नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 28 April 2011

पुनर्ओळखीची गोष्ट...

प्रेम, माया ह्या काही मोजण्याच्या गोष्टी नव्हेत. त्यांचे अस्तित्व हे सुखद आठवणी घेऊन येते. जसा एखादा वृक्ष. प्रेम ही त्याची खोल रुजलेली मुळे वर डवरलेला त्याचा फुलोरा ही त्या प्रेमाचीच दृश्य चित्रे. नव्हे काय ?

माझा असा एक पेटारा ओसंडून वाहतो आहे. अगदी लिहिता वाचता यावयास लागले तेव्हापासूनची एकेक पाने...एकेक फुले. कोणाची पत्रे, कोणाची चित्रे, कोणी दिलेल्या चिमुकल्या भेटवस्तू तर कोणी दिलेला एखादा टपोरा लाल गुलाब. काय तो सुकला ? काय तो कोमेजला ? नाही. तो काळापरत्वे काळसर झालेला गुलाब ज्या ज्या वेळी समोर येतो त्या त्या वेळी तो नाजूक क्षण ताजा टवटवीत डोळ्यांसमोर जिवंत उभा रहातो.

असेच...त्याच भावनेने त्या दिवशी माझ्या आठवणींच्या पोतडीत एक हिरा ठेवला.

"आज तुमचा काय कार्यक्रम आहे ?" सौरभ.
मैत्री म्हणजे अगदी नेहेमी समोरच बसून गप्पा मारता याव्यात अशी माझी भ्रामक समजूत कधी नव्हतीच. त्यालाच दुजोरा देणारी अशी माझी नवी मैत्री. मैत्रीला काही वय नसते. पण तरी देखील ही माझी एक वर्ष जुनी मैत्री.

त्यावेळी एका मैत्रिणीने काँन्सिलरकडे जाण्याचा प्रेमळ सल्ला दिला होता. अशी काँन्सिलर, जिने तिच्या कठीण काळात तिला बाहेर यावयास मदत केली होती. मी गेले. काँन्सिलर बाईंनी उपाय सांगितला. १००० रुपये फी. उपाय ? तर पत्र. पत्र लिहिण्यास सांगितले. पहिले पत्र बाबांना. दुसरे आईला. तिसरे नवऱ्याला. ह्या तीन व्यक्तींना जे काही मनापासून सांगावेसे वाटते ते त्या प्रत्येक पत्रातून व्यक्त करावयाचे होते. लिहिली. अगदी वाईट भाषेतच बोलायचे झाले, तर 'भडास काढली.' बाबांचा कधी आलेला राग, आईच्या कधी पटलेल्या गोष्टी, नवऱ्यामुळे मला माझ्यामुळे नवऱ्याला झालेला प्रचंड मनस्ताप. त्या पत्रांतून सगळे लिहिले. मग ? मग पुढील खेपेस ज्या वेळी काँन्सिलर बाईंकडे गेले, त्यावेळी ती तिन्ही पत्रे माझ्याकडून तिने वाचून घेतली. अगदी नाट्य प्रवेशच झाला काहीसा तो. म्हणजे आवाज वर खाली. पत्रातील मजकुरास शोभेसा. १००० रुपये झाले. म्हणजे १००० + १००० = २०००. आता ? आता पुढील वेळेस येशील त्यावेळेस ह्या व्यक्ती, तुझ्या पत्रांना काय उत्तरे देतील हे लिहून काढ, असे सांगण्यात आले.

परंतु, माझा हा पत्रव्यवहार इथेच थांबला.
मात्र लिहायला जी सुरुवात झाली, ते नाही थांबले. रेस्टइजक्राईमची पाने भरू लागली. दिवसागणिक एक.

पुढे ? पुढे सातासमुद्रापलीकडे माझ्यापेक्षा खूप छोटाश्या एका मुलाच्या हाती देवाने ही माझी पाने सुपूर्त केली. सौरभ. सौरभ नुसता वाचून थांबत नव्हता. प्रत्येक वेळी वाचलं की त्यावर त्याची प्रतिक्रिया देत गेला. कधी विचार करावयास भाग पाडणारी. तर कधी खोखो हसवणारी. म्हणजे मी एकदम काही लिहिलेलं असे...भावनांचा उद्रेक वगैरे...आणि हे बुवा त्यावर अशी काही प्रतिक्रिया देत असत की हसू फुटलेच पाहिजे ! आणि हा उपाय माझ्यासाठी एक जीवदान ठरला. एक कोमात गेलेला जीव. हळूहळू हालचाल करू लागला. काय हे मी उगाच बोलते आहे ? नाही. पूर्ण सत्य. माझ्या दुसऱ्या जन्माचे...

मुंबईत येऊन ठेपलेल्या सौरभचा त्या दिवशी फोन आला.
"आज तुमचा काय कार्यक्रम आहे ?"
"का रे ?"
"मी दादरला आलोय. आपण भेटू शकतो का ?"
"हो तर. का नाही ? अर्ध्या तासात शिवाजी पार्क सीसीडीत भेटूया काय ?"
"चालेल."

आणि मग पुढे ?
पुढे जे काही घडलं ते म्हणजे माझ्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचेच होते ! म्हणजे हे कधी माझ्या डोक्यातच आलेले नव्हते !

काही महिन्यांपूर्वी, सौरभच्या डोक्यात आयडीयेची कल्पना आली. मग आकाशच्या मदतीने रेस्टइजक्राईममधील त्यांना आवडलेले लेख दोघांनी निवडले. श्री फलटणकरांच्या मदतीने ते एकत्रित करून त्याचे एक पुस्तकच छापले !
पाटी माझी पटेल काय ?

ह्या धक्क्यामधून बाहेर यायला मला जवळजवळ एक महिना लागला. ते पुस्तक काही दिवस मला हातात धरता येत नव्हते. उघडून बघणे तर दूरचीच गोष्ट ! म्हणजे मला नक्की काय वाटते आहे हेच मला कळत नव्हते !

आजपर्यंत अगदी लहानपणापासून मी 'विश्वास पाटलांची मुलगी अनघा' असे अगदी खणखणीत आवाजात सांगते. नंतरच्या काळात 'शरद निगवेकरची बायको अनघा' हे मी सांगत आले.
आणि आज ज्यावेळी मी माझी ओळख, 'अनघा निगवेकर' म्हणून जाणून घेऊ शकले त्यावेळी कधीही माझ्या स्वप्नात देखील ते नव्हते !

सौरभ, आकाश आणि राजीव...
प्रेम, माया ह्या काही मोजण्याच्या गोष्टी नव्हेत.
त्यांचे अस्तित्व हे सुखद आठवणी घेऊन येते...
हे पुस्तक...ही माया...ही आठवण...
सुकत चाललेल्या पिंपळावरचे हे हळूच उगवलेले एक नाजूक गुलाबी पान.
:)

Wednesday, 27 April 2011

चित्रकला - २

आज आमच्या लग्नाला सव्वीस वर्षे झाली.
मग त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एका चित्रकारासाठी दुसरे काय असू शकते ? चित्रकला शरद निगवेकर म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू. त्याची चित्रे ही त्याची ओळख. मागल्या वेळी आपण त्याची स्केचेस पाहिली. आज जलरंगांवरील त्याचे कौशल्य बघुया का ?
मला ह्याची जाणीव आहे की इथे मी हाय रेज चित्रे नाही टाकू शकत. परंतु, त्याला काही इलाज नाही....तुम्ही समजून घ्यालच. :)

Sunday, 24 April 2011

Why do I need...?

Okk ...That's funny !

वांद्रयातील एका गच्चीवर होतो आम्ही. सुखद हवा. रात्र पळती. परदेशी वास्तव्य असणाऱ्या मित्राच्या चार वर्षाच्या मुलाचा वाढदिवस होता. त्याचवेळी नेमका भारतात असल्याकारणाने त्याने जुन्या जवळच्या मित्रमंडळीना आमंत्रित केलं होतं. आपापल्या कुटुंबाबरोबर. मी आणि माझी लेक. छानपैकी कपडे घालून पोचलो होतो. काही मित्र...त्यांच्या बायका, त्यांची मुलं....एक जुना झकाससा बॉस आणि त्याची चिरतरुण बायको.

लवकर लग्न उरकून टाकलं आणि भारताच्या जनसंख्येत जी काय भर टाकायची आहे ती लवकर टाकून दिली की तसं आपलं भलंच होतं. कारण आपण व आपली मुलं ह्यात वयाची खूप खोल दरी नाही होत. जरी पिढी खूप पुढची असली, तरी....अगदी मोठी झालेली मुलं आपली मित्र वा मैत्रिणीच होतात. वा होऊ शकतात ! माझी लेक माझी मैत्रिणच असल्याचा भास आभास मला बऱ्याचदा होतो.

सगळ्यांचे ग्लास भरलेले. माझा आपला...पेप्सीचा ग्लास. मऊ लुसलुशीत चविष्ट चिकन टिक्के इथेतिथे फिरत होते. त्यामुळे पोट आणि जुने मित्र खूपखूप वर्षानंतर भेटल्याने मन...आनंदित.
मिठ्या झाल्या...हाय हॅलो झालं...
एका मित्राची बायको उजव्या हाताला. तिच्या हातात ग्लास. मित्र व माझी लेक समोर...गप्पा चढत्या.
"Hey ! Get a boyfriend for your beautiful mother !" माझ्या मित्राने लेकीच्या खांद्यावर जबाबदारी टाकली. अगदी बाळ असल्यापासून ही मित्रमंडळी तिला ओळखतात त्याचा फायदा वा गैरफायदा...
लेक हसू लागली.
"Ya ya...am going hunting now !" म्हणजे...नदीकाठी लेक...गळ टाकून...काय करतेयस...तर आईसाठी बॉयफ्रेंड पकडतेय....व्वा व्वा...काय सिच्युअशन आहे !
त्याच्या बायकोने माझ्या गळ्यात हात टाकले.
नवऱ्याला पाठिंबा देत, "Seriously yaar ! Why not ?!"
"Arey ! Have a daughter yaar ! Have her responsibility !" ढाल क्रमांक एक.
"Now this is a typical Indian woman attitude ! Make your kids feel guilty !"
"What ?" आता ह्यात मी लेकीला काय guilty feel दिलं...मला नाही कळलं. लेक समोर बसून हसतेय...
"नही तो क्या ! Poor thing yaar ! She must be thinking that because of her you are alone !" लेक उगाच मान डोलावतेय. "Ya ya ! Tell her !"
"Tell her what ?! चूप गं !" लेकीला थोडं दमात.
"See ! She is okay with it !"
"Okay काय Okay ! तिच्या बापाचं काय जातंय ?" माझं मराठी झिंदाबाद ! लेक हसतेय.
"You Ghati !"
"Gitu, why do you want me to have complications in my life ?! Am I not looking happily single ?!" ढाल क्रमांक दोन.
"Arey ! Men are good yaar ! It 's good to have a man around !" आता मला हसायला आलं...म्हणजे एक मोठ्ठं राक्षसी फुलपाखरूच दिसलं मला....अवतीभवती उडताना....आणि मला भीती वाटते. अश्या अगडबंब फुलपाखरांची !
"नही यार ! A man is just like a bundle of complications...." तारे माझे ! तोडले...
"Yaa ...that तो they are ...but still....why live single ?!" ....बॉसची रूपगर्विता आता चर्चेत सामील. जणू, माझी जबाबदारी आता सर्वस्वी त्यांच्यावर. जणू, आज रात्र संपता संपता एक बॉयफ्रेंड माझ्या गळ्यात बांधला की हुश्श !
"hmmmm...see...anyways, am not like 'single and ready to mingle type...right ?"
"Precisely ! That's what ! You should get a steady boyfriend !" कॉलेजमध्ये जेंव्हा नवरा 'मित्र' होता...त्यावेळी पण हे बॉयफ्रेंड प्रकरण नव्हतं डोक्यात. हा माझा होणारा नवरा हेच कायम डोक्यात ! तो काही माझा 'टेस्टिंग पिरिएड' चालू नव्हता !
"Shanta ! What do you think ? रूपगर्वितेने नवऱ्याला हाक मारली.
"About what ?"
"We all think that Anagha should have a boyfriend !"
"हम्म्म्म" शांता डोळे बारीक करून माझ्याकडे. "You stopped wearing lenses ?"
"Got bored with them, Shanta ! Too much of efforts every morning ! And I think these fat specs make me look intellectual !"
शांताने मन डोलावली. "Ya Ya. You look nice ! So...why you don't want a boyfriend ?"
"Because I have not found an answer to....'why do I need a boyfriend ? "
"And you will find the answer when you will grow old !"
"hmmmmm " मी फक्त हसले.
ताडमाड शांताने खांद्यावर हात ठेवून जवळ घेतलं...त्यावेळी त्या वडील आणि मित्र सदृश्य स्पर्शातून कळून गेलं...का हा माझा सर्वात लाडका बॉस आहे..."Life was tough on you...I know. Leave her alone Arati..." शांताने अर्धांगिनीला फर्मावलं. आरतीने भरलेल्या ग्लासमधून एक घोट घेतला. व माझ्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला.

पार्टी पुढे सरकली. आम्ही पोटभर जेवलो. गच्चीवरील हवा थंड होती....पिणाऱ्यांची विमाने हळू तरंगत होती...सगळेच आनंदात होते. रात्र फारच चढली होती. आम्ही दोघी निघालो.
गीतूने पुन्हा मिठी मारली. आपला मुद्दा सोडला नाही..."Remember what I told you !" मी हसले.

गाडी चालू केली आणि लेकीला म्हटलं...मला 'मेरील स्ट्रीप' चा 'ममा मिया' आठवतोय..! आधीच ही 'मुंबई' आणि त्यात हे आमचं glamorous advertising ! त्यात आपण ना असे मध्येच तरंगतोय...त्रिशंकू सारखे...तू काही मनावर घेऊ नकोस हा त्यांचं ! "
"आता हा त्रिशंकू कोण ? ज्याच्यासारखे आपण लटकतोय ?" लेकीने विचारले.
'त्रिशंकू' समजावता समजावता घर आलं...
आमचे पाय जमिनीला लागले...
आणि पंधरा मिनिटात पाठ बिछान्याला.

Friday, 22 April 2011

माझा जिना...


जो जिना चढता असतो, तोच जिना उतरतो देखील...नाही का ?
की उलट....?
जो जिना उतरतो....तोच जिना चढतो ?

मी जिना चढते आहे.....की मी उतरते आहे ?

मला जिना, कधीच सरळ नाही उतरता येत...
लहानपणापासून मला उतरायची घाई लागलेली आहे.... धाड धाड.
आणि माझा चढता जिना मात्र संथ...तसा मंदच असतो...

देव करो, माझा जिन्याला उतरण न लागो....

Wednesday, 20 April 2011

Death toll

साधना सात. मी पाच.
"सकाळी साधना गेली." आई बाबांना सांगत होती.
"गेली म्हणजे ?" मी विचारलं.
"गेली म्हणजे ती देवाघरी गेली."
"अशी कशी गेली ? ती माझी मैत्रीण आहे. "
साधनाला कावीळ झाली. आणि काविळीने मरतात. माणसे देवाघरी जातात आणि मग ती आपल्याला परत दिसत नाहीत. मी दिवाणखान्यातील कोचावर उपडी पडले. आता आज शाळेत नाही जाता कामा. माझी मैत्रीण देवाघरी गेली. मला रडू यायला हवे. आईने बखोट धरून उचललं. तयार केलं. ती ऑफिसला गेली. माझी शाळेची बस आली. मी शाळेत गेले.

पुढल्या वर्षी.
"आपली आजी चांदणी झाली." मला प्रज्ञा म्हणाली. प्रज्ञा. माझी मावसबहीण. माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठी.
"चांदणी झाली? म्हणजे?"
"म्हणजे आजी आता परत आपल्याला दिसणार नाही. वर बघ. ती...ती चांदणी दिसतेय ना....ती नवीन आहे....म्हणजे ती आपली आजी आहे."
मी वर बघितलं. असंख्य चांदण्यातील एक चांदणी मनात धरली. ती माझी आजी झाली.

पुढे आई बाबांचे ओळखीचे पाळखीचे मरत राहिले. आई बाबा त्यांच्या माणसांना भेटायला जात राहिले. घरी परतल्यावर अंघोळ करायचे.

एक दिवस बाबा गेले. डॉक्टरांनी सांगितलं नाही. बाबा आता जाणार म्हणून. मग बाबा घरी आले. खूप माणसं जमली. एक फोन वाजला. मी उचलला. समोरचा म्हणाला बॉडी कधी नेणार ? माझे बाबा एका क्षणात बॉडी झाले.
स्मशानभूमीत गेले. बाबांच्या आम्ही तिघी मुली. मी मोठी. विधी करायला मी बसले. पहिला प्रश्न भटजींचा. "गण ?"
"म्हणजे ?"
"तुमचा गण कोणता ?"
"मला नाही माहित."
"नाही माहित ? ठीक. मग तुमचा गण राक्षस."
बाबांचा गण राक्षस ठरला.
विधी पार पाडले. डोक्यावर पाण्याचं मडकं. त्या गोल चकरा. मडक्यातून खाली अंगावर उडणारं पाणी. आणि मडकं जमिनीवर मुद्दाम फोडून केलेला तो आवाज.
बधीर. मन बधीर.

गेल्या वर्षी. वर्षाची सुरुवात. परगावी असलेला नवरा अकस्मात फोन घेईनासा झाला. चार दिवसांनी तेथील मित्राने सांगितलं...वो खलास हो गया. प्रगत समाजात वावरणारं मन, मध्यमवर्गीय. मंगळसूत्र, लाल, पिवळा, हिरवा रंगांशी संबंध संपला.
वर्ष थोडं पुढे सरकलं. चार पाच वर्षांनी मोठी असलेली सख्खी मावसबहीण गेली. नाशकातील एक घर, माझ्यासाठी बंद झालं.
वर्ष अजून थोडं पुढे सरकलं. सख्खी मोठी मामेबहीण गेली. मी जिला ताई म्हणत होते, अशी एक बहिण गेली.

हे वर्ष सुरू झालं.
मैत्रिणीचा नवरा गेला. जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला. "तू तर ह्यातून गेलीयस !" ती म्हणाली.
वर्ष थोडं पुढे सरकलं.
वाशा गेली. कामवाली नाही. माझी जणू धाकटी बहिण गेली. तिच्या जवळ गेले. "खूप केलंस गं बयो तिचं." तिची सासू म्हणाली.
गेल्या महिन्यात आईची मैत्रीण गेली. आईच्या मैत्रिणी ह्या मावश्या असतात.

हे चक्र साधनाने सुरू केलं.

मग काल माझी सख्खी मैत्रीण गेली.
मी गेले. तिच्या नवऱ्यासमोर उभी राहिले.
"Gone. Your friend has gone. She wanted you to see her newly bought, newly decorated house. Each and every piece here..she's picked it up...everything. You never turned up ! See it now ! Go...Have a look ! That 's her bedroom !"
....Ann ! When are you coming home ya ? Years passed. You didn't bother to come home !.....
"Goregaon ya ! Isn't it far away from Dadar ?"
"Ya ya ! You, bloody Towny !"
मी हसत असे. तिला चिडवत असे. ती मला ओळखत होती. माझ्या आवाक्याबाहेरचं घड्याळ तिच्या परिचयाचं होतं. मी काल पहिल्यांदा पोचले. घरभर स्वत:चे हसते खेळते फोटो लावून ठेवणाऱ्या, आयुष्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्राचीचं घर.

"आई, अर्ध वर्ष नाही संपलं आणि आपला death toll बघ !" लेक सकाळी म्हणाली.

...त्याचा फास कोणाच्या गळ्यात पडणार आहे...असतं का त्याला माहित ?

रोजची एक जॉब लिस्ट सकाळी माझ्या डोक्यात असते. म्हणजे क्लायंट वाईज काय आणि किती काम आज संपवायचे आहे हे सकाळी डोक्यात तर चालू असतं...

मी त्याची क्लायंट.
आणि एकेक कामं संपवत चाललेला 'तो'.

Monday, 18 April 2011

आठवण...

मित्र एकत्र यावे. शिरस्त्याप्रमाणे. गप्पा व्हाव्या. आणि त्या गप्पांमधून एक अतिशय सुंदर कल्पना जन्म घ्यावी. अडचणींना शरण न जाता, मग त्या मित्रांनी आपली ती सुंदर कल्पना प्रत्यक्षात आणावी. निर्मितीचा आनंद काय वर्णावा ?
कोण होते हे मित्र ? आणि कोणती त्यांची निर्मिती ?
पद्माकर महाजन. स्टेट बँकेचे अधिकारी.
दिनकर बरवे. ग्रंथपाल, किर्ती कॉलेज.
रमेश तेंडुलकर. कवी व मराठी प्राध्यापक, किर्ती कॉलेज.
प्राध्यापक राम पटवर्धन.
एकनाथ साखळकर, (त्यावेळी उपप्राचार्य. किर्ती कॉलेज.)
पद्मा सहस्त्रबुद्धे. चित्रकर्ती....

आणि त्यांची निर्मिती ?
'आठवणीतल्या कविता'...चार भाग.



पहिल्या भागाच्या प्रस्तावनेच्या अखेरीस प्रा. रमेश तेंडुलकर म्हणतात....

'कविताच नव्हेत, जुन्या क्रमिक पुस्तकांतील काही गद्य वेचेही आपल्या आठवणीत असेच राहिलेले असतात - 'दिनूचं बिल', 'म्हातारा आणि त्याचा बैल', 'लांडगा आणि कोकरू' अशा कितीतरी कथा सांगता येतील. उद्या त्यांचंही संकलन करायची योजना कुणी आखील - काय सांगावं, हा उत्साह असाच कायम राहिला तर कदाचित आम्हीही घे संकलन उद्या करू...खरं तर 'आठवणी'चं वर्तुळ कितीतरी अंगांनी मोठं, मोठं करता येण्यासारखं आहे...त्यात कितीतरी अन्य विषयांचाही समावेश होऊ शकेल.
तूर्त अननुभवातूनच चाललेला हा प्रवास फक्त कवितांपुरताच मर्यादित केला आहे.
यानिमित्ताने आधी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आम्ही म्हटल्याप्रमाणे "हा एक मुक्त खजिना आहे, - प्रत्येक वाचकाच्या हृदयकोषात गुप्तपणे दडून राहिलेला...अधिकाधिक रसिकांपर्यंत पोचून त्यांचाच हा मुक्त खजिना त्यांनाच सुपूर्द करण्याचा आनंद आम्हांला लुटायचा आहे."
अशा प्रसंगी-
सोने लुटुनी सांयकाळी मोरू परतुनि आला
बहीण काशी दारी येउनी ओवाळी मग त्याला
दसरा सण मोठा - नाही आनंदा तोटा !
ह्या साकीची आठवण हटकून झाल्याखेरीज कशी रहाणार ?
'नाही आनंदा तोटा',...'नाही आनंदा तोटा'...अशा तल्लीन वृत्तीने या 'आनंदाच्या डोही' यथेच्छ डुंबल्याचा आनंद आपणास मिळाला तर त्या आनंदासाठी या कार्यात 'तोटा' झाला तरी तो 'आनंदाने' सोसण्यात - नव्हे, स्वीकारण्यातही - आम्हाला धन्यताच वाटेल !
रमेश तेंडुलकर
मुंबई
ललितापंचमी
बुधवार ४ ऑक्टोबर १९८९.

हे नक्की की प्रत्येकाच्या आठवणीतील कविता ह्या वेगवेगळ्या असतात...पिढी दर पिढी आपली बालभारती बदलली व आपल्या आठवणी वेगवेगळ्या झाल्या.
आज जर हा खजिना आपल्या हाती लागला तर त्यात कधी आपली आठवण सापडते तर कधी आजी आजोबांनी सांगितलेली त्यांची आठवण सापडते.
आनंद ? अतोनात !

आता ह्या १९८९ साली प्रसिद्ध झालेल्या चार भागांच्या प्रती माझ्याकडे कश्या आल्या ? तर बाबा. हे सगळे बाबांचे जीवाभावाचे मित्र. आणि म्हणून बाबांचा त्यात सहभाग.
आता ह्या प्रती उपलब्ध आहेत का ? बहुतेक नसाव्यात. मग मी हे सगळं तुम्हांला सांगून उपयोग काय ? 'आनंदाच्या डोही' यथेच्छ डुंबल्याचा आनंद एकटीनेच घेणे बरोबर आहे का ? नाही.... म्हणून !
आणि मराठी भाषा मरत आहे अशी बोंबाबोंब करत बसण्यापेक्षा, हे एक ध्येय डोक्यात घेऊन एका पिढीने जी अतोनात मेहेनत केली, त्यातून आपण काही स्फूर्ती घेऊ शकलो तर का नाही....म्हणून...!
:)

Saturday, 16 April 2011

ना ताळ...ना मेळ !

कसलं तरी आर्टवर्क जायचं असतं. आणि त्यामागे जीवाची तोडमोड ! बेजबाबदार माणसं...स्वत:च्या जबाबदारीवर नको ते निर्णय घ्यायला निघतात...आणि घाणेरडं काम करून त्या प्रिंट आउटवर सह्या मागायला येतात !

आर्टवर्कचे दोन भाग असतात. बहुतेक वेळा तरी. एक इमेज आणि दुसरं लाइन आर्टवर्क. दोन्ही कामे वेगवेगळी माणसे करतात. ही कामे चालतात आमच्या स्टुडियो विभागात. स्टुडियो प्रमुखाने, जे आर्ट वर्क जायचे आहे त्याची सर्व प्रथम क्लायंटकडून अप्रूव्ह होऊन आलेली फाईल बघणे, ही अतिशय प्राथमिक गरज. ती फाईल बघूनच त्याला कळणार आहे, ते आर्ट वर्क आपल्या स्टुडियोतील कोण माणूस चांगले करू शकेल ! सिंपल ! पण नाही ना ! स्वत:च्या मुर्खपणाने ज्या कामाला फोटोशॉपची गरज आहे ते काम जो माणूस लाईन आर्टवर्क करतो त्याला देऊन कसे चालेल ? पण दिले ना ! आणि आल्या रात्री जेपेग्स माझ्या अप्रूव्हल्ससाठी !

मग ? आरडा ओरडा ! केस घ्यायची....बोंबाबोंब करायची ! बेसिकली, गोष्टीचा इश्यू करायचा ! घाणेरड्या कामावर मी सही देणार नाही ! जा खड्यात ! स्वत:च्या जबाबदारीवर पाठवा फाईल्स रिलीजसाठी ! पिरीयड !

काल जे आर्ट वर्क शांतपणे, बरोबर निर्णय घेऊन, डेड लाईनमध्ये जाऊ शकलं असतं...त्यावर आता एक मोठ्ठा इश्यू झाला....बोंबाबोंब झाली....रक्त आटवावं लागलं...

...स्टुडियोत आर्ट वर्क चालू आहे.
मी माझ्या मॅकवर सहज माझं फोटोंचं फोल्डर उघडलंय....

मस्त पाऊस...दूरदूर वाहता धबधबा....हिरवंगार माझं कोकण...

कसला ताळमेळच नाही...
जीवाचा आटापिटा....
घर चालवा...
पैसे कमवा....
मुलांना वाढवा...

आणि दुरून दुरून येणारी माझ्या मस्त उन्मत्त कोकणाची हाक ?

कान बंद. डोळे बंद. फोल्डर बंद. मॅकच बंद !

कोकणाकडे दुर्लक्ष.
घराकडे लक्ष !

डोकं नका चालवू मॅडम !
त्यापेक्षा घर चालवा !
:(









Friday, 15 April 2011

चेहरा

संध्याकाळी घरी पोचले. सातच्या सुमारास. म्हणजे लवकरच म्हणायचं. भराभर पोटाचा खोल खड्डा भरला. आईबरोबर कुंकू, लज्जा बघून झालं. 'जगात आता चांगली माणसे खूप कमी उरली आहेत आणि घराघरांत कपटी माणसे वावरत आहेत' हे सर्व दिग्दर्शकांनी मला पटवून देण्याचा आजही प्रयत्न केला.
मग आता ?
पुस्तकांचं कपाट उघडलं. दुर्गा आजींचं 'दुपानी' हातात आलं. कुठलंही पान उघडावं आणि वाचायला सुरुवात करावी. आधीचा, नंतरचा, कसलाही संबध नसलेले छोटे छोटे लेख.

त्यातीलच एक...
................................................

चेहरा

चेहरा ही माणसाच्या व्यक्तिगत जीवनातील अत्यंत महत्वाची गोष्ट. स्वत:च्या चेहऱ्याबद्दल माणसाला वाटणारं आकर्षण कुठल्याही आकर्षणाहून बलवत्तर असतं. कुरूपालाही आपला चेहरा आरशात पाहायला आवडतो मग सुंदर चेहऱ्याबद्दल तर काय बोलावं ? हा चेहरा म्हणजे माणसाला मिळणाऱ्या सामाजिक प्रतिष्ठेचं पहिलं वरदान. पण काय नवल ? माणसाला दोन अवयवांचे प्रत्यक्ष दर्शन घडत नाही. चेहऱ्याचे नि पाठीचे. पाठ म्हणजे एक आंधळा भाग, पण दोन डोळे, दोन कान, नाक नि जीभ, ही रूप, नाद गंध नि रस यांचे अप्रूप अनुभवाचे विश्वच देणारी चार इंद्रिये या चेहऱ्यात असूनही तो काही आपले आपल्याला पाहू शकत नाही. त्याची ओळख पटायची ती दुसऱ्यांनी त्याला पाहिले की त्याच्या दर्शनाच्या प्रतिबिंबातून. म्हणजे माणूस स्वत: पुरता बिनचेहऱ्याचाच असतो. अनुभवाने अलिप्त असतो. आरसा किंवा स्वच्छ जलाशय यांतच चेहऱ्याला स्वत:चे दर्शन घडते. ग्रीक कथांतल्या नार्सिससने स्वत:चे रूप तळ्यातल्या जळात पाहिले नि तो त्या प्रतिबिंबाच्या प्रेमात पडला. आत्मप्रेमाचे हे उदाहरण फार प्रसिद्ध आहे.
आपल्याकडे याच्यापेक्षाही अद्भुत गोष्ट घडून गेली आहे. अर्थात कोण्या एका काळी यज्ञदत्त नावाचा एक अत्यंत सुंदर तरुण होता. आपला चेहरा आरशात निरखायचा त्याला अतिशयच छंद जडला. इतका की त्या प्रतिबिंबित चेहऱ्याशिवाय त्याला दुसरेतिसरे काही सुचेचना. आपला चेहरा प्रत्यक्षात बघायचा ध्यास त्याने घेतला. घर, दार, सारे काही सोडून तो चेहऱ्याच्या शोधात भटकत राहिला. चेहरा काही सापडेना. हात लावून तो कळत होता. पण दिसत नव्हता. यज्ञदत्त भटकता भटकता निराश झाला. विनवणी करून, व्रत करून चेहऱ्याचे दर्शन होईना. आरशाचे ढोबळ माध्यमच त्याला पाहायला लागावे हे शल्य त्याला रुपू लागले. त्याचा जीव कासावीस झाला. प्राण उडू लागले. एक विचार विजेसारखा त्याच्या मनात आला. त्याला उमजले की आपला चेहरा दुनियेत कुठे नाही तर तो आपल्याच डोक्याच्या जागी आहे. तो सुरेख आहे की नाही ही गोष्ट गौण आहे. आपला चेहरा डोक्याला चिकटलेला आहे हीच गोष्ट महत्त्वाची आहे. झाले ! क्षणार्धात त्याची चेहरा पाहण्याची वासना मावळली. ती वासना सर्वंकष असल्यामुळे त्याचे चित्त आता पूर्णपणे मोहमुक्त झाले. त्याला ज्ञान प्राप्त झाले.
महायान बौद्ध पंथाचे सुरंगमसुत्त असे सांगते, की लगेच शांतचित्त होऊन यज्ञदत्ताने ऐहिक जीवनाकडे पाठ फिरवली आणि तो दीक्षा घेऊन भिक्षु झाला.
आरशाशिवायचा चेहरा दुसऱ्याच्या डोळ्यांत आपल्याला दिसतो. आणि त्या नजिकच्या स्नेहमयी डोळ्यांतल्या दर्शनाने आपण खूप सुखी होतो. बापड्या यज्ञदत्ताला हे कळते तर असंख्य प्रेमयुक्त चेहऱ्यांची दर्शने त्याच्या डोळ्यांत लोकांनाही घडली असती. कारण चंद्रवदन युवकाच्या डोळ्यांत डोकावून बघणं कुणा रमणीला आवडलं नसतं ? पण यज्ञदत्त फक्त चेहऱ्याच्या शोधात होता. त्याला सत्य कळले. तेही दर्शन मागे पडले तेव्हा. तेव्हा एक जीवघेणी आच संपली नि त्याची संथ वाटचाल चालू झाली. त्याला आता काहीच शोधायचे नव्हते. बोध झाला नि शोध संपला. आम्ही शोधही घेत नाही नि बोधही घेत नाही. यज्ञदत्त नि आम्ही यांच्यामध्ये फक्त एका सुताचे अंतर आहे, पण ते काही ओलांडण्यासारखे नाही.

आम्ही चेहरा हा चेहरा ठेवीत नाही. त्याचा मुखवटा बनवतो. लोकांच्या प्रेरणांप्रमाणे चलाख होऊन तो घडवतो आणि मग तो चढवूनच वावरतो. तो मग इतका घट्ट बसतो की खरा चेहरा कधी दिसतच नाही. आरशातसुद्धा. फोटोतसुद्धा. तो मुखवट्याच्या थडग्याखाली गाडला जातो. एखाद्याच भाग्यवानाला हे थडगे फोडून आपला चेहरा फिरून वर काढणे जमते.

(हा लेख १९८४ साली 'दीपावली'मध्ये पूर्व प्रसिद्ध झाला होता.)
................................................


भाग्यवान होणे कोणाला नको असते ?
ही अशी तोडफोड...उत्खनन...
माझे देखील चालू आहे...
वर्षानुवर्षे जे गाडले गेले त्याला उन्हं दाखवण्याचा प्रयत्न आहे.

Wednesday, 13 April 2011

चित्रकला

आजचा तास आहे चित्रकलेचा ! :)
कॉलेजच्या दिवसांत, माझ्या नवऱ्याने (शरदने) काढलेली स्केचेस इथे टाकते आहे.
त्याने केलेले जलरंगातील माझ्या बाबांचे पोर्ट्रेट तर तुम्हीं रोज बघताच.

इंग्लिश मुळाक्षरे घेऊन स्केचेसची एक सिरीज त्याने बनवली होती. १९७९ साली 'इंटरनॅशनल इयर ऑफ द चाईल्ड'साठी तयार केलेली...ह्या स्केचेससाठी त्याने वापरले आहे रोट्रीं पेन आणि थोडेसे पोत असलेले त्याचे स्केचबुक. जे कॉलेजच्या दिवसांत सतत त्याच्या बरोबर असे. आणि कधीही कुठेही बसून त्याचे स्केचिंग चालू होत असे. त्यातील 'H' वर उभे असलेले दोघे, आम्हीं आहोत ! चौकडीची टोपी घालून तो आणि दोन शेंड्यांवाली मी ! मी माझा नवरा म्हणून सांगत नाही आहे, पण त्याच्या तोडीचा चित्रकार, मेमरी ड्रॉइंगवरील त्याचा कमांड हा त्यावेळी देखील खूप कमी प्रमाणात बघावयास मिळत असे...सध्या तर कोणी हे अशा पद्धतीची स्केचेस करतं की नाही कोण जाणे. मला तासंतास लेक्चर्स झोडून त्याने मला थोडे सुधारले होते...परंतु, चित्रकला अंगात असावी लागते, शिकवून येत नाही...ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मी आहे !
:)

मला आशा आहे, तुम्हांला त्याची वही बघण्यात आनंदच मिळेल...









Sunday, 10 April 2011

पुत्र व्हावा ऐसा गुंडा....?

त्या दिवशी केशकर्तनालयात जाणे झाले. सोफी. गेले जवळजवळ आठेक वर्षांची माझी जिवाभावाची मैत्रीण. ती ज्या कुठल्या पार्लरमध्ये नोकरी धरते, तिथे मी तिच्या मागे मागे फिरते. आणि बाईसाहेब सुट्टीवर गेल्या तर मी तिच्यापाठी माझे डोके घेऊन अगदी वसईला जाते. पण माझे हे मौल्यवान डोके मी दुसऱ्या कोणाच्याही ताब्यात देत नाही. तर मग ही आजची गोष्ट सोफीची आहे काय ? नाही. गोष्ट सोफीची नाही. परंतु, तिच्यामुळे सुरु झालेली एक विचारधारा...

दुपारची वेळ. थंडगार वातानुकुलीत एक पॉश दालन. समोरील काचांबाहेर पडलेले ऊन आणि त्यातून वहाता वारा. दूरवरील झाडांच्या, हलत्या पानातून जाणवणारा. सोफीची वाट पहाणे भाग होतं. बाहेरचा हलता रस्ता न्याहाळता पंधरा मिनिटे सहज पसार झाली.

सोफीची निमुळती सराईत बोटं केसात शिरली आणि मी डोळे मिटले.

"हाय"
सोफी कोणाशी बोलत होती. केसातील स्पर्शातून स्वत:ला बाहेर काढून डोळे उघडले तर समोर आरशात सोफी व साठीच्या आसपासची एक बाई, दोघी दिसत होत्या. सोफीने जरी हसून त्यांचं स्वागत केलं होतं, तरी त्यांच्या चेहेऱ्यावरील रेषा काही फारशा हलत्या नव्हत्या. चेहेरा गोरा. गर्भश्रीमंत.
"ती शेजारी बसलेली बाई माहितेय का कोण आहे?" सोफी कानी कुजबुजली.
"नाही बाई ! कोण आहे ?"
"ते मध्ये रेप केला ना एका बाई वर, मिल मध्ये नेऊन ! त्या मुलाची आई !"
दुसऱ्या स्त्रीवर बलात्कार करणाऱ्या पुरुषाची माता कशी असेल, असा कधी प्रश्र्न नव्हता पडला. परंतु, आज दर्शन झाले. त्या चेहेऱ्यावर हास्य नव्हते. 'एका स्त्रीवर बलात्कार करणाऱ्या पुरुषाची आई' म्हणून समाजात ओळख असणे काही सोप्पे असणार नव्हते...

"त्या दिवशी पाटील, मी ठाण्याला गेलो होतो...आणि माझी गाडी टो झाली."
पन्नाशीच्या आसपासचे तेंडुलकर साठीच्या पाटलांना एक अनुभव कथन करत होते.
"हो ? काय झालं मग ?"
"काही नाही. गेलो मी स्टेशन वर. लायसन्स दिलं. आणि पैसे भरत होतो. तर त्या माणसाने माझे नाव वाचले."
पाटील हळूच हसले. "मग ?"
"अरे ! तो मला एकदम विचारायला लागला ! सचिन तेंडुलकरचे बाबा का तुम्हीं ?....म्हटलं हो !...मी दिलेले पैसे तो लगेच परत करायला लागला ! अहो, आधी सांगायचं ना! कसला लाडका आहे, अहो तो आमचा ! मी कसले तुमच्याकडून पैसे घेतोय !"
पुढे काय घडले असणार ते खरं तर पाटलांना वेगळं सांगायची गरज नव्हती...पाटील हसत होते. "मग ?"
"म्हटलं, असं कसं ? माझी चूक झालेली आहे ! तेव्हा दंड भरणे मला भाग आहे ! असं चालणार नाही ! घ्यायला लावले मी त्याला पैसे !....गंमत आली पण ! आजपर्यंत मला लोकं 'रमेश तेंडुलकर' म्हणून ओळखत होते...आज सचिनचे बाबा म्हणून ओळखतात...आनंद झाला !"
एकमेकांवर जिवाभावाचे प्रेम असलेले, सम स्वभावाचे मित्रवर्य, खुशीत हसले.

असे काही आयुष्यात करून जावे...
...ज्यांनी जन्म दिला त्यांना असे निर्मळ हसता यावे...

Friday, 8 April 2011

सुरापान

देव सुरा पीत असत. ते प्रमाणात पीत असत की अधेमध्ये प्रमाण विसरत असत कोण जाणे. ते पीत असत असे म्हटले तर देवांनी आता सोडली किंवा देव आता अस्तित्वातच नाहीत असा काहीसा त्यातून अर्थ निघतो.

"काय मोरे भाऊ, तुम्हीं कुठे बघणार फायनल?"
"अरे, आम्हीं मस्त अंधेरीला एक हॉल बुक केलाय!"
"अरे व्वा! भारी!"
"असा मोठ्ठा हॉल आहे. आणि त्याच्या डाव्या हाताला आम्हीं देवघर सारखं केलंय."
"देवघर?"
"हो यार! आमच्या बायकांना लागतात ते असे देव. मॅच मध्ये काही गडबड झाली की त्या जाऊन बसतात तिथे! आणि आम्हांला पण जरा बरं वाटतं यार!"
"हम्म्म्म"
"आणि उजव्या हाताला असा मस्त मोठा बार टाकलाय! अशे मस्त टकाटक पिणार..आणि मस्त मॅच बघणार! धमाल येणारेय यार!"
"अरे व्वा! डाव्या हाताला देव आणि त्यांच्या समोर मद्यपान! सहीयेय भाऊ!"
"अरे! भारी आहोत बॉस आपण!"
"ऑफकोर्स ऑफकोर्स!"

गणपती विसर्जनाच्या दिवशी, एके वर्षी लालबागच्या राजाचे रस्त्यात दर्शन झाले होते. अलोट जनसमुदाय. अंगावर येणारा. घामट अनोळखी स्पर्श. आसमंतात दारूचा हलकासा दरवळ.

बघितलंय. हेही याची डोळा बघितलंय. घरात गणपती. रात्र रात्र जागरण. जुगार जोरात. पैश्याची देवाणघेवाण. पहाटे घरातील पुरुष मंडळी घरी परतलेली बघितली. आरतीला दारू पिऊन झोकांड्या खात झांजा वाजवलेल्या देखील ऐकल्या. समोर गणपती हलकेसं हसत विराजमान झालेला बघितला. मनाने टाहो फोडला. आक्रोश केला. गणपतीने खुणगाठ फक्त मारली. ऐकलेल्या आक्रोशाची.

देव सुरा पितात. मग त्यांचे 'लिव्हर' देखील 'डॅमेज' होते काय? म्हणे, लिव्हर हा शरीरातील एकच अवयव असा आहे, की जर त्यावरील अत्याचार थांबवले गेले तर ते पुन्हा आपली हकनाक गेलेली शक्ती मिळवू शकते. मग देवांना, त्यांच्या बायका इस्पितळात भरती करतात काय? त्यांना नियमितपणे औषधे देतात काय? आणि तरीदेखील देव पितात काय? व्यसन त्यांच्या हाताबाहेर जाते काय? इथून तिथून, रस्त्यावरून ह्या देवांना त्यांच्या बायका उचलून घरी आणतात काय? त्यांच्या बायका कधी टाहो फोडतात काय? आणि फोडलाच तर पिऊन तर्र झालेल्या देवांच्या कानी तो पडतो काय?

की देव सुरा पितात...
आणि म्हणूनच, आणि म्हणूनच...
पिऊन तर्र बेभान होणाऱ्या आपल्या भक्तजनांकडे देव दुर्लक्ष करतात काय?
(तूनळीची जी लिंक टाकली आहे ती माझी मैत्रीण वंदना, हिने त्यावेळी शूट केलेली आहे. )

Wednesday, 6 April 2011

बाल हक्क...

तेच ते आळोखेपिळोखे. तीच ती ओठांना जबरीने पाडलेली मुरड आणि तेच ते अश्रू. तीन ते चार वर्षांचा इतकुसा तो जीव. पण काय ते थैमान. आणि कोणासमोर? तर ती सात ते आठ वर्षांची ताई. काय सांभाळणार ताई ह्या आकांड तांडवाला? काळासा चेहेरा. केसांच्या झिपऱ्या. गळत नाक. गोबरे गाल. फुटपाथावरील ग्रीलमध्ये हात अडकवलेले. ताईचा प्रयत्न त्यातून तिला दूर करण्याचा. परंतु, लोखंडी ग्रील व त्यावरील चिमुकल्या हातांची घट्ट पकड. ताईच्या सर्व आवाक्याबाहेरचे.

नजरेसमोर आलं ते हेच. काही वर्षांपूर्वीचे. तेच ते आळोखेपिळोखे. गाल गोबरे. गोरे गोरे. थैमान घालून लालबुंद झालेले. अंग सगळे सोडून द्यावयाचे. रस्त्यात फतकल मारायचे. ओठ असे काढायचे. टपोऱ्या डोळ्यांतून पाण्याचे हुकमी लोट वहावायाचे. आसपास लोक बघत बसावे. आणि हे भर रस्त्यावील नाटक अगदी रंगात यावे. फुटपाथाच्या अलीकडील एका जीवाला कधीच कळून गेले होते. बालहट्ट हा असाच करावा. भोकांड हे असेच पसरावे. आसपासच्या जनतेचे लक्ष हे असेच वेधून घ्यावे. आईला वा बाबांना आपल्याला हवे ते करावयास भाग पाडावे.

वय तेच. हट्ट पुरवून घेण्याची तऱ्हा तीच. पण मग वेगळे काय?

...वेगळे, नशीब.

फुटपाथावरील त्या चिमुकल्या जीवाला बालहट्ट करण्याचा अधिकार, नियतीने नव्हता दिला. कधीतरी एक दिवस त्या जीवाला हे कळून चुकेल. त्याच्या आयुष्याचे सत्य...हट्ट, हा हक्क आपला नव्हे....

तिच्या ताईने तिचं बखोट हाती पकडलं...फरफटत ती वरात फुटपाथाच्या कोपऱ्यावर असलेल्या झोपडीकडे चालती झाली...तितक्यात सिग्नल सुटला व टॅक्सीवाल्याने गाडी सुरू केली.

जर जन्माला यावयाच्या आधी कोणा पोटी जन्म घ्यावा ह्याची निवड करता आली...तर काय मग काहीजण निपुत्रिक रहातील?

Tuesday, 5 April 2011

सचिनचं शिवाजी पार्क, २ एप्रिल २०११ च्या रात्री!

जिंकलो जिंकलो जिंकलो!
स्वस्थ घरी बसवेना. सगळं जग जागं...मग का जाऊ नये...सचिनचं शिवाजी पार्क काय करतंय, का बघू नये?!
त्या उत्साहाच्या भरात अंगातील विसराळू विनूने तशीच एक डुलकी मारली आणि कॅमेरा घरीच विसरले! पण मग मोबाईलच्या कॅमेरावर फोटो काढलेले आहेत..मला माहित आहे की फोटोत अंधार नुसता माजलाय! पण लक्षात घ्या...मध्यरात्र झालेली होती.....परंतु जगभराचा प्रत्येक भारतीय जागा होता...आणि तोच मूड त्या फोटोमध्ये आहे...अंधाराकडे कानाडोळा करा...आम्हां शिवाजी पार्कवाल्यांच्या भावना समजून घ्या!
आणि कदाचित तुमचं सचिनवरील प्रेम तुम्हांला त्या मिट्ट अंधारात देखील दृष्टी देईल...आणि रात्री एक वाजता खचाखच बहरलेले टक्क जागे, नाचणारे, गाणारे शिवाजी पार्क तुम्हांला दिसून येईल.








Saturday, 2 April 2011

जादुई बटवा

नेहेमीच प्रेमाची फळे गोमटी नसतात. किंवा सगळ्याच प्रेमाची फळे काही गोमटी नसतात. आणि खरं तर प्रेमप्राप्तीसाठी त्याग असतो. मेहेनत असते. आणि समजा हे प्रेम प्राप्त झालेच तर ते वाढते राहावे, त्याला काही बाधा येऊ नये म्हणून त्याची जोपासना करावी लागते. डोळ्यात तेल घालून राखण करावी लागते. जसे गुलबकावलीचे फुल मिळावे म्हणून मेहेनत व गवसले की ते सतत टवटवीत राहावे यासाठी त्याची निगराणी.

ह्या लेखनप्रवासाला तुम्हां सर्वांचे प्रेम लाभले ह्याचे मला अप्रूप. त्या प्रेमाने मग हलकेच नेऊन सोडले अथांग आकाशात. पाठीराख्यांचा एकेक आकडा जशी एक एक चांदणी. वेचत गेले. निघाले तेव्हा हातात चिमुकला बटवा होता...नव्हतं माहित....तो होता जादूचा. एकेक चांदणी जशी आत शिरत गेली, जादुई बटवा वाढता झाला.

ह्या धुंद प्रवासात काही बक्षिसे मिळाली...त्या बक्षिसांवर अधिकार कोणाचा?
तुम्हीं दिले...मी फक्त राखले...हळूहळू वृद्धिंगत झाले.
माझा चांदण्यांचा हार. एकेक चांदणी हळुवार ठेवणीत बसवलेली.

...ह्याबद्दल मी ऋणी...हे ऋण कधीही संपू नये असे...ओझे नसलेले ऋण...




स्टार माझा ब्लॉग माझा...













































मी मराठी लेखनस्पर्धा २०११

Friday, 1 April 2011

पिंपळ

शहरात पिंपळ नुसता नाचतो आहे!
थरथर!
हिरवागार व त्यावर हलकेसे गुलाबी नक्षीकाम!
दुरूनच जाणवावा...स्पर्श त्याचा मुलायमच असावा...
नक्की बघा...
थोडी नजर वर टाका....
तेव्हढंच कारण...
कायम झुकलेली नजर,
आकाशात भिरकवायला...