नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 27 December 2011

मिजास...?

मी जन्माला आले तेव्हां मला दोन पाय होते. मग त्या पायांना डोकं फुटलं, आणि सायकलीचे वेध लागले. धावत्या रस्त्यांवर बिनबोभाट सायकल पळवता येऊ लागली. वा वा वा...म्हणजे अगदी कानात वारं...डोक्यात वारं. त्याच त्या डोक्यात शिरलेल्या वाऱ्याने एक दिवस इस्पितळात पोचवलं ते अगदी कॉलर बोनला चीर पाडूनच. डोंबिवलीत. इतिहासातून धडे घेतले तर तो माणूस कसला ? सायकलची हौस फिटली. खिशात पैसे आतबाहेर करू लागले आणि मग स्कूटर...दुचाकी विकत घेतली. मग एकदा तिने इस्पितळात पोचवलं ! आता हा अपघात नक्की का आणि कसा झाला ह्याचे कारण पडद्याआड राहिले आहे. आणि हा पडदा उघडण्याची सूतराम शक्यता नाही. का बरं ? कारण असं आहे की डोक्याला मार लागला व अपघाताचा तो क्षण विस्मृतीच्या भरभक्कम पडद्याआड गेला. तरीही चूक माझी होतीच. डोक्यावर हेल्मेट मी फक्त अडकवलं होतं. त्याचा पट्टा लावण्याची तसदी मी घेतली नव्हती. म्हणजे हवालदाराला वाटावं, बाईंनी नियमांना धरून शिरस्त्राण चढवलेलं आहे...पण माझ्या स्वत:च्या डोक्याला सरंक्षण शून्य. त्यामुळे चूक माझीच होती व कोणाही दुसऱ्या वाहनचालकाची नव्हती असे खात्रीपूर्वक म्हणता येईल.

कालचक्र अजून थोडं पुढे सरकलं. मुलगी शिकली प्रगती झाली...ह्यातील 'प्रगती' पैश्यात मोजावयाची म्हटली तर मी चारचाकी विकत घेतली. मग विकत घेतली तर काय झालं...माज आला का ? असा विचार येऊ शकतो...मनात...दुसऱ्याच्या...रस्त्यावर चालणाऱ्याच्या वा रस्त्यावर दुचाकी चालवणाऱ्याच्या. पण तसा काही माज आला नाही...कारण चार चाकीपर्यंतचा प्रवास मुळातच दोन पायांपासून केलेला आहे. आणि आमचे पूर्वज हे नेहेमीच देवाने दिलेल्या पायांवरच विसंबून रहात आलेले होते. आईबाबा कायम तरतर चालत रेल्वे स्थानकावर जात असत व मुंबईच्या जीवनरेषेत धक्काबुक्की करत प्रवेश मिळवत असत. त्यामुळे चार चाकी घेतली म्हणून डोक्यात हवा जाण्याचा तसा प्रश्र्न नव्हता. रस्त्यावरील नियम हे फक्त समोरच्यासाठीच बनवलेले आहेत व माझा त्या नियमांशी काडीमात्र संबंध नाही असे मला पायी चालताना देखील वाटले नाही व आता गाडी चालवताना देखील वाटत नाही. त्यामुळे झेब्राच्या अंगावरील पट्टे व लालहिरवा रंग ह्यांबद्दल माझ्या मनात भरपूर आदर आहे. व त्यामुळे त्यांचा मान राखणे हे माझ्या हातून आपोआप घडते. त्यांचा मान राखणे ह्यात माझी अब्रू जाते व माझा मान कमी होतो असे मला अजिबात वाटत नाही. कारण ह्याच रस्त्यांवर माझी वृद्ध आई पायी चालत असते व नियम तोडून भरधाव धावणाऱ्या वाहनांची तिला अतिशय भीती वाटते हे माझ्या कायम ध्यानी असते.

बरं मग ? त्याचं आता काय ? आम्हीं काय करू त्याचं...?

नमनाला घडाभर तेल.

परवा रात्रीचे आठ साडेआठ झाले होते. मी काही कामानिमित्त ऑफिसला जात होते. ऑफिसपाशी पोचतच आले होते...गाडी चालवत. नाक्यावर एक सिग्नल आहे. तो पाळला...पार केला. पुढे आलं की पुन्हा एक उजवे वळण आहे. त्या वळणासाठी देखील एक सिग्नल आहे...ज्यावेळी नाक्यावरील सिग्नल गाड्यांसाठी चालू होतो त्याचवेळी हे उजवे वळण देखील चालू होते. म्हणजे मग आपण ते वळण घेऊन माझ्या ऑफिसच्या इमारतीत शिरू शकतो. त्या दिवशी देखील तसेच झाले. मी धिम्या गतीत उजव्या बाजूला चाक वळवले. गाडीची चारही चाके त्या दिशेने वळली. समोरून दुचाकी येताना मला दिसत होती. धट्टाकट्टा कुटुंबप्रमुख दुचाकी चालवत होता. पुढे पाय कुशीत घेऊन घरातलं छोटं पिल्लू बापावर विसंबून बसलं होतं. व मागे पुरुषाची अर्धांगिनी पातळ नेसून भारतीय बायका जशा दुचाकीवर बसतात तशीच बसली होती. दोन्ही पाय एका बाजूला, नवऱ्याच्या कमरेला विळखा. विश्वासाचा. सिग्नल माझ्यासाठी हिरवा होता. त्यांच्यासाठी अर्थात लाल. मी पुढे आले. साहेब थांबले नाहीत. त्यांच्यासाठी आदर दर्शवून मी माझी चारचाकी थांबवावी असे त्यांचे स्पष्ट मत दिसत होते. त्या मताचा मी मान ठेवला नाही. मी दोन चाके अजून पुढे आले. आता साहेबांचा धीर सुटला. हॅण्डल वेडेवाकडे झाले. दुचाकी रस्त्यावर घसरली. कुटुंब खाली पडलं. साहेबांनी हॅण्डल तसं हातातून सोडलं नव्हतं. तेही त्याबरोबर थोडे घसरले. पिल्लू दुचाकीवरच बसून राहिलं. दुचाकी रस्त्यात आडवी. अर्धांगिनी मागच्या मागे भुईवर. साहेब जागचे उठले. तिरीमिरीत. उभे होते तिथूनच माझ्या अंगावर किंचाळले. "क्या मॅडम, दिखता नही क्या?" 
मी थांबले. काच खाली केली. 
"कोणाला दिसत नाहीये भाऊ ? सिग्नल माझ्यासाठी हिरवा होता. आणि तुमच्यासाठी लाल."
"मग काय झालं ?" आता रस्त्यावर गर्दी जमा होण्यास सुरुवात झालेली होती. दुचाकी उचलण्यासाठी साहेबांना मदत करत होती. पिल्लू उभं राहिलं होतं. त्याला रडू फुटलं होतं. बाई, खडबडून उभ्या रहात होत्या. पातळ सांभाळत.
"मग काही नाही...तुम्हांला तुमच्या बायकापोराच्या जीवाची पर्वा नाही...बेधडक सिग्नल तोडून तुम्हीं निघालात....मग मी कशासाठी थांबू...मी काही नियम तोडत नव्हते....नाही का ?" बाई झपाट्यात साहेबांजवळ पोचल्या. 
"तुमच्या पिल्लाच्या व अर्धांगिनीच्या जीवावर तुम्हीं उठलात की हो भाऊ...नाही का? आणि पोराला चांगलं शिकवताय की...सिग्नल पाळायचा नाही...उद्या देव करो काही वाईट न होवो...पण कधी काही झालंच...तर भाऊ जबाबदार कोण...? तुम्हीच नव्हं का ? सिग्नल न पाळायला तुम्हींच तर शिकवलंत त्याला...."
भाऊंची मी केसच घेतली. भाऊ गप्प झाले. माझी नजर त्या पिल्लावर लागली होती. मी गाडीतून नाही उतरले. साहेबांना चार गोष्टी शिकवण्याची गरज तर होती...पण त्या पिल्लाचा काय दोष होता ? बापावर विश्वास टाकला...ही काय त्याची चुकी होती ?
"पिल्लू घाबरलं की हो भाऊ तुमचं...सांभाळा जरा...वहिनींना आणि पोराला...तुमच्यावर विसंबून बिनधास्त बसतात की तुमच्या मागेपुढे !"

गाडी चालू केली मी...ऑफिसच्या दिशेने...
"अनघा, त्यांनी मरायचच ठरवलं असेल तर निदान आपल्या गाडीखाली येऊ नये एव्हढीच काळजी आपण घ्यायला हवी..." माझा मित्र मला म्हणाला. "आणि म्हणून आपण ब्रेक मारायचे."
"अरे, पण हे असं मुद्दाम पुढे यायचं...सिग्नल तोडून...! माझी गाडी ब्रेक मारून ऐन वेळी थांबवण्याची सक्ती त्याने माझ्यावर का बरे करावी ? आणि ते मी ऐकेनच हा असा विश्वास माझ्यावर का बरे त्याने टाकावा...? नाही थांबवत जा मी गाडी...तू सांभाळ ना यार...तुझा जीव...नाही का ? तुला नाही पडलीय तुझ्या स्वत:च्या जीवाची आणि तुझ्या बायकापोरांची तर मी कशाला काळजी करू...तुमची ?" चिडचिड. वैतागवैताग. "बिचारी ती त्याची बायको ! आणि बिचारं ते पोरगं !"
"हम्म्म्म"

माझे वाहन मला ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे माझा आहे. मी कधी दोन पायाने चालेन, तर कधी दुचाकी चालवेन वा कधी मी चार चाकी चालवेन. आगगाडी नक्की नाही चालवणार कारण ती चालवण्याचे मी शिक्षण घेतलेले नाही...व त्यामुळे त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स माझ्याकडे नाही.

मी एक नागरिक आहे.
व ज्यावेळी मी रस्त्यावर असते, मग मी गाडी चालवत असेन, वा मी चालत असेन...जे काही असेल त्या अवस्थेला काही नियम आहेत.
जसे पादचाऱ्यासाठी नियम तसेच वाहनचालकासाठी.
मी गाडी चालवत असेन तर झेब्रा पट्टे माझे नाहीत. झेबऱ्यावर मी स्वार होऊ शकत नाही.
नियमबाह्य काही वागायची माझी इच्छा नाही. सवय नाही. हे नियम हा माझ्या रक्ताचाच एक भाग आहेत.
लाल रंग ?
रक्ताळलेला. धोका.
हिरवा रंग ? निसर्गाचा. माझा.

मुद्दा क्रमांक २.
माझ्या जिवाची जबाबदारी कोणाची ?
माझी स्वत:ची की समोरच्या माणसाची ?
म्हणजे जरी शेवटी दोरी यमराजाच्या हातीच असली तरी मुद्दाम मी त्याच्या हाती ती का घुसडावी ?
समोरचा वाहनचालक नेहेमीच बेगुमान गाडी चालवत असतो का ?
की कधीतरी, तो नियमांना धरून चालवत असतो परंतु, मी मात्र माझ्या आयुष्याची जबाबदारी त्याच्या पायांवर टाकलेली असते ? त्याच्या ब्रेक दाबण्याच्या कौशल्यावर व त्याच्या मर्जीवर  ?
कारण काय तर...
ह्या दुनियेत माझ्यासाठी एकही नियम नाही !
मी माझ्या मर्जीचा बाप आहे...
आणि ही दुनिया माझ्या बापाची आहे...!

कधी आपण स्वत:चे आयुष्य स्वत: जपायला शिकणार ?
दुसरा चूक करतो व आपण नाहक मरतो...
पण नेहेमीच हे असंच घडतं असं काहीही नाही...
बरेचदा, आपण आपल्याच चुकीने इतिहासजमा होतो.

आणि अर्थात शेवटी, आयुष्याची कथा संपल्यावर, झाडाला लटकून अश्रू ढाळण्यात काय तथ्य ?

मला आता उगाच, मुंबई गोवा हमरस्त्यावरील वाहनविषयक पाट्या मी लिहितेय असं वाटू लागलंय...
'नियम माझ्यासाठी...नियम तुमच्यासाठी !'
'नियम खड्डयात...तर आपण ढगात...!'
वगैरे वगैरे...

18 comments:

rajiv said...

वाचाल..... तर वाचाल !!
:) :)

aativas said...

चांगली पोस्ट आहे पण नियम मोडणारे जे रस्ता वाचत नाहीत ते कुठले ब्लॉग वाचायला!

मागे एका चालकाशी गप्पा मारताना तो सहज म्हणाला होता की : रस्त्यावरच्या इतक्या सगळ्या सूचना मागे निवांत बसणा-यासाठी असतात. चालवणारा बोर्ड वाचत बसला तर अपघात होण्याची शक्यता जास्त.

त्याच मत प्रथमदर्शनी हास्यास्पद वाटल तरी त्यात थोड तथ्यही आहे. अतिरेक करून आपण अनेक गोष्टीचं गांभीर्य घालवतो असाही अनुभव आहे.

Anagha said...

राजीव, :) मला नेहेमी हे वचन बनवणाऱ्याचं कौतुक वाटत असतं...चांगलंच सुचलंय.
जसं...महाराष्ट्र टाइम्स...पत्र नव्हे मित्र...वसंत बापटांनी लिहिलं होतं हे.

Anagha said...

सविता, खरं आहे...चालक गाडी चालवताना नियम नाही वाचू शकत. परंतु, हे वाहतुकीचे नियम वाचूनच शिकावे लागतात का ? ते तर सरळ साधे आहेत...नाही ? लाल...पिवळा...हिरवा..

अतिरेक करून अनेक गोष्टींचं गांभीर्य आपण घालवतो हे बरोबर...परंतु, आपण सिग्नल तोडून आपल्या बायको पोराचा जीव फुका धोक्यात घातला हे तर ह्या प्रसंगी ढळढळीत दिसत होतं...आणि ते त्या चालकाला देखील जाणवलच होतं...ठेच लागून शहाणपण येऊ शकतं...नाही का ? निदान अशी आपण आशा करू शकतो. :)

आणि पुढे जाऊन असंही वाटतं..काहीच न करण्यापेक्षा थोडा अतिरेक केलेला बरा...आपल्या माणसांच्या डोक्यात अतिरेक बघूनच प्रकाश पडतो...बॉलीवूडचं बाळकडू घेतलंय आपण...नाही ? :) :)

Gouri said...

अनघा, समोरच्याला त्याच्या स्वतःच्या, त्याच्या बायकोच्या, मुलाच्या जिवाची पर्वा नाही हे खरंच. पण आपल्या गाडीखाली तो मेला, म्हणजे आपली चूक असो वा नसो आपल्याला मनस्ताप होणारच. हे विकतचं दुखणं कशाला? म्हणजे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण कुठे भांडायचं आणि कुठे सोडून द्यायचं हे आपल्याला ठरवावं लागतं ना?

Anagha said...

अगदी खरं गं बाई गौरे ! :)
फक्त असे आपण दिवसाला इतक्यावेळा रस्त्यावर आपला जीव दुसऱ्याच्या हातात देत असतो नं...की ते सगळेच बेजबाबदारीचे वाटते. म्हणजे "मला व माझ्या प्रिय कुटुंबाला तू जिवंत ठेवायलाच हवं...तुझी जबाबदारीच आहे ती...मी काय पण करेन...त्याच्याशी तुझा काय संबंध ?" असं काहीसं...
:)

Raindrop said...

rastyawar fakta ekach niyam disto aazkal....badi gadi ne jo kiya galat, chhoti gadi ko sympathy...at least Mumbai roads don't have "Tu jaanta nahi main kaun hoon" ani dhadkan pistool baaher yet...sad situation.

Anagha said...

वंदू, कळतंय मला...आपल्या राजधानीबद्दल बोलतेयस ना... ? किती दु:खद आहे हे ! मला हल्ली फार वाटत गं...एक प्रकारची नं निराशा शहरावर पसरलीय...आणि त्यातून, मग हे असे साधेसाधे नियम तोडण्यातून मिळणारे आसुरी आनंद नागरिक घेतायत...कळतंय का ग मी काय म्हणतेय ते ? :(

Raindrop said...

yes kaltay mala...ani he sagle asuri anand ghenare aple sarkhech sade sudi mansach....for all u know tyala zhala pan asel paschatap pan tenvha halla karayach aahe fakta tyala.

Shriraj said...

कालचे आपले संभाषण आणि परवाचा तुझा हा लेख यात काय साम्य आहे माहितेय... तुझ्या बोलण्यातून तुझी कळकळ जाणवते... अगदी स्पष्ट जाणवते

Anagha said...

कळकळ...खरंय श्रीराज...त्याचा काही उपयोग होतोय का ते मात्र नाही माहित. :(
:)

भोवरा said...

मनाचा ब्रेक ....उत्तम ब्रेक
मी गाडी चालवताना हे वाक्य नेहमी लक्षात ठेवतो. खास करून सिग्नल संपायला आले असताना मी कधीच गाडी रेमटवीत नाही कारण दुसऱ्या बाजूचे गाडीवाले अर्धा रस्ता ओलांडून पण आले असतात. दोन स्वताचे अपघात झाले आहेत ते सुधा अश्याच दुसरांच्या चुकीमुळे...
आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे

Anagha said...

भोवरा, खरंय...नियमांना धरून न वागण्याची वृत्ती फार फोफावत चालली आहे...आणि हे रस्त्यावर गाडी चालवताना अतिशय त्रासदायक ठरते. कधी कोण कुठून अकस्मात आपल्या पुढ्यात येईल आणि आपल्याला करकचून ब्रेक मारावा लागेल सांगता येत नाही !
प्रतिक्रियेबद्दल आभार. :)

अपर्णा said...

अनघा माझी आई म्हणते एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये....आणि मी म्हणेन वासरू मारू नकोस पण थोडी हूल दिलीस तर चालेल..फक्त वाहनाच्या बाबतीत हूल पण नेमकी द्यायची तर बॉलीवूदकडून ट्रेनिंग घ्यावं लागेल...

Anagha said...

अपर्णा, अगं मीही स्कूटर चालवलीय, त्यामुळे स्कूटर चालवताना डोकं कसं चालतं तेही माहितेय. पण कुठलाही नियम माझ्यासाठी नाही हे काय म्हणून ? आणि स्वत:च्या जीवाची जबाबदारी स्वत: घ्यावी. दुसऱ्यावर टाकू नये !
असो ! डोकं शांत ठेवून इथल्या रस्त्यांवर गाडी चालवणे ही एक शिक्षा आहे. :)

भानस said...

तू एकदम माझ्या नचिकेतच्या स्टाईलवर गेलीस की. माझा राईट असताना त्याने ठोकले तर तो त्याचा दोष.... मान्य. पण त्यात कोणाचा जीव गेला तर... कोणाला जन्माचे पंगूपण आले तर.... इतर कोणाला जाऊ दे गं पण तुलाच काही झाले तर... म्हणून बये इधर राईट और रॉंग नही देखनेका.... अपना पैर और दिमाख हमेशा ब्रेक पे रखनेका.... बाकी तू केलेस नं तसेच करायची जाम खुमखुमी मलाही येते मधून मधून... :):)

Anagha said...

मीही स्कूटर चालवलीय श्री. पण स्वत:ची जबाबदारी स्वत: घेऊन ! उगाच माझ्या आणि माझ्या लेकीच्या आयुष्याची जबाबदारी दुसऱ्या कोणावर ढकलून नाही. समोरचा ब्रेक दाबेल...ही गोष्ट आपण गृहीत धरूच कशी काय शकतो ? आणि प्रत्येकाला एव्हढं तरी कळायलाच हवं...नाही का ? :)

भानस said...

एवढं तरी कळायला हवंच नं.. नक्कीच गं ! पण कळतंय का कुणाला आणि ज्यांना कळतंय त्यांचं वळतंय का? मामाच्या देखत सिग्नल तोडून लोकं पसार होतात जणू लाल बत्ती नव्हतीच... तेच इथे बघ... स्टॉप साईन ला एकटीच गाडी येऊन थांबेल... तिनही बाजूंना एकही गाडी नसूनही ती थांबेल. मिनिटभराने पुढे सरकेल... शेवटी शिस्त ही अंगात असावी लागते गं... स्वत: पाळायला हवी हे मनात असायला लागतं.