नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 1 July 2011

विषवल्ली...भाग ३

विषवल्ली...भाग १
विषवल्ली...भाग २

आणि एक विचित्र घटना घडली. गौरीकडे दोन्ही मुलांना सोपवून एका मोठ्या कार्यक्रमाला तिघे गेले होते. कार्यक्रम रात्री उशिरा संपणार होता. ह्या अशा कार्यक्रमात शेखर व मनीषचे मन फार रमत असे. नृत्य दारू, गप्पा आणि टप्पा. लीनाचा जीव काही फारसा त्यात न रमणारा. तिने प्रथमच गौरीकडे प्राजक्ताला असे सोडले होते. प्राजक्ता सहा सात वर्षांची व राहुल चार वर्षांचा. कार्यक्रम अर्धवट टाकून काही मनीष शेखर तिथून निघणार नव्हते. मग रात्री अकराच्या सुमारास लीना एकटीच तिथून निघाली व गौरीकडे गेली प्राजक्ताला घ्यायला. प्राजक्ता झोपेला आलेली. राहुल कधीच झोपून गेलेला.
"आज आमच्या पलंगाखाली प्राजक्ताने राहुलला नेले"
"अं ?"
"काही विचित्र विचित्र ती त्याच्याशी बोलू लागली. विचित्र काही वागू लागली."
ह्या वाक्याने हादरलेली लीना, कशीबशी घरी पोचली. मनीष रात्री उशिरा घरी परतला. अशा कार्यक्रमांवरून थोडीच कोणी कोरडे परत येते. ती वेळ नव्हती मनीषशी काही बोलण्याची. रात्रभर लीनाच्या डोळ्याला डोळा लागेना. सकाळी त्याला जाग आल्यावर तीने घडलेला प्रसंग मनीषच्या कानी घातला. गौरी हे असं काही मला सांगत होती.
वर्तमानपत्रात मान डोकावून मनीष शांत.
लक्ष नको देऊस तू. सोडून दे.
पण रात्री मनीष कामावरून घरी आल्यावर सकाळची गोष्ट लीनाने पुन्हा छेडली.
कसं सोडून देऊ ? मी तुला आधीही एखादा म्हटलं होतं. मला कालही नाही आवडलं. गौरी आपल्या लेकीबद्दल खोटं व घाणेरडं बोललीय. ते आपण कसं सोडून द्यायचं ? आणि तुला का सतत ते दोघे लागतात ?
लीनाने ताटात वाढलेली तळलेली चमचमीत कोलंबी लक्षपूर्वक खाणे मनिषसाठी अधिक आनंददायी होते.

तसाही संसार म्हणजे मुळातच ठिगळं लावलेली एक गोधडी. मग एकदा एक ठिगळ लागल्यावर त्यात अजून दहा लागली तरी काय फरक पडतो. बहुधा संसारात ज्यावेळी एक चुकतो त्यावेळी मुळातच त्या चुकीला दुसऱ्याचा हातभार लागलेला असतो. म्हणजे हमालाच्या डोक्यावर 'पँडोराचा बॉक्स' आपण द्यावयाचा..व मग त्या उघड्या फटीमधून विषारी सर्प बाहेर पडू लागले की हमालाच्या नावाने बोंबाबोंब करावयाची. तसं काहिसं.

एकदा एका मंगळवारी मनीष लीना दुपारी जेवायला भेटले. दोघेही कचेरीतून मधेच निघून एकत्र भेटले होते. लीनाला आठवले त्यांचे कॉलेजचे कोवळे दिवस. कॉलेजमध्ये असताना कॉलेज बुडवून ते असेच फिरत असत. खिशात ना फुटकी दमडी. मग चालणे आणि फक्त चालणे. आई लीनाला महिना दहा रुपये पॉकेटमनी देई व मनीषने मागितले की ते त्याला ती देऊन टाकी. त्याच्याकडे कुठून येणार पैसे म्हणून. मग हिचा खिसा रिकामा. ती दुपार लीनाची खूप छान गेली. तिच्या मनीषबरोबर. ते एकत्र जेवले. एकत्र फिरले. काम आटोपल्यावर ती घरी आली व तो आपल्या कचेरीत परत गेला. पण ते तेव्हढेच. रात्री जेव्हा मनीष घरी परतला तेव्हा तो नेहेमीसारखाच पिऊन आला होता. मग तिने त्याला विचारले.
"दुपारी आपण भेटलो तेव्हा तुला नाही का छान वाटलं ? मला तर आपले कॉलेजचे दिवस आठवले. पण मग आता तू कशाला पुन्हा पिऊन आलायस ?"
इत्यादी इत्यादी. अगदी प्यायलेल्या नवऱ्याला एखादी वैतागलेली बायको जे जाब विचारेल ते सर्व तिने विचारले. त्यावर मनीष तिला एकच म्हणाला.
"तू फक्त ती दुपार लक्षात ठेव ना मग ? रात्र कशाला धरून बसतेस ?"
नवऱ्याबरोबरची रात्र लीनाची नसे. रात्र वैऱ्याची असे.

कोवळ्या वयात असल्यापासून मनीषवर जीवतोड प्रेम करणारी लीना आता आयुष्याच्या दुसऱ्या पायरीवर एकटी उभी होती. त्या पायरीसमोर पूर्ण अंधार. त्यामुळे पुढे काय वाढून ठेवले आहे ह्याबद्दल ती स्वत: पूर्णत: अनभिज्ञ. दुसरा पुरुष आयुष्यात येणे हे काही सरळ मनाच्या लीनाला फारसे आनंददायी नव्हते. परंतु, ते घडले. वा ती ते टाळू नाही शकली. जे घडायचे ते नेहेमीच घडते. जर टाळले गेले असते तर त्याचाच अर्थ ते घडणारच नव्हते असा नव्हे काय ? आणि मग त्यात एक प्रामाणिकतेचा तिला लागलेला शाप. वा वरदान ?

हे आपण जे मनीषला फसवत आहोत ते काही बरोबर नाही. त्यात त्याची किती चुकी आहे हे आपण जाणतो तसेच तोही जाणत असेल. आपण त्याच्यावर किती प्रेम केले. व त्याने आपल्या सर्वच गरजांकडे पूर्ण दुर्लक्ष केले...हे असे नाना विचार तिच्या मनी येऊ लागले. आता जर हा सर्व प्रकार थांबवायचा असेल तर सर्वात प्रथम घडलेली घटना आधी मनीषच्या कानावर घालणे भाग आहे. त्यातच आपले दोघांचे, नव्हे तिघांचे भले आहे असे लीनाला वाटू लागले. तरच आपण आपला संसार पुन्हा कोऱ्या पाटीवर रेखू शकू, ही तिची भावना. तेच ते तिचं गणित...एक अधिक एक दोन.
दारू पिऊन घरी उशिरा परतणे हे तर मनिषचे रोजचेच झाले होते. कॉलेजमध्ये बऱ्याचदा मनीष म्हणाला तर होता...लग्न झालं की मी सोडणारच आहे...पण आता तर हे नेहेमीचंच झालं...आपण न्यायालयात गुन्हेगाराच्या चौकटीत उभे रहायला निघालो आहोत खरे....पण ज्याच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे तो ह्या खटल्यात मुख्य गुन्हेगार आहे त्याचे काय ?

आता हे सर्व मनीषला सांगायचे तरी कधी व कसे हा लीना पुढील यक्षप्रश्न.

8 comments:

श्रीराज said...

आता पुढे काय होईल ह्या कल्पनेने मीच बिथरलोय ...

हेरंब said...

ह्म्म्म.. अजूनच गुंतागुंतीचं होत चाललंय सगळं. !

rajiv said...

तसाही संसार म्हणजे मुळातच ठिगळं लावलेली एक गोधडी. > जोड लावूनच गोधडी बनवली जाते हे मान्य पण ती एकसंध असते. एखादा जोड कमकुवत निघाला तर मात्र ती गोधडी उसवतच जाते
ती दुपार लीनाची खूप छान गेली. तिच्या मनीषबरोबर. ते एकत्र जेवले. एकत्र फिरले. > त्या गोधडीला लागणारे जोड किती साधे क्षुल्लक होते नाही का? पण त्यांच्याच दुर्भिक्षामुळे ती रात्री उब द्यायला असमर्थ व्हावी हि लीनाची कुतरओढ फार नेटक्या शब्दात मांडलीयस !! खूप छान !!
याचे फलित > दुसरा पुरुष लीनाच्या आयष्यात येणे हे अतिरेकी पण अनिवार्य वाटले :( दारूमुळे नात्यातील ओलावा पण उडून जातो आणि मग हाताशी लागणारा ओलावा हाच लीनचा आधार होऊ पाहतो. !!

परंतु "आता जर हा सर्व प्रकार थांबवायचा असेल तर सर्वात प्रथम घडलेली घटना आधी मनीषच्या कानावर घालणे भाग आहे. त्यातच आपले दोघांचे, नव्हे तिघांचे भले आहे असे लीनाला वाटू लागले. तरच आपण आपला संसार पुन्हा कोऱ्या पाटीवर रेखू शकू, ही तिची भावना." > यातून लीनाच्या कुरतडलेल्या मनाची अवस्था व हातून घडलेल्या अतिरेकाचे परिमार्जन करण्याचे प्रांजळ इच्छा दिसून येते.

आपण न्यायालयात गुन्हेगाराच्या चौकटीत उभे रहायला निघालो आहोत खरे....पण ज्याच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे तो ह्या खटल्यात मुख्य गुन्हेगार आहे त्याचे काय > यातून लीनाच्या चुकीचे समर्थन नाही पण एका वेगळ्याच सामाजिक उणीवेला हात घातला गेलाय. फिर्यादी व न्यायाधीश जर एकच असेल व फिर्यादिच्याच हातून होत असलेल्या घटनांच्या वारंवारीतेमुळे जर दुसऱ्याचा हातून अपघात झाला तर त्याचा निवाडा कसा होणार....... खरेच विचार करायला लावणारी गोष्ट आहे हि .....!!

अनघा said...

श्रीराज, वाचतोयस हे बघून बरं वाटलं... :)

अनघा said...

हेरंबा, हम्म्म्म
:)

अनघा said...

राजीव, विचार करायला लावतेय न गोष्ट ?

धन्यवाद...वेळातवेळ काढून वाचत राहिल्याबद्दल. :)

भानस said...

" बहुधा संसारात ज्यावेळी एक चुकतो त्यावेळी मुळातच त्या चुकीला दुसऱ्याचा हातभार लागलेला असतो.... "

इथूनच गणित चुकायला सुरवात होते ना गं?

अनघा, खरेच मुंबईतलीच कथा आहे ही. प्रातिनिधीक!

अनघा said...

ह्म्म्म..आपण ज्यावेळी चुकीसाठी दुसऱ्याकडे बोट दाखवतो त्यावेळी आपलीच तीन बोटं आपल्याकडेच वळलेली असतात...नाही का भाग्यश्री ?

आभार गं. :)