नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 19 October 2011

काकदृष्टी...

तो एक कावळा होता. आणि त्या दिवशी तो माझ्या आयुष्यात आला होता. खिडकीवर बसला होता. दिवाणखान्याची लांबसडक खिडकी. जशी कावळ्याची लांबसडक शेपटी ? ती काळी तर माझी खिडकी तपकिरी. लाकडी. मी माझ्या लाडक्या भारतीय बैठकीवर पाय पसरून बसले होते. हातात कॉफीचा मग घेऊन. सकाळचे आठ वाजत आले होते. दिवस आठवड्याचा होता. मान मोडून काम करण्याचा.

कावळ्याने माझ्याकडे बघितले तिरक्या मानेने. आमची नजरानजर झाली. अचानक त्याने आपली चोच पंखांत खुपसली. एकदा दोनदा तीनदा. मान वर खाली. खांदा टोचून टोचून काढला. डावा पंख टोचून झाला. मग मान उजवीकडे. तसेच जोरकसतेने उजव्या खांद्याला टोचून झाले. उजवा पंख विस्कटून झाला. मध्येच माझ्याकडे नजर टाकली. मी बघते आहे की नाही ह्याची त्याने खात्री करून घेतली. आता डाव्या पायाचा कुंचला केला गेला. नखांचा. अणकुचीदार कुंचला. कान, मान. पंख विस्फारून झाले. नखांचा तो कुंचला त्याने आपल्या पंखांवरून फिरवला. मोठ्या तोऱ्यात. खास रुबाबात. खसखस खसखस. उजवा पंख आणि मग डावा पंख. खसखस खसखस. अधूनमधून माझ्या अस्तित्वाची जाणीव. म्हणजे असं नाही म्हणू शकत की मी त्याच्या खिजगणतीत नव्हते. त्याला चांगली जाणीव होती...मी त्याला न्याहाळत होते. त्याने माझ्याकडे बघितले की मी हलकेच हसत देखील होते. त्याचा कुंचला चांगलाच उपयुक्त दिसत होता. पूर्ण शरीरभर उजव्या पायाचा व डाव्या पायाचा कुंचला फिरवून त्याने आपले अंग साफसूफ करून घेतले. मग कुंचला चोचीवर फिरवला. चोच साफ झाली. त्याने मान वेळावली. माझ्याकडे बघितले.

त्याच्या त्या नजरेतून अकस्मात माझ्या नजरेसमोर काही वेगळेच आले. चक्र चित्रपटातील स्मिता पाटील. तिची ती उघड्यावरील अंघोळ. हे असेच काहीसे दृश्य होते. 'तो' समोर बसून 'तिला' न्याहाळत होता. तिला काही गत्यंतर नव्हते. जर अंघोळ करणे गरजेचे तर ती लालचावलेली नजर सहन करणे भाग. सर्वच अगदी न टाळता येण्याजोगे. 

माझ्याकडे नजर टाकत मनसोक्त आनंद लुटत केलेली...कावळ्याची ती कोरडी अंघोळ. समजा ती कावळी असेल...मग तरीही तिने हे असे केले असते ? माझ्या मनात उगाच आले...तसेही माझ्या मनात कधीही काहीही येऊ शकते.

कळले नाही...हे जे घडले ते कावळ्याला आनंद देऊन गेले...की मला ?

"आई, काय तू त्या कावळ्याकडे बघत बसलेयस ?"
"अगं, तो बघ ना किती तन्मयतेने त्याचं अंग स्वच्छ करतोय ! उगाच आपण म्हणतो...कावळ्याची अंघोळ ! चांगली तब्बल दहा मिनिटं चाललेय त्याची साफसफाई !"
"तू उगाच कौतुकाने बघत बसू नकोस ! इथे खाली माझ्या अंगावर त्याची पिसं पडतायत !" लेक ओरडली. ती त्या खिडकीखाली तिचा चहा पीत बसली होती.
"अगं ! अशी काय ? मी खरं तर ते रेकोर्ड करणार होते ! पण जर मी कॅमेरा आणायला उठले तर तो उडून जाईल ना...म्हणून एकदम शांत बसलेय !"
पण तिचा चिडका आवाज ऐकून माझा कावळा उडून गेला !

जशी स्मिता पाटील ओलेती उठून चालू पडली व तिच्या मागोमाग तोही उठला तशी मीही मग माझा रिकामा कॉफी मग घेऊन उठले.
माझी अंघोळ पहाटेच आटोपलेली होती.
आणि ह्या अंघोळ दर्शनात उशीर झाला होता.
चाकरमानी मी. घाईघाईत ऑफिसच्या तयारीला लागले.

18 comments:

विनायक पंडित said...

छान! आवडली! दृष्यं डोळ्यासमोर उभं राहिलं लगेच!

Gouri said...

कुणाची तरी आंघोळ टक लावून बघतेस - वर रेकॉर्ड करणार म्हणतेस? ब्याड म्यानर्स! :D:D:D

बाकी चिऊताईची धुळीतली आंघोळ बघायला मला जाम आवडतं बरं का. आणि कावळ्याचं वागणं बघून कधी कधी वाटतं याला बहुतेक आपलं बोलणं समजत असावं.

हेरंब said...

स्मिता पाटील आणि कावळा???

अरारारारा.. ;)

Shriraj said...

@ अनघा, बरं झालं तुझ्या हातात कॅमेरा नव्हता, नाहीतर ती MMS क्लिप फे.बू.-वर टाकून तू सर्वांशी शेअर केली असतीस.

@ कावळा, वाचलास रे बाबा!

Anagha said...

विनायक, आभार ! :D

Anagha said...

हे हे गौरी !!! :D :D :D
चिऊताईची अंघोळ तर कित्ती गोड दिसत असेल ! आणि मी पण अगदी सांगते तुला...ह्या कावळ्यांना ना सगळं समजत ! :D

Anagha said...

:p स्मिता पाटील आणि कावळा !!!! :D :D :p

Anagha said...

हे हे ! कावळा वाचला ! अगदी अगदी श्रीराज ! :D

Pankaj - भटकंती Unlimited said...

एकदा मी अशी राजस अंघोळ निलाजारेपणाने पाहिली होती.

http://www.flickr.com/photos/pankajz/5463458825

Raindrop said...

niralich observation aahe :) now I will be careful while having a bath ;)

neela said...

kavala ani smita patil chi tulana kelyabaddal mi pratik la tumach naav sangnar ahe.... :P

Aakash said...

कावळा आणि स्मिता पाटील तसे रिलेट होतात. दोघंपण कणखर, मनाने हळवे, स्वतःच्या मर्जीजे मालक.
हा दृष्टीकोन आवड्या आहे.
इसी बात पे आज परत चक्र बघणार!

Anagha said...

:) राजस अंघोळ ! सुंदर आहेत हा ते फोटो पंकज. ताजेतवाने ! :)

Anagha said...

वंदू ! :D

Anagha said...

:) शाळेतली आठवण झाली नीला ! 'थांब बाईंना नाव सांगते तुझं !' म्हणायचो ना असं आपण ?
आभार गं प्रतिक्रियेबद्दल ! :)

Anagha said...

आकाश, तुझ्या कृपेने नुकताच बघितला होता ना 'चक्र' ! म्हणून ती स्मिता पाटीलच आली डोळ्यासमोर एकदम ! :p :)

सौरभ said...

=)) kaychya kay!!!

सौरभ said...

लहानपणी कसं.. अव्वा शेम शेम करायचो, तसं कावळ्याला कौव्वा शेम शेम... =)) lollzz