आकाश खरं तर दुसऱ्या देशाचे होते. म्हटले तर परके. करडे. दाट. जसे दूर कुठेतरी कोणाचे मन दाटून आलेले असावे. बंद पापण्यांच्या काठाशी अश्रू वाट बघत असावेत. रस्ता रुंद. स्पेनमधील मायोरका बेटावरील एक रस्ता. आणि त्या रस्त्यावर, छत धरून ठेवणारे आकाश. कधीकधी कोसळणारे छत. फुटून ओसंडून वहाणारे छत. तसाच होता तो अनोळखी काळा रस्ता. आणि त्याचे ते करडे छत.
आम्हीं गाडीत बसलो होतो. बाहेर पडलो होतो स्पेनच्या त्या हलक्या थंडीत. मी, माझी बहिण, तिचा नवरा आणि माझ्या चिमुकल्या दोन भाच्या. वय वर्षे पाच आणि आठ. दोघी माझ्याबरोबर मागे बसल्या होत्या. बहिण आमची दिशादर्शक तर तिचा नवरा आमचा वाहक. आणि सोबत GPS वरील बाई. विश्वास न टाकता येण्यासारखी. ती काहीही बरळत असते...असे माझे आता स्पेनला जाऊन आल्यापासून ठाम मत बनले आहे. त्या बाईच्या नादाला लागून आम्ही कधी मायोरका बेटावर तर कधी फ्रान्सच्या जंगलात मिट्ट काळोखात भरकटलो. बहिणीच्या कर्तृत्वाच्या जोरावर आम्ही शेवटी मार्गाला लागलो हे नक्की. आज माझ्या घरात टेबलावरील मॅकवर बसून ही पोस्ट लिहिताना ते दाट जंगल व तो काळोख मात्र आठवतो.
"मावशी, तुला माहितेय का आपलं हॉटेल कुठे आहे ते ?" पाच वर्षांचा स्वर. खोल. घाबरलेला.
असो. विषयांतर होतंय.
मी खिडकीबाहेर नजर टाकली. आणि अकस्मात ती दिसली.
आयरिस. ढगाळ आभाळात एका टोकावर हळूच उमटली. क्षणार्धात प्रवास करीत दुसऱ्या टोकावर जाऊन पोहोचली.
GPS बाईच्या मदतीशिवाय.
आयरिस.
वेगवान गतीने जगाच्या ह्या टोकापासून त्या टोकावर काही क्षणांसाठी विसावणारी, सप्तरंगी आयरिस.
देवाचा निरोप. पृथ्वीपर्यंत पोहोचवणारी.
देवाचा निरोप. पृथ्वीपर्यंत पोहोचवणारी.
ग्रीक पौराणिक कथांमधील देवता.
इंद्रधनुषी.
इंद्रधनुषी.
काही क्षण निसटले आणि मी कधीही न बघितलेले मला काही दिसले. ना कधी बघितले. ना असे काही घडते हे माहित होते.
एक नव्हे. दोन आयरिस !
जणू देवाचा आजचा निरोप काही वेगळाच होता. फार महत्त्वाचा होता.
काय म्हणून तो एकट्या आयरीसवर विसंबला नव्हता ?
त्याने जुळ्या पाठवल्या.
जुळ्या बहिणी.
एक आली पुढे.
धाकटी तिची पाठराखीण.
तितक्याच नम्रतेने उमटली.
थोरलीचा मान राखून.
जुळं इंद्रधनुष्य.
असा काय होता तो गूढ निरोप ?
निसर्गाचा.
पृथ्वीसाठी....?
21 comments:
वाचलो.. मला वाटलं स्पॅनिशमधे पोस्ट लिहिली आहेस की काय? :PPP
मी सुद्धा पाहिलेय...असे जुळे इंद्रधनुष्य...
इथेच... आपल्याच आभाळात... खरोखर देवाचा गूढ निरोप असल्यासारखा स्तब्ध नि:शब्द व्हायला झाले... ते संपूर्ण नाहीसे होई पर्यंत :)
मस्त !!!
Heramb :D :D
Anagha mast g....:)
अरे वाह! इतक्या लवकर पोस्ट पण आली!! ले!!
स्पॅनिशमधे पोस्ट नाही ती आता अख्ख मारिया गाणं समजावणारं आहे .. why this KOLHAPURI सारखं ;)
अनघा अप्रतिम गं.. इंद्रधनुष्य़ कसलं सुंदर दिसतेय ... एक दिसणं हल्ली दुर्मिळ त्यात जुळं ... मस्त मस्त!!!
Welcome back Anagha! पोस्टमध्ये एकदम spanish रंग उमटलेत हं :)
तुला एक खाजगी प्रश्न विचारायचाय... तुला स्पेनमध्ये कायमचं राहायला आवडेल का?
अप्रतिम
हेरंबा ! :D
श्रद्धा, मला माहित देखील नव्हते की इंद्रधनुष्य असेही असते ! किती सुंदर नं ?! :)
अपर्णा, युरोप तो युरोप...एक छोटीशी झलक सायप्रसला गेले होते तेव्हा बघितली होती....गल्ली गल्ली...खिडकी खिडकी...सुंदर ! :) :)
आकाशबुवा, माचाफुको परतलाय ते माहितेय मला ! तो कधी बसतोय लिहायला ??? :)
तन्वे, परतताना तुझ्या शहरावरून गेले...संध्याकाळ झाली होती...खाली दिवे लागले होते...मला तुझी खूप आठवण आली...म्हटलं तन्वीने देखील दिवे लावले असतील....आणि कदाचित पिल्लांबरोबर श्लोक म्हणत असेल... :)
अनघा इज बॅक! :)
जुळी इंद्रधनुष्य झकास. आणि भान हरपून ती नुसतीच बघत बसण्याऐवजी तू आमच्यासाठी फोटो पण काढलास म्हणून थॅंक्यू. :)
मला वाटतं एक पुरेसं वाटलं नाही तर असू द्यावं अडीअडचणीला, म्हणून दोन पाठवलीत त्याने. खास तुझ्यासाठी.
आता स्पेनमधल्या
पहिली कॉमेंट अर्धवटच राहिली माझी :( ... मला म्हणायचं होतं, आता स्पेनमधल्या अश्या सगळ्या गमतीजमती आणि फोटो भरभर टाक बघू ब्लॉगवर :)
:) श्रीराज, माझा देश तो माझा देश ! हो ना ? त्यामुळे मी आपली इथेच बरी. दुबईला जात असे त्यावेळी देखील पंधराव्या दिवशी वाटे...कधी एकदाची मी घरी जाणार ! आणि मला न सांगता नवरा माझं तिकीट पुढे पुढे ढकलत राही ! :p :)
महेश, आभार. :)
गौरी, अगं मी ना परतताना विमान बसून एक यादीच बनवलेय स्पेन ट्रीपवरील विषयांची ! पण मग म्हटलं सगळे म्हणाल किती दिवस चाललंय हिचं स्पेनपुराण ! :p :)
सुरुवातीचा पॅराग्राफ अन त्यातलं वर्णन अप्रतिम...
:) आभार आनंद.
mala kahi bol-la nahi ajun :P
कसलं भारी.. दोन दोन आयरिस... आयरिस... कसलं मस्त नाव आहे.
Post a Comment