो प्रसंग आहे. तसं पाहिलं तर ती कविता त्या प्रसंगाला अनुरुप आहे. मग मला वाटतं की ग्रेस यांचा आक्षेप त्या कवितेच्या चालीला असावा कारणं थोडंसं उडत्या प्रकारचं गाणं आहे ते नाही?

अपर्णा said...

अनघा, आपल्याला नक्की काय वाटत हे मांडण्याची ताकत तुझ्या शब्दात आहे म्हणून ही पोस्ट मला त्यासाठी खूप आवडली...आणि हो ग..चवचव गेली सारी हे माझही झालच...
तुला आणखी उदा द्यायचं तर "स्वरगंगेच्या काठावरती"च माहित असेल न तुला...ते गाणं मुल झाल्याची बातमी आल्याबद्दल अतिशय आनंदाने लिहिलं आहे पण चालीमध्ये तशी आर्तताच आहे न....असो..बाकी खर तर मला वाटतं म्हणून मी कधी कधी फक्त गाणी ऐकते ते बर असतं...मला कवितेतलं खरच काही कळत नाही.....
आणि अग अलकाताई प्रत्यक्ष ती साईट चालवतात हे लिहिलस न ते फार बर केलं ग...मला तो उपक्रम खूप आवडला आहे.....इथे एका ग्रुपमध्ये मी ती साईट एकदा फॉरवर्ड केली होती तर सगळ्याना (विशेष करून त्यातील ज्येष्टाना) खूप आवडली होती.....
छान पोस्ट....आभार्स...

Anagha said...

मला वाटतं दीपक, प्रथम त्या चालीला व त्यानंतर सादरीकरणाला....नाही का ?

Deepak Parulekar said...

हो ! अगदी! पण जसं अलका बोललीय की , गाण्याचे चित्रीकरण हा हृदयनाथांचा विषय नाही. हे सुद्धा बरोबर आहे. कारण दिग्दर्शकाला दाखवायंच होतं की नायिका एका पिंजर्‍यातुन सुटून, मुक्त होउन, आनंदाने ती गातेय. त्याला अनुसरुन ह्रदयनाथांनी ते गाणं संगीतबद्ध केलं.
हे फक्त आपले अदमास बरं ! . खरं काय खोटं काय ते त्यांचं त्यालाच माहीत. ;)

Sakhi said...

पोस्ट सुंदर अन त्या मागच्या भावना अन तळमळ हि तितकीच भावणारी ...

अन कविताबद्दल बोलायचे तर "लव लव करी पातं" बद्दल हा अर्थ मला हि नव्याने कळला... पण धक्का नाही बसला...

अलका, हेरंब अन दीपक यांनी सांगितल्याप्रमाणे.. एकाच कवितेचे वेगवेगळे अन एकमेकांशी संपूर्णत: विभिन्न (विसंगत नव्हे) असे अर्थ असू शकतात..अन ते नक्की कोणत्या उर्मी ने अन कोणत्या परिस्थितीत लिहिलेय हे फक्त कवीला ठाऊक असणे शक्य असावे... कधी चर्चेतून कधी कोणत्या कार्यक्रमातून उलगडले तर ऐकणाऱ्याला नित्य नवीन काही हाती लागावे असे...
त्यातून दीपक म्हणाला तसे,, आरती प्रभू , ग्रेस अशी काही दिग्गज मंडळी आहेत ..कि ते जे काम करून गेलेयत ते आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर कदाचित नव्या रुपात नव्या ढंगात भावतील... अन हे भावणे, पुन्हा ज्याच्या त्याच्या वकुबाने, अनुभवाने, अन त्या शब्दांच्या अचानक होणाऱ्या स्पर्शाने उजळून निघाल्यासारखे... स्वताच..स्वताचे...

राहिला प्रश्न .. या गाण्याचा "हा" अर्थ लपून राहण्याचा अन त्या बद्दल वाईट वाटण्याचा ... तर मला असे वाटते की तो नाही लपून राहत... काही मैफिलीतून,.. काही गप्पा ..काही ब्लॉग (:P) मधून तो असाच येतो जातो भेटायला... अन दर क्षणी नवीन काही गवसल्याचा भास देऊन जातो...

अन असे संवेदनशील मन आज आहे न पुढे हि मराठी मुलुखात राहील.... तोवर अशी बरीच गाणी/ कविता भेटत राहतील नित्य नवीन रुपात... (असे मला वाटते... :)

Anagha said...

सखी, 'एकाच कवितेचे वेगवेगळे अन एकमेकांशी संपूर्णत: विभिन्न (विसंगत नव्हे) असे अर्थ असू शकतात..अन ते नक्की कोणत्या उर्मीने अन कोणत्या परिस्थितीत लिहिलेय हे फक्त कवीला ठाऊक असणे शक्य असावे... कधी चर्चेतून कधी कोणत्या कार्यक्रमातून उलगडले तर ऐकणाऱ्याला नित्य नवीन काही हाती लागावे असे..' हे अगदी बरोबर. व त्यातच त्या काव्याचे सौंदर्य दडलेले आहे. मी एखादे चित्र बघत असेन त्यावेळी जर दरवेळी ते चित्र मला एकच गोष्ट सांगू लागले तर काळाच्या परीक्षेत ते खरे उतरू नाही शकणार. मोनालिसाचा नक्की अर्थ काय हे अजून कोणालाही कळलेले नाही. रोज त्यातून नवनवे अर्थ निघातायत. अगदी मोनालिसा हा खरं तर पुरुष होता हे देखील मी हल्लीच कधीतरी वाचलंय !
परंतु, कवितेच्या बाबतीत मात्र मूळ अर्थाचा पत्ताच नाही व तिचं वेगळ्याच रुपात आपल्या समोर आणलं जाणं हे त्या कवितेसाठी विचित्र वाटतं. इथे ते गाणं हेच मुळात आपल्यापुढे आणलं गेलेलं त्या कवितेचं रूप आहे.
'रोज नवेनवे अर्थ लागणे' व 'मूळ अर्थच न समजणे व भलताच अर्थ आपण तोच बरोबर आहे असे धरून चालणे' हे थोडे गडबडीचे वाटते. नाही ?

Anagha said...

फलटणकर, काल तुमच्याशी ह्या विषयावर ज्यावेळी बोलणं झालं त्यावेळी तुम्ही मला हत्ती व आंधळ्यांच्या गोष्टीची आठवण करून दिलीत. त्याक्षणी नाही परंतु, त्यावर विचार करता मला एक गोष्ट ध्यानात आली. बरोब्बर हेच चुकलंय ह्या गाण्याच्या बाबतीत. तिच्यात खरं तर 'हत्तीची' शक्ती आहे व माझे मात्र डोळे झाकले गेले व मला फार थोड्या गोष्टींची जाण करून दिली गेली. व मी आंधळ्याच्या विश्वासाने हा 'तेव्हढाच अर्थ' असे मानत आले. माझ्या गुरूवरील आंधळ्या विश्वासाने हे असं झालं असं म्हणता येईल खरं तर.
कवीने एखाद्या चित्रपटासाठी, प्रसंगाला अनुसरून गाणे लिहिणे वेगळे ( जे माननीय गुलजार देखील कित्येक वेळा करतात आणि ते ज्या सुंदरतेने व सहजतेने ते करतात की आपण चाट पडावं ) व एखादी तयार कविता हातात घेऊन आपल्याला हव्या त्या प्रसंगासाठी संगीताच्या माध्यमातून त्याचा अर्थ फिरवून घेणे वेगळे.
नाही का ?

Shriraj said...

अनघा, १००% सहमत, तू म्हणतेस म्हणून नव्हे, पण खरंच पटलं म्हणून. गाण्याचा मूळ अर्थ समजून न घेता, हे काहीतरी भलतेच वाटते.

असो. ह्या निमित्ताने मी किती अज्ञानी आहे याची ही नव्याने जाणीव झाली मला. मी कितीवेळा हे गाणं टीव्ही वर बघितलं असेल, पण त्या कवितेचा अर्थ मी कधीच समजून घेतला नाही. म्हणजे एवढे दिवस ते गाणं मी फक्त बघत होतो :)

Anagha said...

दीपक, 'चित्रपटातला प्रसंग बघितला तर अर्चना त्या डिरेक्टरच्या नाटक कंपनीला सोडून त्या नायकाबरोबर पळून त्याच्या गावी येते असा तो प्रसंग आहे. तसं पाहिलं तर ती कविता त्या प्रसंगाला अनुरुप आहे.' ....मी थोडा विचार केला तुझ्या ह्या बोलण्यावर. आणि लक्षात आलं ते हे असं...'कवितेच्या अर्थात आहे आत्म्याची घुसमट...नाशवंत शरीराबाहेर पडण्याची धडपड. आणि तो प्रसंग आहे तो बरोब्बर विरुद्ध भावनेविषयी...मुक्ततेविषयी...अर्चना नाटक कंपनीला सोडून नायकाबरोबर पळून त्याच्या गावी आली आहे व त्यामुळे तिच्या आत्म्याला अतिशय मुक्त वाटत आहे...बरोबर ? मग जर त्या प्रसंगाची गरजच मुळात पूर्ण मुक्ततेची आहे आणि ह्या कवितेचा गर्भित अर्थ हा मुळात 'घुसमट' आहे तर माझी क्षीण बुद्धी मला सांगतेय की त्या कवितेची त्या प्रसंगासाठीची निवडच मुळात चुकीची आहे. कारण त्या कवितेत घुसमट आहे आणि व प्रसंग मुक्ततेविषयी सांगू इच्छित आहे...
...बघ मित्रा विचार करून. कदाचित पटेल तुला.

Anagha said...

अपर्णा, आधी हे माझे आभार मागणं थांबव पाहू ! मैत्रीत कधी आभार मानतात का ?? :) :)

आणि अगं अलका हे सगळं एकहाती करते गं बाई ! कसं सगळं करते ते तिचं तिलाच माहित ! :)

माझ्या मित्राने मला हेही सांगितलं की...'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी..अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी...ही कविता म्हणे पत्नीच्या गर्भापातानंतरचे तीव्र दु:ख, वेदना व्यक्त करताना लिहिली गेली आहे !! असो...! :) :)

Anagha said...

असंही आहे ना श्रीराज, की ही सगळी मोठी माणसं...आपल्याला जे सांगतात त्यांवर आपण विश्वास टाकतो...आपण स्वत:हून कधी तपासून बघत नाही...आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही...आंधळा विश्वास...हे आपलं चूकच. :)

Gouri said...

मला ग्रेस, आरती प्रभू समजत नाहेत, आणि हृदयनाथही. त्यामुळे आनंद आहे :)
हे गाणं ऐकायला छान वाटतं एवढं खरं. तसेच हृदयनाथ मंगेशकरांनी चाल दिलेले ज्ञानदेवांचे अभंगही. आणि खरं सांगायचं, तर त्यांचा अर्थ अजिबात उलगडत नाही. त्यामुळे समजते आणि आवडाते ती माझी लाडकी कविता, आणि कानाला गोड लागतं ते आवडतं गाणं असा सोप्पा हिशोब आहे! :D :D

Gouri said...

यावरून आठवलं, तांब्यांची ‘नववधू’ मृत्यूला उद्देशून आहे म्हणे!

Anagha said...

अगदी अगदी...गौरे, मला वाटतं असं इतकं सोप्प गणितच आपण ठेवावं...
पण मग ज्यांनी आपल्याला कवितेतील अर्थ बघून गाणी एन्जॉय करायला सांगितले त्यांनी हे असं वेगळंच का बरं करावं ? :) :)

Prof. Narendra Vichare said...

अनघा,
"आरती प्रभू" उर्फ चिं. त्र्य. खानोलकर साहेब म्हणजे अनाकलनीय असे एक गूढ रसायनच होते. कोकणातील लाव्हा रसा पासून बनलेल्या कातळाच्या डोंगर माथ्यावर आघात केल्यावर त्या डोंगराच्या गर्भातून घुमणाऱ्या गर्भित आवाजा सारखे काहीसे गूढ मला ते वाटायचे...... आरती प्रभू पूर्वी आपल्या जेजे कॉलेज मध्ये यायचे. फाईन आर्ट मध्ये कै. संभाजी कदम सर, कै. प्रल्हाद धोंड सर तसेच आपल्या अप्लाईड आर्ट मध्ये कै. दामू केंकरे सर, कै. रमाकांत देशपांडे सर (कै. पु. ल. देशपांडे साहेबांचे सख्खे बंधू) यांच्याशी साहित्य, नाटक आणि चित्रकला यावर तासंतास गप्पा मारीत बसत असे आमचे शिक्षक सांगायचे.. त्यांच्या "आरती प्रभू" या टोपण नावाचे बारसे कसे झाले याचा किस्सा मी "मायबोली" या संकेत स्थळावर वाचला.. तो असा....
चिं. त्र्य. खानोलकर
चिं. त्र्यं. खानोलकर तथा आरती प्रभूंचा कवी म्हणून जन्म झाला तो त्यांच्या खानावळीत येणार्‍या दोन गिर्‍हाईकांच्या कुतूहलातून! नेहमी गल्ल्यावर बसणारा हा तरुण रोज कागदावर काय खरडतो, हे पाहावं म्हणून ते एकदा युक्ती करतात. पैसे देताना खानोलकरांच्या नकळत त्यांचे कागद ते लंपास करतात. घरी जाऊन पाहतात तर कागदावर उभ्या पद्धतीनं लिहिलेला मजकूर! म्हणजे नक्कीच कविता असाणार! ते त्या 'सत्यकथे'कडे पाठवतात. परंतु त्या साभार परत येतात. पोरीबाळींच्या नावावर पाठवल्यास त्या छापून येतील म्हणून खानोलकरांच्या 'प्रभू-खानोलकर' या नावातील 'प्रभू' घेऊन आधुनिक मुलीचं नाव म्हणून त्यापुढे 'आरती' हे नाव त्यांची जोडलं व त्याच कविता पुन्हा पाठवल्या. त्या श्री. पु. भागवतांच्या हाती पडल्या. या कवितांतील विलक्षण गूढ प्रतिमासृष्टीनं ते चकित झाले आणि पुढे त्यांनी खानोलकरांचं सर्व साहित्य 'सत्यकथा'तून प्रसिद्ध केलं. मात्र या अनपेक्षित प्रसिद्धीच्या झोतानं खानोलकर गुदमरुन गेले आणि त्यांनी कविता लिहिली -

'ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना...
फुले माझी अळुमाळू
वारा पाहे चुरगळू..'

Anagha said...

बापरे सर ! किती सुंदर माहिती सांगितलीत ! मला नव्हतं हे माहित ! आज दिवसाभर मी अधूनमधून आरती प्रभूंच्याच कविता उघडत होते आणि पुन्हापुन्हां वाचत होते...हा जो तुम्हीं अर्थ सांगितलात तो किती सुंदर आहे सर !!! आणि ते आपल्या कॉलेजमध्ये यायचे हे वाचून तर मला एकदम मस्तच वाटलंय ! लई भारी !!! :) :)

Prof. Narendra Vichare said...

अनघा,
"या" थोर मंडळींच्या पदस्पर्शाने आपल्या कॉलेजच्या कंपाउंड मधल्या मातीचे सोने झाले होते.... त्याच सोन्याच्या मातीचे आता काही लोक शेण करताना पाहून " हेची काय फल मम तपाला .." असे, ही थोर मंडळी तिकडे स्वर्गात म्हणत असतील...

Prof. Sumedha said...

पोस्ट अतिशय सुंदर आहे आणि त्यावरची मोकळी चर्चा देखील खूप आवडली. अशी कवितेच्या रसग्रहणाबाबतची सविस्तर चर्चा वाचणं हा ही एक छान अनुभव आहे कविता समजण्यासारखा ...कविता आपली वाटण्यासारखा !

BinaryBandya™ said...

सुंदर चर्चा आणि सुंदर लेख ..
ह्या चर्चेत भाग घेण्याएवढी पत नाहीये :(

भानस said...

अनघे एखादे गाणे, सिनेमा, नाटक आपल्याला अतिशय प्रिय असते... कधी त्याच्या शब्दांमुळे, कधी सुरावटीमुळे तर कधी कशावर चित्रित केले गेलेय त्यामुळे... पण ही झाली आपली बाजू. कारण आपल्याला त्याच्या जन्माची प्रक्रिया माहीत नसते. त्यामुळे ते ज्या कारणाने आपल्याला भावलेय त्याला खरी हकिकत कळली की धक्का बसतो. धक्का अश्याकरता की कवीची भावना किती वेगळी... अलवार/कातर/कंठ गुदमरवणारी होती आणि आपण काय समजत राहीलो. चूक आपली नसली तरी सत्य कळले की फार जीवाला लागते. चुथडा झाल्याचे दु:ख दरवेळी टोचते. :(:(

अलकाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. माझी अतिशय आवडती साईट आहे. आभार !

आणि बयो तुझी तळमळ पोचली गं. कधीतरी आपण आरती प्रभूंच्यां कवितांविषयी आपल्या क्षुद्र वकुबानुसार बोलूयात गं.फार आवडेल मला.

Anagha said...

:) सुमेधा, धन्यवाद गं.

Anagha said...

बंड्या, उगाच काहीही हा ! :)

Anagha said...

पटतंय ना गं श्री तुला ? कवीने काय भावनेतून ती कविता लिहिली त्याचा आपल्याला पत्ताच नाही हे किती वाईट आहे ! म्हणजे एका अतिशय नाजूक कवितेचा मृत्यूच तो !

किती काय करायचं राहूनच जातंय ! हो ना ?! :(
:)

vaishali said...

comments पण किती मोठ्या मोठ्या बाप रे, गाण ऐकण्याच्या बाबतीत मी पण Gouri च्या categoty त येते, so Gouri chya comments la +1

Anagha said...

वैशाली. :)
आभार प्रतिक्रियेबद्दल.

श्रिया (मोनिका रेगे) said...

सुंदर पोस्ट....आणि अभिप्राय आणि ह्या पोस्ट वरील चर्चा.....
कवीच्या मनात किती काय चालले असू शकते जेव्हां एखादा अप्रतीम कवितेचा जन्म होतो,,,,ह्या कवितेला गीताचे स्वरूप संगीतकार देतात,आणि मग हे गीत ऐकणारे ऐकून गुणगुणतात....ऐकणारे रसिक काही फक्त चालीचे सौंदर्य आणि गीताचा,सोपेपणा,कानावर येताना वाटणारा आनंद अनुभवत राहतात....मी देखील हे गीत असेच ऐकत आले.....आज त्यापाठी कवितेचा खरा अर्थ,अनघा तुझ्या ह्या पोस्टमुळे हि माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद!मला इतकच वाटते कि कवितेच्या अर्थाला अनुसरून चित्रीकरण होणे आवश्यक आहे,अगदीच विसंगती पण असू नये......
'लव लव करी पाते'हे गीत आज पण मला तितकेच आवडते,जरी ह्या कवितेबद्दल योग्य माहिती आज मला मिळाली तरीही पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी दिलेली चाल इतके दिवस गुणगुणत आले आहे,ऐकत आले आणि ह्या चित्रपटातील गीते आवडली नेहमीच.

Guru Thakur said...

अगदी खरंच आहे हे..लोकां सांगे ब्रम्हज्ञान.तशी सिनेमाच्या गरजे नुसार त्यानी सोय पाहिली म्हणा.पण प्रश्न एकच.सारेगमपच्या खुर्चीत बसून या लोकांना काव्याला न्याय देण्याची कुवत नाही,एकजात बेअक्कल आहेत सारे असं म्हणत सगळ्या संगीतकारांना झोडण्याचा मंगेशकरांना यांना काय अधिकार????

Anagha said...

अगदी खरंय मोनिका. मलाही त्या चित्रपटातील गाणी प्रचंड आवडतात...खास करून 'तू तेंव्हा तशी' !

काही माणसांकडून आपण काही वेगळेच अपेक्षितो. आणि बहुतेक वेळा तरी, ते सामान्य जनतेला त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल जे सांगतात, जनतेला काही शिकवू पहातात व त्यांच्या ज्ञानात भर घालू पहातात; त्यावेळी आपल्या मनात त्यांच्याविषयी एक प्रतिमा निर्माण होते. व त्या प्रतिमेला कधीही तडा जाऊ नये अशी एक गरीब आशा आपण उगाच मनी बाळगू लागतो.
माझा भ्रमनिरास झाला इतकेच. :)

तुझ्या प्रतिक्रियेबद्दल तुझे आभार. :)

Anagha said...

गुरू, एक कवी म्हणून त्यातील त्या सुंदर कवितेची फरफट तुला अधिकच जाणवली असेल. मला तर हा त्या कवितेचा मृत्यूच वाटला आणि इतकी वर्षे मी अज्ञानाने त्यात किती आनंद घेत होते ! भयंकर !

मीही कमर्शियल चित्रकार आहे...माझी जी काही थोडी फार कला असेल ती पैशांना विकलेलीच आहे. परंतु, त्यामागे कसलेही मी सोंग केलेलं नाही ! कुठलाही आव आणलेला नाही !

Raindrop said...

Just read this post. I don't know how I missed it. I feel when you write for a medium or public, you are letting it out in the world to be interpreted by the people in their own way. Anybody can interpret anything in the way that they feel touches them the most. Like 'Nastes Ghari tu jenvha' can be interpreted by different people who are going through different phases.

Creativity when produced for self has the liberty of saying 'please interpret it in this way only' but when you make something and sell it to someone else, the other person has complete rights to depict it as they want it.

Anagha said...

वंदू, तू काय आणि मी काय आपण नगण्य व्यक्तिमत्त्वे आहोत ज्यावेळी आपण 'आरती प्रभू, कवी ग्रेस, आणि पं हृदयनाथ मंगेशकर ह्या विद्वान व्यक्तींबद्दल बोलतो.
आता इथे तू 'creative freedom' ह्याबद्दल बोलत आहेस. बरोबर ? मी म्हणेन तुझा मुद्दा हा अगदी बरोबर आहे. फक्त :
१) येथील जेष्ठ संगीतकार यांचा दावा आहे की ते नेहेमीच प्रत्येक कवितेचा अर्थ समजून घेतात व त्यानंतरच तिला चाल लावून ती कविता सामान्य लोकांपर्यंत पोचवतात.
२) परंतु, 'लवलव करी पातं' ह्या कवितेचा अर्थ आत्म्याची शरीरातील घुसमट असा आहे...व त्याची चाल व त्याचे चित्रीकरण हे 'आत्म्याचे मुक्त झाल्याकारणाने झालेला आनंद' ह्यावर बेतलेली आहे. दोन्ही गोष्टी ह्या परस्पर पूरक नसून विरोधी आहेत. मग येथील जेष्ठ संगीतकारांचा दावा व कृती ह्यांमध्ये गफलत नाही काय
३) माझे दु:ख त्या अप्रतिम कवितेबद्दलचे आहे, जी माझ्यापुढे काही वेगळ्याच अर्थाने सादर केली गेली व त्यामुळे मी तोच त्या कवितेचा अर्थ असे समजून गेले.
४) ज्याने मला एखादे गाणे कसे ऐकावे हे शिकवले ते संगीतकार, हे नेहेमी असेच विचारपूर्वक चाली देतात हे मी गृहीत धरले.
५) येथे 'creative freedom' च्या नावाखाली मूळ कविता कधीही सामान्य श्रोत्यांपर्यंत न पोचून, वेगळेच काही त्यांतून व्यक्त केले गेले हे त्या कवितेचे मरण नव्हे काय ? आणि ते मरण मुळातच पं. मंगेशकरांनी, त्यांची जी प्रतिमा आमच्यापुढे इतक्या वर्षांत उभी केली त्यामुळे हे झाले नाही काय ?

अर्थात हे माझे अतिसामान्य मत आहे हे सर्वात प्रथम गृहीत धरले पाहिजे. आणि जरी हे गाणे सामान्य श्रोत्यांसाठी बनवले गेले असले तरीही त्यांच्या मताला येथे कस्पटासमान मान आहे हेही तितकेच खरे. म्हणजेच मला काहीही अक्कल नाही हे मला चांगलेच माहित आहे. :)

शंतनु said...

अतिशय सुंदर! ही माहिती मला नवीन होती. याचप्रमाणे 'तरुण आहे रात्र अजुनी' आणि 'मेंदीच्या पानावर' या गाण्यांबद्दल पण माझा समज काही वेगळाच होता.