नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 25 May 2011

हव्यास

कसं आहे...
जिथं जे मिळतं तेच मागावं.
उगा कासाराकडे जावं अन दाणापाणी मागावं.
ग न मिळालं...
म्हणून त्या दुकानवाल्याच्या...
बोकांडी बसावं...
अन्याय अन्याय करून बोंब मारावी..
धो धो धाय मोकलावं...
माथा आपटावा...
कपाळमोक्ष करून घ्यावा.

तसं काहीसं झालंय...
सोनंचांदी...
कपडालत्ता...
मागायचा होता..
डोंगर डोंगर दिला असता...
पण नाही...
मागून मागून मागितलं काय ?
हिरव्या कविता...
गर्द दर्द गाणी...
टपोरं चांदणं...
चिंब पाऊस...
रातराणीचा गंध...
अन प्राजक्ताचा छंद...!

कठीण आहे...
दारुच्या गुत्यावर जावं
अन केशरी दूध मागावं !

हव्यास दु:खाचा !
दुसरे काय ?

Sunday, 22 May 2011

कोर्टाची पायरी...भाग ७

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६

आज ३० सप्टेंबर २००४
मुंबई
खालील कोर्टाने निकाल आपल्या बाजूने दिलेला आहे. परंतु, शर्मा बाईचे कर्तृत्व आपण ओळखून असल्याने आज आपण हाय कोर्टात आपले कॅव्हिएट पुन्हा एकदा नव्याने दाखल केले आहे. लिमयांचा पूर्वीचा अनुभव काही फारसा उत्तेजनार्थक नाही. त्यांना ऐन वेळी घाम फुटतो व बोलती बंद होते हे आपण आपल्या डोळ्यांनी बघितले आहे. व पुन्हा पायावर धोंडा पाडून घेण्याची आपली हौस तर बिलकुल नाही. हौस नाही व तेव्हढा आपल्याकडे वेळही नाही. मग आता आपला खटला मुंबईत कोण चालवणार ? फलटणकरांचे बालपणाचे सवंगडी. ठाण्यातील हाय कोर्टातील प्रख्यात वकील राम आपटे. आज त्यांनीच आपले 'कॅव्हिएट' दाखल केलेले आहे. "खालील कोर्टाने शर्मा बाईचे अपील फेटाळलेले आहे. त्यावर पुढे अपील करण्यासाठी त्या कोर्टाने मुदत दिलेली नाही. त्यामुळे आता आपण २००३ मधला जागेचा ताबा मिळवण्याचा अर्ज पुनरजीवित (रिव्हाईव्ह) करावा. असे केल्याने त्याविरुद्ध भाडेकरूला हाय कोर्टात 'रिट पिटीशन' दाखल करावे लागेल. मात्र ते करण्यास कुठलेही कालावधीचे बंधन नाही. त्यामुळे कॅव्हिएटची मुदत चालू असतानाच ताबा मिळवण्याचा अर्ज तातडीने पुढे चालवावा. हे तुम्हीं तातडीने भिड्यांना कळवा."

३० ऑक्टोबर २००४
रत्नागिरी
पावसकर गैरहजर. अडीच वाजता ऑर्डर तयार करतो असे जज्ज म्हणाले. ४.३० वाजता जज्जनी सांगितले,"मूळ १९८५ च्या दाव्याच्या नकलेची प्रत व डिक्रीची प्रत हजर केल्याशिवाय कोर्ट तुम्हांला ताब्याची ऑर्डर देऊ शकत नाही. कारण आताचा अर्ज हा अपील अर्जावर असल्याने व अपील पूर्णत: फेटाळले गेल्याने, २००३ च्या अर्जावर दुरुस्ती करून मूळ दाव्याच्या निकालावर ऑर्डर देता येईल."...सदर निकाल प्रत आपल्या हाती आहे परंतु डिक्रीची नक्कल नाही. भिड्यांच्या नव्या सहकारी वकील बाई पोतनीस. काळसर मध्यम उंचीच्या बाई. एखादी स्त्री अशी काही जबाबदारीची कामे करताना दिसली की कौतुक वाटते. हा आमच्या जागेचा ताबा आम्हांला लवकर मिळवायचा आहे...व हा खटला अजून कुरवाळत बसण्याची काडीचीही इच्छा नाही हे सर्वप्रथम पोतनीस बाईंच्या कानावर घातले. आता त्यांना तातडीने ती डिक्रीची (विनंती अर्ज) नक्कल मिळवणे आवश्यक होते. २ नोव्हेंबरला प्रतिज्ञा पत्र, दुरुस्ती अर्ज व निकालाची प्रत कोर्टामध्ये समक्ष सादर करण्यास आम्हांला कोर्टाने सांगितले. पुढील तारीख २ नोव्हेंबर.


२ नोव्हेंबर २००४
रत्नागिरी
पहाटे ४ ला मुंबईहून निघून ११.३० वाजता रत्नागिरी कोर्टात हजर. शर्मा बाईने आजच्या घटकेपर्यंत कोर्टाकडे जमा केलेली भाड्याची रक्कम व घराचा ताबा ह्याविषयीचा अर्ज कोर्टात दाखल केला. पुढील तारीख...६ नोव्हेंबर २००४. सदर दुरुस्ती मंजूर होण्याविषयी त्या दिवशी विचार होईल असे कोर्टाने सांगितले.

६ नोव्हेंबर २००४
रत्नागिरी
पहाटे ४.३० ला मुंबईहून निघून १२ वाजता रत्नागिरी कोर्टात हजर.
४ वाजता कोर्टात आमचा नंबर लागला. कोर्टाने आम्ही सांगितलेली दुरुस्ती मंजूर केली व शर्मा बाईच्या उत्तरासाठी पुढील तारीख पडली. १६ नोव्हेंबर २००४. "त्यादिवशी तिचे उत्तर न आल्यास आपल्याला ताबा देण्याबाबत ऑर्डर मिळेल काय ?" भोळसटासारखे प्रश्र्न विचारायची माझी खोड अजूनही गेलेली नव्हती. फलटणकर हसून दुर्लक्ष करण्यास आता शिकले होते.

१६ नोव्हेंबर २००४
रत्नागिरी
पुढली तारीख २५ नोव्हेंबर.

२५ नोव्हेंबर २००४
रत्नागिरी
आज ताबा देण्याची ऑर्डर झाली.
व त्याप्रमाणे लेखी ऑर्डर मिळून त्याप्रमाणे 'बेलीफांना' (कायद्याचा व्यवस्थापक) आदेश होऊन ताबा देण्याबाबत देखील आदेश झाला. या सर्व गोष्टींची माहिती २४ डिसेंबरपर्यंत कोर्टास द्यावयाची होती.

१ डिसेंबर २००४
रत्नागिरी
दुपारी बारा वाजता कोर्टात हजर. घराचा ताबा घेण्याची लेखी ऑर्डर हातात मिळाली. ती बेलीफाला दिली. एक वाजता बेलीफ श्री. गुरव ह्यांना घेऊन घरी गेलो. तिथे ? तिथे शर्मा बाई गायब. घराला कुलूप. शेजारी चौकशी केली तर कळले तर बाई ३ दिवसांपूर्वीच गावी गेली आहे. बेलीफाने ही नोंद कोर्टाकडे दुपारी २.३० वाजता दाखल केली. आम्ही त्यानंतर कोर्टाला अर्ज केला, कुलूप तोडून व सामान बाहेर काढून आम्हांला घराचा खुला ताबा देण्यात यावा. कोर्टाने ५ वाजता तोंडी आदेश दिला...तोडून सामान ताब्यात घेऊन ताबा दिला जावा. मात्र लेखी आदेशाची प्रत ही दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता मिळेल असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे बेलीफाला सांगितले. त्याने लेखी आदेश मिळाल्यास ताबा मिळवून देऊ असे आश्वासन आम्हांला दिले.

२ डिसेंबर २००४
लेखी आदेश मिळेस्तोवर संध्याकाळचे ४ वाजले. परंतु, आता सामानाची मोजदाद करून सूर्यास्ताच्या आधी प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नाही म्हणून ताबा ४ तारखेला देऊ असे सांगण्यात आले.

४ डिसेंबर २००४
ताबा घेण्यासाठी कोर्टात पोचलो तेव्हा शर्मा बाईच्या वकिलाने, पावसकारांनी, हाय कोर्टात रिट पिटीशन दाखल केल्याने सदर प्रक्रियेस १५ दिवसांची स्थगिती मागितली. कोर्टाने मंजुरी दिली. १८ डिसेंबरपर्यंत स्थगिती.

१८ डिसेंबर २००४
चार वाजता मुंबई सोडून ११ वाजता रत्नागिरी कोर्ट. जज्ज साहेब रजेवर. पुढील तारीख ४ जानेवारी २००५. परंतु, एक गोष्ट आम्ही कशी दुर्लक्षित करणार ? 'स्टे' १८ तारखेपर्यंतच होता ! त्यापुढे नाही. कोर्टात पुन्हा विनंती अर्ज. दुसरे जज्ज शिंदे ह्यापुढे आमचा अर्ज सुनावणीस आला. पावसकारांच्या नजरेस ही गोष्ट आणून दिल्यावर त्यांचा सुनावणीस उभे रहाण्यास सपशेल नकार. दुपारी जज्ज शिंदे, "शर्मा बाईने हाय कोर्टाचा स्थगिती आदेश ४ जानेवारी पर्यंत न आणल्यास ताबा देण्याची प्रक्रिया सुरु करावी."

विषारी साप आता ठेचत आणलेला होता...त्याची जोरदार तडफड चालू होती...
समोर मी होते...
न्यायाची बाजू माझी होती.

२६ एप्रिल २००५
मुंबई हायकोर्ट
शर्मा बाईचे वकील शेट्ये ह्यांनी असा विवाद केला: खालील कोर्टाने संपूर्ण अपिलावर फेर सुनावणी घेतली हे चूक होते. कारण हायकोर्टाने फेरसुनावणी घ्यावी हे सांगताना संपूर्ण अपिलाची घ्यावी असा काही आदेश दिला नव्हता.
त्यावर न्या.रंजना देसाई यांनी म्हटले: तुमचे म्हणणे जरी मान्य केले तरी खालील कोर्टात तुमच्या वकिलांनी ही हरकत न घेता स्वतः संपूर्ण अपिलावर सुनावणी दिली असल्याने आता ती तुम्हांला मान्य नाही हा मुद्दा येथे गैरलागू होतो ! सबब तुमचे रिट पिटीशन आता फेटाळले जात आहे.

म्हणजेच शर्मा बाईचे हे हाय कोर्टात दाखल केलेले दुसरे रिट फेटाळले गेले. मात्र त्यांना घर खाली करण्यास २ महिन्याची मुदत दिली गेली. त्या मुदतीत घर खाली करून देऊ असे शपथपत्र घरातील प्रत्येक माणसाने, २ आठवड्यांत करून, हायकोर्टात दाखल करावे असा आदेश देखील हाय कोर्टाने दिला.

२७ जून २००५
रत्नागिरी
हाय कोर्टाचा हा आदेश आता खाली रत्नागिरी कोर्टात आलेला होता. समोर न्यायाधीशांच्या आदरणीय खुर्चीत बसलेले शिंदे ह्यांनी आदेशाची पाने वरखाली केली. समोर मी व फलटणकर हजर. "हा हाय कोर्टाचा आदेश इंग्रजीत आहे. तो काही मला कळत नाही. तुम्हीं सांगा पाहू मराठीत."
फलटणकर...त्यांचे कायद्याचे ज्ञान व शुद्ध मराठी. संपूर्ण आदेश त्यांनी शिंद्यांना समजावून सांगितला.
"छे छे ! नाही हो ! काहीच कळत नाहीये ! मला नीट वाचावे लागेल. व त्यासाठी मी तुम्हांला पुढील तारीख देतो."
तारीख ३ आठवड्यांनंतरची !

त्या दिवशी, परतीचा रस्ता मला तोडफोड करून उद्ध्वस्त करावासा वाटला...
"का केलं हे असं त्या न्यायाधीशांनी ?"
"काय माहित ? पावसकारांनी काय खेळ खेळला होता...कोण जाणे ?"
"आणि आपण का काही नाही करू शकलो ?"
फलटणकरांनी समोरून अंगावर येणाऱ्या ट्रकला रस्ता दिला व आमची गाडी अधिक वेगाने समोरील अंतहीन रस्त्यात दामटवली.

त्यानंतर...
जुलै २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे, हायकोर्टाने शर्मा बाईला २६ सप्टेंबर २००५ पर्यंत मुदत वाढून दिली...

९ नोव्हेंबर २००५
रत्नागिरी
सकाळी १० वाजता कोर्टात हजर.
ऑर्डर ताब्यात घेऊन दुपारी ३ दिवस घरी पोचलो. बाईला अजून दोन दिवस हवे होते.
"अनघा, बाई अजून दोन दिवस मागतायत." अंगणाबाहेर मी उभी होते. फलटणकर तिचा निरोप मला सांगत होते.
"तिला सांगा, गुमान निघायला. नाहीतर मी आत शिरेन आणि हाताला धरून बाहेर काढेन तिला !" माझ्या अंगातील मावळी रक्त बऱ्याचदा मला उसळ्या मारताना जाणवतं.
बाईने घर रिकामं करायला सुरुवात केली. सूर्यास्त झाला.

१० नोव्हेंबर २००५
सकाळी ८.३० वाजता बेलीफांना सोबत घेतले व घरी पोचलो. त्यांनी त्यांची चार माणसे कामाला लावली. एकेक करून तिचे घरातील मोठे सामान बाहेर पडू लागले. शेजारपाजार जमला. गाजावाजा झाला. मी आमच्या गाडीपाशी उभी होते. हातात बाबांचा फोटो होता. रक्त उसळ्या मारत होतं. डोकं गरम झालं होतं. आम्ही म्हणे खरे साळुंके. गावची पाटीलकी आम्हांला शिवाजी महाराजांच्या काळात दिली गेली होती...आणि म्हणून आम्हीं पाटील. आज त्याची आठवण झाली.
जानेवारी २००३ ते नोव्हेंबर २००५. जवळजवळ ३ वर्षे. जशी संथ संथ गतीने रत्नागिरी कोर्टात वीस वर्षे तारखा घेतल्या त्याच गतीने हाय कोर्टात तारखा घ्याव्यात...म्हणजे आयुष्यभर राहून घ्यावं...हा बाईचा अंदाज असावा...हेच मनचे मांडे असावेत. तीन वर्षांत युद्ध आटोपले. कित्येकदा संताप झाला...अनेकदा धीर सुटला. एकूण गेला बाजार, चाळीस ते पन्नास तारखा घेतल्या. सहा महिन्यांत. लाखभर रुपये खर्च झाले. एकाच वेळी रत्नागिरी व मुंबईत युद्ध झालं. युद्धही असं, एकही शस्त्र माहित नसलेलं. पण प्रत्येक क्षणी मनात धगधगतं ठेवलेलं. आज मी गाडीपाशी उभी आहे आणि ती दिसते एकेक चीजवस्तू बाहेर काढताना. दुरून ती माझ्याकडे बघते त्यावेळी माझी नजर तिला आरपार करते. ती तरातरा तिच्या तिने बांधलेल्या घरात निघून जाते.
सूर्यास्त झाला. घर रिकामे झाले. हाताशी सुतार घेतले. पत्रे लावून पडवी बंद केली. रात्रीचे ११ वाजले होते. काळोख दाट होता. हिरव्या दोरीला लटकणारा पिवळा दिवा मंद पसरला होता. पत्र्याचा व हातोडीचा आवाज घुमत होता. बघे अजूनही येतजात होते. "हे तू बरं केलंस. बाई माजली होती !" शेजारीण बोरकर कुजबुजली.

"हे होणारच होतं...! माझे बाबा कधीच हरत नाहीत !"

चांदण्या रात्री चमचमणाऱ्या त्या पत्र्याच्या दारावर मी माझ्या बाबांचे नाव रेखले.
विश्वास पाटील.

परतीचा अंधारलेला रस्ता उजळून गेलेला...


Saturday, 21 May 2011

कोर्टाची पायरी...भाग ६

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५

अख्खं २००३ चं वर्ष...
काय नाही झालं ह्या वर्षात...

८ ऑक्टोबर २००३
रत्नागिरी
सकाळी साडे अकरा वाजता, २४ मार्चला दिलेली पाटलांच्या वारसांची नावे हायकोर्टात लावण्यासाठी, शर्मा बाईच्या पावसकरांनी, ऑक्टोबरच्या २४ तारखेला रत्नागिरी कोर्टात अर्ज दाखल केला. तब्बल सहा महिने त्या कागदावर पावसकर विश्रांती घेत होते. भुर्क्यांनी सदर मुदतवाढ दिली जाऊ नये ह्यासाठीचा अर्ज कोर्टाला सादर केला. दुपारचे भोजन करून झाल्यावर जज्ज भोसले ह्यांच्यापुढे सुनावणी. १८ ऑक्टोबर ही अलीकडची तारीख दिली गेली.

१८ ऑक्टोबर
रत्नागिरी
दुपारी एक वाजता कोर्टात खटला चालू. भुर्के गैरहजर. मी जज्ज समोरच. आत्तापर्यंत ह्या कारभाराची सवय झाली होती. मार्च ते ऑक्टोबर. जसा, आठ महिन्यांचा एक शॉर्ट कोर्स. जज्जनी माझ्याकडे विचारणा केली. "तुमचे वकील कुठे आहेत."
उत्तर द्यावयास फलटणकर सरसावले. सामान्य माणूस बोलायला उठला तर जज्जना त्याचे म्हणणे ऐकणे भाग असते. हा माझ्यासाठीचा एक नवीन धडा.
"आम्ही जागेचा कब्जा मिळवण्यासाठी दरखास्त केली आहे. समोरच्या पार्टीने अजूनही त्यांचे म्हणणे मांडलेले नाही. हाय कोर्टात त्यांनी अपील केलेले नाही. तसेच त्यांचे रिट पिटीशन देखील हाय कोर्टाने दाखल करून घेतलेले नाही. वारसांची नावे त्यांना कळवून देखील ६ महिन्यांत त्यांनी खटल्याला ती नावे जोडलेली नाहीत. म्हणून आता कोर्टाने त्यांना अधिक वेळ देऊ नये." भुर्के नव्हते...बरेच झाले. एव्हढे सगळे ते बोलले असते की नाही तेच जाणे.
"ठीक आहे. शेवटची संधी म्हणून त्यांना ३१ ऑक्टोबर ही तारीख मी देतो. आणि त्यादिवशी ऑर्डर देऊ."

पहाटे चार वाजता दादर सोडावे. सकाळी ११ वाजता रत्नागिरी कोर्टासमोर गाडी लावावी. कोर्टात पुढील तारीख घ्यावी व तडक मुंबईच्या रस्त्याला लागावे...एक मात्र खात्री करावी...कोर्ट पुढची तारीख जर देणारच आहे तर ती सर्वात नजीकची मिळवावी. आता चार/सहा महिन्यांनंतरची तारीख मला कबूल नव्हती. जज्ज समोर उभे रहावे...आणि देणारच आहात तर सर्वात जवळची तारीख मागावी.

३१ ऑक्टोबर
रत्नागिरी
११ वाजता कोर्टात हजर. १२ वाजता शर्मा बाईचे म्हणणे फाईल केले गेले. आज भुर्के हजर. बाईचे म्हणणे वाचून भुर्के यांनी बाई ताबा देण्याबाबात व केस चालवण्याबाबत मुद्दाम चालढकल करत असल्याने आम्हांला त्वरित ताबा देण्यात यावा असे कोर्टाला सांगितले. त्यावर ? त्यावर पुढील तारीख. शर्मा बाईच्या वतीने वादविवाद करण्यासाठी पुढील तारीख. मग आम्हीं कुठली तारीख मान्य करावी ? लगेचची ! दूर जा कशाला ? आम्हांला उद्याचीच तारीख द्या. आम्ही मुंबईहून येतो. परत जाऊन येणे आता शक्य नाही. तेव्हा कोर्टाने उद्याची तारीख द्यावी. कोर्टाने तारीख दिली १ नोव्हेंबर.

१ नोव्हेंबर
रत्नागिरी
तो शनिवार होता. ११ वाजता कोर्टात हजर. १ वाजता बाईच्या वकिलाचा, पावसकारांचा १ आठवड्याच्या रजेचा अर्ज कोर्टाकडे आला. थंडीतापाने ते अचानक आजारी पडले होते. आमचे भुर्के अचानक मुंबईला गेलेले होते. पुन्हा फलटणकर. "जर समोरच्या पार्टीचे वकील आजारी असल्यास त्यांनी प्रत्यक्ष हजर न रहाता लेखी आर्गुमेंट जमा करावे."
पुढील तारीख. सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर. "जर त्या दिवशी त्यांनी आर्गुमेंट न दिल्यास कोर्टाने ऑर्डर द्यावी." आता दोर खेचावयाचेच होते. घट्ट धरावयाचे होते. कुठेही थोडीही ढील न देता. सहनशक्तिचा कडेलोट.
कोर्टातून तडक मुंबईचा रस्ता. पहाटे कधीतरी घरातील बिछान्याला पाठ लागली.

सोमवार
दिनांक ३ नोव्हेंबर.
पहाटे ४ वाजता रत्नागिरीचा रस्ता. ११ वाजता कोर्ट. दुपारचे २.३०. पावसकारांची पुढील चाल.
आता हाय कोर्टात मॅटर रिफर केले गेल्यामुळे व तिथे ७ नोव्हेंबर तारीख असल्याने, खालील कोर्टाने १४ नोव्हेंबरपर्यंत खटला प्रलंबित केला.

बॅडमिन्टनचे जसे शटल. इथून तिथे. पावसकारांनी ही अशीच वीस वर्ष खाल्ली होती. बाबांच्या आयुष्यातील. काय माझे बाबा शटल होते ? ह्या शर्मा बाईला मीच पुरून उरेन. रत्नागिरी ते मुंबई गाडीचा रस्ता एव्हांना तोंडपाठ झाला होता. उन्हाळ्यातील पिवळे व पावसाळ्यातील हिरवे कोकण. येता जाता गाडीबाहेर एकटक बघत बसे. मी डोक्यात राख घालून घेऊन काहीच होणार नव्हते. काय करू शकत होते मी...? एकच...मी एकच करू शकत होते. दर वेळी कोर्टात हजर रहाणे...जवळची तारीख घेणे. तरच मी दिनदर्शिकेला चाकं लावू शकत होते. इतकी वर्षे पावसकर कासवावर स्वार झाले होते...नाही त्यांना सश्यावर बसवले तर नावाची अनघा नाही मी ! नाही शर्मा बाईला नाचवली तर पाटलांची अनघा नाही मी !

आणि १५ जानेवारी २००४.
तब्बल एक वर्षानंतर, मुंबई हाय कोर्टात रिट पिटीशनची सुनावणी होऊन खटला पुन्हा खालील कोर्टात पाठवला गेला.

हाय कोर्टाच्या निकालावर खाली भिडे खुष होते. "आता भाडे बाईने नीट न भरल्याच्या मुद्द्यावर देखील दावा करता येईल. बाईची दुसरी जागा आहे हा मुद्दा आपल्या बाजूचा आहे. तो आता योग्य प्रकारे मांडू. पुढली तारीख ७ एप्रिल आहे. ५ ला मला फोन करा तुम्हीं."

पुढे एप्रिल, मे, जून, जुलै ?...तारखा घेतल्या.

१० ऑगस्ट.
रत्नागिरी. दुपारी दोन वाजता खटला चालला. भिड्यांचे मुद्दे हे असे- मध्येमध्ये न भरलेले भाडे हे नियमित भरलेले भाडे होऊ शकत नाही. त्यांनी उदाहरणादाखल सुप्रीम कोर्टाचे दाखले बरोबर आणले होते. जज्ज, "पुढील तारीख १७ ऑगस्ट. त्या दिवशी निकाल सांगितला जाईल."

मग काय झाले १७ ऑगस्टला ? आम्हीं दादरहून ४.३० ला निघालो व रत्नागिरी कोर्टात ११.३० ला पोचलो. वेळ सवयीची होती. रस्ता नेमिचा होता. जज्ज ? ३ दिवस सुट्टीवर गेले होते. मग ? पुढील तारीख २१ ऑगस्ट. मग २१ तारखेला पुढील तारीख. २५ ऑगस्ट. मग २५ ऑगस्टला पुढील तारीख. २७ ऑगस्ट.

आणि पुन्हा एकदा १ सप्टेंबरला रत्नागिरी कोर्टात निकाल लागला.

आता पर्यायी जागेच्या मुद्द्यावर बाबा जिंकले.
२००२ साली बाबा दोन मुद्द्यावर जिंकले होते. व बाकी मुद्दे रत्नागिरी कोर्टाने वाऱ्यावर सोडून दिले होते. मग जानेवारी २००४ साली हाय कोर्टाने त्या वाऱ्यावरच्या मुद्द्यांचा देखील विचार करण्याचे आदेश दिले. आणि १ सप्टेंबर २००४ रोजी रत्नागिरी कोर्टाने न्यायाची बाजू उचलून धरली.

बाबा पुन्हा जिंकले.

तारखा लवकर पाडून घेतल्या.
किमान ३ ते ४ वर्षे खटला अलीकडे खेचला.

पावसकरांना सश्यावर बसवले.
पाठी शर्मा बाई...
धापा टाकत !

मागला अनुभव.
पुन्हा हाय कोर्टात कॅव्हिएट दाखल करणे गरजेचे.

कोर्टाची पायरी...भाग ५

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

२५ मार्च २००३ ची रात्र. रत्नागिरीतून कोकणकन्या नुकतीच निघाली होती. मी खिडकीत बसले होते. पहाटे मुंबई येणार होती. दोन दिवसांची कामे आटपून फलटणकर व मी घरी निघालो होतो. समोरच्या सीटवर कोणी वयस्कर गृहस्थ बसले होते. गोरे, बारीकसे, थोडे कमरेत वाकलेले. अंदाजे सत्तरीच्या आसपास वय. ते काका, झोपायची तयारी करू पहात होते. पांढरी चादर काढली व चालत्या गाडीत थोड्या कापऱ्या हातांनी चादर अंथरायचा त्यांचा प्रयत्न चालू झाला. बाबा घरी कायम चटईवर झोपत असत. सर्वात प्रथम चटई, मग त्यावर सतरंजी, त्यावर उभी घडी केलेली त्यांची हिरवी चादर व सर्वात वर एक पांढरी शुभ्र चादर. त्या रविवारी देखील १२ च्या सुमारास मी त्यांना हिंदुजातून घेऊन आले होते...त्यांची ही खास गादी करून दिली होती व त्यानंतर पाच मिनिटांवर असलेल्या माझ्या घरी गेले होते. म्हणे मी गादी छान घालत असे. म्हणजे, एकही सुरुकुती येऊ नये...असा प्रेमाने गादीवर हात फिरवावा की बाबांच्या उघड्या मऊ पाठीला एकही चूण टोचू नये. पहाटे सहा वाजता त्यांचा फोन आला. "मला काही बरे वाटत नाहीये. तू अॅम्ब्युलन्स बोलव. कालच्या सारखा मी नाही उतरू शकणार जिने..."
"येते मी बाबा. आणते अॅम्ब्युलन्स."
स्ट्रेचरवर बाबांना ठेवले..."अरे, तुम्हांला जड पडत असेल ना..." बाबा स्ट्रेचर उचलणाऱ्या माणसांना विचारत होते.
बाबांना जाऊन ३ महिने उलटले होते.

"काका, मी घालून देऊ तुम्हांला गादी ?"
"अरे बेटा, घाल ना...मी बसतो असा बाजूला..."
काकांना गादी घालून दिली....एकही चूण नसलेली, धडधडत्या आगगाडीतील गादी.

ओळख झाली...काकांचे नाव बापट. पेशा वकिलाचा. कर्मभूमी मुंबई हाय कोर्ट.
"काय नाव तुझं ?"
"अनघा. अनघा निगवेकर."
संभाषण सुरु झालं...काका हाय कोर्टात वकील आहेत. फलटणकर अॅडव्होकेट आहेत. ते कोर्टात खटले चालवत नाहीत. माझ्या अपुऱ्या माहितीत फलटणकरांनी रीतसर भर घालून काकांना खटला नीट समजावून सांगितला. कपाडिया फौजदारी खटले चालवत. दिवाणी नाही. हाय कोर्टात उभे राहून खटला चालवण्यासाठी कोणा हाय कोर्टात प्रॅक्टिस असलेल्या वकिलाची गरज लागण्याची शक्यता त्यावेळी नाकारता येत नव्हती. रात्र वाढली होती. सहप्रवासी दिवे मालवून आडवे झाले होते. मीही मग काकांच्या समोरील सीटवर निद्रादेवीच्या विनवण्या सुरु केल्या...माझ्या आयुष्यातील कोर्टाच्या चकरांना नुकतीच कुठे सुरुवात झालेली होती...हे किती काळ चालणार आहे...किती खेपा घालाव्या लागणार आहेत...देवच जाणे...
पहाटे दादर आलं...मी उतरून गेले. रात्री काकांचा दूरध्वनी क्रमांक वहीत लिहून घेतला होता....

मुंबईत खटला चालवण्यासाठी बापटकाकांनी त्यांचे सहकारी, लिमये, यांची भेट घडवून दिली. काळे मध्यम उंचीचे लिमये वकील. वय साठीच्या आसपास.

१५ जानेवारी २००४.
मुंबई हाय कोर्ट.
१२ ऑगस्टला तात्पुरता उठवलेला स्टे व हाय कोर्टाने रत्नागिरी कोर्टाकडून मागवलेले खटल्याचे कागद...हे समोर घेऊन त्या दिवशी न्यायमूर्ती चंद्रचूड ह्यांसमोर खटला सुरू झाला होता. बाबा खटला जिंकून कधीच वर्ष उलटून गेलं होतं. त्यानंतर शर्मा बाईने हाय कोर्टाला केलेल्या विनंती अर्जावरची ( रिट पिटीशन ) ही सुनावणी होती. कोर्ट रुममध्ये माझ्या सोबत होते अॅडव्होकेट फलटणकर. समोर न्यायामुर्तींकडे तोंड करून व आम्हांला पाठमोरे, काळ्या कोटातील वकील लिमये तयारीनिशी उभे होते. बाजूला बाईचे वकील, देसाई.
प्रत्येक पक्षाला त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. मी कान लावून ऐकण्याचा जीवतोड प्रयत्न केला...परंतु, कोर्टातील संवाद हळू आवाजात होता...भाषा, बोली नव्हती. मला हळूहळू बहिरेपणा येऊ लागला....काहीही कळेनासे झाले. फक्त हालचाली काय त्या कळत होत्या...देसाई उभे राहिले...देसाई बोलले...लिमये उभे राहिले...लिमये बोलले...न्या.चंद्रचूड यांची भूमिका श्रोत्याची. सर्व ऐकून झाले...आता रिट पिटीशनवर त्यांना निर्णय द्यायचा होता. त्यांनी बाजूलाच बसलेल्या टंकलेखकाकडे बघून आदेश द्यावयास सुरुवात केली. अजूनही मला काहीही ऐकू येत नव्हते. नक्की काय चालले आहे काहीही कळत नव्हते. चंद्रचूड आपल्या बाजूने बोलत आहेत काय ? की आदेश आपल्या विरुद्ध चालू आहे ? काहीही कळायला मार्ग नव्हता. अकस्मात पाठमोरे लिमये खिश्यातून रुमाल काढून घाम पुसताना दिसू लागले. बाजूला बसलेले फलटणकर खाडकन उभे राहिले. पुढे जाऊन लिमयांच्या कानात काही पुटपुटू लागले. चंद्रचूड अजूनही टंकलेखकाकडे बघून आदेशच देत होते. फलटणकर कानात काही बोलल्यावर लिमये न्यायमुर्तीना काही सांगू लागले. आता न्यायमूर्ती, विरुद्ध पक्षाच्या वकिलांकडे बघून काही विचारू लागले...ते काहीतरी उत्तरले....व अखेरीस न्यायमूर्ती परत एकदा आपल्या टंकलेखकास काही आदेश देऊ लागले. आमची वेळ संपली. आदेश देऊन झाला. माझ्यासाठी हा सगळा मूकपट.

आम्ही तिघे कोर्ट रूममधून बाहेर पडलो.

पिवळ्या भिंतींच्या एका कोपऱ्यात लिमये वकील बसत असत. त्यांच्या जागेवर गेलो. लिमये व फलटणकर ह्यांची काही जोरदार चर्चा झाली. मी आत्तापर्यंत दोनदा फलटणकरांना विचारून झालं होतं...काय झालंय ?
"Wait. सांगतो."
"काहीतरी वाईट झालंय का ? आपल्या विरोधात गेलंय का ?"
"एक मिनिट धीर धर. इथून बाहेर पडल्यावर सांगतो."

ती वीस मिनिटे उगाच रेंगाळत चाललेली...म्हणजे कधी थकून गेलो की आपले पाय जसे उचलून टाकता येत नाहीत...तसेच काहीतरी घड्याळाला झाले होते...सरकता सरकेना...लिमये व फलटणकरांची चर्चा संपेना.

"ओक्के. न्यायमूर्ती आज आपला खटला मुंबई हाय कोर्टात दाखल करून घेत होते." आम्ही हाय कोर्टातून बाहेर पडलो होतो. रस्त्याला लागलो होतो. माझ्या हातात एक जडशी थैली. कायदेकानूंनी भरलेली.
"म्हणजे ?"
"म्हणजे त्यांना दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर असे वाटले की ह्यात अजूनही काही विचार होण्याची गरज आहे."
"मग ? आपला खटला इथे अॅडमिट झाला ?"
"झाला असता...पण नाही झाला...ते म्हणाले की हा खटला मी इथे दाखल करून घेऊ शकतो कारण ह्यात दोन्ही बाजूंच्या म्हणण्याचा अजून सखोल विचार होणे आवश्यक आहे."
"मग ?"
"जर आज खटला इथे दाखल होता...तर पुढची वीस वर्ष आपण पायऱ्या चढत राहिलो असतो. म्हणून मी उठून लिमयांना म्हणालो की खटला खाली पाठवायला सांगा ! आणि नशिबाने त्या बाईचे वकील देखील त्या गोष्टीला तयार झाले आणि म्हणून खटला आज इथे अॅडमिट झाला नाही !"
"म्हणून लिमयांना घाम फुटला होता ?"
"हो...कारण आज मॅटर अॅडमिट होताहोता थांबलाय..."
"व्वा ! म्हणजे तू त्या क्षणी उठून लिमयांना सांगितलं नसतंस तर ते काय फक्त घाम पुसत रहाणार होते ?"
"ठीक आहे...नाही झालं ना काही वाईट ?"
"पण मग आता काय करायचं आपण...? आता हा जो खालच्या कोर्टाने निर्णय दिलेला आहे तोच परत तिथेच जाऊन घ्यायचा ? दिलाय ना त्यांनी आधीच निकाल ? जिंकलोय ना आपण तिथे ? आता परत तिथेच जाऊन काय करायचं ?"
"तसं नाहीये ते."
"मग कसं आहे ? मला काहीच कळत नाहीये ! तिथे कोर्टात मला काही ऐकूच येईनासे झाले ! म्हणजे ऐकू येत होतं पण ते काय बोलतायत ते मला काहीच कळत नव्हतं !"
"ते कोर्टाच्या भाषेची सवय नसली की होतं तसं..."
"पण असं खाली का पाठवलं त्यांनी आपल्याला ? त्यांनीच का नाही निकाल देऊन टाकला ?" भोकाड....भोकाड पसरायचं होतं खरं तर....पण रस्त्यात नाही करता येत असलं काही....
"त्यांनी खालील कोर्टाला असा आदेश दिला आहे की...मूळ दाव्यावरील जो निर्णय दिला गेला होता तो सर्व मुद्दे लक्षात घेऊन नव्हता...त्यातील काही मुद्दे तसेच अर्धवट सोडून दिले गेलेले आहेत...आपले म्हणणे असे आहे की शिल्लक मुद्द्यांवर देखील निर्णय व्हावा...व बाईचे म्हणणे आहे, की सर्व निकालच रद्दबादल व्हावा ! म्हणून आता परत एकदा सुनावणी घेऊन पूर्ण निकाल देण्यात यावा."
"मग आता किती दिवस लागतील...हे संपायला...?"
"बघू...संपवू आपण हे लवकर..."
"हे लवकरच संपवायला वं आहे ! माझी लेक काही चालवणार नाहीये ही केस पुढे ! मी खरंच सांगतेय !"
"खालच्या कोर्टात नाही लागणार इतके दिवस. म्हणजे निदान वीस वर्ष तरी नाही लागणार !"

पुन्हां रत्नागिरी...पुन्हा कोर्टाच्या पायऱ्या.
बाबांच्या आयुष्यातील वीस वर्षे + माझ्या आयुष्यातील फक्त दहा महिने !

अजून किती दिवसांची आहुती...ह्या युद्धात...?

Friday, 20 May 2011

कोर्टाची पायरी...भाग ४

भाग १
भाग २
भाग ३

१५ जुलै २००३
रत्नागिरी.

भिडे व भुर्के वकिलांच्याने काही तारीख लवकरची करून घेणे झाले नाही. कारण तसे रक्तातच नाही. कोर्ट जी तारीख देईल ती तारीख...घाई कुणाला आहे अशी मानसिकता...मग त्यात संबंधित लोकांची आयुष्य का जाईना. जितकी अधिक वर्ष खटला चालेल तितकेच त्यातून उत्त्पन्न वाढेल....असा त्यांचा विचार असावा.

कधी कधी शंका येते...भिडे व भुर्के नक्की काय करत होते...का ते लवकरच्या तारखा घेत नव्हते....काय ह्याच त्यांच्या कार्य पद्धतीमुळे वीस वर्षे गेली होती ? कोर्टात जाऊन ज्या वेळी एक अख्खा दिवस वीस वर्षांची पोतडी उघडून बघितली तर ही शंका अधिक प्रबळच झाली...मूळ वकील, पावसकर ह्यांना कायम ठेवून शर्मा बाईचे अधून मधून वकील बदलणे... आजारपणाची कारणे देऊन तारखा महिना महिना पुढे ढकलून घेणे. बाबांचे नोकरीधंद्यानिमित्त मुंबईतील वास्तव्य. उठसुठ रजा घेऊ न शकण्याची व कोर्टात दर तारखेला हजर राहू न शकण्यातील त्यांची हतबलता. खरं तर, त्यांचा जीव, एखाद्या पुस्तकांच्या दुकानात वा एशियाटिक वाचनालयात तासनतास रमणारा. एखादे पुस्तक वाचा...त्यावर मित्रांशी चर्चा करा...टिपणी करून ठेवा...'नवी क्षितिजे' ह्या त्यांच्या त्रैमासिकासाठी लिखाण करा...नाहीतर पहाटे पाच वाजताच बाजारात जाऊन चांगले निवडून निवडून मटण, गावठी कोंबडी घेऊन या...स्वत: व्यवस्थित साफ करून...सर्वांना खायला घाला...समोरच्या माणसाच्या चेहेऱ्यावरील तृप्तीचा आनंद लुटा....हे पाटलांचे छंद.
त्यांच्यासाठी, हा नस्ता मागे लागलेला आणि वेळ व पैसे खाणारा व्याप. हे सर्व विरुद्ध पार्टीच्या पथ्यावर पडणारं.

पण घाईला, मी पेटले होते...हे मला संपवायलाच हवे होते...शर्मा बाईला बाहेर काढायचेच होते...लवकरात लवकर...माझ्या हातात निर्णय दिले असते...तर ताबडतोब ! कदाचित बाबांसाठी तो फक्त एक खटला होता...पण माझ्यासाठी तो 'माझ्या बाबांचा' खटला होता...ज्या खटल्याने माझ्या बाबांना त्रास दिला होता...मानसिक, शारीरिक व आर्थिक. त्यांची काहीही चूक नसताना...
शर्मा बाईला 'मी' महाग पडणार होते...बाबांपेक्षाही अधिक !

त्यादिवशी रत्नागिरी कोर्टाने आमचा 'घराचा ताबा घेण्याचा अर्ज' दाखल तर करून घेतला परंतु, शर्माच्या वकिलांनी, पावसकरांनी, आम्ही हाय कोर्टात रिट पेटिशन दाखल केल्याचे त्या कोर्टाला सांगितले व पुढील तारीख मागितली. त्यावर जिल्हा कोर्टाने त्यांना तुमचे 'रिट पेटिशन' (विनंती अर्ज) हे हाय कोर्टाने दाखल करून घेतले आहे किंवा फेटाळून लावले आहे ह्याबद्दल माहिती देण्यास सांगितले. त्यासाठी पुढील तारीख दिली गेली.


१२ ऑगस्ट.
मुंबई.
दुपारी माझा मोबाईल वाजला. समोरून कपाडियांचे सहकारी चितळे बोलत होते.
"सकाळी हाय कोर्टात आपली केस उभी राहिली होती. व खालील कोर्टाच्या निकालावर हाय कोर्टाने स्टे दिला होता."
"म्हणजे ?! आता ?"
"परंतु, मला ते कोर्ट चेंबर मध्ये स्क्रीन वर फ्लॅश होऊन गेल्यामुळे कळले. मग मी हाय कोर्टात दुपारी पुन्हा केस उभी केली. जज्जना कळवले की आपण हाय कोर्टात कॅव्हिएट दाखल केलेले आहे. त्यामुळे आम्हांला आमची बाजू सांगण्याची संधी दिल्याविना असा 'स्टे' दिला जाऊ नये."
"मग ?" मला अजूनही हे सगळे शब्द...ही कोर्टाची भाषा कठीण जात होती...
"तेव्हा मग कोर्टाने सकाळी दिलेला स्टे उठवला आहे. व ह्या खटल्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे खालील कोर्टाकडून मागवून घेतली आहेत."
"हो का ? मग आता ??"
"येतील कागदपत्र..."
"किती दिवस जातात त्यात ?"
"महिना दीड महिना..."

आपल्या इच्छांची घोडदौड व कायद्याची कासवगती....

२७ जूनला हाय कोर्टात दाखल केलेल्या एका 'कॅव्हिएट'ने, १२ ऑगस्ट रोजी अंगावर येणारी, एक प्रचंड लाट थोपवून धरली होती.

बऱ्याचदा मला वाटतं...देव माझ्याकडे लक्ष ठेऊन आहे. रोज उठून सिद्धीविनायकासमोर रांग लावण्यातील तर मी नाही. संकटे तोच उभी करतो...मान्य. पण, काय तो संकटात मला एकटं टाकतो ? माझी मजा बघत काय तो हाताची घडी घालून, नुसती बघ्याची भूमिका घेतो ? नाही. ऐनवेळी...प्रत्येकवेळी...तो पुढे येऊन वाचवतो. सावरतो. आणि मग मी त्या त्या संकटांमधून काही ना काही शिकत जाते...पुढील आयुष्यासाठी तयार होत जाते. जशी काही ही माझी अडथळ्यांची शर्यत आहे. शर्यत एकटीचीच. अडथळा कधी उंच तर कधी फक्त एक हलकासा गतीरोधक. पण काय हरकत आहे ? जर शेवटी, त्याने तयार केलेल्या शर्यतीत मी उतरत राहिले तर आज ना उद्या उत्तीर्ण होईनच ! नाही का ?
मग बसेन शांतपणे खिडकीपाशी...हातात कॉफीचा माझा मग घेऊन...एकेक घोट शांतपणे घेत...!

फक्त ह्या सर्व परीक्षा त्याने माझ्यासाठीच ठेवाव्या...
माझ्या बहिणी, माझी आई व माझी लेक...
ह्यातून दूर रहाव्या...
इतकंच काय ते.

विषयांतर झालं !

कोर्टाची पायरी...भाग ३

भाग १
भाग २

बाई मुंबईपर्यंत पोचली होतीच.
माझ्या भोळसट मनाचा उगाच एक भ्रम...रत्नागिरीत असेल तुझी वट...पण मुंबई माझी आहे...!

दुर्दैवाने, अजून पुष्कळ धडे बाकी होते...

२८ मार्च...
कॅव्हिएट तयार झालं...तयार करून ठेवू, गरज भासली तरच दाखल करू...उगाच का खर्च...कपाडिया म्हणाले.
कॅव्हिएट केल्याने शर्मा बाईने केलेल्या विनंती अर्जाचा ( रिट पिटीशन ) विचार करीत असता, मुंबई कोर्ट आम्हांला न कळवता कोणताही निर्णय घेऊ शकणार नव्हते. तो दिलासा होता अदमासे १० हजार रुपयांचा.

"I feel Anagha, आता आपण रत्नागिरीत decree execute करावयास हवी. डिसेंबरपासून भरपूर वेळ गेलेला आहे." श्री. कपाडिया म्हणाले. एखादा माणूस आपल्याला भेटतो...व विश्वास देऊन जातो. तसेच काहीसे कपाडियांबद्द्ल म्हणता येईल. साठीच्या आसपास असावेत. थोडी स्थूल शरीरयष्टी. गोल तजेलदार चेहेरा. साईसारखा...
"decree execute ? म्हणजे ?"
"म्हणजे रत्नागिरीच्या कोर्टात पाटलांच्या बाजूने निकाल लागला...बरोबर...? मग आपण तो निकाल धरून घर रिकामे करून घेण्यासंदर्भात त्या कोर्टाकडून ऑर्डर का मिळवू नये ?"
"असं करू शकतो का ? मग करुया..."
"आणि ती बाई तुझ्याकडे तुझं घर विकत मागते ना...? मग तू तिलाच सांग ना...की मी तुला पैसे देते...तू तुझीच सगळी जागा आम्हांला दे...!"
मी हसले..."नको....तिच्याशी काहीही व्यवहार नको आपण करायला...हेच कोर्ट मॅटर संपवूया आपण लवकर...."
"ठीक ठीक. हे असं देखील तुम्हीं करू शकता हे आपलं मी सांगतोय तुम्हांला."
"बरोबर."
...इतक्या वर्षांचे घरमालक भाडेकरूचे नाते...कुठल्याही प्रकारे ग्राहक व विक्रेता ह्यात रुपांतरीत होणारे नव्हते.

हाय कोर्टातून अधिक माहिती मिळाली...हा खटला जज्ज राधाकृष्णन ह्यांच्याकडे लागला आहे. मे पर्यंत तरी त्याचं काहीही होणार नाही. व खालील कोर्टाच्या निकालावर 'स्टे' आलेला नाही. खटला 'पेंडिंग' ठेवला गेला आहे. जर कोर्टाला दाखल केलेले कागदपत्र पुरेसे वाटले नाहीत तर कोर्ट ह्या प्रकारे खटला पेंडिंग ठेवते...

२२ एप्रिल. रत्नागिरी.
वकील भुर्के ह्यांना भेटून घराचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टाची ऑर्डर घेण्यासंदर्भातील अर्जावर मी सह्या केल्या.

...आता ताबा घेण्यासाठी मला कोर्ट ऑर्डर देणार...आणि मी बाबांच्या घराचा ताबा घेणार....चला...बाबांची इतक्या वर्षांची चिंता आता मिटतच आली की...मांडे...मांडे...! अज्ञानातील सुख...!

घरी गेले...बाबांच्या नातलग गृहस्थांच्या सुनेने शेवटी बाबांना त्रास देऊन का होईना...पण बाबांचे घर रिकामे करून दिले होते...व समोरच एक मजली बांधलेल्या स्वत:च्या घरी बस्तान हलवले होते. बाबा कायम स्वरूपी मुंबईत असल्याचा किती जणांचा फायदा. त्या घरात होता एक मोठा पितळी जड भक्कम लामणदिवा...आई म्हणाली होती. मी कुलूप उघडून आत गेले...तर लहानश्या देवघरात लाकडी चौरंगावर सर्व देव, शंख, धुळीत बसून राहिले होते...चार लंगडे बाळकृष्ण...कलंडलेले. किती दिवसांत त्यांना अंघोळ नव्हती, कोण जाणे. एक छोटासा लामणदिवा, धूळ खात पडलेला. घरासमोरची विहीर. त्यावर सुनबाईचा पंप.
पुढील कालावधीत एकदा, ज्यावेळी सर्व जागेची मोजणी झाली, त्यावेळी ती विहीर आली आमच्या वाट्याला...व त्यावर सुनबाईचा पंप ! "हा पंप तर आम्ही लावलाय...आम्हांला तुम्हीं विका ही विहीर...पन्नास हजार देते मी तुला..."
"मी काही बोलले का तुम्हांला...दिसतंय ते मला की विहीर आमची आहे व पंप तुमचा आहे...आणि पाणी तुम्हीं वापरताय..."
मुंबईला पोचले त्याच दिवशी संध्याकाळी फोन वाजला. "काय ग जागेची मोजणी करून घेतलीस ना?"
"हो. आत्या. झाली मोजणी."
"एक सांगते तुला...त्या बाबाच्या सुनेचं पाणी तोडू नकोस तू ! बाबाला तुझ्या नाही पटणार ते ! वापरू दे तिला ती विहीर..."
"पण मी असं काहीच तर म्हटलं नाही ! तीच म्हणाली...पन्नास हजार देत होती ती मला !"
"पाणी विकणार आहेस का तू ? बाबाची मुलगी ना तू ?"
"अगं आत्या, मी असं कुठे म्हटलं काही ? मी तिला वापर चालूच ठेवायला तर सांगून आलेय !"
"हं...बरोबर केलंस मग तू !"
म्हणजे माणसं चांगलं वागू शकतात हे त्या लबाड सुनबाईच्या काही ध्यानात नव्हतं. तिचा नवरा खुद्द सर्वेअर...म्हणजे त्यांना हे तर माहितीच होतं ना...की विहीर आमची आहे...पाणी तर कित्येक वर्ष वापरतायत...अर्थात बाबांवर कदाचित विश्वास असेलही...पण बाबांच्या मुलींवर कुठून विश्वास ? मी तिथून निघाले नाही तर मुंबईला फोन...!
बाबांचे देव चकचकीत झाले...स्वच्छ न्हाऊन...दादरला विराजमान झाले...

३ मे.
मुंबईहून भुर्केंना फोन केला...रत्नागिरी कोर्टाने सुनावणीची तारीख दिली आहे...१५ जुलै.

६ मे.
"मी अनघा बोलतेय." कपाडियांना तारीख कळवायची होती.
"बोल बोल..."
"१५ जुलैची तारीख दिलेय खालच्या कोर्टाने."
"१५ जुलै ? It's too late Anagha ! तोपर्यंत इथे हाय कोर्टात तिचा विनंती अर्ज मान्य झाला तर काय करणार आपण ?"
"अं ?....हो का ? मग काय करू आता ?"
"त्या भुर्केला फोन लाव...आणि त्याला सांग अलीकडची तारीख घ्यायला ! मात्र जर भुर्के नाही म्हणाला तर नाही काही करू शकत आपण...आपली केस मुंबई हाय कोर्टात दाखल होता कामा नये...कारण अनघा, जर तसे झाले, तर पुढची १० वर्ष विसरून जा तू ! चालू राहील इथे ती केस ! बसशील तारखा घेत !"

२७ जून...
गरज उभी राहिली...काळजीचा ढग तरंगू लागला...
मुंबई हाय कोर्टात आमचं कॅव्हिएट दाखल झालं...

...डाव त्याचा होता...
फासे त्याचे होते....
तो ते गेली वीस वर्षे टाकत होता...
त्यात रंगून गेला होता....
डाव त्याला सोडवत नव्हता...
खेळ त्याला मोडवत नव्हता...
अजून एक फासा...
पडायचा होता.

Thursday, 19 May 2011

कोर्टाची पायरी...भाग २

भाग १.

१३ मार्च २००३.

जेव्हां अकस्मात आभाळ कोसळले आहे व आपण एका युद्धाच्या मुखाशीच उभे आहोत, हे सत्य जबडा वासून उभे रहाते, त्यावेळी आधारासाठी आसपास कोण आहे ह्यावर आपसूकच नजर जाते. असे कधीही कुठल्याही वेळेला धावून येणारे एक व्यक्तिमत्व.
"तू कधीही फोन कर ग...मी कितीही कामात असलो तरीही तुझा फोन उचलतोच की नाही ?"
"हो. ते माहितेय मला संदीपदादा...पण..."
"काय झालं ?"
"तो बाबांचा खटला. रत्नागिरीतला."
"त्याचं काय ?"
"तो बाबा जिंकल्याचं म्हणत होते. पण आता पुढे काय करायचं ते काही मला कळत नाहीये."
"ठीक. एक काम कर. जरा त्या खटल्याचे डीटेल्स मला नीट लिहून दे. मग बघू काय करायचं ते."

चार दिवसांनी संदीपदादांचा फोन.
"मुंबई हायकोर्टाने शर्मा बाईंचं रिट पिटीशन फाईल करून घेतलं आहे."
"हो ? म्हणजे ? आता ?"
"रिट पिटीशन म्हणजे विनंती अर्ज. खालच्या कोर्टाकडून तिच्यावर अन्याय झाला आहे व त्या निकालाविरुद्ध तिचे म्हणणे, मुंबई हाय कोर्टाने ऐकून घ्यावे असा विनंती अर्ज."
"मग आता मी काय करू संदीपदादा ?"
"उद्या शनिवार. मी तुला एक नाव देतो. हाय कोर्टात जाऊन त्यांना उद्या भेट. व त्या रिट पिटीशनची एक झेरॉक्स कॉपी मिळव. ती मिळवणे आपल्याला जरुरीचे आहे."
"जाते."

चार दिवसांनी हीच नकल घेऊन मी फोर्टातील त्या ओळखीच्या जेष्ठ वकिलांसमोर बसले होते. श्री. कपाडिया.

"See. All this is very time consuming. And you cannot be sure about anything. But we are going to try. Right ?"
"Right"
"ठीक. तर आता एक कर. जेव्हा रत्नागिरीला जाशील त्यावेळी शर्मा बाईंना, विश्वास पाटलांच्या सर्व वारसांची नावे व पत्ते दे. त्या कागदाची एक नकल स्वत:बरोबर ठेव व त्यावर तिची सही घे. त्यामुळे तिने दाखल केलेल्या रिट पिटीशनमध्ये ती नावे टाकणे तिला भाग पडेल. तिच्या सहीच्या कागदाची नकल काढ. ती नकल शर्मा बाईंचे वकील श्री. पावसकर ह्यांच्याकडे पोचती कर."
"बरं."
"मे मध्ये कोर्टाला उन्हाळी सुट्टी असते. त्यामुळे एप्रिल संपायच्या सुमारास शर्मा बाई, मुंबई हाय कोर्टात, जज्ज पुढे येऊ शकतात. मे महिना संपेपर्यंत खालील कोर्टाच्या निकालावर १ महिन्याचा 'स्टे' आणू शकतात. आणि मग पुन्हा जेव्हा कोर्टाचे कामकाज सुरु होईल त्यावेळेस कोर्टाचा निकाल होईल. मला सध्या तरी वाटत नाही, हाय कोर्ट हा खटला दाखल करेल..."

"अनघा, हे तुला एकटीला जमणारे नाहीये."
"पण हे आता पुढे न्यायला तर लागेलच ना ? अर्धवट तर नाही सोडून देऊ शकत आपण. मग काय करुया ?" मी माझ्या धाकट्या बहिणीच्या नवऱ्याला विचारलं.
"माझा मित्र आहे. बालपणीचा. अॅडव्होकेट आहे. त्याची आपण मदत घेऊया."
"कुठे असतात ते ?"
"ठाण्यात."
"ठाण्यात ?! मग कसं जमणार ते मला ? मी दादरला...ते ठाण्यात !"
"Nothing doing ! राजू फलटणकरच ही केस सांभाळणार !"

२४ मार्च.

दुपारी अकराचा सुमार. मी व अॅडव्होकेट राजीव फलटणकर, शर्मा बाईच्या दारात होतो. कपाडियांनी सांगितल्याप्रमाणे आम्हां वारसांचे माहितीपत्र तिच्या हातात दिले. त्यावर तिची सही व अंगठ्याचा शिक्का घेतला.
"मी काय म्हणत होते..."
तशी बुटकी. गोरी. इथेतिथे अंगावर सोने. नजर बेरकी. मी ताडकन तिच्या दारातून बाहेर पडत असता तिचा तो थोडा पुरुषी आवाज कानावर पडला. मी वळून मागे बघितले. फलटणकरांच्या स्त्री सौजन्याचा फायदा घेत बाईने त्यांना अडवले होते.
"मी म्हणते...आपण हा मॅटर सेटल करूयात ना...."
"सेटल करुया ? म्हणजे ? म्हणजे काय करुया ?" मी वळून विचारले.
"मी काय म्हणत होतु....ते तुमचे वडील उगाच ओ भांडत बसले. ते तर गेले नाही का आता...मग किती वर्स भांडणार आपण...."
"झालीत....वीस उलटून गेलीत."
"तेच तर म्हणतुय मी....हे घर तुम्ही विकून टाका...मी घेते ना ! देते तुम्हांला पैसे मी..."
डोक्यात गेली माझ्या...
"माझे मालक गेल्यावर मी एकटीच आहे हो...मी एकटीच कारखाना सांभाळते....बघा...तुम्ही पण बघा भाव मार्केटला...पण मी चार लाख देते तुम्हांला. विकून टाका मला तुम्ही !"
"व्वा ! म्हणजे माझे बाबा गेले आणि ज्यासाठी ते खटला चालवत राहिले...ते त्यांचे घरच तुम्हांला विकू मी ? वाट्टेल ते तोंडाला येईल ते बोलू नका !"
फलटणकर मला हाताने थांबवू लागले.
"हे बघा बाई. ह्या मॅडम काही एकट्याच निर्णय घेऊ नाही शकणार हा...त्यांना त्यांच्या आईला विचारायला हवे...नाही का ? आणि बहिणी पण आहेत त्यांना...त्यांच्याशी बोलतील त्या...मग बघू...तुम्ही या मुंबईला...तेव्हा बोलू..."
तरातरा मी बाहेर...
"नंतर काय बोलू ? मी काय ह्या बाईला विकणार आहे बाबांचं घर ? मीच काय...आई आणि माझ्या बहिणी पण नाही विकणार कधी !"
"नाहीच विकायचं आपण...तिला आपलं मी उगाच म्हटलं...बघू ना अजून काय अक्कल चालवते ती !"
डोकं फिरवून बसलेल्या माझ्यासाठी हा पहिली गनिमी कावा...

पोस्टात जाऊन बाईच्या वकिलासाठी, पावसकारांसाठी, एक पत्र रजिस्टर पोस्ट केले. आता विरुद्ध पार्टीशी करावयाचा सर्व पत्रव्यवहार हा पोस्टाच्या मदतीने, रजिस्टर एडी नेच करावयाचा होता. ह्यालाच पुरावे तयार करणे व गोळा करणे म्हणतात. अतिशय आवश्यक गोष्ट. जे जे लेखी आहे ते ते कोर्टात महत्त्वाचे ठरू शकते...एक धडा...

त्यानंतर भिडे वकिलांच्या सहकाऱ्याची गाठ...भुर्के वकील.
"मी काय म्हणत होतो...ती शर्मा बाई मला मध्ये भेटायला आली होती."
शर्मा बाई...ह्यांना भेटायला ?
"ती हा कोर्ट मॅटर बाहेर सेटल करायचं म्हणतेय....विकत घ्यायचं म्हणतेय ती ते घर..बघा...विकून टाका...किती वर्ष भांडत रहाणार....तुमचे बाबा भांडत राहिले ठीक आहे...पण तुम्ही सुद्धा भांडत राहिलं पाहिजे असं काही नाहीये...चार लाख म्हणतेय ती...आणि मी केली चौकशी मार्केट मध्ये...मी पण इथलाच आहे....बरोबर भाव सांगतेय ती...कमी नाहीये...पैसे घ्या...घर देऊन टाका...आणि संपवा आता हे..."
हा बाबांचा वकील ?!
"ती कितीही लाख देईना का...आम्ही हे असलं काहीही करणार नाही !"
संताप संताप...डोक्यात...भुर्के वकील...माझ्या डोक्यात...
ताडताड निघाले...
आम्ही मुंबईच्या मार्गी लागलो....

चार दिवसांनी दादरच्या घरातला फोन वाजला...
"मी रत्नागिरीहून मयेकर बोलतोय."
"कोण मयेकर ?" मी विचारलं...
"मी रत्नागिरीत सर्वेअर आहे..."
"बोला...काय काम होतं..?"
"तुम्ही कोण बोलताय...?"
"मी विश्वास पाटलांची मुलगी बोलतेय...बोला तुम्ही..."
"अहो...तुम्हांला काही चांगलं सांगायला फोन केलाय.."
"हं...सांगा..."
"ते तुमचं घर आहे ना...शर्मा बाई रहातेय ते..."
"त्याचं काय?"
"अहो, किती वर्ष तुमचे वडील खटला चालवत राहिले...आता तर ते गेले...तर मी काय म्हणतोय...ती बाई सेटल करायचं म्हणतेय तर करून टाका ना..."
"म्हणजे काय करू?"
"विकून टाका ना तिला ते घर !"
"माझे बाबा इतकी वर्ष खटला चालवत होते...ते काय मूर्ख होते काय ?"
"बघा...बाई, तुम्ही उगाच वाकड्यात जाताय...सगळ्या गोष्टी भावनांनी होत नसतात...तुम्ही अजून लहान आहात...तुमच्या आईशी बोला...बहिणींशी बोला...आणि विकून टाका ते घर तिला..."
"झालं तुमचं बोलून ? ह्यात मला, माझ्या आईला आणि बहिणींना विचारण्याची काहीही आवश्यकता नाही...कारण मला माहितेय...माझ्या बहिणी आणि माझी आई असं काहीही करणार नाहीत ज्यामुळे माझ्या वडिलांचा अपमान होईल."
"अहो, अपमान काय त्यात...पैश्याचा मामला आहे मॅडम !"
"ठेवा आता फोन मयेकर साहेब....तुमच्याशी बोलण्यात मी माझा वेळ दवडावा इतके तुमचे, माझ्या आयुष्यात महत्त्व नाही..."

घ्या हो घ्या....माझ्या बाबांचा स्वाभिमान विकत घ्या...
माझ्या बाबांची वीस वर्ष विकत घ्या...
माझ्या बाबांची अक्कल विकत घ्या...!

विद्यार्जनात तासनतास रमून जाणाऱ्या माझ्या बाबांचा स्वाभिमान...
लाखमोलाचा.

बाई गं...तुझे चार लाख...
कवडीमोलाचे.

Tuesday, 17 May 2011

कोर्टाची पायरी...भाग १

माणसाला, आयुष्यात अनेक भूमिका जगावयास लागतात. मनात असो वा नसो. माझ्या अभ्यासू वृत्तीच्या बाबांची एक भूमिका होती घरमालकाची. खुद्द रत्नागिरीतील त्यांची वडिलोपार्जित शेतीभाती, घर, गोदाम हे सर्व मागे सोडून ते बौद्धिक गरजेसाठी मुंबईत स्थायिक झाले होते. त्या त्यांच्या जमीनजुमल्याची देखभाल, त्यांनी तिथेच रहाणाऱ्या नातलग गृहस्थांवर, मोठ्या विश्वासाने सोपवली होती. त्यात भाताची शेती, माड, आंबा, फणस ह्याही गोष्टी होत्याच. कधी एखाद्या उन्हाळी सुट्टीत आंब्याच्या पेट्या मुंबईतील आमच्या घरी येत असत. कधी माश्याच्या लाल कालवणाबरोबर, लालसर दिसणारा चवदार भात आई ताटात वाढत असे.
आम्हां तिघी बहिणींना घेऊन आई, एकदाच गावी पोचली होती. त्या तिच्या सहलीचा तिचा अनुभव बहुधा फारसा सुखावह नसावा. त्यामुळे, त्यानंतर आम्हीं तिथे कधी पोचलो नाही. बाबा मात्र वर्षातून दोनतीनदा पहाटेची एसटी पकडून गावी जात असत. आठवडाभराने पहाटेच घरी परतत असत. तिथे रहाणारे त्यांचे ते नातलग गृहस्थ मुंबईत वास्तव्याला येत तेव्हा आमच्या घरी उतरत.

आणि मग कधीतरी अगदी १९८५ साली, रत्नागिरी कोर्टात बाबांचा खटला उभा राहिला. नातलग गृहस्थांनी, १९६५ साली बाबांना न विचारताच गोदाम रहातं करून तिथे एक कुटुंब, भाड्याला लावून टाकलं होतं. शर्मा. धंदा सुतारीचा. बाबांना कधीही तो शर्मा पटला नाही. आवडला नाही. त्याला निघून जाण्यासाठी विनंत्या करून झाल्या. पत्रव्यवहार करून झाला. परंतु, शर्मांनी खांब चांगलेच रोवले. भारतीय कोर्टातील खटला. रीतिरिवाजानुसार तारखा पडू लागल्या. माझा सहभाग ह्यात शून्य. फक्त बाहेर गेलीस की ह्या कागदाची एक नकल काढून आण...हे इतकेच मला झेपणारे काम बाबा मला सांगत असत. बाकी काही थांगपत्ता नसे. त्यांच्याकडून लिहिल्या जाणाऱ्या व नाक्यावरील पोस्टाच्या लालबुंद पत्रपेटीत पडणाऱ्या प्रत्येक कागदाची नकल मात्र निघतच असे. ती व्यवस्थित फायलीत जाऊन विसावत असे.

तारखेवर तारीख. वर्षांवर वर्षे. वीस वर्षे.

मध्यंतरीच्या काळात शर्मा वारले. बायको खमकी. तिने आमच्या घराच्या बाजूला दुसरे घर विकत घेतले. तिथे भाडेकरू लावला. व आमच्या घरात ऐसपैस वास्तव्य चालू राहिले. २००२ साल उजाडलं. गावच्या कोर्टात केस जिंकल्याचे बाबा म्हणाले. आणि त्याच वर्षी डिसेंबरमध्ये बाबा गेले. तिसऱ्या दिवशी शर्मा बाईंचा घरी फोन आला. पाटील गेल्याच्या आमच्या दु:खात ती सहभागी असल्याचे तिने मला सांगितले. आत्या म्हणाली, "ही बाई जादूटोणा करते. माझा भाऊ हिनेच खाल्ला." ती बाई काळी का गोरी, अजून पर्यंत थांगपत्ता नव्हता.
बाबांची दूरध्वनी क्रमांकाची वही अतिशय चोख. त्यात त्यांच्या रत्नागिरीतील वकिलांचा नंबर सहज मिळाला. भिडे वकील.
"मी विश्वास पाटलांची मुलगी अनघा बोलतेय."
"बोला."
"बाबा दहा दिवसांपूर्वी गेले. ते कळवायला फोन केला होता."
"तुमचे वडील गेले ह्यात मी काहीही करू शकत नाही."
अपेक्षा ह्या शब्दांची नव्हती.
"हो. ते बरोबर. पण तुम्हांला कळवणे गरजेचे वाटले म्हणून..."
"त्याची काहीही गरज नाही. ज्यावेळी कोर्टात तारीख लागेल तेव्हां मी कळवेन. माझे सहकारी आहेत भुर्के वकील....ह्यापुढे त्यांच्याशी तुम्ही बोलत जा."
"ठीक."

बाबांचे अस्थीविसर्जन त्यांच्या गावी करावे असा विचार ठरला. त्यानुसार अस्थी घेऊन गावी पोचले. बाबांचे बालपणीचे मित्र त्यावेळी आवर्जून उपस्थित होते. ते व बाबा ज्या समुद्रकिनाऱ्यावर तासंतास फेरफटका मारीत असत, त्या मांडवी किनाऱ्यावर विसर्जन केले.
त्यानंतर बाबांच्या घरी जावे म्हणून ज्यावेळी घरी पोचलो तेव्हा प्रथमच 'शर्मा बाई' डोळ्यांना दिसली.
बाबांची वीस वर्ष. मनस्तापाची.
"पाटील गेले. फार वाईट झाले. मला रातच्याला कळालं. म्हणून लगेच सकाळी फोन केला तुम्हांला. खूपच वाईट झालं हो ! बरे तर होते ना ?" शर्मा म्हणाली.

इथेतिथे ऐसपैस पसरलेली जागा, आंबा, माड, विहिरी, पडीक कौलारू घर, मालकीण बाई आल्या म्हणून सांत्वनासाठी आलेले भाडेकरू. हे सर्व काही वेगळं होतं. बाबा इथे काही वेगळे होते.

मुंबईत परतलो. आता आठवतं...एका शनिवारी फोर्टातील एका नावाजलेल्या वकिलांसमोर ह्या खटल्यासंदर्भातील बाबांची फाईल घेऊन बसले होते. ते वकील, मुंबई हाय कोर्टात गुन्हेगारी संदर्भातील खटले चालवत व माझा खटला हा दिवाणी कोर्टातील होता. परंतु, ते ओळखीतील होते. मदतशील होते. त्यांनी फाईल तपासली.
रत्नागिरी कोर्टाने बाबांच्या बाजूने निकाल असा लावला होता....
अ) भाडेकरूने स्वतःच्या निवासासाठी शेजारीच दुसरे घर बांधले आहे.
ब) भाडेकरू, मालकाच्या जागेचा वापर रहाण्यासाठी न करता उद्योगधंद्यासाठी करीत आहे.
भाडेकरूने जुन्या न दिलेल्या भाड्याची वसुली या मुद्द्यावरील निकाल, कोर्टाने अनुत्तरीत ठेवला होता.
मुंबईच्या वकिलांनी पहिला सल्ला दिला.
"मुंबई कोर्टात कॅव्हिएट फाईल करावयास हवे."
"कॅव्हिएट म्हणजे ?"
पुढील कालावधीत मला पडत गेलेल्या असंख्य खुळ्या प्रश्र्नांची ती नांदी होती.
"आपण कॅव्हिएट केल्याने, जर ती बाई जिल्हा कोर्टाच्या निकालाविरुद्ध मुंबईतील हाय कोर्टात आली, तर आपल्याला पूर्व सूचना दिल्याशिवाय कोर्ट काहीही व कधीही निकाल देऊ शकणार नाही."
"हो का ? बरं. मग करू या आपण."

कोर्टाची पायरी...
खरं तर कोर्टाचा जिना...
एकेक पायरी...
एकेक धडा...
माझे त्या जिन्यावरील गतीने धावणे...
व माझ्या जलद गतीला पावलोपावली खीळ घालणारा भारतीय कायदा...

Monday, 16 May 2011

अनुभूती

शुक्रवार आणि रविवार.

शुक्रवार. नेहरू सेंटर मधील कागदाची शिल्पे. अप्रतिम. बघायलाच हवी अशी. आजचा दिवस शेवटचा आहे...धावा, पळा आणि गाठा. मी काही १९९५ साली जहांगीर कला दालनातील प्रदर्शन बघितले नव्हते. त्यातील शिल्पे याहून अधिक सुंदर होती...असे ऐकिवात आले. आम्ही ऑफिसमधून चौघे गेलो होतो. मधल्या सुट्टीत. आपापसात काही बोलत असता, शेजारीच उभ्या असलेल्या एक बाई हलकेच पुटपुटल्या," लहानपणापासून तो हेच करतोय. फार हौस त्याला."
मी त्यांच्याकडे वळून बघितले.
"मी त्याची बहिण."
"हो का?"
"हो. लहानपणी पण कागद आणि कातर घेऊन तो बसलेला असे."
"तेव्हापासून काम करत आहेत म्हणजे ते या कलेवर ! त्या कष्टांनीच तर इतके कौशल्य प्राप्त झाले आहे. नाही का ?"
छोटुसा बेडूक, चिमुकले फुलपाखरू, एखादी लहानशी कळी, एखादा निळा खंड्या...अगदी असे वाटावे...आपणही हॅन्स अॅण्डरसन्सच्या परीकथेतील 'थंबलीना' व्हावे...व ह्या तिच्या चिमुकल्या रानात आपणही एखाद्या गुलाबी फुलात विराजमान व्हावे.
त्यातच त्या शिल्पकाराने वसवलेले आदर्श असे गावातील कौलारू घर. चिमुकले घर, एक विहीर, त्यावर रहाटगाडगे, समोर धष्टपुष्ट गुरंढोरं, एक डौलदार कोंबडा, त्याच्या बाजूला दाणे टिपणाऱ्या दोन कोंबड्या....फक्त त्यात नाही दिसली ती तुरुतुरु पळणारी त्यांची पिल्लावळ. एक सवय नजरेला...चित्र डोक्यात बसलेले...कोंबडा कोंबडी आणि त्यांची पिलावळ. ती त्यांची धांदल फक्त नाही दिसली. पण ही आपली माझी उगाचची हुरहूर. तुम्ही आपले पळा...हा आनंद चुकवू नका.

मग रात्रीचे आठ. वरळीच्या ताओ कलादालन. अच्युतचे प्रदर्शन. अच्युत पालव. कॅलीग्राफर. तो आता निघालाय लंडन व जर्मनीला. त्याची चित्रे घेऊन. त्या चित्रांची मुंबईतील, एका दिवसाची झलक. जसा एखादा खलिता असतो तसेच हे मोठे भिंतीवर लटकवायचे खलिते. त्यावर कधी एखादा श्लोक, कधी ओम तर कधी एखादे देवनागरी अक्षर. अच्युतचा नेहेमीचा व आता जगभर मान्यता पावलेला आत्मविश्वास त्यातील प्रत्येक फटकाऱ्यात नाचरा. मला वाटतं, अच्युत त्याचे फटकारे अवकाशात भिरकावतो. आणि मग ते तसेच त्याच गतीत त्या झपाटलेल्या अवकाशात फुगड्या घालीत रहातात. सगळे त्याचे साहित्य, पाठंगुळीस लावून जागतिक दौऱ्यावर निघालेला हा माझा वर्गबंधू.

शनिवार सामान्य.

रविवार रात्री साडे आठ वाजता आयनॉक्स, नरीमन पॉइन्ट. बाल गंधर्व.
चित्रपटात बाल गंधर्वांची आई त्यांच्या पत्नीला म्हणते "हा असामान्य मुलगा होता आणि त्याला मी उगाच आपल्या सामान्य नियमांमध्ये जखडायला गेले व त्यात नाहक तुझी फरफट झाली."
खरोखर. असामान्य माणसांनी सामान्य आयुष्य जगावे अशी आपण अपेक्षा करतो व मग आपल्या सामान्य अपेक्षा पूर्ण न झाल्याच्या जखमा घेऊन बसतो. कुबेरालाही भीक लागेल अशी त्यांची स्वप्ने माझ्या सामान्य पोटात खड्डा निर्माण करत गेली. त्यांच्या पत्नीची दु:खे माझी झाली.
दिग्दर्शक त्या सिनेमाला एकसंघ रूप देऊ शकलेला नाही...काही प्रश्र्न अनुत्तरीतच राहिले. परंतु ही माझी मते...व तरीही हा भरजरी सिनेमा पैसे देऊन बघायलाच हवा...हे माझे ठाम मत. त्यातील 'बाल गंधर्व एका तलावाच्या काठाशी उभे राहून जेव्हा मुक्त स्वरात अभंग गातात ते दृश्य स्वर्गीय ! आसमंतात त्या क्षणांपुरता फाकलेला तो दैवी प्रकाश...व तो अद्भुत आवाज...!!!!! शब्द संपले.

शुक्रवार व रविवार...कारणी लागले.

कलेची अनुभूती.

तीन वेगवेळ्या माध्यमातून.

कधी निसर्ग व कागद.
कधी कागदावरील शाईचे नृत्य.
तर कधी स्वर्गीय गळ्याची मानवी फरफट.

Thursday, 12 May 2011

जोडगोळी

रोज सकाळ होते. कामाच्या यादीची चढती भाजणी, उतरती करण्याची एक धडपड सुरु होते. आणि थोड्याच वेळात घड्याळात सात वाचून चाळीस मिनिटे होतात. भिंतीवरचे घड्याळ जसे काही त्याचीच वाट पहात असते. माझ्यासारखीच. कारण बरोबर त्याच वेळी आमच्या दारी एक जोडपं उभं रहातं. भल्यामोठ्या खिडक्या ही माझी घरातील सर्वात लाडकी गोष्ट. मनमोकळं...हवेला अटकाव नसलेलं हे माझं घर. खिडक्यांच्या पलीकडे लावलेली रोपे. कामाच्या यादीत, त्यांची तहान भागवणे हे देखील असतेच. एक छानसी निळ्यागार रंगाची झारी घेऊन मी दिवाणखाना ते शयनगृह अशी फेरी मारते. व माझी हिरवीगार रोपे अंघोळ करून दिवसाची सुरुवात, प्रसन्न मनाने करतात. मात्र झारीचा फवारा काही फक्त झाडांना स्नान नाही घालत. त्याचबरोबर माझे खिडकीचे गज ही धुवून निघतात. रोज. हे काम झालं की मात्र खिडकीबाहेर एक अतिशय नयनरम्य चित्र तयार होतं. हिरवी रोपं, काळे गज व त्या सर्वांवर लगडलेले अगणित पाणीदार हिरे. अप्रतिम. इथे थेंब...तिथे थेंब...असंख्य थेंब माळा...चमचमत्या. नित्य नव्या नित्य नवख्या. स्वत:वर खुष होण्याची माझी खोड जित्याची आहे. त्यामुळे ही अशी मी रोज स्वत:वर खुष होते...झारी तिच्या जागी ठेवते व पुढील कामास लागते. कामे असतात इथेतिथे. कधी स्वयंपाकघरात तर कधी दिवाणखान्यात. पण मी जिथे असेन तिथून मला हाळी घालण्यात येते. नुसता चिवचिवाट करून. दोन चिमुकले जीव. इतुके चिमुकले की ओंजळीत मावावे. दोघे दोघे. हे जे पानांवर, गजांवर थेंब झुलत असतात ते टिपून घ्याव्या हे जोडपे रोज हटकून हजेरी लावून जाते. आणि किती ती धावपळ...किती ती धांदल. इथे उड्या तिथे उड्या. दोघे दोघे. कधीकधी माझी वृत्ती फारशी अभ्यासू नसल्याचे मला बरेच वाटते. कारण त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे शास्त्रीय कारण काही माझ्यापुढे येत नाही. निष्पाप जोडगोळी. मग हे पक्षी कोण, ते कुठून आले आहेत व त्यांच्या सवयी काय आहेत ह्याचा मला मागमुस देखील नसतो. ते दोघे हमखास रोज येतात...उड्या मारत...हिरे टिपत...तहान भागवत...आणि मी हसते. बस्स. इतकंच.

काल त्यांना न्याहाळताना अशीच काही जुनी आठवण येऊन गेली...जोडगोळीची.

लग्न नुकतंच झालेलं होतं. हाताशी घरदार काहीच नव्हतं. मग कोणी त्यांचं कुठलं न वापरात असलेलं घर आम्हांला देऊ करत व आम्ही काही दिवस तिथे बस्तान करू. घरून निघताना जी एक बॅग घेऊन निघाले होते तीच बॅग त्यात्या घरात कुठे कोपऱ्यात जाऊन बसत असे. परवानगी असेल तर स्टोव्हवर माझे चुकतमाकत जेवण प्रयोग सुरु होत असत. असेच काही महिने गेले. नवऱ्याच्या एका मित्राने डोंबिवली पश्चिमेला एक घर नोंदवून ठेवलं होतं. तो स्वत: रहात असे भायखळ्याला. आमच्या नशिबाने त्यावेळी त्याला त्या घराचा ताबा मिळाला. व आम्हांला काही महिन्यासाठी का होईना पण एक पक्कं घर मिळालं. फक्त आता घर होतं परंतु भांडीकुंडी नव्हती. सकाळी आम्ही दोघेही आपापल्या उद्योगधंद्यासाठी मुंबईत येत असू व रात्री उशिराच परतत असू. त्या काळी फोन वगैरे काही प्रकार नव्हतेच. फक्त ट्रेनच्या घड्याळावर आमचे घड्याळ बसत असे. म्हणजे मी इतक्या वाजताची ट्रेन पकडेन, तू किती वाजताची पकडशील...हा असाच संवाद...रोजचा. त्या दिवशी मी ट्रेन मधून उतरले तर नवरा व त्याचा जिवलग मित्र स्टेशनावर उभे. मला ह्या ट्रेनच्या प्रवासाची नसलेली सवय...म्हणून दोघे मला घ्यायला फलाटावर हजर झाले होते. दोघे हसत होते. खुशीत दिसत होते. आम्ही तिघेही तिथून निघालो. घराच्या दिशेने चालू लागलो. गोपी टॉकीजजवळ. त्यावेळी मोठा सुनसान परिसर. नवीनच झालेल्या इमारतीत आम्ही दोघेच काय ते रहिवासी. कामाच्या निमित्ताने नवरा कायम उशिराच घरी परतणार. म्हणजे वीज गेली की त्या अख्ख्या इमारतीत भुतासारखी मी ! आणि वीज जाणे ह्या डोंबिवलीत नेहेमीच होणाऱ्या प्रकाराची मला मुळातच तेव्हा सवय नव्हती. त्यामुळे सुरवातीला मला वाटले की आता आपण एकटेच आहोत तर दार तरी उघडे ठेवावयास हवे...म्हणजे कोणी असेल तर आपल्यालाच सोबतबिबत...काही वेड्या समजुती. ह्याला हा माझा काळोखात दार उघडं टाकून बसायचा प्रकार कळला तर तो हादरलाच ! चांगला ओरडा खाल्ला मग मी... "अगं, पण सगळा अंधार आहे, तर तू गपचूप दार बंद करून आत शांतपणे बसशील की दार सताड उघडं टाकून बसशील ?" आता वाटतो खरा हा मूर्खपणा...पण तेव्हा तेच बरोबर वाटलं होतं खरं... असो. ह्यालाच विषयांतर म्हणतात ! तर आम्ही तिघे घरी पोचलो. आणि काय सांगावे ? त्या दिवशी नेमका हा लवकर घरी पोचला होता व दोघा मित्रांनी बाजारात जाऊन आमच्यासाठी भांडीकुंडी खरेदी केली होती. म्हणजे वेगवेगळ्या आकाराची तपेली, चमचे, पळ्या वगैरे वगैरे. पुरुषांच्या बुद्धीला झेपेल तेव्हढे त्या दोघांनी खरेदी केले होते. आता पाळी होती माझी. एकदम आनंदी भावना चेहेऱ्यावर आणायची. म्हणजे व्वा व्वा. कित्ती छान. हे भांडं किती सुंदर, स्टील किती जाड इत्यादी इत्यादी. पण नाही जमले ते मला. मन खट्टू होऊन गेले. ते एका कोपऱ्यात रुसून बसले. माझ्या संसारातील ती पहिली खरेदी. मला ती त्याच्याबरोबर एकटीने करायची होती. म्हणजे कसं, तो आणि मी. हे भांडं बघ, हा चमचा बघ...हे ताट तुला आवडेल का आणि पेला किती सुंदर आहे, नाही का...हे असे दोघादोघांचे संवाद...सगळंच बालिश वाटतंय, नाही का ? त्या दोघांनी चांगल्या बुद्धीने गोष्ट केली होती...आता मला खोटं का होईना आनंदी होणं भाग होतं....माझं मन एकटं...त्यांची ने दुकटी...

आज लवकर उठून रोपांना अंघोळ घातली...टपोरे हिरे तयार झाले....परंतु, किलबिल आज फार क्षीण ऐकू आली...मी हळूच खिडकीत उभी राहिले...चिमुकला पक्षी एकटाच होता...एकदोन हिरे त्याने टिपले..इथे तिथे झोके घेतले...आणि तो चिमणा जीव उडून गेला...

Wednesday, 11 May 2011

आता वाटतं...

आता वाटतं...
आयुष्य आंब्यासारखं...
एकेक फोड...
जणू आयुष्याचा एकेक टप्पा.

प्रत्येक फोडीची चव निराळी...
कधी गोड...
कधी आंबट...
तर एखादी फोड...
...मार लागलेली.

एक दिवस मात्र फोडी संपून जातील...
चोखून, शोषून, विस्कटलेली कोय
एकटीच राहील..

काय ती एकटीच पडून राहील..
उन्हातान्हात करपत राहील...
कचराकुंडीत सुकून जाईल ?

वा त्या कोयीतुनच एक कोंब जन्म घेईल ?

Tuesday, 10 May 2011

ओढ

का कोण जाणे...
खिडकीबाहेर...
एकेक पान, एकेक फूल, एकेक फांदी...
पावसाची ओढ लावून जेमेतेम उभे आहेत असं काहीसं वाटतंय...

...दुष्काळात, पावसाच्या त्या एका थेंबाची ओढ...
...थेंबांचा अतिरेक...
...मग निवाऱ्याची ओढ.

...ह्याची ओढ..
त्याची ओढ...

खरं तर...
ही नस्ती XX
कुतरओढ !

Monday, 9 May 2011

Shoot her !

परवा एक शूट केलं. एक बाई आणि एक बुवा. बाई तिशीची आणि बुवा २८-२९ चे. दोघांचाही गेटअप पंजाबी. तरुण पंजाबी शेतकरी. व तरुण पंजाबी गृहिणी. मिशी, केस, मेकप वगैरे पंजाबी पद्धतीकडे जाईल असा. तिचे कपडे, केस, दागिने अस्सल पंजाबी धाटणीचे. ते काही फॅशन शूट नक्की नव्हतं. तर काही भाव प्रदर्शित करावयाचे होते. दोन्ही क्लोज अप शॉटस्...अभिनय करता येणे गरजेचे होते.

ज्यावेळी मॉडेल निवड चालू होती, त्यावेळी अनेक फोटो माझ्यासमोर दिले गेले होते. आणि त्यातून ह्या दोघांची निवड केली होती. ते सर्व फोटो फॅशनशी संबधित होते. आम्हांला हवा होता शेतकरी. व गृहिणी. आणि नवीन चेहेरा. क्लायन्टच्या प्रॉडक्टचं लॉन्च पंजाब हरियाणात. प्रथम मी ह्यांची निवड केली होती. व नंतर क्लायन्टकडून अप्रुव्हल घेतले होते. तो लूक बरोबर मिळवणे मेकअपवर बरेच अवलंबून होते. माझ्या हातात, त्यांच्याकडून नक्की काय प्रकारचे भाव हवे आहेत हे दाखवणारे रेफरन्स प्रिंट आउट्स होते.

तरुणाचा शॉट प्रथम. कॅमेरा लावला गेला. चर्चा करून, एकदोन शॉट्स घेऊन लाइट्स ठरवले गेले. तरुणाला त्याच्या उभं रहाण्याच्या जागेचे मार्किंग दिले गेले. कॅमेरासमोर तो आला. आणि काही क्षणात मुंबईचा मूर्तिमंत फॅशनेबल वाटणारा तो तरुण, साक्षात पंजाबी शेतकरी झाला ! फटाफट भाव बदलत गेला...फोटोग्राफर क्लिक करत गेला...एकेक शॉट्स लॅटॉपवर येऊन विसावत गेले...भरपूर...एका मागोमाग एक. "Should I do it like this...." त्याचे अधूनमधून विचारणे. स्वत: त्या फोटोत गुंतणे. आपले भाव अगदी मनासारखे उतरले जावे ह्यासाठीचे त्याचे कष्ट...
"Done ! You were fantastic !"
"Can I mail you my portfolio...?
"Ya ...do that..."

खुषीखुशी तो गेला...आनंदात आम्ही पुन्हा कॅमेराकडे वळलो.

आता...तरुणी. ती मुळातच पंजाबी असल्याने अस्सल पंजाबी दिसायला फारसे कष्ट नव्हते. तरी...टिकली कुठली लावावी...कानातले कुठले घालावे...गळ्यात काय घालावे...चर्चा झाली....पक्की पंजाबी दिसण्यासाठी जे जे गरजेचे होते ते ते अंगावर चढले.
मग....तिच्याकडून जे अपेक्षित आहे ते तिला समजावले गेले. प्रश्र्न सुंदर दिसण्याचा नव्हताच. तर काही भाव अपेक्षित होते. मुळातच ते फॅशन शूट नव्हतेच.

"Ya ya ....I got it ...let's start..."
क्लिक क्लिक....लॅटॉप वाहू लागला....चिन अप...एक्स्प्रेशन्स...स्माईल...क्लिक क्लिक. क्लिक क्लिक....
स्टुडियोत नेहेमी जोरदार संगीत चालू असतंच...मॅडम रंगात आल्या...त्यावर नाचू लागल्या...उड्या मारू लागल्या. पण मग आम्हांला हवं असलेलं एक्स्प्रेशन ? भाडमें ! आमचे चेहेरे ? चिंतीत....तिचा चेहेरा ? मजेत ! इथून तिथून...मिथुन ! आम्ही ? हताश. पुन्हा पुन्हा समज. अर्धा तास....एक तास...भुवया वर...ओठ असे....चेहेरा असा...मान अशी....नाही म्हणजे नाही ! आमच्या मॉडेलच्या काही गळी उतरेना ! बाई असाव्यात ३७/३८ च्या. परंतु, त्यांचं नाचरं तारुण्य त्यांना अभिनय करू देईना !
"तुषार, ह्याहून अधिक बाईंकडून काही नाही मिळणार..." फोटोग्राफर, माझा जुना मित्र. त्याच्या कानात कुजबुजले.
"हो...मलाही असंच वाटतंय..."
"ठीक आहे....मी करेन काही तरी...मिळेल एखादं..."
"...you got it ?" पंजाबीण.
"Not really ..but will manage...!" नेहेमी खरं बोलावे...खोटं बोलू नये !
पॅक अप...

दुसऱ्या दिवशी तुषार हार्ड डिस्क घेऊन घरी आला. त्या तरुणाचे फोटो...अगणित. कुठला घेऊ आणि कुठला नको..अशी परिस्थिती.
आणि पंजाबीण ? कठीण परिस्थिती. निवडा...परत परत बघा...ह्यात ती हसलीय बरी...ह्यात तिचे डोळे बरे...ह्यात तिचा हात नको होता. नशिबाने एक मिळाला....ज्यात हात आडवा आला...मग दुसऱ्या इमेजची मान आणि पहिल्या इमेजचा चेहेरा...

काम चांगलंच करण्याची मनापासूनची इच्छा, तरुणाच्या चेहेऱ्यावरील प्रत्येक स्नायूतून बोलत होती. व तरुणीचे नसते नखरेच तिच्या चेहेऱ्यावर उतू जात होते.

दुपारी इमेज आर्टिस्ट डोंबिवलीहून आला. निवडलेल्या इमेजेस घेऊन गेला. फोटोशॉप करायला.
रविवारी सकाळी फर्स्ट कट इमेजेस मला मिळाल्या...

बाईंची वेळ तुकड्या तुकड्यांनी मारून नेली होती !

एकदोन दिवसांत क्लायन्टला दाखवणे आहे. मुंबईचे 'मॉड' तरुण तरुणी. झाले पंजाबी शेतकरी आणि पंजाबी गृहिणी !

इतुकीच आशा...शेतकरी बघून क्लायन्ट खुष व्हावा.
आम्ही तोंड दिलेला नखरा त्याला न दिसावा...बाईंच्या चेहेऱ्यावर !

Saturday, 7 May 2011

चुटपूट

काही दिवसांपूर्वी, मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील ह्यांच्यासमोर जाण्याचा योग आला होता. त्यांनी व मी, पाटीवरील गमभन, एकाच वेळी एकाच शाळेत गिरवले होते. मग मनात आलं, त्यांना आपली छापील पाटी भेट द्यावी. 'पाटी माझी पटेल का' पुस्तकावर सुवाच्च अक्षरात त्यांचे नाव टाकले. माझी नेहेमीची मराठमोळी सही उमटवली...आणि पाटी त्यांच्यापुढे धरली. त्याआधी पाच मिनिटे, १२ डिसेंबर २००२ साली बाबा गेल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुढील काही दिवस विविध वर्तमानपत्रात आलेली त्यांच्याविषयक कात्रणे पाटीलसाहेबांसमोर ठेवली होती. आणि मग त्यावर माझी पाटी ! साहेबांनी पुस्तक चाळायला सुरुवात केली होती. आणि मनाला काही विचित्र वाटले. काहीतरी चुकीचे. स्पष्टीकरण गरजेचे.
"हे माझ्या ब्लॉगवरील लेखांचे एक छोटेसे पुस्तक." मी दोन्ही हात एकत्र गुंफत, बोटं मोडत म्हटलं. साहेब मान खाली घालून पाने उलटत होते.
"म्हणजे बाबा, वैचारिक, गंभीर विषयांवर लिहित असत..."
"...हं..."
जणू, सोन्यापुढे, पितळाने मिथ्या मिरवावे...आणि बघणाऱ्याने पितळ हाती घ्यावे...
मला एका वाक्यात 'पाटी'चा सारांश करणे व त्यांच्या कानावर घालणे अत्यंत जरुरीचे झाले.
"माझं आपलं साधसुधं लिखाण आहे...म्हणजे जन्मल्यापासून, मुंबईतील स्पर्धात्मक आयुष्य जगता जगता...सामान्य माणसाचे आयुष्य जगताना आलेले हे आपले माझे अनुभव...त्याव्यतिरिक्त काही नाही...!"
पालकमंत्री हसले.
एकच शाळा आणि एकाच इयत्तेच्या प्रेमाने त्यांनी पुस्तक गुळगुळीत लाकडी काळ्या मंचावर ठेवले.

...एक चुटपूट आपली माझ्या मनात...

...उंच भरारी मारणाऱ्या, अवकाशात पंख पसरलेल्या पक्ष्याच्या अथांग सावलीत; कोणा चिमणीने रहावे आणि उगा ती धरतीवर क्षितिजापार पसरलेली सावली माझीच म्हणून शेखी मिरवावी....असेच काहीसे.