विषवल्ली...भाग २
विषवल्ली...भाग ३
विषवल्ली...भाग ४
मनीष पुरता कोसळला होता. आजवर लीना ही त्याने आयुष्यात गृहीत धरलेली गोष्ट होती. पूर्ण रंग भरत चित्र न्यावं आणि अकस्मात पाण्याचं भांड कलंडावं व सर्व रंग विस्कटून जावेत. कचेरीत उच्च पदांवर तो सरकत होता आणि लीनाने त्याला कड्यावरून खाली ढकलून दिलं होतं. तिला माफी नव्हती. त्या दिवशी तो कामासाठी कुठे निघाला होता. नेहेमीसारखी गाडी चालवत. संध्याकाळ नुकतीच झालेली होती. त्याचे जग अंधारलेले होते पण अजून बाहेर उजेडच होता. सिग्नलला तो गाडी वळवणार तेव्हढ्यात त्याला लीना दिसली. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. व त्याने अचानक गाडीचा वेग वाढवला. क्षणभराची खोटी व लीनाच्या अंगावर गाडी जावी. त्याची व लीनाची नजरानजर झाली. बावचळून लीना एकदम रस्त्याच्या कडेला सरकली. पडता पडता वाचली. गाडीच्या बोनेटचा तिने आधार घेतला व स्वत:ला सावरले. पुन्हा वर बघितलं तर एका क्षणात पूर्ण तिरस्काराने तिला फाडून मनीष पुढे निघून गेला होता. तो तिरस्कार तिला कोसळवून गेला. एक अतिशय प्रखर वीज कोसळली होती तिच्या अंगावर. भडकत्या आगीचा जाळ तिला भेदून गेला होता. आणि कधी नव्हे इतक्या वेगाने मनीषाने गाडी त्या गल्लीत घुसवली. त्याला जिथे काम होतं ती इमारत गेऊन गेली तरी मनीषने गाडी नाही थांबवली. कोणी ढकलून दिल्यासारखा तो निघाला. त्याच्या हातून मृत्यू लिहिलेला नव्हता म्हणून आज त्याच्या गाडीपुढे अजून कोणी नाही आलं.
कधीतरी एक मांजर आडवं गेलं होतं...व त्यानंतर अजून कोणीही आडवं गेलं नाही.
कधीतरी एक मांजर आडवं गेलं होतं...व त्यानंतर अजून कोणीही आडवं गेलं नाही.
गौरी व लीना ह्यांचे कधीही सख्य नव्हते. एकमेकांना त्या ओळखत होत्या इतकेच. त्यामुळे ना ती कधी लीनाकडे धावून आली ना लीना कधी गौरीकडे गेली. मात्र मनीष, दारू व शेखरगौरी ह्यांच्यावर आता अधिकाधिक अवलंबून राहू लागला.
इथे लीनाची नोकरी चालू होती. अनेकदा भावनिकदृष्ट्या कोसळून देखील तो नोकरीचा लढा मात्र तिने चालू ठेवला होता. तसेही तिला गत्यंतर नव्हते. पैसे कमावणे भाग होते. प्राजक्ता व तिचा स्वत:चा खर्च ती तिच्या आई वडिलांवर कसा टाकू शकत होती ? त्यांनी तिला बिनतक्रार घरात घेतले हेच खूप झाले. इतक्या मोठ्या चुकीनंतर देखील त्यांनी त्यांच्या घराचे दरवाजे तिच्यासाठी उघडले ही मोठी गोष्ट नव्हती काय ? त्या दोघींच्या खर्चाचा भार मनीष काही आता सोसणार नव्हता. लीनाचे वडील ह्या सर्व घटनेने खचून गेले. त्यांनी एकदा परोपरीने मनीषची हात जोडून माफी मागितली. त्यांच्या कन्येच्या चुकीसाठी. बाप लाचार झाला. तिला माफ करा. ती तिच्या तोंडाने तिची चूक मान्य करतेय म्हणून तरी तिला माफ करा...बाप व्याकुळतेने सांगत होता. परंतु, मनीष व त्याच्या बरोबरीने आलेला शेखर तिथून तडकाफडकी निघून गेले. त्या पुण्यवान म्हाताऱ्याच्या विनवण्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करून. आभाळ वाकलं होतं. मनीषने आपलं अंग चोरलं. तो दरवाजाकडे वळला त्यावेळी त्या बंद दरवाज्यापाशी हात जोडून लीना विनवण्या करत होती. आक्रोश चालू होता. शेखर व मनीष निघून गेले आणि लीना मटकन खाली बसली. तिला हे सर्व खरंच घडतंय ह्यावर विश्वास नव्हता बसत. आता आपल्याला वेड लागेल...आपण नाही ह्यातून जिवंत बाहेर पडू शकणार....नाही पडायचं ह्यातून जिवंत. गल्लीतील रोजच्या केमिस्टकडून लीनाने झोपेच्या गोळ्या जमवायला सुरुवात केली. दोन तीन दिवसांतून ती एकदा तिथे जाई व एकदोन गोळ्या मागून आणे. आज काय तर डॉक्टरांचा कागद घरीच राहिला तर उद्या म्हणे आहे पर्समध्ये..आत्ता सापडत नाहीये. केमिस्ट लहानपणापासून तिला ओळखणारा. त्याला काय माहित लीना सरसोट कड्याच्या टोकाशी उभी आहे. आणि वर्तमानकाळ व भूतकाळ ह्यात असा कितीसा अवधी ? एक तर पळ. पापणी लवेस्तोवर तेव्हढाच तर वेळ जातो.
कचेरीतून मध्येच उठून लीना जवळच असलेल्या समुद्रापाशी जाऊन बसे. शून्यात नजर लावून. पर्समधून झोपेच्या गोळ्या काढे..आणि हातावर घेऊन मोजत बसे. पण तिला हे करवत नव्हतं..आपण अजून किती त्रास देणार आहोत आपल्या आई वडिलांना...आपण मरून गेलो तर मग काय करेल प्राजक्ता....मनीष थोडी सांभाळणार आहे तिला...अधिकाधिक दारू पीत राहील...आणि मग काय होईल प्राजक्ताचं. एक दिवस अशीच लीना वाळूत पाय अंगाशी घेऊन बसली होती. सूर्यास्त होत आला होता. आकाश ना लाल होतं. ना तांबूस. सगळं जसं करडं, रंगहीन. कातरवेळेची हल्ली लीनाला भीती वाटे. तिरमिरीत येऊन लीनाने सगळ्या गोळ्या समुद्रात फेकून दिल्या...एक गोळी हळूच तिच्या पावलाशी येऊन पडली...लीना वाकली. गोळी हातात घेतली. वाटलं, देव काय सांगतो आहे...काय तो तिची परीक्षा घेतो आहे...? हे असे आत्महत्या करणे म्हणजे का केलेल्या चुकीची शिक्षा ? की शिक्षेपासून पळ ? लीनाने वाकून तळहात पाण्यात धरला...हलकेच लाट गोळीवर फिरली. खारट पाणी हातात गोल फिरलं. बुडबुडे उठले. पाण्याने गोळीला फेरे धरले. लीनाने विरघळेस्तोवर तिला तळहातात धरून ठेवलं...ती हलकेच आक्रसत जाते ना जाते तोच पुढच्या लाटेने गोळीला खेचून नेलं. जशी त्या लाटेने लीनालाशिक्षा फर्मावली...जा...जगणे हीच तुझी शिक्षा...
जिवंत पुरुषी अहंकारच ह्यापुढे मनीषला जिवंत ठेवणार होता. लीनाने तिची चूक मान्य केली. तिला माफी नव्हती. मनीषने त्याची चूक मान्य केलीच नव्हती. त्यामुळे त्याला माफ करण्याचा प्रश्र्नच कुठे उद्ध्भवत होता ?
लीना त्या नात्यातून जी बाहेर पडली होती ती कधीही न परतण्यासाठी. ते तिने कधीच तोडलं होतं...तडकाफडकी बाहेर येण्यासाठी नक्की काय घडलं ? तिचं मन प्रेमासाठी आसुसलेलं...पण एक क्षण असा आला व अकस्मात त्या नात्याचं चित्र स्पष्ट झालं. तू घटस्फोट घे व तुझं घर ताब्यात घे...मग आपण लग्न करू...हे ज्यावेळी वाक्य तिच्या कानावर आलं त्यावेळी तिला जी खाडकन जाग आली ती त्या वरून मलमली दिसणाऱ्या स्वप्नात पुन्हा कधीही न शिरण्यासाठी. जसा एखादा सुंभ जाळून त्याचे टोक अगदी बंद करून टाकावे. कधीही न उस्कवटण्यासाठी. किंवा एखादे उगाच उगवलेले बांडगुळ कोणी उपटावे, त्याची मुळे जाळावीत व झाडाची ती जागाच खरवडून खरवडून नष्ट करावी. वादळात भरकटलेली तिची नाव लीना खेचून किनारी आणत होती. तिच्या हाती एक चिमुकला हात होता. आणि त्या हातात जी ताकद होती ती जगात कोणाकडेही नव्हती. तोच जीव आता तिला ह्यातून बाहेर काढणार होता. मात्र तो किनारा खरोखर कधी अस्तित्वात होता की तो एक भासच होता...
ह्याला जीवन ऐसे नाव. नाही का ?
आणि शेखर ? तो आज काय भूमिका खेळत होता ?
मनीषला परत मिळवण्याची आशा मात्र अजून लीनाने जिवंतच ठेवली होती. किती पत्रे लिहिली. किती फोन केले. सगळे दरवाजे ठोठावले. किती दिवस आईवडिलांकडे रहाणार म्हणून मग भाड्याचे घरही शोधू लागली. अंधेरी, गोरेगाव, वांद्रे. कधी कुठे गॅरेजमध्ये तर कधी रेल्वेपासून अतिशय जवळ. मुंबईकरांच्या विधींची दुर्गंधी त्या घराला कायम लाभलेली. भाड्याने घर घ्यावे आणि मग प्राजक्ताला कसे सांभाळावे ? दिवसभर तिला कुठे ठेवावे ? प्रश्र्न नाना. उत्तरे शून्य.
एक दिवस लीनाला कचेरीत फोन आला. शेखरचा. तो म्हणाला तू घरी ये. त्याने लीनाला, तिच्याच घरी भेटायचे आमंत्रण दिले. मनीषने त्याच्याकडे किल्ली दिलेली होती. लीना गेली. मनीष घरात नव्हता. तिच्याशी बोलण्यासाठी शेखरने तिला मुद्दाम बोलावले होते. सूर्यास्त होऊन दोनतीन तास उलटून गेलेले होते. घरात अंधार पडू लागला होता. घर खरे तर लीनाचे. परंतु, आता तिथे मनीषच्या मित्रांचा वावर अधिक दिसत होता. घरातील दिवेलागण आज बऱ्याच दिवसांनी तिच्या हातून झाली होती. दिवाणखान्यात लीना बसली. जमिनीवर. समोर शेखर मद्याचा ग्लास भरून. ह्यात नवीन ते काय ? मनीषच्या घरात नेहेमीच ह्याला मुभा होती. शेखर तर घरचाच होता. आता काय करता येईल व मनीष पुन्हा लीनाला घरात घेईल हा प्रश्र्न होता. लीना पुन्हा पुन्हा एकच विचारत होती. काय करू मी आता ? काही बोलतो का तो तुझ्याशी ? कसा आहे तो ? काही विचारतो का माझ्याबद्दल ? हे आणि असेच निरर्थक प्रश्न.
अकस्मात शेखरने लीनाच्या मांडीवर डोके ठेवले.
"आता तू काही मनीषची बायको राहिली नाहीस. आपल्यात आता काहीही होऊ शकते." शेखर म्हणाला.
लीनाचा चुकलेला हृदयाचा ठोका पुन्हा कधीही ठिकाणावर नाही आला. ती तिरमिरीत उठली. आणि दार उघडून चालू पडली. वडिलांच्या घरी आली आणि प्राजक्ताला मिठी मारून हमसाहमशी रडू लागली. तिच्या आईवडिलांना त्यात काय नवीन होते ? चुकलेल्या नशिबाची लीना आज फिरून एकदा रडत होती. इतकेच काय ते त्यांच्यासाठी होते.
पुढचे तीनचार दिवस रोज लीनाच्या कचेरीत शेखर तिला फोन करत होता. आणि त्याचे नाव देऊन तिने रीसेप्शनिस्टला सांगूनच ठेवले होते तिला तो फोन न देण्याबद्दल. एकदाच तिने चुकून फोन घेतला. "हे तू काय चालवलं आहेस ? भेट मला. बोलायचंय मला तुझ्याशी. तिथे येऊन खेचून घेऊन जाईन तुला ! कळलं ना ?"
तिने न बोलता फोन ठेवून दिला. तोही तिच्या अब्रूचे अजून धिंडवडे काढायला कधी तिच्या कचेरीत अवतरला नाही.
हे शेखरचे धक्कादायक वागणे लीनाने मग फक्त एका मित्राला सांगितले. त्याने मनीषच्या कानावर घातले. परंतु, मनीषला ना त्याचे सोयर ना सुतक. शेखर व गौरी आपल्या लेकाला घेऊन परगावी निघून गेले. व त्यांच्या मागोमाग मनीषदेखील तिथे निघून गेला. त्यांच्याचकडे तो आता राहू लागला. महिना १०,००० रुपये शेखरला भाडे म्हणून देऊन. तेव्हढाच म्हणे शेखरला हातभार. कधी काळी त्यांच्या चार आण्यांच्या संसारात लीनाने शेखरला आपला मोठा भाऊ मानून सांभाळले होते. कधी ते नाते पैश्यात नव्हते मोजले. त्याची आठवण कोणाला ? आणि का बरं असावी ?
भयानक वादळ...जीवघेणं थैमान...रोजची काळरात्र आणि विजांचं रोजचं तांडवनृत्य...
9 comments:
दुरून डोंगर साजरेच असतात...
कशी गंमत आहे नं, मित्रमैत्रीणी तुम्हाला सावरू शकतात आणि बरबादीला हातभारही लावू शकतात.
बाकी बरबादीला डोळे नसतातच...
वाचतेय गं. येऊदे पुढचा लगेचच.
अगदी खरंय भाग्यश्री...
...रोज एक भाग टाकतेय...आता उद्या सकाळी टाकतेच. :)
आणि तू देत असलेल्या ह्या पाठिंब्याबद्दल खूप खूप आभार ! :)
सत्याची डूब आहे ह्या कथेला... कदाचित त्यामुळेच ते इतकं कटू आहे...मनाला लागणारं :(
पुढच्या भागाची वाट बघतोय
bhaag number saha hai kahaan?
बापरे.. किती गुंतागुंत चाललीये !!
श्रीराज...वाचा वाचा पुढे वाचा.
वंदू, जरा जास्तीच वेळ लागला सहावा भाग टाकायला !...नीट लिहायला हवे ना सगळे...त्यामुळे. :)
हेरंबा... त्रास दिलाय का मी ? :(
ab mujhe heram ka naam dekhte hi apne 'watan' ki yaad aati hai :)
Post a Comment