नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 8 July 2011

डबके

ती मान खाली घालून फुटपाथावर बसली होती. पावसाची जोरदार सर नेमकी त्याच वेळी का यावी हा एक चिडका प्रश्र्न मनात घेऊन. कालच निळे प्लास्टिक कसेबसे मिळवले होते. गळणाऱ्या झोपडीवर घातले होते. पाण्याची डबकी अस्ताव्यस्त पसरलेली दिसत होती. त्यात पडलेली पिवळ्या दिव्यांची प्रतिबिंबे. गोल गोल..नाजूक. वाटले, ते उचलून घ्यावे...आणि बाजारात विकावे...पिवळे चमचमते हिरे. अचानक त्या डबक्यात वरून थेंब पडू लागले. उमटणाऱ्या लहरी. सगळे हिरेच फुटले. पाण्याने एक क्षण मन शांत करावे आणि वरून अजून एक थेंब टपकवा आणि पाणी थरारून उठावं...पुन्हा तेच...एक क्षण शांत व पुन्हा थैमान. तिची नजर पायाजवळील डबक्यावर पडली. तिला तिचे प्रतिबिंब दिसले...एकच क्षण आणि वरून अकस्मात चारपाच थेंब त्याकडे झेपावले आणि पाणी थरारून उठलं. त्या थेंबांना त्या शांत पाण्यात कोसळताना धीर नव्हता...ते डबकं आत्ता कुठे श्वास घेत होतं...एका संकटातून बाहेर आल्याच्या सुखात एक निश्वास टाकत होतं...आणि पुन्हा तेच...पुन्हा नवीन संकट...आणि पुन्हा उलथापालथ...
डाव्या बाजूने भर्रकन एक गाडी गेली व तिने ते अख्खं डबकं तिच्या अंगावर उडवलं...
एक डबक्याच्या आयुष्यातील सर्व थरार थांबले...ते आयुष्यातून उठलं...
पुढल्या क्षणाला दुसरीकडे जन्म घेऊन परत एकदा जगायचा प्रयत्न करू लागलं...
डबक्याचे आयुष्य ते...माझ्यासारखे उकिरड्याचे थोडे...माश्या घोंघावत. तिने तिरस्कारात मान झटकली.
समोर चार पोरं. आपण गोरे आणि ही सगळीच्या सगळी अशी काळी ठिक्कर. अंगावर घालायला कपडा नाही. नाचतायत पावसात. नुसता दंगा माजलाय ! खिदळतायत साली ! उड्या मारतायत !

...आता ह्या तुफान पावसात ह्या गळक्या घरात काय गिऱ्हाईक येणार ?

...हा साला पाऊस तर धंद्यावर येतो !

22 comments:

Raindrop said...

tujhi observation mhanje microscopicach aste....ani tyatoon ewadhe mothe thoughts padataat baher :)

Aakash said...

शब्द वापरून काढलेलं चित्र बघितल्या सारखं वाटतं. तुम्ही लिहतांना काय विचार करून लिहलं ते काही माहिती नाही, पण एखाद दोन ठिकाणी रिलेट करता आलं म्हणून आणखीनच आवडलं.

भानस said...

पोटाच्या खळगीपुढे सगळेच शुन्यवत...

हेरंब said...

बापरे.. शेवटचा ट्विस्ट भयंकर :((

Anagha said...

अगं वंदू, आमच्या ऑफिसची गल्ली आहे ना...हनुमान गल्ली, तिथे ह्या बायका नेहेमी असतात. परंतु, आता अशा पावसात मग कुठे जातात, स्वत: काय खातात व आपल्या पोरांना काय खायला घालतात कोण जाणे. त्यांचे पोट तर रोजच्या कमाईवर अवलंबून...नाही का ?
मी तिथून रोज जाते...गाडीत बसून. आणि अशी एखादी नजरेस पडते...आपल्याच विचार गढलेली...

Anagha said...

:) आकाश, म्हणजे शब्दचित्रच झालं की ! :)

Anagha said...

भाग्यश्री, ही खळगी नुसती माती ओढून न भरता येण्यासारखी...

त्यांचे दु:ख त्यांनाच माहित. रोज सकाळी आणि रोज संध्याकाळी माझे काही क्षण त्यांच्याबरोबर जातात...म्हणजे दुरून का होईना पण त्या माझ्या सख्याच. मग त्याच्या त्या खळग्यांचं दु:ख असं भिडतं.

आभार गं.

Anagha said...

हेरंबा, आपल्यापर्यंत न पोचणारं आणि आपल्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरचं हे त्या स्त्रीचं आणि त्याच वेळी एका मातेचं दु:ख...हो ना ?

Shriraj said...

अनघा, कसं ग जमतं तुला हे!!??

Anagha said...

श्रीराज ! :)

अपर्णा said...

शेवट एकदम अंगावर आला...बापरे कशी आयुष्य जगतात नाही काही लोक...

Anagha said...

खरंय अपर्णा.
धन्यवाद गं.

yogik said...

kay danger'katha' sutaliy !!
chitr jhombale!!

Anagha said...

योगिक, त्या रोज दिसणाऱ्या बायका...ह्या पावसात काय होणार त्यांचं ?
आभार प्रतिक्रियेबद्दल. :)

Alhad Mahabal said...

...आता ह्या तुफान पावसात ह्या गळक्या घरात काय गिऱ्हाईक येणार ?


स्स्स्स्स्स
च्च्च च...

सहनच नाही झालं!

rajiv said...

पावसापेक्षाही अंगावर येतंय ते ." ...आता ह्या तुफान पावसात ह्या गळक्या घरात काय गिऱ्हाईक येणार ? "
त्या नागव्या सत्यापेक्षाही तिची ममता व आटापिटा आतपर्यंत भिडतो .......

BinaryBandya™ said...

बापरे ..
एखादा माणूस शब्दात कसा रंगवायचा , तुमच्याकडूनच शिकावं.
डबकं..
डबक्याचा एवढा विचार मी कधीच केला नव्हता ...

छानच लिहलंय..

सौरभ said...

एक अणुबॉम्ब, केवढा मोठा?? काही फुट लांब, एखाद दिड फुट रुंद... फुटला की शेकडो किलोमीटरच्या क्षेत्रावर परिणाम...
अनघा मॅडमचा पोस्ट केवढा??? मोजके शब्द आणि काही ओळी... पडला की असंख्य भावनांचा कल्लोळ...

Anagha said...

ही चित्रं सहन होण्यासारखंी नसतातच, आल्हाद.
धन्यवाद, प्रतिक्रियेबद्दल.

Anagha said...

हे...काही सारखे तर काही वेगळे भाव, रोज त्यांच्या चेहेऱ्यावर दिसतात. धन्यवाद राजीव.

Anagha said...

बंड्या आभार. :)

Anagha said...

सौरभा... :)